डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

एखादा सिनेमा त्यातल्या साधेपणाने मन जिंकून घेतो तर आणखी एखादा त्यातल्या गुंतागुंतीने प्रभावित करतो. या सगळ्या गोष्टी तर असतातच, पण माझ्यापुरते सर्वात जास्त महत्त्वाचे असते दिग्दर्शकाचा प्रामाणिकपणा. मनापासून, कोणताही आव न आणता केलेला सिनेमा तांत्रिक दृष्ट्या कांकणभर कमी असला तरी मनात घर करतो. मग तो सिनेमा राजकीय असो, नातेसंबंधांवर आधारलेला असो की रिॲलिझमशी फारकत घेणारा. मला काय सांगायचंय, कसं सांगायचंय आणि का सांगायचंय याची खरी उत्तरं दिग्दर्शकापाशी असली की त्याचा/तिचा सिनेमा प्रेक्षक म्हणून आपल्यावर परिणाम करतोच. ती संवेदनशीलता मात्र आपल्यामध्ये असायला हवी.

कोविडमुळे नोव्हेंबर महिन्यात होऊ न शकलेला भारताचा 51 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जानेवारी महिन्यात 16 ते 24 या दरम्यान पार पडला.

आयनॉक्सचं आवार कधी नव्हे एवढं सुनंसुनं दिसत होतं. अतिशय तुरळक गर्दी. दर वर्षीप्रमाणे दिव्यांचा झगमगाट होता. रस्त्यांवर रोषणाई होती. पण तरीही आसमंतात उत्सवाचं वातावरण नव्हतं. भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफीचा) हा पहिलाच दिवस आहे, असं एरवी कोणाला खरंही वाटलं नसतं. पण देशातलीच नाही, तर जगातली परिस्थिती 2020 मध्ये आलेल्या कोव्हिडने बदलून टाकली होती. गेल्या वर्षभरात, मार्च महिन्यानंतर जगभरात एकही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव झालेला नव्हता. अगदी कानसारखा महोत्सवाचाही त्याला अपवाद नव्हता. अनेकांनी आपले महोत्सव ऑनलाईन केले होते. सिनेमे दाखवण्याबरोबरच विविध दिग्दर्शकांच्या मुलाखती, सिनेमाविषयक चर्चा अशा महोत्सवामध्ये असणाऱ्या अनेक गोष्टी ऑनलाईन, झूमसारख्या माध्यमांमधून, प्रेक्षकांसमोर आणल्या गेल्या. आलेल्या परिस्थितीला शरण न जाता त्यातून मार्ग काढण्याचा तो एकमेव पर्याय उपलब्ध होता.

आणि मग हळूहळू परिस्थिती सुधारू लागली. लॉकडाऊनमध्ये असलेली बंधनं कमी झाली. माणसं कामासाठी घराबाहेर पडू लागली. अनेकांच्या आयुष्यात खूप मोठी उलथापालथ होऊन गेलेली होती. आर्थिक मंदीमुळे खचलेली माणसं नव्याने उभं राहण्याचा प्रयत्न करू लागली होती. अशा वेळी शो मस्ट गो ऑन या तत्त्वावर केंद्रातल्या डिरेक्टोरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हलने (डिएफएफ) गोव्यातला चित्रपट महोत्सव ऑनलाईन न करता प्रत्यक्ष साजरा करण्याचा धाडसी निर्णय घेतला. किंबहुना, या वेळचा महोत्सव हायब्रिड होता. म्हणजे ऑनलाईनही होता आणि फिजिकलही. 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या महोत्सवाची वेळ तेवढी पुढे ढकलण्यात आली होती. 2020 चा 51 वा चित्रपट महोत्सव 16 ते 24 जानेवारी या काळात जाहीर झाला. आणि व्यवस्थापनामध्ये फार काही अडथळे न येता पारही पडला. इतकंच नव्हे तर, 2021 च्या नोव्हेंबर महिन्यात नेहेमीप्रमाणे 52 वा महोत्सव होणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं.

कोव्हिडचा धोका संपलेला नसल्याने एरवीपेक्षा जास्त काळजी घेतली जाणं स्वाभाविक होतं. प्रत्येक प्रवेशद्वारावर सॅनिटायझर आणि तापमान तपासणं हे तर होतंच, पण तिकिटांचं सगळं बुकींग फक्त ऑनलाईन होतं. महोत्सवामधल्या सिनेमांची माहिती देणारा कॅटलॉग रद्द करण्यात आला होता. ही सगळी माहिती इफीच्या वेबसाईटवर उपलब्ध असल्यामुळे त्यावाचून काही अडणारही नव्हतं. थिएटरसुद्धा प्रत्येक शोनंतर सॅनिटाईझ केलं जात होतं. त्यासाठी वेळ असावा म्हणून दिवसभरातले शोजही कमी करण्यात आले होते. शिवाय थिएटरमध्ये एक खुर्ची सोडून प्रेक्षक बसू शकत होते. त्यामुळे कमी प्रेक्षक हजेरी लावणार हे गृहित धरलेलं होतं. प्रशासनाने आणि रसिकांनीही. म्हणूनच आयनॉक्सचं आवार पहिल्या दिवशी सुनंसुनं वाटत असलं तरी ते अपेक्षितही होतं. भारताच्या नॅशनल फिल्म हेरिटेज मिशनचे तांत्रिक सल्लागार उज्ज्वल निरगुडकर यांच्याशी गप्पा मारताना ते म्हणालेही, ‘या वर्षीचा महोत्सव मुळात होतो आहे हेच महत्त्वाचं आहे. या काळातही चित्रपट महोत्सव आयोजित करता येतो, तो यशस्वीपणे पार पडतो, ही जगभरातल्या इतर चित्रपट महोत्सवांसाठी एक दिलासा देणारी घटना आहे. त्यांनाही यातून विश्वास मिळणार आहे. गोव्यापाठोपाठ केरळचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवही आता होतोय. माझ्या दृष्टीने हे या महोत्सवाचं सर्वात मोठं यश आहे.’

निरगुडकरांशी असहमत होण्याचा प्रश्नच नाही. आणि खरंच, काही छोट्या-मोठ्या अडचणी सोडल्या तर नेहमीसारखाच या महोत्सव पार पडला यातही शंका नाही. आमच्यासारखी जी थोडीफार मंडळी गोव्यात पोचली होती त्यांच्यासाठी खूप महिन्यांनी थिएटरमध्ये, मोठ्या पडद्यावर सिनेमे पहाण्याचा आनंदही होताच. दर वर्षीसारखा माहोल नसला, ओळखीचे चेहरे नसले आणि पाहिलेल्या सिनेमांवर गंभीरपणे वाद घालणारी माणसं खूपच कमी असली तरी ज्यांनी हजेरी लावली होती ते सिनेमाचे अस्सल दर्दी होते हे शंभर टक्के खरं. (त्यातही क्रिकेटचे चाहतेसुद्धा होतेच. अजिंक्य राहणेच्या भारतीय संघाने चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला नमवलं आणि मालिका जिंकली, त्या दिवशी आयनॉक्सच्या प्रांगणात फोनवर सामना पाहणाऱ्यांचे घोळके दिसत होते.) नाही तर कोव्हिडचा धोका पत्करून शंभर दोनशे माणसांचा वावर असलेल्या ठिकाणी कोण कशाला जाईल?

पण चित्रपट महोत्सव केवळ एवढ्यासाठीच असतो का? जगभरात कुठेही प्रत्यक्ष माणसांच्या गर्दीत चित्रपट महोत्सव होत नसताना आपण तो घेऊन दाखवला यावरच महोत्सवाचं यश ठरवायचं का? मुळात चित्रपट महोत्सवाचा हेतू नेमका काय असतो? कठीण काळातही लोकांना एकत्र आणून दाखवणं, की जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवू पाहणाऱ्या दिग्दर्शकांचे चांगले सिनेमे दाखवणं? आणि चांगले सिनेमे दाखवणं हा जर मूळ उद्देश असेल तर तो काही फारसा सफल झाला असं मला वाटलं नाही. एखादी व्यक्ती महोत्सवाच्या आठ दिवसांमध्ये 24 ते 32 सिनेमे पहात असेल तर त्यातले किमान आठेक सिनेमे चांगले निघायला हवेत. एक दोन अप्रतिम असावेत आणि एखादा मास्टरपीस बघायला मिळावा, अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. या वर्षी एका हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढेही उत्तम सिनेमे मिळाले नाहीत. मान्य आहे, 2020 मध्ये मार्च-एप्रिलनंतर फारसे सिनेमे प्रदर्शितच झाले नाहीत. थिएटर्स बंद होती, शूटिंग्स बंद होती आणि या सगळ्याचा परिणाम सिनेमांवरही अर्थातच झाला होता. त्यामुळे कदाचित निवड करण्यासाठी फारसे पर्याय उपलब्ध नसतील.

पण मग तरीही महोत्सव घेण्याचा अट्टाहास गरजेचा होता का? पणजीतला आठ दिवसांचा महोत्सव आटोपून घरी परतेपर्यंत या प्रश्नाचं उत्तर सापडलेलं नव्हतं. वर्षभर आपण ज्या गोष्टीची वाट पहात असतो त्या गोष्टीने तृप्त न होता माघारी यावं लागलं, ही हुरहूर मनात होती. याला पूर्णपणे महोत्सवातल्या सिनेमांनाही जबाबदार धरता येणार नाही हेही समजत होतं. मूबीसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आज अनेक महोत्सवांमध्ये गाजलेले तसंच जगात क्लासिक्स गणले गेलेले भारतीय आणि अभारतीय सिनेमे सहज उपलब्ध असतात. नेटफ्लिक्स, प्राईम, हॉटस्टार यांसारख्या माध्यमांमधूनही अनेक सिनेमे, उत्तमोत्तम मालिका पहायला मिळतात. अशा वेळी चित्रपट महोत्सवांचं महत्त्वही फार वाटत नाही. पूर्वी सहजपणे पाहता येणार नाहीत, असे सिनेमे पाहण्यासाठी हे महोत्सव आवश्यक वाटत. आज ती संधी हातातल्या स्मार्टफोनने दिलेली आहे. पण घरात एकट्याने असा सिनेमा पाहणं आणि प्रत्यक्ष महोत्सवाला जाऊन, जो काही आहे तो माहोल अनुभवत थिएटरमध्ये सिनेमे पाहणं यात फरक आहेच की! थोड्या फार प्रमाणात गोव्याने हा माहोल दिला, सिनेमांनी मात्र निराशा केली.

0

एखादा सिनेमा मनाला भावतो म्हणजे नेमकं काय होतं? सिनेमाची गोष्ट आवडते? त्यातला अभिनय पसंत पडतो? सिनेमामधले छोटे छोटे क्षण मनात रेंगाळत राहतात? पटकथा, संवाद, छायाचित्रण या बाबींची वाहवा कराविशी वाटते? एखादा सिनेमा त्यातल्या साधेपणाने मन जिंकून घेतो तर आणखी एखादा त्यातल्या गुंतागुंतीने प्रभावित करतो. या सगळ्या गोष्टी तर असतातच, पण माझ्यापुरते सर्वात जास्त महत्त्वाचे असते दिग्दर्शकाचा प्रामाणिकपणा. मनापासून, कोणताही आव न आणता केलेला सिनेमा तांत्रिक दृष्ट्या कांकणभर कमी असला तरी मनात घर करतो. मग तो सिनेमा राजकीय असो, नातेसंबंधांवर आधारलेला असो की रिॲलिझमशी फारकत घेणारा. मला काय सांगायचंय, कसं सांगायचंय आणि का सांगायचंय याची खरी उत्तरं दिग्दर्शकापाशी असली की त्याचा/तिचा सिनेमा प्रेक्षक म्हणून आपल्यावर परिणाम करतोच. ती संवेदनशीलता मात्र आपल्यामध्ये असायला हवी.

‘आय नेव्हर क्राय’ आणि ‘माय लिट्‌ल सिस्टर’ या इफीमध्ये बघितलेल्या दोन सिनेमांना हे निकष नेमके लागू होतात.

पोलीश दिग्दर्शक आणि पटकथाकार पिओत्र दोमालेवस्की यांचा ‘आय नेव्हर क्राय’ ही एका सतरा वर्षांच्या मुलीची, ओलाची गोष्ट सांगतो.

सिनेमाची सुरुवात होते तेव्हा ओला ड्रायव्हिंगची टेस्ट देताना आपल्याला दिसते. बोलण्याच्या ओघात या आधी दोन वेळा ती या टेस्टमध्ये नापास झाल्याचंही कळतं. इन्स्ट्रक्टर तिला बरी गाडी चालवते आहेस असं सांगतो आणि पुढच्याच वळणार एक माणूस अचानक गाडीच्या समोर येतो, ओला दचकते, चूक करते आणि तिसऱ्यांदा नापासचा शिक्का घेऊन येते. वाटेत आलेल्या माणसाला शिव्या घालणं, इन्स्ट्रक्टरशी हुज्जत घालणं या  सगळ्यातून ओलाचा आक्रमक स्वभाव आपल्या लक्षात येतो. वारंवार ड्रायव्हिंग टेस्टसाठी पैसे देता यावेत एवढी सधन कुटुंबातली ती नाही हेही समजतं.

ओलाच्या घरी तिची आई आहे आणि तिचा शारीरिक दृष्ट्या विकलांग तरुण भाऊ. वडील डब्लिनला, आयर्लंडमध्ये पैसे कमावण्यासाठी गेलेले आहेत. गेली कित्येक वर्षं. एक प्रकारे ओलाशी त्यांचा फारसा संबंधच आलेला नाही. पण आपल्या अठराव्या वाढदिवसासाठी गाडी भेट देता यावी, म्हणून ते पैसे साठवताहेत एवढं तिला वडिलांविषयी प्रेम वाटायला पुरेसं आहे.

टेस्टमध्ये नापास होऊन ओला घरी येते आणि डब्लिनहून फोन येतो. ड्युटीवर असताना कंटेनरच्या अपघातामध्ये वडिलांचा मृत्यू झाल्याची बातमी कळते आणि मायलेकी हादरतात. आपल्या नवऱ्याचे अंतिम संस्कार योग्य पद्धतीने व्हायलाच हवेत, त्याचं शव पोलंडमध्ये परत आणायलाच हवं, असा आईचा आग्रह असतो आणि त्यासाठी आपल्या सतरा वर्षांच्या मुलीला ती डब्लिनला पाठवायचा निर्णय घेते.

‘आय नेव्हर क्राय’ म्हणजे ओलाचा एका अनोळखी देशातला प्रवास आहे. पोलीश एम्बसीमध्ये जाऊन माहिती काढणं, नोकरशाहीचा सामना करणं, प्रसंगी खोटं वागून हवी ती कागदपत्रं मिळवणं असले सगळे प्रकार ओला करते. मध्येच थकून आईला, ‘मी फक्त सतरा वर्षांची आहे ग, करतेय मी प्रयत्न,’ असं असहाय्यपणे सांगते.

वडिलांचं शव परत नेण्यासाठी होणारा खर्च आपल्याला परवडणारा नाही हे ओलाच्या लक्षात येतं. वडिलांचं तिथे एका बाईशी अफेअर असल्याचं कळतं. त्यांच्या अपघाताची भरपाई मिळू शकत नाही. कारण अपघात झाला तेव्हा ते दुसऱ्या एका मित्राची ड्युटी करत होते आणि कायदेशीर दृष्ट्या ते मुळी कामावरच नव्हते हे समजतं. आणि या सगळ्यामध्ये ओलाचा शोध चालू असतो तो वडिलांनी आपल्या गाडीसाठी जमवलेल्या पैशांचा.

हा शोध घेता घेता ओलाची आपल्या वडिलांशी जणू नव्याने ओळख होते. नात्यांचा अर्थ लक्षात येऊ लागतो. पैशांचं महत्त्व वेगवेगळ्या माणसांसाठी वेगवेगळं असतं याची जाणीव होते. वडिलांचा कलश घेऊन पोलंडला परतलेली ओला बदलून गेलेली असते. त्या संपूर्ण प्रवासात एकदाही एकही अश्रू न गाळणारी. आणि वडिलांची शवपेटी ठेवलेली गाडी कोणाचीही पर्वा करता चालवत असताना मनसोक्त रडणारी ओला मोठी झालेली असते.

कमिंग ऑफ एज किंवा असं मोठं होणं, जगाचं भान येणं यावर आजवर अनेक सिनेमे आलेले आहेत. प्रत्येकाची गोष्ट वेगळी, ट्रिटमेंट वेगळी. ‘आय नेव्हर क्राय’ अत्यंत साध्या सरळ पद्धतीने दिग्दर्शकाने आपल्यासमोर पेश केलाय. एक छोटीशी गोष्ट सांगणं एवढ्याच हेतूने. ना त्यात काही गिमिक्स आहेत, ना काही प्रयोग केले आहेत. पण त्यातला अस्सलपणा प्रत्येक फ्रेममधून जाणवतो. त्यातला साधेपणा आपल्याला भावतो. नखशिखान्त खरी वाटणारी ओला बराच काळ आपल्या मनात रेंगाळत राहते.

0

‘माय लिट्‌ल सिस्टर’सुद्धा असाच नातेसंबंधांवर आधारलेला सिनेमा आहे. हळुवार, भावूक. कॅन्सरसारखा आजार केंद्रस्थानी असूनही कुठेही मेलोड्रमॅटिक न होणारा. डोळ्याच्या कडा पाणावणारा, पण तरीही आशावादी. लेखक आणि दिग्दर्शक आहेत स्टेफनी श्वात आणि व्हेरोनिक रेमंड.

लिसा आणि स्वेन या जुळ्या बहीण भावांची ही कथा. लिसा ही बर्लिनमधली एक उत्तम नाटककार, तर स्वेन अतिशय नावाजलेला अभिनेता. लिसाच्या नवऱ्याला स्वित्झर्लंडमध्ये मोठी नोकरी असल्याने आपल्या दोन मुलांसह ती तिथे स्थायिक झालीये.

स्वेनला ल्युकेमिया झाल्याचं निदान होतं आणि लिसाची लेखणी थांबते. त्यानंतर बर्लिनमध्ये जाऊन भावाची देखभाल करणं, स्वित्झर्लंडमधला संसार सांभाळणं यात लिसाचा सगळा वेळ जाऊ लागतो. उपचार घेऊन स्वेन घरी परततो तेव्हा, आपण आपली कारकीर्द जिथे सोडली तिथून ती पुन्हा सुरू करायची आहे असं त्याच्या मनाने घेतलेलं असतं. पण आपल्या मुख्य नटाला मोठ्या भूमिका आता झेपणार नाहीत, याची खात्री असलेला दिग्दर्शक नाटक बदलतो, नट बदलतो आणि स्वेन निराश होतो.

इथून सुरू होतो लिसाचा झगडा. भावाला एकदा शेवटचं रंगभूमीवर उभं करायचंच या विचाराने ती झपाटून जाते. एखादा छोटा मोनोलॉग का असेना, पण त्याने तो रंगमंचावर सादर करायला हवा या हट्टाखातर आपलं सगळं आयुष्य पणाला लावायला तयार होते. त्यासाठी आधीच तडे गेलेला संसार उद्‌ध्वस्त होतोय याचीही पर्वा ती करत नाही. ‘लिसा, तुझं पुन्हा लिहायला लागणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे,’ हे स्वेनचे शब्द तिला जणू प्रेरणा देतात.

या गोष्टीचा शेवट गोड असूच शकत नाही. पण म्हणून तो निराशावादीही नाही. रोमँटिक वास्तववाद त्यात नाही. पण तरीही टाईप करताना लॅपटॉपच्या कीबोर्डवर येणारा आवाज जितका स्वेनच्या मनावर फुंकर घालणारा वाटतो, तितकाच आपल्यालाही हेलावून जातो. शांत करतो आणि समाधानही देतो.

इथेही कॅमेऱ्याशी दिग्दर्शक फार खेळलेले नाहीत. उलट त्यांनी प्रकाशाचा भरपूर वापर केलेला जाणवतो. आपण एक सकारात्मक गोष्ट सांगतोय असंच जणू ते सुचवू पाहतात. एका दुर्धर आजारावर सिनेमा करताना असा दृष्टिकोन क्वचितच पहायला मिळतो. आणि एक सुरेख सिनेमा पाहिल्याचा आनंदही देतो.

(‘इफ्फी’वरील आणखी दोन लेख पुढील दोन अंकांत)

Tags: इफ्फी : 2021 आयनॉक्स सिनेमा आंतरराष्ट्रीय चित्रपट चित्रपट महोत्सव लॉकडाऊन गोवा डिरेक्टोरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हल weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके