ब्राझिलचा ‘ऑन व्हील्स’हा म्हटलं तर रोड मुव्हीच आहे. बारा तेरा वर्षांच्या दोन मुलांची ही गोष्ट. यातला मुलगा, ल्युकास अपंग आहे. मात्र, त्याच्या वागण्याबोलण्यात कुठेही त्या अपंगत्वाचं अस्तित्त्व जाणवत नाही. त्याचे आईवडीलही त्याच्याशी वागताना तो नॉर्मल असल्यासारखे वागतात आणि शाळेतले शिक्षक आणि वर्गमित्रही. त्याच्या वडिलांनी खास त्याला चालवता येईल अशी मोटरसायकल बनवून घेतलीये. मुलगी, लाईस, आई आणि आजीबरोबर रहातेय. आपले वडील कोण होते किंवा आहेत या प्रश्नाने तिचा पिच्छा पुरवलाय. एक दिवस तुझे वडील कामासाठी म्हणून बाहेर गेले आणि परत आलेच नाहीत, इतकंच आईने तिला सांगितलंय. आईपाशी एक फोटो आहे. त्यातला वडिलांच्या चेहऱ्याचा भाग तिने फाडून टाकलाय. उरलेल्या फोटोत आईने कडेवर घेतलेली ही छोटी लाईस आणि एक लाल रंगाची गाडी तेवढी दिसतेय.
काही सिनेमे पाहून मन प्रसन्न होतं. ते खूप ग्रेट सिनेमे असतात असं नाही, पण त्यांच्यात काहीतरी गोडवा असतो. मात्र एक साधी-सोपी गोष्ट सांगतानाही दिग्दर्शक आपल्याला अधिक काहीतरी सांगू पाहत असतातच. अशा काही सिनेमांविषयी-
प्लंबिंग आणि इलेक्ट्रिशियनचं काम करणारे तिघे. अत्यंत सामान्य आयुष्य घालवणारे. आणि त्यांच्यावरही एक छान सिनेमा बनू शकतो हे सांगणारा स्पेनचा ‘द ऑड - जॉब मेन’ हा सिनेमा.
वीसेक वर्षांपासून काम न मिळालेली एक ऐंशी वर्षांची अभिनेत्री. आणि आयुष्यातला शेवटचा सिनेमा करण्यासाठी तिनं अर्जेंटिनामधून थेट पॅराग्वेपर्यंत घेतलेली रोड ट्रिप दाखवणारा ‘शार्लोट’ हा सिनेमा.
आणि हीसुद्धा एक रोड ट्रिपच. बारा-तेरा वर्षांच्या एका पॅराप्लेजिक मुलानं आपल्या मैत्रिणीबरोबर तिच्या वडिलांच्या शोधासाठी घेतलेली. ‘ऑन व्हील्स’मधली.
‘व्हील ऑफ फॉर्च्युन अँड फँटसी’ या तिघांपेक्षा जरा वेगळा. तीन छोट्या छोट्या गोष्टींमधून आधुनिक जगातल्या तरुण मुलींच्या भावविश्वात डोकावणारा.
या चारही सिनेमांमध्ये वरवर पाहता ‘फील गुड’ असं काही असण्याची शक्यता वाटत नाही. पण तरीही या वर्षीच्या गोव्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधे या सिनेमांनी छान सिनेमा पाहिला मिळाल्याचा दिलासा निश्चितच दिला.
‘द ऑड - जॉब मेन’ची गोष्ट घडते बार्सिलोनामधे. व्हालेरो आणि पेप एका छोट्याशा प्लंबिंग कंपनीमध्ये काम करत असतात. ही कंपनी आहे व्हालेरोच्या बायकोची. पेपला आता निवृत्तीचे वेध लागले आहेत. त्याची जागा घेण्यासाठी व्हालेरोची बायको मोहा, म्हणजे मोहम्मद मेलाली नावाच्या मोरोक्कोहून बार्सिलोनामध्ये राहायला आलेल्या तरुण मुलाची निवड करते. एक आठवडा त्याची ट्रायल घेऊन ही नोकरी त्याला द्यायची की नाही ते ठरणार असतं. त्या एका आठवड्याचा हा सिनेमा.
मोहाविषयी पहिल्या क्षणापासून व्हालेरोच्या मनात अढी निर्माण होते. पण एकत्र काम करणं भाग असतंच. तो हरतऱ्हेनं मोहा या कामासाठी कसा लायक नाहीये हे बायकोला आणि पेपला पटवून देण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला, आपल्या ग्राहकांना मोहासारखा दुसऱ्या देशातला विस्थापित घरात घुसलेला आवडणार नाही असं सांगू पाहतो. मग त्याला काम जमत नाही हे दाखवू पाहतो.
पण मुळात व्हालेरोच्या मनात मोहाविषयी इतका नकारात्मक भाव का असतो? वरवर पाहता तो निव्वळ परकीयांवरचा राग असल्याचं जाणवतं. पण थोडं खोलात शिरल्यावर लक्षात येतं, व्हालेरोनं आयुष्यात जे जे गमावलंय ते ते सगळं मोहापाशी आहे. मध्यमवयीन व्हालेरो आता स्थूल झालाय. एका लग्नासाठी जुना सूट फिट व्हायला हवा म्हणून डाएट करतोय. मोहा अर्थातच तरुण आहे, तंदुरुस्त आहे आणि आनंदी आहे. जगाकडं पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन आशावादी आहे. म्हणून तर दिवसभर नोकरी करून तो संध्याकाळी बार्सिलोनाची कॅटलन भाषा शिकण्यासाठी क्लासला जातोय. आणि आयुष्यभर आपण जे काम करत आलोय त्यात कसला आलाय आशावाद, असा व्हालेरोचा दृष्टिकोन आहे. मोहाच्या कामात फारशा चुका काढू न शकणारा व्हालेरो आपल्या मनात खदखदणारा राग स्वाभाविकपणे मोहाबरोबरच्या वागण्यातून व्यक्त करतोय. त्याच्याशी तुसडेपणानं वागतो, त्याला काम जमत नाही असं म्हणत राहतो.
गंमत म्हणजे, ज्या ग्राहकांना मोहा आवडणार नाही असं व्हालेरोला वाटतंय त्या सगळ्यांनी मोहाला सहज स्वीकारलंय. एक शंभर वर्षांचे आजोबा त्याला आपल्या तरुणाईचं रहस्य सांगतात. एक फोटोग्राफर त्याच्या तगड्या शरीरावर भाळून त्याला आपला मॉडेल बनवते. आणि एका घरातल्या दोन लहान जुळ्या बहिणी व्हालेरो आणि मोहाला त्यांच्या घराच्या बाल्कनीमधे अडकवून ठेवतात. वेगवेगळी माणसं, अनोळखी घरं आणि त्यांचे अनेकविध अनुभव.
‘‘मी माझ्या शेजाऱ्यांना ओळखतही नाही. आमच्या दरम्यान एक भिंत आहे. पाणी, वीज, गॅस, टेलिफोन या सगळ्यांच्या वायर्सनी आम्ही एकमेकांना जोडलेलो आहोत तरीही. तीच गोष्ट या शहराची, इतर शहरांची. आणि तरीही आपण एकटे आहोत,’’ मोहाच्या स्वगतानं सिनेमाची सुरुवात होते. आणि हळूहळू लक्षात येतं, की हसत खेळत पुढे सरकणाऱ्या या सिनेमाचा गाभाच मुळी तो आहे.
प्लंबर किंवा इलेक्ट्रिशियन ही माणसं आपल्या कुटुंबाचा एक भाग असतात याची जाणीवही आपल्याला कधी होत नाही. आपल्या घरातल्या कोणत्याही खोलीमध्ये शिरण्याची त्यांना मुभा असते. त्यांच्या कामाचं स्वरूपच तसं असतं. आपण मात्र त्यांची दखल घेतो ते आपल्याला त्यांची गरज लागते तेव्हाच. त्यांच्या एरवीच्या आयुष्यात त्यांचं काय चालतं याचं आपल्याला सोयरसुतकही नसतं. आपण त्यांच्याशी कोणत्याच पातळीवर जोडले गेलेलो नसतो.
हे असं जोडलेलं नसणं म्हणजे काय ते हा सिनेमा सांगू पाहतो. मोहा आणि व्हालेरोच्या निमित्तानं आपण दोन भिन्न भाषिकांमधलं, दोन संस्कृतींमधलं विभागलेपण दाखवतो. माझ्या देशात तू आलायस म्हणून तू माझ्याशी नम्रपणे वागायला हवं या अहंभावाशी सामना करू पाहतो. आणि प्लंबिंग आणि इलेक्ट्रिशियनच्या अत्यंत रूक्ष कामामधून प्रेक्षकांना जोडण्याचा प्रयत्न करू मागतो.
दिग्दर्शक नेएस बाल्यूचा हा तिसरा सिनेमा. आपल्या या सिनेमाचं वर्णन करताना ती म्हणते, ‘‘ही एक प्रकारे हायब्रिड डॉक्युमेंटरी आहे. प्रत्यक्ष आयुष्य आणि कल्पना यांचं मिश्रण.’’ या सिनेमातले तीनही मुख्य कलाकार प्रत्यक्ष आयुष्यात खरोखरच प्लंबर आहेत. त्यांनी दिग्दर्शकाबरोबर तीन वर्षं प्रशिक्षण घेतलं. त्यांच्या कामातल्या अनुभवाचाही नेएसने उपयोग करून घेतला. त्यामुळं सिनेमातल्या घटना खूप खऱ्या वाटतात. त्यात फार काही घडतं असं नाही, पण माणसांच्या स्वभावाचे कंगोरे दिसतात आणि त्यातून गंमत निर्माण होते. या आपल्या ओळखीच्या जगाची मग नव्यानं ओळख होते.
0
ॲन्जेला मोलिना ही 66 वर्षांची एक स्पॅनिश अभिनेत्री आहे. अनेक स्पॅनिश सिनेमांमधून तिनं काम केलेलं आहेच, पण बऱ्याच इटालिअन सिनेमांमधून आणि टेलिव्हिजन मालिकांमधूनही ती प्रेक्षकांसमोर आलेली आहे. 1976पासून तिनं काम करायला सुरुवात केली आणि आजही नायिका म्हणून तिच्यासाठी सिनेमा लिहिला जातोय. ‘शार्लोट’ची नायिका तीच आहे. मात्र, इथं ती जवळपास 80 वर्षांची आहे. गेली वीस वर्षं कामाशिवाय जगतेय. आपल्या जुन्या दिवसांची आठवण काढतेय.
सिनेमाचा टोन पहिल्या क्षणापासून आपल्या लक्षात येतो.
शार्लोट आपल्या मानसोपचार तज्ज्ञाकडं नेहमीच्या सेशनसाठी आलीये. इतर बऱ्याच गोष्टी बोलताना ती मधेच त्याला विचारते, ‘‘जे घडलेलं नाही त्याच्या आठवणी येऊ लागल्या तर काय करायचं?’’
दरम्यान, मागं बसलेल्या तिच्या मानसोपचार तज्ज्ञाचा श्वास कोंडू लागलेला असतो. क्षणात तो खाली कोसळतो. शार्लोट त्याला तपासून पाहते आणि तो जिवंत नाही हे तिच्या लक्षात येतं. त्याच्या ड्रॉवरमधून आपल्याला हव्या असलेल्या औषधांच्या बचकभर गोळ्या ती पर्समधे टाकते आणि खोलीच्या बाहेर येते.
बाहेर बसलेली रिसेप्शनिस्ट तिला विचारते, ‘‘पुढची अपॉइंटमेंट हवीये का?’’
‘‘नको. आणि मला वाटतं तू आत जाऊन डॉक्टरांना पहावं. ही इज डेड.’’
मृत्यूचा प्रसंग विनोदी पद्धतीनं दाखवताना दिग्दर्शक सिमॉन फ्रॉन्को आपली ओळख स्वत:च्या विश्वात रमलेल्या, भूतकाळ विसरू न शकणाऱ्या एका स्वयंकेंद्रित अभिनेत्रीशी करून देतो. हळूहळू ही ओळख दाट होत जाते. तिचं एखाद्या भव्य वाड्यासारखं जुनं घर, तिच्या सेवेत चोवीस तास असणारा तरुण तैवानी मुलगा, त्या दोघांचं नातं आपल्या समोर उलगडत जातं.
ज्या दिग्दर्शकामुळं शार्लोटची कारकिर्द बहरलेली असते तो त्याच्या शेवटच्या सिनेमाचं शूटिंग पॅराग्वेमध्ये सुरू करणार असल्याची बातमी शार्लोटला कळते. या सिनेमाची पटकथा तिला माहीत असते. किंबहुना, त्यातली भूमिका तिच्यासाठीच लिहिलेली आहे हेही तिला ठाऊक असतं. आपली भूमिका दुसरं कोणी करूच शकत नाही, ती आपणच करायला हवी या हट्टानं ती पेटून उठते आणि आपलं मोडकळीला आलेलं घर भाड्यानं देऊन एक भली थोरली व्हॅन घेऊन पॅराग्वेच्या दिशेनं निघते. ड्रायव्हर अर्थातच तिचा तैवानी मदतनीस. संपूर्ण रात्र ती त्याला झोपू देत नाही. आणि दोन देशांमधली सीमा पार करायची वेळ येते तेव्हा सांगते, ‘‘माझ्यापाशी पासपोर्ट नाही. तो वीस वर्षांपूर्वीच एक्सपायर झालाय!’’
आपल्या दिग्दर्शक मित्राला भेटण्यासाठी तिनं केलेला आटापिटा म्हणजे हा सिनेमा आहे. पैसे संपल्यावर ती एका चेहऱ्याला तजेला आणणाऱ्या क्रीमच्या जाहिरातीमधे काम करायचं मान्य करते. आणि ‘‘तुमच्या क्रीमनं माझा चेहरा खराब झालाय,’’ असं सांगून संपूर्ण चेहरा कागदानं झाकून शूटिंग करायला नकारही देते.
भूतकाळ मुठीत पकडून ठेवणाऱ्या आणि तरीही भविष्याची स्वप्नं पाहणाऱ्या या विक्षिप्त पण गोड शार्लोटच्या आपण कधी प्रेमात पडतो ते आपल्यालाही कळत नाही.
दिग्दर्शक सिमॉन फ्रॉन्को गोव्याला आले होते. आपल्या या सिनेमाविषयी बोलताना त्यांनी सांगितलं, ‘‘आपण एके काळी कोण होतो आणि आता काय आहोत याचं शार्लोटला भान येतं आणि त्या क्षणापासून तिचा प्रवास सुरू होतो. पण हा प्रवास केवळ ती पार करत असलेलं अंतर नाही, तर तो मानसिक अधिक आहे. वैयक्तिक आहे.’’
शार्लोटचा मदतनीस तैवानी का आहे असा प्रश्न स्वाभाविकच विचारला गेला. त्यावर सिनेमाच्या निर्माती लेना फर्नांडेज म्हणाल्या, ‘‘पॅराग्वेमधे तैवानहून आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. आमच्या देशानं त्यांना मान्यता दिलेली आहे. आणि वेगवेगळ्या संस्कृतींच्या लोकांचं प्रतिबिंब सिनेमात पडावं असं आम्हांला वाटत होतं. त्यामुळं सिनेमाला आंतरराष्ट्रीय फ्लेवरही येतो.’’
या सिनेमाचा शेवटही खास आहे. शार्लोट चेहऱ्यावर तजेला आणणाऱ्या क्रीमची जाहिरात करण्याचं मान्य करते. जाहिरातीमध्ये तिचा मूळ म्हातारा चेहरा आधी दाखवला जातो. आणि मग क्रीम लावल्यानंतर पडद्यावर येणारा चेहरा अर्थातच फोटोशॉप करून तरुण दिसेल असं बघितलं जातं. त्यावरच्या सुरकुत्या सगळ्या काढून टाकल्या जातात. ही जाहिरात पाहून शार्लोट खूप चिडते. असं खोटं खोटं तरुण दिसणं तिला अजिबातच पसंत पडत नाही.
सिनेमा संपतो तेव्हा आपल्याला जाहिरातीचं दिग्दर्शन करणारी मुलगी दिसते. त्या क्रीमची तिची जाहिरात पाहण्यासाठी संबंधित अधिकारी बसलेले दिसतात. जाहिरात सुरू होते. आपल्याला शार्लोट दिसते. मग ती क्रीम वापरू लागते. आणि त्यानंतर दिसणारी शार्लोटही म्हातारीच आहे. पण तिच्या चेहऱ्यावर अधिक आत्मविश्वास आहे. आणि पडद्यावर ओळ उमटते-
‘वुई आर बॉर्न टु डाय.’
या सिनेमाचं सगळं सार या बदललेल्या जाहिरातीमधे आहे. त्यामुळे या साध्या-सोप्या गोड सिनेमालाही एक आगळं परिमाण मिळालंय. आणि तो नुसताच ‘फील गुड’ सिनेमा राहिलेला नाही.
ॲन्जेला मोलिना यांना या वर्षी इफीमधे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला हे इथं आवर्जून सांगायला हवं.
0
ब्राझिलचा ‘ऑन व्हील्स’हा म्हटलं तर रोड मुव्हीच आहे. बारा-तेरा वर्षांच्या दोन मुलांची ही गोष्ट. यातला मुलगा, ल्युकास अपंग आहे. मात्र, त्याच्या वागण्याबोलण्यात कुठेही त्या अपंगत्वाचं अस्तित्व जाणवत नाही. त्याचे आईवडीलही त्याच्याशी वागताना तो नॉर्मल असल्यासारखं वागतात आणि शाळेतले शिक्षक व वर्गमित्रही. त्याच्या वडिलांनी खास त्याला चालवता येईल अशी मोटारसायकल बनवून घेतलीये.
मुलगी- लाईस, आई आणि आजीबरोबर राहतेय. आपले वडील कोण होते किंवा आहेत या प्रश्नानं तिचा पिच्छा पुरवलाय. ‘‘एक दिवस तुझे वडील कामासाठी म्हणून बाहेर गेले आणि परत आलेच नाहीत,’’ इतकंच आईनं तिला सांगितलंय. आईपाशी एक फोटो आहे. त्यातला वडिलांच्या चेहऱ्याचा भाग तिनं फाडून टाकलाय. उरलेल्या फोटोत आईनं कडेवर घेतलेली ही छोटी लाईस आणि एक लाल रंगाची गाडी तेवढी दिसतेय.
कोणत्याही परिस्थितीत वडिलांना शोधून काढायचं हा ध्यास लाईसनं घेतलाय. एक दिवस यासाठी ती घरातून पळून जायचं ठरवते. ल्युकास तिचा मित्र असल्यामुळं त्यालाही बोलावते. आपल्या खास मोटारसायकलवरून ल्युकास आणि साध्या सायकलवरून लाईस यांचा प्रवास सुरू होतो.
या प्रवासात त्यांना भेटणारी माणसं, येणारे अनुभव, मित्र म्हणून त्यांचं अधिक जवळ येणं, आपल्या अपंगत्वाविषयी ल्युकासला वाटणारी खंत, त्यानं स्वीकारलेलं आपलं शरीर, लाईसला जाणवलेलं वडिलांविषयीचं सत्य... अशा छोट्यामोठ्या हेलकाव्यांमधून हा सिनेमा पुढे सरकतो आणि शेवटी जे आपल्या मुठीत आहे तेच खरं, जे नाही त्याच्या मागं का लागायचं, असं सांगून संपतो.
इथंही या दोन मुलांच्या प्रवासात खूप काही साहसी घडत नाही. नाही म्हणायला, एका म्हाताऱ्या बाईच्या घरी जेवण मिळतंय म्हणून ल्युकास आणि लाईस थांबतात. काळोखं घर, मिणमिणणारे दिवे, रहस्यमय वातावरण आणि म्हातारीच्या मेलेल्या नवऱ्याचं अस्तित्व काही काळ आपल्याला धस्स करतं खरं, या मुलांना आता कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागणार या विचारानं आपण अस्वस्थ होतो. पण क्षणभरच. कारण ल्युकास आणि लाईसही काही क्षणांतच त्या घरातून बाहेर पडतात. कारण प्रेक्षकांना घाबरवणं किंवा त्यांच्यावर दडपण आणणं हा मुळी दिग्दर्शकाचा हेतूच नाही. या दोन मुलांना जगाचं भान येणं, आपल्या परिस्थितीचं भान येणं एवढंच त्याला दाखवायचंय. तेही फार गंभीरपणे नाही, हसतखेळत. म्हणून तर सिनेमा संपतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरही एक बारीकसं हसू उमटलेलं असतं. मन प्रसन्न झालेलं असतं. एखाद्या सिनेमानं एवढं केलं तरी खूप झालं की!
0
‘व्हील ऑफ फॉर्च्युन अँड फँटसी’चं जपानी नाव आहे ‘गुझेन तो सोझो’ आणि त्याचा अर्थ दिलाय, ‘योगायोग आणि कल्पनाविलास.’ तीन छोट्या छोट्या गोष्टींचा मिळून हा सिनेमा आहे. तीन तरुण मुलींच्या गोष्टी हा यातला समान धागा.
पहिल्या गोष्टीचं नाव आहे, ‘मॅजिक (ऑर समथिंग लेस अशुअरिंग)’. मिको आपल्या अतिशय जवळच्या मैत्रिणीबरोबर टॅक्सीतून प्रवास करत असते. मैत्रीण नव्यानं तिला भेटलेल्या एका मुलाविषयी भरभरून बोलत असते. आमच्यात काहीतरी बॉन्ड तयार झालाय, हे नातं पुढे जाऊ शकतं असं सांगत असते. आणि मिकोच्या लक्षात येतं की आपली ही मैत्रीण ज्याच्या प्रेमात पडतेय तो आपला माजी प्रियकर, काझुआकी आहे. मैत्रिणीच्या बोलण्यातून तिला हेही कळतं की तो अजून आपल्याला विसरलेला नाहीये. मैत्रिणीला घरी सोडून मिको टॅक्सी पुन्हा मागे वळवते आणि थेट काझुआकीच्या ऑफिसमधे जाते. आपल्या दोघांनाही अजून एकमेकांविषयी आकर्षण आहे याची जाणीव त्यांना होते. पण त्याचं काय करायचं हे मात्र समजत नाही. कारण दोघांच्याही आयुष्याकडून असलेल्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात.
मग एक दिवस मिको आणि तिची मैत्रीण कॅफेमधे बसलेल्या असताना त्यांना काझुआकी भेटतो. तो ऑकवर्ड होतो. मिको काही बोलणार का? आपल्याविषयी काही सांगणार का? मिकोच्याही मनात द्वंद्व आहे. सांगून टाकावं का मैत्रिणीला सगळं? मोडावं का यांचं नव्यानं निर्माण होऊ लागलेलं नातं?
दुसऱ्या गोष्टीचं नाव आहे, ‘डोअर वाईड ओपन’, नाओ या मुलीची. नाओचं लग्न झालंय आणि सासाकी नावाच्या मित्राबरोबर निव्वळ सेक्स करण्यापुरतं तिचं नातं आहे. या सासाकीचा कॉलेजातल्या त्यांच्या सेगावा नावाच्या एका प्राध्यापकावर राग आहे. सेगावा यांना त्यांच्या एका पुस्तकासाठी मानाचा पुरस्कार मिळतो आणि त्यांची बदनामी करण्याच्या हेतूनं सासाकी नाओची मदत मागतो. नाओ प्राध्यापकांच्या ऑफिसमधे जाते. दरवाजा बंद करणार तोच ते तिला म्हणतात, ‘‘दरवाजा उघडाच असू दे.’’ मग नाओ त्यांच्याशी पुस्तकाविषयी, त्यातल्या काही वासना उद्दिपीत करणाऱ्या परिच्छेदांविषयी बोलू लागते. आणि त्यावरचं प्राध्यापकांचं म्हणणं रेकॉर्ड करते. ही क्लिप तिच्याकडून चुकीनं सेगावाला पाठवली जाते. प्राध्यापकांची बदनामी होते. आपल्यामुळे हे घडलं याची खंत आणि अपराधी जाणीव नाओला कायम कुरतडत राहते.
तिसरी गोष्ट आहे दोन बायकांची. नाव आहे ‘वन्स अगेन’. आया आणि नात्सुकोची. अनेक वर्षांनी शाळेतले मित्रमैत्रिणी भेटायचं ठरवतात आणि आयाला आपल्या एका वर्गमैत्रिणीची तीव्रतेने आठवण येते. तिचं पहिलं प्रेम.
स्टेशनवर तिला ही मैत्रीण दिसते. दोघी एकमेकींकडं बघून हसतात. ती आयाला आपल्या घरी घेऊन येते आणि म्हणते, ‘‘माफ कर, पण मला तुझं नाव किंवा चेहरा आठवतच नाहीये.’’ अधिक तपशिलात बोलल्यावर दोघींच्याही लक्षात येतं की शाळेतल्या मैत्रिणी तर दूरच, आपण एकमेकींना ओळखतच नाही. पण आता ओळख तर झालेली असते. दोघी एकमेकींशी बोलू लागतात, मनातल्या भावना व्यक्त करू लागतात आणि एकमेकींच्या दु:खांवर फुंकरही घालतात.
अतिशय साध्या गोष्टी. दिग्दर्शक रुसुकी हामागुची यांनी तितक्याच साधेपणानं सांगितलेल्या. फारसं खोलात न शिरता. इथं जे दिसतं तेवढंच आहे याची जाणीव आपल्याला ताबडतोब होते. पण त्यातला हळुवारपणा भावतो. वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या आयुष्यातलं हे डोकावणं आपल्याला निश्चितच काहीतरी देऊन जातं. फार काळ या व्यक्तिरेखा आपल्याला गुंतवून ठेवत नाहीत. तरीही जोवर त्या पडद्यावर दिसत राहतात तोवर आपण त्यात रंगून जातो एवढं नक्की.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या