डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

प्राचीन भारतातील वैज्ञानिक प्रगती (दाव्यांचे मूल्यांकन)

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे विज्ञानाची भाषा ही गणित आहे, संस्कृत नव्हे! कुठल्याही विज्ञानाची सुरुवात आपल्या कामाच्या वर्णनातून होत असावी. परंतु वैज्ञानिक शोध गणिती स्वरूपात मांडल्यावरच खरी आणि वेगवान प्रगती सुरू होते. असे संशोधन मग इतरही क्षेत्रांमध्ये वापरणे शक्य होते. प्राचीन काळातील अशा प्रकारच्या संक्रमणाचा एकही पुरावा आपल्याकडे नाही. विज्ञानातील अत्याधुनिक प्रगती गणितीय साधनांमुळेच शक्य होऊ शकली आहे. गणितक्षेत्रातील भारतीयांची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे चौदाव्या आणि सोळाव्या शतकादरम्यान केरळमधील शिक्षणसंस्थेने मांडलेली गणिती प्रमेये आहेत. ऋग्वेदात मोठी अंकगणिते मांडली आहेत. पण त्यानंतर अनेक वर्षांनी शास्त्रीय बीजगणिताची सुरुवात झाली आणि आपल्या पूर्वजांना त्याबद्दलचे ज्ञान नव्हते.

नैसर्गिक प्रक्रियांच्या पारंपरिक आणि निःपक्षपाती अभ्यासाला आपण साधारणतः विज्ञान असं संबोधतो. अशा वैज्ञानिक अभ्यासाला आता अभूतपूर्व असा धोका निर्माण झाला आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विज्ञानक्षेत्रातील अनेक महान व्यक्तींनी भारतातील वैज्ञानिक संशोधनाचा आकृतिबंध तयार केला होता. त्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे सुनियोजित प्रयत्न आज होत आहेत. ‘आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सदुपयोग हाच प्रगतिशील भविष्याचा मार्ग आहे’, हे स्वातंत्र्योत्तर मांडणीतील सर्वमान्य तत्त्व होतं. त्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील संशोधन अतिशय महत्त्वाचं होतं. पण संशोधनाचा मार्ग मुख्यतः वैज्ञानिकांचे निर्णय आणि आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्तीच्या मार्गदर्शनाद्वारेच निश्चित होत असे. त्याचा देशाला बराच लाभ झाला. आंतरराष्ट्रीय संशोधनातील बव्हंशी सर्वच क्षेत्रांत लागणारं कौशल्य आज भारताकडे आहे; परंतु कुठल्याही संशोधनाचं मूळ भक्कम बनवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रगतीची जोड मिळणे अत्यावश्यक आहे. हेसुद्धा बऱ्यापैकी भारतीय संशोधनांच्या बाबतीत घडलं. समकालीन विज्ञानविषयक संशोधन करणाऱ्या भारतीय वैज्ञानिकांचे आंतरराष्ट्रीय समुदायासोबत घनिष्ठ संबंध आहेत. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय विज्ञानासाठी ही बाब अतिशय उपयुक्त आहे. परंतु डोळ्यांना झापडं लावल्यामुळे ज्या लोकांची दृष्टीच मर्यादित झाली आहे, त्यांना भारतीय वैज्ञानिक म्हणजे पाश्चात्त्य विज्ञानाचे बावळट समर्थक वाटतात. वैज्ञानिकांचा देशाभिमान आणि बांधिलकीवरही ही मंडळी शंका उपस्थित करतात.

भारतीय विज्ञानातील आमूलाग्र बदल

आज संपूर्ण भारतीय विज्ञानपटलाचंच पुनरावलोकन होत आहे. स्वातंत्र्यासाठी लढा देणारी पिढी आता स्वातंत्र्योत्तर काळातील नव्या पिढीला वाट देत आहे, देश विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे मूलभूत घटक आणि त्यांच्या भविष्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मूलभूत विज्ञानातील संशोधन अधिकाधिक क्लिष्ट होत गेल्याने, त्याच्या थेट उपयोगितेवर मर्यादा येते. मग त्याचा उपयोग फार तर विज्ञानाच्याच काही तांत्रिक गरजा भागवण्यासाठी होतो. वैज्ञानिक संशोधन आणि औद्योगिक तंत्रज्ञानात अगदी सूक्ष्म दुवा आहे. हे संशोधन आंतरराष्ट्रीय संस्थांच्या जोडीने केले जाते. त्यामुळे, ‘असे महाखर्चिक संशोधन देशाला खरेच परवडणारे आहे का?’, असे प्रश्न आज उपस्थित केले जात आहेत.

भारतीय विज्ञानाबद्दल आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, वैज्ञानिक वाटचालीसाठी आपण जर्मनीतील ‘मॅक्स प्लँक’ या संस्थेची संरचना अवलंबिली आहे. त्यानुसार मूलभूत संशोधनासाठी विशेष संस्था स्थापन करण्यात आल्या आणि विद्यापीठांमधून शिक्षणावर भर दिला गेला. हळूहळू विद्यापीठांतील संशोधनविषयक जाणीव वाढू लागली. तेव्हा तिथेही संशोधनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा पुरविल्या जाव्यात, अशी मागणी जोर पकडू लागली. त्यामुळे आपण अवलंबिलेल्या संरचनेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातेय. आणि मूलभूत संशोधनाची क्षमता असणाऱ्या अधिकाधिक संस्थांची निर्मिती केली जात आहे. देशासाठी हे उत्तम लक्षण म्हणायला हवे. 

विज्ञान आणि वैज्ञानिकांच्या दृष्टिकोनापुढे निर्माण झालेले वैचारिक आव्हान अधिक गंभीर आहे. भूतकाळातील अवास्तव आणि तथाकथित विलक्षण कामगिरीचा सर्वत्र डंका पिटणारा समूह समकालीन विज्ञानापुढे सर्वांत आक्रमक आव्हान बनत आहे. निसर्गाच्या सर्व घटकांचा बुद्धिप्रामाण्यवादी पद्धतीने अभ्यास करणारी मंडळी भूतकाळातील अशा गौरवशाली कामगिरीवर पुराव्या-अभावी विश्वास ठेवायला तयार नाहीत. त्यामुळे तर्क आणि प्रयोजनाशिवाय भूतकाळातील कामगिरीचे गौरवशाली चित्र रंगवणाऱ्या समूहाला हे वैज्ञानिक सर्वांत मोठा अडथळा वाटू लागले आहेत.

शास्त्रीय आणि वस्तुनिष्ठ विचारांवर आधारित संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांना हे समूह ‘पाश्चात्त्यांचे प्रतिनिधी’ आणि त्याहूनही दर्जाहीन आशयाची संबोधने वापरू लागले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये हा समूह अधिक बळकट होऊ लागला आहे. त्यांच्या मते, पुराव्यांचा सूक्ष्म अभ्यास करणारी वैज्ञानिक मंडळी म्हणजे संकुचित स्वार्थासाठी भूतकाळातील यश न मानणारे, अतिशय घातक असे संस्कृतिविरोधी प्रचारक आहेत. त्यामुळे प्राचीन तांत्रिक आणि वैज्ञानिक कामगिरीचे नवनवे पुरावेच हा समूह आता शोधून काढत आहे. त्यांच्या मते, भूतकाळातील ही कामगिरी अतिशय महत्त्वाची आहे. तिचा प्रचार अनैसर्गिक आणि अतिशयोक्तीपूर्ण वाटला तरीही तो व्हायलाच हवा, अशी त्यांची मागणी आहे. त्यामुळे आधुनिक वस्तुनिष्ठ पद्धतीने अभ्यास करणारी वैज्ञानिक मंडळी त्यांना अडचणीची- किंबहुना, शत्रूसमान वाटतात. वैज्ञानिक त्या शोधांचा संपूर्ण प्रवास जाणतात. त्यानुसार पूर्वीच्या काळी असे यश मिळविणे शक्य नव्हते आणि म्हणून त्यासंबंधीचे सर्व दावे फोल आहेत, असे त्याचे मत आहे.

प्राचीन विज्ञान आणि आधुनिक वैज्ञानिक

प्राचीन साहित्य वाचू इच्छिणारे अनेक वैज्ञानिक त्याचे महत्त्व आणि मर्यादा मान्य करतात; परंतु हे समूह अशा कुठल्याही मर्यादा मान्य करू इच्छित नाही. याउलट, तार्किक विश्लेषणापुढे जाऊन मुख्य विचारधारेत बळजबरीने त्यांचा विचार रेटू पाहतात. ‘पुरातन काळातील महान द्रष्टे सर्वज्ञ होते’, हेच त्यांच्यासाठी त्रिकालाबाधित सत्य आहे. Thermodynamics (औष्णिक यंत्रविद्या) आणि Electromagnetics (विद्युतीय चुंबकत्व) हे Quantum Mechanics शास्त्राच्या विकासातील अतिशय महत्त्वाचे घटक आहेत. (Quantum Mechanics ही भौतिकशास्त्राची एक शाखा आहे. त्यात वस्तू आणि ऊर्जेचा अणू-रेणूंसारख्या मूलभूत घटकांच्या आधारे अभ्यास केला जातो.) पुरातन काळात या घटकांबद्दल ज्ञान अवगत असल्याचा कुठलाही पुरावा नाही. तरीही त्या काळी लोक Quantum Mechanics आणि Aerodynamics (वायुगतिशास्त्र)मध्ये पारंगत होते, हे आपण मान्य करावं, असा या समूहाचा अट्टहास आहे. प्राचीन साहित्य आणि आधुनिक विज्ञानाच्या अभ्यासातून मानवी उत्क्रांतीची एक विश्वसनीय कालरेखा आखण्यात आली आहे. पण तर्क आणि विवेकी विचार झुगारून, केवळ खोट्या अभिमानासाठी हा समूह ही कालरेखा नव्याने आखू इच्छितो.

‘आजचे वैज्ञानिक त्या काळी नव्हतेच; त्यामुळे पूर्वीच्या लोकांचे ज्ञान, त्यांची क्षमता त्यांना कळूच शकणार नाही’, असा या समूहाचा युक्तिवाद आहे. यावरून एक नक्की कळतं की, या समूहाला विज्ञानाच्या उत्क्रांतीची प्रक्रिया मुळीच कळलेली नाही. त्यामुळे प्राचीन विज्ञानाकडे बघण्याचा वैज्ञानिकांचा दृष्टिकोन जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

आपल्या पूर्वजांच्या कामगिरीचे मूल्यांकन करणे वाटते त्यापेक्षा बरंच सोपे आहे. पुरातत्त्व अवशेष आणि मानवी क्रियांची कालसुसंगत बांधणी केली की, उत्क्रांतीची कालरेखा आखणे सहज शक्य होते. आधुनिक तंत्रज्ञान इतके प्रगत आहे की, काही मिलिग्रॅम अवशेषांच्या आधारे अचूक माहिती मिळवता येऊ शकते. अशा अभ्यासातून मानवाचा विकास कसा होत गेला, हे कळते. त्यानुसार साधारण दहा लाख वर्षांपूर्वी आधुनिक शरीररचनेचा मानव अस्तित्वात आला. एक लाख वर्षांपूर्वी त्या मानवाने विविध भूप्रदेश पादाक्रांत करण्यास सुरुवात केली. हा आधुनिक मानव सर्वप्रथम आफ्रिकेत वास्तव्यास होता आणि तिथून तो जगातील इतर प्रदेशांत पसरू लागला. त्यादरम्यान स्थानिक मानवसदृश प्राण्यांसोबत त्यांचे समागम झाले, इत्यादी.

इतिहासातही किती जुन्या कालखंडाबद्दल आपण माहिती मिळवतोय, त्यानुसार ती किती अचूक आहे हे ठरते. ढोबळमानाने घटनांचा क्रम मात्र अगदी स्पष्ट आहे.

मानवी उत्क्रांती व निसर्गाबद्दलच्या आकलनक्षमतेचा विकास

साधारण सत्तर हजार वर्षांपूर्वी भारतीय उपखंडात मानव वास्तव्य करू लागला, असा सबळ पुरावा आहे. मानवनिर्मित साधने आणि इतर अवशेषांच्या आधारे कालानुरूप त्यांची सांस्कृतिक प्रगती कशी होत गेली, हे लक्षात येते. सात ते दहा हजार वर्षांपूर्वी हा मानव शेतीकडे वळू लागला. भटकंती थांबवून तो स्थिरावू लागला. त्यादरम्यानच हा मानव भारतीय उपखंडातील विविध भागांत भव्य दगडी रचना उभारू लागला. हडप्पा संस्कृती त्याचेच एक उदाहरण. काही सूक्ष्म मुद्यांचा अपवाद वगळता हा घटनाक्रम निर्विवाद आहे. इथे एक बाब नमूद करणे अतिशय महत्त्वाचे आहे. ज्या कालरेषेच्या आधारे आपण मानवाचे आफ्रिकेतून इतर प्रदेशात झालेले स्थलांतर, मानवी वसाहत आणि तंत्रज्ञानाची उत्क्रांती अभ्यासली आहे, त्यात प्राचीन भारतीय संस्कृतीसंबंधीच्या दाव्यांना कुठलेही स्थान नाही.

संस्कृतभाषक प्राचीन मानवी वसाहतींसंबंधीचे सर्व पुरावे मुख्यत्वे साहित्याशी निगडित आहेत. अगदी क्वचितच कुठल्या पुरातत्त्व प्रदेशाशी त्यांचा थेट संबंध जोडण्यात आल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे अशी माहिती मिळवताना त्रुटी संभवतात. तरीही तिची कालरेषेवर आखणी करताना दोन निकष वापरले जातात. एक म्हणजे, भाषा ही सतत बदलत असते. माझे आजोबा आणि माझ्या पिढीतील शब्दप्रयोग हे पूर्णतः वेगळे आहेत. माझ्यावर विश्वास नसेल, तर Oxford English Dictionary ला दर वर्षी अशा भाषिक बदलांमुळे किती वेदनादायी प्रक्रियेला सामोरे जावे लागते, ते तपासून बघा. भाषेचा विकास कालानुरूप होतो हे मान्य केले, तर प्राचीन दस्तावेजसुद्धा कालरेषेवर मांडता येतील. उदाहरणार्थ- एखाद्या इंग्रजी निबंधात ‘Thou’किंवा ‘Thine’ (प्राचीन इंग्रजीत ‘तू’ या द्वितीय पुरुषी सर्वनामासाठी वापरले जाणारे शब्द. आधुनिक भाषेत त्याऐवजी you हा शब्द अधिक वापरला जातो) असा शब्दप्रयोग आढळला, तर नक्कीच तो किमान काही दशके किंवा कदाचित शंभर वर्षे जुना असू शकतो. हीच माहिती दुसऱ्या पद्धतीनेही मिळवता येऊ शकते. त्यासाठी उपलब्ध नोंदींमधून खगोलशास्त्रीय खुणा, वनस्पती आणि प्राण्यांचे वर्णन इत्यादींचा अभ्यास करून तो लेख नेमका कुठे लिहिला गेला आणि त्यातील घटनाक्रम कधी घडला असावा, याविषयी निश्चित माहिती मिळवता येते. त्यानंतर तंत्रज्ञानाविषयी केलेले विश्लेषण अभ्यासून एक तर्कसंगत कालरेषा आखता येऊ शकते. आणि ही सर्व माहिती आपल्याला अवगत असलेल्या इतर ज्ञानाशी सुसंगत आहे किंवा नाही, हेसुद्धा तपासून बघता येते.

गेल्या काही दशकांमध्ये आनुवंशिकशास्त्रात उल्लेखनीय प्रगती झाली आहे. त्याद्वारे मानव, प्राणी आणि वनस्पतींचा सखोल अभ्यास केला गेला. त्यांच्या हालचाली, विविध समूहांचे परस्परसंबंध आणि स्थलांतराचा आकृतिबंध हे या शास्त्राच्या आधारे समजू शकले आहेत. त्याचप्रमाणे भाषेचे आनुवांशिकशास्त्र आपल्याला आधारभूत पुरावे देऊ शकते.

अगदी राजा अशोकाच्या कालखंडापासून अस्तित्वात असलेल्या विविध स्मारकांचा, लेखी नोंदींचा याच पद्धतीने अभ्यास केला, तर प्राचीन काळातील मानवी कामगिरी- विषयी थेट पुरावे मिळू शकतात.

वैज्ञानिक पटल

परंतु, चर्चेदरम्यान केलेल्या टोकाच्या दाव्यांबाबत इतर काही युक्तिवाद महत्त्वाचे ठरतात. विज्ञानाच्या कुठल्याही शाखेचा विकास हा इतर विज्ञान विषयांपासून अलिप्त राहून होत नसतो. Quantum Mechanics शास्त्राचंच उदाहरण घेऊ. प्रथम आपल्याला Thermodynamics, Atomic Physics  (म्हणजेच अणू या घटकाशी संबंधित अभ्यास करणारी भौतिक शास्त्राची शाखा) आणि Electromagnetic (चुंबकीय विद्युत ऊर्जेसंबंधित) सिद्धांतांचा सखोल अभ्यास करावा लागला. त्यांची गणितीय क्लिष्टता समजून घेतल्यावर आपल्याला कळले की, अणूंची स्थिरता स्पष्ट करण्यासाठी एक नव्या भौतिकशास्त्राच्या नियमाची आवश्यकता आहे. अशा कठीण प्रवासातून आपण Quantum Mechanics हे शास्त्र विकसित करू शकलो.

त्याचप्रमाणे कुठल्याही अभ्यासाशिवाय थेट विमान बनवून उडवणे शक्य नव्हते. त्यासाठी हवा आणि पृथ्वीच्या वातावरणाची आंतरप्रक्रिया, गती समजणे अत्यावश्यक होते. हवेचा दबाव मोजणे- मग ही हवा सपाट प्रदेशावरून वाहताना आणि वक्र भागावरून वाहताना दबावात काय फरक पडतो, हे सगळे जाणणे अपरिहार्य होते. विज्ञानाच्या अनेक घटकांचा अभ्यास करूनच ‘डॅनियल बरनौली’ हा संशोधक हवेच्या प्रवाहाचे मूलभूत तत्त्व मांडू शकला. शंभर वर्षांची औद्योगिक क्रांती, धातूंबद्दलचे सखोल ज्ञान आणि इंधनाच्या ज्वलनातून ऊर्जा निर्माण करणारे इंजिन नसते, तर राईट बंधूंना विमानाची कल्पना तरी सुचली असती का? एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जाण्यासाठी सर्वप्रथम त्यांच्यातील अंतर माहीत असणे आवश्यक आहे. सौरप्रणालीची ग्रहकेंद्रित संरचना पूर्णतः समजणे गरजेचे आहे. त्यासोबतच पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाबाबत सखोल माहिती हवी. या गुरुत्वाकर्षणाला भेदून जाऊ शकेल, असे शक्तिशाली इंजिनही लागेल. अशा प्रकारची क्षमता विकसित करण्यासाठी प्रयोगशाळा, त्यांची तपासणी आणि अखेर यंत्रनिर्मितीसाठी लागणाऱ्या सोई-सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे Genetic Engineering (आनुवंशिक अभियांत्रिकी) शाखेच्या विकासासाठी जीवसृष्टीचे आण्विक पातळीवरील अस्तित्व समजून घेणे आवश्यक आहे. सर्वांत लहान घटक म्हणजे रेणू किंवा परमाणू. हे परमाणू अनेक अणूंचे मिळून बनतात. तसे बघता, अणूंचे फार थोडे प्रकार अस्तित्वात आहेत; पण त्यातूनच या सृष्टीतील विविधता निर्माण झाली आहे. कार्बन हा जीवसृष्टीचा केंद्रीय घटक आहे, हे कळल्यावर इतर घटकांच्या अभ्यासाची आवश्यकता जाणवते. त्यानंतर आपल्याला आण्विक भौतिकशास्त्र (Atomic Physics) आणि रसायनशास्त्र समजून घ्यावे लागते. अणूद्वारे उत्सर्जित होणाऱ्या प्रकाशाचे पृथक्करण करणारी यंत्रे हवी असतात. त्यातून मिळणारी माहिती गणिती सिद्धांतांद्वारे मांडली की, मग जीवशास्त्र कसे चालते हे आपल्याला कळू शकते. त्यानंतर सूक्ष्मदर्शक यंत्रणेद्वारे अभ्यास करून आपल्याला परमाणूंमधील आंतरप्रक्रिया समजून घ्यावी लागते. शतकावधीच्या अशा अथक अभ्यासानंतर आनुवंशिकतेची प्रक्रिया आपल्याला समजू लागते. आनुवंशिक माहिती प्रजननाद्वारे नवजात जीवापर्यंत पोचवली जाते आणि त्यातूनच जीवसृष्टीचा विकास होतो. 

नवजात पेशींच्या विकासाचा सखोल अभ्यास करावा लागतो. अनेक दशकांच्या अभ्यासातून आनुवंशिक- शास्त्राचे मूलभूत नियम आपल्याला कळू लागतात. जनुकांवर प्रक्रिया करून एखादा संयुक्त जीव निर्माण करणे तर त्याहून किती तरी क्लिष्ट आहे. एखाद्या सजीवातील एखादे जनुक काढून टाकल्यास होणारे बदल किंवा ती जनुके दुसऱ्या सजीवामध्ये रुजविल्यास होणारे परिणाम याबाबत पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. हे सगळे करण्यासाठी प्रचंड वेळ, साधनसामग्री, सखोल अभ्यास आणि अत्याधुनिक प्रयोगशाळा उपलब्ध असणे आवश्यक आहे. आणि आनुवंशिकतेचे कोडे सोडवण्यासाठीच प्रतिबद्ध असलेल्या संशोधकांचा एक समूह असणे आवश्यक आहे. खरे तर आधुनिक आनुवंशिकशास्त्राने जी काही प्रगती केली आहे- त्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रातील अनेक संशोधकांचा मोलाचा वाटा आहे. पुरातन काळी या शास्त्रात प्रगती करण्यासाठी लागणाऱ्या सोई-सुविधा किंवा असे संशोधन करणारा मानवी समूह अस्तित्वात असल्याचा कुठलाही पुरावा पुरातत्त्व अवशेषांमध्ये किंवा साहित्यातही आढळून येत नाही.

आण्विक शस्त्रांची निर्मितीसुद्धा अशाच किचकट प्रवासातून शक्य झाली आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपण अणूंची वैशिष्ट्ये जाणून घेतली. त्यांची आंतरप्रक्रिया समजून घेतली. अस्थिर केंद्रकांमधून उत्सर्जित होणाऱ्या ऊर्जेच्या गुणधर्मांचा अभ्यास केला. हे सर्व करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाची गरज होती. त्याद्वारे विशिष्ट पदार्थाचे अणू पुरेशा प्रमाणात वेगळे करणे शक्य झाले. एवढे करूनही शुद्ध युरेनियम लगेच काही अणुबाँब म्हणून वापरता येणे शक्य नव्हते. एका विशिष्ट दबाव तंत्रज्ञानाचा वापर करून शुद्ध युरेनियमचा गाभा संकलित करावा लागतो. त्यातून अणूंच्या कायमस्वरूपी विभाजनप्रक्रियेला सुरुवात होते. या प्रक्रियेतून अणुबॉम्ब बनविणे शक्य होते. या सगळ्या प्रक्रियेच्या मुळाशी एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. ती म्हणजे, धातू शुद्धीकरणाचे विकसित शास्त्र आणि कला. क्लिष्ट गणितीय समीकरणे इथे गृहीतच आहेत. आणि बाणाच्या टोकाला बांधून कुणीही सोडावा इतका वजनाने हलका अणुबॉम्ब नक्कीच नसतो.

या सगळ्या प्रक्रियांसाठी विद्युत्‌ ऊर्जेची आवश्यकता काही वेगळी नमूद करण्याची आवश्यकता नसावी. ऊर्जेचा वापर आणि स्थित्यंतराच्या दृष्टीने विद्युत्‌ ऊर्जा सर्वांत सोईस्कर आहे. आपले पूर्वज विद्युत्‌ ऊर्जेची निर्मिती आणि वापर करू शकत होते, हे दाखवणारा एकही पुरावा उपलब्ध नाही.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विज्ञानाची भाषा ही गणित आहे, संस्कृत नव्हे! कुठल्याही विज्ञानाची सुरुवात आपल्या कामाच्या वर्णनातून होत असावी. परंतु वैज्ञानिक शोध गणिती स्वरूपात मांडल्यावरच खरी आणि वेगवान प्रगती सुरू होते. असे संशोधन मग इतरही क्षेत्रांमध्ये वापरणे शक्य होते. प्राचीन काळातील अशा प्रकारच्या संक्रमणाचा एकही पुरावा आपल्याकडे नाही. विज्ञानातील अत्याधुनिक प्रगती गणितीय साधनांमुळेच शक्य होऊ शकली आहे. गणितक्षेत्रातील भारतीयांची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे चौदाव्या आणि सोळाव्या शतकादरम्यान केरळमधील शिक्षणसंस्थेने मांडलेली गणिती प्रमेये आहेत. ऋग्वेदात मोठी अंकगणिते मांडली आहेत. पण त्यानंतर अनेक वर्षांनी शास्त्रीय बीजगणिताची सुरुवात झाली आणि आपल्या पूर्वजांना त्याबद्दलचे ज्ञान नव्हते.

हे सर्व आपण दुर्लक्षित केले, तरीही एक प्रश्न उरतोचते विस्मयकरी त्या तंत्रज्ञानाचे आणि क्षमतांचे नेमके झाले तरी काय? ते तंत्रज्ञान अचानक लुप्त कसे काय झाले? त्यासंबंधीची मुद्देसूद मांडणी कुठल्याही लिखाणात का आढळून येत नाही? कोणत्या प्रलयकारी घटनांमुळे ते सगळे नष्ट झाले आणि आज त्याचा मागमूसही का आढळत नाही? अशा प्रलयकारी घटनांची एकही आख्यायिका किंवा दंतकथा का बनली नाही? परकीय आक्रमणांमुळे हे झाले असे म्हटले, तर नवा प्रश्न उपस्थित होतो- हे परकीय सत्ताधीश असे शक्तिशाली तंत्रज्ञान वापरून जगभर आपली सत्ता विस्तारित करू शकले असते; तेव्हा त्याचा स्वार्थासाठी वापर न करता, ती शस्त्रास्त्रे आणि तंत्रज्ञान त्यांनी नष्ट करणे काहीसे कल्पनातीत नाही का वाटत?

शिक्षणावरील प्रतिबिंब : हा समूह तर वैज्ञानिक विचार रुजवणाऱ्या शिक्षण व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करू पाहतो आहे. एवढ्या मोठ्या वर्गावरील अविवेकी विचारांचा प्रभाव हे आपल्या शिक्षण व्यवस्थेचे अपयश आहे. लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेमध्ये निष्णात असणारा डॉक्टर जेव्हा ही विद्या पुरातन काळात अस्तित्वात होती असे म्हणतो आणि ते पटवून देण्यासाठी महाभारतातील शिखंडी या किन्नराचं उदाहरण देतो, तेव्हा भारतीय मनावरील वैज्ञानिक विचारांच्या प्रभावांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. इतिहासाचा अभ्यास करताना आपण तर्कशुद्ध आणि कालसुसंगत विचारांवर मुळीच भर देत नाही, हे यावरून स्पष्ट होते. इतिहास हा केवळ तारखेपुरता मर्यादित नाही. मानवी संस्कृतीचा क्रमाक्रमाने होत गेलेला विकास म्हणजे खऱ्या अर्थाने इतिहासाचा अभ्यास.

त्यामुळे जर ‘पूर्वजांना अमुक तंत्रज्ञान अवगत होते’, असे कुणीही म्हणाला, तर क्षणभर विचारांना विश्रांती द्या. त्यानंतर नैसर्गिक प्रक्रियेबाबत ज्ञान मिळवण्यासाठी इतर काय काय माहिती आवश्यक आहे, याचा विचार करून बघा. ‘हे संपूर्ण ज्ञानभांडार अमुक काळीच अस्तित्वात होते’, यावर स्वतःचा विश्वास बसला, तर तो इतरांनाही पटवून द्या. त्यासाठी मग योग्य भाषेतील विश्वसनीय दस्तावेज, प्रयोगासाठी लागणारी साधनसामग्री, तंत्रज्ञान आणि गणितविषयक कौशल्य याबाबतीतील पुरावे देता येतील. असे पुरावे नसतील, तर ते सर्व दावे अप्रशिक्षित मेंदूतून जन्माला आलेल्या कल्पनाच आहेत. असे दावे करणाऱ्यांपैकी कुणीही आजवर, ‘यानंतर आता अमुक तंत्रज्ञान विकसित होईल आणि प्राचीन साहित्यात त्याबद्दल असं-असं विश्लेषण दिलं आहे’, असा अंदाज व्यक्त केला नाही.

पूर्वीच्या वैज्ञानिकांना आपल्या क्षमतांचा पुरेसा अंदाज नव्हता, असेही मत मांडले जाऊ शकते; तर मग त्यानंतरच्या काळात तरी त्या सर्व तंत्रज्ञानाच्या परिणामांसंदर्भात अंदाज मांडायला हवे होते. निदान आधुनिक वाचकांना प्राचीन मांडणीवरून असे अंदाज बांधता यायला हवेत.

वादविवादाची कर्कशता : अशा सबळ युक्तिवादाच्या आधारे मूल्यांकन केले, तर हे सर्व भपकेबाज दावे सपशेल अपयशी ठरतात. एवढेच नव्हे, तर त्यामुळे संपूर्ण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेला सुरुंग लागून भारताच्या भूतकाळातील प्रामाणिक वैज्ञानिक अभ्यासाबद्दलही संशय निर्माण होतो. अशा प्रयत्नांमुळे समकालीन वैज्ञानिकांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण होते. तसेच आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानापासून लक्ष व संसाधने दूर जाऊ लागतात. एकशे दोनव्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये ‘संस्कृतमधील विज्ञान’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. त्यात प्राचीन भारतीयांच्या खऱ्या वैज्ञानिक क्षमतेबद्दल चर्चा झाली. त्याचदरम्यान ‘प्राचीन भारतीय परग्रहाच्या वाऱ्या करू शकत होते’, असे दावे इतर मंचावरून केले गेले. पूर्वजांना भारतीय उपखंडापलीकडे भौगोलिक परिस्थितीचे ज्ञान नव्हते. त्यामुळे असे दावे मान्य करणे अवघड आहे. पाचव्या शतकाच्या सुमारास भारतात पृथ्वीचा आकार गोल आहे, हेसुद्धा मानले जात नसे. त्याचदरम्यान आर्यभट्टाने ग्रहकेंद्रित सौरप्रणालीची संकल्पना मांडली. जगाला वेगळे वळण लावणाऱ्या गणित आणि खगोलशास्त्रातील प्राचीन भारतीयांच्या अशा सखोल आकलनीय अभ्यासाकडे कुणाचेही लक्ष जात नाही. ही मूलभूत समस्या आहे. समकालीन वैज्ञानिकांना त्यांत कट्टर राष्ट्रवादाची भुतं दिसतात, तर कट्टर राष्ट्रवाद्यांना त्यांच्या राष्ट्रीय बांधिलकीविषयी संशय वाटतो. या सगळ्या गोंधळात धर्मद्रोह्यांद्वारे आपल्या प्राचीन वारशाची हेटाळणी केली जात आहे.

पर्यायाने आपण सर्वच आपला राष्ट्रीय वारसा आणि गौरव गमावून बसतो. असत्याचा वारंवार रेटा लावला तर ते सत्य म्हणून मान्य होईल, असा या कट्टर राष्ट्रवाद्यांचा समज आहे. भारतीय वैज्ञानिक यशाला योग्य ती मान्यता आणि ओळख मिळवून देण्याच्या त्यांच्या मूलभूत हेतूलाच हा विचार बाध्य ठरतो. समकालीन वैज्ञानिकांमध्ये अशा घटकांकडून तिरस्कृत झाल्याची भावना निर्माण होते. प्राचीन विज्ञानाबाबत तर्कसंगत चर्चा करू पाहणाऱ्या व्यासपीठावरही या घटकांच्या कर्कश आवाजामुळे चिंतेचे सावट पसरलेले जाणवते.

भारताचे विज्ञानातील खरे योगदान : भारतीयांची कामगिरी त्या काळाच्या अनुषंगाने अगदीच लक्षणीय नव्हती, असे नाही. नरसिंहा यांनी संपादकीय लेखात (‘करंट सायन्स’च्या प्रस्तुत अंकात) मांडल्याप्रमाणे, सहज म्हणून भारतभेटीला आलेल्या पर्यटकांच्या मनावरही छाप सोडून जाणारी कामगिरी भारतीयांनी बजावली आहे. आर्यभट्ट आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलेले संशोधन, प्राचीन-कालीन धातू वितळविण्याचे कौशल्य विकसित केलेला समूह, केरळमधील शिक्षणसंस्थेचे गणित विषयातील कार्य, संस्कृत साहित्यातील धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन आणि त्याद्वारे जागतिक कार्यपद्धतीवर केलेला गुंतागुंतीचा युक्तिवाद, हडप्पा संस्कृतीतील नगररचना, ताजमहालसारखे वास्तुकलेचे अद्वितीय नमुने, टिपू सुलतानाच्या फौजेतील अग्निबाण अशी आपल्या पूर्वजांच्या वाखाणण्याजोग्या कामगिरीची भली मोठी यादी करता येईल.

उदाहरणार्थ- पायथागोरसचे प्रमेय सर्वप्रथम भारतीय गणितज्ञांनीच शोधून काढले, हे सर्वश्रुत आहे. मुळात ग्रीक लोकांना या सिद्धांताची माहिती सर्वांत शेवटी झाली, हेसुद्धा स्पष्ट आहे. पण अशा ठाम मतांसोबतच, परग्रहावर जाऊ शकणाऱ्या विमानाची निर्मिती केल्याचाही दावा जेव्हा केला जातो, तेव्हा खऱ्या कामाबद्दलही संशय निर्माण होतो. प्राचीन भारताचे वैभव परत मिळवून देऊ पाहणारेच त्यासाठी नुकसानकारक ठरतात. भारतीय विज्ञान काँग्रेसमधील ‘संस्कृतमधील प्राचीन विज्ञान’ या विषयावरील चर्चासत्र काहीसे असे होऊ शकले असते :

1. न्याय-वैशेषिक व्यवस्था: या प्राचीन भारतातील नैसर्गिक प्रक्रियांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करणाऱ्या संस्था. वैदिक साहित्यावर आधारित असलेल्या तर्कशास्त्राच्या प्रमुख सहा संस्थांपैकी या दोन संस्था आहेत. त्यांनी केलेले निसर्ग आणि भौतिक प्रक्रियांचे वर्णन बऱ्याच प्रमाणात आधुनिक आणि क्लिष्ट आहे. कुठल्याही रचनेबाबतीतील ज्ञान ते सात भागांमध्ये विभागतात, त्यांना पदार्थ असे संबोधले जाते. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समयाय आणि अभाव असे हे सात पदार्थ. वस्तूंचे गुणधर्म समजून घेण्याचा एक वेगळा दृष्टिकोन यातून मिळतो. विशेष म्हणजे, कुठल्याही धार्मिक किंवा परमेश्वरासंबंधी भावनांना त्यातून आवाहन केले जात नाही. सर्वोत्तम बुद्धिप्रामाण्यवादी परंपरेतील हा अभ्यास म्हणता येईल.

2. योग आणि आयुर्वेद : म्हणजेच- प्राचीन भारताचा स्वास्थ्य आणि आजारपणासंदर्भातील दृष्टिकोन. या संस्था स्वयंशिस्त, व्यायाम आणि वनस्पतीजन्य औषधींवर आधारित आहेत. जीवन आणि स्वास्थ्याबाबतच्या त्यांच्या सर्वसमावेशक हाताळणीतून नव्या विचारांना प्रेरणा मिळाली आहे. त्यामुळेच जगभरातील आरोग्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना त्यांचे आकर्षण वाटते. योगावर आधारित हे आरोग्यशास्त्र खऱ्या अर्थाने चिकित्सक, तर्कसंगत आणि व्यवहार्य आहे. ही आरोग्यसंस्था विकसित होऊन आधुनिक प्लॅस्टिक सर्जरीसारख्या क्लिष्ट शस्त्रक्रिया शक्य झाल्या.

3. विज्ञानविषयक भारतीय तत्त्वज्ञान : योजनाबद्ध अभ्यासाच्या अभावामुळे निसर्गाप्रतीचा भारतीय दृष्टिकोन आणि त्यामागील तत्त्वज्ञान आपल्याला पूर्णतः समजून घेता आले नाही. या धर्मनिरपेक्ष तत्त्वज्ञानामध्येच मानव, त्यांच्या पर्यावरणासोबतच्या अन्योन्य क्रिया आणि नैसर्गिक प्रक्रियांबद्दल काही अतिशय अभ्यासपूर्ण कल्पना दडलेल्या आहेत. न्याय-वैशेषिक संस्थेच्या युक्तिवादापालीकडे जाऊन त्यात तर्कशास्त्र, प्रयोजन आणि शंकांसंदर्भातील अनेक समस्यांवर चर्चा केली आहे. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, त्यातील मानवी शोषण आणि निसर्गप्रेमाची चर्चा कमालीची सर्वसमावेशक आहे.

4. वेदांपासून ते केरळमधील शिक्षणसंस्थेतील भारतीय गणितशास्त्राचा आढावा: भारतीय गणितशास्त्रातील कामगिरी सर्वदूर पोचली होती. अंकगणितातील सिद्धांत, बीजगणितातील प्रमेये अशा वैविध्यपूर्ण संकल्पना भारतीयांनी मांडल्या आहेत. आणि त्यांना योग्य मान्यतासुद्धा मिळाली.

5. भारतीय संहितेतील खगोलशास्त्रीय कल्पना: भारतीय खगोलशास्त्र हे अचूक आणि व्यावहारिक होते. ग्रीक खगोलशास्त्राला जणू वर्तुळाकारांची भुरळ पडली होती. अशा कुठल्याही प्रभावात न येता भारतीय खगोलशास्त्रात ग्रहांची हालचाल समजण्यासाठी उपयुक्त समीकरणे शोधण्यावर भर दिला गेला. त्यातूनच त्रिकोणमितीतील पायाभूत संकल्पना उदयाला आल्या. ग्रहण मोजण्यासाठी अवलंबिलेली पद्धत, ग्रहांच्या संक्रमणाच्या नोंदी यावरून भारतीय खगोलशास्त्राच्या संपन्नतेचा अंदाज येऊ शकतो. आर्यभट्टाने खगोलशास्त्रीय गणनेसंदर्भात ज्ञानकोशीय कार्य केले आहे. त्यासोबतच वराहमिहिराने परिभाषित केलेला खगोलशास्त्राचा अभ्यासक्रम, अनेक संकल्पनांचे स्पष्टीकरण ही सगळी कामगिरी विस्मयकारक आहे.

6. ग्रहण आणि ग्रहसंयोग: मुहूर्त, तिथी, दिनदर्शिका, ग्रहण आणि ग्रहसंयोग हे भारतीय खगोलशास्त्र आणि पंचांगनिर्मितीचे महत्त्वाचे घटक होते. व्यातिपद या सूर्य, चंद्र आणि राहूच्या संयोगातून निर्माण होणाऱ्या ग्रहणासंबंधीचा साधक-बाधक विचार खरेच आकर्षक वाटतो. चर्चेच्या विषयाची व्याप्ती वाढवून विज्ञानासोबतच स्थापत्यशास्त्र आणि तंत्रज्ञानाचा समावेश केला असता; तर हडप्पा संस्कृती, ताजमहाल, टिपू सुलतानाचे अग्निबाण हे सर्व त्या यादीत समाविष्ट करता आले असते. भारतीय मंदिर स्थापत्यशास्त्रावरही चर्चा करता आली असती.

या मुद्यांच्या आधारे चर्चा झाली असती, तर भारतीय विज्ञानाचा एक पोषक वारसा सर्वांच्याच मनावर बिंबवला गेला असता. या चर्चेत सहभागी झालेले बहुतेक सर्वच जण निःपक्षपाती असून पुराव्यांच्या आधारे संशोधन करतात. त्यामुळे अतिशय काटेकोर तपासणीतून ही मौल्यवान कामगिरी समोर आली आहे, याचा आपल्याला सार्थ अभिमान असायला हवा.

वर्तमान वादविवादाच्या परिणामांवरील प्रतिबिंब

परंतु, एका विशिष्ट समूहाच्या टोकाच्या दाव्यांमुळे आपण सर्वच गमावू लागतो. म्हणजेच भारतीय भूतकाळाचा निःपक्षपाती आणि वास्तववादी अभ्यास द्वेषास सदैव पात्र ठरेल. त्यामुळे कुठलाही बुद्धिप्रामाण्यवादी वैज्ञानिक किंवा नागरिक तो अभ्यास करायला धजावणार नाही.

अशा संकुचित विचारांचा प्रभाव सरकारी संस्थांवर असल्यास, बुद्धिप्रामाण्यवादी वैज्ञानिकांचे कार्यक्षेत्रही हळूहळू मर्यादित होऊ लागेल. ‘निखळ उत्कृष्टतेतूनच वचनबद्ध श्रेष्ठत्व उदयाला येते’, असे एक विरोधाभासी अलंकाराचे उदाहरण आहे. मुळात वचनबद्ध श्रेष्ठत्व असे काही असूच शकत नाही. निळ्या चष्म्यातून पांढरा रंग दिसणे अशक्य. सलग निळा रंग दिसू लागला, तर तिथे पांढरा रंग असू शकतो, असा अंदाज बांधण्यात कदाचित काही लोक यशस्वी होतील. पण बहुतांश मंडळी जगाचा रंग निळा आहे, याच समजुतीत राहतील. परिणामी, जे लोक इतर रंग बघू शकतात, ते समाजबहिष्कृत होतील. चष्मा न वापरणाऱ्यांच्याच सोबतीने त्यांना राहावे लागेल. अन्यथा, जिथे चष्मे वापरण्याची पद्धत नाही अशा प्रदेशांकडे वळावे लागेल. त्यामुळे आपण अधिक कमकुवत होऊ, आपली प्रतिष्ठा ढासळू लागेल आणि त्या दबावाने परतीची वाट शोधणे अपरिहार्य होईल.

तर, आपण करायचे तरी काय? एक तर या समूहाचे पितळ उघड करणे आवश्यक आहे. त्यासाठी सुनियोजित प्रयत्न करावे लागतील. वैज्ञानिकांना त्यांचा पारंपरिक लाजाळूपणा सोडावा लागेल. भूतकाळाबाबत अज्ञान किंवा अहंभाव न दाखवता, ‘या समूहाचे सर्व दावे मूर्खपणाचे आहेत’, हे आपल्याला लोकांना पटवून द्यावे लागेल. वैज्ञानिकांना सर्वप्रथम आपल्या ऐतिहासिक कामगिरीबाबत परिपूर्ण माहिती मिळवावी लागेल, तरच या समूहाचा सामना करण्यासाठी पाऊल पुढे टाकता येईल. कारण हा समूह सुसंघटित आहे. त्यांना आर्थिक अनुदान प्राप्त आहे, त्यांचा आवाज सर्वदूर पोचू शकतो. शक्तिस्थानांकडून प्रेरणा मिळत नसेल, तरीही त्यांच्या कृत्यांकडे दुर्लक्ष नक्कीच केले जाते. ही परिस्थिती कळल्यावर मन विचलित होऊ शकते. पण ही आपल्या देशाच्या आत्म्यासाठीची लढाई आहे. या लढाईला आता फार अवधी उरला नाही. ही लढाई अतिशय क्रूर, कठीण आणि दीर्घ काळ चालणारी असेल. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक मंचावर ती लढावी लागेल. भारतीय विज्ञान काँग्रेस, वृत्तपत्रे आणि इतर सार्वजनिक मंचावर लढा द्यावा लागेल. भारताच्या आत्म्याची चिंता असणाऱ्या आणि बुद्धिप्रामाण्यवादी समाजनिर्मितीचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकाला या लढ्यात सहभागी व्हावेच लागेल.

(अनुवाद: नीलेश मोडक)

मयंक वाहिया यांचा हा लेख ‘करंट सायन्स’ या इंग्रजी नियतकालिकात 25 जून 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाला होता.

Tags: भारतातील प्राचीन विज्ञान मयंक वाहिया प्राचीन भारतातील वैज्ञानिक प्रगती (दाव्यांचे मूल्यांकन) नीलेश मोडक करंट सायन्स neelesh modak Ancient Science Of India Mayank Vahiya Pracheen Bharatatil Vaidnyanik Pragati ( Davyanche Mulkyan) weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके