डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘बलुतं’चा माझ्यावर इतका प्रभाव पडला की, एम. ए. ला असतानाच मी दलित साहित्यप्रवाहाचा बारकाईने अभ्यास करू लागलो. आत्मचरित्र या वाङ्‌मयप्रकारासंबंधी अधिक रुची निर्माण झाली. त्यामुळे मराठीतील जी आत्मचरित्रं मिळतील, ती वाचत गेलो. त्यावरील समीक्षा जाणीवपूर्वक मिळवून वाचत राहिलो. त्या काळात दलित लेखकांची जी आत्मचरित्रं प्रसिद्ध झाली होती, ती एकूणएक सगळी वाचून काढली. पुढे पीएच. डी.साठी संशोधन करताना ‘दलित स्त्रियांची आत्मकथने : स्वरूप आणि चिकित्सा’ हा विषय निश्चित केला.   

‘ग्रंथाली’ अभिनव वाचक चळवळीनं 24 डिसेंबर 1978 रोजी ‘बलुतं’ प्रसिद्ध केलं. ‘बलुतं’ प्रसिद्ध झालं त्या वेळी दया पवारांनी चाळिशी ओलांडली होती. म्हणजे, वय तसं उमेदीचंच होतं. ‘बलुतं’च्या आधी त्यांचा ‘कोंडवाडा’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्याची चर्चाही झालेली होती. बहुधा ‘विटाळ’ हा कथासंग्रहही प्रसिद्ध झालेला होता. या ‘विटाळ’मध्ये ‘बलुतं’च्या खाणाखुणा दिसतात. म्हणजे ‘बलुतं’मधील काही घटना- प्रसंग ‘विटाळ’मधील कथांमधून दृष्टीस पडतात. ‘बलुतं’ प्रसिद्ध झालं आणि दया पवार एकदम प्रकाशझोतात आले. त्यातच पु. ल. देशपांडे यांनी ‘बलुतं’वर महाराष्ट्र टाइम्सच्या रविवार पुरवणीत ‘दुःखानं गदगदलेलं झाड’ असा लेख लिहिला. ‘बलुतं’ची चौफेर चर्चा सुरू झाली. ‘बलुतं’ आणि दया पवारांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. पवारांना फोर्ड फाउंडेशनचा एक लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला. जर्मनीचा दौरा झाला. अनेक भारतीय आणि विदेशी भाषामध्ये ‘बलुतं’ गेलं. ‘अत्याचार’ नावाचा मराठी सिनेमाही त्यावर निघाला. पुढे पवारांना यथावकाश पद्‌मश्री सन्मान मिळाला.

माझ्या हातात ‘बलुतं’ पडलं, त्या वेळी मी नुकताच कॉलेजात दाखल झालो होतो. पहिल्या काही महिन्यांत मी ग्रंथालयातील कपाटात अनेक पुस्तकं धुंडाळली होती. ‘बलुतं’बद्दल ऐकून-वाचून होतो. कपाटात ‘बलुतं’ दिसताच ते ताब्यात घेतलं. ग्रंथालयाच्या काऊंटरवर रीतसर नोंदणी करून शबनममध्ये टाकलं. पुढं अनेक दिवस मी ‘बलुतं’ पुन: पुन्हा वाचत होतो. पुस्तक इतक्या वेळा  नजरेखालून गेलं होतं की अमुक एक प्रसंग हा डाव्या की, उजव्या पानावर आहे, हेही मला लख्ख आठवत होतं.

आता मागे वळून पाहताना विचार करतो की, ‘बलुतं’ मला इतकं का आवडलं होतं? दया पवारांचं अनुभवविश्व आणि माझं आयुष्य यात कोणतंही साधर्म्य नव्हतं. दया पवारांच्या आणि माझ्या वयातही बरंच अंतर होतं. मी विशी-बाविशीचा तरुण, तर पवारांची चाळिशी उलटलेली. पवार नगर जिल्ह्यातले, संगमनेर-अकोलेजवळच्या धामणगावचे. मी जळगाव जिल्ह्यातला, पण वडिलांच्या रेल्वेच्या नोकरीमुळे गावं सतत बदलत गेलेली. म्हणजे भौगोलिक प्रदेशही एकच नव्हता. असं असलं तरी ‘बलुतं’मधल्या काही भन्नाट घटना मला विलक्षण भावलेल्या. विशेषतः त्यातील व्यक्तिरेखा मला ओळखीच्या आणि जवळच्या वाटल्या.

‘बलुतं’मधल्या धामणगावच्या महारवाड्यातील वल्ली असलेल्या व्यक्ती आमच्या गावाकडच्या महारवाड्यातीलच वाटायच्या. परीक्षा संपल्यावर दर उन्हाळ्याच्या सुट्टीत चुलते-काके आणि त्यांची मुलं, आम्ही सगळे गावाकडं जायचो. महारवाड्यातील समवयीन मुलांबरोबर शेतात, रानात, नदीकाठी हुंदडायचो. या महिनाभराच्या वास्तव्यात अनेक बनेल- तऱ्हेवाईक व्यक्तींचा परिचय होत असे. पवारांचे वडील गेल्यानंतर, त्यांच्या गर्भार आईचे पोट पुढे आल्यावर उमा आज्याने पवारांना उचकवले होते. त्याचा पवारांना खूपच त्रास झाला. त्यांनी चक्क आईवर संशय घेतला होता. लग्नसराईच्या वेळी वाजंत्रीच्या ताफ्यातील मंडळींना गावकऱ्यांची जेवणं झाल्यावर जेवण दिलं जाई. ताफ्यातील महार कलावंत भुकेमुळे मेटाकुटीला येत. त्या वेळी ते आयोजक मंडळींना आपल्या पिपाण्यांमधून शिव्या देत. चित्रकार असलेला चंदर, दादरच्या पुलाखाली राहणारी जमुनामावशी, खुद्द पवारांचा हरहुन्नरी चुलता अशी काही मंडळी मला जवळची वाटली. कारण तशीच माणसं मला आमच्या आणि मामाच्या गावातील महारवाड्यात भेटली होती. सई, सलमा आणि बानू या तर खूपच ओळखीच्या वाटायच्या. जणू काही मित्रांच्या बहिणीच. रेल्वे कॉलनीत सर्वच जाती-धर्मांचे मित्र. सगळ्या मित्रांचे परस्परांशी संबंध कौटुंबिक मैत्रीचे. कुटुंबातील सगळेच लोक एकमेकांशी मायेच्या ओलाव्याने बांधलेले. म्हणून मित्राचा भाऊ असो वा बहीण- हे आपल्याच घरातील, असा संस्कार मनात मुरलेला. पवारांनी संशयावरून सईचा घटस्फोट घेतलेला. त्याचं मला वाईट वाटलं. त्याहून वाईट वाटलं सलमा किंवा बानू त्यांच्या आयुष्यात येऊ शकली नाही त्याचं. असो.

‘बलुतं’मधील समाजदर्शन अंतर्मुख करणारं आहे. पवारांचा शिक्षणासाठीचा संघर्ष, बोर्डिंगमधील वास्तव्य... गावाकडं आई-बहीण मजुरी करतात, त्यांना सुखाचे दोन घास खाता यावेत म्हणून खटपट करून त्यांनी आई- बहिणीला बोर्डिंगच्या खानावळीत काम मिळवून दिलं. पण एकदा आईला पाळी आल्याचं समजताच मुलांनी जेवणावर बहिष्कार घातला आणि समूहस्वरात ‘पचका झाला रं, पचका झाला’ अशा आरोळ्या मारून अपमानित केलं. काही मुलांनी तर त्यांच्या बहिणीला बंद खोलीत नाचवलं. बहीण नाचते आहे, मुलं ओरडून गाणं म्हणताहेत; त्यांनी टेबल-खुर्चीवर, रिकाम्या पत्र्यांच्या डब्यावर ठेका धरलाय- असं ते दृश्य. पुढं पवार मुंबईला गेले. कामगारवस्तीत राहिले. कावाखानागोलपीठा परिसराचे चित्रण वाचल्यावर दिङ्‌मूढ व्हायला झाले. ‘मुंबई रात्री अंगठीतल्या खड्यासारखी चमचम करीत असे’ असं मुंबईचं वर्णन त्यांनी केलं आहे. तोपर्यंत मी मुंबई पाहिली नव्हती. ‘अशी चमचमणारी मुंबई पाहायला हवी’ अशी इच्छाही त्यामुळं मनात निर्माण झाली होती.

निवेदनशैलीचा परिणाम असेल- त्याही कारणामुळे ‘बलुतं’ आवडलं होतं. पूर्वाश्रमीचा दगडू मारुती पवार लेखक असलेल्या दया पवारला आपला जीवनवृत्तांत सांगतोय, अशी निवेदनाची मांडणी. दगडूनं दयाला विश्वासात घेतलेलं. मनातील वेदना, सल, अपमान, संघर्ष असं सगळं दगडू दयाला सांगतो. मधेच, तर ‘काय सांगत होतो’, अशी विचारणा करून दगडू आपलं निवेदन कथन करीत राहतो. आपल्या आयुष्यासंबंधी नेमकं आपण कसं लिहावं, असा प्रश्न पवारांना पडला असावा. तो पेच सोडविण्यासाठी पवारांनी ही निवेदनशैली स्वीकारली असावी. त्यात नावीन्य होतं.

दया पवारांनी आपल्या जीवनानुभवाचे चित्रण पारदर्शीपणे केले, असे सतत जाणवत राहते. त्यांनी हातचे काही राखून ठेवलेले दिसत नाही. ज्या गोष्टी एखादा व्यक्ती आयुष्यभर कोणाजवळ सांगू शकत नाही, त्यांनी अगदी सहजपणे सांगितल्या आहेत. ‘बलुतं’ प्रसिद्ध होण्यापूर्वी आत्मचरित्रलेखनाचे मराठी साहित्यात काही संकेत होते. ते कोणते? तर, आत्मचरित्र कर्तृत्वसंपन्न व्यक्तीने लिहावे. म्हणजे नेमके कोणी? तर, ज्याच्या आयुष्यात सांगण्यासारखं काही आहे, जे वाचून लोक प्रेरणा घेतील. म्हणजे एखादा प्रसिद्ध सिनेमा नट किंवा नटी, एखादा मंत्री, एखादा आंतरराष्ट्रीय दर्जाचा कीर्तिवंत खेळाडू, एखादा लष्करप्रमुख, एखादा पंतप्रधान. म्हणजे असामान्य कर्तृत्व असलेला व्यक्ती. आणि त्यानं ते कधी लिहावं? तर, आयुष्याच्या संध्याकाळी. म्हणजे वयाच्या अशा टप्प्यात, जिथे आता काहीही करायला वाव राहिलेला नाही. भूतकाळाकडे पाहून  सिंहावलोकन करणे आणि आपल्या कर्तृत्वासंबंधी लिहिणे. लेखनात अर्थातच असामान्य घटना-प्रसंगांचा समावेश. जे सामान्यांच्या आयुष्यात दूर-दूरपर्यंत घडू शकत नाहीकिंबहुना, त्याची कल्पनाही ते करू शकत नाहीत अशी वलयांकित अनुभवांची जंत्री अशा आत्मचरित्रात असायची. या पार्श्वभूमीवर ‘बलुतं’कडे पाहिलं तर काय दिसतं? तर, ही काय हीरोची थिअरी नाही. अत्यंत सामान्य माणसाचं हे अनुभवकथन आहे. म्हणजे सामान्य माणसाच्या आयुष्यातही सांगण्यासारखं बरंच काही असतं तर? ते काय असतं? तर, ते वलयांकित अनुभव नसतात. जातिव्यवस्थेच्या तळ्यात जन्म झाल्यामुळे अभावग्रस्त जीवन वाट्याला आलं. या जीवनात ना गौरव, ना सन्मान. आहे ती परवड आणि फरफट. शिक्षणासाठी आणि पोटाची भूक भागविण्यासाठी संघर्ष. हलक्या-नीच जातीमुळे प्रतिष्ठा नाही- किंबहुना, त्यामुळेच अवहेलना, अपमान, वेदना आणि दुःख वाट्याला आलेले. पवार अर्पणपत्रिकेत लिहितात, ‘आई, तुझ्यामुळेच दलितांच्या विराट दुःखाचं दर्शन झालं.’

पवारांनी ‘बलुतं’मध्ये हातचं काही राखून लिहिलं नाही, असा वर उल्लेख आला आहे. ‘बलुतं’ प्रसिद्ध झाल्यावर पवारांना खूप सोसावं लागलं. कोर्ट-कचेऱ्या झाल्या. आयुष्यात आलेल्या लोकांची नावं त्यांनी जशीच्या तशी लिहिली, त्यावरूनही त्यांना जाब विचारला गेला. खूपच मनस्ताप सहन करावा लागला. मग प्रश्न असा निर्माण होतो की, त्यांना याची जाणीव नव्हती? आपण हे जे काही लिहितो आहोत, त्याचे परिणाम काय होऊ शकतात याची खरंच त्यांना कल्पना नव्हती? त्यांना अंदाज असावा, असा तर्क करायला जागा आहे. पण मनातील लेखनऊर्मी ते दाबू शकले नसावेत. हे आपण लिहिलंच पाहिजे, त्याशिवाय मनातील ठसठस जाणार नाही- अशी त्यांची मनःस्थिती झाली असावी. आंबेडकरी विचार आणि चळवळीमुळे दलित साहित्यप्रवाहातील लेखकांच्या मनात एक वैचारिक स्पष्टता आली. आपण हे जे काही आपल्या अपमानास्पद जीवनासंबंधी लिहितोय, त्याची लाज आपण का बाळगावी? आपण हे जीवन स्वतःहून स्वीकारलेले नाही, तर हे आपल्यावर समाजव्यवस्थेने लादलेलं आहे. त्याची शरम या व्यवस्थेला वाटायला हवी. जन्म कुठे, कोणत्या जातीत घ्यावा, हे कोणाला ठरवता येत नाही. मग अस्पृश्य आहोत यात आमचा दोष काय? या स्पष्टतेमुळेच ‘बलुतं’नंतर अनेक आत्मकथनं प्रसिद्ध झाली. या विचारस्पष्टतेमुळेच ‘मी रखेलीचा मुलगा आहे’, हे शरणकुमार लिंबाळे सांगू शकले... यामुळेच ‘आम्ही चोर- भामटे आहोत’, हे लक्ष्मण गायकवाड निर्भीडपणे सांगू शकले... आणि ‘आमचे अर्धे आयुष्य हागणदारीत गेले’ असं लक्ष्मण माने बिनदिक्कतपणे सांगू शकले. दारिद्र्याचं भांडवल करण्यापेक्षा माणूस म्हणून आमचा आत्मगौरव महत्त्वाचा आहे, हे वास्तव या लेखकांनी समोर आणलं. त्याला वाट करून दिली दया पवारांनी.

‘बलुतं’चा माझ्यावर इतका प्रभाव पडला की, एम. ए. ला असतानाच मी दलित साहित्यप्रवाहाचा बारकाईने अभ्यास करू लागलो. आत्मचरित्र या वाङ्‌मय प्रकारासंबंधी अधिक रुची निर्माण झाली. त्यामुळे मराठीतील जी आत्मचरित्रं मिळतील, ती वाचत गेलो. त्यावरील समीक्षा जाणीवपूर्वक मिळवून वाचत राहिलो. त्या काळात दलित लेखकांची जी आत्मचरित्रं प्रसिद्ध झाली होती, ती एकूणएक सगळी वाचून काढली. कित्येक तर विकत घेतली. अजूनही ती माझ्या संग्रही आहेत. पुढे महाविद्यालयात प्राध्यापक झाल्यावर या विषयावरील  वाचन अधिक वाढले. ‘अस्मितादर्श’ आणि इतर दलित साहित्य संमेलनात वावरताना मित्रपरिवार वाढला. चर्चा- संवादातून-वाचनातून बैठक तयार होत गेली. पुढे पीएच. डी.साठी संशोधन करताना ‘दलित स्त्रियांची आत्मकथने : स्वरूप आणि चिकित्सा’ हा विषय निश्चित केला. म्हणजे, पीएच. डी. प्रबंधलेखनासाठी लागणारी पायाभरणी ही खूप आधीपासूनच तयार झाली होती. प्रबंधलेखन करताना आपण ग्रंथच लिहायचा, हे निश्चित केलं. म्हणजे प्रबंधाला नंतर पुस्तकरूप देण्यापेक्षा पुस्तकच प्रबंधाच्या शिस्तीत लिहायचं, हे ठरवलं. विद्यापीठ अनुदान आयोगाने एका योजनेअंतर्गत दोन वर्षांची पगारी रजा दिल्यामुळे मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएच. डी. पदवी संशोधनासाठी मराठी विभागात रुजू झालो. प्रबंधलेखनाचे काम मी दोन वर्षांत पूर्ण केले. त्याचे कारण सगळी संदर्भ- सामग्री मी आधीपासूनच गोळा करून ठेवली होती. विषयाची मांडणी डोक्यात पक्की होती. पीएच. डी. पदवी मिळाल्यावर प्रबंधातील एका ओळीचीही फेरमांडणी न करता मी ‘दलित स्त्रियांची आत्मकथने : स्वरूप आणि चिकित्सा’ हा संदर्भग्रंथ सुविद्या प्रकाशनाच्या वतीने 26 जानेवारी 2001 रोजी प्रसिद्ध केला. त्यात आत्मचरित्र या वाङ्‌मयप्रकारासंबंधी सखोल आणि सूक्ष्म मीमांसा करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठीतील आत्मचरित्रलेखनाची परंपरा, पहिले आत्मचरित्र, पहिले दलित आत्मकथन, आत्मचरित्र-आत्मकथाआत्मनिवेदन-स्वकथन-आत्मकथन या संज्ञांचा परामर्श, दलित आत्मकथनलेखनाच्या प्रेरणा, आत्मकथनांचे स्वरूप, त्यांचे वैशिष्ट्य अशी प्रदीर्घ चर्चा या ग्रंथात केली आहे. अनेक अभ्यासकांना पुढे या संदर्भग्रंथाचा उपयोग झाला. माझे अभ्यासविषय आणि अभ्यासक्षेत्र ‘बलुतं’ने निश्चित केले होते, असे आता म्हणायला हरकत नाही.

‘बलुतं’मुळे मी झपाटलो असलो तरी दया पवारांची आणि माझी भेट कधी झाली नाही. म्हणजे मी त्यांना एक- दोन वेळा पाहिलं, पण त्यांच्याशी बोलता आलं नाही. जळगावला शंकरराव खरात यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं होतं. तेव्हा आम्ही मित्रमंडळी तिथे गेलो होतो. आकर्षण काय? तर दया पवार, यशवंत मनोहर, नारायण सुर्वे, उद्धव शेळके. या संमेलनात पवारांना पाहिलं. सफारीमध्ये वावरत होते. शरीर काही प्रमाणात सुटलेले, पण चेहऱ्यावर मवाळ भाव. बोलणं काही झालं नाही. सोलापूरच्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे पवार अध्यक्ष होते. पण सोलापूरला जाणं काही जमलं नाही.

पुण्यातील खडकी या उपनगरात राजा ढाले यांच्या अध्यक्षतेखाली अस्मितादर्श संमेलन झाले, त्या वेळी परिसंवादात पवारांना ऐकलं होतं. राजा ढालेंनी दलित साहित्य ही संज्ञा-संकल्पना फेटाळून ‘फुलेआंबेडकरी प्रेरणे’चे साहित्य या संज्ञेचा पुरस्कार केला होता. पवारांनी याबाबत आपले मतभेद नोंदवले होते आणि ‘दलित साहित्य’ हीच संज्ञा कशी सर्वव्यापी आणि अन्वर्थक आहे, हे ठासून सांगितलं होतं. नंतर त्यांनी या संदर्भात ‘लोकसत्ते’त लेख लिहून अधिक सविस्तर प्रतिपादन केलं होतं. भेट झाली नाही तरी पवारांना मी दोनेक वेळा पत्रं लिहिली होती. त्यांचं उत्तरही आलं होतं.

अगदी अलीकडे अकोल्याच्या महाविद्यालयात व्याख्यानासाठी गेलो होतो, त्या वेळी त्यांच्या धामणगावला भेट दिली होती. गावातील अनेक लोकांशी बोललो. पण दया पवार हे नाव कोणालाही माहीत नव्हतं. वाईट वाटले. नंतर एका नियतकालिकासाठी ‘दया पवारांच्या गावात’ हा लेख लिहून अस्वस्थतेला वाट करून दिली. पवार 1996 मध्ये दिल्ली मुक्कामी हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मात गेले. त्या वेळी नगरच्या साहित्य संमेलनाची धामधूम सुरू होती. पवारांनी उमेदवारी घोषित केली होती. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर त्यांचे दौरे सुरू होते. निवडणुकीचा ताण बहुधा त्यांना मानवला नसावा. त्यांच्या निधनाच्या वार्तेने खूप हळहळ वाटली. ‘हा दगड इमारतीच्या बांधकामातून निकामी केलेला-’ हे जॅक लंडनचं वाक्य त्यांनी ‘बलुतं’च्या प्रारंभीच्या पानावर नोंदवलं आहे. ते गेल्यावर हीच ओळ मला सारखी आठवत होती.

Tags: उद्धव शेळके नारायण सुर्वे यशवंत मनोहर बलुतं मनोहर जाधव दया पवार वाङ्मय मराठी साहित्यिक दलित साहित्य मराठी साहित्य weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मनोहर जाधव,  पुणे
manohar2013@gmail.com

तीन दशके सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक राहिलेले मनोहर जाधव आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख आहेत, त्यांनी कविता व समीक्षा लेखन केले आहे.


Comments

  1. G V Hinge- 05 Jul 2021

    सुंदर.

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके