डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

शंकर भाऊंच्या आठवणीतील अण्णा भाऊ

अण्णा भाऊंच्या सान्निध्यातील काही जाणकार लोकांनी आणि मित्रांनी या आठवणी लिहिण्यासाठी शंकर भाऊंकडे तगादा लावलेला दिसतो. त्यामुळेच हे पुस्तक लिहून झाले आहे. अण्णा भाऊंची कलावंत म्हणून झालेली जडण-घडण, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील कंगोरे, कलावंताचा कलंदरपणा, प्रापंचिक जीवन, त्या जीवनातील पेच, मनस्ताप, व्यक्तिमत्त्वातील बलस्थान व मर्यादा अशा सगळ्याच गोष्टी शंकर भाऊंनी या पुस्तकात पारदर्शीपणे लिहिल्या आहेत. अण्णा भाऊ महाराष्ट्रातील मोठे कलावंत आणि लेखक होते, याची त्यांना स्पष्ट जाणीव आहे. अण्णा भाऊंच्या या मोठेपणाचं दडपण त्यांच्या लेखनावर जाणवत नाही.

‘माझा भाऊ अण्णा भाऊ’ हे शंकर भाऊ साठे यांचे पुस्तक. या पुस्तकाची पहिली आवृत्ती 1 ऑगस्ट 1980 रोजी प्रसिद्ध झाली. हे 132 पृष्ठांचे पुस्तक पुण्याच्या सुगावा प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. या प्रकाशनाचे हे पहिलेच पुस्तक. शंकर भाऊ साठे हे अण्णा भाऊ साठे यांचे धाकटे भाऊ. अण्णा भाऊंचे चरित्र म्हणजे हे पुस्तक असं त्यांनी प्रस्तावनेत म्हटलं आहे. खरं म्हणजे अण्णा भाऊंच्या आठवणी त्यांनी लिहिल्या आहेत, या आठवणींनाच त्यांनी चरित्र असे संबोधले आहे. या आठवणींचे लेखन ललित स्वरूपात त्यांनी केलं आहे. त्यांच्या अतिशय निकटवर्तीय व्यक्तीने या आठवणी लिहिल्या असल्यामुळे आपोआपच त्याला एक अधिकृत विश्वासार्हता प्राप्त झाली आहे, असे म्हणायला हरकत नाही. या आठवणी रोचक आहेत.

सार्वजनिक जीवनात सक्रिय असणाऱ्या आणि लौकिक मिळवलेल्या व्यक्तीसंबंधी समाजात एक आस्था असते. अशा व्यक्तीसंबंधी समाजात दंतकथा प्रसृत झालेल्या असतात. गौरवीकरण किंवा उदात्तीकरणही सुरू असते. कधी वस्तुस्थितीचा विपर्यासही दिसतो. भारतीय समाजजीवनात तर या गोष्टींचा प्रत्यय निरंतर येत असतो. कधी कधी तर टोकाच्या संवेदनशीलतेमुळे व्यक्तींचे दैवतीकरण होऊ लागते. अशा वेळी आस्थेची जागा श्रद्धा घेते आणि ही श्रद्धा तारतम्याच्या अभावामुळे भाविकतेमध्ये बदलते. मग अनुयायी निर्माण होण्यापेक्षा भक्तांची संख्या वाढू लागते. विचारांपेक्षा भावना, व्यक्तिपूजा वरचढ होऊ लागते. आणि भक्त केव्हा उन्मादी होतात, हे त्यांनाही कळत नाही. अशा वेळी लौकिकप्राप्त व्यक्तीच्या सहवासातील नजीकच्या व्यक्तीने लिहिलेल्या आठवणी, चरित्रे महत्त्वाची ठरतात. जवळच्या व्यक्तीने लिहिले म्हणजे त्यात उदात्तीकरण येणारच नाही, असे मात्र संभवत नाही. हा धोका असतोच. या निकषावर ‘माझा भाऊ अण्णा भाऊ’ हे पुस्तक तपासले, तर एक आश्वासक दिलासा मिळतो. प्रस्तावनेत शंकर भाऊंनी म्हटले आहे की, ‘कै.शाहीर अण्णा भाऊ साठे यांचे चरित्र माझ्यासारख्या एका साध्या माणसाने लिहिले म्हणजे, आपल्या आरतीने स्वतः ओवाळून घेतल्यासारखे आहे. परंतु मी जे लिहिले आहे, ते फक्त अण्णा भाऊंनी काय केले ते. हे जर एखाद्या उत्तम कादंबरीकाराने लिहिले असते, तर त्याला फार मोठी मान्यता मिळाली असती... अण्णांच्या साहित्याबद्दल मला काही लिहायचे नाही. त्यांनी कसे लिहिले, ते मी सांगू शकत नाही... परंतु त्यांनी काय काम केले, ते मी लिहिले आहे. तेव्हा अण्णा भाऊंच्या वाचकांनी हे जरूर पाहावे की, अण्णा भाऊ कसे होते नि त्यांनी काय केले.’ शंकर भाऊंनी अण्णा भाऊंच्या लेखन कारकिर्दीचा आढावा घेतलेला नाही. या लेखनाचा हेतू पण तो नाही. काय सांगायचे आहे याची स्पष्टता त्यांच्याजवळ आहे.

प्रस्तावनेत जाता-जाता त्यांनी एक खंत व्यक्त केली आहे. वाटेगावने अण्णा भाऊंसाठी काहीही केलेलं नाही, कारण जातीयवादाची भिंत कोणी फोडू शकला नाही. जर अण्णा दुसऱ्या कोणत्याही वर्गाचे असते, तर गावाने नक्कीच काही तरी केले असते. शंकर भाऊंचे हे जळजळीत भाष्य समाजाच्या मानसिकतेवर प्रकाश टाकणारे आहे. असामान्य कर्तृत्वाच्या माणसांना शेवटी जातीच्या चौकटीतच समाजव्यवस्था पाहत असते. समाजाचे हे थिटेपण अजूनही कायम आहे.

त्यांच्या बालपणातील व ऐन उमेदीतील आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत, त्याप्रमाणे लोकनाट्य कलावंत म्हणून त्यांनी केलेली कामगिरी आणि या क्षेत्रात परिश्रमाने मिळवलेला नावलौकिक, महाराष्ट्रात ठिकठिकाणी लोकनाट्य सादरीकरणासाठी केलेले झंझावाती दौरे, या प्रसंगीच्या घटना, इत्यादी तपशील शंकर भाऊंनी विस्ताराने लिहिला आहे. महत्त्वाचे म्हणजे, या दौऱ्यात अण्णा भाऊंसोबत एक कलावंत म्हणून तेही सहभागी झाले आहेत. म्हणजेच शंकर भाऊ या सगळ्या घटना-घडामोडींचे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. या अर्थाने या लेखनाला एक अधिकृतता प्राप्त झाली आहे.

1968 मध्ये अण्णा भाऊंनी शंकर भाऊंना आपला स्वतःचा एक पेन भेट दिला होता. त्या पेनच्या साह्याने शंकर भाऊंनी अण्णा भाऊंच्या आठवणी लिहिल्या आहेत. पेन देतेवेळी अण्णा म्हणाले होते, ‘‘शंकर, हा माझा पेन सांभाळून ठेव. याने मी पुष्कळ लिहिले आहे. हा कुणाला देऊ नकोस. तसे माझ्याकडे आणखी दोन-तीन चांगले पेन आहेत. तेव्हा याला जपून ठेव.’’ (प्रस्तावना) अण्णांची आठवण म्हणून तो पेन शंकर भाऊंनी जपून ठेवला होता. त्याच पेनने अण्णांच्या आठवणी लिहिण्याची वेळ येईल, याची त्यांना अर्थातच कल्पना नव्हती. त्याच पेनने त्यांनी आठवणी लिहून काढल्या. त्या पेनने ‘काडतूस’ नावाची कथा लिहायला घेतली. एक वही लिहून पूर्ण झाली आणि नंतर तो पेन गायब झाला. तो पेन त्यांच्याच एका जवळच्या नातेवाइकाने नेला होता. तो त्यांनी परत दिला नाही. जणू काही आठवणी लिहिण्यासाठीच त्यांनी शंकर भाऊंना तो पेन दिला होता. शाहीर अमर शेख, शाहीर द.ना. गव्हाणकर आणि शाहीर अण्णा भाऊ साठे या त्रिमूर्तीने एक काळ गाजवला. तमाशा, लावणी, छक्कड, पोवाडे, लोकनाट्य अशा कलांचे सादरीकरण या चमूकडून होत असे. मात्र या तिघांपैकी शाहीर अमर शेख काही कालावधीनंतर बाजूला झाले. नंतर द.ना. गव्हाणकर आणि अण्णा भाऊ या जोडगोळीने महाराष्ट्राचे मनोरंजन आणि प्रबोधन प्रदीर्घ काळ केले याची माहिती या पुस्तकात वाचायला मिळते. अभ्यासकांसाठी हा संदर्भ  महत्त्वाचा आहे.

लोकनाट्य संस्थेची रंगभूमी 1945 ते 1947 पर्यंत पार्टीने चालवली. पार्टी कलावंतांना मानधन देत असे. ज्यांचे लग्न झाले आहे त्यांना साठ रुपये आणि एकटे असणाऱ्यांना चाळीस रुपये मानधन होते. हिंदी, तेलुगू, गुजराती मराठी अशी चार पथके होती. परंतु नंतर खर्चाचे प्रमाण वाढू लागले. म्हणून पार्टीने कलावंतांना सांगितले की, आता तुमची महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली आहे. तुमच्या जबाबदारीवर कार्यक्रम करावेत. या परिस्थितीत अमर शेख, गव्हाणकर, अण्णा भाऊ यांनी आपले कलापथक कायम ठेवले. जागेअभावी रिहर्सल कुठे करावी, हा प्रश्न होता. सातरस्ता जेकब सर्कलला खोली मिळाली. पण 550 रुपये पागडी कशी भरावी, असा प्रश्न निर्माण झाला. गव्हाणकरांनी ‘यंग इंडिया’ कंपनीशी संपर्क साधून अण्णा भाऊंनी लिहिलेल्या ‘पंजाबचा दंगा’ या पोवाड्याचे रेकॉर्डिंग केले. त्या कंपनीकडून पैसे मिळाले. पागडी  भरून खोली ताब्यात घेतली. तालमी सुरू झाल्या. अण्णा घाटकोपरला, तर गव्हाणकर गिरणगावला त्रिभुवन रोडवर राहत. त्यांची खोलीची अडचण नव्हती. अमर शेख जेकब सर्कलला राहू लागले. पुढे त्यांचे लग्न झाले. त्यांनी खोली आपल्या ताब्यात ठेवली. काही दिवसांनी तेच खोलीचे मालक बनले. चार नवे लोक जोडून त्यांनी स्वतंत्र कलापथक काढले आणि आपले कार्यक्रम ते करू लागले. चिडखोर स्वभावामुळे त्यांचे कोणाशी पटत नव्हते. त्यामुळे गव्हाणकर आणि अण्णा भाऊ यांनी स्वतंत्र पथकाचा विचार करून वाटचाल सुरू केली.

अण्णा भाऊंच्या सान्निध्यातील काही जाणकार लोकांनी आणि मित्रांनी या आठवणी लिहिण्यासाठी शंकर भाऊंकडे तगादा लावलेला दिसतो. त्यामुळेच हे पुस्तक लिहून झाले आहे. अण्णा भाऊंची कलावंत म्हणून झालेली जडण-घडण, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील कंगोरे, कलावंताचा कलंदरपणा, प्रापंचिक जीवन, त्या जीवनातील पेच, मनस्ताप, व्यक्तिमत्त्वातील बलस्थान व मर्यादा अशा सगळ्याच गोष्टी शंकर भाऊंनी या पुस्तकात पारदर्शीपणे लिहिल्या आहेत. अण्णा भाऊ महाराष्ट्रातील मोठे कलावंत आणि लेखक होते, याची त्यांना स्पष्ट जाणीव आहे. अण्णा भाऊंच्या या मोठेपणाचं दडपण त्यांच्या लेखनावर जाणवत नाही. किंबहुना, असामान्य असा आपला थोरला भाऊ या दृष्टीने या लेखनात आदर प्रतिबिंबित झाला आहे. अण्णा भाऊंचा संघर्ष आणि प्रपंचातील अडी-अडचणींचे ते एका अर्थाने सहभागीदारही आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील ‘माणूस’ त्यांनी मनःपूर्वकपणे चित्रित केला आहे. जवळजवळ वीस वर्षं अण्णा भाऊंचा त्यांना प्रत्यक्ष सहवास लाभला आहे. म्हणून अण्णा भाऊंना अधिक तटस्थपणे समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

मुंबईतील गिरणी कामगारांच्या संपाच्या वेळी 1934 मध्ये अण्णा भाऊ संपाकडे आकर्षित झाले. त्यात त्यांनी धडाडीने भाग घेतला. अनेक कार्यकर्त्यांच्या ओळखी झाल्या. माटुंगा लेबर कँपमध्ये कॉ.साळवी आणि कॉ.मोरे त्यांना भेटले. त्यांच्यामुळे ते चळवळीचा अभ्यास करू लागले. त्यांचे वाचन वाढले. उपास-तापास करणारे अण्णा भाऊ पूर्णपणे बदलले. त्यांनी देवधर्म सोडला आणि कामगार कार्यकर्ते झाले. 1937-38 मध्ये म्हणजे वयाच्या सतराव्या-अठराव्या वर्षी ते कॉम्रेड पार्टीचे झाले. एकनिष्ठपणे पार्टीचे काम करू लागले. चौफेर वाचनामुळे त्यांची दृष्टी व्यापक आणि प्रगल्भ झाली. कामगार, शेतकरी यांच्या चळवळीची माहिती असलेली पुस्तके वाचल्यामुळे त्यांच्यातील कार्यकर्ता सजग झाला.

शंकर भाऊंजवळ लेखनकौशल्य आहे, लेखक म्हणून त्यांच्या नावावर अनेक साहित्यकृती आहेत; पण अण्णा भाऊंसारखा लौकिक त्यांना मिळाला नाही. अण्णा भाऊंच्या आठवणी लिहिताना शंकर भाऊंच्या व्यक्तिमत्त्वातील निरागसता जाणवत राहते. कुठे आडपडदा न ठेवता काही प्रसंग जसे घडले तसे त्यांनी कथन केले आहेत. त्यातून सत्य प्रकटते आणि वस्तुस्थितीही निदर्शनास येते. या लेखनाचा पोत प्रांजळ आहे. हे पुस्तक महत्त्वाचे असूनही त्याची फारशी दखल घेतली गेली, असे आढळत नाही. अण्णा भाऊ साठे हा विषय पुस्तकाच्या केंद्रस्थानी असूनही या पुस्तकाला त्या काळी प्रकाशक मिळत नव्हते. ‘सुगावा’ मासिकाने अण्णा भाऊ साठे विशेषांक 1977 मध्ये प्रसिद्ध करायचे ठरवले. वर्तमानपत्रात ही बातमी वाचून शंकर भाऊंनी आपले लेखन ‘सुगावा’कडे पाठवले आणि त्यातून हे पुस्तक आकाराला आले.

‘लोकमंत्री’ या तमाशावर बंदी वॉरंट निघाले, त्यासंबंधीची सविस्तर हकिगत शंकर भाऊंनी तपशीलवार सांगितली आहे. ‘लोकमंत्री’वर बंदी असली, तरी त्याच्या प्रयोगाची मागणी रसिकांकडून होत होती. एकदा तर ठाणे येथील एका पोलीस स्टेशनने गणेशोत्सवात या ‘लोकमंत्री’ तमाशाचे आयोजन केले. ज्या पोलिसांनी हा प्रयोग ठरवला, त्यातील बहुतेक सातारा परिसरातील म्हणजे अण्णा भाऊंच्याच भागातील होते. या प्रयोगाच्या निमित्ताने अण्णा भाऊ आयतेच पोलिसांच्या हाती लागतील, अशी शंका गव्हाणकरांना आली. त्यांनी ती पोलिसांजवळ बोलूनही दाखवली. पण ‘असं काही होणार नाही’ असा शब्द पोलिसांनी दिला. झालेही तसेच. पोलिसांनी आपला शब्द पाळला. अनेक ठिकाणी ‘लोकमंत्री’चे प्रयोग झाले. दर वेळी अण्णा भाऊंनी पोलिसांना गुंगारा दिला. कधी ते हमालाच्या वेषात प्रयोगाठिकाणी हजर होत, तर कधी सातारी फेटा-धोतर घालून येत. या वेषात ते ओळखू येत नसत. स्टेजवर अण्णा भाऊंची भूमिका दुसरी कोणती तरी व्यक्ती करते आहे, अशी आवई पसरवली जायची. प्रयोग बिनदिक्कत पार पडत असे. आपल्या कामासंबंधी, कलेविषयीची तन्मयता अण्णा भाऊंच्या ठायी होती. कामातील आनंद आणि प्राप्त परिस्थितीतील थरारकता ते अनुभवत होते. वॉरंट निघाल्यावर नाही म्हटले तरी त्यांना असुरक्षित वाटत होते. याबाबत शंकर भाऊ लिहितात-‘अण्णा फुकटच्या मरणाला फारच भीत होते. ते म्हणत की, प्रत्येक माणसाला मरण हे येणारच आहे. ते केव्हाही चुकणार नाही. पण माणसाने काही तरी कारणाने मरावे आणि काही तरी करून मरावे की, ज्यामुळे तुमचे नाव मागे राहील.’ (पृ. 104)

अखेरच्या काळात अण्णा भाऊ फारच विमनस्क झाले होते. आपल्या जीवनात काही अर्थ नाही, असे त्यांना वाटत होते. त्याला कारणंही तशीच होती. नंतरच्या काळात कलापथकातील लोकांनी त्यांना दगा दिला होता. दुसरी पत्नी त्यांना तडकाफडकी सोडून गेली. जवळपास वीसेक वर्षे सोबत राहून तिनं अकस्मात हा निर्णय घेतला होता. पहिल्या पतीपासून तिला दोन मुली होत्या. पैकी मोठी मुलगी अण्णा भाऊंपासून फुटून गेलेल्या दुसऱ्या गटात सामील होऊन, त्यांच्या कलापथकात सक्रिय झाली. पहिल्या पत्नीच्या हेकटपणाला ते कंटाळले होते आणि मित्रांनी लुबाडणूक केल्यामुळे ते निराश झाले होते. ‘फकिरा’ चित्रपटाची कथा, पटकथा, गाणी त्यांनी लिहिली होती. त्यात अभिनयही केला होता. पण निर्मात्याने फक्त लेखनाचा आणि अभिनयाचा श्रेयनामावलीत उल्लेख केला. दिशाभूल झाल्यामुळे चित्रपटाचे हक्क ते गमावून बसले. कर्जबाजारी झाल्यामुळे सगळे व्यवहार फिसकटले. यामुळे ते दारूच्या आहारी मोठ्या प्रमाणात गेले. या सर्व गोष्टींना कंटाळून त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येत असत, पण त्यांनी आत्महत्या केली नाही. आत्महत्येमुळे लोकांमध्ये संभ्रम तर निर्माण होईलच- पण जवळच्या लोकांनाही त्रास होईल. या जाणिवेतून त्यांनी आत्महत्या न करण्याचा निर्णय घेतला. दि.18 जुलै 1969 रोजी अण्णा भाऊंचे निधन झाले. निधन कशामुळे झाले त्याचा उल्लेख शंकर भाऊंनी केला नाही. अण्णा भाऊंच्या निधनावेळी शंकर भाऊ वाटेगावला होते. त्यांना अंत्यविधीसाठी वेळेवर हजर राहता आले नाही. दि.19 जुलैला कोल्हापूर-मुंबई एसटीने त्यांनी मुंबई गाठली. पण त्या वेळी ते ठाणे येथे पोचले. गोरेगावला गेले नाहीत. दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 जुलैला सकाळी दहा-अकराच्या सुमारास ते गोरेगाव दहनभूमीवर पोचले. त्यांच्यासोबत गावापासूनच अण्णा भाऊंचा मुलगाही होता. अण्णा भाऊंचे अंत्यदर्शन ते घेऊ शकले नाहीत, मात्र अस्थिदर्शन झाले. अण्णा भाऊ 1966 पासून जे जीवन जगत होते, ते त्यांना मृत्यूसमान वाटत होते. म्हणून त्यांनी स्वतः आत्मचरित्र लिहिण्यास सुरुवात केली होती. ‘मृत्यूकडून जीवनाकडे’ असे शीर्षक त्यांनी योजले होते.

अण्णा भाऊंना उत्तरायुष्यात महाराष्ट्र शासनाने गोरेगाव येथे घर उपलब्ध करून दिले होते. त्या ठिकाणी राहून निवांत लेखन करीत राहावे, असा त्यांचा मानस होता. पण चिरागनगर झोपडपट्टीतील खोली सोडण्याची इच्छा होत नव्हती. वीस-बावीस वर्षे ते या झोपडपट्टीत राहत होते आणि मानसिक दृष्ट्या ते या ठिकाणी रमले होते. ज्या खोलीत त्यांनी कथा, कादंबऱ्या, लोकनाट्ये यांची निर्मिती करून नाव मिळवले होते, त्या ठिकाणी त्यांचे मन गुंतले होते. तिथे असणारी प्रतिकूलता त्यांच्या अंगवळणी पडली होती- किंबहुना, ती प्रतिकूलता आहे, असे त्यांना मुळी वाटतच नव्हते. शासन दरमहा रुपये तीनशे मानधन त्यांना देत असे. त्यामुळेही त्यांच्या आवश्यक गरजा भागत होत्या. त्यांना नाव मिळाले, पण संपत्ती मिळाली नाही. प्रकाशकांनी त्यांची पुस्तके प्रकाशित केली. प्रकाशकांनी व्यवसाय केला, पण हवा तसा आर्थिक हात त्यांना दिला नाही. अण्णा भाऊदेखील त्याबाबत काटेकोर नव्हते. आपल्या मृत्यूच्या काही महिने आधी मात्र ते गोरेगावच्या घरी राहायला गेले होते.

अण्णा भाऊंच्या शिक्षणाबद्दल मत-मतांतरे आहेत. शंकर भाऊ यांच्या या पुस्तकात अण्णा भाऊंच्या शिक्षणासंबंधी अचूक माहिती मिळत नाही. ‘अण्णांचे शिक्षण बघावे तर ते फक्त दीडच दिवस शाळेत गेले होते, असे मला आमची आई सांगत होती. परंतु अण्णा मात्र स्वतःचे तिसरी-चौथीपर्यंत शिक्षण झाले आहे, असं सांगत.’ (प्रस्तावना). अर्थात या आठवणीच आहेत. काळाच्या ओघात त्यातील नेमकेपणा हरवण्याची शक्यता गृहीत धरता येते. पण शंकर भाऊंनी याबाबत साक्षेपी शोध घेतलेला नाही. शंकर भाऊंच्या मर्यादा लक्षात घेता, याबाबत वाचक असमाधानीच राहतो. मात्र शाळेच्या पहिल्याच दिवशी दुपारच्या सत्रात मास्तरने अण्णा भाऊंच्या हाताच्या बोटांना छडीचा मार दिल्याची आठवण ते सांगतात. पहिल्याच दिवशी अक्षरं गिरवून ओळखणे शक्य नसताना मास्तरने तशी अपेक्षा करणे न समजण्यासारखे आहे. तिरीमिरीत येऊन अण्णा भाऊ मास्तरला दगड फेकून मारतात. माराच्या भीतीमुळे अण्णा भाऊ शाळेत जायला नकार देतात. शाळेचे मास्तर थेट संस्थानच्या पंताच्या कानांवर अण्णा भाऊंच्या दगडफेकीचं प्रकरण घालतात. त्यांची तक्रार करताना मात्र त्यांनी केलेली शिक्षा सांगण्याचं टाळतात. अण्णा भाऊ, त्यांचे वडील यांना पाचारण केलं जातं. या वेळी त्यांचे वडील मास्तरने केलेल्या शिक्षेचं स्वरूप आणि अण्णा भाऊंची बोटं पंतांना दाखवतात. पंत काय ते समजतात. मास्तरला समज मिळते, पण अण्णा भाऊंचं मन शिक्षणावरून उडतं. ते रमत नाही. नाही म्हणायला, एकदा ते मित्रासोबत शाळेत जाऊन मास्तरला दम देतात. ‘माझ्या शिक्षणात खंड पाडण्याचं कारण तुम्ही आहात आणि तुम्हाला या गावातून घालवल्याशिवाय मी राहणार नाही,’ अशी धमकीही देतात. संध्याकाळी मास्तर घाबरून त्यांच्या वडिलांच्या कानांवर हे प्रकरण घालण्यासाठी घरी येतात. दरम्यान, त्यांचे वडील कामासाठी मुंबईला गेलेले असतात. आई मास्तरची काही तरी समजूत काढते. ‘पोराटोरांचं मनावर घेऊ नका म्हणते.’

अण्णा भाऊंच्या वडिलांनी रोजीरोटीसाठी मुंबई जवळ केली आहे. त्यांच्या वडिलांनीही मुंबईत राहून मोलमजुरी केलेली होती. मुंबईत ब्रिटिशांच्या बंगल्यावर माळीकाम करून ते आपला चरितार्थ चालवतात आणि गावाकडे नियमित पैसे पाठवतात. त्यामुळे गावातील मांगवाड्यातील लोकांची जी सतत परवड होत असे, तशी त्यांच्या कुटुंबाची होत नाही. दोर वळण्याचं काम मांगवाड्यात बारा महिने सुरू असतं. तसं काम त्यांच्या घरी होत नाही. तुलनेनं त्यांना फार कष्ट करावे लागत नाहीत. गाई-गुरं ते चारतात. प्रसंगी मित्रांसोबत शेंगा, मिरच्या इतरांच्या शेतातून चोरून आणतात. अशा चोऱ्यामाऱ्या ग्रामीण भागात सतत होत असतात. त्यात काय नवीन नाही. हातावर पोटं असणाऱ्या कष्टकरी कुटुंबातील मुलं खाण्या-पिण्याचे जिन्नस सर्रास लांबवतात. ज्या वयात अण्णा भाऊ हे करतात, त्या वयात तर ही सामान्य बाबच म्हणायला हवी. पण तक्रारीचं वाढतं प्रमाण लक्षात घेता, त्यांना मुंबईला धाडायला हवं, असं त्यांच्या आईच्या मनात येतं. पुढं वडील मुंबईहून गावी आल्यावर सगळ्यांनीच मुंबईला जायचं, असं ठरतं. मुंबईला जाण्यास ते राजी नसतात. ‘तुम्ही सगळे मुंबईला जा, मी एकटाच गावी राहतो’ असं वडिलांना सांगतात. ‘एकट्या मुलाचा गावी कसा निभाव लागावा? कोणी त्याला खाऊ-पिऊ घालावं?’ ही आईच्या मनातील शंका तिला स्वस्थ बसू देत नाही आणि दसरा संपताच सगळं कुटुंब गाव सोडतं. सगळ्या कुटुंबाचा वाटेगाव ते मुंबई हा पायी प्रवास शंकर भाऊंनी विस्ताराने सांगितला आहे. शंकर भाऊ वडिलांच्या कडेवर, एक बहीण आईच्या कडेवर, अण्णा आणि एक बहीण आई-वडिलांसोबत वाटेगाव, सातारा, कराड, पुणे, खंडाळा घाट, कल्याण, मुंबई- असा हा प्रवास जवळपास तीन महिन्यांचा आहे. वाटेत कामासाठी ठिकठिकाणी मुक्काम करीत मजल-दरमजल करीत या कुटुंबानं मुंबई गाठली. या प्रवासातील घटना-घडामोडी उद्विग्न करणाऱ्या आहेत. गरीब, कष्टकरी आणि त्यातही अस्पृश्य लोकांचं जगणं किती वेदनादायी आहे, हे पाहून विचारी माणसाचं अंतःकरण अस्वस्थ झाल्याशिवाय राहत नाही.

सगळ्या आप्तस्वकीयांमध्ये शंकर भाऊंवर अण्णा भाऊंचा जास्त विश्वास आहे. कित्येकदा तो त्यांनी त्यांच्याजवळ बोलूनही दाखवला आहे. शंकर भाऊ अनेक वर्षे मुंबईला राहिलेत. ठिकठिकाणी कामं केलीत. मुंबईतील संघर्ष, हाल-अपेष्टा त्यांनी अनुभवल्या आहेत. अण्णा भाऊंच्या कलापथकात सहभागी असल्यामुळे त्यांनी अण्णा भाऊ  आणि सहकाऱ्यांसोबत महाराष्ट्र पिंजून काढला आहे. अण्णा भाऊंचे सोनेरी दिवस त्यांनी जवळून पाहिले आहेत. त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात प्रेम, आदर आहे. त्यांच्या न आवडणाऱ्या गोष्टीविषयी त्यांनी कुठेही कडवट प्रतिक्रिया दिलेली नाही. प्रत्येक प्रसंगात ते त्यांना समजावून घेण्याचा प्रयत्न करतात. शंकर भाऊ हेदेखील मुंबईतील कष्टकरी कामगार आहेत. काम केलं तरच उदरनिर्वाह होऊ शकतो, अशी स्थिती आहे. या स्थितीतच माणसं एकमेकांना धरून असतात. त्यांच्या नात्यात ओलावा असतो. हा ओलावा या पुस्तकातून प्रकट झाला आहे.

(सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठीचे वरिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या मनोहर जाधव यांनी कविता व समीक्षा हे दोन लेखनप्रकार प्रामुख्याने हाताळले आहेत. ‘दलित स्त्रियांची आत्मकथने’ हा विषय त्यांनी पीएच.डी.साठी घेतला होता.)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मनोहर जाधव
manohar2013@gmail.com

मराठी कवी, समीक्षक, प्राध्यापक व भाषांतरकार


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात