डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सनातन : व्यवस्थेला प्रश्न विचारणारी कादंबरी

‘‘गोहत्या केली म्हणून ज्यांची हत्या केली त्यांना...’’ ही या कादंबरीची अर्पणपत्रिका. त्यातून वर्तमानकालीन राजकीय- सामाजिक संदर्भ मुखर होतो. गेल्या काही वर्षांत अनेक अल्पसंख्य-मागासवर्गीयांना गोहत्येच्या संशयापायी आपले प्राण गमवावे लागले. ते उन्मादी झुंडशाहीचे बळी ठरले. कादंबरीतही या घटनांचे संदर्भ येतात. माणसांची अवहेलना सुरू आहे. माणसांपेक्षा गाय महत्त्वाची. कारण ती गोमाता. आपण कोणत्या संस्कृतीच्या जाळ्यात गुरफटत चाललो आहोत, असा भयकारी प्रश्न निर्माण व्हावा, अशी वातावरणनिर्मिती सुरू आहे. त्याचे चित्रण लिंबाळे यांनी ‘सनातन’मध्ये निर्भिडपणे केले आहे. या कादंबरीतून जे राजकीय विधान समोर येते ते पाहिले तर लेखकाने व्यवस्थेला कायम प्रश्न विचारायला हवेत, याची प्रचिती येते. ही प्रचिती समाधान देणारी, म्हणून महत्त्वाची! 

प्रस्थापित-विस्थापित, शोषक-शोषित, सरंजामदार-गरीब असे संघर्ष जगभर पहायला मिळतात. जगाच्या पाठीवर कित्येक वर्षांपासूनचा सुरू असलेला हा झगडा. आपल्या अस्तित्त्वासाठी, कधी वर्चस्वासाठी तर कधी अन्य कारणासाठी. अशा लढ्याचे स्वरूपही गुंतागुंतीचे. कोणाचे हितसंबंध कुठे दडलेले. कोणाचा स्वार्थ तर कोणाची बनवेगिरी. प्रत्येक ठिकाणचे संदर्भही निरनिराळे. कधी रंगभेद तर कधी वंशभेद. कधी प्रदेशवाद तर कधी वर्णश्रेष्ठत्व. उच्च-नीच, जातीभेद तर नित्याचेच. विशेषतः भारतीय संदर्भात पाहिले तर जातव्यवस्था सातत्याने सक्रिय दिसते. कधी दृश्य तर कधी अदृश्य स्वरूपात. मानवी मूल्याच्या प्रस्थापनेसाठी, माणसाचे जीवन अधिक सुंदर व्हावे यासाठी जे संघर्ष झाले, त्यातून एक तेजस्वी इतिहास आकाराला आला. मात्र हा इतिहास घडविण्यासाठी ज्यांनी त्याग केला त्यांची नोंद नाही. आणि ज्यांचे इतिहासात कर्तृत्त्व नाही, ते त्या इतिहासाचे नायक झाले. त्याचे कारण ज्यांनी इतिहास घडवला तो त्यांना लिहिता आला नाही आणि ज्यांनी लिहिला त्यांनी स्वार्थीवृत्तीने स्वतःचे गौरवीकरण केले. विशेषतः मानवतेचा चेहरा कुरूप करणाऱ्या जातव्यवस्थेच्या विरोधात जे संघर्ष झाले ते एक तर इतिहासात दडवण्यात आले किंवा त्यांच्या नोंदीच झाल्या नाहीत. असे असले तरी इतिहास आपल्या पाऊलखुणा मागे सोडत असतो. त्याचे पुनर्वाचन करणे, संगती लावून त्याचा अन्वयार्थ धुंडाळणे, विश्लेषणाच्या जागा हेरून त्याची पुनर्स्थापना करणे अशी महत्त्वाची कामगिरी कर्तव्यबुद्धीने पार पाडणारे अभ्यासक, संशोधक, कलावंत विविध ठिकाणी विखुरलेले दिसतात. कोणी संशोधनातून तर कोणी कलेच्या माध्यमातून इतिहासाचा माग घेत असतो. शरणकुमार लिंबाळे यांनी ‘सनातन’ या कादंबरीतून असा प्रयत्न केल्याचे दिसून येते. अलीकडेच या कादंबरीला राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा ‘सरस्वती सन्मान’ हा पुरस्कार प्राप्त झाला.

विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार यांच्यानंतर मराठीमध्ये हा सन्मान लिंबाळे यांना मिळाला. यात विशेष बाब अशी की, लिंबाळे हे मराठीतले दलित साहित्यप्रवाहाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे या साहित्यप्रवाहाच्या संदर्भातदेखील ही उल्लेखनीय बाब आहे. सत्तरच्या दशकानंतर मराठीत दलित साहित्यप्रवाहाची चर्चा सुरू झाली. प्रस्थापितांच्या कठोर टीकेला सामोरे जाऊन या साहित्यप्रवाहाने आपली पृथगात्मता आणि मौलिकता सिद्ध केली. कविता आणि आत्मकथन या साहित्यप्रकारांनी तर प्रस्थापित संकेत मोडून नवीन जीवनदर्शन समोर आणले. पुढे या साहित्यप्रवाहामध्ये आपले स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण केले. इतर भारतीय भाषेत दलित साहित्य चळवळीचे वारे वाहू लागले. त्याचा प्रेरणास्रोत मराठी दलित साहित्य म्हणून ओळखले जाऊ लागले, इतकेच नव्हे तर इंग्रजी आणि इतर विदेशी भाषांमध्ये दलित साहित्याने स्वतंत्र ओळख निर्माण केली. अनेक लेखकांना फेलोशिप, सन्मान, पुरस्कार मिळाले. दलित साहित्याने जागतिक परिप्रेक्ष्यात आपली मुद्रा उमटवली. ही सगळी पार्श्वभूमी विचारात घेता ‘सनातन’ला मिळालेला सरस्वती सन्मान या साहित्य-प्रवाहाचाच गौरव करणारा आहे.  

‘सनातन’चा अर्थ हिंदू धर्म, त्यातील विषमता, जातीभेद, जातीआधारित शोषण, शोषक मनोवृत्ती, जात श्रेष्ठत्वाचा अहंकार, शूद्र-अतिशूद्रांचे खच्चीकरण, मानवी मूल्यांची प्रतारणा, वर्णव्यवस्थेतील सर्वोच्च स्थान या एकमेव गृहितकावर आधारित समाजामध्ये वर्तनव्यवहार अशा अनेक मितीतून प्रकट झाला आहे. त्यानिमित्ताने लिंबाळे यांनी हिंदू धर्म व्यवस्थेसंबंधी जे चिंतन मांडले आहे ते अंतर्मुख करणारे आहे. त्यांच्या चिंतनातून तार्किकता प्रकट होत असली तरी हिंदू धर्म व्यवस्थेबद्दलची चीड आणि संताप प्रकर्षाने व्यक्त होतो. हे चिंतन काही केवळ बौद्धिक पातळीवर वावरत नाही तर व्यवस्थेचे बळी म्हणून जे जगणे त्यांच्या वाट्याला आले आहे त्याबद्दलची एक तिडीक आणि घृणाही त्यातून समोर येते. 

लिंबाळे आपल्या मनोगतात लिहितात, ‘‘ही कादंबरी प्रामुख्याने दलितांविषयी बोलते. सर्वच धर्मांनी, प्रदेशांनी, भाषा आणि संस्कृतींनी दलितांना सहजीवनापासून अलिप्त ठेवले. त्यांचा विटाळ मानला. त्यांना भेदभावाने वागवले. परिणामी दलित वेगळे पडले आहेत. हा वेगळेपणा ह्या कादंबरीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. भेदभावाविरूद्ध व्यक्त झालेला हा स्वाभाविक उद्‌गार आहे. वेगळेपणाचे उद्‌गार वाढले तर यजमान संस्कृतीला धोका संभवतो, हा संदेश देण्याचा प्रयत्न आहे. इतिहासाच्या काल्पनिक आधाराचे एक जळजळते वर्तमान सांगण्याचा केलेला हा प्रयत्न आहे.’’ पुढे ते म्हणतात, ‘‘ही कादंबरी म्हणजे महारांचा इतिहास नाही, हे महारांचे वर्तमान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे धर्मचिकित्सेला सुरूवात झाली. हिंदू धर्माने अस्पृश्यांचे आणि आदिवासींचे आतोनात नुकसान केलेले आहे. त्या नुकसानीची गणना अजून झालेली नाही. नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न तर दूरच. अस्पृश्यांच्या आणि आदिवासींच्या नुकसानीविषयी ही कादंबरी बोलते आहे.’’ 

लिंबाळेंच्या मनोगतातून कादंबरीची आशयसूत्रे सूचित झालेली आहे. ‘सनातन’ कादंबरीकडे कसे पाहावे, ती कशी वाचावी याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. तथापि हा झाला लेखकाचा दृष्टिकोन. कादंबरीचा अन्वयार्थ लावण्याचे, त्यातील आशयाची चिकित्सा करण्याचे स्वातंत्र्य वाचकाला आहेच. कादंबरीत पौराणिक कहाण्या आणि आख्यायिकांचा वापर करण्यात आला आहे. कादंबरी लेखनासाठी अनेक संशोधनपर संदर्भग्रंथांचा आणि ललित साहित्यकृतींचा आधार घेतला आहे. मनोगतात त्या त्या लेखकांचा उल्लेखही केलेला आहे. मात्र कोणती कहाणी, आख्यायिका कोणत्या ग्रंथाच्या आधारे घेण्यात आली आहे. त्याचा नेमका उल्लेख नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी वि.रा. शिंदे, श्री.म. माटे यांच्या कोणत्या ग्रंथांतील, कोणते संदर्भ उपयोगी पडले, त्यांचा निर्देश आढळत नाही. तसा निर्देश असायला हवा होता. 

ईस्ट इंडिया कंपनीच्या आधीच्या काळापासून कादंबरी कथानकाला प्रारंभ होतो. त्या काळातील अत्यंत भीषण स्वरूपाचे दलित जीवनचित्रण लेखकाने चितारले आहे. नंतरच्या काळात ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना, कंपनी सरकारमुळे दलितांच्या जीवनात झालेले स्थित्यंतर, सैन्य भरतीमुळे दलित तरुणांच्या कर्तबगारीला मिळालेला वाव, मिशनऱ्यांचे आगमन, धर्मांतराची सुरू झालेली प्रक्रिया, 1857 चे बंड, मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई यांचे उठाव, इंग्रज-पेशवे लढाई, भीमा कोरेगावचा विजय, आदिवासींच्या जंगलांवर इंग्रजांनी मिळवलेला कब्जा, बेसुमार जंगलतोड, विस्थापित झालेले आदिवासी, आदिवासींनी इंग्रजांच्या विरूद्ध पुकारलेला एल्गार, स्वातंत्र्यलढ्याची निर्माण झालेली भावना, आपल्या हक्कांबद्दल दलितांमध्ये निर्माण झालेली जागृती, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी साऊथ ब्युरो कमिशनपुढे अस्पृश्यांच्या वतीने दिलेली साक्ष इतका मोठा अवकाश या कादंबरीने व्यापलेला आहे. दलितांच्या चार-पाच पिढ्यांचा संघर्ष त्यातून चित्रित झाला आहे. साहजिकच त्या त्या काळातील ऐतिहासिक घटनांचे तपशीलवार वर्णन कादंबरीत आले आहे. हे वर्णन विस्तारित स्वरूपात काही ठिकाणी आले आहे, इतके की आपण कादंबरी वाचतो आहोत की इतिहासाची माहिती वाचतो आहोत, असा वाचकाला संभ्रम पडावा. कादंबरीत इतिहासाचे संदर्भही लालित्यपूर्ण असायला हवे, इथे ते इतके कोरडेपणाने येतात की कादंबरीच्या आशयाला न भिडता ते समांतरपणे जाताना दिसतात. पृ. 105, 106, 107, 111, 112, 113 या पृष्ठांवरील वा अन्यत्रही अशी वर्णने विपुल प्रमाणात आढळतात. पौराणिक कहाण्या आणि मिथकांचा वापरही आवश्यक ते संदर्भ अधिक ठसठशीतपणे व्यक्त व्हावेत यासाठी केलेला असला तरी अमृतनाक यांची कहाणी कशासाठी अवतरली असावी असा प्रश्न पडतो, त्याचे प्रयोजन कळत नाही. 

या कादंबरीतील सामाजिक प्रश्नांची चर्चा टोकदारपणे सामोरी येते. हिंदू धर्मातील तीव्र भेदभावांमुळे दलितांचे जगणे असह्य झाले. मिशनऱ्यांच्या सहवासात त्यांना काहीसा दिलासा मिळाला. कारण इथे जातीभेद, अस्पृश्यता नव्हती. होती ती करूणा,  सहानुभूती. त्यामुळे ते ख्रिस्ती धर्माकडे आकृष्ट झाले. त्यांनी आकृष्ट व्हावे असाच व्यवहार मिशनरी करीत होते. धर्मांतरामुळे त्यांचे नाव बदलले, वेशभूषा व प्रार्थनास्थळे बदलली. समाज-जीवनातील जाच कमी झाला. पण जगण्यात निरोगी समाधान आले नाही. एका समस्येतून सुटका झाली तरी दुसरे प्रश्न निर्माण झाले होते. गोरा ख्रिश्चन आणि काळा ख्रिश्चन हा भेद कायम राहिला. रोटी-बेटीतील हा अडसर कायम राहिला. पूर्वाश्रमींच्या हिंदू समाजातून दलित विभक्त झाले, परंतु ख्रिश्चन झाल्यावर ते अधांतरी लोंबकळत राहिले. मिशनरी धर्मप्रसाराचे कार्य करत, पण ख्रिश्चनांमधल्या जाती मिटवण्याचे काम त्यांनी कधी केले नाही. ते हिंदू धर्मातल्या जातीव्यवस्थेविषयी प्रखर टीका करायचे, पण ख्रिश्चनांमधल्या जातिभेदाविषयी मौन पाळायचे. त्यामुळे धर्मांतरित अस्पृश्यांना फसवणूक झाल्यासारखे वाटायचे. ज्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला त्यांची समाजजीवनातील अस्पृश्यता नाहीशी झाली, पण पूर्वाश्रमीचे अस्पृश्य हा नवीनच वर्ग निर्माण झाला. मिशनऱ्यांच्या नादी लागून अस्पृश्य धर्मांतर करतात, म्हणून हिंदू धर्माचे धुरीण मिशनऱ्यांना कडाडून विरोध करतात. ब्राह्मण आणि अस्पृश्यता वगळल्यास हिंदू धर्मात काय शिल्लक राहणार आहे? हा हिंदू समाजाचा गाभा आहे, अशी त्यांची घट्ट धारणा आहे. या धारणेतूनच संघर्षाचे अनेक प्रसंग उद्‌भवले. त्याचे चित्रण लिंबाळे यांनी केले आहे. 

फादर एडमंडची हत्या नरसोपंतांनी केली. रात्रीच्या वेळी चर्चच्या आवारात शिरून झोपलेल्या फादरला नरसोपंतांनी निष्ठुरपणे गावठी पिस्तुलातून गोळ्या घातल्या, आणि पोबारा केला. नरसोपंत पकडला गेला, इंग्रज अधिकाऱ्यांनी त्याला फासावर लटकवले. या घटनांच्या मालिकेतील वेगवान गुंतागुंत लिंबाळे यांनी चित्रित केली आहे, ती मुळातून वाचण्यासारखी आहे. मुळात जातव्यवस्था समाजातील लोकांची मानसिकता तयार करते. ती विकृत स्वरूपाचीच असते. श्रेष्ठ-कनिष्ठ भाव जोपासत राहते. माणूस म्हणून असलेली गुणवत्ता इथे नामशेष होते. जाती श्रेष्ठत्वाचा गजर माणसांच्या तना-मनात निनादत राहतो. या जातीअहंकारामुळे समाजजीवनाला कीड लागते. ही कीड वाळवीसारखी समाज पोखरत राहते. अंतिमतः माणसापेक्षा जात वरचढ ठरते. या सगळ्या प्रक्रियेत समाज असो वा राष्ट्र, ठेचकाळत राहतात. त्यामुळे ना समाजाला उभारी येते ना राष्ट्राला. ‘सनातन’ या कादंबरीतील समाजजीवन असे जातव्यवस्थेभोवती गरगरत राहते. गरगरणारा समाज पुढे जात नाही. स्वतःभोवती फिरत राहतो. मूर्च्छा येऊन कोसळतो. 

लिंबाळे यांचे ‘अक्करमाशी’ हे आत्मकथन इंग्रजीमध्ये ‘द आऊटकास्ट’ या शीर्षकाने प्रसिद्ध झाले आहे. हिंदी, गुजराथी, पंजाबी, मल्याळम्‌, तमिळ, उर्दू, तेलुगु या भारतीय भाषांमध्ये ‘अक्करमाशी’ याच शीर्षकाने ते प्रसिद्ध झाले आहे. या आत्मकथनाचे वरील भाषांमध्ये जोरदार स्वागत झाल्यामुळे ‘अक्करमाशी’चे लेखक म्हणून लिंबाळे यांची आणि ‘अक्करमाशी’चीही चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. अनुवादाचे सामर्थ्य काय असू शकते, याचा अनुभव आल्यानंतर लिंबाळे यांनी स्वतःहून आपल्या साहित्यकृती इतर भाषांमध्ये कशा जातील याकडे लक्ष दिले. त्यांचे इतर ललित साहित्य आणि काही समीक्षालेखन इतर भाषांमध्ये अनुवादित झालेही, मात्र ‘अक्करमाशी’कार अशीच त्यांची ओळख कायम राहिली. सरस्वती सन्मानामागे या ओळखीचा संदर्भ महत्त्वाचा ठरला असेल तर नवल वाटायला नको. 

‘‘गोहत्या केली म्हणून ज्यांची हत्या केली त्यांना...’’ ही या कादंबरीची अर्पणपत्रिका. त्यातून वर्तमानकालीन राजकीय- सामाजिक संदर्भ मुखर होतो. गेल्या काही वर्षांत अनेक अल्पसंख्य-मागासवर्गीयांना गोहत्येच्या संशयापायी आपले प्राण गमवावे लागले. ते उन्मादी झुंडशाहीचे बळी ठरले. कादंबरीतही या घटनांचे संदर्भ येतात. माणसांची अवहेलना सुरू आहे. माणसांपेक्षा गाय महत्त्वाची. कारण ती गोमाता. आपण कोणत्या संस्कृतीच्या जाळ्यात गुरफटत चाललो आहोत, असा भयकारी प्रश्न निर्माण व्हावा, अशी वातावरणनिर्मिती सुरू आहे. त्याचे चित्रण लिंबाळे यांनी ‘सनातन’मध्ये निर्भिडपणे केले आहे. या कादंबरीतून जे राजकीय विधान समोर येते ते पाहिले तर लेखकाने व्यवस्थेला कायम प्रश्न विचारायला हवेत, याची प्रचिती येते. ही प्रचिती समाधान देणारी, म्हणून महत्त्वाची! 

Tags: मराठी साहित्य मनोहर जाधव दलित साहित्य सरस्वती सन्मान साहित्य सनातन शरणकुमार लिंबाळे editorial manohar jadhav saraswati sanman sharankumar limbale sanatan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मनोहर जाधव,  पुणे
manohar2013@gmail.com

तीन दशके सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक राहिलेले मनोहर जाधव आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख आहेत, त्यांनी कविता व समीक्षा लेखन केले आहे.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके