डिजिटल अर्काईव्ह

मी वडाच्या झाडाकडे धावलो. याच वटवृक्षाच्या सावलीत मी बालपणीचा आनंद लुटला होता. हेच आमचे बालपणीचे मैदान, आणि तारुण्यातील सुखप्रद आश्रयस्थान होते. आह ! या प्रिय वडाला बघताच मला धक्का बसला आणि मन दुःखी झाले. त्या झाडाकडे बघून अशा अशा हृदयद्रावक घटना आठवल्या की, मी जमिनीवर बसून रडलो. हो! हेच ते वडाचे झाड आहे, ज्याच्यावर चढून मी त्याच्या पारंब्यांपर्यंत पोहोचत होतो. ज्या पारंब्या आमचा झोका बनत होत्या. आणि ज्याची फळे जगातील कोणत्याही मिठाईपेक्षा मधुर लागत होती. माझ्या गळ्यात गळा घालून खेळणारे माझे लंगोटी मित्र कुठे गेले?

आज बरोबर साठ वर्षांनी मला माझ्या मातृभूमीचे दर्शन होते आहे. ज्या वेळी मी माझा प्रिय देश सोडला होता आणि माझे नशीब मला पश्चिमेच्या दिशेला घेऊन गेले होते, त्या वेळी मी तरुण होतो. माझ्या नसांमधून नवीन रक्त सळसळत होते. हृदय नवीन आशा-आकांक्षांनी भरून गेले होते. मला आपल्या प्रिय भारत देशापासून कुणा अत्याचाराने अथवा न्यायाच्या प्रबळ हाताने दूर केले नव्हते. अत्याचारीचे अत्याचार अथवा कायद्याची कठोरता काय वाट्टेल ते करू शकली असती, पण मला माझ्या प्रिय मातृभूमीपासून वेगळे करू शकली नसती. मला माझ्या उच्च आकांक्षांनी आणि उच्च विचारांनी मातृभूमीपासून दूर नेले होते.

मी अमेरिकेत जाऊन खूप व्यापार केला आणि त्यातून खूप पैसेदेखील मिळवले. पैशाबरोबर मिळणाऱ्या सर्व सुखांचादेखील मी मनसोक्त उपभोग घेतला. सुदैवाने मला पत्नीदेखील सुंदर मिळाली. माझ्याशिवाय अन्य विचार तिच्या मनालादेखील स्पर्श करीत नसे आणि ती माझे सर्वस्व होती. मला पाच मुले होती. जी सुंदर, धष्टपुष्ट आणि प्रामाणिक होती. त्यांनी माझा व्यापार अजूनच वाढवला. माझी नातवंडे माझ्या मांडीवर खेळत होती. अशा परिस्थितीत मला माझ्या प्रिय मातृभूमीचे दर्शन घेण्याची इच्छा झाली. मी खूप धन, प्रिय पत्नी, गोड नातवंडे, लाडकी मुले या सगळ्यांचा त्याग करून माझ्या भारत जननीचे अंतिम दर्शन करण्याचे ठरवले. मी खूप म्हातारा झालेलो आहे, दहा वर्षांनंतर मी 100 वर्षांचा होईन. आता माझ्या मनात एकच अभिलाषा आहे की, मी माझ्या मातृभूमीच्या मातीत मिसळून जावे.

ही इच्छा माझ्या मनात काही आज उत्पन्न झालेली नाही, तर ज्या काळात माझी प्रिय पत्नी आपल्या मधुर वाणीने आणि कोमल कटाक्षांनी माझे मन प्रफुल्लित करीत असे, त्याही दिवसांत माझ्या मनात हीच इच्छा डोकावत होती. माझे तरुण पुत्र सकाळी येऊन जेव्हा मला प्रणाम करीत, त्याही वेळी माझ्या मनात खोलवर कुठेतरी एक काटा सलत असायचा की, मी माझ्या मातृभूमीपासून दूर पडलोय. हा देश माझा नाही, मी या देशाचा नाही. 

मला धन मिळाले, पत्नी मिळाली, पुत्र-पौत्र मिळाले, इस्टेट मिळाली... तरी का कोण जाणे मला राहून राहून आपल्या देशातील मोडकीतोडकी झोपडी, चार-सहा बिघे जमीन आणि बालपणीचे ते लंगोटी मित्र यांची आठवण अस्वस्थ करीत असे. प्रायः अत्यंत आनंदाच्या वा सुखाच्या क्षणीच मनात विचार चमकून जायचा की, "मी आपल्या देशात असतो तर..."

2

ज्या वेळी मी जहाजातून मुंबईला उतरलो, तेव्हा मी पहिल्यांदा कोट-पँट घातलेले, मोडकीतोडकी इंग्रजी बोलणारे खलाशी पाहिले. मग इंग्रजी दुकाने, ट्राम गाड्या आणि मोटारी दिसल्या. त्यानंतर रबरी टायर लावलेल्या गाड्या, आणि तोंडात चिरूट दाबून धरलेली माणसे यांचीही गर्दी दिसली. मग रेल्वेचे व्हिक्टोरिया टर्मिनस स्टेशन पाहिले. नंतर रेल्वेगाडीत बसून हिरव्यागार डोंगरामधून प्रवास करीत मी माझ्या गावी पोहोचलो. त्या वेळी माझे डोळे पाण्याने भरून आले. मी खूप रडलो. कारण हा माझा देश नव्हता. हा तर एखादा वेगळाच देश होता. अमेरिका अथवा इंग्लंडसारखा. परंतु माझ्या स्वप्नातला प्रिय भारत मात्र निश्चित नव्हता.

जंगल, पर्वत, नद्या, मैदाने पार करीत माझ्या प्रिय गावी रेल्वेगाडी पोहोचली खरी, जे कधीकाळी पाने, फुले आणि फळे यांनी बहरलेले असायचे आणि नदी-नाल्याच्या जलसंचयांनी ते जणू स्वर्गाशी स्पर्धा करीत असायचे. मी गाडीतून खाली पाऊल टाकले तेव्हा माझे हृदय आनंदाने उचंबळून आले. मी आता माझे प्रिय घर पाहीन. लहानपणीच्या मित्रांना भेटेन. आता मी 90 वर्षांचा वृद्ध आहे हे मी विसरूनच गेलो. मी गावाच्या जवळ पोहोचू लागलो तशी माझ्या पावलांची गती वाढली. प्रत्येक वस्तूकडे मी डोळे फाडून पाहू लागलो. अहाहा! हाच तो ओढा. या ओढ्यात आम्ही रोज घोडे धूत होतो आणि स्वतःही बुड्या मारीत होतो. परंतु आता त्याच्या दोन्ही तीरांवर काटेरी तारा बसवल्या होत्या. समोर एक बंगला होता. त्या बंगल्यात दोन इंग्रज हातात बंदुका घेऊन सगळीकडे नजर ठेवून होते. ओढ्यात स्नान करायची आता सक्त मनाई होती.

मी गावात प्रवेश केला आणि माझी नजर बालपणीचे सवंगडी शोधू लागली. पण माझे दुर्दैव आड आले. ते सगळे मृत्युमुखी पडले होते. माझे घर - तुटकीफुटकी झोपडी, जिच्या मांडीवर मी अनेक वर्षं खेळलो होतो, तिथेच बालपणीचा आनंद लुटला होता, आणि ज्याचे चित्र आजही माझ्या डोळ्यासमोर तरळत होते, ते माझे प्रिय घर आता भुईसपाट झाले होते.

तशी त्या जागेवरची वस्ती उठली नव्हती. शेकडो लोक इकडून तिकडे येता-जाताना दिसत होते, जे कोर्टकचेरीच्या आणि पोलीस स्टेशनच्या गप्पा मारीत होते. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता आणि उदासीनता दिसत होती. सांसारिक चिंतांनी सगळे व्यथित झालेले दिसत होते. माझ्या सोबत्यांप्रमाणे निकोप, बलवान आणि लालबुंद चेहऱ्याचे नवयुवक कुठेच दिसत नव्हते. माझ्या हाताने ज्या आखाड्याचा पाया खणला होता, तिथे आता एक पडकी शाळा होती. त्या शाळेत दुर्बल, कांतिहीन, रोगट दिसणारी, फाटके कपडे घातलेली मुले बसल्या बसल्या डुलक्या घेत होती. त्यांना पाहून नकळत माझ्या मुखातून उद्गार निघाले, '... नाही, नाही, हा माझा प्रिय देश नाही. हा देश पाहण्यासाठी मी इतक्या दुरून आलो नाही. हा माझा प्रिय भारतवर्ष नाही...'

मी वडाच्या झाडाकडे धावलो. याच वटवृक्षाच्या सावलीत मी बालपणीचा आनंद लुटला होता. हेच आमचे बालपणीचे मैदान, आणि तारुण्यातील सुखप्रद आश्रयस्थान होते. आह ! या प्रिय वडाला बघताच मला धक्का बसला आणि मन दुःखी झाले. त्या झाडाकडे बघून अशा अशा हृदयद्रावक घटना आठवल्या की मी जमिनीवर बसून रडलो. हो! हेच ते वडाचे झाड आहे, ज्याच्यावर चढून मी त्याच्या पारंब्यांपर्यंत पोहोचत होतो. ज्या पारंब्या आमचा झोका बनत होत्या. आणि ज्याची फळे जगातील कोणत्याही मिठाईपेक्षा मधुर लागत होती. माझ्या गळ्यात गळा घालून खेळणारे माझे लंगोटी मित्र कुठे गेले ? हाय, घरदार नसलेला असा प्रवासी केवळ मीच आहे का? माझा कुणीच मित्र या गावात उरला नाही का? या वडाच्या झाडाशेजारीच पोलीस ठाणे होते आणि झाडाच्या खाली लाल फेटा बांधलेला कुणी बसला होता. त्याच्या आसपास दहा-वीस लाल पगडीवाले उभे होते. तिथेच पलीकडे फाटके कपडे घातलेला, दुर्भिक्षग्रस्त, अंगावर चाबकाच्या फटके मारल्याच्या खुणा असलेला पुरुष उसासे टाकत होता. मला पुन्हा प्रतीत झाले की, हा माझा देश नाही. दुसराच कोणता तरी देश आहे. युरोप असेल, अमेरिका असेल, परंतु ही माझी प्रिय मातृभूमी नाही - कदापि नाही.

3

इथे निराश झाल्यावर मी चावडीकडे वळलो. माझे वडील संध्याकाळी गावातील अन्य प्रतिष्ठित लोकांबरोबर इथे बसून हुक्का पीत, गप्पा-विनोद करीत असत. आम्हीही तिथेच त्या तट्ट्याच्या बैठकीवर बसून कोलांट्या उड्या मारीत असू. कधी कधी तिथे पंचायतीची बैठक व्हायची, माझे वडील नेहमी पंचायतीचे सरपंच असायचे. चावडीजवळ एक गोशाला होती. तिथे गावातील सगळ्या गायी ठेवल्या जात. आम्ही तिथे पाडसांबरोबर खेळत असू. पण आता त्या चावडीचा पत्ता नव्हता. तिथे आता देवी टोचण्याचे केंद्र आणि पोस्ट ऑफिस झाले होते. त्या काळी चावडीला लागूनच एक उसाचे गुऱ्हाळ होते. थंडीच्या दिवसांत तिथे उसाचा रस काढला जाई आणि ताज्या गुळाचा वास नाकात शिरायचा. मी आणि माझे सोबती उसाच्या गंडेऱ्यांसाठी तिथे बसून राहायचो. गंडेऱ्या करणाऱ्यांचे हस्तकौशल्य बघून आम्ही आश्चर्यचकित होत असू. तिथे हजारो वेळा मी उसाचा रस दूध मिसळून प्यालो होतो आणि तिथे आसपासच्या घरातील स्त्रिया आणि मुले आपली आपली भांडी घेऊन येत असत आणि त्यात रस भरून घेऊन जात असत. दुःख याचे वाटते आहे की, ते बैल अजून तिथेच होते, पण गुऱ्हाळाऐवजी आता तिथे ताग गुंडाळणारे यंत्र होते आणि त्याच्यासमोर एक पानाचे आणि सिगारेटचे दुकान झाले होते. हे हृदयविदारक दृश्य बघून मी एका सभ्य दिसणाऱ्या गृहस्थाला विचारले, "महाराज, मी एक परदेशी प्रवासी आहे. मला रात्रभर इथे कुठे राहायला जागा मिळेल का?" त्या माणसाने माझ्याकडे आपादमस्तक पाहून उत्तर दिले, "पुढे जा. इथे जागा नाही." मी पुढे गेलो. तिथेही मला हेच उत्तर मिळाले. मी पाचव्या ठिकाणी रात्रीचा आसरा मागितला तेव्हा त्या सज्जन माणसाने माझ्या हातावर मूठभर चणे ठेवले. चणे माझ्या हातातून गळून पडले. डोळ्यातून अविरत अश्रुधारा वाहू लागल्या. तोंडातून पुन्हा सहज शब्द उमटले, "हाय ! हा माझा देश नाही, हा दुसराच कोणता तरी देश आहे. हा माझा अतिथीसत्काराबद्दल प्रसिद्ध असलेला प्रिय भारत देश नाही."

मला अचानक धर्मशाळेची आठवण झाली. मी परदेशात गेलो तेव्हा ती नुकतीच बांधली जात होती. मला वाटले की, तिथे कशीबशी रात्र काढता येईल म्हणून मी धर्मशाळेकडे गेलो. पण तिथेही दुर्दैव आड आले. ती धर्मशाळा होती, पण गरिबांना तिथे राहायला जागा नव्हती. तो दारू, जुगार यांचा अड्डा बनला होता. तिथे सगळे वाईट उद्योग चालत होते. धर्मशाळेची ही अवस्था बघून माझ्या छातीत कळ आली. मी जोराने ओरडलो, "नाही.. नाही... हजार वेळा नाही. हा माझा प्रिय भारत देश नाही. हा युरोप असेल, अमेरिका असेल, पण भारत मात्र कदापि असू शकणार नाही."

4

अंधारी रात्र होती. कोल्हे-कुत्रे कर्कश स्वरात ओरडत होते. मी दुःखी मनाने ओढ्याच्या काठी जाऊन बसलो होतो. आता काय करावे असा मी विचार करीत होतो. आपण परत आपल्या मुलाकडे जाऊन हे शरीर अमेरिकन मातीतच एकरूप होऊ द्यावे का?... आतापर्यंत मी परदेशात राहत असलो तरी मला माझी मातृभूमी होती. माझ्या मनात माझ्या देशाच्या आठवणी सतत पिंगा घालायच्या. पण आज मी परका झालो होतो. मला माझा असा देशच उरला नव्हता. गुडघ्यात मान घालून मी पुष्कळ वेळ याचा विचारात निःस्तब्ध बसलो होतो. कुठेतरी रात्रीचे तीन ठोके पडले आणि त्याच वेळी कुणाच्यातरी गाण्याचे सूर कानी पडले. ते सूर ऐकून माझे हृदय सद्गतीत झाले. हा तर माझ्याच देशाचा राग होता. हे माझ्याच मातृभूमीचे स्वर होते. मी झटकन उठून उभा राहिलो. पाहतो तर 15-20 वृद्ध स्त्रिया स्नानाला चालल्या होत्या. चालता चालता त्या गात होत्या. त्या स्त्रिया पांढऱ्या साड्या नेसल्या होत्या. हातात तांबे घेतलेले होते. त्यांच्या मुखातून भक्तिगीताचे मधुर स्वर उमटत होते, "हमारे प्रभू, अवगुण चित न धरो."

हे गीत ऐकताना माझी तंद्री लागतच होती, इतक्यात मला काही लोकांचा बोलण्याचा आवाज आला. त्यातील काही लोकांच्या हातात पितळेचे कमंडलू होते. ते तोंडाने 'शिव-शिव, हरहर गंगे-गंगे, नारायण नारायण' असे शब्द म्हणत होते. त्याचा जो प्रभाव माझ्या मनावर पडला, त्याचे वर्णन करणे अवघड आहे.

मी अमेरिकेतील चंचल आणि प्रसन्न चित्ताच्या स्त्रियांचा आलाप ऐकला होता, हजारो वेळा त्यांच्या तोंडातून प्रेमाचे शब्द ऐकले होते. पक्ष्यांचे सुरेल गायनही ऐकले होते, पण जो आनंद, जे सुख मला या रागापासून मिळाले ते मला जीवनात कधीही लाभले नव्हते. मीपण त्यांच्याबरोबर त्यांचे गीत गाऊ लागलो, "हमारे प्रभू, अवगुण चित न धरो."

माझे हृदय पुन्हा उत्साहाने भरून आले. कारण ते सगळे माझ्या प्रिय देशाचेच जीवन होते. आनंदातिरेकाने माझे हृदय भरून आले. मी त्यांच्या बरोबर चालू लागलो. आणि सहा मैल पहाडी मार्ग पार करीत त्याच नदीकिनारी पोहोचलो, जिचे नाव पतित-पावनी आहे. जिच्यात डुबकी मारणे आणि जिच्या कुशीत अंतिम श्वास घेणे हे प्रत्येक हिंदूला भाग्याचे वाटते. अशी ही पतित-पावनी गंगा माझ्या प्रिय गावापासून अवघ्या सहा-सात मैलांवरून वाहते. कधी काळी माझ्याही मनात घोड्यावर बसून गंगामातेच्या दर्शनाला जायची लालसा सदैव असायची. इथे हजारो माणसांना नदीच्या थंड पाण्यात बुचकळ्या मारताना मी पाहिले होते. काही लोक वाळूत बसून गायत्री मंत्र जपत होते. काही लोक हवन करण्यात गुंतले होते. काही कपाळावर टिळा लावत होते आणि काही लोक वेदमंत्र म्हणत होते. माझे मन उल्हसित झाले आणि मी जोरात म्हणालो, "हो, हा माझा देश आहे. हीच माझी मातृभूमी आहे. हाच माझा सर्वश्रेष्ठ भारत देश आहे. याचे दर्शन घडावे हीच माझी उत्कट इच्छा होती. याच देशाची पवित्र धूळ बनावे असे मला वाटत होते."

5

मी विशेष आनंदात मग्न होतो. मी अंगावरील कोट-पँट उतरवून ठेवली, आणि मी गंगामैयाच्या पाण्यात स्वतःला झोकून दिले. हो, आता मी आपल्या देशात आहे. ही माझी प्रिय मातृभूमी आहे. हे लोक माझे भाऊ आहेत, आणि गंगा माझी आई आहे...

मी गंगेच्या काठावर एक झोपडी बांधली आहे. आता मला केवळ रामनाम घेण्यावाचून कोणतेही काम नाहीये. मी दररोज सकाळ-संध्याकाळ गंगास्नान करतो. माझी इच्छा आहे की, गंगेच्या काठीच माझे प्राण जावेत आणि माझ्या अस्थींचे विसर्जन गंगेतच व्हावे.

माझी पत्नी, माझी मुले मला परत बोलावत आहेत. पण हा गंगेचा किनारा आणि आपला देश सोडून मी कुठेही जाऊ इच्छित नाही. मला माझी रक्षा गंगेतच अर्पित करायची आहे. आता जगातील कोणतीच शक्ती मला गंगेपासून वेगळे करू शकत नाही. कारण हाच माझा देश आहे, हीच माझी मातृभूमी आहे. आता माझी एकच उत्कट इच्छा आहे की, मी माझ्या मातृभूमीवरच माझा देह टाकावा.

अनुवाद : चंद्रकांत भोंजाळ

'यही मेरा वतन है' या नावाने उर्दूमध्ये प्रथम प्रकाशन. 'सोजे वतन' (उर्दू कथासंग्रह) जुलै 1908 मध्ये संकलित. हिंदी कथा 'यह मेरी मातृभूमी है' या शीर्षकाने प्रकाशित झाली.
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मुन्शी प्रेमचंद ( 8 लेख )

मुन्शी प्रेमचंद (जन्म : वाराणसी, 31 जुलै 1880-8 ऑक्टोबर 1936) हे हिंदी व उर्दू साहित्यातील नावाजलेले लेखक होते. त्यांना उपन्यास सम्राट म्हणून गौरविले जाते. प्रेमचंदांनी इ.स. 1913 ते इ.स. 1931 पर्यंत एकूण 224 कथा, 100 लेख आणि 18 कादंबऱ्या लिहिल्या.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी