डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

मास्तर कृष्णरावांच्या शब्दांत...

या विशेषांकाचा एक विशेष म्हणजे मास्तर कृष्णरावांनी आपले गुरुजन, विशेषतः पं. भास्करबुवा बखले, त्यांच्या नजरेखाली केलेल्या आपल्या संगीतसाधनेची हकीगत आणि आपल्या गुरुवर्याच्या आठवणी या सर्व विषयांचा स्वतःच्याच शब्दांत करून दिलेला परिचय. आरंभी देत आहोत, त्यांच्या हदयंगम आठवणी, त्यानंतर त्यांनी केलेले गुरुवर्यांच्या गायकीचे आणि विद्यादानाचे विवरण.

स्मृतींच्या या अनमोल खजिन्यापाठोपाठ 'गुरुवर्याची गायकी व शिकवण' हा खुद्द मास्तरांनीच 'संगीत कलाविहार' मध्ये प्रसिद्ध केलेला लेख दिला आहे. तो या 'कृष्णस्मृतीं’ चा कलशाध्यायच आहे.

1. कृष्णस्मृती!

मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांची संगीत ग्रहण करण्याची शक्ती अलौकिकच होती. गुरूने दिलेल्या ज्ञानाचा कणकण शिष्य बुद्धिमान असला तर इतक्या अचूकपणे ग्रहण करतो की बिंब कोणते आणि प्रतिबिंब कोणते, असा भल्याभल्यांना संभ्रम पडावा. पण गुरूने आपल्याला विद्या कशी दिली, याचे आनंदाने स्मरण करण्यात कृतज्ञ शिष्याला कृतार्थता वाटते. मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी आपल्या महान गुरूच्या- गुरुवर्य भास्करबुवा बखले यांच्या- आठवणी किती उचंबळलेल्या मनाने सांगितलेल्या आहेत, ते येथे प्रत्ययाला येईल. या आठवणी त्यांनी श्री. मा. वि. धामणकर (भास्करबुवांचे ज्येष्ठ जावई) यांना सांगितल्या. त्या येथे आवर्जून देत आहोत.

गायनाचार्य गुरुवर्य बुवासाहेबांच्या चरित्रासाठी मी त्यांच्याबद्दल लिहिण्यास बसलो परंतु त्यांचे गाण्याचे स्वर डोक्यात सदैव घोळत असल्याने, त्यांची एखादी अस्ताई मी स्वररचनेने लिहून काढीन व त्यात मला जितकी सुलभता वाटेल तितके त्यांच्याबद्दल नुसते लिहिण्याचे अवघड वाटते. गाणारांचे गाणे जितके सदोदित मनोरंजक वाटते तितके त्यांच्या गुणांचे वर्णनयुक्त भाषण अगर त्यांच्यावर लिहिलेला लेख हा सदोदित मनोरंजक वाटणार नाही. तथापि गुरुवर्यांनी केलेली गुरुसेवा कष्टमय होती. विद्येकरिता हालअपेष्टा व जातिभेद विसरून गुरूची मर्जी संपादन करून, त्यांना आपलेसे करून विद्येत पारंगत होऊन त्यांचा पूर्ण आशीर्वाद त्यांनी मिळविला व त्यामुळे जगात ते एक लोकोत्तर गायक म्हणून अमर झाले. 

ह्या कथेपासून नवीन पिढीच्या शिष्यवर्गास बोध घेण्यासारखा आहे. हे गुरुचरित्र खास आहे हे जाणून गुरुची अल्प का होईना एक सेवा आपल्या हातून घडावी ह्या हेतूने मी माझी शब्दरूपी सुमनींनी गुंफलेली माला गुरुचरणांवर वाहात आहे. गुरुवर्य बुवासाहेबांची व माझी हृष्टभेट सन 1910 मध्ये मी नाट्यकला प्रवर्तक कंपनीमध्ये असताना झाली. मी लहान कामे करीत होतो व पुढे सौभद्र नाटकात नारदाची भूमिका करू लागलो. गाण्याबरोबर पायात चाळ बांधून 'पावना वामना या मना...' हे पद म्हणत असताना तालावर नाचावी पाऊले टाकीत हे पद म्हणावयाचे. त्या वयाला व भूमिकेला साजेसे होते. व नाट्यकला प्रवर्तक कंपनीच्या मालक मंडळींचा व बुवासाहेबांचा स्नेह असल्याने ते कधीकधी येत असत.

एकदा सौभद्र नाटकाला बुवासाहेब आले होते. पहिल्या अंकानंतर त्यांना रंगपटात बोलावून मालकांनी आदरयुक्त नमस्कार केला. मी दुरूनच पाहात होतो. इतक्यात त्यांनी, नारदाचे काम केलेला मुलगा कोण असे विचारताच मालकांनी मला त्यांच्यापुढे नेले व लगेच मी त्यांना नमस्कार केला. हा मुलगा हुशार आहे, द्याची म्हणण्याची लकब चांगली आहे व हा गायनात चांगला तयार होईल असे त्यांनी म्हटलेले शब्द मला पूर्ण स्मरत आहेत. पुढे काही दिवसांनी मी कंपनीतून निघाल्यावर मला गायन शिकविण्याकरिता कोणाकडे ठेवावे हा विचार माझे ती. मातोश्री, वडीलबंधू करू लागले. 

त्याचे परमस्नेही गोपाळराव मराठे, धोंडोपंत साठे यांना त्याबद्दल विचारले. त्यांनी गायनाचार्य भास्करबुवा बखले ह्यांच्याकडे ठेवावे असे मत दिले. माझे बंधू, गोपाळराव मराठे व पं.पळशीकर यांच्याबरोबर मी बुवासाहेबांकडे गेलो. जाण्यापूर्वी 'पुनरपि नयना ही तनुलतिका' हे वीरनतय नाटकातील ‘पूर्वी' रागाचे पद बसविले होते. ते बुवासाहेबांसमोर म्हटले. पद म्हणून झाल्यावर बुवासाहेब म्हणाले, 'या मुलाला मी ओळखतो असे वाटते. नारदाचे काम करीत असे, तो हाच मुलगा ना? ह्याचा आवाज फार हलका आहे.' हे शब्द ऐकून, 'याला आपण कृपा करून गाणे शिकवा, " असे ती. बंधू बुवासाहेबांना म्हणाले. अशी इच्छा प्रदर्शित केल्यावर हयाला माझ्या मुलाप्रमाणे मी समजतो, अवश्य शिकवीन' असे बुवासाहेब म्हणाले. त्यावर बंधू म्हणाले, 'आम्ही अगदी गरीब आहोत व आपल्याला काही मोबदला देण्याची आमची ताकद नाही. त्याबरोबर बुवासाहेब म्हणाले, 'तुम्ही काय द्यावे व आम्ही काय घ्यावे? परंतु मुलगा समजल्यावर काही बोलण्याची जरूरच नाही.' ह्यात बुवासाहेबांच्या मोठेपणाची व प्रेमळ अंत:करणाची साक्ष पटली व त्यांचे व माझे गुरुशिष्य व पितापुत्र असे नाते सुरू झाले. त्या दिवसापासून त्यांनी स्थापन केलेल्या भारत गायन समाजामध्ये माझ्या शिक्षणाला सुरुवात झाली.

समाजातील कोर्सचे शिक्षण मला अवगत होते, तथापि मी स्वतंत्र गवई व्हावे म्हणून त्या पद्धतीने शिक्षण देण्यास त्यांनी सुरुवात केली. समाजातील शिक्षणाच्या वेळा सोडून रात्री साडेनऊच्या पुढे, सकाळी सातच्या पुढे व दुपारी तीन वाजता मला ते शिकवू लागले. मी अशक्त असल्याने व सर्दीचा विकार असल्याने माझी छाती कमजोर आहे हे जाणून मला झेपेल अशी मेहनत माझ्याकडून ते करून घेऊ लागले. 

एवढे मोठे गायनाचार्य पण त्यांनी माझ्यासारख्या लहान मुलाला कसे शिकवावे, याबद्दलची त्यांची हातोटी वाखाणण्यासारखी आहे. माझा आवाज माझे वय व माझी बुद्धी, तशीच ताकद अजमावून, मी जी काही पदे अगर किरकोळ चिजा म्हणत असे त्याच स्वर व तालामध्ये अर्थासह प्रथम त्यांनी ती सुधारण्यास सुरुवात केली. नाटकातील मराठी पदे मला साधारण येत होती. त्यांच्या मूळ चिजा बसविण्यास सुरुवात केली. मानापमानातील 'टकमक पाही' ह्याची मूळ चीज- 'पीहरवाने हारी ही मला सांगण्यास सुरुवात केली. मोठा घास घेण्यापेक्षा पचेल एवढाच देऊन त्यांनी जवळजवळ ती चीज संपूर्ण बसवून टाकली.

नंतर स्वतंत्र चीज 'हारवा मोरा दे' ही अस्ताई ते सांगू लागले. चिजेत लय, गमक व वजनदार पाया असलेल्या चिजांची तालीम मला जास्त दिवस दिली गेली. राग यमन शिकविण्याचा उद्देश हा की ह्या रागाचे स्वर संपूर्ण असून तान पलटे घेण्यास सुलभ जावे. गुरुवर्य प्रत्येक पलटा मोजून घटविण्यास सांगत व बरोबर आपण स्वतः म्हणत. नंतर भूप राग घेतला. नंतर सकाळचे राग, सुरावटी, दुपारी सारंग वगैरे असा क्रम आखला गेला. प्रत्येक रागाची सविस्तर माहिती देऊन त्याचे स्वरूप समजावून सांगत. अशी दिवसातून तीन तास न कंटाळता मेहनत होऊ लागली. जवळजवळ 5-6 महिने हे राग चालू होते. माझ्या घरची वडील मंडळी कंटाळून गेली. त्यांनी नित्य विचारावे की बुवांनी काय शिकविले व मी जे होत होते तेच सांगत होतो. 

कित्येक वेळी घरच्या मंडळींनी मला निरोप द्यावा की आपली गरिबी आहे तर लवकर शिकवावयास बुवांस सांग. परंतु शिक्षण उत्तम मिळत असल्यामुळे, असा निरोप कसा सांगावा हा मला प्रश्न पडत असे. एकदाचे मी सांगून टाकले की तुम्हीच जाऊन बुवांना काय सांगायचे ते सांगा. त्याप्रमाणे माझे वडील बंधू बुवांना भेटावयास आले. बुवासाहेबांनी न रागावता अत्यंत प्रेमाने बंधूंना सांगितले की, 'दत्तोपंत, हे राग दिसायला साधे वाटतात पण ते उत्तम गायल्यावर त्यांची महती विशेष आहे. कृष्णाला मी नुसता चिजांचा नंबर वाढवून शिक्षण देत नाही, तर त्याला गायकीची कल्पना येण्यासाठी सर्वसाधारण तऱ्हा त्याच्या गळ्यात उतरवीत आहे. 

त्याचे हे यमन, भूप, भैरवी, सारंग ऐकून तुम्हाला त्याच्या पहिल्या गुणगुणण्यात व अधिक धीमेपणाने म्हटलेल्यात फरक वाटतो की नाही? चार रागांची नावे ऐकून तुम्हाला कंटाळवाणे वाटत असेल हे खरे परंतु धीरानं सर्व काही मी करून घेईन. असे बुवा म्हणाले. बुवासाहेबांचे हे भाषण व शिक्षणाचे धोरण पाहून बंधूंना व मातोश्रीना बरे वाटले व पुन्हा ह्याबाबत ते बुवासाहेबांकडे विचारण्याकरिता आले नाहीत. सुरापेक्षा माझा ताल कच्चा असे, त्यामुळे शिकविताना हाताची बोटे ह्या मात्रा कल्पुन त्या हिशोबाने प्रत्येक चीज, त्यातील विलंपद व पलटे बरोबर बसवून घेत असत. मी कंटाळा केला तर माझ्याच मांडीवर तालाच्या चापट्या देत असत. 

काही वेळाने मांडी हुळहुळून जाई व आता ताल शिरला की नाही डोक्यात, म्हणून विचारीत. पाच् सहा महिन्यानंतर, भारत गायन समाजाच्या मदतीकरिता बुवा जलसे करू लागले. त्यांमध्ये मी सुरुवातीस गात असे. एक राग त्याची जलद अस्ताई, एक ठुंबरी किंवा दादरा व एक मराठी पद असा माझा कार्यक्रम असे. तानपलटे घेण्यात माझी तत्परता दिसून येई, परंतु गमक हा पदार्थ मात्र माझ्या छातीला झेपण्यास त्रास पडे. मी घेण्याची तयारी दाखवावयाचा पण बुवासाहेब म्हणावयाचे, 'कृष्णा, बेताने. तुझ्या डोक्यात कल्पना बरोबर येते पण जरा बेतानेच घेत जा. पुढे काही दिवसांनी ताकद आपसूकच वाढून मग गमकीचा प्रकार तुला झेपेल.' 

असे जरी होते तरी गमक व गाण्याचे प्रकार सांगताना बुवांना आनंदाश्रू येत. म्हणत, 'बेटा, तू हुशार आहेस पण तुझी छाती एक इंच व गाणे एक फूट हे कसे झेपेल, ह्याबद्दल मला काळजी वाटते. परमेश्वराने तुला पुष्कळ शक्ती द्यावी व ती आल्यास तू बरोबर जोरकस नक्की गाशीलच!' बुवासाहेबांकडे शिकावयास राहिल्यापासून बराच काळ गेला होता. शिकविण्याच्या वेळानंतर बुवा इतर काही माहिती सांगू लागले. माझ्या बुद्धीप्रमाणे त्यांना काही विचारण्याचे धैर्य मला पण आले होते. त्यांनी सांगितलेली माहिती थोड्याफार प्रमाणात ह्या स्थळी देणे इष्ट वाटते, ते सांगत, पहिले गुरुजी पै.वा फैजमहंमदखाँ ह्यांनी विलंपदी, मांड, गमक वगैरे प्रकार फार उत्तम तऱ्हेने शिकविले. 

त्यांची गायकी अत्यंत सुरेल असे व एक चीज सुरू केली की निम्मे गाणे झाले, असा भरीव भारदस्तपणा त्या चिजेच्या मांडणीत होता. असे ते गाणे व असा तो गुरू सुरुवातीपासूनच मिळाल्यामुळे गळ्यास एक तऱ्हेचे वजन प्राप्त झाले. हे पायाशुद्ध म्हणजे गायनाचा पाया मजबूत करणारे गायन. हा पाया मजबूत झाला की त्यावर वाटेल तितके मजले चढवा, त्याला भंग नाही, असे गुरुजी पै. फैजमहंमदखाँ साहेबांची गायकी व त्यांच्या शिक्षणाबद्दल म्हणत असत. भैरवी रागातील चिजा व ठुमऱ्या अनेक आहेत. परंतु 'भाईवे तोरी सावरो' या भैरवीचे चिजेतील रुबाब, त्यांची स्वरांची बांधणी व गोवा समुद्राच्या लहरीप्रमाणे आल्हादकारक अशी आहे. 

ही चीज म्हणताना गुरुवर्यांना खाँसाहेबांची आठवण होऊन नेत्रांतून आनंदाचे आलेले मी व माझ्याप्रमाणे अनेक मित्रांनी पाहिले आहेत. बुवा नेहमी म्हणत, खाँसाहेब समोर उभे आहेत असेच वाटते. बुवांचे दुसरे गुरुजी गायनाचार्य पै. वा. खाँसाहेव नथ्यनखाँ होत. त्यांच्या गायकीचे वैशिष्ट्य म्हणजे लय, बोलताना (बोलभाट) व विजेच्या शब्दांतील लव स्वरांबरोबर ठेवल्यासारखी असे व विजेतील शब्दोच्चाराला महत्त्व आहे हे त्यांच्या गाण्याने पटवून दिले जाई. बसल्याबरोबर रंगे अशी डौलदार गायकी होती. ते नुसते बोलू लागले तरी तासन्तास निघून जात असत. बुवांना त्यांनी आपल्या मुलाप्रमाणे समजून शिक्षण दिले त्यांना तीन मुलगे. 

वडील मुलाचे नाव महमंदखाँ, दुसरे अब्दुल्ला भैय्या किंवा दुल्लेखाँ व तिसरे हयात असलेले व सर्वांच्या परिचयाचे असे खाँसाहेब विलायत हुसेनखाँ (हल्डी दिल्ली रेडिओ केंद्रात ऑफिसर म्हणून आहेत.) मी महंमदखाँना ओळखत असे. त्यांची शिकविण्याची हातोटी फार चांगली व सोपी होती व चिजांची याद फार वाखाणण्यासारखी होती. खाँसाहेब दुल्लेखाँ गाण्यात आपल्या वडिलांची प्रतिमा होते असे बुवासाहेब नेहमी म्हणत असत. पंजाबमध्ये जालंदरच्या उत्सवात त्यांना गाण्याकरिता बुवांनी नेले होते. एकदा हुबळीस कै. गोपाळराव सुळे (किलोस्कर कंपनीचे जुने हितचिंतक) यांच्या चिरंजिवांच्या मुंजीत दुल्लेखाँना बोलाविले होते. मी सुरुवातीला तोडी रागातील 'बरसाती समागत हूं' म्हटली. 

नंतर दुल्लेखाँसाहेब बसून त्यांनी देशी रागातील ख्याल व नंतर 'म्हारे मेरे आवजी महाराज' ही म्हटली. ते या चिजेत रंगून गेले. त्यांनतर भैरवी 'के गयो पिया' ही म्हटली. त्या वेळी बुवासाहेब मला म्हणाले. बेटा आज दुल्लेखाँनी वडिलांचा फोटो बरोबर उभा केला. यावरून वडील कसे होते याची कल्पना येते. असाच एकदा किल्लोस्कर कंपनीत योग आला. सकाळी गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे बसले व नंतर खाँसाहेब दुल्लेखाँ बसले. नंतर गुरुवर्य बुवासाहेब बसले. सकाळी 8 वाजता वैठकीस सुरुवात झाली; ते दुपारी 3 वाजले. एकेकाच्या गावकीची मौज वाटली. बुवा साहेब व दुल्लेखाँ हे दोघे बंधूच आहेत, असे वाटत होते. 
मा. वि. धामणकर

2. गुरुवर्यांची गायकी व शिकवण

परमपूज्य गुरुवर्य गायनाचार्य कै. भास्करबुवा बखले यांना इहलोक सोडून पंचवीस वर्षे होऊन गेली. मनुष्य हयात असताना त्याची पंचवीस वर्षांची कारकीर्द किती तरी मोठी वाटते. परंतु त्याच्या पश्चात् पंचवीस वर्षांचा काल इतका झपाट्याने जातो की गाण्याच्या भाषेत बोलायचे झाल्यास हयातीतला काळ हा ठाय लयीप्रमाणे वाटतो आणि हयातीनंतरचा काल द्रुत लयीप्रमाणे वाटतो. गुरुवर्य बुवासाहेबांच्या सान्निध्यात शिक्षण घेण्यात जो माझा काळ गेला तो अल्प असला तरी त्यांचे एकसारखे सान्निध्य (सहवास) व कठीण परंतु श्रवणास सोज्वळ अशी स्वतंत्र पद्धतीची गायकी, सतत गायनाभ्यास यांमुळे मला तो काळ भरपूर वाटला. कसेही असो, संगीत क्षेत्रात गुरुवर्यांचे नाव एक लोकोत्तर गायक म्हणून अजरामर आहे, यात शंका नाही.

तीन प्रकारची गायकी

गुरुवर्यांच्या गळ्यामध्ये तीन प्रकारची गायकी उतरली, ती येणेप्रमाणे : गुरुवर्य खाँसाहेब फैज महंमदखाँ बडोदे यांची सुरेल, विलंपदी व गमकीची गायकी; गुरुवर्य नथ्यन खाँसाहेब यांच्या गायकीतील लयबाजपणा, तयारीची तान, बोलबाँट व शब्दलालित्य, गुरुवर्य अल्लादियाखाँसाहेब यांच्या गायकीतील अनवट राग, बंदिशीतील व तानेतील त्यांची चमत्कृतिजन्य वक्र फिरत. अर्थात गाण्यास नानाविध सुवासिक फुलांच्या आल्हाददायक गुच्छाप्रमाणे असणारी गुरुवर्यांची गायकी या वरील तीन श्रेष्ठ गायकांच्या नानाविध गायकीचा नमुना होय. इतक्या दर्जाची ही गायकी बुवासाहेबांस आत्मसात करण्यास एकोणीस-वीस वर्षांची तपश्चर्या करावी लागली आणि तीही खडतर मेहनतीची. गुरुवर्यांनी विदयेकरता गुरुसेवा केल्याची हकीगत त्यांच्या तोंडून मी जेव्हा ऐकली, त्या वेळी ती ऐकून मी थक्क झालो.

एका ब्राह्मण शिष्याने विद्येकरिता आपला दर्जा सोडून आपण केवळ एक विद्यार्थी अगर सेवेकरी आहोत हीच कल्पना डोळ्यापुढे ठेवून कचदेवाप्रमाणे गुरूंचे मन राखून, पोटात शिरून संजीवनी विद्येप्रमाणे, ही गायनविद्या गुरूकडून हस्तगत केली, व तिन्ही गुरूंचा आशीर्वाद मिळविला. किर्लोस्कर नाटक मंडळीतून निघून जाताना “भास्करबुवा म्हणूनच पुन्हा तोंड दाखवीन” असे त्या वेळच्या मॅनेजरना त्यांनी उत्तर दिले ही गुरुवर्य बुवासाहेबांचे अंगी लहानपणापासून ‘बुवा’ होण्याची असलेली जातिवंत महत्त्वाकांक्षा, गुरूकडून विद्या मिळविण्याकरिता त्यांना उपयोगी पडली यात काही संशय नाही.

भास्कर म्हणजे सूर्यच!

गुरुवर्य बुवासाहेबांचे तिन्ही विद्यावान् गुरुजी म्हणजे इहलोकचे ब्रह्मा, विष्णू, महेश होत. अशा त्रिवर्गाच्या शिष्याच्या प्रकाशमान गायकीबद्दल एका थोर सत्पुरुषाने प्रशंसापर उद्गार काढले ते येथे देणे उचित होईल. हे थोर सत्पुरुष म्हणजे हुमणाबादाचे श्रीसद्गुरु खंडेराय मार्तंड माणिक प्रभू हे होत. सन 1914 मध्ये बोलावून त्यांचे गाणे निरनिराळ्या वेळेस केले. ते ऐकून श्रीसद्गुरुमहाराज खूष होऊन त्यांनी गुरुवर्यांची तारीफ केली की, 'बुवासाहेब, आपले नाव भास्कर अर्थात सूर्य आहे. त्या नावाप्रमाणेच आपले गायनाचे तेजही प्रकाशमान आहे. मुलाचे पाय पाळण्यात पाहूनच हा प्रकाशमान मुलगा होणार असे वाटून बुवांच्या मातापितरांनी त्यांना ‘भास्कर’ हे नाव दिले असावे, असे गौरवून श्रीसद्गुरु खंडेराय महाराजांनी गुरुवर्याचा योग्य असा सत्कार केला होता. 

गुरूंची शिकवण

गुरुवर्य कै. फैज महंमदखाँ, गुरुवर्य कै.नथ्यनखाँ, गुरुवर्य अल्लादियाखाँसाहेब या तिन्ही महान गायकांच्या घराण्याच्या गायकीचे अध्ययन 19/20 वर्षे केल्यावर तिन्ही घराण्यांची वैशिष्ट्यपूर्ण गायकी व हजारो चिजा आत्मसात केलेल्या बुवांसारख्या मोठ्या गायकांनी मैफिलीमध्ये अगदी ख्याल, अस्ताईशिवाय काही न गाता सोवळे राहावयास पाहिजे होते. मग साधी नाटकांतील पदे, शिवाय काही भजने अशी साधीसुधी गाणी त्यांनी मैफिलीत का म्हणावी ही विचार करण्याजोगी गोष्ट आहे. त्याबद्दल मला स्वतःला जरी त्यांचे म्हणणे व मत पूर्ण ठाऊक आहे तरी ही वस्तुस्थिती गायनप्रेमी जनतेस कळावी म्हणूनच त्याचा उल्लेख करणे आवश्यक आहे. 

गुरुवर्य बुवासाहेब म्हणायचे की, अरे बाबा कृष्णा, मैफलीत गेल्यावर श्रोतृवर्गाला खूष  करणे हे आपले पहिले काम! श्रोतृवर्गाला झोपेत ठेवावयाचे नाही. नाना तऱ्हेच्या चवीचे लोक असतात, कुणाला जिलबी पाहिजे, तर कुणास साधी चपाती पाहिजे. यामुळे सर्व तऱ्हेच्या जनतेस गाण्याचा आनंद देता येतो. गुरूंच्या या खिलाडू वृत्तीमुळे गुरुवर्य बुवांची गाणी त्या काळातही मोठ्या मैफिलीपासून ते कॉलेजसारख्या ठिकाणीही झाली आहेत. गुरुवर्य बुवासाहेब म्हणायचे, “अरे ख्याल अस्ताई गाईली म्हणून काही ठुमरी अगर नाटकातील पदे काय कमी आहेत काय? प्रत्येकाचा रंग निराळा आहे. आपण उत्तम जमून रंगून गायले म्हणजे झाले.” आपण पाण्यासारख्या वृत्तीचे पाहिजे. "पानी तेरा रंग कैसा, जिस में मिलाये वैसा!" अशा निर्मल गंगाजलाप्रमाणे थोर मनाच्या गायकाची मला ही शिकवणूक असल्याने, मी तेच ध्येय पुढे ठेवून गात असतो. यामुळे समंजसापासून तो सर्वसाधारण जनतेपर्यंत सर्वांना त्याचा आस्वाद घेता येतो. गायनाला इतका व्यापकपणा आणून दिल्याबद्दल मला गुरूच्या शिकवणीची धन्यता वाटते. 

मासलेवाईक मैफल

वरील धोरणास अनुसरून गाइलेली बैठक व त्या बैठकीची हकीकत अशी. गुरुवर्य बुवासाहेबांच्या अनेक बैठकी झाल्या असल्या तरी त्यात काही मासलेवाईक अनुभवांच्या आहेत. प्रत्येकाचे वर्णन करीत न बसता नमुन्यासाठी म्हणून एक लिहीत आहे. पुण्यास एका मोठ्या घरी एका उत्सवाप्रीत्यर्थ गुरुवर्यांचे गाणे झाले. तो उत्सव खासगी स्वरूपाचा होता. हॉलमध्ये साधारणतः पाऊणशे मंडळी बसतील व खेचाखेचीने शंभर बसतील एवढीच जागा होती. निमंत्रित असेच सुशिक्षित लोक होते, बरोबर साडेदहा वाजता गुरुवर्यांचे गाणे सुरू झाले. त्यांनी सुरुवातीस भूप रागातील ख्याल- ‘अब मान ले' ही चीज सुरू केली. ‘भूप’सारखा राग की, ज्यात क्लिष्टपणा नसून सर्व जनतेस आवडेल असा. नाटकांतूनही या रागाचा प्रचार खूपच झालेला असल्यामुळे जनतेच्या श्रवणात या रागाचे स्वर असायचेच.  अशा या रागास गुरुवर्य बुवासाहेबांनी सुरुवात केली. बैठक खुर्च्यांची नसून देशी पद्धतीची होती. गाण्यास सुरुवात होऊन जेमतेम अर्धा तास होतो न होतो तो श्रोतृवर्गापैकी काही तक्क्यास टेकून विश्रांती घेऊ लागले. एक दोघे तर तक्के खाली पाडून डोके त्यावर ठेवून जवळ जवळ झोप काढण्याच्या रंगात होते. आम्ही शिष्यवर्ग, आमच्या मागे बसलेले काही थोडे आमच्याच सहवासातले व काही न बोलावता आमच्या वशिल्याने आलेले, एवढे मात्र खडखडीत जागे होतो. वरील प्रकार पाहून गुरुवर्यांनी ख्याल थोडक्यात गाऊन लगेच त्रितालामधील ‘तुमी हमसन जिन बोल पिहरवा’ ही चीज जलद सुरू केली. 

या जलद विजेबरोबर जलद झोपी गेलेल्या दोन मंडळींकडे पाहून बुवासाहेब म्हणाले की, कृष्णा, बेटा ही आपली मेहनतच समजायची. दोन तडाखे तान पलट्याचे मारून अंग हलके करू. हे म्हटल्यावर आमच्यात साहजिकच हास्यरस उत्पन्न झाला. तरी पण या श्रोतृवर्गाला झोपेत ठेवणे हे त्यांच्या मनास पटत नव्हते, असे जाणूनच लगेच त्यांनी ‘उगाच का कांता' हे आपले शंभर नंबरी गाणे सरसकट आवडेल व पचेल असे, सुरू केले. झोपलेले व डुलक्या देत असलेले श्रोते एकदम रामबाण मात्रा दिल्याप्रमाणे खडखडून जागे होऊन त्याचा आस्वाद घेऊ लागले व 'आत्ता खरी मजा येणार' असे म्हणू लागले. 

आम्हांलाही ते शब्द ऐकायला मिळाले. असा बदल केल्यामुळे पुढे बैठकीस रंग चढत चालला. क्रमाक्रमाने पिलू रागातील ठुमरी, नंतर एक बसंत रागातील चीज व पुन्हा 'वद जाऊं कुणाला शरण' हे चढलेले पद गाऊन व अखेर भैरवी म्हणून सुरुवात झाल्याबरोबर अर्ध्या तासात झोपी जाणारा श्रोतृवर्ग पहाटे साडेतीन वाजेपर्यंत जागत व खुषीत ठेवला. श्रोतृवर्ग सुस्त व झोपेत ठेवता उपयोगी नाही, या त्यांनी म्हटलेल्या शब्दांचा व त्यांच्या शिकवणुकीची आठवण मला नेहमीच असते.

प्रचारकार्य

अशा खिलाडू वृत्तीने लहानांत लहान, मोठ्यांत मोठे अशा तऱ्हेने गायनकलेची उपासना करून तिचे प्रचारकार्य केल्याची उदाहरणे पुढीलप्रमाणे दाखविता येतील. प्रत्यक्ष मैफिलीतून स्वतः श्रेष्ठ गायक गायकी सजवून बुवासाहेबांनी त्या आवडीच्या समंजस श्रोतृवर्गात आपला मोठा दर्जा राखला. त्यापुढे नजर ठेवून शिक्षण देण्याची संस्था म्हणजे सुरुवातीची किर्लोस्कर भारत गायन समाज ही गायन- वादन कलेची शिक्षण देणारी संस्था काढून बालगोपालांपासून तो प्रौढ विद्यार्थी वर्गालाही शिक्षणाचा लाभ त्यांनी दिला. अल्प वेतनात प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना या कलेची आवड उत्पन्न व्हावी, हाच प्रधान हेतू मनात धरून त्यांनी ही संस्था स्थापन केली. आज या संस्थेस 37 वर्षे झाली. 

पुणे भारत गायन समाज म्हणूनही संस्था प्रसिद्ध असून गुरुवर्यांचे ते स्मारक म्हणून आज प्रसिद्ध आहे. संस्थेची स्वतःची इमारत आहे. ही संस्था गुरुवर्यांची एक चिरकालची आठवणच होय, नामांकित गवयाचे हे स्मारक महाराष्ट्रात पहिलेच होय असे म्हणण्यास हरकत नाही. महाराष्ट्राच्या बाहेरही गायकांचे असे कायमचे स्मारक आहे असे माझ्या ऐकिवात नाही. अशी शिक्षणसंस्था काढून त्याचा प्रचार करून त्याही पुढे एक पाऊल टाकून जेथे असंख्य स्त्री-पुरुष, खालच्या वर्गापासून तो वरच्या वर्गापर्यंत अर्थात अशिक्षितापासून सुशिक्षितापर्यंत जो एक समाज एकत्रित पाहण्यास मिळतो, ते ठिकाण म्हणजे रंगभूमी होय. त्या रंगभूमीवरील अव्वल दर्जाच्या गंधर्व नाटक मंडळीने आपला लौकिक संगीताच्या बाजूने कायम राखला. त्यातील मोठा वाटा गुरुवर्यांचा आहे.

बालगंधर्वादी नटांकडून, त्यांच्या गोड गळ्याचा उपयोग करून आपली गायकी (अर्थात गाणाऱ्यास झेपेल व श्रोतृवर्गाला पचेल) अशी मध्यवर्ती सांगड बांधून त्याचा कंपनीद्वारा सर्व जनतेत त्यांनी फैलाव केला. आपल्या शास्त्रोक्त पण ढंगदार गायकीची श्रोतृवर्गावर छाप बसविली. मला वाटते, शिक्षण संस्थांतून गायनाचा प्रचार करणे याला मोजमाप आहे. परंतु सदोदित असंख्य जनतेस एकाच वेळी एकसारखे गायनाच्या रसाचे प्याले पाजायचे व श्रोतृवर्गांनी त्याचा आस्वाद नित्य घेत राहायचे याचे प्रमाण न मोजण्याइतके खास आहे व हे स्थान म्हणजे रंगभूमीच होय. 

असे फारच मोठे संगीताचे प्रचारकार्य करून गुरुवर्य बुवासाहेबांनी संगीताचे लोण घरोघरी पोहोचविले यात शंका नाही. गुरुबंधू श्री. बालगंधर्वांच्या हातात हात घालून गंधर्व कंपनीत गुरुवर्यांनी मला ठेवले, त्याच्या मुळाशी वरील दर्शवलेलाच हेतू होता असे म्हणणे अपरिहार्य आहे. गंधर्व कंपनीचे ‘स्वयंवर’ हे नाटक म्हणजे गुरुवर्यांचे स्मारक असून या स्वयंवर नाटकाच्या संगीताने एक नवा मनू रंगभूमीवर निर्माण केला आहे, हे निर्विवाद आहे. आज माझ्या पुढे गुरुवर्यांचा आदर्श असल्याने मला त्यांच्या कृपेने संगीताच्या नाना तऱ्हेच्या क्षेत्रांत भाग्य लाभले आहे व लाभतही आहे. अशा थोर गायकाची- गुरुवर्य भास्करबुवांची शिकवण म्हणजे श्री सद्गुरु समर्थांची शिकवण अशा पूज्य भावनेने ती तितक्याच तोलाची असे आम्ही सदैव मानतो.

Tags: रामकृष्णबुवा वझे दुल्लेखाँ अब्दुल्ला भैय्या महमंदखाँ कृष्णराव फुलंब्रीकर मा. वि. धामणकर बालगंधर्व पुणे अल्लादियाखां के.नथ्यन खां फैजमहंमदखां भास्करबुवा बखले Balagandharv Pune Alladiyakha ke. Nathan kha faijmahamand khaa Bhaskarbuwa Bakhale weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके