डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

या सिनेमामध्ये प्रचंड नाट्य आहे. पण मेलोड्रामा कुठेही नाही. क्षणाक्षणाला खूप काही घडते आहे याची जाणीव आपल्याला सारखी होत असते, पण त्यात अतर्क्य वाटावे असे कणभरही काही नाही. भावनांचे हेलकावे आहेत, पण कढ नाहीत. आता पुढे काय होणार याची अस्वस्थ जाणीव आहे, पण रहस्यमयता नाही. आपल्या भूतकाळाला सामोरे गेलो, तरच वर्तमानात जगता येते असे सांगणारा हा असा सिनेमा एखादा महान दिग्दर्शकच बनवू शकतो! या सिनेमातही आल्मादोवर यांनी रंगांचा अप्रतिम उपयोग केला आहे. लाल रंग त्यांचा खास लाडका. त्यांच्या प्रत्येक सिनेमामध्ये हा लाल रंग जणू काही एखादी व्यक्तिरेखा असावी तसा येतो. पडद्यावरचे त्या रंगाचे अस्तित्वही काहीतरी म्हणत असते.
 

‘पॅरलल मदर्स’ हा पेद्रो आल्मादोवर यांचा नवा कोरा सिनेमा इफीमध्ये पाहायला मिळाला आणि नेहमीप्रमाणे या मास्टर दिग्दर्शकाने एक अप्रतिम अनुभव दिला. त्या सिनेमाविषयी...

2006 मध्ये प्रकाशित झालेल्या मुलाखतींच्या पुस्तकात पेद्रो आल्मादोवर या स्पॅनिश दिग्दर्शकाने म्हटले आहे, ‘‘वीस वर्षांपूर्वी मला वाटायचं की फ्रॅन्सिस्को फ्रॅन्कोवर सूड उगवायचा तर त्याचं अस्तित्वच नाकारायला हवं, त्याची आठवण काढताच कामा नये. माझे सिनेमे मी अशा प्रकारे बनवायला हवेत की जणू तो आमच्या आयुष्यात कधी नव्हताच. आज मात्र माझं मत बदललंय. मला वाटतं, स्पेनच्या आयुष्यातला तो काळ आम्ही विसरता कामा नये, हा आमचा नजीकचा इतिहास आहे याचं भान आम्ही ठेवायलाच हवं. माझ्या वैयक्तिक मतामधे झालेला हा बदल म्हणजे स्पॅनिश दृष्टिकोनामधे झालेल्या बदलाचं प्रतिबिंब आहे असं तुम्ही म्हणू शकता. 1975 मधे फ्रॅन्कोच्या मृत्यूनंतर ॲम्नेस्टीच्या 1977 च्या कायद्यात पॅक्ट ऑफ ऑब्लिव्हियॉनचा समावेश करण्यात आला. इतिहासात घडलेल्या राजकीय गुन्ह्यांच्या, अत्याचारांच्या आठवणी दूर सारून पुढं पाहायला सांगणारा हा पॅक्ट. अपराधीपणाची भावना झुगारून लोकशाहीच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी ते आवश्यक आहे असं सांगणारा. पण खरंच इतिहास असा विसरून जाणं शक्य असतं का? आपल्या देशावर सत्ता गाजवणाऱ्या हुकूमशहाचे अत्याचार सहन केलेल्या एखाद्या कुटुंबाला आपलं दु:ख विसरणं कठीण जातं, मग संपूर्ण देशानं ते कसं काय विसरावं?’’

फ्रॅन्सिस्को फ्रॅन्को बामॉन्दे म्हणजे 1939 ते 1975 या काळात स्पेनवर सत्ता गाजवणारा हुकूमशहा. स्पेनमध्ये या काळाचा उल्लेख ‘फ्रॅन्कोईस्ट स्पेन’ किंवा ‘फ्रॅन्कोईस्ट हुकूमशहा’ असा केला जातो. त्याच्या काळात एका बाजूला स्पेनची आर्थिक भरभराट झाली, तर दुसऱ्या बाजूला त्याने आपल्या विरोधकांची प्रचंड मुस्कटदाबी केली, प्रसंगी बळाचा वापर केला आणि हजारो लोक त्याच्या अत्याचारांचे बळी ठरले. प्रखर राष्ट्रवाद हा त्याच्या सत्तेचा गाभा होता. त्या काळात मृत्युमुखी पडलेल्या अनेक लोकांच्या कुटुंबीयांच्या मनातली आपल्यावर झालेल्या अन्यायाची सल अजूनही गेलेली नाही.

आल्मादोवर यांच्या मुलाखतीला हा संदर्भ आहे. आणि हे असे वाटत असल्यामुळेच 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द सायलेन्स ऑफ अदर्स’ नावाच्या डॉक्युमेंटरीसाठी पेद्रो आल्मादोवरने कार्यकारी निर्मात्याची भूमिका निभावली होती.

...आणि याच भावनेमधून त्यांनी 2021 मध्ये ‘पॅरलल मदर्स’ नावाचा सिनेमा केला. आल्मादोवरची सगळी वैशिष्ट्ये असणारा. पण त्याचबरोबर एका वेगळ्या आल्मादोवरची ओळख करून देणारा.

याचा अर्थ ‘पॅरलल मदर्स’ हा राजकीय सिनेमा आहे असे नाही. इथेही आल्मादोवर आपल्याला एक गोष्टच सांगतात. पण त्याला पार्श्वभूमी मात्र स्पेनच्या राजकारणातल्या त्या काळ्याकुट्ट दिवसांची आहे. आजच्या काळातल्या दोन वेगवेगळ्या पिढ्यांमधल्या मुलींची गोष्ट सांगताना त्यांनी त्याला अनेक पदर आणलेले आहेत.

एका दृश्यात या सिनेमातली जॅनिस (पेनेलोपे क्रुझ) तिच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या ॲनाला म्हणतेही, ‘‘आपण कोणत्या देशात राहतो हे तू समजून घ्यायला हवंस आता. आपली मुळं, आपला इतिहास जाणून घ्यायला हवा.’’

ही गोष्ट मुख्यत: जॅनिसची आणि त्याचबरोबर ॲनाचीही आहे. चाळिशीला आलेली जॅनिस माद्रिदमधली एक प्रसिद्ध फोटोग्राफर आहे. सिनेमाची सुरुवातच मुळी ती करत असलेल्या एका फोटो सेशनने होते. ज्याचे फोटो ती काढतेय तो आहे आरतुरो. मानववंशशास्त्राचा तो अभ्यासक आहे. जॅनिसला त्याची मदत हवी आहे. स्पेनच्या नागरी युद्धामध्ये फॅसिस्ट फ्रॅन्कोच्या पोलिसांकडून मारल्या गेलेल्या काही लोकांना गावाबाहेर एकत्र पुरून टाकले आहे आणि त्यात जॅनिसच्या पणजोबांचा समावेश आहे. या पणजोबांबरोबर गावातल्या आणखी काही जणांना पोलिसांनी स्वत:चीच कबर खोदायला लावली आणि नंतर त्यातच सर्वांना पुरले आहे ही गोष्ट जॅनिसने आपल्या आजीकडून ऐकलेली आहे. जॅनिसच्या कुटुंबाला आणि पर्यायाने जॅनिसला ती जागा खोदण्याची परवानगी सरकारकडून हवी आहे. असं काम हाती घेण्यासाठी लागणारे अर्थसाहाय्य मिळावे अशी त्यांची अपेक्षा आहे. आपले पणजोबा तिथे असतील तर त्यांच्या इच्छअेनुसार त्यांचे शव त्यांच्या बायकोच्या बाजूला पुरले जावे, मृत व्यक्तीवर योग्य प्रकारे अंतिम संस्कार व्हावेत अशी जॅनिसची इच्छा आहे. आपण पूर्ण प्रयत्न करू असे आश्वासन आरतुरो तिला देतो. दोघांच्या भेटी होऊ लागतात आणि ते एकमेकांमध्ये गुंतत जातात. एक दिवस आपण गरोदर असल्याचे जॅनिसच्या लक्षात येते. आपण आपल्या आजारी बायकोला सोडून तुझ्याकडे येऊ शकत नाही असे आरतुरोने सांगितल्यानंतरही हे बाळ जन्माला घालायचा जॅनिसचा निर्णय बदलत नाही. या बाळाची कोणतीही जबाबदारी तुझ्यावर नाही असे आरतुरोला सांगून ती मोकळी होते. मुळात चाळिशीत आलेलो असताना आपण आई बनतो आहोत याचाच तिला विलक्षण आनंद झालेला असतो.

नऊ महिन्यांची गरोदर जॅनिस हॉस्पिटलमध्ये दाखल होते. आणि तिच्या बरोबर रूम शेअर करणारी ॲना तिला भेटते. विशीसुद्धा न गाठलेली. आपल्या बाळाचा बाप नक्की कोण आहे हे माहीत नसणारी. आता आपण आयुष्यभरासाठी अडकलो आहोत या भावनेने निराश झालेली.

जॅनिस आणि ॲना. दोन पिढ्यांमधल्या दोन बायका. दोघींचे आर्थिक स्तर पूर्णत: भिन्न. दोघींची मानसिक स्थिती अगदी विरुद्ध. कोणताही समान धागा नसलेल्या, या आई होऊ घातलेल्या दोघी एकमेकींना भेटतात. एकमेकींच्या जवळ येतात आणि एकमेकींच्या आयुष्याचा भाग होऊन जातात. ॲनाबरोबर तिची आई, टेरेसा आहे. मुलीला लहान असताना बापाकडे सोडून रंगभूमीवर अभिनय करण्यासाठी निघून गेलेली. आताही चांगली भूमिका मिळाल्यावर तशीच वागणारी. ‘‘मी चांगली आई नाही. चांगली आजी नाही. चांगली बायको तर कधीच नव्हते. मी फक्त थिएटरवर प्रेम केलं आणि करते. त्यासाठी काहीही करायला माझी तयारी आहे,’’ असे प्रांजळपणे कबूल करणारी.

स्वाभाविकच ॲना आधारासाठी जॅनिसकडे झुकते. योगायोगाने दोघींना एकाच दिवशी मुली होतात. दोन्ही बाळांना काही कॉम्प्लिकेशन्स झाल्यामुळे इनक्युबेटरमध्ये ठेवावे लागते. आणि अखेर आपापली बाळे घेऊन दोघी आपापल्या घरी जातात. एकमेकींबरोबर संपर्क ठेवायचे ठरवतात.

एवढ्या सगळ्या घटना सिनेमाच्या पहिल्या पंधराएक मिनिटांमध्ये घडतात. गोष्ट सांगताना आल्मादोवर कुठेही वेळ घालवत नाहीत, पण म्हणून ते घाईघाईने आपल्याला पुस्तकाच्या पुढच्या पानावर नेत आहेत असेही वाटत नाही. गोष्ट सांगण्याच्या या दिग्दर्शकाच्या हातोटीला सलाम करायला हवा, असे मात्र मनात येते.

गोष्ट इथवर आल्यानंतर लेखक आणि दिग्दर्शक आपल्याला एका मागोमाग एक धक्के देऊ लागतात. काहीतरी घडणार आहे असे वाटत असते, पण असे काही घडेल याची कल्पनाही आपण केलेली नसते.

जॅनिसच्या व्यक्तिरेखेभोवती सगळा सिनेमा फिरतो. एकटीने मूल सांभाळताना होणारी तिची धावपळ, लवकरात लवकर काम सुरू करण्याची तिची जिद्द, आपल्या पणजोबांना न्याय मिळवून देण्यासाठी ती करत असलेला आटापिटा आणि त्याचबरोबर एक उत्तम आई बनण्यासाठी ती घेत असलेले कष्ट. कधी ती कणखर दिसते. कधी व्हलनरेबल. कधी असाहाय्य. कधी घाबरलेली. चूक करणारी आणि ती सुधारणारी. आणि त्यामुळेच ती शंभर टक्के खरी वाटते. माणूस वाटते.

ॲना पुन्हा भेटल्यानंतर तिला आपल्या पंखाखाली घेणारी जॅनिस, घर कसे सांभाळायचे याचे धडे ॲनाला देणारी, अगदी बटाट्याची सालं कशी सोलायची इथपासून स्वयंपाक करायला शिकवणारी. आणि हे सगळे करताना ॲनावर आपण अन्याय केला आहे या भावनेने कायम पछाडलेली अस्वस्थ जॅनिस.

दुसऱ्या बाजूला ॲना आहे. आईपणाशी अगदी लहान वयात ओळख झालेली. पण हळूहळू त्यात रमणारी. आपली आई आपल्याशी वागली तसे आपण आपल्या मुलीशी कधीही वागायचे नाही म्हणून धडपडणारी. आपल्याला फसवले आहे हे लक्षात आल्यानंतर कोसळून पडणारी.

जॅनिस आणि ॲनाचे समांतर आयुष्य, एकमेकांना छेद देणारे आयुष्य, एकमेकांमध्ये गुंतलेले आयुष्य दाखवताना संपूर्ण वेळ फ्रॅन्कोच्या अत्याचारांचा अंडरकरंट सिनेमाला आहे. या दोघींच्या गोष्टीला समांतर असला, तरी तो सतत जाणवत राहणारा आहे. किंबहुना, जॅनिस आणि ॲनाच्या निमित्ताने दिग्दर्शक आपल्याला आणखी खूप काही सांगू पहातो आहे. फ्रॅन्कोचे अत्याचार प्रत्यक्ष न दाखवताही त्याविषयी कठोरपणे बोलू पाहतो आहे.

या सिनेमामध्ये प्रचंड नाट्य आहे. पण मेलोड्रामा कुठेही नाही. क्षणाक्षणाला खूप काही घडते आहे याची जाणीव आपल्याला सारखी होत असते, पण त्यात अतर्क्य वाटावे असे कणभरही काही नाही. भावनांचे हेलकावे आहेत, पण कढ नाहीत. आता पुढे काय होणार याची अस्वस्थ जाणीव आहे, पण रहस्यमयता नाही. आपल्या भूतकाळाला सामोरे गेलो, तरच वर्तमानात जगता येते असे सांगणारा हा असा सिनेमा एखादा महान दिग्दर्शकच बनवू शकतो!

या सिनेमातही आल्मादोवर यांनी रंगांचा अप्रतिम उपयोग केला आहे. लाल रंग त्यांचा खास लाडका. त्यांच्या प्रत्येक सिनेमामध्ये हा लाल रंग जणू काही एखादी व्यक्तिरेखा असावी तसा येतो. पडद्यावरचे त्या रंगाचे अस्तित्वही काहीतरी म्हणत असते. लालभडक रंगाचा जॅनिसचा आयफोन, त्याला मॅचिंग असे फळे ठेवण्यासाठी वापरले जाणारे काचेचे भांडे आणि तिच्या बाळासाठी आणलेली त्याच रंगाची कॅरिअर बॅग एका फ्रेममध्ये पाहताना आपल्याला जॅनिसच्या आयुष्यात त्या क्षणाला कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते लक्षात येते.

पेद्रो आल्मादोवर आज 72 वर्षांचे आहेत. आणि सातत्याने सिनेमे बनवताहेत. दोन वर्षांपूर्वी इफीमध्येच त्यांचा ‘पेन अँड ग्लोरी’ हा सिनेमा बघितला होता. तेव्हाही असाच एक अतिशय उत्तम सिनेमा पाहिल्याचा अनुभव मिळाला होता. त्यातही पेनेलोपे क्रुझ होतीच, (1997मध्ये ‘लाइव्ह फ्लेश’ या सिनेमात क्रुझने आल्मादोवर यांच्याबरोबर पहिल्यांदा काम केले. ‘लाइव्ह फ्लेश’ धरून त्यानंतर त्यांनी अकरा सिनेमे केलेत आणि त्यापैकी एकूण आठ सिनेमांमध्ये क्रुझने काम केले आहे.) पण तिथे केंद्रस्थानी होती ॲन्टोनिओ बन्डेरास यांनी साकार केलेली एका काम नसलेल्या साल्वादोर माल्लो नावाच्या दिग्दर्शकाची व्यक्तिरेखा.

गेल्या वर्षीच्या महोत्सवामध्येही त्यांची एक शॉर्ट फिल्म होती. त्यांच्या मातृभाषेत नव्हे, तर इंग्लिशमध्ये केलेली. यात एकच व्यक्तिरेखा होती जी टिल्डा स्विन्टन या हॉलीवूडमधल्या अभिनेत्रीने साकारली होती. जाँ कुकतू या फ्रेंच नाटककाराच्या 1930 मध्ये लिहिलेल्या ‘द ह्युमन व्हॉइस’ नावाच्या नाटकावर हा सिनेमा आधारलेला आहे. नावही तेच, ‘द ह्युमन व्हॉइस’. स्पेनमधल्या एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहणारी ही बाई. तिचा प्रियकर तिला नुकताच सोडून गेला आहे. त्याचे सगळे सामान असलेल्या त्याच्या बॅगा हॉलमध्ये ठेवलेल्या आहेत. त्याचा कुत्रा अस्वस्थपणे घरभर फिरतो आहे. आणि ही फोनवर त्याच्याशी अखंड बोलते आहे. आपण कसे नीट आहोत हे ठसवण्याचा प्रयत्न करते आहे. आपले निर्माते आता कसे आपल्या वयाच्या भूमिका आपल्याला देऊ पाहताहेत, आपण एका नव्या इनिंगची सुरुवात करतो  आहोत असे सांगते आहे. आणि एक शेवटचे गुडबाय म्हणण्यासाठी तरी मला प्रत्यक्ष भेट अशी याचनाही करते आहे. संतापते आणि डेस्परेट होते आहे. या दोघांमध्ये नक्की काय आणि का आणि कसे बिनसला आहे याविषयी दिग्दर्शकाने शेवटपर्यंत संदिग्धता ठेवली आहे. कारण ते महत्त्वाचे नाहीच. महत्त्वाचे आहे तिचे एकटेपण. खायला उठणारे तिचे भलमोठे, देखणे पण रिकामे घर. तिच्या मनात उफाळलेला संताप आणि तिचे खचलेपण. आपला आब राखण्याची तिची केविलवाणी धडपड.

सिनेमा जसा शेवटाकडे येऊ लागतो तसा एवढा वेळ घर दाखवणारा कॅमेरा हळूहळू वर जाऊ लागतो आणि आपल्या लक्षात येते की हे घर म्हणजे एक सेट आहे. त्याला त्यामुळे अर्थातच सीलिंग नाही. आपल्या प्रियकरासमोर आपण आनंदी आहोत हे तिचे सांगणे जितके खोटे तितकेच तिचे घरही.

काय सांगायचे आणि कसे सांगायचे या दोन्हीवर आल्मादोवर यांचे प्रभुत्व आहे. त्यामुळे स्वाभाविकच त्यांचे सिनेमे व्हिज्युअलीही ताकदीचे असतात. इथेही शेवटच्या दृश्यांमध्ये दिसणाऱ्या आगीच्या ज्वाळा आणि मधोमध असलेली टिल्डा स्विन्टन बराच काळ आपल्या मनात रेंगाळतात राहतात.

1980पासून आल्मादोवर सिनेमे करताहेत. आणि आजही त्यांच्या सिनेमांविषयी प्रेक्षकांना तेवढीच उत्सुकता आहे यातच खरे तर त्यांचे मोठेपण आहे. त्यांचे सिनेमे अजूनही ताजे वाटतात आणि अपेक्षाभंग करत नाहीत हे ‘सोने पे सुहागा’. त्यामुळेच ‘पॅरलल मदर्स’सारख्या त्यांच्या नव्या कोऱ्या सिनेमाने तृप्त होऊन या वर्षीच्या चित्रपट महोत्सवाची सांगता होणे यापेक्षा सुख ते आणखी काय असणार?

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके