डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

साथी बबन डिसोजा : सच्चे समाजवादी, प्रेमळ काका

सच्चा समाजवादी ही ओळख बबनकाकांना तंतोतंत शोभते. आधी प्रजा समाजवादी पक्ष आणि 1977 नंतर जनता पार्टीमध्ये काका व मावशी सक्रिय राहिले. त्यानंतर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री भाई वैद्य यांनी स्थापन केलेल्या सोशलिस्ट पार्टीच्या सर्व बैठकींसाठी अगदी नजीकच्या काळापर्यंत ते उपस्थित राहायचे. बॅ.नाथ पै आणि प्रा.मधु दंडवते यांच्या निवडणुकीत उमेदवार, मतदार आणि कार्यकर्ते यांच्यातील समन्वय साधणारा पडद्यामागचा शिल्पकार म्हणजे बबनकाका. दोघांच्या निवडणुकींच्या काळात कार्यालये आणि प्रचारप्रक्रिया चालवणे ही त्यांच्यावर असलेली हमखास जबाबदारी. देवरुखचे ‘मातृमंदिर’ आणि मालवण येथील ‘बॅ. नाथ पै सेवांगण’ ही बबनकाकांनी इतर सहकाऱ्यांसमवेत साकारलेली दोन स्मारके म्हणजे समाजवादी नेत्यांच्या कार्यावर असणारी आत्मविश्वासपूर्ण आणि  अढळ निष्ठा यांची प्रतीके आहेत.

बबन डिसोजा (बबनकाका) यांनी आयुष्याचा शहाण्णव वर्षांच्या कालावधीमधील बहुतांशी काळ समाजवादी चळवळ आणि राष्ट्र सेवादलामध्ये घालवला. त्यांच्यावर लेख लिहीत असताना त्यांच्या कुटुंबीयांना म्हणजेच रतनमावशी आणि राणी यांना वगळणे माझ्यासाठी निव्वळ अशक्य! तसेच, राणी आणि मी जिथे वाढलो, ती नवसमाज सोसायटी आणि आमचे घरेलू संबंध या लेखात येणेसुद्धा टाळता येणे शक्य नाही. बबन डिसोजा हे आमच्यासाठी एक अतिशय प्रेमळ काका आहेत. अगदी आजसुद्धा मी, माझी धाकटी बहीण किंवा माझी मुले त्यांना दिसली की, पटकन पिशवीमध्ये हात घालून जो काही खाऊ असेल तो आमच्या हातात दिल्याशिवाय ते पुढे जात नाहीत. आम्हीही कौतुकाने आणि हक्काने तो घरी नेतो, आवडला म्हणून सांगायला लागलीच फोन करतो. अशा या स्वातंत्र्यसेनानी आणि पुरोगामी व्यक्तीशी जवळून असलेले नाते माझ्यासाठी अतिशय मोलाचे आहे.  

बबनकाकांचा जन्म मालवण तालुक्यातील कट्टा या गावी 3 सप्टेंबर 1924 रोजी झाला. ख्रिस्ती घरात गणेश चतुर्थीला मुलगा झाला याचे काय अप्रूप! आई लहानपणीच गेली. वडील आणि धाकटी बहीण घरी असायचे, पण काकांचे शालेय शिक्षण त्यांच्या काकांच्या घरी म्हणजे मालवणमध्ये टोपीवाला हायस्कूलमध्ये झाले. विद्यार्थिदशेत असतानाच राष्ट्र सेवादलाशी संपर्क आला. गांधीजींच्या ‘चले जाव’ चळवळीपासून ते मालवण बॉम्बस्फोटाचा प्रयत्न असे सर्व काही जवळून पाहिले. साने गुरुजींबरोबर मेघा भवन (दादर टीटी, मुंबई) मध्ये राहत असताना मिल मजदूर सभेची स्थापना झाली. त्यामध्ये असे कार्यकर्ते होते. कार्यालयाची दैनंदिन जबाबदारी बबनकाकांनी सांभाळायला सुरुवात केली. त्याचबरोबर मालवणमध्ये मुलींची सेवादलाची शाखा ते चालवीत होते.

बबनकाका आणि रतनमावशी दोघेही संयुक्त कुटुंबात वाढलेले. काका चुलत भावंडांच्या सान्निध्यात आणि रतनमावशी मावस भावंडांत. एकत्र कुटुंबात मोठे झाले तरीही पारंपरिक विचारसरणीत दोघेही अडकले नाहीत, आपल्या घरामध्ये कायम येणाऱ्या-जाणाऱ्यांचा मनापासून पाहुणचार करण्याचा गुण त्यांनी अंगीकृत करून घेतला होता, हे नक्की. बबनकाकांचे कोकण प्रदेशाशी असलेले नाते विलक्षण आहे. प्रभाकरराव देसाई, बापू शिरोडकर, शाम कोचरेकर, शंभू भाऊ बांदेकर हे तर त्यांचे जुने आणि जवळचे मित्र; पण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास सर्व तालुक्यांत आणि अगदी गोव्यापर्यंत त्यांच्या स्नेही मंडळींचा गोतावळा आहे. (प्रभाकरराव देसाई यांच्याबरोबर बबनकाकांची 1957 पासून असलेली मैत्री अजूनही तितकीच घट्ट आहे, महिन्या दोन महिन्यांतून एकदा तरी प्रभाकरराव व त्यांचे कुटुंबीय बबनकाकांना भेटायला येतातच) बबनकाका व रतनमावशीच्या दर वर्षी गोव्याला एक-दोन वाऱ्या असायच्याच. वास्तव्य मुंबईत असूनसुद्धा त्यांचे बारीक लक्ष रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेच्या अडीअडचणी सोडविण्याकडे असायचे. तेथील लोकांना आजारपणातील औषधोपचारासाठी मुंबईत आल्यावर डिसोजा परिवार हा हक्काचा आधार असायचा. चोवीस तास घरी राहणारी बानू त्यांच्याबरोबरीने सर्वांचा पाहुणचार आणि राणीची देखभाल करायची.

रतनमावशी (रत्ना पै) ही मंगलूरची. उडुपीमध्ये जन्म झाला. तिघी बहिणींमध्ये मावशी सर्वांत धाकटी. मोठी बहीण आणि तिचा नवरा मुंबईत परळला राहायचे, हॉटेल चालवायचे. या शेणोय दांपत्याच्या घरी मुंबईत येणारे सर्व नातेवाईक राहायचे. तिथे राहून रतनमावशीने चिकित्सक समूहाच्या शाळेमध्ये शिक्षण घेतले. तिकडचं वातावरण पुरोगामी होतं. सिद्धार्थ कॉलेजमध्ये तिच्या सामाजिक जाणिवेला उभारी आली. कॉलेजमध्ये असलेल्या ‘लोकसभे’मध्ये ती मंत्रिपदावर तर होतीच, परंतु माजी केंद्रीय रेल्वेमंत्री मधु दंडवते, प्रा.रमेश तेंडुलकर (सचिन तेंडुलकर यांचे वडील) अशा दिग्गजांशी तिचा संपर्क तिथे आला आणि प्रजा सोशलिस्ट पार्टीचे (पीएसपी) काम करायला लागली.

रतनमावशीचे मावसभाऊ (राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असलेले चित्रकार) व्ही.एन.ओके त्या काळात युसूफ मेहेरअली यांच्या सांगण्यावरून देशभरातील समाजवादी नेत्यांची रेखाचित्रे काढणे, अशी महत्त्वाची कामगिरी करीत होते (आजसुद्धा अनेक समाजवादी व्यक्तींची कृष्णधवल चित्रे पाहायला मिळतात.) ओलार लंके (गावाचे नाव) आणि आडनाव शेनोय यावरून आपले नाव ओ’के असे त्यांनी ठेवले होते. काँग्रेस हाऊसमध्ये एक खोली घेऊन रतनमावशी, ओकेमामा आणि भाची भारती शेनोय राहू लागले. तिथे नियमितपणे पीएसपी आणि राष्ट्र सेवादलाचे कार्यकर्ते येऊ लागले. लग्नाच्या आधीपासून प्रमिलामावशी दंडवते आणि मृणालमावशी गोरे आदींनी स्थापन केलेल्या समाजवादी महिला सभेमध्ये रतनमावशी सक्रिय होती. तिथल्या मैत्रिणी, विशेषतः साने गुरुजी यांची मानसकन्या सुधामावशी (बोडा), प्रमिलाताई संघवी आणि विमलताई परांजपे आयुष्यभर तिच्या सख्या राहिल्या. यापैकी तिघी जणी विविध शाळांच्या मुख्याध्यापिका होत्या.

बबनकाका आणि रतनमावशी यांनी 1954 मध्ये आंतरधर्मीय विवाह करायचे ठरवले, तेव्हा ओकेमामांचा विवाहाला पाठिंबा होता, मात्र मावशीच्या माहेरच्यांकडून कडाडून विरोध झाला. खुद्द एस.एम.जोशी (अण्णांना) हस्तक्षेप करून घरच्यांना समजावून सांगायला लागले की, दोघेही समाजवादी विचारसरणीचे असल्यामुळे रतनमावशीच्या लग्नानंतर धर्म बदलण्याचा प्रश्नच उद्‌भवणार नाहीये म्हणून! बबनकाकांच्या घरून कोणताही विरोध नव्हता. लग्न झाल्यावर आठ दिवसांतच दोघे साथी अशोक मेहता यांच्या निवडणूक प्रचारासाठी गोंदिया जिल्ह्यात गेले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्तिसंग्राम तर जोमाने सुरू होताच.

रतनमावशी उच्च शिक्षित. त्या काळात एम.ए. आणि बी.टी. झालेली. बबनकाका आणि ती भाई जीवनजी लेनमध्ये प्रजा सोशलिस्ट पार्टीचे (पीएसपी) काम करू लागले, तेव्हा डॉ.शांती पटेल यांच्या सांगण्यावरून ती पार्टीची पूर्ण वेळ कार्यकर्ती झाली. वसंत बापट, महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री सदानंद वर्दे आणि लीलाधर हेगडे यांनी सांताक्रूझ, मुंबई येथे 1970 मध्ये साने गुरुजी शाळेची स्थापना केल्यानंतर रतनमावशीला तिथे मुख्याध्यापिका म्हणून येण्यास विनंती केली, ते तिने मान्य केले. शाळेमधून निवृत्त झाल्यावर चित्रा नाईक यांचे मुंबई विद्यापीठामधील प्रौढ शिक्षण केंद्राचे संचालन तिने केले. अतिशय नीटनेटके आणि प्रसन्न, हसतमुख असे तिचे व्यक्तिमत्त्व होते. संध्याकाळी ती शाळेतून परत येताना दिसली की, तिला बघायला खूप आवडायचे. जुलै 2005 ला (मुंबईमध्ये थरकाप उडवणारी अतिवृष्टी व्हायच्या आठवडाभर आधी) रतनमावशी गेली. आम्हा दोघी बहिणींना मावशीची आठवण म्हणून राणीने आवर्जून तिची एक सुंदर खादीची साडी दिली. खूप मोलाचा ठेवा आहे तो आमच्यासाठी.  

राणीचा जन्म 1956 मध्ये झाला. रतनमावशीच्या घरच्यांशी संवाद नसल्याने माहेरी जाणे शक्य नव्हते. तेव्हा प्रमिलामावशी दंडवते, स्वतःला बाळंतपणाचा कसलाही अनुभव नसताना ‘मी करते,’ असं म्हणून रतनमावशीला त्यांच्या शारदाश्रम, दादर येथील राहत्या घरी घेऊन गेली. बाळ-बाळंतीण दंडवते कुटुंबीयांसमवेत तीन-चार महिने राहिले. राणी झाल्यावर महिन्याभरात बबनकाका गोंदियामध्ये पीएसपीच्या प्रचारासाठी गेले. ते मुंबईला परत आल्यावर डिसोजा कुटुंब जोगेश्वरीला राहायला गेले. बबनकाका समाजवादी चळवळीचे आयुष्यभर पूर्ण वेळ कार्यकर्ते आणि रतनमावशी कार्यकर्ती व शिक्षिका अशा जबाबदाऱ्या निभावून दोघांनी हसत-खेळत संसार चालवला. 1960 च्या अखेरीस डिसोजा आणि (आमचे) गुप्ते कुटुंबे नवसमाज सोसायटी बांधून झाल्यावर तिथे राहायला गेली. आम्ही दोघी चार वर्षांच्या आणि वयात केवळ एका महिन्याचं अंतर. मग राणी आणि मी लहानपणी मैत्रिणी होतो, यात काय नवल? जुळ्याचं दुखणं अशी आमची गत होती! एकमेकींच्या घरचा स्वयंपाक अधिक रुचकर वाटायचा. जिच्या घरी आवडीचा स्वयंपाक बनवला असेल असं वाटायचं, तिथे आम्ही दोघी हमखास हजर राहायचो. दूध-भात, पापलेटची तुकडी, कोळंबीचे कळवण, बटाट्याची भाजी दोघींच्या आवडीची. एकमेकींना चांगलं-चुंगलं देता यावं म्हणून एका ताटात जेवायचा आग्रह असायचा. संध्याकाळी अंधार पडला लागला की, मी तिला समोरच्या इमारतीत असलेल्या तिच्या घरी ‘सोबत’ म्हणून सोडवायला जायचं आणि त्यानंतर तिने मला सोडवायला यायचं- असं आमचं न संपणारं नाटक सुरू असायचं. मग अति झालं की बानू तिला न्यायला आमच्या घरी यायची. प्रचंड ताटातूट झाल्यासारखे वाटायचे. कधीही आमच्यामध्ये रुसवा-फुगवा, भांडण, अबोला झालेला मला आठवतच नाहीये. आजसुद्धा नियमितपणे भेटत नसलो तरी बालपणातील तो ओलावा आणि प्रेम हृदयाच्या कोपऱ्यात जपून ठेवलंय, असं वाटतं. वाढदिवस लक्षात ठेवणे, एकमेकींसाठी कधी तरी आठवणीने काही तरी घेऊन जाणे असे अजून सुरूच आहे.

आम्हा दोघींच्या वेगवेगळ्या शाळा निवडण्यामागे आमच्या आई-वडिलांची कारणे बोलकी होती. राणीवर ख्रिस्ती शाळेत ख्रिश्चन धर्माचा प्रभाव होऊ शकतो, म्हणून तिथे पाठवायच्याऐवजी तिचे मराठी शाळेत नाव घालायचे ठरवले. रतनमावशी साने गुरुजी विद्यालयाची मुख्याध्यापिका असल्याने तिथे राणी विद्यार्थिनी नसावी, हा पण विचार होता. म्हणून विलेपार्ले पूर्वमधील प्रार्थना समाज शाळेत (आणि त्यानंतर दादर येथील मुलींचे समर्थ विद्यालय) इथे राणीचे शालेय शिक्षण झाले. माझ्या बाबतीत त्याच्या अगदी उलट. जवळपासच्या मराठी शाळांमध्ये एकच भाषा बोलणारे, एकाच धर्माचे आणि सवर्ण जातींमधील लोक मुले पाठवतील, ही माझ्या आई-वडिलांच्या मनात असलेली चिंता. तिथे व्यवस्थापनातील काही व्यक्ती हिंदुत्ववादी विचारसरणीकडे झुकले असण्याची शक्यता लक्षात घेता, आपल्या मुलींना सर्व धर्मांतील मुले येतात अशा इंग्रजी शाळेत पाठवावे, असा आमच्या घरी निर्णय झाला. रेल्वे पूल ओलांडून पाऊणएक तास चालत जावे लागायचे. इतक्या लांब असलेल्या ख्रिस्ती नन्सच्या शाळेत मला आणि माझ्या धाकट्या बहिणीला पाठवले. वरकरणी विरोधाभास वाटावा असे हे निर्णय दिसत असले, तरी दोन्ही कुटुंबे आपल्या मुलांच्या आयुष्यात असणारे संभाव्य धोके लक्षात घेऊन अतिशय सुजाण पालकत्व निभावत होते, हे आमच्या बालमनाला तेव्हा कुठे समजायचं? फक्त दोघी एका शाळेत नसल्याबद्दल वाईट वाटायचं.

राणीचा बाप्तिस्मा झालेला नाही, चर्चमध्ये कधीही गेलेली नाही (आम्हा दोघींच्या घरात देव-धर्म नव्हताच) तरीही तिचे ‘रिटा डिसोजा’ हे नाव ऐकून शाळेत ‘अरेच्या, तू ख्रिश्चन आहेस का? वाटत नाहीस’ अशा शब्दांत कुतूहल व्यक्त केलं जायचं. माझ्या आईशिवाय राणीला रिटा म्हणून कोणीच हाक मारायचे नाही. आई तिला ‘रीटू’ म्हणायची. सुरुवातीस राणी ‘मी ख्रिश्चन आहे की नाही हे मला माहीत नाही,’ असं म्हणायची. आपण ख्रिश्चन नाही हे पटवण्याचा प्रयत्न करायची, कालांतराने ती उत्तर देण्यास उत्सुक असायची. वाटच बघायची प्रश्न कधी येतो त्याची. आपण इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत स्पेशल आहोत, याची तिला कालांतराने गंमत वाटायला लागली! कधीही तिला वाईट अनुभव मात्र आला नाही, शाळा-कॉलेजमध्ये चांगल्या मैत्रिणी तिला लाभल्या. रतनमावशीची साडी, कुंकू, मंगळसूत्र पाहिलं की तिलासुद्धा शाळेत पालक, शिक्षक स्तंभित होऊन म्हणायचे. तुम्ही ‘डिसोजा’ असाल, असं वाटत नाही! राणीला नेहमी प्रश्न पडायचा की, ख्रिश्चन असणे, दिसणे म्हणजे नेमके काय? पुरोगामी परिवारांमध्ये विचार महत्त्वाचे होते, धर्म नगण्य होता- हे समाजाला कळणे अवघड होते. आज तर त्याहून अवघड होत चाललंय, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. आमच्या आई-वडिलांचे (तसेच बहुतांशी समाजवादी कुटुंबातील व्यक्तींचे) आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह होते, सर्वांची नोंदणीकृत पद्धतीने लग्ने झालेली होती. जन्म, विवाह, मृत्यू अशा कोणत्याही घटना घडत असताना धार्मिक विधी झाला नव्हता, कोणताही समारंभ धार्मिकरीत्या साजरा केला जात नव्हता. हा फार मोठा संस्कार आमच्यावर आपोआप झाला असं मी निश्चितपणे सांगू शकते. मागे वळून बघताना राणीला डिसोजा आडनाव असलेल्या आई-वडिलांच्या कुटुंबात जन्म घेतल्याचा आनंद वाटतो. आडनावामुळे मित्र-मैत्रिणींबरोबर चर्चा करायची संधी मिळाली, असंच तिला वाटतं.

लहानपणापासून ती काय आणि मी काय- आई वडिलांबरोबर जाहीर सभा, शिबिरे अशा सर्व ठिकाणी जायचो. आपण समाजवादी आहोत, ही संकल्पना आपसूकच मनात रुजली. दुसरी ओळख विशेष करून धर्माची आणि जातीची महत्त्वाची नव्हती. आपल्या वैचारिक समूहातील कोणी वारले की, घरचाच माणूस गेल्यासारखा दु:खी माहौल असायचा. नाथ (पै) काका 1971 मध्ये गेल्यावर पहिल्यांदा आपलं कोणी तरी गेलंय हे उमजलं आणि मी ओक्साबोक्शी रडले, असं राणी म्हणायची. इतक्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू त्याआधी अनुभवला नव्हता म्हणून. 

प्रजा समाजवादी पक्ष आणि हिंद मजदूर सभेची अधिवेशने आमच्यासाठी वार्षिक समारंभ होते. निवडणूक आली रे आली की, आमची उत्साही वानरसेना सर्वांत पुढे असायची - कार्ड लिहिण्यासाठी, घरोघरी ती पोहोचवून ‘प्रचार’ करण्यासाठी, हिरीरीने प्रजा समाजवादी पक्षाचा manifesto वाचून दाखवण्यासाठी. आणीबाणीमध्ये आणि 1977 च्या ऐतिहासिक निवडणुकीच्या काळात तर रात्री-अपरात्री भिंती रंगवणे, लोकशाहीवादी घोषणा लिहिणे असे उद्योग आम्ही दोघी आणि पार्ल्यातील समाजवादी परिवारांमधील तरुणमंडळी करायचो. सर्वांना घरातून पाठिंबा असल्यामुळे आमचा उत्साह द्विगुणित झालेला असायचा.

राणी उत्कृष्ट चित्रकार आहे. ओकेमामांच्या कुशल सान्निध्यात वाढलेली. राणी जेजे स्कूल ऑफ आटर्‌समध्ये पदवीधर झाली, तर त्यात आम्हाला काही आश्चर्य वाटले नाही. मी 1981 मध्ये एका प्रकल्पावर काम करत असताना आम्ही दोघींनी प्रदर्शन बनवले होते. बेबी फूड निर्माण करणाऱ्या कंपन्या बाळ होताच हॉस्पिटलमध्ये ‘बाळंतविडा’ दिल्यासारखे फुकट पाकीट देऊन आईच्या अंगावरचे दूध कसे तोडतात, महागडी दूध पावडर विकत घेण्यास व बाटलीने दूध पाजण्यास नवख्या आईला कसे उद्युक्त करतात आणि न परवडणारी पावडर पुरवठ्यास यावी म्हणून ते गरीब वस्त्यांमध्ये प्रमाणाबाहेर पातळ (अनेकदा दूषित पाण्याने) कसे केले जाते, असा विषय होता. राणीने रेखाटलेली बोलकी चित्रे आणि त्याच्या जोडीला मी एकत्रित केलेली आकडेवारी, फार्मा कंपन्यांचे राजकारण वगैरे माहिती आम्ही चटयांवर लावली होती.

समाजवादी समूहातील विश्वासार्ह असे डिसोजा दांपत्य आणि कुटुंब सतत प्रेमाने ओथंबलेले असायचे. आपल्या चिमुकल्या फ्लॅटमध्ये अनेक दशकांपासून सदैव पाहुणचार करण्यासाठी तत्पर असायचे. कोणत्याही वेळी त्यांचे दार ठोठावले तरी चालायचे. विमानतळाजवळ, विलेपार्ले येथे घर असल्यामुळे तर रात्रंदिवस लगबग असायची. राणीने एक आठवण सांगितली. काका प्रवासात असताना एकदा मध्यरात्रीनंतर अचानक दारावर थाप पडली. रतनमावशी आणि राणी खडबडून जाग्या झाल्या. ‘मी शिवाजी पाटील आहे, घाबरू नका’ असे ऐकल्यावर दोघींनी दार उघडले. शिवाजीराव पाटील हे उत्तर महाराष्ट्रात साखर सहकारी संस्थांचे जनक (आणि अद्वितीय अभिनेत्री स्मिता पाटील तसेच बालरोगतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ती डॉ. अनिता पाटील देशमुख यांचे वडील) होते, ही बाब सर्वज्ञात आहेच. एस.एम.जोशी, नानासाहेब गोरे, एच.व्ही.कामत, बॅरिस्टर नाथ पै, दंडवते कुटुंबीय आणि इतर समाजवादी मंडळी डिसोजा कुटुंबीयांकडे नियमितपणे येत-जात असत. मग संध्याकाळी उदय दंडवते, राणी, मी आणि इतर चिल्लीपिल्ली गप्पा मारायचो, खेळायचो. धर्मानुसार नावे वेगळी कशी असतात, नावापुढे आडनाव का असते, अशा गहन विषयांवर आमच्या बाल बुद्धीनुसार चर्चा करायचो. जात हा फारच वाईट प्रकार आहे, असा ठाम निष्कर्ष मांडायचो. ज्या वातावरणात आम्ही लहानाचे मोठे होत होतो तिथे अशा प्रकारच्या चर्चा होणे स्वाभाविक होते.

मुंबईच्या पश्चिम उपनगरात समाजवादी विचाराचे खूप लोक होते. अगदी वांद्रे येथे असलेल्या सदानंद-सुधा वर्दे, तसेच मधु-चम्पाताई लिमये या कुटुंबांपासून ते गोरेगाव येथील मृणालताई गोरे यांचा परिवार आणि बाबूराव सामंत यांच्यापर्यंत व्याप्ती होती. अंधेरी येथे प्रा.मणी-पद्माकर कामेरकर, सुधा-तुलसी बोडा आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद-मेहरुन्निसा दलवाई ही कुटुंबे होती (सर्व जण आमच्यासाठी काका-मावशी असे होते). विलेपार्ले तर समाजवादी विचारांचा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा बालेकिल्लाच होता. राष्ट्र सेवादलाची शाखा खुद्द आमच्या 'नवसमाज'मध्ये चालायची (लीलाधर हेगडे आणि वसंत बापट यांच्यासारखे दिग्गज यायचे, भा ल कोरगावकर आमची शाखा घ्यायचे). टॉलस्टॉय, साने गुरुजी, टागोर यांच्या कथा, स्वातंत्र्य चळवळीच्या आठवणी आणि स्फूर्तिगीते, भरपूर मैदानी खेळ असायचे, सहकाराने कसे राहायचे याचे धडे मिळायचे. साने गुरुजी कथामालेमध्ये मी आणि राणीने बहुधा पहिली बालगीते आणि गाणी गायली असावीत - पुढे जाऊन मी स्वतः पार्ल्यातील साने गुरुजी कथामाला चालवली. राणी, झेलम (वर्दे-परांजपे), स्मिता आणि अनिता पाटील आदि भारत दर्शनमध्ये सक्रिय असायच्या.

सेवादलाचे कलाकार (सुधा मावशी, निळू फुले- अगदी दादा कोंडके वगैरेसुद्धा) नियमितपणे सेवादलाच्या कलपथकाद्वारे नाटक आणि कलेचे इतर आविष्कार प्रस्तृत करायचे (‘पुढारी पाहिजे’ हे पु.ल. देशपांडे यांचे नाटक आणि ‘आंधळं दळतंय’ अशी नाटकं अजून लक्षात आहेत). शाहीर अमर शेखांचे कार्यक्रम आवर्जून ऐकायला जायचो. राम नगरकर हे लेखक सुरुवातीच्या काळात 'नवसमाज'मध्ये राहायचे (‘राम नगरी’मध्ये 'नवसमाज'चा उल्लेखसुद्धा आहे). नवसमाज सोसायटी आणि समाजवादी परिवारात अतिशय समृद्ध व परिपक्व वातावरण होते. अतिशय साधी राहणी, दोन खोल्यांच्या घरात राहूनसुद्धा कोणालाही जेवल्याशिवाय परत पाठवायचे नाही, रात्री-अपरात्री आलेल्या पाहुण्यांची आणि कार्यकर्त्यांची काळजी घेणे- एकूणच सदाबहार पाहुणचार हे आमच्या आंगवळणी पडले होते. वैचारिक प्रगल्भता, सामाजिक व व्यक्तिगत पातळ्यांवर मानवी मूल्ये जोपासणारी आणि मैत्रीचे नाते निभावणारी मंडळी सभोवताली होती. त्यांचे उपकार शब्दांत मानणे शक्य नाही.

समाजवादी मंडळींनी (त्यात माझे वडील वसंत गुप्ते, बबनकाका इत्यादी होते) स्थापन केलेली नवसमाज सोसायटी आसपासच्या परिसराच्या तुलनेत अधिक समावेशक होती. अधिकतर कुटुंबे मराठी भाषक असली तरी विभिन्न जातींची होती. गुजराती, पंजाबी, कन्नड, कोकणी आणि तमिळ भाषक होते. ख्रिस्ती कुटुंबे होती. त्यामुळे सर्व मुलांचे आपसूक एकमेकांच्या घरी जाणे, जेवणे, पकडा-पकडीपासून ते भातुकलीचा स्वयंपाक, मेंदीची पाने वाटून हातांना लावण्यापासून ते सोसायटी डे-साठी उत्साही पालकांच्या मदतीने नाटक, नाच-गाणी बसवणे असे कायम सुरू असायचे. बहुतांशी मुली-मुले संध्याकाळी सोसायटीच्या प्रांगणात असलेल्या सेवादलाच्या शाखेत असायची. सर्वांचे आई-वडील ‘काका' आणि 'काकी-मावशी’ म्हणून संबोधित केले जायचे. आता अनेक घरांची विक्री आणि हस्तांतरण झाल्यानंतर असे आपुलकीचे वातावरण राहिले नाही, याची मनोमन खंत वाटते. अनेकांची मुले जातिवादी, धर्मवादी संघटनांमध्ये गेली, ही तर त्याहून अधिक क्लेशदायक बाब. तरीही एक समाधानकारक गोष्ट म्हणजे, 'नवसमाज'ला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यावर केलेल्या सुवर्णमहोत्सव सोहळ्याचे उद्‌घाटन हयात असलेले एकमेव संस्थापक सदस्य या नात्याने बबनकाकांच्या हस्ते झाले. आमचे आई-नाना गेल्यानंतर बबनकाका आमच्यासाठी पितृतुल्य आहेत, यात शंका नाही; परंतु 'नवसमाज'मध्येसुद्धा त्यांना अजून एक विशेष सन्मानाचे स्थान आहे, याबद्दल खूप आनंद वाटतो.

सच्चा समाजवादी ही ओळख बबनकाकांना तंतोतंत शोभते. आधी प्रजा समाजवादी पक्ष आणि 1977 नंतर जनता पार्टीमध्ये काका व मावशी सक्रिय राहिले. त्यानंतर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री भाई वैद्य यांनी स्थापन केलेल्या सोशलिस्ट पार्टीच्या सर्व बैठकींसाठी अगदी नजीकच्या काळापर्यंत ते उपस्थित राहायचे. बॅ.नाथ पै आणि प्रा.मधु दंडवते यांच्या निवडणुकीत उमेदवार, मतदार आणि कार्यकर्ते यांच्यातील समन्वय साधणारा पडद्यामागचा शिल्पकार म्हणजे बबनकाका. दोघांच्या निवडणुकींच्या काळात कार्यालये आणि प्रचारप्रक्रिया चालवणे ही त्यांच्यावर असलेली हमखास जबाबदारी. देवरुखचे ‘मातृमंदिर’ आणि मालवण येथील ‘बॅ. नाथ पै सेवांगण’ ही बबनकाकांनी इतर सहकाऱ्यांसमवेत साकारलेली दोन स्मारके म्हणजे समाजवादी नेत्यांच्या कार्यावर असणारी आत्मविश्वासपूर्ण व अढळ निष्ठा यांची प्रतीके आहेत.

बबनकाका आणि रतनमावशीची पुढची पिढी, म्हणजेच राणी आणि सतीश भाई (पाटील) यांचे नातेसुद्धा आगळे-वेगळे असेच म्हणावे लागेल. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर एअर इंडियामध्ये नोकरी करणारे सतीश यांचा राजकीय विचारांशी किंवा पुरोगामी चळवळींशी कसलाही संबंध नव्हता. लग्न करताना डिसोजा आडनाव कुठेही अडसर ठरले नाही, याचे कौतुक राणीलाच वाटते. रतनमावशी गेल्यापासून राणी आणि तिचा मुलगा राहुल यांचे वास्तव्य बबनकाकांच्या घरीच आहे. हेसुद्धा राणी आणि सतीशभाईंच्या संसाराच्या आड कधीही आले नाही. हसतमुख आणि समंजस असे सतीशभाई खरंच बबनकाकांच्या कुटुंबात समरस होणारे व्यक्तिमत्त्व म्हणावे लागेल. राहुल म्हणजे 'नवसमाज'मध्ये अजून राहणाऱ्या डिसोजा आणि गुप्ते (माझी धाकटी बहीण गिरिजा तिथे असते) मंडळींचे शेंडेफळ. बबनकाकांचे आणि राहुलचे विशेष रेशमीबंध राहिलेले आहेत. लहानपणी त्याला भरवणे, आजारी असला की रात्रभर कपाळावरच्या गार पाण्याच्या पट्‌ट्या बदलणे, स्पंजिंग करणे असे सर्व काका करायचे. छोट्या-मोठ्या दुखण्यासाठी शेजाऱ्या-पाजाऱ्यांना होमिओपॅथीची औषधे देणारे बबनकाका राहुलची मन:पूर्वक शुश्रूषा करायचे. तोच राहुल आता गेल्या काही वर्षांपासून बबनकाकांची मनापासून काळजी घेतो. त्यांच्या सर्व गरजा, आवडीनिवडी जपतो. 

सदाबहार, प्रामाणिक, प्रेमळ आणि तळमळीने समाजवादी चळवळीसाठी आयुष्यभर कार्यरत असलेल्या बबनकाकांना आदरपूर्वक व प्रेमपूर्वक नमन आणि सलाम. जनतेच्या व देशाच्या हितासाठी राजकारण आणि चळवळी करणाऱ्या पितृतुल्य बबनकाकांना क्रियाशील दीर्घायुरारोग्य लाभो, हीच मनोमन सदिच्छा. चार वर्षांनी त्यांची शंभरी उत्साहाने साजरी करण्याची आपली सर्वांची प्रबळ मनोकामना पूर्ण होवो!

Tags: नानासाहेब गोरे नवसमाज सोसायटी सेवादल समाजवाद समाजवादी चळवळ बबन डिसोजा weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके