Diwali_4 लेनिनच्या सहवासातील (1902 ते 24) ते दिवस
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

लेनिनच्या सहवासातील (1902 ते 24) ते दिवस

मॅक्झिम गॉर्कीलिखित ‘डेज्‌ विथ लेनिन’  या पुस्तकाच्या ‘मार्टिन लॉरेन्स लिमिटेड, लंडन’ यांनी 1932 साली प्रकाशित केलेल्या इंग्रजी आवृत्तीवरून हा मराठी अनुवाद केला आहे. रशियनवरून इंग्रजी अनुवाद कोणी केला, याचा तपशील त्या आवृत्तीत नमूद केलेला नाही आणि इतरत्र शोधूनही हा तपशील हाती लागला नाही. पुस्तकात उल्लेख आलेल्या काही व्यक्तींची ओळख शेवटी दिली असून ती मूळ पुस्तकाबरहुकूम आहे. त्यातील जन्म-मृत्यूच्या तारखांसह सर्व संदर्भ तसेच ठेवले आहेत. शिवाय, तत्कालीन सामाजिक-सांस्कृतिक संदर्भात वृद्ध गॉर्कीने लिहिलेला हा मजकूर आहे, हे लक्षात घेऊन जवळपास  सर्वच उल्लेख एकेरी ठेवले आहेत.
-अनुवादक
 

व्लादिमीर लेनिनचं निधन झालं आहे. त्याच्या जाण्याने समकालीनांहून कित्येक पटींनी उत्तुंग प्रतिभा लाभलेली व्यक्ती जगाने गमावली आहे, याची कबुली लेनिनच्या काही शत्रूंनीही दिली. चेकोस्लोव्हाकियाहून प्रकाशित होणाऱ्या प्रागा टाकब्लाट (Prager Tagblatt) या जर्मन बूर्झ्वा वर्तमानपत्रात लेनिनवर एक लेख प्रसिद्ध झाला. लेनिनच्या महाकाय व्यक्तिमत्वाबद्दलचा दरारा व आदर व्यक्त करणारा ठळक सूर या लेखातून ऐकू येतो. लेखाचा शेवट असा आहे: लेनिन महान, भयंकर आणि आपल्या आकलनापलीकडचा होता- त्याचा मृत्यूही तसाच आहे. या लेखातील भावना अर्थातच समाधान व्यक्त करणारी नाही किंवा ‘शत्रूच्या शवाचा वास नाकाला चांगलाच लागतो’ या म्हणीतल्यासारखी कुत्सितही नाही. एखाद्या महान पण अशांत विभुतीच्या जाण्याने आलेली सुटकेची भावनाही यामागे नाही. उलट, महामानवाविषयी एकंदर मानवतेला वाटणाऱ्या निर्विवाद अभिमानाची भावना या वाक्यात दिसते.

निर्भीड विवेक आणि जगण्याबाबतचा दृढनिश्चय यांचा महान दाखला म्हणून ज्याच्या जीवनाकडे पाहिलं जातं अशा लेनिनचा मृत्यू झाल्यानंतरही त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल आदर व्यक्त करण्याइतकं नैतिक धैर्य अथवा अभिरुची परदेशांत आश्रय घेतलेल्या रशियन माध्यमांमध्ये नाही.

व्लादिमीर इल्यिच1 लेनिनचं व्यक्तिचित्र रेखाटणं अवघड आहे. माशाचे खवले कसे असतात, तसे शब्द लेनिनचे शब्द केवळ त्याच्या बाह्य व्यक्तिमत्वाचा एक भाग होते. त्याच्या बोलण्यातील साधेपणा व परखडपणा हे मुळात त्याच्या स्वभावाचं अत्यावश्यक अंग होतं. त्याने दाखवलेल्या शौर्याभोवती कोणतंही तेजोवलय नाही. त्याच्या शौर्याची रशियामध्ये चांगलीच प्रचिती आहे- भूतलावर सामाजिक न्याय प्रत्यक्षात आणता येईल या अढळ विश्वासापायी या अस्सल रशियन क्रांतिकारी बुद्धिजीवीने निगर्वी व निःस्वार्थी साधेपणाचं जीवन स्वीकारलं, मानवतेच्या आनंदासाठी कष्ट उपसण्याच्या उद्देशाने जीवनातील सर्व सुखांवर पाणी सोडलं.

त्याच्या निधनानंतर तत्काळ मी जे काही लिहिलं, ते दुःखावेगात, घाईगडबडीने लिहिलेलं होतं, आणि अपुरंही होतं. स्वाभाविक औचित्याच्या कारणांमुळे त्या वेळी मला काही गोष्टी लिहिता आल्या नव्हत्या. लेनिनकडे तीक्ष्ण दूरदृष्टी व सखोल शहाणीव होती आणि ‘शहाणीव असते तिथे तितकंच दुःख असतं.’

त्याला कायमच खूप दूरचं दिसायचं. 1919 ते 1921 या दरम्यानच्या वर्षांमध्ये लोकांशी चर्चा करताना त्याने अनेकदा आगामी वर्षांमधील घडामोडींचा अचूक अंदाज व्यक्त केला होता. हे अंदाज प्रत्येक वेळी सुखकारकच असायचे असं नाही. त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा, असं प्रत्येक वेळी वाटायचंच, असंही नाही. पण दुर्दैवाने अनेक वेळा त्याचे साशंक शेरे समर्थनीय ठरले होते.

पहिली भेट

अनेक रिकाम्या जागा आणि विसंगती यांमुळे मी लिहिलेल्या लेनिनच्या आधीच्या आठवणी जास्तच असमाधानकारक झाल्या. मी लंडन काँग्रेसपासून2 सुरुवात करायला हवी होती. साशंकता, अविश्वास, उघड वैरभाव आणि अगदी तिरस्कारही व्यक्त होत असताना व्लादिमीर इल्यिच खंबीरपणे त्या परिस्थितीला सामोरं गेला.

लंडनच्या परिघावर असलेल्या त्या चर्चच्या रिकाम्या भिंती, सुशोभीकरणाचा असंगत वाटावा इतका अभाव, एखाद्या गरीब शाळेतला वर्गासारख्या लहान व अरुंद सभागृहातील उंच कमानदार खिडक्या, हे सगळं अजूनही लख्खपणे माझ्या डोळ्यांसमोर उभं राहातं.

या इमारतीचा केवळ बाहेरचा भाग चर्चशी साधर्म्य सांगणारा होता. आतमध्ये चर्चविषयक बाबींचा मागमूसही नव्हता, पुल्पिटसुद्धा सभागृहाच्या एका टोकाऐवजी प्रवेशद्वारापाशी- दोन दारांच्या मधोमध ठेवलेलं होतं.

त्यापूर्वी कधीच मी लेनिनला भेटलेलो नव्हतो, किंवा त्याच्याविषयी पुरेसं वाचलेलं नव्हतं. पण जेवढं काही मला वाचायला मिळालं, विशेषतः त्याला वैयक्तिक पातळीवर ओळखणाऱ्यांनी ज्या उत्साहाने त्याच्याविषयी लिहिलं होतं, त्यामुळे मी त्याच्याकडे आकर्षित झालो. आमची परस्परांना ओळख करून देण्यात आली, तेव्हा त्याने मनापासून हस्तांदोलन केलं, आणि त्याच्या तीक्ष्ण नजरेने माझी छाननी करत एखाद्या जुन्या परिचिताच्या सुरात तो बोलायला लागला. तो मिश्किलपणे म्हणाला: तुम्ही आलात याचा आनंद आहे. बकवास गोष्टी ऐकायची तुम्हाला सवय असेल ना? इथे जुनंच भांडण पुन्हा उकरून काढलं जाणार आहे.

लेनिन असा असेल अशी माझी अपेक्षा नव्हती. काहीतरी कमतरता असल्यासारखं वाटत होतं. त्याचा ‘र’ उच्चार कंठातून खरखरल्यासारखा यायचा आणि हात कसेतरी काखेत बांधून ठामपणे उभं राहायची त्याची पद्धत होती. तशा अर्थाने तो अगदी सर्वसामान्य होता, नेता असल्याचे काही संकेत त्याच्या प्रथमदर्शनी व्यक्तिमत्वातून मिळत नव्हते. लेखक म्हणून मला अशा लहानसहान तपशिलांची दखल घेणं भाग आहे, आणि ही गरज आता माझी सवयच झाली आहे- किंबहुना काही वेळा ही सवय मलाच त्रासदायक होते. आमच्या पहिल्या भेटीदरम्यान जी. व्ही. प्लेखनॉव्ह हाताची घडी घालून उभे होते. कामाने थकलेला शिक्षक नव्याने आलेल्या विद्यार्थ्याकडे बघतो, तसं गंभीर आणि थोड्याशा कंटाळलेल्या चेहऱ्याने ते माझ्याकडे पाहत होते. ते बोलले त्यातलं काहीच माझ्या स्मरणात राहिलेलं नाही, फक्त एक नेहमीचं सरधोपट वाक्य तेवढं ते म्हणाल्याचं आठवतं: मी तुमच्या लेखनाचा चाहता आहे. परिषदेच्या संपूर्ण कार्यकाळात आम्हा दोघांनाही एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलावंसं वाटलं नाही.

तर, आता माझ्या समोर हा टक्कल पडलेला, ठेंगणासा, काटक देहयष्टीचा, घरघरल्यासारखा ‘र’ उच्चारणारा माणूस उभा होता. माझा एक हात त्याने त्याच्या हातात घेतला होता आणि दुसऱ्या हाताने तो स्वतःचं सॉक्रेटिससदृश कपाळ पुसत होता. त्याचे असाधारण उजळ डोळे प्रेमाने माझ्यावर रोखलेले होते.

तो थेट माझ्या आई कादंबरीतील त्रुटींविषयी बोलायला लागला. एस. पी. लेडीझनिकॉव्ह यांच्याकडचं कादंबरीचं हस्तलिखित त्याने वाचलं होतं. पुस्तक गडबडीत संपवावं लागलं, मी म्हणालो- पण तसं का केलं, हे मात्र मला सांगता आलं नाही. मग लेनिननेच दुजोरा देत त्याचं स्पष्टीकरण केलं: होय, अशा पुस्तकाच्या बाबतीत लवकरच काम संपवायला हवं, असं पुस्तक गरजेचं आहे. अजाणतेपणी आणि अनागोंदीच्या अवस्थेत क्रांतिकारी चळवळीत सहभागी होणाऱ्या अनेक कामगारांना आई कादंबरी अतिशय उपयुक्त ठरेल. सद्यस्थितीत हेच पुस्तक गरजेचं आहे. त्याने माझ्याविषयी काढलेला हा एकमेव प्रशंसोद्गार, पण माझ्यासाठी तो अतिशय मूल्यवान होता.

मग त्याने व्यावहारिकपणे चौकशी केली- या पुस्तकाचं भाषांतर होतंय का, रशियन किंवा अमेरिकी सेन्सॉरशिपने त्यात जास्त फेरफार केले का? पुस्तकाच्या लेखकावर खटला चालवला जाणार होता, असं मी त्याला सांगितलं. त्यावर आधी तो संतापला, मग डोकं थोडं मागे नेऊन त्याने डोळे बंद केले आणि मग त्याच्या असाधारण हास्याचा स्फोट झाला. त्याच्या हसण्याकडे कामगारांचं, एफ. उरलस्कींचं व इतर तिघांचं लक्ष गेलं आणि ते या बाजूला आले.

मी उत्साहात होतो. पक्षाच्या तीनशे निवडक सदस्यांच्या गर्दीत मी होतो. दीड लाख संघटित कामगारांनी या प्रतिनिधींना परिषदेसाठी पाठवल्याची माहिती मला मिळाली. माझ्या समोर सर्व पक्षनेते होते- जुने क्रांतिकारी, प्लेखनॉव्ह, अक्सेलरॉड, डॉइश, आदी. माझा उत्साह तसा स्वाभाविक होता. माझ्या मातृभूमीपासून दोन वर्षं दूर राहावं लागल्यानंतर मी अतिशय खिन्न झालो होतो, त्या पार्श्वभूमीवरचा माझा हा उत्साह वाचक समजून घेतील, असं वाटतं.

जर्मन सामाजिक-लोकशाहीवाद्यांसोबत

माझ्या खिन्नतेची सुरुवात बर्लिनमध्ये झाली. तिथे मी जवळपास सर्व आघाडीच्या सामाजिक-लोकशाहीवाद्यांना भेटलो. ऑगस्ट बेबेलसोबत जेवलोसुद्धा- तेव्हा अतिशय उमद्या स्वभावाचे पॉल सिंगर माझ्या शेजारी होते आणि इतरही मान्यवर लोक तिथे उपस्थित होते.

एका प्रशस्त व आरामदायी खोलीत हा भोजन समारंभ पार पडला. अभिरुचीसंपन्न, नक्षीदार कापडं पक्ष्यांच्या पिंजऱ्यांवर टाकलेली होती आणि खुर्च्यांवर बसलेल्या व्यक्तींची डोकी लागून खुर्च्यांची आवरणं खराब होऊ नयेत म्हणून त्यांच्या पाठीवर नक्षीदार रूमाल बांधलेले होते. सगळं दणकट व सघन होतं. सर्व जण गांभीर्याने खात होते आणि गंभीर सुरात एकमेकांना म्हणत होते, ‘मालसाइत’. हा शब्द माझ्यासाठी नवीन होता, पण फ्रेंचमध्ये ‘माल’ म्हणजे ‘वाईट’ आणि जर्मनमध्ये ‘साइत’ म्हणजे ‘वेळ’, हे अर्थ मला माहीत होते- त्यामुळे ‘वाईट वेळ’ असा अर्थ मला लागला.

सिंगर यांनी कॉट्‌स्कीचा उल्लेख दोनदा ‘रॉमॅन्टीसिस्ट’ असा केला. गरुडासारखं नाक असलेले बेबल मला थोडे आत्मसमाधानी वाटले. आम्ही ऱ्हायनिश वाइन आणि बीअर प्यायलो. वाइन आंबट नि कोमट होती. बीअर चांगली होती. रशियन क्रांतीविषयी आणि तिथल्या पक्षाविषयी सामाजिक-लोकशाहीवादी मंडळी कटुतेने व तिरस्काराने बोलत होती. त्यांच्या स्वतःच्या जर्मन पक्षाची मात्र प्रत्येक गोष्ट उत्कृष्ट मानली जात होती! एकंदर वातावरणच आत्म-समाधानी होतं. तिथल्या खुर्च्याही नेत्यांच्या सन्माननीय कुल्ल्‌यांना आधार देण्यातच आनंद मानत असाव्यात.

जर्मन पक्षासोबतचं माझं काम थोडं नाजूक स्वरूपाचं होतं. तळागाळातील द लोअर डेप्थ्स या माझ्या नाटकासंबंधी लेखकाचं मानधन नाट्यगृहांकडून जमा करण्याचे अधिकार झनानियेने3 जर्मन पक्षातील अलेक्झांडर पार्वस या एका प्रमुख- आणि नंतर कुख्यात ठरलेल्या- सदस्याला दिले होते. सेबास्टोपल इथे तो बेकायदेशीर भेटीवर आला असताना, 1902 साली त्याला हे अधिकार मिळाले. त्याने संकलित केलेले पैसे पुढीलप्रमाणे विभागायचे होते: एकूण रकमेच्या 20 टक्के त्यानेच ठेवावेत, आणि उर्वरित रकमेपैकी एक चतुर्थांश हिस्सा मला मिळेल, तर उर्वरित तीन हिस्से सामाजिक-लोकशाहीवादी पक्षाच्या निधीत जमा होतील. पार्वसला अर्थातच या अटी माहीत होत्या, आणि तो त्यावर खूश होता. चार वर्षं हे नाटक जर्मनीतल्या सर्व नाट्यगृहांचे दौरे करून आलं. एकट्या जर्मनीत या नाटकाचे पाचशेहून अधिक प्रयोग झाले. या सगळ्यातून पार्वसकडे लाखो मार्क तत्कालीन जर्मन चलन जमा झाले असणार. पण झनानियेकडे, के. पी. पिआटनित्स्की पैसे पाठवण्याऐवजी पार्वसने एक पत्र पाठवलं. इटलीला एका तरुणीसोबत फिरायला गेलं असताना आपण तो सर्व पैसा उडवला, असं त्याने पत्रात बिनदिक्कतपणे कळवलं होतं. त्याची ही सहल निश्चितपणे आनंददायीच झाली असेल; त्यात खर्च झालेल्या पैशातील एक चतुर्थांश हिस्सा व्यक्तीशः माझा होता, हेही ठीक; पण उर्वरित तीन चतुर्थांश हिश्शासंबंधी जर्मन पक्षाच्या केंद्रीय समितीला लेखी कळवणं मला गरजेचं वाटलं. एस. पी. लेडीझिकोव्हमार्फत मी त्यांच्याशी संपर्क साधला. पार्वस यांच्या सहलीची फारशी दखल केंद्रीय समितीने घेतली नाही. नंतर मला कळलं की, पक्षात त्याची पदअवनती झालेली आहे. खरं सांगायचं तर, त्याचे कान उपटायला हवेत, असं मला वाटत होतं. कालांतराने एकदा मी पॅरिसला गेलो, तेव्हा कोणीतरी एका अतिशय सुंदर तरुणीकडे निर्देश करून, तीच तरुणी पार्वससोबत इटलीच्या सफरीला गेल्याचं सांगितलं. खूपच सुंदर मुलगी आहे ही, असं माझ्या मनात आलं.

बर्लिनमध्ये मी अनेक लोकांना भेटलो- लेखक, कलावंत, कला व साहित्याचे आश्रयदाते, आणि इतरांचा त्यात समावेश होता. त्यांची आत्मसंतुष्टता आणि आत्मप्रौढी फक्त थोड्या फार प्रमाणात भिन्न होती.

अमेरिकेची वारी

अमेरिकेत मॉरिस हिलक्विट यांच्याशी बराच वेळ भेट झाली. न्यूयॉर्कचा महापौर व्हायची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. मी अनेक लोकांना भेटलो, अनेक गोष्टी पाहिल्या, पण रशियन क्रांतीचं संपूर्ण महत्त्व समजलेला एकही माणूस मला भेटला नाही. ही क्रांती म्हणजे ‘युरोपीय जीवनातील केवळ एक घटना आहे’, असं सर्वसाधारण मत असल्याचं मला सगळीकडे दिसून आलं. ‘समाजवादाविषयी सहानुभूती’ राखणाऱ्या एका ‘सुंदर स्त्री’च्या शब्दांत सांगायचं तर, ‘कायम कॉलरा किंवा क्रांती होत असलेल्या’ देशातली ही एक सामान्य घटना आहे.

अमेरिकेत जाऊन बोल्शेव्हिक निधीसाठी पैसे जमवण्याची कल्पना एल. बी. क्रासिनने मांडली. व्ही. व्ही. वोरोव्स्की सचिव म्हणून माझ्यासोबत येणार होता आणि बैठकींचं आयोजनही तोच करणार होता. त्याला इंग्रजी चांगली यायची, पण पक्षाने त्याला दुसरं कोणतंतरी काम दिलं आणि एन. ई. बुरेनिनला माझ्यासोबत अमेरिकेला पाठवण्यात आलं. बुरेनिनला इंग्रजी भाषा येत नव्हती. प्रवासामध्ये असताना त्याने भाषेचे धडे घ्यायला सुरुवात केली.

माझ्या भेटीचा उद्देश कळल्यानंतर समाजवादी क्रांतिकारकांनी त्यात बालिश रस घ्यायला सुरुवात केली. मी फिनलँडमध्ये असतानाच तचाइकोव्स्की व झित्लोव्स्की माझ्याकडे आले आणि बोल्शेव्हिकांपुरता पैसा जमावण्याऐवजी ‘एकंदर क्रांती’साठी पैसे जमवावेत, असं त्यांनी सुचवलं. ‘एकंदर क्रांती’साठी पैसे जमवायला मी नकार दिला. मग त्यांनी ‘बबुश्का’ला4 तिथेही पाठवलं. तर, अमेरिकेत दोन व्यक्ती आलेल्या, त्या आपापल्या स्वतंत्र स्तरावर, एकमेकांची भेटही न घेता पैसे जमवत होत्या, आणि त्यांचं निधीसंकलन बहुधा दोन वेगवेगळ्या क्रांत्यांसाठी सुरू होतं.

यातील कोणता पर्याय अधिक चांगला व अधिक ठोस आहे, याचा विचार करण्यासाठी अमेरिकी लोकांकडे वेळही नव्हता आणि त्यांचा तसा काही कलही नव्हता. ‘बबुश्का’ला ते स्पष्टपणे आधीपासूनच ओळखत होते. तिच्या अमेरिकी मित्रमैत्रिणींनी पूर्वीच तिची बरीच जाहिरात करून ठेवली होती. उलटपक्षी माझ्याबाबतीत मात्र झारच्या दूतावासाने कंड्या पिकवल्या.5 अमेरिकी साथी रशियन क्रांतीला ‘स्थानिक’ आणि निष्पळ घटना मानत होते. मी बैठका घेऊन जमवलेल्या पैशाला त्यांनी काहीसं ‘उदारपणे’ वागवलं. तसंही मी खूपच कमी रक्कम जमा केली होती. जेमतेम 10 हजार डॉलरांहून कमी निधी माझ्याकडे जमला. वर्तमानपत्रांमध्ये लिहून थोडे पैसे मिळवावेत, असं मी ठरवलं- पण अमेरिकेतही मला पार्वससदृश माणसं भेटली, आणि एकंदरित अमेरिकेचा दौरा अपयशी ठरला. परंतु, तिथे असताना मी आई कादंबरी लिहिली- त्यामुळेच बहुधा त्यात काही दोष व त्रुटी राहून गेल्या.

त्यानंतर मी इटली केप्री इथे गेलो, आणि स्वतःला रशियन पुस्तकांमध्ये नि वर्तमानपत्रांमध्ये बुडवून घेतलं. त्याने माझी मनस्थिती आणखीच ढासळली. ठोसा लागून पडलेल्या दाताला भावना असत्या, तर त्याला जितकं एकाकी वाटलं असतं, तशीच माझी अवस्था झाली होती. अनेक विख्यात लोक एका राजकीय मंचावरून दुसऱ्या मंचावर उड्या मारत होती, त्यांच्या हालचालींमधलं कौशल्य आणि चापल्य बघून मी चकित झालो.

सगळं संपलंय, ते म्हणाले. सर्वांना त्यांनी चिरडून टाकलंय, संपवलंय, हद्दपार केलंय, तुरुंगात डांबलंय!

यातील बरंचसं हास्यास्पद होतं, पण उत्साहाचा एखादा किरणही दिसत नव्हता. रशियाहून भेट घ्यायला आलेला एक गुणवान लेखक म्हणाला की, मी तळागाळातीलमधल्या लूकसारखं वागतोय. मी माझ्या स्नेहशील शब्दांनी तरुण लोकांना भुरळ घातली, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, डोकी वाजवली आणि मग मी पळून गेलो. दुसऱ्या एकाने जाहीर केलं की, मी ‘कंपूशाही’च्या कह्यात गेलोय, माझ्यात ‘तोचतोचपणा’ आलाय, आणि केवळ ‘साम्राज्यवादी’ असल्याचं कारण देऊन त्याने त्या नृत्यनाट्याला महत्त्वाचं मानायला नकार दिला. एकंदरीत ते अनेक मूर्खासारख्या व हास्यास्पद गोष्टी बोलले. रशियाहून जंतुनाशकाची धूळ इकडे वाहत असल्यासारखं मला अनेकदा वाटलं.

मग अचानक, एखाद्या परिकथेप्रमाणे, मी रशियन सामाजिक-लोकशाहीवादी पक्षाच्या परिषदेत येऊन पडलो. हा अर्थातच माझ्यासाठी खूप चांगला दिवस ठरला!

लंडन परिषदेला

पण पहिल्या बैठकीपर्यंतच माझा उत्साह टिकला. त्यानंतर ‘विद्यमान सुव्यवस्थे’वरून त्यांच्यात भांडणं सुरू झाली. या वादांमधील त्वेष पाहून मी थिजलोच. सुधारक आणि क्रांतिकारी अशा दोन गटांमध्ये पक्षाची थेट विभागणी झाल्याचं 1903 साली माझ्या लक्षात आलं होतं. त्यामुळे हे विभाजन तसं आश्चर्यकारक नव्हतं, पण सुधारकांचा लेनिनविषयीचा वैरभाव धक्कादायक होता. एखाद्या जुन्या रबरी नळीतून बाहेर पडणाऱ्या उच्चदाबाखालील पाण्यातून कशा वाफा सुटतात, तसं सुधारकांच्या भाषणांमधून वैरभाव व्यक्त होत होता.

प्रत्येक वेळी काय बोललं गेलं हे महत्त्वाचं असतंच असं नाही, तर कसं बोललं गेलं हे जास्त महत्त्वाचं ठरतं. प्रोटेस्टन्ट पंथाच्या धर्मोपदेशकासारखा गच्च बटणं लावलेला फ्रॉक कोट घालून आलेल्या प्लेखानॉव्हने परिषदेच्या आरंभी भाषण केलं. आपण मांडत असलेले विचार वादातीत आहेत, अशा आत्मविश्वासने त्याने उपदेश केला. त्याच्या भाषणातला प्रत्येक शब्द आणि प्रत्येक विराम अतिशय मोजून मापून वापरलेला होता. सुंदर गोळीबंद वाक्यवापराद्वारे तो कुशलपणे प्रतिनिधींवर प्रभाव पाडत होता आणि बोल्शेव्हिकांच्या बाजूने कोणा साथीने थोडा आवाज केला किंवा कुणी कुजबुजलं, तर हा सन्माननीय वक्ता थोडा विराम घेऊन त्या दिशेने एक तीक्ष्ण कटाक्ष टाकायचा. फ्रॉक कोटवरचं एक बटण प्लेखानॉव्हचं खूपच लाडकं होतं; सारखं तो बोटाने त्या बटणाला कुरवाळत होता, आणि बोलताना विराम घेतल्यावर इलेक्ट्रीक बेलसारखं ते बटण दाबायचा. जणू काही त्याच्या भाषणाचा प्रवाह त्या दाबामुळेच थांबत असावा.

बैठकीदरम्यान एकदा प्लेखानॉव्ह कोणाला तरी उत्तर देण्यासाठी उभा राहिला. तेव्हा हाताची घडी घालून त्याने ‘हा!’ असा तिरस्कारयुक्त आवाज केला. त्यावर बोल्शेव्हिक कामगार हसले. प्लाखोनॉव्हने भुवया वर केल्या आणि त्याचा गाल निस्तेज पडल्याचं दिसलं. मी पुल्पीटच्या बाजूला बसलेलो होतो, त्यामुळे वक्त्‌याची केवळ एकच बाजू मला दिसत होती, म्हणून मी गालाचा उल्लेख केला.

पहिल्या बैठकीवेळी प्लेखानॉव्ह बोलत असताना बोल्शेव्हिकांच्या बाजूला सर्वाधिक बैचेन होऊन चुळबुळ करणारा इसम लेनिन होता. एकदा तर थंड पडल्यासारखा तो खांदे मुडपून वर उठत थोडा पुढेही झाला, मग गरम वाटल्याप्रमाणे पुन्हा खाली आला. त्याने कोटाच्या बाहीवर बोटं चेपली, हनुवटी घासली, डोकं हलवलं आणि एम. पी. टॉम्स्कीच्या कानात काहीतरी पुटपुटला.

पक्षात कोणीही ‘प्रतिक्रांतिवादी’ रिव्हिजनिस्ट6 नाही, असं प्लेखानॉव्हने जाहीर केलं, तेव्हा लेनिन पुढे झुकला, त्याच्या माथ्यावरचा टकलाचा घेर लालसर झाला आणि अस्फुट हास्यामुळे त्याचे खांदे हलत होते. त्याच्या पुढे आणि मागे बसलेले कामगारही हसले. सभागृहाच्या मागच्या बाजूने एक जोरदार चिडचिडा आवाज आला: आणि मग तिथे बसलेल्या लोकांचं काय चाललंय?

लहानखुरा थिओडोर डान बोलत होता. अस्सल सत्याशी बाप-लेकीसारखं नातं असल्याप्रमाणे तो बोलू लागला- त्याच्यात हे असं बोलण्याचं कौशल्य उपजतच होतं आणि त्याने ते जोपासलंसुद्धा, अजूनही तो ही जोपासना करत असतो. त्याच्या रूपात जणू काही कार्ल मार्क्सचा पुनर्जन्म झाला आहे. मेन्शेव्हिकांमध्ये ‘सर्व उत्तमोत्तम मार्क्सवादी विचारवंत’ आहेत, तर बोल्शेव्हिकांमध्ये सगळी अर्धशिक्षित, बेताल मुलं आहेत आणि मेन्शेव्हिकांशी असलेलं त्यांचं वागणंही बोल्शेव्हिकांचा बेतालपणा सिद्ध करतं, असं तो म्हणाला.

तुम्ही मार्क्सवादी नाही आहात, तो तुच्छतेने म्हणतो. नाही, तुम्ही मार्क्सवादी नाही आहात- असं म्हणत त्याने स्वतःची पिवळसर मूठ खाली आपटली. त्यावर एका कामगाराने उठून त्याला विचारलं: आता उदारमतवाद्यांसोबत चहा प्यायला कधी जाणारेस तू?

मारटोव्ह पहिल्याच बैठकीवेळी बोलला होता का, हे मला आत्ता आठवत नाही. पण हा विलक्षण आकर्षक माणूस तारुण्यातल्या तळमळीने बोलत होता. मतभेद उघड होत होते व फूट पडल्याचं दिसत होतं, तेव्हा या शोकात्म नाट्याने त्याला प्रचंड दुःख झाल्याचं स्पष्ट कळत होतं. त्याचं अंग पूर्ण थरथरत होतं, तो पुढे-मागे झोकांड्या घेत होता, खळी केलेल्या शर्टची कॉलर अचानक सैल करत होता आणि जोरजोरात हातवारे करत होता. त्याच्या शर्टच्या मनगटाजवळची पट्टी कोटातून खाली पडली, मग त्याने हात वर उचलला आणि पट्टी परत मूळच्या जागी यावी म्हणून हलवला. मारटोव्हच्या बोलण्याचा सूर युक्तिवादाचा नव्हता, तो कळवळून विनवणी करत होता: आपण ही फूट थांबवायला हवी, विभाजन पेलण्याएवढी आपल्या पक्षाची ताकद नाही. इतर कशाच्याही आधी कामगारांना स्वातंत्र्य मिळायलाच हवं, आपण त्यांना नाउमेद करता कामा नये. भाषणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात तर तो जवळपास वेडापिसा झाल्यासारखं बोलत होता; शब्दवैपुल्यामुळे काही वेळा त्याचं बोलणं अस्पष्ट होत होतं; त्याचं ते रूप वेदनादायी वाटत होतं. भाषणाच्या शेवटी, काहीच थेट संबंध नसताना त्याने तोच ‘जहाल’ सूर कायम ठेवला आणि त्याच तळमळीने तो जहाल गटाविरोधात ओरडू लागला. सशस्त्र उठावासाठी सुरू असलेल्या तयारीविरोधात तो बोलला. ‘आता आला मुख्य मुद्‌द्यावर!’ असं बोल्शेव्हिकांच्या बाजूचं कोणीतरी ओरडल्याचं मला स्पष्टपणे आठवतंय. त्याच वेळी, माझ्या आठवणीनुसार, टॉम्स्की म्हणाला: कॉम्रेड मारटोव्हच्या मनःशांतीसाठी आपण आता आपले हात कलम करावेत काय?

परत एकदा नोंदवतो- मारटोव्ह पहिल्या बैठकीवेळी बोलला का, ते मला नीटसं आठवत नाही. पण त्या परिषदेला लोक कशा वेगवेगळ्या तऱ्हांनी बोलले, याचं वर्णन करण्यासाठी मी हा उल्लेख केला आहे.

त्याच्या भाषणानंतर बैठकीच्या सभागृहाशेजारच्या खोलीत कामगारांची खिन्नपणे चर्चा झाली. हा बघा मारटोव्ह; आणि आधी हाच ‘इस्क्रा’7 गटासोबत होता! आपले बुद्धिजीवी मित्र रंग बदलतायंत!

रोझा लक्झेम्बर्गने प्रभावी, उत्कट व तीक्ष्ण भाषण केलं. तिच्या भाषणात उपरोधाचा अतिशय परिणामकारक वापर केलेला होता.

लेनिन बोलतो

त्यानंतर व्लादिमीर इल्यिच लगबगीने पुल्पिटपाशी जातो आणि त्याच्या खर्जातल्या सुरात ओरडतो कॉम्रेडांनो! त्याचं भाषण खराब आहे, असं मला आधी वाटलं, पण मिनिटभराने माझ्यासह सर्वच जण त्याच्या भाषणात गुंतून गेले. गुंतागुंतीच्या राजकीय प्रश्नांची इतकी सोपी हाताळणी मी पहिल्यांदाच ऐकत होतो. वजनतादर वाक्प्रचारांचा सोस त्याला नव्हता, पण प्रत्येक शब्द ठामपणे उच्चारला जात होता, आणि त्याचा अर्थही आश्चर्यकारकरित्या सरळ होता. त्याच्या भाषणाची छाप किती असाधारण होती हे वाचकांपर्यंत पोचवणं अतिशय अवघड आहे.

हात थोडा उंचावलेल्या अवस्थेत त्याचा पंजा उघडलेला होता, आणि हाताने तो प्रत्येक शब्द मोजत-मापत असल्यासारखं वाटत होतं. विरोधकांच्या टिप्पण्या बाजूला सारत असताना तो दूरगामी परिणाम करणारे काही युक्तिवाद मांडत होता. उदारमतवादी बूर्झ्वा वर्गासोबत किंवा त्यांच्या पाठोपाठ जाण्याऐवजी कष्टकरी वर्गाला स्वतःच्या मार्गाने जाण्याचा अधिकार आहे आणि ते त्याचं कर्तव्यही आहे. हे सगळंच असाधारण होतं, आणि हे लेनिन स्वतःच्या इच्छेने नव्हे तर इतिहासाच्या इच्छेने बोलत असल्यासारखं वाटत होतं.

त्याच्या भाषणातलं ऐक्य, पूर्णत्व, थेटपण आणि सामर्थ्य, पुल्पिटमागे उभं असतानाचं त्याचं एकंदर दर्शन- ही एक प्रत्ययकारी अभिजात कलाकृती होती: त्यात सर्व काही होतं, पण त्यातलं काहीच अनावश्यक नव्हतं. काही अलंकारिक गोष्टी असतील, तरी त्या लक्षात येण्याजोग्या नव्हत्या- चेहऱ्यावर दोन डोळे असतात किंवा एका हाताला पाच बोटं असतात इतक्या नैसर्गिक व अपरिहार्य रितीने ही कलाकृती घडत होती.

आधीच्या वक्त्‌यांपेक्षा लेनिनचं भाषण कमी लांबीचं होतं, पण त्याची छाप खूप जास्त पडली. असं वाटणारा मी एकटाच नव्हतो. माझ्या मागून कोणीतरी उत्साहाने पुटपुटत होतं: हां, याच्याकडे बोलण्यासारखं काहीतरी आहे नक्की. हे म्हणणं खरंच होतं. लेनिनने काढलेले निष्कर्ष कृत्रिम नव्हते, तर स्वतःहून, अपरिहार्यपणे समोर आलेले होते. या भाषणाविषयी- किंबहुना त्याहून अधिक खुद्द लेनिनविषयी मेन्शेव्हिकाने उघडपणे नाराजी व्यक्त केली. क्रांतिकारी सिद्धान्ताचा पराकाष्टेने विकास साधण्याची गरज आहे, म्हणजे त्या आधारे व्यवहाराची सखोल तपासणी करता येईल, हे त्याने उपस्थितांना पटेल अशा रितीने ठामपणे पक्षासमोर मांडलं, त्यानंतर मेन्शेव्हिकांनी जास्तच संतापून त्याच्या भाषणात अडथळे आणले.

ही परिषद काही तत्त्वज्ञानाची नाहीये! आमच्या समोर मास्तरकी करू नकोस, आम्ही शाळकरी पोरं नाहीयोत!

दुकानदारासारखा वाटणारा एक उंच दाढीवाला माणूस विशेष आक्रमक झाला होता. तो त्याच्या जागेवरून उडी मारून उठला आणि तोतरत म्हणाला: छोटेमोठे क-क-कट, र-रचायचे छोटे कट! ब्लाक्विस्टवादी लोक!

रोझा लक्झेम्बर्गने लेनिनच्या म्हणण्याशी संमतिदर्शक मान हलवली. नंतरच्या एका बैठकीत तिने मेन्शेव्हिकांना खडे बोल सुनावले: तुम्ही मार्क्सवादाच्या आधारे बोलत नाही, तुम्ही सरळ त्यावर ठाण मांडता, किंबहुना त्यावर आडवे होऊन बोलता.

चिडचिड, उपरोध आणि तिरस्कार यासह द्वेषपूर्ण संतापाची लाट सभागृहात पसरली. लेनिनचं प्रतिबिंब उमटलेल्या डोळ्यांमधून शेकडो प्रकारच्या भावना व्यक्त होत होत्या. या वैरभावी वातावरणाचा लेनिनवर कोणताही परिणाम झाल्याचं दिसत तरी नव्हतं. तो मनापासून, तरीही जाणीवपूर्वक व शांतपणे बोलत होता. या बाह्य शांततेची किंमत त्याला काही दिवसांनी मोजावी लागली, असं मला नंतर कळलं. पक्षातील कलहाची कारणं शोधण्यासाठी पूर्णतः विकसित सिद्धांताची मदत घ्यावी लागेल, असा अतिशय स्वाभाविक विचार मांडल्यानंतरही त्याच्या विरोधात इतका वैरभाव निर्माण झाल्याचं पाहणं विचित्र आणि दुःखद होतं.

परिषदेच्या दिवसागणिक व्लादिमीर इल्यिच लेनिनची ताकद वाढत गेली आणि तो अधिक धाडसी व आत्मविश्वासपूर्ण होत गेला, असं मला वाटलं. दिवसागणिक त्याची भाषणं अधिक ठाम सुरातली वाटू लागली आणि परिषदेतील बोल्शेव्हिकांची भूमिका अधिक परखड व ताठर होत गेली. लेनिननंतर रोझा लक्झेम्बर्ग व एम. पी. टॉम्स्की यांच्या भाषणांनी मी प्रभावित झालो. लक्झेम्बर्गने मेन्शेव्हिकांविरोधात जोरकस वक्तृताने मांडणी केली, तर टॉम्स्कीने कामगार परिषदेच्या संकल्पनेवर कठोर प्रहार केले.

लेनिन आणि कामगार

काही क्षण किंवा काही तासं मोकळे मिळाले की लेनिन कामगारांशी संवाद साधत असे. त्यांच्या जगण्याच्या अगदी क्षुल्लक वाटणाऱ्या बाबींविषयीही तो चौकशी करायचा.

त्यांच्या बायकांचं काय? त्या घरकामात बुडून गेल्या आहेत का? तरीही त्यांना काही शिकायला, वाचायला वेळ मिळतो का?

लेनिनला पहिल्यांदा त्या परिषदेवेळीच पाहिलेले काही कामगार एकदा हाइड पार्कमध्ये त्याच्या परिषदेतील वर्तनाबद्दल चर्चा करत होते. त्या वेळी एका कामगाराने लक्षवेधी टिप्पणी केली:

युरोपातही कामगारांच्या बाजूने काही लोक त्याच्याइतके हुशार असतील. पण या माणसाइतकं अचूक लक्ष्य साधणारा दुसरा कुणी सापडेल, असं मला तरी वाटत नाही!

दुसरा एक कामगार हसत म्हणाला, तो तसा आपल्यातलाच आहे.

तसा तर प्लेखानॉव्हसुद्धा आपल्यातलाच आहे, कुणीतरी म्हणालं. त्यावरचं, मला ऐकू आलेलं, उत्तर अगदी अचूक होतं- प्लेखानॉव्ह सारखा आपल्याला धडे देतोय, काहीतरी हुकूम सोडतोय, असं वाटतं, पण लेनिन खरा नेता, खरा साथी आहे. एक तरणा गडी विनोदाने म्हणाला, प्लेखानॉव्हचा फ्रॉक कोट जरा जास्तच घट्ट आहे.

एकदा आम्ही एका उपहारगृहात जात होतो, तेव्हा वाटेत मेन्शेव्हिक गटाच्या एका कामगाराने लेनिनला थांबवलं आणि त्याला प्रश्न विचारला. बाकीचे लोक पुढे गेले, पण इल्यिच त्या कामगाराशी बोलत मागे थांबला. मग पाच मिनिटांनी तो उपहारगृहात शिरला तेव्हा संतापलेला होता. तो म्हणाला: अशा भोळसट माणसाला परिषदेला बोलावलं म्हणजे आश्चर्यच आहे. चर्चेचं मुळात कारण काय होतं, असं त्याने मला विचारलं. ‘हेच ते’, मी त्याला म्हटलं, ‘तुझ्या मित्रांना संसदेत जायचंय, पण कष्टकरी वर्गाने संघर्षासाठी तयारी करावी असं आम्हाला वाटतं.’ बहुधा त्याच्या हे लक्षात आलं असावं, असं मला वाटलं.

आमच्यापैकी अनेक जण एकाच स्वस्तातल्या लहान उपहारगृहात एकत्र जेवायचो. व्लादिमीर इल्यिच फार कमी खायचा- दोन किंवा तीन शिजवलेली अंडी, हॅमचा लहानसा तुकडा, आणि घट्ट, डार्क बीअरचा एखादा पेला, एवढंच. स्वतःची तो फारशी काळजी घेत नसे. उलट कामगारांविषयी मात्र त्याच्या मनात पराकोटीची काळजीची भावना असायची.

कॅन्टिनचं कामकाज एम. एफ. आंद्रेयेवा बघायची. तिला लेनिन विचारायचा: तुला काय वाटतं, कामगारांना पुरेसं जेवण मिळतं का? नाही? हां, ह्म्‌म. कदाचित आपण जास्तीची सँडविचं उपलब्ध करून देऊ शकतो?

तू काय करतोयंस? मी विचारलं.

चादरींना हवा लागतेय की नाही, ते बघतोय.

आधी मला काही कळलं नाही. लंडनमध्ये चादरींचं काय होतंय, याचं त्याला काय करायचंय? मी गोंधळल्याचं पाहून तो म्हणाला, आपण स्वतःची काळजी घ्यायला हवी.

1908 सालच्या शरद ऋतूमध्ये सॉरमोवोहून आलेल्या दमित्री पावलोव्ह या कामगाराला मी ‘लेनिनचं सर्वांत लक्षणीय वैशिष्ट्‌य कोणतं वाटतं’ असं विचारलं. तो म्हणाला: साधेपणा. तो सत्याइतका साधा आहे. बरंच आधी विचारपूर्वक ठरवलं असल्याप्रमाणे त्याने हे मत दिलं.

एखाद्या व्यक्तीच्या हाताखाली काम करणारे लोक त्या व्यक्तीचे सर्वांत कठोर टीकाकार असतात, हे सर्वज्ञात आहे. लेनिनच्या गाडीचा चालक गिल हा अतिशय अनुभवी माणूस आहे. तो म्हणाला: लेनिन अतिशय दुर्मिळ माणूस आहे. त्याच्यासारखं दुसरं कुणी सापडणार नाही. एकदा लेनिनला मी गाडीतून म्यास्नित्स्काया रस्त्यावरून घेऊन जात होतो. रहदारी भरपूर होती. मला गाडी फारशी पुढे नेता येत नव्हती. कुठेतरी धडक बसेल या भीतीने मी हॉर्न वाजवत होतो, खूप चिंताग्रस्त मनस्थितीत होतो. तेव्हा लेनिनने दार उघडलं, फुटबोर्डवर उभं राहून त्याने मला आधार दिला. असं उभं राहिल्यावर दुसऱ्या गाड्यांचा धक्का लागून तो पडायचा धोका होता. पण ती जोखीम पत्करून त्याने मला धीर दिला आणि गाडी पुढे न्यायला सुचवलं. ‘गिल, घाबरू नकोस, बाकीच्यांसारखंच पुढे जात राहा.’ गाडी चालवतच माझे केस पांढरे झालेत. त्यामुळे दुसरं कुणीही हे असं केलं नसतं, हे मी सांगू शकतो.

लेनिनचा लोकांवर उमटलेला ठसा एकाच दिशेने सहजपणे व नैसर्गिकपणे निर्देश करत होता. यातली सहजता वाचकांना समजावून सांगणं अवघड आहे. होकायंत्राच्या सुईप्रमाणे त्याचे विचार कायम कामगारांच्या वर्गीय हिताच्या दिशेने वळलेले असत.

लंडनमध्ये एकदा संध्याकाळच्या मोकळ्या वेळेत आम्ही काही मोजके लोक एका संगीत सभागृहात गेलो. विदूषक व विनोदवीरांच्या करामतींवर व्लादिमीर इल्यिच खदखदून हसला आणि बाकीच्यांकडे तो निर्विकारपणे पाहत होता. दुसऱ्या कार्यक्रमात ब्रिटिश कोलम्बियातील कामगार इमारती लाकूड कसं कापत होते, हे त्याने विशेष लक्ष देऊन पाहिलं. मागच्या बाजूच्या एका लहान दृश्यात वनातला तळ दाखवला होता आणि पुढच्या बाजूला जमिनीवर दोन तरणे गडी एका झाडाच्या खोडावर कुऱ्हाड चालवत होते. जवळपास एक मीटर जाडी असलेलं हे खोड कापण्याचं त्यांचं काम मिनिटभर सुरू होतं.

हे अर्थातच लोकांना दाखवण्यासाठी आहे, इल्यिच म्हणाला. वास्तवात काही हे काम इतक्या चटकन होत नाही. पण तिथेही कुऱ्हाड वापरावी लागते आणि बऱ्याच लाकडाच्या निरुपयोगी चकत्याही खाली पडतात. ही ब्रिटिश सभ्यता!

भांडवलशाहीमध्ये उत्पादनामध्ये कशी अराजकता निर्माण होते, बऱ्याच प्रमाणात कच्ची सामग्री कशी वाया जाते, याबद्दल त्याने बोलायला सुरुवात केली, आणि या विषयावर पुस्तक लिहिण्याचा विचार अजून कोणी केला नाही, याबद्दल खेद व्यक्त करून तो थांबला.

त्याची मांडणी मला स्पष्टपणे लक्षात आली नाही, पण व्लादिमीर इल्यिचला प्रश्न विचारणं काही मला जमलं नाही. संगीतनृत्यमय मूकनाट्य हा नाट्यकलेचा विशेष प्रकार आहे, अशा स्वरूपाची काही रोचक टिप्पणी तो करत होता. सर्वसाधारणतः स्वीकारल्या गेलेल्या संकल्पनांकडे विशिष्ट उपहासात्मक वृत्तीन पाहाणारी ही अभिव्यक्ती आहे, या संकल्पनांना उलटं फिरवून, त्यांची विपरित मांडणी करून, सर्वसाधारणतेची यादृच्छिकता यात दाखवली जाते. हे थोडं गुंतागुंतीचं वाटलं, तरी रोचक आहे!

दोन वर्षांनी केप्री इथे, ए. ए. बॉगदानॉव्हच्या कल्पितादर्शमय युटोपियन कादंबरीची चर्चा करत असताना लेनिन म्हणाला, भांडवलशाहीच्या शार्क माशांनी पृथ्वीला कसं ओरबाडलंय आणि तेल, लोखंड, इमारती लाकूड व कोळशाची कशी नासधूस केलेय, या विषयावर कामगारांसाठी तुम्ही एखादी कादंबरी लिहिलीत, तर ते पुस्तक उपयुक्त ठरेल, मॅचिस्ट महाशय!8

पॅरिसमधील भेट

लंडनमध्ये निरोप घेताना त्याने मला आश्वासन दिलं की, आराम करण्यासाठी तो केप्रीमध्ये येईल. पण त्यासंबंधीचा निर्णय होण्याआधीच तो मला पॅरिसला दिसला. एका विद्यार्थ्यांच्या खोलीत तो होता (त्या खोलीचा फक्त आकार विद्यार्थी वापरतात त्या खोल्यांएवढा होता, पण स्वच्छता आणि सुव्यवस्था याबाबतीत अशी तुलना शक्य नव्हती). तिथे नादेज्दा कोनस्तान्तिनोवना9 आम्हाला चहा देऊन बाहेर गेली, त्यामुळे खोलीत आम्ही दोघेच उरलो.

झनानिये प्रकाशनसंस्थेमध्ये तोवर फूट पडलेली होती, आणि आमच्या शक्यतो सर्व वाययीन लोकांना सामावून घेईल अशा नवीन प्रकाशनसंस्थेच्या उभारणीसंदर्भात चर्चा करण्यासाठी मी लेनिनला भेटलो होतो. या संस्थेचं संपादकीय कार्यालय परदेशात असावं, असा प्रस्ताव मी मांडला. व्ही. व्होरोवस्की किंवा इतर कोणाकडे तरी या कार्यालयाची धुरा द्यावी आणि रशियात व्ही. ए. द्येस्नित्सी त्यांचं प्रतिनिधित्व करतील, असं मी सुचवलं. पाश्चात्त्य वाययांचा इतिहास, रशियन वायय यांविषयीची पुस्तकमालिका प्रकाशित करावी, असं मला वाटत होतं. शिवाय, कामगारांना स्वशिक्षणासाठी व प्रचारतंत्रासाठी उपयोगी पडतील अशी सभ्यतासंस्कृतीच्या सिव्हिलायझेशन इतिहासाविषयीची पुस्तकंही काढायला हवी होती. पण सेन्सॉरशिप आणि लोकांन एकत्र आणण्यातील अडचणी, अशी कारण देऊन व्लादिमीर इल्यिचने ही योजना खोडून काढली. बहुतांश कॉम्रेड व्यावहारिक पक्षकार्यात गुंतलेले होते- त्यांना लिहायला वेळ नव्हता. पण, लेनिनचा मुख्य युक्तिवाद ढोबळमानाने असा होता: ‘जाडजूड पुस्तकं लिहायला वेळ नाहीये. जाडी पुस्तकं केवळ बुद्धिजीवी वर्ग वाचेल, पण ते तर उघडपणे समाजवादाऐवजी उदारमतवाद स्वीकारत आहेत आणि त्यांनी निवडलेल्या मार्गापासून त्यांना बाजूला नेण्याची जबाबदारी आपल्यावर नाही. आपल्याला वर्तमानपत्रांची नि पत्रकांची गरज आहे. झनानिये ग्रंथालयाचं पुनरुज्जीवन करणं चांगलं राहील, पण सेन्सॉरशिपमुळे रशियात ते करता येणं अशक्य आहे आणि इथे वाहतुकीमुळे तसं करणं अवघड आहे. आपण लोकांपर्यंत लाखो पत्रकं पोचवायला हवीत आणि असे गठ्ठे बेकायदेशीररित्या पोचवणं अशक्य आहे. तर, जरा काळ सुधारला की प्रकाशनसंस्थेचे पाहू.’ हे त्याचं म्हणणं निर्णायक असल्याचं मला जाणवलं.

त्याच्या नेहमीच्या लक्षणीय स्पष्टपणाने तो द्युमा व कॅडेट्‌सविषयी10 बोलायला लागला. या लोकांना ‘ऑक्टोबरिस्ट11 म्हणवून घ्यायला लाज वाटते आहे’, त्यामुळे आता त्यांना उजवीकडे वळण्याचा तेवढाच एक मार्ग उपलब्ध आहे, असं तो म्हणाला. मग त्याने युद्धाची वेळ निकट येऊन ठेपल्याचा अंदाज वर्तवला, त्यासंबंधी अनेक युक्तिवादही केले. बहुधा एक नव्हे, तर युद्धमालिकेलाच तोंड फुटेल, असं भाकित त्याने वर्तवलं, आणि बाल्कन प्रदेशात ते पुढच्या काळात खरंही ठरलं. तो उभा राहिला आणि खास त्याच्या पद्धतीने कोटाच्या बाहीमध्ये अंगठे खोवून तो त्या बारक्या खोलीत येरझाऱ्या घालू लागला. तल्लख डोळे गच्च मिटून तो म्हणाला:

युद्ध येऊ घातलंय. ते अपरिहार्य आहे. भांडवली जग आता पुरतं आंबून गेलंय, हा त्यांचा अखेरचा टप्पा आहे. अंधदेशभक्ती व राष्ट्रवादाच्या अंमली पदार्थांनी लोकांनी आधीच स्वतःवरती विषप्रयोग सुरू केले आहेत. आता लवकरच युरोपात सर्वत्र युद्ध सुरू होईल, असं मला वाटतं.

श्रमिक वर्ग? हा रक्तपात टाळण्याची शक्ती श्रमिक वर्गाला प्राप्त होईल, असं वाटत नाही. मुळात ते कसं करणार? सगळ्या युरोपात कामगारांचा सार्वत्रिक संप घडवून? अजून ते पुरेसे संघटित झालेले नाहीत किंवा त्यांच्यात हवी तेवढी वर्गजाणीवही नाही. असा संप केला तर यादवी युद्धाचा संकेत दिल्यासारखं होईल, पण व्यावहारिक राजकारणी म्हणून आपण त्यावर विसंबून राहू शकत नाही.

तो थांबला आणि बुटांचे सोल जमिनीवर घासत खिन्नपणे म्हणाला: या सगळ्यात श्रमिक वर्गाला भयंकर गोष्टी सहन कराव्या लागतील. किमान येता काही काळ तरी त्यांची हीच नियती दिसते आहे. पण त्यांचे शत्रू एकमेकांना दुबळे करतील, तेही अपरिहार्यच आहे.

माझ्या जवळ येऊन तो ठामपणे, पण ओरडून नव्हे, किंबहुना थोडासा आश्चर्यचकित झाल्यासारखं म्हणाला: नाही, पण विचार करून बघ. पोट भरलेले लोक भुकेलेल्यांना एकमेकांविरोधात का लढायला लावतील? याहून मूर्खपणाचा किंवा उद्वेगजनक गुन्हा दुसरा कुठला असेल काय? याची भयंक मोठी किंमत कामगारांना मोजावी लागेल, पण अखेरीस त्यांचा लाभ होईल. ही इतिहासाची इच्छा आहे.

तो अनेकदा इतिहासाविषयी बोलायचा, पण त्याच्या बोलण्यात कधीही इतिहासाची इच्छा वा ताकद यांचं स्तोम माजवल्याचं किंवा त्याबद्दल भक्तिभाव राखल्याचं मला वाटलं नाही.

स्वतःच्या शब्दांनी तो कासावीस झाला होता. मग तो बसला आणि कपाळावरचा घाम पुसत थोडा थंड चहा प्यायला. नंतर अचानक त्याने विचारलं: तुझं ते अमेरिकेत काय प्रकरण झालं होतं? तसं पेपरांमध्ये मी वाचलं होतं, पण शेवटी झालं काय?

मी माझे तिथले अनुभव त्याला थोडक्यात सांगितले. लेनिनइतकं वातावरण भारून टाकणारं हसणं मी तरी इतर कुठेच कधीच पाहिलेलं नाही. इतका कठोर वास्तववादी माणूस, ज्याला मोठमोठ्या सामाजिक उलथापालथींची अपरिहार्यता इतकी लख्खपणे दिसत होती आणि इतक्या उत्कटपणे जाणवत होती, जो भांडवली जगाचा पराकोटीचा तिरस्कार करायचा, त्याला असं लहान मुलासारखं हसताना पाहून विचित्र वाटायचं. डोळ्यांतून पाणी येईपर्यंत, पोट दुखेपर्यंत तो हसत राहायचा. असं हसण्यासाठी त्या माणसाचं मन अगदी सुदृढ व निरोगी असायला हवं.

तू भारी विनोदी आहेस राव! तो हसता-हसता म्हणाला. मला एवढं विनोदी काही कधीच सुचलं नसतं.

मग डोळे पुसत तो अचानक गंभीर झाला आणि त्याचं खास दयाळू सौम्य स्मित चेहऱ्यावर आणत म्हणाला: तू अपयशाकडे विनोदी दृष्टीने पाहू शकतोस, हे चांगलं आहे. विनोदबुद्धी हा एक विलक्षण गुण आहे. खरं म्हणजे आयुष्य जितकं दुःखी आहे तितकंच विनोदीसुद्धा आहे.

एका दिवसानंतर मी पुन्हा त्याची भेट घ्यावी, असं आमचं ठरलं. पण हवामान खराब होतं आणि संध्याकाळी मला रक्ताच्या उलट्या व्हायला लागल्या, त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी तिथून निघालो.

लेनिन इटलीमध्ये

पॅरिसनंतर केप्रीमध्ये आमची गाठ पडली. त्या भेटीचा माझ्यावर एकदमच विचित्र परिणाम झाला- जणू काही व्लादिमीर इल्यिच दोनदा केप्रीमध्ये आलाय आणि दोन पूर्णतः परस्परभिन्न मनस्थितीमध्ये तो आहे. पहिला इल्यिच मला मालधक्क्‌यावर भेटला, तेव्हा त्याने तत्काळ निग्रहाने जाहीर केलं: ए.एम., मॅचिस्ट मंडळींसोबत माझा समेट घडवणं शक्य आहे, अशा आशेने तू कायम बोलत असतोस, हे मला माहीतेय. पण हे असं करणं निष्फळ ठरेल असा इशारा मी तुला पत्रातून दिला होता. तर, तू असले काही प्रयत्न करू नकोस.

निवासगृहाकडे परत जाताना आणि नंतरही मी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की, त्याचं म्हणणं काही बरोबर नाहीये. दोन परस्परविरोधी तत्त्वज्ञानांमध्ये समेट घडवण्याचा माझा उद्देश आधीही नव्हता आणि आत्ताही नाही, किंबहुना मला या तत्त्वज्ञानांची पुरेशी समजही नाही. शिवाय, तरुणपणापासूनच मला सर्व तत्त्वज्ञानांविषयी अविश्वास वाटत आलेला आहे. तत्त्वज्ञान आणि माझे वैयक्तिक ‘व्यक्तिनिष्ठ’ अनुभव यांच्यातील विसंगतीमुळे हा अविश्वास निर्माण झाला. माझ्या दृष्टीने, जगाची नुकतीच कुठे सुरुवात झाली होती, त्याच्या घडणीची प्रक्रिया सुरू होती, पण तत्त्वज्ञानाने त्याच्या डोक्यावर एक चापटी मारून पूर्णतः अस्थानी व अप्रस्तुत ठरणारा प्रश्न विचारला: तू कुठे चाललायंस? कशासाठी चाललायंस? काही तत्त्वज्ञ साधा, कठोर आदेश देतात: थांबा! शिवाय, अतिशय साधी, अगदी हिणकस वाटणारी स्त्रीसुद्धा कुशलतेने असा पेहराव घालू शकते ज्यामुळे तिच्या सौंदर्याविषयी पाहणाऱ्याची खात्री पटेल, तसंच तत्त्वज्ञानाचं असतं, याचीही जाणीव मला होती.

हे ऐकून व्लादिमीर एल्यिच हसला. हे म्हणजे करायचा म्हणून विनोद केल्यासारखं आहे, तो म्हणाला. जगाची आत्ताच सुरुवात झालेय, त्याची घडण सुरू आहे, असं म्हणतोयंस तू. पण जरा गांभीर्याने यावर विचार करून पाहा. मग तुझ्या लक्षात येईल. खरं म्हणजे हे तुझ्या आधीच लक्षात आलं असतं.

ए. ए. बॉग्दानोव्ह, ए. लुनाचार्स्की आणि व्ही. ए. बाझारोव्ह हे महत्त्वाचे आणि उच्चशिक्षित लोक आहेत; त्यांच्या समतुल्य असं कोणीच पक्षात नाही, हे माझं मतही मी त्याला सांगितलं.

कबूल. पण त्याने काय होईल?

हे लोक अंतिमतः एकाच उद्दिष्टाकडे पाहत आहेत, असं मला वाटतं. खोलवर समजून घेतलं, तर त्यांच्या उद्दिष्टातील ऐक्याद्वारे तात्त्विक अंतर्विरोधांचं उच्चाटन होईल.

म्हणजे समेट साधायची आशा अजूनही टिकून आहे तर? बाष्कळपणा आहे हा, तो म्हणाला. हे तुझ्या डोक्यातून कायमचं काढून टाक. मित्र म्हणून सल्ला देतोय बघ. तुझ्या मते, प्लेखानॉव्हचं उद्दिष्टही सारखंच आहे. तो भौतिकतावादी आहे, आधिभौतिकी मानणारा नाही, हे खरं असलं, तरी आमच्यापेक्षा त्याचं उद्दिष्ट खूपच वेगळं आहे, असं मला वाटतं.

इथे आमचं संभाषण संपलं. हे अगदी तशाच्या तशा शब्दांमध्ये इथे नोंदवलेलं नाही, हे वेगळं सांगण्याची गरज नसावी. पण संभाषणातील विचार मात्र हेच होते, याबद्दल मी खात्रीने सांगू शकतो.

तर, माझ्याशी बोलत असलेला व्लादिमीर इल्यिच लेनिन लंडनमधील परिषदेपेक्षा अधिक ठाम व ताठर भूमिकेत होता. पण नंतर तो कासावीस झाला होता, त्यानंतर पक्षात स्पष्ट फूट पडली, तेव्हा काही वेदनादायी क्षणानंतर त्याच्यात पुन्हा चैतन्य निर्माण झालं. आता तो शांत, किंबहुना थंड व उपहासात्मक मनस्थितीत होता. सगळ्या तात्त्विक विषयसूत्रांना ठोसपणे बाजूला सारून, तो सतत दक्ष होता.

सौम्य स्वभाववृत्ती व अतिशय आकर्षक व्यक्तिमत्व लाभलेल्या ए. ए. बॉगदानोव्हला लेनिनविषयी ममत्व वाटत असे. पण मुळात बॉगदानोव्ह स्वतःला श्रेष्ठ मानत होता. त्याला लेनिनकडून झोंबणारे व वेदनादायी शब्द ऐकून घ्यावे लागले होते: ’स्पष्ट विचार म्हणजे स्पष्ट उक्ती’ असं शॉपेनहॉरने म्हटलं आहे. त्याचं सर्वांत सत्य वाक्य हेच आहे, असं मला वाटतं. कॉम्रेड बॉगदानोव्ह, तू स्वतःचं म्हणणं स्पष्टपणे मांडू शकत नाहीस. तुझ्या ‘पर्याया’ने कष्टकरी वर्गाला काय मिळेल, आणि मॅचिझम मार्क्सवादापेक्षा अधिक क्रांतिकारी का आहे, ते मला मोजक्या शब्दांमध्ये स्पष्ट करून सांग.

बॉगदानोव्हने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं बोलणं खरोखरच गोंधळलेलं आणि शब्दबंबाळ होतं.

सोडून दे ते, व्लादिमीर इल्यिचने सल्ला देताना म्हटलं. कोणीतरी, जुआरेस, मला वाटतं, म्हटलंय की, ‘मंत्री होण्यापेक्षा सत्य बोलणं चांगलं’- मंत्रीसोबत मॅचिस्ट शब्दाची भर मी घालेन. मग तो बॉगदानोव्हसोबत बुद्धिबळ खेळण्यात गुंतून गेला, आणि त्यात हरल्यावर तो चिडला, एवढंच नव्हे तर, लहान मुलासारखा तो उद्विग्न झाला होता. पण त्याच्या विस्मयकारक हास्याप्रमाणेच या बालसुलभ उद्विग्नतेनेही त्याच्या स्वाभाववृत्तीच्या पूर्णत्वाला आणि ऐक्याला काही बाधा पोचत नव्हती.

केप्रीमध्ये लेनिनचं दुसरं रूपही वावरत होतं- जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये अथकपणे रुची घेणारा, चैतन्यशील, सहृदयी व लक्षणीयरित्या सौम्य साथी, असा हा दुसरा लेनिन होता. एकदा संध्याकाळी उशिरा सगळे जण पाय मोकळे करायला गेले होते, तेव्हा तो मला नि एम. एफ. आँद्रेयेवाला अतिशय खेदाने दुःखी सुरात म्हणाला: हे इतके हुशार आणि बुद्धिमान लोक आहेत, पक्षासाठी त्यांनी बरंच काही केलंय, अजून दहा पट काम ते करू शकतील- आणि तरीही ते आपल्यासोबत येणार नाहीत! त्यांना ते शक्यच नाही. असे अनेक, शेकडो लोक या उद्ध्‌वस्थ आणि छिन्नविछिन्न करण्याचा गुन्हा या सत्ताधाऱ्यांनी केला आहे.

नंतर एकदा तो म्हणाला: लुनाचार्स्की पक्षात परत येईल. इतर दोघांपेक्षा तो कमी व्यक्तिवादी आहे. त्याला दुर्मिळ प्रतिभासंपन्नता लाभलेय. त्याच्या बाबतीत मी थोडं ‘झुकतं माप’ देतो. किती मूर्खासारखे शब्द आहेत हे- ‘झुकतं माप’! मला त्याच्याविषयी ममत्व वाटतं, तो एकदम उत्कृष्ट साथी आहे, माहितेय ना तुला! खास फ्रेंच धाटणीचं तेज आहे त्याच्याकडे. त्याच्या सौंदर्यदृष्टीतूनच त्याचा अवखळपणा आलेला आहे.

केप्रीतल्या मच्छिमारांच्या जीवनाविषयी त्याने तपशिलात विचारणा केली. त्यांचं उत्पन्न किती आहे, त्यांच्यावर धर्मगुरूंचा प्रभाव किती आहे, त्यांच्या शाळा कशा आहेत, याबद्दल चौकशी केली. त्याला इतक्या विषयांत रुची आहे, हे पाहून मला आश्चर्य वाटलं. एकदा एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा धर्मगुरू झाल्याचं त्याच्या निदर्शनास आणून देण्यात आलं, तेव्हा त्याने तत्काळ त्यासंबंधीची माहिती विचारली. गरीब शेतकऱ्यांची मुलं सेमिनरीत जाण्याचं प्रमाण किती असावं, आणि ही मुलं आपापल्या गावात धर्मोपदेशक म्हणून परत येतात का, असे प्रश्न त्याने विचारले.

कळलं ना? हे असं एखादंच सुटं प्रकरण नसेल, तर त्याचा अर्थ- व्हॅटिकनचं हे धोरणच असणार- एकदम कावेबाज धोरण!

इतर लोकांहून उत्तुंग असूनही महत्त्वाकांक्षेची हाव नसलेला आणि सर्वसामान्य लोकांमध्ये तल्लख रुची राखणारा लेनिनव्यतिरिक्त दुसरा माणूस मला कल्पनेतही उभा करता येत नाही.

लेनिनचं व्यक्तिमत्व खास चुंबकीय प्रकारचं होतं. कष्टकरी लोकांची मनं त्याच्याकडे आकर्षिली जातात आणि त्याला लोकांची सहानुभूतीही मिळते. लेनिनला इटालियन बोलता येत नव्हतं, पण केप्रीतील मच्छिमारांनी विशिष्ट अंतःप्रेरणेने लेनिनला विशेष स्थान देऊ केलं. यापूर्वी तिथल्या लोकांनी शलिआपिन आणि असे इतर अनेक उत्तमोत्तम रशियन पाहिले होते. त्याचं हसणं भुरळ पाडणारं होतं- माणसांचा वेंधळा मूर्खपणा आणि हजरजबाबी लोकांची चलाख लबाडी यांची पुरेपूर ओळख असलेल्या माणसाचं हे मनमोकळं हास्य होतं. ‘मनातून साध्या’ असलेल्या लोकांच्या बालसुलभ निष्कपटीपणामधून त्याला आनंद मिळत असे. गिओवनी स्पादरो हा एक वृद्ध मच्छिमार म्हणाला: माणूस प्रामाणिक असेल, तरच त्याला असं हसता येतं.

काही वेळा निळ्या पाण्यामधून, निरभ्र आकाशाखाली आम्ही नौकाविहाराला जायचो. काठीशिवाय फक्त दोरी वापरून- निव्वळ बोटांनी मासा कसा पकडायचा, हे लेनिन शिकला. बोटांना दोरीची थरथर जाणवेल, तेव्हा मासा गळाला लागल्याचं समजावं, असं मच्छिमाराने त्याला समजावून सांगितलं: कोसी: द्रिन, द्रिन. कॅपिस्से?

दुसऱ्याच क्षणी त्याच्या गळाला मासा लागला, त्याने तो वर खेचला आणि बालसुलभ आनंदाने व शिकाऱ्याच्या उत्साहाने ओरडला, द्रिन, द्रिन. मच्छिमारही मुलांसारखे गदगदून हसले आणि या नवीन मच्छिमाराला ‘द्रिन-द्रिन महाशय’ असं नाव त्यांनी दिलं. तो गेल्यानंतरही ते त्याची चौकशी करायचे: द्रिन-द्रिनचं कसं चाललं? झाराने त्याला अजून पकडलं नाहीये ना?

मला पक्कं आठवत नाही, पण लेनिनच्या भेटीच्या आधी किंवा नंतर प्लेखानॉव्हसुद्धा केप्रीला आला होता. केप्री वसाहतीतल्या काही स्थलांतरितांना त्याच्याशी बोलायचं होतं. लेखक ऑलिगर, सोत्चीमध्ये उठाव केल्याबद्दल देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेला लॉरेन्त्झ मेटनर आणि पॉल विग्दोरचिक यांच्यासह आणखी दोघांनी अशी इच्छा व्यक्त केली होती. पण प्लेखानॉव्हने नकार दिला. तसंही आजारी असल्यामुळे तो विश्रांतीसाठी तिथे आला होता, त्यामुळे भेट नाकारण्याचा अधिकार होताच. परंतु, त्याने अतिशय अपमानास्पद रितीने नकार दिल्याचं ऑलिगर आणि लॉरेन्त्झ यांनी मला सांगितलं. ऑलिगर अतिशय उत्साही स्वभावाचा माणूस होता. लोकांना बोलायची इच्छा असते, पण तेवढी क्षमता त्यांच्यात नसते, असल्या लोकांच्या गर्दीचा मला कंटाळा आलाय असं प्लेखानॉव्हने सांगितल्याचं तो म्हणाला. प्लेखानॉव्ह माझ्यासोबत होता, तेव्हा त्याला स्थानिक वसाहतीतल्या कोणालाही भेटण्याची अजिबात इच्छा नव्हती. इल्यिच लेनिन मात्र सर्वांना भेटला. प्लेखानॉव्हने कधीही कशाहीबद्दल काही विचारलं नाही. त्याला आधीपासूनच सगळं माहीत होतं आणि त्याने समोरच्याला सगळं स्वतःच सांगितलेलं असायचं! खास रशियन बुद्धिमत्ता त्याच्यात होती. युरोपीय शिक्षणामुळे, त्याला स्वतःचं बुद्धिचातुर्य दाखवायला आवडायचं, आणि बोचरी थट्टामस्करी करण्यासाठी तो परकीय किंवा रशियन साथींच्या दुबळ्या दुव्यांवर निष्ठूरपणे भर देत असे. त्याचं बुद्धिचातुर्य मला अनेकदा निरर्थक वाटायचं. मेहरिंग म्हणजे नरम पडलेला नेमस्त आहे; एनरिको फेरी भोंदू आहे- धड ना सोनं आहे, ना लोखंड आहे- अशा त्याच्या काही टिप्पण्या आठवतात. फेरो (ferro) म्हणजे लोखंड, त्यावरून त्याने ही कोटी साधली होती. त्याच्या सर्व शाब्दिक कसरतींमध्ये हाच आकृतिबंध होता. स्वतः देव असल्याप्रमाणे तो लोकांशी तुच्छतेने वागायचा, हाच सर्वसाधारण नियम झाला होता. अतिशय गुणवान लेखक आणि पक्षाला सैद्धान्तिक प्रेरणा देणारा विचारक म्हणून त्याच्याविषयी मला प्रचंड आदर वाटत असे, पण सहानुभूती मात्र अजिबात वाटायची नाही. त्याच्यात ‘उमराव’ वृत्ती ठासून भरलेली होती. माझं मत चुकीचं असण्याची शक्यता आहे. मुळात चुका चिवडत बसायला मला आवडत नाही, पण इतरांप्रमाणे मी त्या कायम टाळूही शकत नाही.

परंतु, एक वस्तुस्थिती नमूद करायलाच हवी: जी. व्ही. प्लेखानॉव्ह आणि व्लादिमीर इल्यिच लेनिन या दोघांइतक्या परस्परांहून भिन्न व्यक्ती मला क्वचितच भेटल्या आहेत. हे तसं स्वाभाविकही आहे. यातील एक जण जुन्या जगाच्या विध्वंसाचं काम संपवत होता, तर दुसऱ्याने नव्या जगाच्या उभारणीला सुरुवात केली होती.

आयुष्य आपल्याशी असे दुष्ट डाव खेळतच असतं- खरा तिरस्कार करण्याची क्षमता नसलेले लोक खरं प्रेमही करू शकत नाहीत. ही वस्तुस्थिती मानवी स्वभावाला मुळापाशीच विकृत करून टाकते, आत्म्याच्या या अटळ विभाजनामुळे जीवनाची आधुनिक अवस्था विसर्जित होत जाते.

सर्व दुःख, यातना व वेदना यांच्याबद्दल लेनिनला तीव्र द्वेष, घृणा व तिरस्कार वाटत असे. अटळ दुःख भोगणं हा मुक्तीचा सर्वसाधारण मार्ग आहे, अशी शिकवण देणाऱ्या रशियासारख्या देशात मी असा दुसरा माणूस कधी पाहिला नाही.

दुःखाची प्रशंसा करणाऱ्या व त्याला पवित्र स्थान देणाऱ्या स्तोत्रांना उत्कृष्ट कलाकृती मानणारा हा देश; क्षुल्लक, नीरस एकसुरी व एकसाची नाट्यांचं वर्णन करणाऱ्या पुस्तकांच्या प्रभावाखाली इथली तरुणाई जगण्याला सामोरी जाते. या पार्श्वभूमीवर लेनिनने व्यक्त केलेल्या भावना, जीवनातील नाट्यमयता व शोकांतिकांविषयीचा तिरस्कार, यांमुळेच मुख्यत्वे त्याला विशिष्ट उंची प्राप्त झाली, असं मला वाटतं. रशियाचं वायय हे युरोपातील सर्वांत निराशावादी वायय आहे. आपली सर्व पुस्तकं एकाच किंवा सारख्याच विषयसूत्राला धरून लिहिलेली असतात- स्वतःच्या मूर्खपणामुळे, अनियंत्रित राज्यव्यवस्थेच्या दडपशाहीमुळे, स्त्रियांमुळे, शेजाऱ्याच्या प्रेमामुळे, विश्वाच्या अयशस्वी रचनेमुळे आपण तारुण्यात व मध्यम वयात कसे दुःखग्रस्त होतो, असं हे सूत्र दिसतं. त्यालाच जोडून वृद्धापकाळात आपल्याला स्वतःच्या जीवनातील चुकांची जाणीव होते त्यामुळे, दात पडल्यामुळे, अपचनामुळे, मृत्यू जवळ येऊन ठेपल्यामुळे दुःख होत असतं, हे विषयसूत्र सापडतं. कोणत्यातरी राजकीय गुन्ह्यामुळे एखादा महिना तुरुंगात घालवलेल्या किंवा महिनाभर हद्दपारी अनुभवलेल्या प्रत्येक रशियन व्यक्तीला स्वतःच्या दुःखाच्या आठवणींचं पुस्तक रशियासमोर सादर करणं हे स्वतःचं पवित्र कर्तव्य वाटतं. पण आनंदी जीवनाच्या आठवणींचं पुस्तक काढावं, असा विचार मात्र कोणाच्या मनात आलेला नाही. आपलं जीवन कसं असावं, यावर विचार करण्याची सवय रशियनांना आहे, पण तशा प्रकारे स्वतःचं जीवन घडवणं त्यांना शक्य होत नाही, त्यामुळे असं एखादं पुस्तक कदाचित त्यांना आनंदी जीवन घडवण्याचे धडे देऊ शकेल.

मानवतेच्या दुःखाबाबत लेनिनच्या मनात अपरिवर्तनीय, अथक वैरभाव होता; दुःख हा जगण्याचा अनिवार्य व अटळ भाग नाही, अशी त्याची ज्वलंत धारणा होती; या घृणास्पद घटकाला लोकांनी बाजूला सारायला हवं आणि त्यासाठीची क्षमता त्यांच्यात आहे, असं त्याला वाटत होतं. माझ्या मते, या विचारामुळेच लेनिन अपवादात्मकरित्या महान ठरतो.

लेनिनसोबतचे मतभेद, 1917

लेनिनसोबतच्या माझ्या संबंधांनी 1917-18 या काळात अनिष्ट वळण घेतलं. पण त्याला काही पर्यायही नव्हता. तो राजकारणी होता. गरीब शेतकऱ्यांचं प्रचंड वजन भरलेल्या रशियानामक जहाजाचा महाकाय भार पेलणाऱ्या नेत्याकडे सुस्पष्ट दूरदृष्टी असणं अपरिहार्य आहे. मला मात्र आतूनच राजकारणाविषयी नावड आहे, आणि जनतेच्या- विशेषतः शेतकऱ्यांच्या विवेकशक्तीवर माझा फारसा विश्वास नाही. हुकूमाधारित विचारांशिवायची विवेकबुद्धी अजून सर्जनशील कामकाजात उतरलेली नाही. सर्व विभक्त व्यक्तींच्या हितांचा समुदाय प्रत्यक्षात येत नाही तोपर्यंत जनतेच्या मनात काही विचारसंकल्पना निर्माण होणार नाहीत.

गेली हजारो वर्षं जनता हितकारक अवस्थेसाठी प्रयत्नशील राहिली आहे, आणि या प्रयत्नप्रक्रियेदरम्यान जनतेच्या मांसावर जगणारे लोभी पशू निर्माण होतात, ते जनतेलाच गुलाम करून तिच्या रक्तावर स्वतःची तृष्णा भागवतात. या पाशवी दास्यातून मुक्त व्हायचं असेल, तर लेनिनने शिकवलेली सत्याची ताकदच जनतेला आत्मसात करावी लागेल, अन्यथा त्यांची स्थिती बदलणार नाही.

लेनिनने 1917 साली रशियात परतल्यानंतर त्याने स्वतःचं प्रतिपादन12 प्रकाशित केलं. राजकीय शिक्षण झालेले कामगार आणि बुद्धिजीवी वर्गातील सर्व अस्सल क्रांतिकारक रशियन शेतकरीवर्गाला बळी देणारं हे प्रतिपादन असल्याचं मला वाटलं. रशियातील ही एकमेव सक्रीय शक्ती मूठभर मिठासारखी ग्रामजीवनातल्या रुक्ष दलदलीत फेकण्याचा हा प्रकार आहे आणि कोणताही मागमूस न ठेवता हे मीठ विरघळून जाईल, रशियन लोकांचं मन, जीवन अथवा इतिहास यांमध्ये कोणताही परिणामकारक बदल न घडवता ही शक्ती दलदलीत शोषली जाईल, असं माझं मत होतं. एकंदर व्यावसायिक बुद्धिजीवी- वैज्ञानिक व तंत्रकुशल लोक, स्वभावतः क्रांतिकारी होते, असं मला वाटायचं. हा समाजवादी बुद्धिजीवी वर्ग आणि त्यांच्यासोबतच कामगार म्हणजे रशियात साठवलेली सर्वांत अमूल्य शक्ती आहे, अशी माझी धारणा होती. सत्ता काबीज करण्याची आणि गाव संघटित करणारी दुसरी सक्षम शक्ती मला दिसत नव्हती. संख्यात्मकदृष्ट्‌या नगण्य आणि अंतर्विरोधांनी विभागलेली ही शक्ती पूर्ण आंतरिक ऐक्य साधू शकली, तरच तिला ही भूमिका निभावता येईल. त्यांच्या समोरचं कार्य अचाट होतं- गावांमधील अराजकतेमध्ये सुव्यवस्था आणणं, शेतकऱ्यांच्या विचारांना शिस्त लावणं, त्यांना तर्कबुद्धीने काम करायला शिकवणं, शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेची पुनर्रचना करणं आणि अशा माध्यमातून देशाची प्रगती साधणं. गावांच्या अंतःप्रेरणा शहराच्या विवेकबुद्धीखाली आणूनच हे सर्व साधणं शक्य होतं.

देशातील सांस्कृतिक शक्तींच्या विकासाला पूरक अवस्था निर्माण करणं, हे क्रांतीचं प्राथमिक कार्य आहे, असं मी मानत होतो. त्यासाठी केप्रीमध्ये कामगारांसाठी एक शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव मी मांडला, आणि 1907 ते 1913 या प्रतिक्रांतीच्या काळात कामगारांमधील चैतन्य वाढवायचा मी सर्वतोपरीने प्रयत्न केला. या दृष्टीने फेब्रुवारी क्रांतीनंतर लगेचच ‘विधायक विज्ञान विकास व प्रसार यांसाठीची मुक्त संघटना’ स्थापन करण्यात आली. एका बाजूला, रशियामध्ये विज्ञान संशोधन संस्था स्थापणं, हे या संघटनेचं उद्दिष्ट होतं. तर दुसऱ्या बाजूला, कामगारांमध्ये वैज्ञानिक व तंत्रज्ञानीय ज्ञान सातत्याने आणि व्यापक पातळीवर लोकप्रिय करत नेणं, हेसुद्धा या संघटनेचं उद्दिष्ट होतं. संघटनेच्या नेतृत्वस्थानी विख्यात वैज्ञानिक आणि विज्ञान अकादमीचे सदस्य होते. व्ही. ए. स्टेकलॉव्ह, एल. ए. तचुगायेव, फर्समान, एस. पी. कोस्त्यत्चेव, ए. ए. पेत्रोव्स्की आणि इतर अनेकांचा यात समावेश होता. अतिशय ऊर्जेने विविध साधनं एकत्र आली. प्राणिशास्त्र व वनस्पतिशास्त्र संशोधन संस्थेसाठी एस. पी. कोस्त्यात्शेव आधीपासूनच जागा बघू लागला होता.

एक गोष्ट माझ्या बाजूने प्रांजळपणे नमूद करायला हवी. शहरांच्या तुलनेत गावांमध्ये जास्त आढळणारी निरक्षरता, शेतकऱ्यांचा व्यक्तिवाद, आणि सामाजिक भावनांचा त्यांच्या ठायी असलेला जवळपास संपूर्ण अभाव, या सगळ्याचा माझ्यावर आयुष्यभर निराशाजनक परिणाम होत आला आहे, माझं मनोबऴ त्यामुळे खच्चीही झालं होतं. युद्धामुळे गावं आणखीच अराजकतेच्या गर्तेत ढकलली गेली, त्यातून परिस्थितीमधील गुंतागुंत आणखी वाढली, यावरचा एकमेव संभाव्य उपाय म्हणजे वैज्ञानिक व तंत्रकुशल बुद्धिजीवी वर्गाशी जवळचं नातं राखणाऱ्या राजकीयदृष्ट्‌या सजग कामगारांची हुकूमशाही, असं माझं मत होतं. रशियन क्रांतीमधील बुद्धिजीवी वर्गाच्या भूमिकेचं मूल्य काय, या प्रश्नावर बोल्शेव्हिकांशी माझे मतभेद होते. सर्व बोल्शेव्हिकांचा समावेश या बुद्धिजीवी वर्गात होत होता, आणि त्यांनी शेकडो कामगारांना सामाजिक शौर्याचे व अस्सल बौद्धिकतेचे धडे दिले होते. रशियन इतिहासाचा भार पेलून पुढची वाटचाल करण्याची ताकद केवल रशियन बुद्धिजीवी वर्गात, वैज्ञानिक व व्यावसायिक बुद्धिजीवींमध्येच होती, आहे आणि राहील, असंच मला वाटत होतं. जनतेने कितीही धक्के अनुभवले असले, त्यांना कितीही प्रेरणा व प्रोत्साहन मिळालं असलं, तरी बाहेरून नेतृत्वाची गरज भासेल अशीच ही जनतेची ताकद होती.

तर, 1917 साली मी हा असा विचार करत होतो, आणि त्यात माझी गफलत झाली. माझ्या आठवणींमधली ती पानं फाडून टाकायला हवीत. पण व्लादिमीर इल्यिच लेनिनच म्हणतो त्यानुसार, पेनाने लिहिलेलं कुऱ्हाडीने कापून टाकता येत नाही आणि आपण आपल्या चुकांमधूनच धडे घेतो. त्यामुळे वाचकांना माझ्या चुकाही कळू देत. घाईगडबडीत निष्कर्ष काढण्याची सवय असलेल्यांना यातून काही इशारा मिळाला, तर बरं. अनेक तज्ज्ञांनी केलेल्या घृणास्पद घातपाती कृत्यांची प्रकरणं समोर आल्यावर, वैज्ञानिक व तंत्रकुशल व्यावसायिकांबाबतचं मत बदलण्याव्यतिरिक्त दुसरा काही पर्याय माझ्या समोर नव्हताच. असे बदल- विशेषतः वृद्धावस्थेत- बरीच किंमत मोजायला लावतात.

लोकांच्या निष्ठावान नेत्यांना स्वतःचं कर्तव्य पार पाडताना अलौकिक अडचणी पार कराव्या लागतात. कोणत्याही नेत्याला काही प्रमाणात जुलुम करणं अनिवार्य असतं. तोमास मुन्झरपेक्षा लेनिनच्या नेतृत्वाखाली बहुधा जास्त लोक मारले गेले असावेत, पण हे केलं नसतं तर लेनिनच्या नेतृत्वाखालील क्रांतीला होणारा प्रतिकार अधिक व्यापक व संघटित झाला असता. शिवाय, आपण एक वस्तुस्थिती लक्षात घ्यायला हवी की, सभ्यतासंस्कृतीच्या विकासासोबत मानवी जीवनाचं मूल्य उघडपणे कमी होतं- समकालीन युरोपात लोकांचा उच्छेद करण्याची तंत्र वाढीस लागली आहेत आणि तसं करण्यामधला रसही वाढतो आहे, यावरून ही वस्तुस्थिती स्पष्टपणे सिद्ध होते.

कुख्यात युरोपीय युद्धाच्या चार वर्षांच्या काळात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल करुणेचा चकार शब्दही न काढता, उलट ‘विजयी समाप्ती’साठी या घृणास्पद युद्धाला सर्वतोपरी खतपाणीच घालण्याचं काम नैतिकतावाद्यांनी केलं, पण रशियन क्रांतीच्या रक्तपिपासूपणाविषयी ते चर्चा करतात, हा ढोंगीपणा आहे. याच्याशी कोण कितपत सहमत होतं किंवा याची कोणाला कितपत चीड येते, हे मोकळेपणाने स्वतःलाच विचारून पाहावं. आजघडीला ‘सभ्य’ सिव्हिलाइज्ड राष्ट्रं उद्ध्‌वस्त झाली आहेत, थकली आहेत, त्यांचा ऱ्हास होतो आहे, आणि सर्वच लोकसमूहांमध्ये सामायिक असलेला अशिष्ट निम्न बूर्झ्वा असंस्कृतपणा प्रबळ होतो आहे. या अवस्थेच्या फासातून सुटण्याचा मार्ग नाही, त्यामुळे लोकांचा यात गळफास लागून मृत्यू होतो आहे.

लेनिनच्या क्रौर्याबद्दल बरंच काही बोललं आणि लिहिलं गेलेलं आहे. खोटेपणा आणि निंदा यांपासून त्याचा बचाव करायला जाणं म्हणजे हास्यास्पद बिनडोकपणा ठरेल, त्यामुळे तसं काही करण्याचा माझा उद्देश नाही. खोटं बोलणं किंवा गरळ ओकणं ही निम्न बूर्झ्वा राजकारणातील एक वैध पद्धती आहे, शत्रूवर हल्ला चढवण्यासाठी ते सर्वसाधारणतः हाच मार्ग अवलंबतात, हे मला माहीत आहे. ज्याच्यावर कधीच चिखलफेक झाली नाही असा महान माणूस आजच्या जगात शोधूनही सापडणार नाही. हे सर्वज्ञात आहे. शिवाय, असामान्य माणसाला स्वतःच्या आकलन-पातळीपर्यंत खाली आणण्याची प्रवृत्ती सर्व लोकांमध्ये दिसते, एवढंच नव्हे तर, त्यांनी निर्माण केलेल्या बुळबुळीत दुर्गंधीयुक्त चिखलामध्ये संबंधित माणसाला स्वतःच्या पायांनी तुडवण्याकडे लोकांचा कल असतो. यालाच लोक ‘दैनंदिन जीवन’ म्हणतात.

पुढील तिरस्करणीय प्रसंग अजूनही माझ्या आठवणीत आहे. पेट्रोग्राडमध्ये 1919 साली ‘ग्रामीण गरिबां’ची परिषद होती. रशियाच्या उत्तरेकडील गावांमधून हजारो शेतकरी परिषदेला आले होते. त्यातील काही शे लोकांना रोमानोवांच्या विन्टर पॅलेसमध्ये उतरवण्यात आलं. परिषद संपल्यानंतर हे लोक निघून गेले. तेव्हा असं निदर्शनास आलं की, महालातील मोऱ्याच नव्हे, तर फ्रेंच बनावटीची भांडी, सॅक्सन आणि जुन्या फुलदाण्या अशा अनेक अमूल्य वस्तूंचाही वापर लघवीसाठी करण्यात आला होता. हे करण्याची काहीच गरज नव्हती, कारण महालातील मुताऱ्या अतिशय चांगल्या अवस्थेत होत्या आणि पाण्याची व्यवस्थाही सुरळीत होती. पण मुळात सौंदर्यावर कलंक लावणं, त्याला हिणकसपणे वागवणं, या इच्छेचा हा विध्वंसक आविष्कार होता, त्यामुळे व्यवस्था सुरळीत असल्याचा त्यावर काहीच परिणाम होणार नव्हता. दोन क्रांत्या आणि एक युद्ध पाहिल्यानंतर मला लोकांच्या या अशा सुप्त सूडभावनेचे शेकडो दाखले मिळाले आहेत. सुंदर गोष्टी फोडणं, विरूप करणं, त्यांची थट्टा करणं वा बदनामी करणं, ही मुळातलीच प्रवृत्ती असल्याचं दिसतं. शेतकऱ्यांविषयीच्या माझ्या साशंकदृष्टीमुळे मी ग्रामीण गरीबांच्या वर्तनावर भर देतो आहे, असं मानू नये. हा काही केवळ एकमेव दाखला नाही.

अपवादात्मक सौंदर्य असलेल्या वस्तूंचं विकृतीकरण करण्याची मत्सरी वृत्ती आणि अपवादात्मक माणसाची बदनामी करण्याची किळसवाणी वृत्ती यांच्यात मूलभूत सारखेपणा आहे. कोणतीही अपवादात्मक गोष्ट लोकांना त्यांना हवं तसं जगू देत नाही. लोकांना त्यांच्या सामाजिक सवयींमध्ये कोणताही मूलभूत बदल नको असतो, तर वाढीव सवयी लावून घेण्याची आस त्यांना लागलेली असते. आमच्या अंगवळणी पडलेल्या जीवनमार्गामध्ये हस्तक्षेप करू नका!, हे बहुसंख्यांच्या विलापाचं व तक्रारीचं सार असतं. तर, लोकांना अंगवळणी पडलेल्या जीवनापासून कसं फारकत घ्यायला लावायचं, हे व्लादिमीर लेनिनसारख्या माणसाला चांगलं माहीत होतं. जगातील बूर्झ्वा वर्गीयांना त्याचा किती द्वेष वाटत होता, हे अगदी ओंगळवाण्या पद्धतीने स्पष्ट झालेलं होतं. त्या द्वेषाचे काळे-निळे व्रण सहज नजरेस पडतात. हा द्वेष किळसवाणा आहेच, पण जगातील बूर्झ्वा वर्गीयांच्या दृष्टीने व्लादिमीर लेनिन हा संपूर्ण जगातील श्रमजीवींचे प्रेरणादायी नेता किती महाभयंकर आहे, हेसुद्धा यातून आपल्याला कळतं.

लेनिनचं शरीर आता अस्तित्वात नाही, पण त्याचा आवाज आधीपेक्षा तीव्रतेने व अधिक विजयी सुरात धरतीवरील कामगारांच्या कानांत घुमतो आहे. जगाच्या कानाकोपऱ्यांमध्ये त्याच्या आवाजाने लोकांच्या मनात क्रांतीची, नवजीवनाची, समतापूर्ण समाजाच्या निर्मितीची इच्छा निर्माण केली. लेनिनचे अनुयायी आता त्याच्या शक्तीचे वारसदार झाले आहेत, आणि सतत वाढत्या आत्मविश्वासाने, सामर्थ्याने व यशाने ते हे महान कार्य पुढे घेऊन जात आहेत.

‘सत्याचं मूर्तिमंत रूप’

जगण्याची उत्कट इच्छा त्याच्या ठायी होती, जगण्यातील घृणास्पद गोष्टींविषयी त्याच्या मनात तीव्र तिटकारा होता, त्यामुळेच मी त्याच्याकडे आकर्षिला गेलो. त्याची प्रत्येक कृती तारुण्यसुलभ उत्कटतेने केलेली असायची, ते मला फार आवडत असे. त्याची हालचाल सहज नि चपळ असायची, आणि तो क्वचितच हातवारे करायचा, पण भाषणाशी पूर्णतः मेळ राहील अशाच प्रकारे या हालचाली व्हायच्या. मोजक्या शब्दांचा वापर करणारं त्याचं भाषण विचारांनी भारलेलं असायचं. त्याच्या किंचित मंगोलियन चेहरेपट्टीवरचे अविश्रांत योद्‌ध्याचं तेज असणारे तीक्ष्ण डोळे जीवनातील खोटेपणावर आणि दुःखावर रोखलेले असत. त्याचे डोळे कधी चकाकत, तर कधी आग ओकत, कधी गोंढळलेले असत, तर कधी मिचकत, कधी उपहासाने हसत, तर कधी संतापाने धगधगत राहात. नजरेतील चमक त्याच्या शब्दांना अधिक प्रखर करत असे. त्याच्या अंतरात्म्यातील दुर्दम्य ऊर्जेच्या ठिणग्या त्याच्या डोळ्यांतून आणि शब्दांतून उडत असल्याचं काही वेळा वाटायचं. नजरेतून नि शब्दांतून उडालेल्या या ठिणग्या वातावरणात चकाकत राहात. अनिवार्य सत्याचा शारीरिक दबाव आल्याचा भाव त्याच्या शब्दांमधून समोरच्यांना जाणवायचा.

गोर्कीमधील13 उद्यानात लेनिनला पाहणं ही असाधारण विचित्र गोष्ट होती. लेनिन म्हटल्यावर डोळ्यांसमोर येणारं चित्र कायम असं असायचं की: मोठ्या टेबलाच्या टोकाला तो बसलाय, तज्ज्ञ दृष्टीने आणि कौशल्याने साथीदारांना कामासंदर्भात मार्गदर्शन करतोय, वैमानिकासारखी त्याची तल्लख नजर फिरतेय, चेहऱ्यावर स्मित आहे; किंवा डोकं थोडं मागे कललेल्या अवस्थेत तो मंचावर उभा आहे, शांत जमावापुढे त्याचे सुस्पष्ट शब्द उच्चारले जातायंत, सत्य जाणून घेण्यासाठीची उत्सुकता समोर लोकांच्या चेहऱ्यांवर दिसतेय.

त्याचे शब्द माझ्या अंतःचक्षूंसमोर कायम पोलादी अवजाराची थंड चकाकी आणत असत. विलक्षण साधेपणा असलेल्या या शब्दांमधून सत्याची अचूक आकृती उभी राहात असे.

त्याचा स्वभाव साहसी होता, पण ही साहसीवृत्ती केवळ जुगाऱ्यासारखी लाभार्थी स्वरूपाची नव्हती. ध्येयावर अढळ विश्वास असलेल्या, जगासोबतच्या आपल्या नात्याचं मूलगामी व संपूर्ण आकलन झालेल्या आणि जगातील अनागोंदीमधील स्वतःची व शत्रूची भूमिका काय आहे याचीही अचूक समज असलेल्या माणसामध्येच आढळेल अशा अपवादात्मक नैतिक धैर्याचा आविष्कार लेनिनच्या व्यक्तिमत्वातून होत असे.

तो जितक्या उत्साहाने बुद्धिबळ खेळायचा, तितक्याच उत्साहाने ‘पोशाखांचा इतिहास’ यासारख्या पुस्तकाची पानं चाळायचा, सहकाऱ्यांशी तासंतास वाद घालायचा, मासे पकडायचा, केप्रीमधील खडकाळ वाटांवर चालायला जायचा, दक्षिणेतलं ऊन पेलायचा, पिवळ्या रानफुलांकडे नि मच्छिमारांच्या काळ्या मुलांकडे पाहत राहायचा. तिन्हीसांजेला रशियाविषयी व ग्रामीण भागाविषयीच्या गोष्टी ऐकताना हेवा वाटून सुस्कारा टाकत तो म्हणायचा, रशियाबद्दल- सिम्बर्स्क, कझान, पीटर्सबर्ग, सायबेरियातील हद्दपारी अशा बहुधा सर्वच भागांबद्दल मला खूपच कमी माहिती आहे.

त्याला मौजमजा करायला आवडायचं. तो हसायचा म्हणजे त्याचं संपूर्ण शरीरच हसायचं. अनेकदा हसता हसता त्याला रडू यायचं, इतकं त्याचं हसणं प्रचंड होतं. ‘ह्‌, ह्म्‌’ या खास अल्पाक्षरी उद्गारांचा तो असंख्य तऱ्हांनी वापर करत असे- उपहासापासून ते संदिग्ध शंका व्यक्त करण्यापर्यंत अनेक भावना तो या उद्गांनी व्यक्त करायचा. त्याच्या या ‘ह्‌, ह्म्‌’मध्ये अनेकदा विनोदी सूर असायचा. जीवनातील मूर्खपणाच्या आरपार पाहू शकणाऱ्या तीक्ष्ण दृष्टीच्या माणसालाच हा विनोद अनुभवायला मिळतो.

काहीशी ठेंगणी व रुंद देहयष्टी असलेल्या लेनिनचं डोकं सॉक्रॅटिससारखं होतं आणि त्याची नजर वेगाने फिरायची. अनेकदा त्याची बसण्याची वा उभं राहण्याची ढबही विचित्र, किंबहुना विनोदी वाटायची. तो डोकं खांद्यावर कलल्यासारखं मागे करायचा नि बोटं कोटाच्या खिशात घालून उभा राहायचा. त्याच्या या पोजमध्ये काहीतरी विलक्षण मजेशीर होतं- लढाऊ कोंबडा विजयी होताना उभा राहातो तसं काहीतरी. अशा वेळी तो आनंदाने उसळत असायचा. या तापदायक जगातलं मोठं झालेलं बालक वाटायचा तो. तेजस्वी मानवाप्रमाणे प्रेम प्रत्यक्षात यावं यासाठी त्याला जगातल्या शत्रुभावासमोर व द्वेषासमोर स्वतःचा बळी द्यावा लागला.

बुद्धिजीवी आणि तज्ज्ञ यांच्याविषयी

1918 साल उजाडेपर्यंत मी लेनिनला रशियात भेटलो नव्हतो, किंवा त्याला दूर अंतरावरूनही पाहिलं नव्हतं. त्या वर्षी लेनिनच्या हत्येचा शेवटचा भेकड प्रयत्न झाला.14 त्याच्या गळ्याला गोळी लागून गेली होती. मी भेटलो तेव्हा त्याला मान फारशी हलवता येत नव्हती आणि हाताचाही फारसा वापर करता येत नव्हता. हल्लाच्या घटनेबाबत मी संताप व्यक्त केला, तेव्हा तो म्हणाला: भांडणामुऴे झालं. काही करता येणार नाही. प्रत्येक जण आपापल्या समजुतीप्रमाणे वागतो. एखाद्या गोष्टीचा वीट आल्यावर तिच्याकडे दुर्लक्ष करताना उमटतो तसा त्याचा सूर होता.

आमची भेट तशी खूपच मैत्रीपूर्ण वातावरणात पार पडली, पण प्रिय इल्यिचच्या तीक्ष्ण व धारदार नजरेमध्ये माझ्याबद्दलची कीव स्पष्टपणे दिसत होती, कारण मी राजकीय संदर्भात चुकलेल्या वाटेला गेलो होतो.

काही क्षण गेल्यावर तो तावातावाने म्हणाला: आमच्या सोबत नसेल, तो आमच्या विरोधात आहे. घटनाक्रमापासून अलिप्त राहिलेले लोक, ही केवऴ एक परिकथा आहे. असे लोक पूर्वी कधीतरी अस्तित्वात होते, हे मान्य केलं, तरीही वर्तमानात ते अस्तित्वात नाहीत आणि अस्तित्वात येण्याची शक्यताही नाही. त्याने कोणाचंही भलं होणार नाही. अभूतपूर्व व्यामिश्रता धारण केलेल्या वास्तवाच्या वादळात अखेरीस या सर्वांना टाकण्यात आलं आहे. मी जगण्याचं खूप सुलभीकरण करतो, असं तुम्ही म्हणता ना? या सुलभीकरणामुळे संस्कृती कोसळण्याचा धोका आहे, असं म्हणता ना? मग त्याचं खास उपहासात्मक ‘ह्‌, हम्’ झालं.

त्याची तीक्ष्ण नजर आणखी धारदार झाली आणि खालच्या सुरात तो बोलू लागला: हातात रायफली घेतलेले लाखो शेतकरी संस्कृतीला धोकादायक नाहीत, असं तुम्हाला म्हणायचंय का? घटनासभेला त्या अराजकतेशी जुळवून घेता आलं असतं, असं तुम्हाला वाटतं का? देशातील अराजकतेविषयी इतका गदारोळ माजवणाऱ्या तुमच्यासारख्यांनी इतरांपेक्षा आमचं काम आधी धड समजून घ्यायला हवं. रशियन जनतेला पेलेल असंच काहीतरी आम्हाला त्यांच्या समोर मांडावं लागेल. सोव्हिएत आणि साम्यवाद, हे सोपं आहे.

कामगारांची संघटना आणि बुद्धिजीवी वर्ग, यांच्याबाबत काय म्हणाल? बरं, ते वाईट नाहीये, ठीक. सांगा मग बुद्धिजीवींना. त्यांनी यावं आमच्याकडे. तुमच्या मते ते न्यायाचे सच्चे सेवक आहेत. मग अडचण कुठे आहे? येऊ दे की त्यांना आमच्याकडे. लोकांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं महाकाय कार्य आम्ही अंगावर घेतलंय इतकंच. जीवनाविषयीचं सत्य संपूर्ण जगाला सांगण्याचं हे कार्य आहे. मानवी जीवनाकडे जाणारी सरळ वाट आम्ही लोकांना दाखवतो आहोत- ही वाट गुलामगिरी, दारित्र्य व वंचना यांतून बाहेर काढणारी आहे.

तो हसला आणि कोणत्याही उद्वेगाविना म्हणाला: तर, हे असं आहे, म्हणून बुद्धिजीवी वर्गाकडून माझ्यावर गोळी झाडली गेली.

या संभाषणाचं तापमान कमी-अधिक सर्वसाधारण पातळीला होतं, तेव्हा तो खिन्नपणे म्हणाला: बुद्धिजीवी वर्ग आपल्याला आवश्यक आहे, या विचाराविरोधात मी भांडतोय, असं तुला वाटतं का? पण त्यांची वृत्ती किती शत्रुभावी आहे, सद्यस्थितीमधली गरज समजण्यात त्यांची किती गफलत होतेय, हे तुला दिसतंय ना? आमच्याशिवाय ते किती सामर्थ्यहीन होतील, जनतेपर्यंत पोचणं त्यांना शक्यच होणार नाही, हे त्यांच्या लक्षातही येत नाहीये. आमच्याकडून खूप जास्त डोकी फुटली, तर त्याचा दोष त्यांच्यावर असेल.

आम्ही जवळपास प्रत्येक भेटीमध्ये या विषयावर चर्चा करायचो. त्याच्या बोलण्यातून बुद्धिजीवींविषयीचा अविश्वास व शत्रुभाव जाणवायचा. पण प्रत्यक्षात क्रांतिकारी प्रकियेतील बौद्धिक ऊर्जेचं महत्त्व किती आहे, याचा योग्य अंदाज त्याला आधीपासूनच आलेला होता. सर्वसामान्य स्थितीत नियमितपणे विकसित होण्याची शक्यता नसलेल्या ऊर्जा उफाळून येणं, हा क्रांतीचा गाभा आहे, या मुद्‌द्यावरही त्याची सहमती असल्यासारखं वाटायचं.

एकदा तो आणि विज्ञान अकादमीच्या तीन सदस्यांसोबत मी बोलत होतो. पेट्रोग्राडमधील एका अत्युच्च वैज्ञानिक संस्थेच्या पुनर्रचनेची आवश्यकता किती आहे, यासंबंधीची ही चर्चा होती. उर्वरित लोक गेल्यानंतर लेनिन समाधानाने म्हणाला: आता हे ठीक झालं. हे हुशार लोक होते. त्यांचं सगळं सोपं असतं आणि काटेकोर मांडणी केलेली असते. या लोकांना स्वतःला काय हवंय हे अचूक माहीत असतं. अशा लोकांसोबत काम करण्यासारखं सुख नाही. विशेषतः एस. मला चांगला वाटतो. ‘एस.’ या ठिकाणी त्याने अतिशय महान रशियन वैज्ञानिकांपैकी एकाचं नाव घेतलं. नंतरच्या दिवशी त्याने मला दूरध्वनीवरून विचारलंही: एस.ला विचारून बघ, तो आपल्यासोबत काम करायला तयार आहे का ते. मग एस.ने हा प्रस्ताव स्वीकारल्यावर लेनिनला खरोखरच आनंद झाला. हात एकमेकांवर चोळत तो मिश्किलपणे म्हणाला: एकेक करून हे सगळे रशियन आणि युरोपीयन आर्किमिडिससदृश लोक आपण जिंकून घेऊ, मग जगाची इच्छा असो वा नसो, ते बदलेलच!

पक्षाच्या आठव्या परिषदेवेळी15, एन. आय. बुखारिन म्हणाला: राष्ट्र म्हणजे श्रमजीवींसोबत बूर्झ्वाही आले. काही निंद्य बूर्झ्वा लोकांचं स्वयंनिर्णयनाचा अधिकार मान्य करण्याचा प्रश्नच येत नाही.

नाही, माफ करा, जरा मधेच बोलतो, लेनिन म्हणाला, हा प्रश्न निश्चितपणे आहे. बूर्झ्वांपासून श्रमजीवींना वेगळं काढण्याच्या प्रक्रियेचं आवाहन तू करतोयंस, पण जरा थांबून हे कसं होईल, हे पाहायला हवं. मग जर्मनीचं उदाहरण देऊन त्याने, ही विभाजनाची प्रक्रिया किती संथपणे विकसित होते, त्यात कोणत्या अडचणी येतात, हे स्पष्ट केलं. बळजबरी करून साम्यवाद रुजवणं आपल्याला कधीच शक्य होणार नाही, असं त्याने जाहीरपणे मांडलं. उद्योग, सैन्य, सहकार चळवळ या ठिकाणी बुद्धिजीवींचं महत्त्व किती असतं, हा प्रश्नही त्याने चर्चेला घेतला. परिषदेच्या चर्चेचं इझ्वेस्तिआमध्ये16 आलेलं वार्तांकन थोडं उर्द्धृत करतो.

येत्या परिषदेमध्ये या प्रश्नावर पूर्ण ठाम निर्णय घ्यायला हवा. बूर्झ्वा विज्ञान व तंत्र यांद्वारे जनतेला साम्यवाद अधिक परिचित झाल्यावर हा विचार रुजवणं आपल्याला शक्य होईल. यासाठी बूर्झ्वांकडून साधनसामग्री घेणं आवश्यक आहे, या कामासाठी सर्व तज्ज्ञांना सोबत घ्यायला हवं. बूर्झ्वा तज्ज्ञांशिवाय, उत्पादनशक्ती वाढवणं अशक्य आहे. त्यांच्या भोवती सहभावी सहकार्याचं वातावरण हवं, कामगारांचे कॉमिसार, साम्यवादी यांनी त्यांच्या आसपास राहायला हवं. बूर्झ्वा तज्ज्ञांना फारकत घेता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करायला हवी. भांडवलशाहीपेक्षा चांगल्या पद्धतीने काम करता येण्याची शक्यता त्यांच्या समोर ठेवायला हवी, अन्यथा बूर्झ्वा वर्गाकडून शिक्षण मिळालेला हा स्तर काम सुरू करणार नाही. बळजबरीने या संपूर्ण स्तराला कामाला लावणं अशक्य आहे.

बूर्झ्वा तज्ज्ञांना सांस्कृतिक काम करण्याची सवय आहे, बूर्झ्वा सत्ताचौकटीमध्ये त्यांनी हे काम सुरू ठेवलं, म्हणजे प्रचंड भौतिक कामाने व बांधकामाने त्यांनी बूर्झ्वा वर्गाला संपन्न केलं, आणि या संपत्तीमधील अत्यल्प वाटा श्रमजीवींना दिला. तरीही, त्यांनी संस्कृतीचं काम निश्चितपणे पुढे नेलं- तोच त्यांचा पेशा आहे. कामगारांनाही संस्कृतीचं मूल्य जाणवतं, एवढंच नव्हे तर जनतेपर्यंत संस्कृती घेऊन जाण्यासाठी कामगार मदत करतात, हे बूर्झ्वा तज्ज्ञांच्या लक्षात आलं की त्यांची आपल्याकडे बघण्याची दृष्टी बदलेल. मग बूर्झ्वांपासून त्यांची राजकीय फारकत होईलच, शिवाय त्यंच्यावर नैतिक विजय प्राप्त करता येईल.

आपण त्यांना आपल्या साधनसामग्रीकडे आकर्षून घ्यायला हवं, आणि त्यासाठी त्याग करण्याची आपली तयारी हवी. तज्ज्ञांना सामोरं जाताना आपण क्षुल्लक मनस्तापांना थारा देता कामा नये. जगण्याची शक्यतो सर्वोत्तम स्थिती आपण त्यांना पुरवायला हवी. तेच उतम धोरण होईल. काल आपण निम्न बूर्झ्वा पक्षांना कायदेशीर स्थान देण्याविषयी बोलत होतो आणि आज मेन्शेव्हिक व डाव्या समाजवादी क्रांतिकारांना अटक करतो आहोत, अशा धोरणबदलामध्ये एक सरळ दुवा आहे- प्रतिक्रांतीचा बिमोड करण्यासाठी आणि बूर्झ्वांची सांस्कृतिक साधनसामग्री काबीज करण्यासाठी उचललेलं हे पाऊल आहे.

निम्न बूर्झ्वा वर्गाच्या ढोंगी व दयनीय ‘मानवतावादी’ विलापापेक्षा ही महान धोरणाची उत्कृष्ट अभिव्यक्ती अधिक अस्सल व अर्थपूर्ण आहे. कष्टकरी वर्गासोबत सहकार्य करून प्रामाणिकपणे काम करण्याचं हे आवाहन दुर्दैवाने संबंधितांनी समजून घेतलेलं नाही. त्यांनी गुप्त घातपात व दगाफटका करण्याचा मार्ग निवडला. वेठबिगारीचं उच्चाटन झाल्यानंतर, अनेक घरगुती वेठबिगार, गुलामांच्या पातळीवरचे लोक आपापल्या मालकांच्या सेवेतच राहिले. ज्या तब्येल्यांमध्ये या गुलामांना मालक चाबकाचे फटके मारत, तिथेच राहाण्याचा मार्ग गुलामांनी पत्करला.

क्रांतिकारी डावपेच

क्रांतिकारी डावपेच व जीवन यांमधील क्रौर्याविषयी मी लेनिनशी अनेकदा बोलत असे.

मग तुला काय हवंय? त्याने आश्चर्याने आणि संतापाने विचारलं. अशा अभूतपूर्व क्रूर संघर्षात मानवीपणे वागणं शक्य आहे का? मृदुहृदयीपणासाठी वा औदार्यासाठी यात काही जागा आहे का? युरोपने आपली नाकेबंदी केलेली आहे, युरोपीय श्रमजीवींची मदत आपल्याला मिळत नाही, सगळ्या बाजूंनी प्रतिक्रांती आपल्यावर अस्वलासारखी चाल करून येते. अशा वेळी तुला काय अपेक्षित आहे? आमचं म्हणणं योग्य नाहीये का? आम्ही संघर्ष आणि प्रतिकार करूच नये का? आम्ही काही मूर्ख नाहीयोत. आम्हाला हवंय ते आम्हालाच साध्य करता येईल, हे आम्ही जाणतो. याच्या विपरित युक्तिवाद मला पटत असता, तर मी इथे बसलो असतो, असं तुला वाटतं का?

एखाद्या लढाईत कोणते हल्ले आवश्यक आहेत आणि कोणते अनावश्यक आहेत, हे ठरवण्याचा तुझा निकष काय आहे? त्याने एकदा संतप्त चर्चेनंतर मला विचारलं. या साध्या प्रश्नाला मी ढोबळ काव्यात्म उत्तर देऊ शकलो. त्याव्यतिरिक्त काही उत्तर देणं शक्यच नाही, असं मला वाटलं.

अनेकदा मी वेगवेगळ्या स्वरूपाच्या विनंत्या करण्यासाठी त्याच्याकडे जात असे. विविध लोकांविषयी मी त्याच्याकडे काळजी व्यक्त केली की त्याला माझी कीव येत असावी, असं वाटायचं. तो विचारायचा, बऱ्याच निरर्थक गोष्टींमध्ये तू स्वतःची ऊर्जा वाया घालवतोयस, असं तुला वाटत नाही का?

पण मला आवश्यक वाटायचं ते मी करतच राहायचो, आणि श्रमजीवींचे शत्रू कोण आहेत हे माहीत असणारा हा माणूस माझ्याकडे संतापाने व संशयाने पाहायचा. जोरजोरात डोकं हलवत तो म्हणायचा, आपले साथी व कामगार यांच्या दृष्टीने तुझं वर्तन संशय वाढवणारं आहे.

हेच साथी आणि कामगार उत्तेजित झाले, त्रस्त झाले की मूल्यवान लोकांच्या जीवनाला आणि स्वातंत्र्याला खूपच क्षुल्लक मानतात, हे अनेकदा घडलेलं आहे, याकडे मी निर्देश करायचो. क्रांतीच्या प्रामाणिक कष्टांना या महाकाय, व काही वेळा निरर्थक क्रौर्याने बाधा पोचते, एवढंच नव्हे तर वस्तुनिष्ठरित्या विचार केला तर डावपेच म्हणूनसुद्धा हे वाईट आहे, कारण अशा कृतींमुळे अनेक महत्त्वाचे लोक क्रांतीमध्ये सहभागी होण्यापासून दुरावतात, असं मला वाटत होतं.

‘ह्‌, ह्म्‌’ लेनिन साशंकतेने पुटपुटला. बुद्धिजीवी वर्गाने कामगारांच्या हितसंबंधांचा विश्वासघात केल्याचे अनेक दाखले त्याने माझ्या समोर मांडले.

आपल्यापैकी अनेक लोक विरोधी बाजूला जातात आणि आपला विश्वासघात करतात. केवळ भेकडपणामुळे हे घडतं असं नव्हे, तर त्यांच्या स्वप्रतिष्ठेच्या भावनेमुळेही हे घडतं. त्यांच्यावर लाजीरवाणी वेळ ओढावेल याची त्यांना भीती असते, वास्तवाच्या कचाट्यात आल्यावर आपल्या प्रिय सिद्धान्ताला बाधा पोचेल याची त्यांना भीती असते, म्हणून हे घडतं. पण आम्हाला अशी भीती नाही. आमच्या लेखी सिद्धान्तांबाबत किंवा प्रमेयांबाबत काहीच पवित्र किंवा दैवी नसतं. आमच्या दृष्टीने सिद्धान्त म्हणजे केवळ साधन.

एवढं सगळं असूनही माझी कोणतीही विनंती इल्यिचने अव्हेरली नाही. प्रत्येक वेळी विनंतीची पूर्तता व्हायचीच असं नाही, पण यात त्याचा दोष नसायचा, तर ढिसाळ रशियन राज्ययंत्रणेचा हा दोष होता. शिवाय, काही लोकांचं प्रबोधन करण्याबाबत किंवा मूल्यवान लोकांचे जीव वाचवण्याबाबत मत्सरी अनुत्सुकतेचाही भाग यात असावा. त्याचप्रमाणे जाणीवपूर्वक इजा पोचवण्यात आल्याचीही काही प्रकरणं होती- हा शत्रू जितका कावेबाज होता, तितकाच दोषैकदृष्टीचा होता. सूड व द्वेष ही स्थितिशीलतेची लक्षणं आहेत. या व्यतिरिक्त रोगट मनाच्या काही क्षुद्र व्यक्तीही होत्या. शेजाऱ्यांच्या वेदनेत आनंद शोधणारी विकृत मानसिकता असणाऱ्या या व्यक्ती होत्या.

एकदा लेनिनने हसत मला एक तार दाखवली. त्यांनी मला पुन्हा अटक केली आहे. मला सोडून द्यायची सूचना त्यांना करावी. त्याखाली इवान व्हॉल्नी याची सही होती.

मी त्याचं पुस्तक वाचलंय. मला ते खूप आवडलं. पहिले पाच शब्द वाचल्यावरच मला जाणवलं की, या माणसाला चुकांची अपरिहार्यता कळली आहे, तो व्यक्तीशः दुखावला गेला, तरी संतापत नाही किंवा चिडत नाही. ही आता बहुधा तिसऱ्यांदा त्याला अटक झालेय. त्याने गाव सोडून जावं, असाच सल्ला त्याला द्यावा, अन्यथा पुढच्या वेळी ते त्याला मारून टाकतील. त्यांना तो फारसा रुचलेला नाही, हे तर स्पष्टच आहे. तर, त्याला हा सल्ला देऊ. तार करून.

अनेकदा लेनिन त्याचे शत्रू मानल्या गेलेल्या लोकांच्या मदतीसाठीही तत्पर असे, केवळ मदतीसाठी तयार असायचा एवढंच नव्हे, तर त्यांच्या भवितव्याविषयीही त्याला काळजी वाटायची, हे मी अनुभवलेलं आहे. उदाहरणार्थ, एकदा एका सेनापती रसायनशास्त्रज्ञाला जीवेमारलं जाण्याचा धोका निर्माण झाला. मी त्या संदर्भात जे काही सांगितलं ते काळजीपूर्वक ऐकून घेऊन लेनिन म्हणाला: ह्‌, ह्म्‌. म्हणजे त्याच्या मुलांनी त्याच्या प्रयोगशाळेत शस्त्रं लपवून ठेवली होती, हे त्याला माहीत नव्हतं, असं तुला वाटतं का? हे तसं शक्य वाटत नाही. पण त्याचा उलगडा दझेरझिन्स्कीलाच करू दे. अशा बाबतीत सत्य शोधण्यात तो वाकबगार आहे.

काही दिवसांनी त्याने मला पेट्रोग्राडमध्ये दूरध्वनीवरून सांगितलं, तुझ्या त्या सेनापतीला आम्ही सोडतोय- बहुधा आधीच त्याला मुक्त केलं असावं. त्याला नक्की काय करायचंय?

होमोइमल्शन.

हां, हां- कार्बोलिक ॲसिड. बरं, खवळू दे त्याचं पित्त. त्याला काही गरज पडली, तर मला सांग.

एका माणसाचा जीव वाचवल्याबद्दल वाटणारा आनंद लेनिनला दाखवायचा नव्हता, त्यामुळे तो उपहासाने बोलत होता. नंतर अनेक दिवसांनी त्याने मला पुन्हा विचारलं: बरं, तो सेनापती कसा आहे? सगळ्याची तजवीज झाली का?

1919 साली पेट्रोग्राडच्या खानावळींमध्ये एक सुंदर स्त्री आली आणि तिने कळकळीने मागणी केली, माझ्या कुत्र्यांसाठी मला एक हाड द्याल का! मी राजकन्या क्ष आहे.

तर, अवनती आणि भूक सहन न होऊन शेवटी तिने नेव्हा नदीत झोकून उडी मारण्याचं ठरवलं, पण तिच्या या दुःखी निर्णयाचा अंतःप्रेरणेने अंदाज आलेल्या तिच्या चार कुत्र्यांनी तिचा पाठलाग केला आणि आरोळ्या ठोकून नि स्वतःचा क्लेश व्यक्त करून तिला आत्महत्येपासून परावृत्त केलं, असं सांगितलं जातं. ही कहाणी मी लेनिनला ऐकवली. तेव्हा त्याने मला न्याहाळलं, डोळे थोडे मिचकावत मग पूर्ण बंद केले, आणि खिन्नपणे म्हणाला, हे सगळं रचलेलं असेल, तरी संकल्पना वाईट नाहीये. क्रांतीसंबंधीचा विनोद ठरेल असं आहे.

तो शांत राहिला. मग उभा राहून टेबलावरच्या कागदपत्रांची आवराआवर केली नि विचारी मुद्रेने म्हणाला: त्या लोकांसमोरच्या अडचणी प्रचंड वाढल्यात, हे खरंच आहे. इतिहास क्रूर सावत्र आईसारखा असतो, त्याचा प्रतिहल्ला सुरू होता तेव्हा तो थोपवणं शक्य नसतं. याहून अधिक काय बोलणार? त्या लोकांची स्थिती वाईट आहे. त्यांच्यातल्या हुशार लोकांना अर्थातच लक्षात येईल की, त्यांची मुळंच उचकटली जात आहेत आणि ती पुन्हा कधीही वाढणार नाहीत. युरोपात जाऊन रुजवण करणं हुशार लोकांना मानवणार नाही. त्यांना तिथे मूळ धरता येणार नाही, असं तुलाही वाटत नाही का?

तिथे त्यांना रुजता येईल, अलं मला वाटत नाही.

म्हणजे एक तर ते आपल्या सोबत येतील किंवा पुन्हा हस्तक्षेप करायचा प्रयत्न करतील.

मी त्याला विचारलं: हे फक्त मलाच वाटतंय की, तुला खरंच लोकांची दया येते?

तो म्हणाला: हुशार लोकांच्या बाबतीत जे काही घडतंय त्याबद्दल मला खेद वाटतो. आपल्याकडे हुशार लोक पुरेसे नाहीत. आपण तसे बहुतांशाने गुणवान लोक असलो, तरी मानसिक पातळीवर आळशी आहोत. अनेक कॉम्रेड त्यांच्या वर्गीय मानसिकतेपलीकडे जात बोल्शेव्हिकांसोबत काम करत होते, त्यांची आठवण काढताना लेनिनचा सूर आश्चर्यकारक ममत्वाचा होता.

लेनिनचे गुण

विलक्षण मनोबळ लाभलेल्या लेनिनकडे क्रांतिकारी बुद्धिजीवी वर्गाची उत्तमोत्तम गुणवैशिष्ट्‌यं होती. त्याची स्वयंशिस्त अनेकदा स्वतःला त्रास करून घेणारी व स्वतःला इजा पोचवणारी होती. या शिस्तेने टोक गाठल्यावर त्यातून कलेचा त्याग केला जायचा आणि ए. आंद्रेयेव यांनी रेखाटलेल्या एका नायकासारखा युक्तिवाद सुरू व्हायचा: इतर लोक खडतर आयुष्य जगत आहेत, त्यामुळे मीसुद्धा खडतर आयुष्य जगायला हवं.

1919 साली दुष्काळ पडला असताना सहकाऱ्यांनी, सैनिकांनी आणि गावांकडच्या शेतकऱ्यांनी पाठवलेलं अन्न खायला लेनिनला शरम वाटत असे. त्याच्या उदास फ्लॅटमध्ये पार्सलं आल्यानंतर तो चिडायचा आणि त्याला शरमल्यासारखं व्हायचं. पार्सलांमधून आलेलं पीठ, साखर व लोणी तो तातडीने आजारी कॉम्रेडांना किंवा अन्नाअभावी कमजोर झालेल्यांना देऊन टाकत असे.

एकदा त्याने मला जेवायला बोलावलं होतं, तेव्हा तो म्हणाला: तुला थोडे भाजलेले मासे देतो- आस्त्राखानवरून ते माझ्याकडे आलेत. आणि त्याच्या सॉक्रेटिससदृश भालप्रदेशावर आठ्या उमटल्या. स्वतःची तीक्ष्ण नजर माझ्यावरून दूर नेऊन तो म्हणाला: मी कोणीतरी उमराव असल्याप्रमाणे लोक हे माझ्याकडे पाठवतात! मी त्यांना कसं रोखू शकतो? आपण स्वीकारायला नकार दिला, तर ते दुखावतात. आणि माझ्या आसपासचा प्रत्येक जण भुकेला आहे.

लेनिनला व्यक्तीशः कोणतंही व्यसन नव्हतं, तंबाखू किंवा वाइन यांच्याशी त्याचा संबंधही आलेला नव्हता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो गुंतागुंतीच्या व अवघड कामामध्ये गुंतलेला असायचा, त्यामुळे स्वतःकडे पाहायचा विचारही त्याला शिवत नसे. पण साथीदारांच्या आरोग्यावर त्याचं जागरूक लक्ष असायचं.

पुस्तकांच्या खोलीत टेबलापाशी बसून तो वेगाने बोलायचा किंवा कागदावर टेकवलेलं पेन न उचलता लिहीत असायचा: गुड मॉर्निंग. कसा आहेस? माझं आत्ताच आटपलं. गावात एका कॉम्रेडला एकटं वाटतंय- तो अगदीच थकलाय. त्याला उल्हसित करण्याची गरज आहे. मानसिक अवस्था ही काही कमी महत्त्वाची गोष्ट नव्हे!

एकदा मी त्याला मॉस्कोत जाऊन भेटलो. तेव्हा त्याने विचारलं, तू जेवलायंस का?

होय.

खोटं बोलत नाहीयेस ना?

साक्षीदार आहेत ना. मी क्रेमलिन खानावळीत जेवलो.

तिथे जेवण चांगलं नसतं, असं मी ऐकलंय.

वाईट नसतं, पण आहे त्याहून चांगलं करता येऊ शकतं.

त्याने तत्काळ तपशील विचारला. चांगलं का नसतं? त्यांना काय सुधारणा करता येईल? तो संतप्त होऊन पुटपुटायला लागला: एखाद्या कुशल आचाऱ्याला का बोलावत नाहीत ते? लोक अक्षरशः शुद्ध हरपेपर्यंत काम करत आहेत, त्यांना आणखी खावं वाटावं, यासाठी चांगलं अन्न मिळायलाच हवं. मुळातच अन्न अत्यल्प मिळतंय आणि त्यातही खराब झालेलं असतं; त्यांना तिथे एक चांगला आचारी मिळायला हवा. खाणं आणि पचन या प्रक्रियांमध्ये मसाल्यांचं महत्त्व किती असतं, याबद्दल त्याने एका आरोग्यतज्ज्ञाचं मत उर्द्धृत केलं. तुला या गोष्टींबद्दल विचार करायला वेळ कसा मिळतो? मी विचारलं. त्यावर त्याने मलाच प्रतिप्रश्न केला, योग्य आहाराविषयी विचार करायला? त्याच्या सुरावरून मला कळलं की, माझा प्रश्नच अस्थानी होता.

पी. ए. स्कोरोखोदोव्ह हा माझा एक जुना परिचित. सोर्मोव्हमध्येच काम करणारा स्कोरोखोदोव्ह अतिशय मृदू हृदयी व्यक्तिमत्वाचा माणूस होता. ट्‌चेकामधील17 काम खूप त्रासदायक असतं, अशी तक्रार त्याने एकदा केली. मी त्याला म्हटलं, ते काम तुझ्यासाठी योग्य नाहीये, असं मला वाटतं. तुला काही ते हितकारक नाही. त्याने व्यथित होऊन सहमती दर्शवली, होय, अगदीच तापदायक आहे. पण थोडा विचार करून तो म्हणाला, पण, तुला तर माहीतच असेल, इल्यिचलासुद्धा स्वतःच्या भावना दडपाव्या लागतात. तर, मला स्वतःच्या दुबळेपणाची लाज वाटते.

आपण वाहून घेतलेल्या ध्येयाची प्राप्ती व्हावी यासाठी स्वतःमधल्या सेंद्रीय ‘सामाजिक आदर्शवादा’वर मात करण्याकरिता अडचणींना सामोरं जाणारे, स्वतःच्या भावना दडपणारे अनेक कामगार मला माहीत होते आणि अजूनही माहीत आहेत. लेनिनलाही स्वतःच्या भावना दडपाव्या लागल्या का? स्वतःविषयी इतरांशी बोलावं इतकं लक्षच मुळात तो स्वतःकडे देत नसे. इतर कुणाहीपेक्षा त्याला अंतरात्म्याच्या त्रस्ततेविषयी मौन राखणं अधिक साध्य झालेलं होतं.

पण एकदा गोर्कीमध्ये काही मुलांना मायेने थोपटताना तो म्हणाला, आपल्यापेक्षा यांचं जगणं आनंदी असेल. आपल्यासारख्या जीवनानुभवांना तोंड द्यायची वेळ त्यांच्यावर येणार नाही. त्यांच्या आयुष्यात इतकं क्रौर्य नसेल.

मग दूर अंतरावर, गावाला कवेत घेऊन बसलेल्या टेकड्यांकडे पाहत तो खिन्नपणे म्हणाला: तरीही मला त्यांचा हेवा वाटत नाही. आपल्या पिढीने इतिहासातील विलक्षण अर्थपूर्ण गोष्ट साध्य केली आहे. आपल्या जीवनावस्थेमुळे क्रौर्य आवश्यक ठरलं, त्यामुळे ते समजून घेतलं जाईल आणि त्याबाबत न्यायही होईल. प्रत्येकच गोष्ट समजून घेतली जाईल. तो काळजीपूर्वक, सौम्यपणे मुलांना थोपटत होता.

एकदा मी त्याला भेटायला गेलो, तेव्हा टेबलवर वॉर अँड पीसची प्रत होती.

होय. टॉलस्टॉय. शिकारीचा प्रसंग मला वाचायचा होता, पण एका कॉम्रेडला पत्र लिहायचंय हे नेमकं त्याच वेळी आठवलं. तर, वाचायला अजिबातच वेळ मिळत नाही. गेल्या रात्री टॉलस्टॉयवरचं तुझं पुस्तक मात्र मी वाचलं.

हसत आणि डोळे मिचकावत तो आरामखुर्चीत निवांत रेलला, आवाजाचा सूर खालच्या पट्टीत नेत म्हणाला, काय प्रचंड आहे ना? जबरदस्त ताकदीचा मेंदू असेल! सर, कसा हा कलावंत आहे पाहा. किती विस्मयकारक गोष्ट आहे! हा काउन्ट टॉलस्टॉय प्रकाशात येईपर्यंत वाङ्‌मयात अस्सल प्रतिभा आपल्याला सापडतच नाही.

मग पुन्हा डोळे मिचकावत माझ्याकडे पाहून त्याने विचारलं, युरोपात त्याच्याव्यतिरिक्त नाव घेण्यासारखं कोण आहे? उत्तर त्याने स्वतःच दिलं, कोणीच नाही. आणि हात एकमेकांवर चोळत तो समाधानाने हसला.

रशियन वाङ्‌मयाविषयी त्याला अभिमान वाटायचा, हे मी बरेचदा अनुभवलेलं आहे. काही वेळा लेनिनच्या स्वभावावृत्तीपेक्षा हे त्याचं वैशिष्ट्‌य अगदीच विसंगत आहे, किंबहुना भाबडं आहे, असं मला वाटायचं. पण स्वतःच्या पितृभूमीविषयी त्याच्या मनात खोलवर रुजलेल्या उत्साही प्रेमाचेच प्रतिध्वनी म्हणून त्याच्या या मतांकडे पाहायला मी शिकलो. केप्रीमध्ये शार्क माशांनी गुंता केलेली व फाडलेली जाळी मच्छिमार कसे सोडवतात, हे पाहत असताना लेनिनने एक निरीक्षण नोंदवलं होतं: आपली माणसं काम अधिक चपळाईने करतात. त्याच्या या टिप्पणीवर मी थोडी साशंकता व्यक्त केल्यावर तो किंचितशा चिडचिड्या सुरात म्हणाला, ह्‌, ह्म्‌. या बेटावर राहून राहून तू रशियाला विसरतोयंस, असं नाही वाटत का तुला?

व्ही. ए. द्येस्नित्स्की-स्ट्रोयेव्हने एकदा मला लेनिनविषयीच एक किस्सा सांगितला होता. एकदा तो लेनिनसोबत ट्रेनमधून स्वीडनमार्गे जात होता, आणि ड्यूररविषयीचं एक जर्मन पुस्तक चाळत होता. त्याच डब्यात बसलेल्या काही जर्मनांनी पुस्तकाविषयी त्याच्याकडे चौकशी केली. या लोकांनी महान कलाकार असलेल्या ड्यूररचं नावही ऐकलेलं नव्हतं, हे नंतर स्पष्ट झालं. याने लेनिनमधला उत्साह जागा झाला, आणि त्याने दोनदा द्येस्नित्स्कीला अभिमानाने सांगितलं: ते स्वतःच्या कलावंतांना ओळखत नाहीत, पण आपण ओळखतो.

एकदा संध्याकाळी मॉस्कोतील ई. पी. प्येस्को-व्स्कायाच्या फ्लॅटमध्ये इसाया डोब्रोवेईन वाजवत असलेली बीथोव्हेनची एक सुरावट लेनिन ऐकत होता. तेव्हा तो म्हणाला, अपासिओनाटापेक्षा महान काही माझ्या माहितीत नाही; ही सुरावट मला दररोज ऐकायला आवडेल. अलौकिक संगीत आहे हे. माणसं किती विलक्षण गोष्टी करू शकतात, याचा विचार केल्यावर मला फार अभिमान वाटतो- कदाचित हा माझा भाबडेपणाही असेल!

मग डोळे मिचकावत नि हसत तो थोड्या खिन्न सुरात म्हणाला, पण मी जास्त वेळा संगीत ऐकू शकत नाही. त्याने आपल्या मनावर परिणाम होतो, काहीतरी मूर्खासारखं चांगलंचुंगलं बोलायची इच्छा होती, आणि इतक्या भीषण नरकामध्ये राहत असताना असं सौंदर्य निर्माण करणाऱ्या लोकांच्या डोक्यांवर तडाखा हाणावा असं वाटू लागतं. पण आत्ता कोणाच्या डोक्यात तडाखा हाणायचा नाहीये- नाहीतर आपल्या हाताला चावे बसतील. कोणाच्याही विरोधात बळ वापरायचं नाही असं आपलं आदर्श तत्त्वं आहे, पण दयामाया न दाखवता त्यांच्या डोक्यावर तडाखा हाणायला हवा. ह्‌, ह्‌, आपलं कर्तव्यं अमानुष वाटावं इतकं अवघड आहे!

शेवटी तोही अगदी थकून आजारी पडायच्या बेतात होता, तेव्हा 9 ऑगस्ट 1921 रोजी त्याने मला पाठवलेल्या पत्रात लिहिलं होतं:

ए.एम.!

तुझं पत्र मी पुढे एल. बी. कामेनेव्हकडे पाठवलं. मी इतका थकलोय की अगदी बारकंसंही काम माझ्याच्याने होत नाहीये. आणि अरे, तू रक्त ओकतोयंस, तरी बाहेर का जात नाहीयेस? हे अगदी लांच्छनास्पद, अविचारी होईल. युरोपात एखाद्या आरोग्यभवनात आपली तब्येत सुधारून काहीतरी काम करण्याइतकी तरी ताकद येऊ शकते. खरंच. पण इथे धड तब्येतही सुधारत नाही, किंवा दुसरंही काही करता येत नाही. निव्वळ चिंता, सतत चिंता करत बसण्याशिवाय दुसरं काहीच इथे हाती राहात नाही. जा तिकडे, तब्येत सांभाळा. उगीच हट्टीपणा नको, विनवून सांगतोय मी!

तुझा,

लेनिन.

आश्चर्यकारक चिकाटीने त्याने वर्षभर मला रशिया सोडून जाण्याचा आग्रह केला. तो स्वतः कामात इतका बुडालेला होता, तरीही कुठेतरी विश्रांतीची गरज असलेला एक आजारी माणूस आहे, हे त्याने लक्षात ठेवावं, याचा मला अचंबा वाटला. अशा प्रकारची पत्रं त्याने बहुधा विविध लोकांना लिहिली होती.

साथींविषयीची वृत्ती

आपल्या साथींविषयीची / कॉम्रेडांविषयीची त्याची वृत्ती किती अपवादात्मक होती, त्यांच्याकडे तो किती लक्ष द्यायचा, त्यांच्या जगण्यातील लहानसहान तपशिलांबाबतही काळजी कशी घ्यायचा, याबद्दल मी आधी बोललो आहे. एखाद्या प्रामाणिक व कुशल कामगाराबाबत चलाख मालक काही वेळा दाखवतो तशी स्वहितदक्ष काळजी दाखवण्याची लेनिनची पद्धत नव्हती. त्याच्या वागण्यात मला कधी असा पवित्रा आढळला नाही. प्रामाणिक साथींचं हित व्हावं, ही त्याची मनापासूनची इच्छा होती. समपातळीवरील व्यक्तींमध्ये आढळतं तसं हे ममत्व होतं. त्याच्या पक्षातील अगदी महत्तम लोकांनाही लेनिनसम मानणं अशक्य आहे, हे मी जाणतो, पण त्याला स्वतःला काही ते लक्षात आलं नव्हतं किंवा बहुधा त्याला तसं जाणवून घ्यायचं नसावं. काही वेळा तो लोकांशी कठोरपणे वागायचा, युक्तिवाद करताना निष्ठूरपणे त्यांची टिंगल करायचा, अगदी छद्मी म्हणावं असं हसायचासुद्धा. हे तो करायचाच. पण कोणावर त्याने टीका केली किंवा वाक्ताडन केलं, तरी नंतर त्या लोकांविषयी निर्वाळा द्यायची वेळ आल्यावर त्याच लोकांमधील गुण आणि नैतिक निर्धाराचं त्याला खरोखरचं आश्चर्य वाटायचं. 1918 ते 1921 या उबगवाण्या काळात त्यांनी दुर्दम्य श्रम केले, सर्व देशांचे व पक्षांचे सभोवती वावरत असताना काम केलं, युद्धाने जर्जर झालेल्या देशाच्या शरीरावरील जखमा कधी चिघळायचा आणि कुठकुठली कटकारस्थानं बाहेर यायची, त्याही परिस्थितीत या लोकांनी कार्य सुरू ठेवलं, याबद्दल त्याला वाटणारा विस्मय स्पष्टपणे कळायचा.

त्यांनी अविश्रांतपणे काम केलं, मिळेल ते आणि तेवढंच खाल्लं, सतत सतर्क राहून ते जगले. पण व्यक्तीशः लेनिनला या परिस्थितीमधलं काठीण्य बहुधा जाणवतही नसायचं- यादवी संघर्षाच्या खुनशी वावटळीने पायाच डळमळीत झालेल्या समाजातील अनपेक्षित धोके त्याला तितके अवघड वाटत नसावेत. एकदाच कधीतरी त्याने तक्रारसदृश उद्गार काढल्याचं आठवतं. एम. एफ. आंद्रेयेवासोबत तो त्याच्या खोलीत बोलत होता, तेव्हाची गोष्ट.

तो म्हणाला, एम. एफ, मी आणखी काय करू शकतो? आता लढण्याव्यतिरिक्त दुसरा काही पर्याय आमच्या समोर नाहीये. हे आम्हाला अवघड वाटतं का? अर्थातच! मला हे अवघड जात नसेल, असं वाटतं का तुला? नाही, हे अवघडच आहे, खूप अवघड आहे. दझेरझिन्स्कीकडे पाहा. तो आता काहीच नसल्यासारखा वाटायला लागलाय. यात काही करता येण्यासारखं नाही. अपयशी होण्यापेक्षा सहन करणं चांगलं.

माझ्या समोर त्याने एकदाच खेद व्यक्त केला होता: मारटोव्ह आपल्या सोबत नाही, याचं मला अतिशय वाईट वाटतं. किती तेजस्वी कॉम्रेड होता तो, अत्यंत प्रामाणिक माणूस होता!

रशियात फक्त दोनच साम्यवादी आहेत- लेनिन आणि कॉलोन्ताय, असा शेरा मारटोव्हने मारला होता, तो वाचताना लेनिन बराच वेळ मनापासून हसत राहिल्याचं मला अजूनही आठवतं. हसून सुस्कारा सोडत तो म्हणाला, किती हुशार बाई होती ती कॉलोन्ताय!

एकदा एका प्रशासकीय अधिकाऱ्याला स्वतःच्या खोलीतून बाहेर काढल्यावर लेनिन खरोखरच्या आदरापोटी नि आश्चर्याने म्हणाला, तू त्याला आधीपासून ओळखतोयंस का? युरोपातल्या एखाद्या देशात तो मंत्रिमंडळाचा प्रमुख झाला असता. मग स्वतःचे हात एकमेकांवर चोळत हसत तो म्हणाला, आपल्या तुलनेत युरोपात उपजत बुद्धी कमीच आहे.

विमानांच्या दिशेने डागण्यात आलेल्या तोफगोळ्यांचं समायोजन करण्यासाठी एका ज्येष्ठ बोल्शेव्हिक माणसाने (तो स्वतः पूर्वी रणगाड्यांच्या पथकात काम करत होता) तयार केलेलं एक उपकरण पाहण्यासाठी मुख्य रणगाडा विभागाकडे एकत्र जाऊया, असं मी लेनिनला एकदा सुचवलं. त्यातलं मला कुठे काय कळतं? तो म्हणाला, पण तरीही माझ्यासोबत आला.

एका अंधाऱ्या खोलीत टेबलावर ते उपकरण ठेवलेलं होतं. त्याभोवती सात सेनाधिकारी होते; आणि आठ्या घातलेल्या चेहऱ्यांचे, करड्या केसांचे, अचंबित झालेले वृद्ध वैज्ञानिक होते. या सगळ्या साध्या नागरी पोशाखातल्या लेनिनचं व्यक्तिमत्व झाकोळून गेलं.

संबंधित शोधक माणसाने उपकरणाच्या बांधकामाविषयी सांगायला सुरुवात केली. लेनिनने दोन ते तीन मिनिटं त्याचं ऐकून घेतलं आणि सहमती दर्शवत ‘ह्‌, ह्म्‌’ असा उद्गार काढला. त्यानंतर लेनिनने त्या माणसाला प्रश्न विचारायला सुरुवात केली. एखादा राजकीय विषय असावा तितक्या सहजतेने ही प्रश्नांची सरबत्ती सुरू होती.

नजर ठेवत असताना, एकाच वेळी दोन गोष्टी करणं या यंत्राला कसं शक्य होतं? बॅरल चढवणं आणि यंत्रणेविषयीच्या सूचना यांच्यात आपोआप सांधा जोडणं अशक्य असेल का? धोकादायक कक्षा कुठपर्यंत विस्तारेल आणि इतर काही गोष्टीही त्याने विचारून घेतल्या. त्या संशोधकाने आणि सेनाधिकाऱ्यांनी उत्साहाने स्पष्टीकरणं दिली, आणि दुसऱ्या दिवशी तो संशोधक मला म्हणाला:

तू एका कॉम्रेडसोबत येतोयंस, एवढंच मी सेनाधिकाऱ्यांना सांगितलं होतं, पण तो कॉम्रेड कोण असणार आहे, ते मी बोललो नव्हतो. त्यांनी इल्यिचला ओळखलं नाही आणि तो काही गाजावाजा न करता किंवा अंगरक्षकाशिवायच असा येईल याची कल्पनाही बहुधा त्यांनी केली नसावी. त्यांनी माझ्याकडे विचारणा केली, ‘तो तांत्रिक अभियंता किंवा प्राध्यापक आहे का? काय? लेनिन? काय सांगता! कसं शक्य आहे? आपल्याशी संबंधित या गोष्टींविषयी त्याला एवढं कसं माहिती? त्याने तर तंत्रज्ञानतज्ज्ञासारखे प्रश्न विचारले’. कमाल आहे!

तो लेनिनच होता, यावर त्यांचा खरंच विश्वास बसला नव्हता. रणगाडा विभागातून परत येत असताना लेनिन गालातल्या गालात हसत होता आणि त्या संशोधकाविषयीही तो बोलला.

माणसांविषयी आपले किती सहज गैरसमज होतात बघ! तो एक प्रामाणिक कॉम्रेड आहे, एवढं मला माहीत होतं, पण त्याने काही साध्या पावडरचाही शोध लावला असेल, असं मला वाटलं नव्हतं. पण तो तर खराच संशोधक निघाला. चांगला गडी आहे! त्या उपकरणाच्या व्यावहारिकतेविषयी मी शंका उपस्थित केल्यावर सेनाधिकारी कसे धास्तावलेले! मी हेतूपूर्वकच ते केलं होतं. त्या कल्पक वस्तूविषयी त्यांचं मत काय आहे, ते मला जाणून घ्यायचं होतं.

तो गदगदून हसत म्हणाला: बरं, मला सांग, त्याच्या नावावर आणखी काही संशोधन आहे का? त्याने खरं म्हणजे दुसरं काही करायलाच नको. या सगळ्या तांत्रिक अभियंत्यांना काम करण्यासाठी आदर्श परिस्थिती आपण निर्माण करू शकलो, तर किती बरं होईल! तसं झालं, तर येत्या पंचवीस वर्षांमध्ये रशिया जगातील सर्वांत प्रगत देश ठरेल.

त्याने लोकांची- व्यक्तीशः त्याला सहानुभूती न वाटणाऱ्या लोकांचीही-  स्तुती केल्याचं माझ्या पाहण्यात अनेकदा आलं होतं. त्यांच्य ऊर्जेला दाद कशी द्यायची, हे लेनिनला माहीत होतं. लिआँ ट्रॉट्‌स्कीच्या संघटनकौशल्याची तो प्रशंसा करत असल्याचं पाहून मला अतिशय आश्चर्य वाटलं होतं. मी आश्चर्यचकित झाल्याचं खुद्द लेनिनच्याही लक्षात आलं.

त्याच्याविषयीच्या ट्रॉट्‌स्कीविषयीच्या माझ्या मतांविषयी बऱ्याच अफवा पसरल्या आहेत, हे मला माहितेय. पण जे आहे ते आहे, आणि नाहीये ते नाहीये. कोणत्याही परिस्थितीत सैनिकी तज्ज्ञांना संघटित करण्याची क्षमता त्याच्यात होती.

थोडा विराम घेऊन खालच्या सुरात, काहीशा खिन्नपणे तो म्हणाला, आणि तरीही तो आपल्यापैकी नाही. तो आपल्यात आहे, पण आपल्यातला नाहीये. तो महत्त्वाकांक्षी आहे. त्याच्यात थोडा लासेलचा अंश आहे. हे काही चांगलं नाही.

आमच्यासोबतचा, पण आमच्यातला नसलेला, हे शब्द त्याने माझ्या समोर दोनदा वापरले होते. व्लादिमीर इल्यिच लेनिननंतर लगेचच मरण पावलेल्या दुसऱ्या एका महत्त्वाच्या व्यक्तीबाबत त्याने हे उद्गार काढले होते.

व्लादिमीर इल्यिच लोकांना चांगलं ओळखायचा, हे तसं स्वाभाविकच होतं. एकदा मी त्याच्या स्टडीमध्ये गेलो, तेव्हा दाराकडे पाठ करून एक माणूस लेनिनसमोर मान तुकवत होता आणि लेनिन नजर वर न करता लेखनात गुंतला होता.

तू त्याला ओळखतोस का?, लेनिनने दाराकडे बोट दाखवून विचारलं.

‘वैश्विक वाङ्‌मया’संदर्भात दोनदा माझा त्याच्याशी संपर्क आला होता, असं मी सांगितलं.

मग?

अगदी निष्काळजी, असंस्कृत माणूस आहे.

ह्‌, ह्‌, खास खुशामती करणारा आणि बहुधा बदमाश इसम आहे हा. पण मी त्याला आज पहिल्यांदाच भेटलो, त्यामुळे माझा गैरसमज झालेला असू शकतो.

लेनिनचा गैरसमज झालेला नव्हता. काहीच महिन्यांनी या इसमाने लेनिनचं मत पूर्णतः खरं ठरवलं.

लोकांविषयी लेनिन खूप विचार करायचा, कारण, त्याच्याच म्हणण्याप्रमाणे, आपली यंत्रणा अतिशय अस्थिर आहे. ऑक्टोबरपासून अनेक घटकांनी तोंड वर काढलं आहे. याचा दोष तुमच्या पवित्र आणि प्रिय बुद्धिजीवी वर्गाकडे जातो- त्यांच्या नीच घातापाताचा हा परिणाम आहे.

आम्ही गोर्कीमध्ये फेरफटका मारत असताना तो हे म्हणाला. दरम्यान, मी अलेक्सिन्स्कीविषयी बोलायला लागलो. बहुधा त्या वेळी अलेक्सिन्स्कीची काही घृणास्पद कारस्थानं सुरू असावीत, म्हणून हा विषय बोलण्यात आला.

हे चित्र आपल्यालाही स्पष्टपणे दिसतं. आमची पहिल्यांदा भेट झाली, तेव्हा त्याच्याविषयी मला शारीरिक किळस वाटली होती. त्या भावनेवर मला मात करता आली नाही. इतर कोणाच्याही बाबतीत कधीच माझ्या मनात अशी भावना उमटलेली नाही. आम्हाला काही काम एकत्र करावं लागलं. खूप अवघडल्यासारखं झालेलं - स्वतःवर ताबा ठेवण्यासाठी मला सर्वतोपरी प्रयत्न करावा लागला. या अधःपतित माणसासोबत आपण काही संपर्कच ठेवू शकत नाही, असं मला वाटत होतं

तेव्हा अचंबा दाखवत स्वत:चे खांदे उडवत लेनिन म्हणाला: पण मला त्या बदमाश मॅलिनोव्स्कीचा कधी थांग लागला नाही. अगदी गूढ व्यक्तिमत्व होतं.

माझ्यासाठी तो एक कडक शिक्षक आणि समर्पित भावना असलेला मित्र होता.

तूही एक अनाकलनीय माणूस आहे, तो विनोदाने म्हणाला. साहित्यात तर तू चांगला वास्तववादी दिसतोस- आणि लोकांसोबतच्या वागण्यात स्वच्छंदतावादी रोमॅन्टिक असतोस. तुझ्या लेखी सगळेच लोक इतिहासाचे बळी असतात का? आम्ही इतिहास जाणतो, आणि पीडितांना आम्ही सांगतो, ती पवित्र आसनं उलथून टाका! मंदिरं मोडून काढा! देवांना खाली खेचा! आणि कष्टकरी वर्गाच्या बंडखोर पक्षाने आधी बुद्धिजीवींना आश्वस्त करावं, असं तू मला पटवून देऊ पाहतोयस.

कदाचित माझा गैरसमज झाला असेल, पण व्लादिमीर इल्यिच लेनिनला माझ्याशी बोलायला आवडायचं. ये, भेटून जा- फोन कर, भेटू आपण, असं तो जवळपास कायमच म्हणायचा.

एकदा तो म्हणाला: तुझ्याशी बोलणं रोचक वाटतं. तुझे अनुभव विभिन्न आणि व्यापक आहेत. बुद्धिजीवींच्या वृत्तीविषयी तो विचारणा करायचा, विशेषतः वैज्ञानिकांमध्ये त्याला खास रस होता. त्या वेळी ‘वैज्ञानिकांची अवस्था सुधारण्यासाठीच्या समिती’वर मी एन. बी. खालातोव्हसोबत काम करत होतो.

श्रमिकांचं साहित्य

श्रमिकांच्या वाङ्‌मयात त्याला रस होता. यातून काय निष्पन्न होईल, असं तुला वाटतं?

माझी अपेक्षा बरीच आहे, पण लितवूझ (साहित्याभ्यास करणारी संस्था) स्थापन करणं आवश्यक आहे. भाषारचनाशास्त्र, परकीय भाषा- पाश्चात्त्य व पौरात्त्य, लोककथा, वैश्विक वाङ्‌मयाचा इतिहास आणि रशियन वाङ्‌मयाचा इतिहास, यांचा तिथे अभ्यास व्हावा.

ह्‌, ह्‌, डोळे मिटून मंद हसत तो म्हणाला. हे अगदीच अवाढव्य आणि डोळे दिपावणारं आहे! अवाढव्य गोष्टींच्या मी विरोधात नाही, पण हे इतकं डोळे दिपावणारं असेल, तर? या विषयांसाठी आपल्याकडे स्वतःचे प्राध्यापक नाहीत, आणि बूर्झ्वा प्राध्यापक एका विशिष्ट प्रकारचाच इतिहास शिकवतील. नकोच, या गोष्टींची आपली तयारी झालेय, असं मला वाटत नाही. आणखी तीन ते चार वर्षं तरी आपल्याला वाट पाहावी लागेल.

मग तो तक्रार करत म्हणाला, वाचायला अजिबातच वेळ मिळत नाही! प्रचारतंत्रासाठी डेम्यान बेड्‌नीचं लेखन किती मूल्यवान आहे, यावर तो वारंवार भर देऊन बोलायचा, पण ते जरा कच्चं आहे. तो वाचकाच्या पाठोपाठ जातो. वास्तविक त्याने वाचकापेक्षा थोडंसं पुढे असायला हवं, असं तो म्हणाला.

मायकोव्स्कीवर त्याचा अविश्वास होता, किंबहुना मायकोव्स्कीमुळे त्याची चिडचिड व्हायची. तो ओरडतो, काहीतरी विपरित शब्द शोधून काढतो आणि शेवटी काहीच मांडत नाही, असं मला वाटतं. काहीतरी अनाकलनीय लिहितो. वाचायलाही ते अवघड असतं, आणि कशाचा कशाला थांग लागत नाही. तो गुणवान आहे का? खूप गुणवान आहे का? ह्‌, ह्म्‌. बघू. पण आजकाल लोक खूप कविता लिहितायंत, असं तुला वाटत नाही का? वर्तमानपत्रांमध्ये अख्खी पानं कवितांनी भरलेली असतात आणि दर दिवशी कवितांचे खंड बाहेर निघतात.

अशा काळात तरुणाई कवितेकडे आकर्षित होणं स्वाभाविक आहे, आणि माझ्या मते, चांगल्या गद्यापेक्षा सुमार काव्य लिहिणं सोपं असतं, असं मी म्हटलं. शिवाय, कविता लिहायला वेळ कमी लागतो. त्याचप्रमाणे काव्यलेखन कलेसाठी आपल्याकडे अनेक चांगले शिक्षक आहेत.

गद्यापेक्षा पद्य लिहिणं सोपं आहे, यावर माझा विश्वास नाही. मला ते अकल्पनीयच वाटतं. कोणी माझी कातडी जिवंतपणीच सोलली, तरीही मला कवितेच्या दोन ओळी लिहिता येणार नाहीत. मग तो संतापला. इथे आणि युरोपात असेल ते सर्व जुनं क्रांतिकारी साहित्य आपण जनतेपर्यंत पोचवायला हवं.

स्वतःच्या जन्मभूमीपासून दीर्घ काळ दूर राहावं लागलेला तो रशियन होता. त्यान दुरून या भूमीची तपासणी केली होती आणि दुरून ही भूमी अधिक देदिप्यमान व अधिक सुंदर दिसते. या भूमीच्या संभाव्य शक्ती आणि इथल्या लोकांची अपवादात्मक गुणवत्ता यांचा त्याने अचूक अंदाज बांधला. एकसुरी व दडपशाहीच्या इतिहासामुळे लोकांमधील ही शक्ती व गुणवत्ता फारशा अभिव्यक्त झालेल्या नाहीत आणि बहुतांशाने सुप्त आहेत. परंतु, रशियातील लक्षणीय जीवनाच्या नीरस पार्श्वभूमीवर त्यांचा सुवर्णताऱ्यांप्रमाणे सर्वत्र वावर आहे.

व्लादिमीर लेनिन हा मूलगामी अर्थाने या लौकिकातला माणूस होता, तो आता मरण पावला आहे. त्याला ओळखणाऱ्या लोकांच्या मनावर त्याच्या मृत्यूने गंभीर आघात झाला.

जगातील कष्टकरी वर्गाचा नेता म्हणून तो अतिशय महत्त्वाचा होता, हे जगाला अधिक ताकदीने सांगण्याचं काम मृत्यूच्या अंधःकाराने केलं.

तिरस्कार, खोटेपणा व निंदा यांचं सावट अधिक गडद असतं, तरीही त्याने फरक पडला नसता. या वेड्या विश्वातील गुदमरवून टाकणाऱ्या अंधारात लेनिनने वर उंचावलेली मशाल खाली आणणारी कोणतीही शक्ती नाही.

लेनिनचं यथायोग्य चिरंतन स्मरण होत राहील.

व्लादिमीर लेनिन मरण पावला आहे. पण त्याचे विचार व इच्छा यांचे वारसदार जिवंत आहेत. ते जिवंत आहेत आणि कार्यरत आहेत. मानवतेच्या इतिहासात कुठल्याच कार्याला मिळालं नाही इतकं यशही त्यांना मिळतं आहे.

(अनुवाद : अवधूत डोंगरे)

तळटिपा

1. इल्यिच हे लेनिनचं वडिलांकडून आलेलं नाव. त्याचे जवळचे मित्र आणि साथी त्याला या नावाने संबोधत असत.- इंग्रजी संपादक 2. रशियन सामाजिक-लोकशाहीवादी मजूर पक्षाची लंडनमध्ये 1907 साली झालेली परिषद. 

3. बोल्शेव्हिकांचं कायदेशीर प्रकाशनगृह. 4. ‘बबुश्का’ कॅथरीन ब्रेश्कोव्स्कायाला तिचे अनुयायी रशियन क्रांतीची ‘आजी’ असं संबोधत असत. युद्धकाळात ती सामाजिक-राष्ट्रभक्त होती, केरेन्स्कीला तिने पाठिंबा दिला होता आणि ऑक्टोबर क्रांतीनंतर ती सोव्हिएत संघाची विखारी शत्रू झाली. 5. गॉर्कीच्या अभियानाची माहिती पसरल्यावर त्याच्या विरोधात सामाजिक बहिष्काराची मोहीम राबवण्यात आली. बहुधा त्याच्या वैवाहिक संबंधांच्या संदर्भात हे घडवण्यात आलं. त्याला हॉटेल सोडावं लागलं आणि एका मित्राकडे त्याला आश्रय घ्यावा लागला. 6. मार्क्सवादात ‘सुधारणा’ करू पाहणाऱ्या सुधारणावादी बर्नस्टेनचे समर्थक. 7. 1900 ते 1903 या काळात लेनिनच्या नेतृत्वाखाली इस्क्रा हे रशियन समाजवादी-लोकशाही पक्षाचं आघाडीचं मुखपत्र होतं. नोव्हेंबर 1903मध्ये लेनिनने राजीनामा दिल्यानंतर 1905 पर्यंत मेन्शेविकांचं मुखपत्र म्हणून हे प्रकाशन सुरू राहिलं.  8. ऑस्ट्रियन पदार्थवैज्ञानिक अर्न्स्ट Ernst Mach यांच्या यांत्रिकतानिष्ठ सिद्धान्तांवर आधारित तात्विक आदर्शवादाचं नवीन रूप वापरून मार्क्सवाद मवाळ करण्याची एक प्रवृत्ती त्या काळात प्रचलित होती, तिला ‘मॅचिझम’ असं संबोधलं जात होतं. 9. एन. के. कृप्स्काया, लेनिनची पत्नी. 10. बूर्झ्वा-उदारमतवादी राज्यघटनानिष्ठ लोकशाहीवादी पक्षाचे सदस्य. 11. बडे भांडवलदार व जमीनदार यांचा पक्ष.

12. फेब्रुवारी क्रांतीचं स्वरूप आणि गरीब शेतकऱ्यांच्या साथीने कामगार बूर्झ्वा वर्गाकडून सत्ता खेचून घेत नाहीत तोपर्यंत क्रांती सुरू ठेवण्याचा बोल्शेव्हिक कार्यक्रम, यासंबंधीचं विश्लेषण. 13. मॉस्कोजवळचं एक गाव. अखेरच्या आजारपणाच्या काळात लेनिन विश्रांतीसाठी इथे गेला होता. तिथेच 21 जानेवारी 1924 रोजी त्याचा मृत्यू झाला. 14. एका कारखान्यात कामगारांना संबोधित करून लेनिन बाहेर पडत असताना त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न डोरा काप्लान या समाजवादी क्रांतिकारकाने केला होता. ही घटना 1918 साली घडली. 15. 1919. 16. सोव्हिएत सरकारचं अधिकृत मुखपत्र. 17. ‘प्रतिक्रांती व घातपात यांचा प्रतिकार करण्यासाठीचा असाधारण आयोग’ या विभागाचं लघुरूप; प्रतिक्रांतीचा पाडाव झाल्यानंतर या विभागाचं नामकरण ‘राज्य राजकीय प्रशासन’ असं करण्यात आलं.

चरित्रात्मक टिपा

अलेक्झिन्स्की, जी. ए. (जन्म 1879)- रशियन सामाजिक-लोकशाहीवादी पक्षात 1905 सालापासून सक्रिय; दुसऱ्या द्यूमा मंडळाचा सदस्य; युद्धकाळात कट्टर समाजवादी-देशभक्त; बोल्शेव्हिक क्रांतीनंतर व्हाइट गार्ड जनरल रँगेलचा मुख्य प्रसिद्धी अधिकारी म्हणून काम.

अक्सेलरॉड, पॉल बी. (1850-1928)- प्लेखानॉव्हसोबत पहिला संघटित मार्क्सवादी गट- श्रमिक मुक्ती गट- 1883 साली स्थापन करण्यात पुढाकार; नंतर आघाडीचा मेन्शेव्हिक नेता; सोव्हिएत सरकारचा कट्टर विरोधक; साम्यवादाविरोधात सक्रिय मोहीम रबावली; सेकण्ड इंटरनॅशनलच्या आंतरराष्ट्रीय समाजवादी मंडळाचा सदस्य.

आंद्रेयेवा, एम. एफ.- गॉर्कीची पत्नी.

कामेनेव्ह, एल. बी. (जन्म 1882)- जुना बोल्शेव्हिक नेता; क्रांतीनंतर विविध सरकारी पदं सांभाळली; विरोधकांना संघटित केल्यामुळे सर्व पदांवरून काढून टाकण्यात आलं आणि पक्षातूनही बाहेरचा रस्ता दाखवला गेला; नंतर विरोधी बाजूचा त्याग केल्यावर पुन्हा पक्षात घेण्यात आलं.

कॉट्‌स्की, कार्ल (जन्म 1854)- युद्धाआधी आघाडीचा मार्क्सवादी सिद्धान्तकार; मध्यममार्ग मांडणी केली पण साम्राज्यवादी युद्धाआधी मार्क्सवाद पूर्ण सोडून दिला आणि युद्धादरम्यान सामाजिक-शांततावादी झाला; सोव्हिएत सरकार व साम्यवादी चळवळीचा कट्टर विरोधक.

कॉलान्ताय, अलेक्झान्ड्रा एम. (जन्म 1872)- सुरुवातीला मेन्शेव्हिकांसोबत काम आणि नंतर स्त्रियांच्या चळवळीत सक्रिय; युद्धादरम्यान आंतरराष्ट्रीयतावादी भूमिका घेऊन बोल्शेव्हिकांमध्ये सामील; सोव्हिएत संघाच्या वतीने परदेशात राजनैतिक प्रतिनिधित्व.

क्रासिन, एल. बी. (1870-1926)- जुना बोल्शेव्हिक नेता; ऑक्टोबर क्रांतीनंतर अनेक महत्त्वाच्या सरकारी पदांची जबाबदारी सांभाळली; इंग्लंड व फ्रान्स इथे सोव्हिएत राजदूत म्हणून काम केलं.

खलाटोव्ह, एन. बी.- सोव्हिएत संघाच्या राज्य प्रकाशनगृहाचा (गॉसिस्दात) माजी अध्यक्ष.

बाझारोव्ह, व्ही. ए. (जन्म 1874)- रशियन अर्थशास्त्रज्ञ आणि तात्त्विक निबंधकार; 1907 साली मॅचिस्ट होईपर्यंत बोल्शेव्हिक पक्षाचा सदस्य; सोव्हिएत संघाच्या राज्य नियोजन आयोगामध्ये कार्यरत.

फेरी, एन्रिको (1866-1929)- इटालियन समाजवादी, विद्यापीठात अध्यापक, गुन्हेशास्त्रातील तज्ज्ञ आणि वकील.

बेबल, ऑगस्ट (1840-1913)- जर्मन सामाजिक-लोकशाहीवादी पक्षाचा एक संस्थापक व नेता.

बेड्‌नी, डेम्यान (जन्म 1883)- विडंबनकार कवी, साम्यवादी आणि लोकप्रिय रशियन लेखक.

बॉग्दानोव्ह, ए. ए. (जन्म 1873)- विख्यात बोल्शेव्हिक लेखक; 1908 साली मॅचिस्ट गटात दाखल. मॉस्कोतील रक्त संक्रमण संस्थेचं अध्यक्षपद सांभाळलं.

बुखारीन, निकोलाय आय. (जन्म 1889)- प्रमुख बोल्शेव्हिक नेता; सोव्हिएत संघातील ‘राइट अपोझिशन’चं नेतृत्व केलं आणि नंतर त्या पदाचा त्याग केला.

शेलिआपिन फ्योदर (जन्म 1873)- प्रसिद्ध रशियन गायक.

दान, थिओडोर (जन्म 1871)- मेन्शेव्हिक नेता; युद्धादरम्यान शांततावादी; परदेशातून होणाऱ्या सोव्हिएतविरोधी प्रचारतंत्रात सहभागी.

डेब्स, यूजीन व्ही. (1855-1926)- क्रांतिकारी कामगार संघटक आणि समाजवादी प्रचारतंत्रात सहभागी नेता; अमेरिकेतील समाजवादी पक्षाच्या संस्थापकांपैकी एक; चार वेळा राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार; बोल्शेव्हिक क्रांतीचा समर्थक; साम्राज्यवादी पक्षाने मार्क्सवाद पूर्णतः सोडून दिल्यावरही डेब्सने पक्षापासून फारकत घेतली नाही.

ड्यूश, लिओ जी. (1855)- रशियात 1883 साली श्रमिक मुक्ती गट स्थापण्यात सहभाग; युद्धादरम्यान आत्यंतिक देशप्रेमी आणि 1917 साली प्लेखानोव्हचा साथीदार.

ड्यूरर अल्बर्ट (1471-1528)- जर्मन चित्रकार, कोरीव काम करणारा आणि लेखक.

दझेरझिन्स्की, फेलिक्स (1877-1926)- पोलिश सामाजिक लोकशाहीवादी पक्षाच्या सर्वांत जुन्या सदस्यांपैकी एक; 1917 सालापासून ते निधन होईपर्यंत तो बोल्शेव्हिक केंद्रीय समितीचा सदस्य होता; ट्‌चेकाचा अध्यक्ष, अंतर्गत कामकाज विभागाचा प्रमुख, संदेशन प्रमुख आणि सर्वोच्च आर्थिक मंडळाचा अध्यक्ष.

ज्यॉरेस, ज्याँ (1859-1914)- असामान्य फ्रेंच समाजवादी नेता; महायुद्धाच्या सुरुवातीला माथेफिरू धर्मांधाकडून हत्या.

झिट्‌लोव्स्की, सी. - रशियन व्याख्याता व लेखक; सामाजिक क्रांतिकारी; नंतर न्यूयॉर्कमध्ये स्थायिक.

पार्व्हस (ए. एल. हेल्फाण्ड, 1869-1924)- विख्यात मार्क्सवादी सिद्धान्तकार; रशियन राजकीय स्थलांतरित; एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपासून जर्मन सामाजिक-लोकशाहीवादी पक्षामध्ये सक्रिय; युद्धादरम्यान आत्यंतिक सामाजिक भूमिका आणि युद्ध कंत्राटांशी संबंधित विविध व्यावसायिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन जर्मन साम्राज्यवादाचा दलाल म्हणून काम केलं.

प्लेखानोव्ह, जॉर्ज व्ही. (1850-1918)- रशियातील मार्क्सवादी समाजवादाचा संस्थापक आणि मार्क्सवादी सिद्धान्तकार; सुरुवातीला लेनिनचा साथीदार; नंतर मेन्शेव्हिक नेता; युद्धादरम्यान रशियाच्या साम्राज्यवादी उद्दिष्टांना पाठिंबा दिला आणि ऑक्टोबर क्रांतीनंतर सोव्हिएत सरकारचा कठोर विरोध केला.

मॅलिनोव्स्की, अँड्र्‌यू- 1911 सालापासून बोल्शेव्हिक पक्षात सक्रिय; चौथ्या द्यूमाचा नियुक्त सदस्य आणि पक्षाच्या केंद्रीय समितीमध्येही सहभागी; फेब्रुवारी क्रांतीनंतर उघड झालेल्या नोंदींनुसार झारच्या गुप्त पोलिसांचा हा सदस्य होता; सोव्हिएत सरकारच्या स्थापनेनंतर स्वेच्छेने रशियात परतला; देशद्रोही व गुप्तहेर असल्याच्या आरोपावरून खटला चालवून देहदंडाची शिक्षा देण्यात आली.

मारटोव्ह, एल. (1873-1923)- मेन्शेव्हिक नेता; युद्धादरम्यान शांततावादी; रशियन क्रांतीच्या पहिल्या टप्प्यात त्याच्या पक्षातील बहुसंख्यांशी मतभेद, पण कालांतराने सोव्हिएत सरकारच्या शत्रूछावणीत दाखल.

मायकोवस्की, व्ही. (1894-1930)- आघाडीचा रशियन भविष्यवेत्ता; ऑक्टोबर क्रांतीनंतर ‘डाव्या आघाडी’चा कवी; आत्महत्या केली.

मेहरिंग, फ्रान्झ (1846-1919)- असामान्य क्रांतिकारी मार्क्सवादी इतिहासकार व पत्रकार; जर्मन सामाजिक-लोकशाहीवादी पक्षातील डाव्या शाखेचा सदस्य आणि स्पार्टाकस लीगमधील नेता.

म्यून्झर, थॉमस (1498-1526)- जर्मनीत 1525 साली झालेल्या शेतकऱ्यांच्या उठावाचा नेता.

तचाइकोव्स्की, एन. (1860-1926)- रशियातील आरंभिक लोकप्रिय क्रांतिकारी गटांचा संस्थापक; सामाजिक-क्रांतिकारकांचा नेता; महायुद्धादरम्यान सामाजिक देशभक्त; यादवी युद्धादरम्यान रशियाच्या उत्तरेकडील प्रतिक्रांतिकारी सरकारचा प्रमुख.

टॉम्स्की, एम. पी (जन्म 1880)- तरुणपणापासून बोल्शेव्हिक; 1905 व 1917 यावेळच्या क्रांत्यांमध्ये सक्रिय सहभाग. सोव्हिएत संघाच्या कामगार संघटनांच्या केंद्रीय मंडळाचा अध्यक्ष आणि 1919 पासून पक्षाच्या केंद्रीय समितीचा अध्यक्ष; ‘राइट अपोझिशन’ संघटित केल्याबद्दल सर्व प्रमुख पदांवरून हकालपट्टी; नंतर राज्य प्रकाशनगृहाचा अध्यक्ष.

ट्रॉट्‌स्की, एल. डी. (जन्म 1879)- रशियन सामाजिक-लोकशाहीवादी पक्षात 1903 साली फूट पडल्यानंतर मेन्शेव्हिकांसोबत राहिला; युद्धादरम्यान आंतरराष्ट्रीयतावादी; कल कॉट्‌स्की गटाकडे; फेब्रुवारी क्रांतीनंतर बोल्शेव्हिक पक्षामध्ये दाखल; केंद्रीय समितीचा सदस्य; सरकारी पदांची जबाबदारी सांभाळली; पक्षाच्या कार्यक्रमांचा व धोरणांचा विरोध केल्याबद्दल 1927 साली पक्षातून व सर्व पदांवरून काढून टाकण्यात आलं; त्यानंतर सोव्हिएतविरोधी भूमिगत कारवाया केल्याबद्दल सोव्हिएत संघातून हद्दपार.

लेडीझानिकोव्ह, एस. पी.- 1917च्या क्रांतीआधी एका प्रकाशन संस्थेचा प्रमुख.

लुनाचार्स्की, अनातोल (जन्म 1875)- जुना बोल्शेव्हिक; विख्यात भाषावैज्ञानिक, नाट्यकार व साहित्यसमीक्षक; मूलभूत तात्त्विक प्रश्नांवर बोल्शेव्हिक नेत्यांशी असहमती दर्शवण्यासाठी बॉग्दानोव्ह व इतरांसह एक गट स्थापन केला; मार्च क्रांतीनंतर पुन्हा बोल्शेव्हिक पक्षात दाखल; अनेक वर्ष शिक्षण मंडळाचा प्रमुख.

लक्झेम्बर्ग, रोझा (1871-1919)- असामान्य क्रांतिकारी समाजवादी नेती व सिद्धान्तकार; जर्मन, पोलिश व रशियन श्रमिक चळवळींमध्ये सहभाग; युद्धादरम्यान तुरुंगवास; स्पार्टाकस लीगच्या संस्थापकांपैकी एक; या लीगचंच रूपांतर पुढे जर्मन साम्यवादी पक्षात झालं; जर्मन अधिकाऱ्यांनी तिची कार्ल लिएबक्नेश्तसह हत्या केली.

वॉलोव्स्की, व्ही. व्ही. (1871-1923)- जुना बोल्शेव्हिक आणि सोव्हिएत संघाच्या साम्यवादी पक्षाचा एक प्रमुख सदस्य. लॉसाने परिषदेत सोव्हिएत प्रतिनिधी म्हणून सहभागी झाला असताना 1923 साली हत्या झाली.

हिलक्विट, मॉरीस (जन्म 1870)- समाजवादी पक्षाच्या संस्थापकांपैकी एक नेता; श्रीमंत वकील; युद्धादरम्यान मध्यममार्गी व शांततावादी; सोव्हिएत सत्तेचा व साम्यवादाचा कठोर विरोधक आणि सोव्हिएत संघाविरोधातील प्रतिक्रांतीवादी चळवळींचा समर्थक. अमेरिकेतील एक लक्षणीय उजवा समाजवादी नेता.

सिंगर, पॉल (1844-1911)- बेबलसोबत जर्मन सामाजिक-लोकशाहीचा एक नेता.

Tags: लेनिनच्या सहवासातील ते दिवस डेज्‌ विथ लेनिन मॅक्झिम गॉर्की व्लादिमीर लेनिन अवधूत डोंगरे avdhoot dongare Days with lenin Valdmir lenin maxim gorky weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात