डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

'ऑपरेशन नंदीग्राम'द्वारे नंदीग्राम परिसरातल्या, 'बंडखोर' गावांचा ताबा घेणे, ही काही 'चुकीने घडलेली' गोष्ट नाही. राज्य सरकारचे प्रशासन व सत्तेवर असलेला पक्ष यांच्या संगनमताने नियोजनपूर्वक घडवलेली ही कारवाई होती. त्याचे सज्जड पुरावे आहेत- की कशा रीतीने हत्यारे, गुन्हेगार, पार्टीचे गुंड नियोजनबद्ध रीतीने जमले; हरमदांना धुडगूस घालता यावा म्हणून पोलीस कॅम्प्स हटवले गेले; पोलिसांकडे तक्रारी करूनही होत असलेल्या अत्याचाराकडे पोलिसांनी कसे दुर्लक्ष केले अथवा काहीतरी थातुरमातुर करून कारवाई केल्याचे भासवले; एखाद्या युद्धातील रणनीतीप्रमाणे गावामागून गावे कशी ताब्यात घेण्यात आली; गावकऱ्यांनाच युद्धकैद्यांप्रमाणे ढालीसारखे वापरून प्रतिकार करणाच्या गावांवर कशा प्रकारे हल्ले चढवण्यात आले; हे सर्व बिनविभोट व्हावे म्हणून कशाप्रकारे मीडिया, विरोधी पक्षनेते, सामाजिक कार्यकर्ते, बाहेरील समाज यांना अडवले गेले; गावांवर कब्जा केल्यानंतरही लूटमार, मारहाण करून आणि त्याहीपलीकडे काही बंडखोरी राहिली असेलच तर तिला नमवण्यासाठी आक्रमक घोषणा देत मोर्चे काढून दहशत निर्माण केली गेली; हे सर्व अत्यंत पद्धतशीरपणे झाले आहे.
 

12 नोव्हेंबर 2007

सुमारे 25 कार्यकर्ते बुद्धिजीवींचा आमचा समूह कलकत्त्याहून नंदीग्रामकडे जाण्यास निघाला. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सीपीएमच्या समर्थकांनी शस्त्रबळावर नंदीग्राम परिसराचा कब्जा घेतल्यानंतर, तिथे जाणारा हा पहिलाच नागरी समाजाचा / संघटनांचा गट होता. हे कार्यकर्ते मानव अधिकार, लोकशाही हक्क, शाश्वत विकास, अशा मुद्यांवर काम करणारे होते. एक ट्रक भरून मदत साहित्य घेऊन आम्ही निघालो होतो. ही मदतही बाहेरून तिथे पोचणारी पहिलीच मदत होती. या टीममधील आमच्यापैकी काहींना याआधी तिथे जाण्याचा प्रयत्न केला असताना झालेल्या हल्ल्याचा अनुभव होता. तरीही, तेथे पोचणे आम्हाला निकडीचे वाटत होते. 

अत्यंत बिकट, तणावाच्या परिस्थितीतील नंदीग्रामवासीयांना काही ज्येष्ठ, संवेदनशील, शांतताप्रिय व्यक्तींनी तेथे जाऊन आधार दिला पाहिजे, या भावनेतून आम्ही निघालो होतो. त्या परिसरातून सतत येत असलेल्या फोन-निरोपांतून ऐकू येणारा जखमी, इस्पितळात उपचार घेणाऱ्या, घरांतून हुसकून काढलेल्या निर्वासितांचा आक्रोश आम्हाला बोलवत होता.

आदल्या दिवशी कोलकत्त्याच्या पोलीस उपमहानिरीक्षकांना लेखी सूचना देऊनसुद्धा आम्ही कोलकत्याहून निघण्याच्या सुमाराला दुपारी 12 वाजता पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला अडवले. बऱ्याच बोलाचालीनंतर अखेर मुख्य सचिव, गृह सचिव व पोलीस महानिरीक्षक यांची भेट मिळाली. सुमारे तासभर त्यांच्याशी झालेल्या चर्चेत, आम्ही त्यांना नंदीग्राममध्ये मदत साहित्यासह व सेवेसाठी जाऊ इच्छिणाऱ्या सामाजिक संघटनांना राज्य सरकारने तशी परवानगी देण्याबाबतचा उच्च न्यायालयाचा आदेश दाखवला. 'आजऐवजी उद्या जा अशी उच्च अधिकाऱ्यांची विनंती नाकारून आम्ही त्याच दिवशी जायचे ठरवले. कारण वेळच तशी होती. सत्तारूढ पक्षाच्याच केडर्सकडून लोकांवर होणाऱ्या हल्ल्यांपासून त्यांना संरक्षण देण्यास राज्यसरकार अक्षम ठरत होते, अशावेळी तेथे लोकांसोबत असणे आम्हाला आवश्यक वाटते असेही आम्ही त्यांना बजावले. 

दुपारी 2 वाजता अखेर आम्ही निघालो. हावडा जिल्ह्यात पोहोचलो, तेव्हा सीपीएमच्या सुमारे 35 जणांच्या गटाने आम्हाला अडवले. तासभर तिथे गेला. आणखी काही अंतरावर पुन्हा अडवले गेले. त्यानंतर मात्र रस्त्याच्या दुतर्फा शेकडोंच्या संख्येने लोक आम्हाला समर्थन आणि संरक्षण देण्यासाठी उभे असलेले दिसले. हे लोक त्या परिसरातील सामान्य नागरिक होते. मात्र त्यानंतर अचानकपणे पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाकडून आम्हाला थांबवण्यात आले. त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांसोबत अरेरावीने बोलण्या- वागण्यास सुरुवात केली. एक तासभर पुन्हा त्यात गेला, हे सर्व आम्हाला लवकर पोहोचू न देण्यासाठी चालले होते, हे सहजच लक्षात येण्यासारखे होते.

संध्याकाळी उशिरा आमचा जथा कोलाघाटला पोहोचला. तेव्हा सीपीएमच्या हजाराहून अधिक निदर्शकांनी आम्हाला रोखले. त्यांना हटवण्याबाबत पोलीस अधिकार्यांनी असमर्थता व्यक्त केली आणि रात्रीच्या वेळी अंधाराचा गैरफायदा घेऊन आमच्यावर हल्ला होऊ शकतो असा इशाराही दिला. ट्रकभोवतालचा तो शिवीगाळ करणारा, धमक्या देणारा जमाव हटेना; तेव्हा आम्ही नाइलाजाने कोलकत्त्याला परतायचे ठरवले. मदतसाहित्याचा पहिलावहिला हप्ता त्या दिवशी नंदीग्रामच्या निर्वासितांपर्यंत पोहोचू शकला नाहीच.

13 नोंव्हेबर 2007

कदाचित भाजप नेते लालकृष्ण अडवानी त्या दिवशी या क्षेत्रात येणार होते म्हणून असेल, पण कुठल्याही अडथळ्या अडवणुकीविना आम्ही नंदीग्राममध्ये पोहोचलो. अडवानी, सुषमा स्वराज आणि रालोआचे काही नेते, आम्ही तेथे पोहोचण्यापूर्वी नंदीग्राम व अन्य काही गावांना भेट देऊन गेले होते. एरवी कधीही तिथे पोहोचलो की, 'दिच्ची ना, देबो ना' अशा जोरदार घोषणांनी स्वागत व्हायचे तिथे आज सन्नाटा, दहशत आणि हुंदके यांनी वातावरण दाटले होते. तिथल्या लढाऊ महिला नि:शब्द झाल्या होत्या. त्यांनी मारलेल्या मिठीतून व्यक्त होत होते भय आणि असहायता. हळूहळू त्यांनी धीर एकवटला आणि दाटल्या कंठातून एकेक दाहक अनुभव पाझरू लागले. काहींनी आमचे हात इतके घट्ट धरून ठेवले होते की आमच्या आधाराची त्यांना फार गरज आहे हे त्या स्पर्शातून कळत होते.

या रिलीफ कँपमध्ये नंदीग्रामचे सुमारे 2500 लोक होते. तिथेच एक सभा झाली, ज्यामध्ये सर्वच वक्त्यांनी सीपीएम केडर्सकडून झालेल्या या हिंसक हल्ल्याचा तीव्र निषेध केला, आणि हे हत्यारबंद केडर्स हटवण्याची आणि त्यांची दहशत ताबडतोब थांबवण्याची एकमुखी मागणी केली. ज्या गावांमध्ये वैद्यकीय सेवेची सर्वात जास्त गरज आहे, तिथे जाऊच दिले जात नसल्याबद्दल एका डॉक्टरने संताप व्यक्त केला. वेगवेगळ्या संघटनांच्या आम्हा सर्व प्रतिनिधींनी आपले समर्थन आणि एकजूट व्यक्त केली.

त्यानंतर आम्ही त्या जुन्या शाळेतील छोट्याछोट्या वर्गांमध्ये आश्रयाला आलेल्या स्त्री-पुरुषांशी बोललो. त्यांनी त्यांच्या कुटुंबियांनी, गावकरयांनी जे भोगले ते समजून घेतले. या सर्व कहाण्या भयानक सशस्त्र हल्ल्यांच्या, जाळल्या-तोडल्या जाणार्या घरांच्या, अत्याचार आणि बलात्कारांच्या होत्या. शेकडो लोक आजही बेपत्ता आहेत आणि त्यापैकी अनेकजण खेजुरीला सीपीएम केडर्सच्या ताब्यात असू शकतील असा त्यांचा अंदाज आहे.

14 नोंव्हेबर 2007

आम्ही सकाळीच पुढे निघालो. भूमी उच्छेद प्रतिरोध समिती- बीयूसीपीच्या नेत्यांना आम्ही सुचवले की, केवळ रस्ता दाखवण्यासाठी त्यांनी दोन-चार कार्यकर्त्यांना आमच्यासोबत पाठवावे. नंदीग्रामपासून काही किलोमीटर्स अंतरापर्यंत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान तैनात केलेले दिसत होते; पण त्यापुढे नाही.

आम्ही कमलपूर, टकापुरा, सातनगबारीला भेटी दिल्या. आमच्यापैकी काहीजण गोकुलनगर दसपारा व अधिकारीपारा येथे जाऊन आले. बीयूपीसीच्या स्थानिक नेत्यांना आम्ही भेटलो. आमच्यातले काहीजण पोलीस, पोलीस अधिकारी व सीआरपीएफच्या महानिरीक्षकांशी बोलले. जिल्हा मॅजिस्ट्रेटशी फोनवर बोलणे झाले.

कमलपूर आणि टकापुरा येथे 20-30 स्त्री-पुरुष आमच्या जीपजवळ आले. त्यांच्याबरोबर सीपीएमचे दोन-चार स्थानिक नेते/प्रवक्तेही होती. त्यांनी आमच्या तिथे येण्याबद्दल विरोध व्यक्त केला. ते म्हणाले की आत्ता इथे शांतता प्रस्थापित झाली आहे पण याआधी नव्हती. बीयूपीसीच्या लोकांनी शांतता भंग केली; लोकांना छळले असे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी विशेषतः स्त्रियांना मोर्चात- तेही रात्री येण्याची सक्ती केली आणि जिथे एसईझेड येणारच नाही, त्या आमच्या गावात समित्या स्थापन केल्या असे त्यांचे गान्हाणे होते. सीपीएमला त्या क्षेत्रातून हटवण्याचा त्यांचा हा डाव होता असा त्यांचा आरोप होता. 

या समूहातील 'बोलकी मंडळी ही राज्य सरकारचे कर्मचारी, मुख्यत: स्थानिक शिक्षक तसेच कोलकत्त्यात नोकरी करणारे गावकरी होते. स्त्रिया आपल्या व्यथा मांडत होत्या, परंतु त्यांना तेथील सीपीएमचे कार्यकर्ते/ नेते तशा सूचना देत होते हे स्पष्टपणे कळत होते. आमचा वेळ जात होता खरा, तरीही आम्ही त्यांचेही म्हणणे ऐकून घ्यायचे, समजून घ्यायचे ठरवले. मात्र बीयूपीसीने मोडतोड केलेले अथवा जाळलेले एकही घर ते दाखवू शकले नाहीत. उलट बीयूपीसीच्या कार्यकर्त्यांनी आपली स्वत:ची घरे स्वत:च जाळली(!) असे ते म्हणाले. मागे घुटमळणाच्या, या बोलक्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकत असलेल्या आणि चेहऱ्यावर अनिच्छा आणि भय असलेल्या या गटातीलच काही स्त्री-पुरुषांशी आमच्यापैकी काहीजण सहज बोलले, तेव्हा हे सगळे खोटे असल्याचे लक्षात आले.

पुढे त्या प्रवासात मध्येच जीप थांबवून काही घरांत जाऊन पाहिले तेव्हा ठिकठिकाणी आजारी, वृद्ध महिला, धक्क्यातून न सावरलेले- भयभीत पुरुष, वाचा हरवलेले युवक भेटले. त्यांचे नातेवाईक, शेजारीपाजारी परागंदा झाले होते, काहींनी नंदीग्रामच्या निर्वासित छावणीत आश्रय घेतला होता तर काही अन्य गावी नातेवाईकांकडे निघून गेले होते. काहींचा तर पत्ता नव्हता. घरे जाळलेली, विस्कटलेली होती, जिथे राहणे शक्य नव्हते. अनेकांना वैद्यकीय उपचारांची तातडीची गरज होती, मात्र या सर्वांनाच सर्वप्रथम भयातून मुक्ती हवी होती. केडर्सच्या 'धडा शिकवू' अशा धमक्यांपासून, हुसकून लावले जाण्याच्या टांगत्या तलवारीपासून सुटका हवी होती. 

त्यांची भातपिके शेतात कापणीला आली होती, पण तीदेखील सीपीएम केडर्स शिल्लक ठेवतील की नाही याच्या काळजीत ते होते. सातनगबारी गावात असा प्रकार घडल्याचे त्यांच्या कानावर आले होते. निर्वासित छावणीतील त्यांच्या भाऊबंदांची खुशाली जाणून घेण्यास ते उत्सुक होते आणि त्यांचे घरदार, कपडेलत्ते, भांडीकुंडी, इतकेच काय, खायला दाणाही न उरल्याचे सांगत हळहळत होते.

'हरमद बाहिनी'चा हल्ला झालेल्या सातनगबारीला आम्ही गेलो. 'हरमद' हा शब्द बंगालमध्ये गाव लुटणारे, अत्यंत क्रूर व अमानुष वर्तणुकीसाठी प्रसिद्ध लुटारू या अर्थाने वापरला जातो. सीपीएमच्या हत्यारबंद हल्लेखोरांसाठी नंदीग्रामवासीय हा शब्द वापरतात. सीपीएमच्या या भाडोत्री हल्लेखोरांनीच एप्रिल - मे महिन्यात हल्ला केला होता, हे सर्वश्रुत आहे. हरमद वाहिनीचे केडर्स मोटारबाईक्स व अन्य वाहनांनी गावात कसे घुसले आणि त्यांनी घरं कशी लुटली, तोडली, याची वर्णने आमच्यापैकी त्या घटनेनंत तेथे गेलेल्यांनी ऐकलेली होती. आजूबाजूचे गावकरी त्यावेळी त्यांच्या हातातल्या छोट्यामोठ्या हत्यारांसह या गावकऱ्यांच्या मदतीला धावले आणि त्यामध्ये काही हरमदही जखमी झाले होते. 

यावेळी आम्ही पाहिलं की या गावात केवळ मोजके सीपीएमचे समर्थक आणि त्यांचे काही पुढारी तेवढे शिल्लक होते. बाकी सर्व गाव ओसाड. त्यापैकीही नेतेमंडळी मागाहून लाल झेंडे लावलेल्या मोटारबाईक्सने आलेली.

तेथील लोकांनी आमच्या जीपला घेरले. ते आमच्यावर आरोप करू लागले. मेधा पाटकरांनी बीयूपीसीला 10 लाख रुपये दिले आहेत, असा आरोप त्यांनी केला. आमच्या घरांवर ( बीयूपीसीच्या लोकांनी) हल्ला केला आणि आम्हाला अनेक महिने गाव सोडून जावे लागले; असे त्यांचे म्हणणे होते. आम्ही त्यांची घरे पहायचे ठरवले आणि त्या आरडाओरडा, आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या प्रक्षुब्ध जमावाबरोबर गेलो. कियाखाली, रानीचौक आणि सातनगबारी या तीन गावांत शेकडो घरांवर बीयूपीसीच्या लोकांनी हल्ला केला असे ते सांगत होते. ते म्हणत होते की सेझ आणि केमिकल हब आला की आम्हाला नोकऱ्या मिळतील, तेव्हा सेझ झालाच पाहिजे. गावागावात तयार होत असलेल्या भूमी उच्छेद प्रतिरोध समित्यांवर त्यांचा विशेष रोष होता.

मात्र तिथे उपस्थित असलेल्या सामान्य लोकांकडून याला दुजोरा मिळाला नाही. त्यांच्या सांगण्यानुसार गावातले सुमारे चारेकशे लोक सीपीएमद्वारे चालवल्या जात असलेल्या खेजुरीमधील निर्वासित छावणीत आहेत आणि बाकी बीयूपीसीशी संबंधित सर्व लोक गाव सोडून पांगले आहेत, काही हॉस्पिटलमध्ये तर काही नंदीग्राममधील निर्वासित छावणीत आहेत.

साध्या वेशातील पोलीस आमच्याशी बोलणाऱ्या लोकांवर 'नजर' ठेवून होते. नंदीग्रामपासून पुढे सर्वच गावात लाल बावट्याशिवाय अन्य कुठलेही झेंडे नव्हते. खरे तर देशभरात जिथे जिथे सेझविरोधी संघर्ष चालू आहे- त्यापैकी अनेक ठिकाणी सीपीएमही त्यामध्ये आहे- तिथे तिथे सर्वत्र मोर्चे होतात, धरणी होतात, निषेध सभा होतात, कमिट्या तयार होतात... पाँडिचेरीत बंदराच्या खाजगीकरणाविरोधात, महाराष्ट्रात रायगडला अंबानीच्या सेझविरोधात, ओरिसात पॉस्कोच्या विरोधात.... पॉस्कोच्या विरोधात सीपीआयचे नेतृत्व गांधीवादी युवकांच्या हातात हात घालून काम करते आहे; आंध्र प्रदेशात सीपीएमच्या लढवय्यांनी जीवाची बाजी लावून 3 दिवसांत नुकसानभरपाई मिळवल्याचे पार्टी मोठ्या अभिमानाने सांगते- जमीन हक्क आणि पुनर्वसनाच्या अधिकारावर अनेक जनआंदोलनांसह नागरी समाजाचा पाठिंबा मिळवत लढत राहते; हे प.बंगालमध्ये जिथे सीपीएमचे स्वत:चे सरकार दीर्घकाळपासून सत्तेत आहे, तेथेच नेमके कसे विसरले जाते? तेथे केवळ विरोधी राजकीय पक्षांवरच नव्हे तर अन्य जनआंदोलने व मानव अधिकारावर काम करणाऱ्यांवरही दहशत का बसवली जाते? ज्यांच्यावर भांडवलदार अथवा जात जमातवादी असा शिक्का मारता येत नाही, त्यांना माओइस्ट ठरवून बाद का केले जाते? सीपीएमच्या असहिष्णुतेचा, अरेरावीचा, हेटाळणीचा सामना का करावा लागतो?

ऑपरेशन नंदीग्राम- अहवाल काय सांगतात? 

वर्तमानपत्रातले वृत्तांत आणि आम्ही गावागावातल्या लोकांकडून जे ऐकले त्यावरून, तसेच निर्वासित छावण्यांमधील स्थितीवरून असा निष्कर्ष काढता येतो, की नंदीग्राम पुन्हा ताब्यात घेण्याची (री-कॅप्चर) कारवाई सीपीएमने नियोजनबद्ध रीतीने पार पाडली. प्रत्यक्ष हल्ले करण्यापूर्वी काही दिवस शस्त्रास्त्रांचे साठे करण्यात आले होते. आमच्या स्रोतांकडून ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यातच आम्हाला खबर मिळाली होती की सुंदरबनमधील नालगोडा आणि द. 24 परगाणामधील मंदिरबझार ब्लॉकमधून 13-14 भाडोत्री सैनिकांचे गट, (जसे यापूर्वी सीपीएमने निवडणुकीच्या वेळी वापरले होते) 'नंदीग्राम ऑफरेशन' साठी तैनात करण्यात आले होते. 

पोलिसांसोबतचेही नियोजन करण्यात आले होते. ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून पोलीस कॅम्प्स काढून घ्यायला सुरुवात झाली. नंदीग्राम पोलीस स्टेशनच्या ओ.सी.ला कुठल्याही परिस्थितीत पोलीस बळ नंदीग्राममध्ये न आणण्याचा आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाला होता, असा त्याचा जबाब नोंदवलेला आहे. गोळीबार चालू असताना पोलीस बघ्यासारखे उभे असलेले अथवा जमिनीवर पडून राहिलेले तर टीव्हीवरूनच दाखवले गेले. "स्वस्थ रहा आणि हरमदना सर्व ताब्यात घेऊ द्या' असे आदेशच त्यांना मिळालेले स्पष्ट दिसत होते.

या कारवाईची वेळही अगदी खास निवडण्यात आली होती. दुर्गापूजेच्या काळात प.बंगालमध्ये एकूणच उत्सवी वातावरण असते आणि राजकीय हालचाली थंडावलेल्या असतात. 9 ते 11 तारखेदरम्यान सरकारी सुट्ट्या आल्यामुळे कोर्टकचेऱ्याही बंद होत्या, अशावेळी केलेल्या कारवाईला काही प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता फारच कमी होती.

सर्व गावातील लोकांकडून हेच कळले की आधी गोळीबाराच्या फैरी झडायच्या, बाँब फेकले जायचे आणि मग काळ्या कापडाने चेहरे झाकलेले हरमद अवतरायचे. हे दृश्यच भिववणारे असायचे. त्यानंतर घरांची लुटालूट, जाळपोळ, लोकांना धरून मारहाण, स्त्रियांवर अत्याचार-बालात्कार... हे सारे घडायचे. ज्या प्रकारे नेमकी काही घरे मोडलेली, जाळलेली, लुटलेली दिसत आहेत त्यावरून बीयूपीसीच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना लक्ष्य बनवलेले स्पष्ट होत आहे. परिणामी या कुटुंबातील धडधाकट माणसे-बायका-पोरे जीव वाचवण्यासाठी पळून गेली; काही म्हातारी-कोतारी नाईलाजाने तिथेच राहिली आहेत. अशा प्रकारे पळून गेलेल्यांची, दूर कुठेतरी नातेवाईकांकडे आश्रय घेतलेल्यांची अद्याप गणती नाही.

जसजशी गावे लुटली जात राहिली, तसतशी नंदीग्राम निर्वासित छावणीतील संख्या वाढत राहिली...

कुठल्याही हिंसेत सर्वात मोठा आघात सोसावा लागतो तो स्त्रियांना. इथेही स्त्रिया-मुले असे काही न पाहता हिंसा होत राहिली. 10 नोव्हेंबरच्या शांतता मोर्चात सहभागी झाल्याबद्दल गोकुलनगरच्या छबीरानी मंडलला इतके मारण्यात आले की तिचे नाक फ्रॅक्चर झाले. आज ती हॉस्पिटलमध्ये आहे. सातनगबारी गावात 7 महिला आणि एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. त्यापैकी सामूहिक बलात्काराची बळी ठरलेल्या 40 वर्षांच्या अखरेजा बीवीला तामलुक इस्पितळात आणण्यात आले, तर तिच्या 18 आणि 16 वर्षांच्या दोन मुलींवरही बलात्कार झाले, पण त्या बेपत्ता आहेत. 

सातनगबारीच्याच मुक्तारण बीबीने सांगितले की, 6 नोव्हेंबरला सकाळी सहाच्या सुमारास 20-30 लोक भाताच्या शेतातून लपूनछपून आले. त्यांचे चेहरे काळ्या फडक्यांनी झाकलेले होते. त्यांनी गोळीबार सुरू केला. घराघरात घुसून लुटमार केली. त्यांच्याकडील यंत्राच्या साहाय्याने घराच्या फरशा उखडल्या. भिती पाडल्या, त्यांनी मला घेरले आणि माझ्या नवऱ्याबद्दल चौकशी सुरू केली. त्यातल्या दहाएक जणांना तर मी आवाजावरून ओळखले, कारण ते आमच्याच गावातले लोक होते. 

इतर मात्र बाहेरचे होते. त्यांनी मला मारहाण केली, माझे चार महिन्याचे मूल माझ्या हातून हिसकावले आणि जमिनीवर फेकून दिले. त्याच्या डोक्याला लागले म्हणत तिने दाखवले, तेव्हा त्या बाळाच्या डोक्याला मागच्या बाजूला भलेमोठे टेंगूळ आलेले दिसले. 

याच गावातील मंजुरा बीवी ही 7 महिन्यांची गरोदर स्त्री. 6 नोव्हेंबरला हल्ला झाला, तेव्हा ती सर्वाबरोबर पळत सुटली. दुसऱ्या दिवशी आपल्या घरी परत आली तर काहीही शिल्लक नव्हते. ती आपल्या सासूकडे गेली. परंतु हरमद तिथे आले, त्यांच्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी ती सासूच्या खाटेखाली लपली. पण त्यांनी तिला खेचून काढून मारले. तिच्या डोक्यावर मारले; तिच्या कानातून रक्त वाहू लागले. त्यांनी तिला घरात राहू दिले नाही. या मारहाणीनंतर माझे पोटातले मूल फिरेनासे झाले आहे आणि आता ओटीपोटात कळा येऊ लागल्या आहेत... मंजुरा बीवी सांगत होती.

अशा कितीतरी कहाण्या...!

शांतियात्रा आणि त्यानंतर... 

सीपीएमचे केडर्स नंदीग्राम परिसरात धुमाकूळ घालत असताना, बीयूपीसीने त्या हिंसेचा सामना शांततामय मार्गाने करायचे ठरवले व 10 तारखेला शांतियात्रा काढायची ठरवली, हे आम्हाला कोलकत्त्यात समजले होते. त्यांनी सोनचुरा ते भंगाबेरा आणि नंदीग्राम ते महेशपूर असे दोन मोठे शांततामोर्चे काढायचे ठरवले. निदान निःशस्त्र शांतियात्रेवर तरी सीपीएमचे सशस्त्र सैनिक हल्ला करणार नाहीत अशी त्यांची अपेक्षा होती. ओ.सी.ला तर लेखी कळवलेलेच होते; पंतप्रधान, राष्ट्रपती आणि यूपीएच्या अध्यक्षांनाही आम्ही त्यांच्या खासगी सचिवांमार्फत फोनने कळवले होते. केंद्र सरकारातील काही मंत्री व खासदारांनाही या प्रसंगाचे गांभीर्य कळवून, तिथे हिंसा होणे थोपवावे अशी विनंती केली होती. सकाळी 9 वाजता लोक नंदीग्राम पोलीस स्टेशनसमोर जमले व त्यांनी या सशस्त्र हल्ल्यांपासून संरक्षण देण्याची मागणी केली. पोलीस स्टेशनमधून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने अखेर काही तासानंतर त्यांनी महेशपूरकडे चालायला सुरुवात केली.

या नि:शस्त्र मोर्चावर सीपीएमच्या हत्यारबंद गटांनी हल्ला चढवला; लोकांना ताब्यात घेतले आणि या 'युद्धकैद्यांना ढालीसारखे वापरत गावागावांमध्ये प्रवेश मिळवला. 'ऑपरेशन नंदीग्राम' 'यशस्वी' झाले होते. 

सोनचुराचे असित प्रधान सांगतात- सोनचुरापासून मी शांतियात्रेत होतो. गोकुळनगरजवळ भाताच्या शेतातून 70-80 लोक अचानक आले. त्यांच्याजवळ बंदुका आणि लाठ्या होत्या. त्यांनी आम्हाला हात वर करायला आणि काही अंतरावर असलेल्या लाल बावट्याजवळ जायला धमकावले. त्यांनी आमचे खिसे तपासले आणि त्यातले पैसे, मोबाईल वगैरे सर्व काढून घेतले. त्यांनी आम्हा सुमारे 500 लोकांना घेरले आणि चालायला लावले. 2-3 तास चालल्यानंतर आम्ही खेजुरीमधील शेरखाचक इथे पोचलो. आमच्यातल्या दोघांना गोळ्या लागून ते जखमी झाले होते, तरीही त्यांनी त्यांनाही चालायला भाग पाडले. दरम्यान ल्या हरमदची संख्याही वाढली होती. 

आधी त्यांनी आम्हाला खेजुरीतल्या अमराटोला प्राथमिक शाळेत नेले व काही खायला व पाणी प्यायला दिले. त्यानंतर त्यांनी आमच्यातील प्रमुख कार्यकत्यांना एका बाजूला काढले. एकेकाला बाजूला घेत त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. बीयूपीसीच्या या मोर्चात तुम्ही का आलात? सुरुंग कोठे पेरले आहेत? तुमच्यात किती माओवादी आहेत? शंकर सामंतांना कोणी मारले? तुमच्याजवळ किती शस्त्रे आहेत? तुम्हाला शस्त्रे कोण देते? तीनजण प्रश्न विचारत होते आणि दोघेजण मारत होते. 'मला माहीत नाही' असे उत्तर दिले किंवा काहीच उत्तर दिले नाही तर मार पडत होता. माझ्यासारखेच आणखी पंधरा जणांना मारले. त्यानंतर सीपीएम नेता नवा सामंता म्हणाला- "हे संपूर्ण राज्य आमचं आहे. दुसऱ्यांच्या मोर्चात जाण्याचा मूर्खपणा तुम्ही का करता आहात?"

मारहाणीत माझा हात मोडला होता. खूप वेदना होत होत्या. मला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा आग्रह मी धरला रात्री 8 वाजता आमच्यापैकी 7 जणांना हॉस्पिटलमध्ये पाठवले. रात्री 11 वाजता आम्ही कमरदा हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. त्यानंतर कालीचरणपूरहून एका असिम दास या डी.एम. एस. डॉक्टरला आणले, त्याला इतके प्रचंड मारले होते की त्याला अ‍ॅम्ब्युलन्समधून नेण्यात आले. त्याच्या अंगातून रक्त ठिबकत होते. त्याला कुठे नेले, त्याचे काय झाले; मला काही ठाऊक नाही.

दुसऱ्या दिवशी डॉक्टर आला. आम्हाला नेण्यासाठी ओसी आले असल्याचे त्याने सांगितले. आम्हाला नंदीग्राम हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. आमच्यासोबत खागन कार होता. टेखाडी बाजारामध्ये त्याचे दुकान आहे. त्याला डोक्याला जबर मार लागला होता आणि त्याचा डोळा फुटून बाहेर लोंबत होता. त्याला तामलुकला पाठवण्यात आले. तो तर बिचारा आमच्या शांतियात्रेतही नव्हता. त्याला हरमदनी टेखाली बाजारामधूनच उचलले होते.

माझ्याबरोबर मार खाल्लेल्या 15 पैकी 6 जणांना माझ्याबरोबरच इथे आणले. बाकीचे आठजण कुठे आहेत, माहीत नाही. 

नंदीग्राम हॉस्पिटलमध्ये अशा त-हेचे अनेक अनुभव ऐकायला मिळाले. सोनचुराच्या प्रकाश गिरीला 4 गोळ्या लागल्या होत्या. 

नववीतल्या एका विद्यार्थ्याला हरमदांनी इतके बदडले होती की त्याने त्या दिवशी घातलेला शर्ट रक्ताने पूर्ण भरला होता. त्याला दगड/गिट्टी पसरलेल्या मैदानात ढकलून 5 जणांनी त्याला लाथाबुक्क्यांनी तुडवले; त्याच्या शरीरावर बसले. त्याचे नाक फ्रॅक्चर झाले. पारुलबारी कॅम्पमध्ये त्याला दोन दिवस कैदेत ठेवले आणि आता तो नंदीग्राम हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता.

मारहाणीच्या, सोबतचे लोक गोळीबारात, मारहाणीत मृत्युमुखी पडल्याच्या, पकडलेल्या गावकरयांना पुढे करून हरमदांनी गावागावात गोळीबार केल्याच्या, मृतदेह मिळवण्यासाठीही पोलिसांनी मदत न केल्याच्या... अशा कितीतरी घटना लोक सांगताहेत. जे मेले ते तर कायमचेच स्तब्ध झाले आहेत...!

अहवालावरून असे दिसते की, बंदुकीच्या धाकाने ताब्यात घेतलेल्या 500 शांतियात्रींना अमरताला प्राथमिक शाळा, कालगाछय्या आणि कुंजीपूर या तीन ठिकाणी नेण्यात आले. काहींना मानवी ढाल म्हणून वापरले गेले, तर काही बेपत्ता आहेत. यापैकी किमान 350 लोक आजही खेजुरीत असावेत असा अंदाज आहे.

गावांवर ताबा

निर्वासित छावण्यांतील लोक आपापल्या घरी जाण्यासाठी आतुर आहेत, पण पुन्हा हल्ला होण्याच्या भीतीच्या सावटाखालीही आहेत. "आम्हाला आमच्या गावी सुरक्षितपणे पोचवा-" ही त्यांची पहिली मागणी आहे. त्यांच्या शेतात उभे असलेले भातपीक सीपीएमचे लोक लुटून नेतील अशी त्यांना भीती वाटतेय, मात्र आपण आपल्या गावी- घरी परतू शकू का, याबद्दल ते साशंक आहेत. कारण यापूर्वीचा अनुभव असा आहे, की परत गेल्यावरही त्यांना सीपीएम केडर्सच्या छळाला सामोरे जावे लागले. या प्रदेशावर 'कब्जा' केल्याचा सीपीएमचा दावा म्हणजे तेथील विरोधाला पूर्णपणे नेस्तनाबूत करणे आहे.

सातनगबारीची रहीना बीवी सांगते-7 तारखेला आम्ही सातजणांनी गावात परत जाण्याचा प्रयत्न केला. आम्ही दिसताच त्यांच्यापैकी एकाने ओरडून वर्दी दिली आणि बंदुका आणि सुरे रोखून त्यांनी आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली. तुझा नवरा कुठे आहे असे विचारत ते मला मारत होते. मी ओरडले की मी कुठे जाणार नाही, इथेच राहणार. तेव्हा त्यांनी मला बांधून ठेवले. मला पाणीही दिले नाही. मला सोडा, मी रात्री माझ्या नवऱ्याला आणते असे आश्वासन दिले, तेव्हा त्यांनी मला सोडले आणि मी इथे आले. आता माझी परत जायची हिंमत नाही.

जामबारीचे 96 वर्षांचे स्वातंत्र्यसैनिक नेताईपद कारन यांचा 13 तारखेला मृत्यू झाला. मागील वेळेच्या 'कारवाई' त त्यांनाही मारहाण झाली होती. त्यांच्या अंतिम संस्कारांसाठी गावात जाण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी पोलीस संरक्षण मागितले. त्या दिवशी अडवाणी त्या भागात येणार होते. ते येऊन गेल्यानंतरच व्यवस्था करू शकू असे पोलिसांनी सांगितले 3-4 पोलिसांसह हे 10 जण टेखालीपर्यंत पोहोचले.

तेथून आणखी पोलिसांची मदत मिळेल असे सांगण्यात आले होते. तेथील पोलीस अधिकाऱ्याने सीपीएमच्या स्थानिक समितीच्या सचिवाला फोन करून 'परवानगी' मागितली. त्याने सांगितले की फक्त एकानेच यावे आणि ते स्वत:च अंत्यविधीची व्यवस्था करत आहेत. "आमच्या काकाच्या मृत शरीराचाही ताबा आम्हाला मिळू शकला नाही- नातेवाईक सांगत होते.

पूर्वी सीपीएमचे सदस्य/कार्यकर्ते असलेले अनेकजण सेझमुळे बीयूपीसीमध्ये गेले आहेत. त्यांना तर विशेष लक्ष्य बनवले जात आहे. अजनूर काझी हा सीपीएमचा पंचायत सदस्य. सेझच्या मुद्यावर तो सीपीएमपासून दुरावला. बीयूपीसीमध्ये सक्रिय झाला. निर्वासित छावणीतून तो घरी गेला, तेव्हा त्याला मारहाण करण्यात आली.

बंदुकीचा धाक दाखवून सीपीएमवाले त्यांच्या मोर्चात येण्यास भाग पाडतात. रात्रीची गस्त घालायला लावतात. भातपिके लुटून नेतात. दंड भरायला लावतात, अत्याचाराच्या भयाने लोकांनी मुलाबाळांना- विशेषत: मुलींना दूर नातेवाईकांकडे पाठवून दिले आहे. त्यांचे शिक्षण थांबले आहे.

पोलिसांकडे तक्रार करून काही उपयोग होत नाही. मात्र सीपीएमच्या कुणा नेत्यापर्यंत पोहोचता आले तर मार टळतो, घर वाचते. सीपीएमपासून बाहेर पडलेल्यांवर सीपीएमचे हरमद दबाव आणतात. विशेषत: त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात, त्यामुळे त्यांना कसेबसे निर्वासित छावणीपर्यंत आणण्याची लोकांची धडपड चालू आहे.

निर्वासित छावणीत

13 नोव्हेंबरच्या रात्री आम्ही नंदीग्रामच्या हायस्कूलमधील निर्वासित छावणीतच थांबलो. छावणीत साधारणपणे किती लोक आहेत, त्यांच्या गरजा काय आहेत, याची पाहणी आमच्या गटाने केली.

शाळेच्या 24 खोल्यांमध्ये प्रत्येकी सुमारे 60-70 लोक, असे सुमारे दीड हजार लोक तिथे होते. त्यात अगदी छोटी बाळे सुमारे 150 होती. ज्यांच्यासाठी दूध व अन्य लहान मुलांच्या अन्नपदार्थांची गरज होती.

याशिवाय सुमारे 500 ते 700 लोक जवळपासच्या परिसरात मित्र किंवा नातेवाईकांच्या घरांमध्ये राहत आहेत, जे जेवणासाठी इथे येतात. तेव्हा सुमारे 2000 ते 2200 लोकांचे अन्न इथे शिजवावे लागते आहे. काही दिवसांपूर्वी येथे सुमारे 4000 लोक जेवत होते असे तेथील रसोड्याचे काम बघणाऱ्या बीयूपीसीच्या केंद्रीय समितीच्या कार्यकर्त्याने सांगितले.

सरकार काही गोष्टी पुरवते आहे. परंतु त्या फारच अपुन्या आहेत. 9 तारखेला 15 किंटल व 13 तारखेला 10 किटल तांदूळ मिळाला तो सर्वोच्च न्यायालयाच्या अन्नअधिकार समितीच्या सदस्या अनुराधा तलवार यांच्यामुळेच. हा तांदूळ फारतर 3-4 वेळांपुरता पुरेल. त्यामुळे अन्य तन्हांनी जोडणी करावी लागते आहे. आम्ही त्या परिसरात असताना भात फक्त एक वेळा करण्यात येत होता व दुसऱ्या वेळेला 'मुरी' किंवा 'चिरा देण्यात येत होता. अपुऱ्या अन्नाविषयी लोक तक्रार करत होते.

स्वच्छतागृहांची काहीच व्यवस्था नव्हती. सगळे 2500 लोक जवळपासच्या अगदी अपुन्या सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करीत होते. त्यामुळे त्यांच्यावर खूपच ताण येत होता.

लोक जीव वाचवण्यासाठी नेसत्या वस्त्रानिशी घराबाहेर पडले होते, त्यामुळे कपडे आणि अंथरुण-पांधरुणाचीही समस्या होती. या थंडीच्या दिवसात लोक एका पातळशा सतरंजीवर झोपत होते आणि पांघरायला तर अनेकांकडे काही नव्हतेच! छोटी बाळे, वृद्ध, आजारी लोकांचे तर हाल आणखीनच होते.

शिबिरात आश्रयाला आलेले अनेक लोक अद्याप धक्क्यात आहेत. मानसिक आघातातून ते अद्याप सावरलेले नाहीत. एक स्त्री मध्यरात्री मोठ्याने रडत-किंचाळत होती. तिच्या भावाला पकडून नेले आहे आणि खूप मारले आहे, एवढेच ती सांगू शकत होती.

अशा लोकांना वैद्यकीय मदतीची, समुपदेशनाची गरज आहे. या सर्वाबद्दल जिल्हा मॅजिस्ट्रेटकडे मागणी करून झाली आहे. परंतु त्यांची एकूण अनास्था या लोकांबद्दलचा सरकारचा पक्षपाती दृष्टिकोनच अधोरेखित करते आहे. पुन्हा पुन्हा हिंसेचा सामना करावा लागत असलेल्या नंदीग्रामवासियांसंदर्भात सरकारवर सर्वदूर टीका होत असूनही, सरकारवर त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही.

13-14 नोब्हेंबरला आम्ही नंदीग्राम परिसरात होतो तेव्हा सीआरपीएफचे जवान शहरात तैनात केलेले दिसत होते. मोठ्या प्रमाणावर राज्य सरकारच्या हत्यारबंद पोलिसांचीही उपस्थिती होती. तरीही निर्वासित छावणीतील लोकांना असुरक्षित वाटत होते. महिला सांगत होत्या की काही दिवसांपूर्वी सीपीएमचे कार्यकर्ते येथे येऊन कैंप रिकामा करण्याच्या धमक्या देऊन गेले. बीयूपीसीच्या काही तरुण कार्यकर्त्यांना पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांसमक्ष 6-7 लोकांनी उचलून मोटरबाईक्सवरून सीपीएमच्या पार्टी ऑफिसात नेले होते. मुस्तफा या बीयूपीसीच्या कार्यकर्त्याला अशाच रीतीने पळवून नेल्याची तक्रार घेऊन तेथील कार्यकर्ते आमच्या समक्षच पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. पोलिसांनी पार्टी ऑफिसला फोन केल्यानंतर मुस्तफाची सुटका झाली.

14 तारखेला सकाळी, आम्ही तेथे असतानाच कळले की सीपीएमचे कार्यकर्ते मोटारसायकलवरून शहरात फिरत असून आदल्या दिवशी झालेल्या अडवाणींच्या भेटीच्या वेळी लावण्यात आलेले भाजपचे झेंडे काढून फाडून टाकत आहेत. फक्त सीपीएमचेच झेंडे लागतील असे त्यांनी बजावले आहे.

त्याच दिवशी संध्याकाळी सातच्या सुमारास शिबिराबाहेर घोषणांचा आवाज आला. अनेक महिला भीतीने थरथर कापू लागल्या, सीपीएमचा जुलूस चालला होता. लोक म्हणाले की हे रोजचेच आहे. आदल्या दिवशी 50-100 मोटारसायकलींचा, डोक्याला रुमाल बांधलेल्या तरुणांचा जथा घोषणा देत गावभर फिरला होता. या सर्वांची जबरदस्त दहशत बसत होती.

14च्या रात्री निर्वासित छावणीच्या गेटवर एकही पोलीस वा सुरक्षा रक्षक नव्हता. रात्री उशीरा आम्ही सीआरपीएफच्या डीआयजींना भेटलो व हे त्यांच्या निदर्शनाला आणून दिले. आपण दुसऱ्या दिवशी स्वत: जाऊन पाहू व तिथे सुरक्षारक्षक तैनात करू असे आश्वासन त्यांनी दिले.

आपल्या नातेवाईकांडे आश्रय घेतलेल्या निर्वासित गावकऱ्यांनाही सतत दहशतीचा सामना करावा लागतो आहेच. सीपीएमचे लोक येऊन त्यांना विचारतात की ते कुठले? त्यांची नावे काय? ते कुठल्या पक्षाचे आहेत? त्यांना आपल्या गावी परत पाठवण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना धमकावले जाते. ते आपल्या गावी/घरी परतले की त्यांना मारहाण केली जाते.

अशा परिस्थितीत बीयूपीसीने वेगवेगळ्या गावात सीआरपीएफच्या 12 कैम्प्सची मागणी केली आहे. अद्याप केवळ 2 कैम्प्स सुरू करण्यात आले आहेत. आणखी 2 होणार आहेत म्हणतात, मात्र याबाबत सीआरपीएफच्या डीआयजीकडे विचारणा केली असता इतके कॅम्प्स सुरू करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे त्यांनी सांगितले.

18 तारखेला आलेल्या बातमीनुसार सीआरपीएफचे नंदीग्राम आणि इतर गावातले कॅम्प्स हटवून ते खेजुरीच्या सीमेवर नेण्यात आले आहेत. यामुळे बीयूपीएसचे लोक, निर्वासित तसेच गावातील लोकही अत्यंत असुरक्षित स्थितीत ढकलले गेले आहेत.

सीआरपीएफचे कमांडर आलोक राज यांनी राज्य सरकार सहकार्य देत नसल्याची तक्रार जाहीरपणे केली आहे.

निष्कर्ष

हे अगदी स्पष्ट आहे की 'ऑपरेशन नंदीग्राम द्वारे नंदीग्राम परिसरातल्या, 'बंडखोर' गावांचा ताबा घेणे, ही काही 'चुकीने घडलेली गोष्ट नाही. राज्य सरकारचे प्रशासन व सत्तेवर असलेला पक्ष यांच्या संगनमताने नियोजनपूर्वक घडवलेली ही कारवाई होती. त्याचे सज्जड पुरावे आहेत- की कशा रीतीने हत्यारे, गुन्हेगार, पार्टीचे गुंड नियोजनबद्ध रीतीने जमले; हरमदांना धुडगूस घालता यावा म्हणून पोलीस कॅम्पस हटवले गेले; पोलिसांकडे तक्रारी करूनही होत असलेल्या अत्याचाराकडे पोलिसांनी कसे दुर्लक्ष केले अथवा काहीतरी थातुरमातुर करून कारवाई केल्याचे भासवले; एखाद्या युद्धातील रणनीतीप्रमाणे गावामागून गावे कशी ताब्यात घेण्यात आली; गावकऱ्यांनाच युद्धकैद्यांप्रमाणे ढालीसारखे वापरून प्रतिकार करणाऱ्या गावांवर कशा प्रकारे हल्ले चढवण्यात आले; हे सर्व बिनबिभोट व्हावे म्हणून कशाप्रकारे मीडिया, विरोधी पक्षनेते, सामाजिक कार्यकर्ते, बाहेरील समाज यांना अडवले गेले; गावांवर कब्जा केल्यानंतरही लूटमार, मारहाण करून आणि त्याहीपलीकडे काही बंडखोरी राहिली असेलच तर तिला नमवण्यासाठी आक्रमक घोषणा देत मोर्चे काढून दहशत निर्माण केली गेली; हे सर्व अत्यंत पद्धतशीरपणे झाले आहे. याहीपलीकडे. निर्वासित छावण्यांमध्ये बीयूपीसीची ताकद निर्माण होऊ शकते, हे जाणवताच लोकांना त्या सोडण्यास व घरी परतण्यास भाग पाडणे; माओवाद्यांची शो आणि साहित्य सापडल्याच्या अफवा पसरवत हे सर्व आक्रमण योग्यच ठरवण्याचा प्रयत्न करणे आणि सीपीएमच्या नेत्यांची आक्रमक, चिथावणीखोर, आत्मसमर्थनपर विधाने यांवरून हे सर्व अत्यंत नियोजनपूर्वक, ठरवून केलेले कृत्य होते हे उघड आहे.

आता हे सर्व माओवाद्यांचे कारस्थान आहे अशी हाकाटी पिटली जात आहे, पण याचे काय पुरावे आहेत? माओवादी साहित्य व शस्त्रे सापडल्याचे सांगणाऱ्या जमावानेही त्याच्या पुष्ट्यर्थ काहीही पुरावा दिला नाही. 

असे म्हणता येईल की आम्ही एका छोट्याशा विभागात फिरलो, कदाचित बाँब वगैरे अन्यत्र असतील; मात्र आम्ही सीपीएम व बीयूपीसीच्या किमान 150- 200 लोकांशी बोललो, त्यापैकी एकानेही, बीयूपीसीने सशस्त्र प्रतिकार केल्याचे सांगितले नाही. किंबहुना अनेक सीपीएम समर्थकांनी असेच सांगितले की, आमची घरे परत मिळवण्यासाठी आम्ही हे युद्ध केले. माओवादी वा बीयूपीसीने शस्त्रास्त्रांचा वापर केल्यामुळे सीपीएमचे कार्यकर्ते जखमी वा मृत झाल्याचा निर्विवाद पुरावा खुद्द सीपीएम देऊ शकलेले नाहीत. आम्हाला भेटलेले सर्व जखमी हे हरमदच्या हल्ल्याला बळी पडलेले बीयूपीसीचे लोक होते!

दुसरे असे की, जे यापूर्वीही अनेकदा पुढे आले आहे आणि आमच्या या दौऱ्यातही दिसून आले- की ही तृणमूल काँग्रेस विरुद्ध सीपीएम अशी लढाई नाही. बीयूपीसी हे तृणमूलचे दुसरे रूप नाही. त्याचप्रमाणे ही डावे व अतिडाव्यांमधलीही लढाई नाही. बीयूपीसी हा नंदीग्राम परिसरातील क्रुद्ध नागरिकांचा समूह किंवा संघटन आहे जे त्यांची जमीन बळकावण्यासाठी सीपीएम अवलंबत असलेल्या दमननीती आणि धटिंगणशाहीचा विरोध करत आहेत. त्यांच्यामध्ये तृणमूल, एसयूसीआय, जमायते उलेमा हिंद, सीपीआय (एमएल), काँग्रेस एवढेच नव्हे तर खुद्द सीपीएमचेही लोक आहेत.

आज सर्वात खेदजनक बाब ही आहे की नंदीग्राममध्ये शेजारीच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. खेजुरीमध्ये काही लोक 11 महिन्यापर्यंत निर्वासित होऊन राहिले ही खरीच गोष्ट आहे. ते किती होते या आकड्याबाबत मतभेद होऊ शकतो, परंतु त्यांच्या मनात कडवटपणा भरला आहे हे निर्विवाद! मात्र त्यांना त्यांच्या सामर्थ्यवान पक्षाचे आणि राज्यप्रशासनाचे भक्कम पाठबळ आहे. 

पुढे येणाऱ्या पंचायत निवडणुका हा पुन्हा एकदा संघर्षाचा आखाडा ठरू शकतो. तसे झाले तर राजकारणाचा एक कुरूप चेहरा त्यातून पुढे येईल. म्हणूनच या परस्परांत लढणाऱ्या गटांमध्ये मध्यस्थीची गरज आहे. खरे तर एक प्रामाणिक, निष्पक्षपाती प्रशासन हे करू शकते; पण ते होईल? पक्ष व प्रशासनात सुस्पष्ट सीमारेक्षा असायला हवी, तीच इथे आज अदृश्य झालेली आहे. ती पुन्हा निर्माण होईल?

दोन्ही बाजूंच्या लोकांना अन्न, आवश्यक गरजांची पूर्तता, त्यांची घरे पुन्हा बांधण्यासाठी मदत हवी आहे. अनेकांचे तर सर्वस्वच गेले आहे. अनेकांचा रोजगार गेला आहे, तर कित्येकांची रोजगारसाधने. विशेषत: गरीब वर्गाची स्थिती अशावेळी नेहमीच अधिक बिकट होत असते. 

सीपीएम व बीयूपीसीमधील आरोप- प्रत्यारोप, आघात-प्रत्याघात चालूच आहेत. काही ठिकाणी त्यामध्ये सुधारणा होतेय, पण अगदीच किरकोळ. अशावेळी प्रशासनाने आपले कर्तव्य अधिक प्रगल्भपणे, योग्य रीतीने बजावायला हवे आहे. गुन्हेगारांना शासन, गरजूंना मदत आणि दुबळ्यांचे रक्षण हे त्यांच्याकडून अपेक्षित आहे. पण हे घडेल?

संवेदनशील, शांतताप्रेमी नागरी समाज आणि सामाजिक संघटनांनी तिथे पोचणे आवश्यक आहे. मात्र या सर्वाआधी, सीपीएम व प.बंगाल सरकारने तेथील शस्त्रसज्ज फौजा मागे घेऊन, नंदीग्राम परिसरातील नागरिकांना संरक्षणाची हमी देणे आवश्यक आहे. मानवाधिकार आयोगाने आपला अंतरिम अहवाल देऊन राज्य व केंद्र सरकारला सुस्पष्ट सूचना देऊन त्यांची अंमलबजावणी होत आहे हे पाहिले पाहिजे.

शब्दांकन : सुव्रो मुखर्जी

---------------

प.बंगालमध्ये नंदीग्रामच्या क्षेत्रातून येणार्या बातम्यांनी आमची झोप उडाली आहे. नंदीग्राममध्ये चाललेले मानवी जीवितांचे आणि संसाधनांचे हनन संतापाच्या पलीकडचे आहे. तेथे शांतता व सुव्यवस्था या क्षणी प्रस्थापित करणे आणि नागरिकांना आपले लोकशाही अधिकार राबवता येतील अशी परिस्थिती तत्काळ निर्माण करणे हे राज्यशासनाचे कर्तव्य आहे. लोक नाहक अत्याचाराला बळी पडत आहेत. लोकांच्या सहमतीशिवाय त्यांची संसाधने त्यांच्या हातून काढून घेतली जात आहेत. पत्रकार, कार्यकर्ते, संवेदनशील नागरिक यांना नंदीग्राममध्ये जाण्यावाचून रोखले आहे. पं.बंगालमध्ये डाव्या पक्षांचे पुरोगामी सरकार सत्तेवर असल्याने या प्रश्नाला एक नाजूक स्वरूप प्राप्त झाले आहे. प्रश्न आपण डावे/उजवे असण्याचा नाही, प्रश्न आपण माणसे असण्याचा आहे...

विजय तेंडुलकर, डॉ.श्रीराम लागू, दीपा लागू, माधुरी पुरंदरे, सतीश काळसेकर, अतुल पेठे, मकरंद साठे, मोहित टाकळकर, ज्योती सुभाष, किरण यज्ञोपवित, शशांक शेंडे…

Tags: गावांवर ताबा नंदीग्राम हॉस्पिटल नंदीग्राम डायरी मेधा पाटकर शांतियात्रा ऑपरेशन नंदीग्राम weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मेधा पाटकर

आंदोलनकर्त्या- नर्मदा बचाव आंदोलन, कार्यकर्त्या- सामाजिक चळवळ 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके