डिजिटल अर्काईव्ह

नोव्हेंबर 2023 मध्ये गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव झाला (इफ्फी), त्या ठिकाणी विविध देशांतील विविध भाषांमधील अनेक चित्रपट पाहता आले. त्यापैकी बोस्निया, बल्गेरिया आणि स्पेन या तीन देशांमधले तीन अगदी वेगळे सिनेमे. एक स्थलांतरितांबद्दल बोलणारा, एक समाजातल्या वयोवृद्धांच्या स्थानाविषयी प्रश्न निर्माण करणारा आणि तिसरा तीस वर्षांनंतर दिग्दर्शनाकडे वळलेल्या दिग्दर्शकाचा.

'बोस्नियन पॉट' नावाचा एक पदार्थ आहे. बोस्नियामधल्या खाणकामगारांचा एक पारंपरिक पदार्थ. कामावर येताना यातला प्रत्येक जण आपल्या घरून एक वस्तू घेऊन येतो. बहुतेक वेळा यात विविध भाज्यांचाच समावेश असतो. अगदीच कुणाचं नशीब बरं असेल तर मांस असतं. जमिनीमधल्या एका खड्ड्यात मडकं ठेवलेलं असतं. त्यात हे सगळे पदार्थ टाकून शिजवले जातात.

पावो मॅरिनकॉविच यांच्या नव्या सिनेमाची, 'बोस्नियन पॉट' ची सुरुवातच ही आहे. एकेक खाणकामगार त्याच्या जवळची भाजी खड्ड्यात टाकतो आणि खाणीमध्ये काम करायला जातो. त्यांचे कामाचे तास भरेपर्यंत हा पदार्थ मंद आचेवर शिजत राहतो. काम संपलं की ते सगळे बाहेर येतात आणि गप्पा मारत, आपल्या जेवणाचा आस्वाद घेतात.

पण म्हणून सिनेमा ना रेसिपीशी संबंधित आहे, ना केवळ बोस्नियामधल्या खाणकामगारांशी. हा पॉट म्हणजे एक रूपक आहे आणि एका व्यक्तीची गोष्ट सांगता सांगता दिग्दर्शक त्यातून स्थलांतरितांच्या परिस्थितीवर भाष्य करतो.

सिनेमाचा नायक फारुक एक मध्यमवयीन लेखक आहे. अजूनतरी त्याला फारसं यश मिळालेलं नाही, पण त्याचे प्रयत्न चालू आहेत. सारायेवोमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर तो आपल्या मायदेशातून ऑस्ट्रियातल्या ग्राझमध्ये राहायला आलाय आणि गेली बारा-पंधरा वर्षं तिथेच राहतोय. सुरुवातीला आपल्याला पडद्यावर दिसणारी बोस्नियन पॉटची गोष्ट फारुकनेच रेडिओसाठी लिहिलेली आहे.

फारुकपाशी फारसं काम नाही. अशातच, ऑस्ट्रियन सरकारच्या कडक नियमांनुसार फारुकच्या तिथे राहण्याच्या परमिटचं नूतनीकरण होत नाही आणि तो हादरतो. आपल्यापाशी काम आहे आणि त्यातून आपण देशाच्या महसुलामध्ये भर घालत आहोत, समाजाचं देणं फेडत आहोत हे सिद्ध करण्यावाचून त्याच्या समोर पर्याय नसतो.

एका बाजूला लेखक म्हणून स्वतःची ओळख शोधणं आणि दुसऱ्या बाजूला आपली मुळं याच देशात आहेत हे सिद्ध करणं- अशा दुहेरी कात्रीत फारुक सापडतो. त्याचं काय होतं याची ही गोष्ट.

दिग्दर्शकाने ही गोष्ट कुठेही दुःखाचे कढ काढत सांगितलेली नाही. किंबहुना, यातल्या अनेक प्रसंगांमधून विनोदनिर्मितीच होते. फारुकचं त्याच्या बिल्डिंगमधल्या बाईशी असलेलं अफेअर, युद्धाच्या आधी त्याने लिहिलेल्या नाटकाचा प्रयोग करण्याच्या कल्पनेने त्याचं झपाटून जाणं, प्रत्यक्ष प्रयोग होत असताना त्यात आलेले अडथळे हे सगळं हसतखेळत, हलक्या फुलक्या पद्धतीने दिग्दर्शक मॅरिनकॉविच दाखवतात आणि आजच्या जगाला भेडसावणाऱ्या प्रश्नावर भाष्यही करतात. स्थलांतरितांमधल्या विचारवंतांचं अस्वस्थपण अधोरेखित करतात आणि वेळ आली की आपोआप ते आणि आपण अशी दुही निर्माण होते याची जाणीव करून देतात. मुख्य म्हणजे बोस्नियन पॉटसारखी उत्तम रेसिपी तयार व्हायची असेल तर त्यात सगळ्या प्रकारच्या भाज्या पडाव्या लागतात, तरच त्याला चव येते हेही सांगतात.

एकच रंग, एकच भाषा, एकच धर्म... सगळं काही एकच. जगण्यात मुळी काही वैविध्यच नाही. कसं असेल असं जग? याची कल्पना खरं तर आपल्या देशातल्या बहुसंख्यांकांनी करून बघायला हवी. कसली चव असणार अशा जगण्यात?

या सिनेमात बोस्निया, क्रोएशिया आणि ऑस्ट्रिया अशा तीनही देशांतले कलाकार आहेत. एका प्रसंगात एरवी जर्मन बोलणारा फारुक समोरच्या बाईला रागाने काहीतरी बोलतो तेव्हा आपल्या भाषेत व्यक्त होतो. त्याच्या दुर्दैवाने त्या बाईला बोस्नियाची भाषा येत असल्यामुळे ती शांतपणे त्याला प्रत्युत्तर देते! मात्र, जर्मन किंवा बोस्नियन यांपैकी कुठलीही भाषा येत नसलेले आपण इंग्लिश सबटायटल्स वाचून सिनेमा समजून घेत असतो आणि मग असे छोटे, पण महत्त्वाचे बारकावे निसटून जातात.

दिग्दर्शक पावो मॅरिनकॉविच गोव्यामध्ये आलेले होते. त्यांना मी हाच प्रश्न विचारला. आणि भाषेतले बारकावे निसटतात हे त्यांनीही मान्य केलं. सिनेमा किती कमी बजेटमध्ये केला हे त्यांनी सांगितलं आणि आता राजकीय सिनेमे बनवणं दिवसेंदिवस फारसं सोपं राहिलेलं नाही असं मत व्यक्त केलं.

अशा परिस्थितीतही आपल्याला हवं ते सांगण्याचा प्रयत्न करणारे दिग्दर्शक आहेत, हेही नसे थोडके.

सिनेमाचा ट्रेलर पाहायचा असेल तर या लिंकवर क्लिक करा. 

'ब्लागाज लेसन्स' ही एका शिक्षिकेची गोष्ट आहे. म्हटलं तर क्राइम थ्रिलर, म्हटलं तर वयस्क, एकट्या राहणाऱ्यांच्या आयुष्यातल्या कारुण्याचं दर्शन घडवणारी. तेवढंच नाही, ही गोष्ट सांगताना दिग्दर्शक स्टीवन कोमान्दारेव यांनी बल्गेरियामधल्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करायचा प्रयत्न केलाय. 2017मध्ये त्यांनी 'डायरेक्शन्स' नावाचा सिनेमा केला होता, त्यानंतर 2019मध्ये त्यांचा 'राउंड्स' प्रदर्शित झाला. आणि 'ब्लागाज लेसन्स'ने त्यांनी आपली त्रिसूत्री पूर्ण केली आहे. यातली ब्लागाची भूमिका करणाऱ्या एली स्कॉरचेवा तब्बल तीस वर्षांनंतर पुन्हा एकदा कॅमेऱ्यासमोर उभ्या राहिल्या आणि त्यांनी अप्रतिम अभिनय केलाय.

काय आहेत या ब्लागाचे धडे? 

आयुष्यभर शिक्षिकेचं, भाषा शिकवण्याचं काम तिने केलंय. त्यामुळे समोरच्याच्या भाषेतल्या चुका काढण्याची सवय तिला जडलीये. बल्गेरियामध्ये आलेल्या आणि तिथली भाषा शिकू इच्छिणाऱ्या तरुण मुलामुलींच्या शिकवण्याही ती घेतेय.

सिनेमा सुरू होतो तेव्हा ब्लागाच्या नवऱ्याचं नुकतंच, आठवडाभरापूर्वी निधन झालंय हे आपल्याला कळतं. त्याच्या थडग्यासाठी ती एक चांगली जागा शोधतेय. एक जागा तिला आवडते, पण त्याचे पैसे सहजासहजी तिच्या खिशाला परवडणारे नाहीत. त्यातून, 'बाजाराचे नियम आहेत, जो पहिला येईल त्याला वस्तू मिळणार', असं ती जागा विकणाऱ्याने सांगितल्यामुळे लवकरात लवकर पैसे उभे करणं तिच्यासाठी महत्त्वाचं आहे. नव्हे, आता ते तिच्या आयुष्याचं मिशन आहे. दूर अमेरिकेत काम करणाऱ्या तिच्या मुलाला या सगळ्याशी फारसं देणंघेणं नाही, त्यामुळे पूर्ण जबाबदारी ब्लागाचीच आहे.

आणि एके दिवशी तिला फोन येतो. पोलिसांच्या क्राइम ब्रँचकडून. 'काही माणसं तुझे पैसे चोरायचा प्रयत्न करणार आहेत, पण आम्ही त्यांना पकडायचा प्रयत्न करत आहोत, त्यासाठी आम्ही सापळा रचलाय, तेव्हा ते जे सांगतील ते कर म्हणजे आम्हांला त्यांना रंगेहाथ पकडता येईल', वगैरे वगैरे.

घरात एकटी, वय झालेलं. ब्लागा स्वाभाविकच घाबरते. तेवढ्यात खरंच तिला चोरांचा फोन येतो. पोलिसांनी सांगितल्यानुसार ती चोर सांगतात ते सगळं करत जाते. आपल्या जवळची सगळी कॅश एका प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून गॅलरीतून खाली फेकून देते आणि घरात लपून बसते. 

दुसऱ्या दिवशी ब्लागा पोलिस स्टेशनात जाते तेव्हा तिला कळतं की असा कोणताच फोन क्राइम ब्रँचने केलेला नव्हता. दोन्ही फोन चोरांचेच होते आणि आता आपले सगळे पैसे लुबाडले गेले आहेत. नवऱ्याच्या थडग्यासाठी जागा विकत घ्यायला आता ना तिला कोणी बँक कर्ज द्यायला तयार आहे, ना दुसरा कुठला सनदशीर मार्ग तिच्या समोर आहे. त्यातून तिची गोष्ट ऐकणारे बहुतेक जण, "असा कसा तू मूर्खासारखा विश्वास ठेवलास", असं म्हणून तिला वेड्यात काढताहेत.

ब्लागा हताश होते. निराश होते. पण हरत नाही. 

एकट्या वृद्धांना हेरून अशा प्रकारे स्कॅम्स करणारी टोळी शहरात काम करतेय आणि त्यांच्यापासून वाचण्यासाठी कोणती खबरदारी घ्यायला हवी हे सांगण्यासाठी पोलिसांतर्फे एक सभा आयोजित केली जाते. त्यात ब्लागाला आपला अनुभव सांगावा लागतो. तिला ते सगळं फार अपमानास्पद वाटतं. मात्र, एक पोलिस आपल्या भाषणात या टोळीच्या कार्यपद्धतीचं वर्णन करतो आणि ब्लागाच्या डोक्यात काहीतरी सटकतं. ही टोळी गॅलरीतून टाकलेले पैसे उचलण्यासाठी भुरट्या चोरांचा वापर करत असतात. असे भुरटे मिळवण्यासाठी वर्तमानपत्रांमधून येणाऱ्या जाहिरातींमध्ये काही ठरावीक शब्दांचा उपयोग केला जातो हे ब्लागाला कळतं आणि ती थेट नाव आणि वय बदलून तशी जाहिरात प्रसिद्ध करते.

थोड्याच दिवसांत तिला फोन येतो आणि पहिलं काम मिळतं. जमिनीवर पडलेलं प्लॅस्टिकचं गाठोडं उचलायचं, त्यातून कमिशनचे पैसे काढून घ्यायचे आणि फोनवर सांगितल्या ठिकाणी आणून फेकून द्यायचं.

ब्लागा हे काम करू लागते.

क्षणभर मनात येतं, एक शिक्षिका अशी गुन्हेगार बनू शकेल का? इतक्या सराईतपणे ते काम करू शकेल का? चुकीची भाषा बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना रागावणारी बाई इतकं चुकीचं वागू शकेल का? मुळात, आपणही चूक करू शकतो, तेही इतकी भयंकर चूक करू शकतो हे ती कसं स्वीकारू शकेल? हे वास्तववादी आहे का?

पण, दिग्दर्शक इतक्या ठामपणे हे वास्तव मांडतो की सगळे प्रश्न मनातल्या मनात विरून जातात. आणि एली स्कॉरचेवा इतक्या कनव्हिक्शनने ब्लागा साकारते की त्यात कुठे खोट काढताच येत नाही. गुन्हेगारांच्या त्या जगात अधिकाधिक रुतत जाणाऱ्या ब्लागाचं शेवटी काय होणार? ब्लागा तिचे गुन्हेगार असलेल्यांचा सूड उगवणार का? आपल्या नवऱ्याच्या थडग्यासाठी हवी असलेली जागा तिला मिळणार का? हे प्रश्न मात्र आपली पाठ सोडत नाही. सिनेमा संपतो तेव्हा या ब्लागाच्या आयुष्यात आपण पूर्णपणे समरस झालेले असतो.

थ्रिलरला आवश्यक असलेली वातावरण निर्मिती, संगीत, प्रसंग या सगळ्यांमधून एक सकस सिनेमा आपल्या समोर साकार होतो. आणि तरीही तो केवळ थ्रिलर राहत नाही. समाजाचा वृद्धांकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यांचं एकटेपण, भांडवलशाही जगात त्यांचं हरवून जाणं, आपण या जगाचा भाग आहोत की नाही अशा परिस्थितीतलं त्यांचं जगणं या सगळ्यावर आपली गोष्ट सांगता सांगता दिग्दर्शक भाष्य करत असतो.

'ब्लागाज लेसन्स' चा ट्रेलर पाहायचा असेल तर या लिंकवर क्लिक करा. 

दिग्दर्शक विक्तोर एरिसे यांचा 'क्लोज युवर आइज' मात्र अतिशय वेगळा आहे. या सिनेमाचं सिनॉप्सिस वाचून आपण एक रहस्यकथा पाहायला जाणार, असा ग्रह झाला होता. हुलिओ आरेनास नावाचा स्पॅनिश नट एका सिनेमाचं शूटिंग चालू असताना मध्येच नाहीसा होतो. त्याचं शव मिळत नाही, पण समुद्राजवळच्या कड्यावरून तो पडला आणि मेला असं पोलिस जाहीर करतात. मध्ये बरीच वर्ष लोटतात आणि 'कोल्ड केस मिस्टरीज' चा शोध घेणाऱ्या आणि सनसनाटी निर्माण करणाऱ्या टीव्हीवरच्या कार्यक्रमात हुलिओच्या असं नाहीसं होण्यावर एक एपिसोड करायचं ठरतं. कार्यक्रमाच्या निमित्ताने हा विषय पुन्हा ऐरणीवर येतो. ज्या सिनेमासाठी शूटिंग करत असताना तो नाहीसा झाला, त्या सिनेमाचा दिग्दर्शक मिगेल गराय कार्यक्रमात सहभागी होतो, सिनेमाची चित्रित झालेली शेवटची काही दृश्यं त्यात दाखवली जातात. आणि हुलिओच्या निघून जाण्यावर एक प्रश्नचिन्ह उभं केलं जातं.

पण, ही गोष्ट म्हणजे हा सिनेमा नाही. अजिबातच नाही. किंबहुना, तो त्यानंतरच सुरू होतो. आणि एका संथ लयीत त्याचा प्रवास होतो. या सिनेमाला कादंबरीसारखा ठेहराव आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेला स्वतःचा प्रवास आहे. अगदी छोट्या छोट्या व्यक्तिरेखाही गोष्टीत भर घालतात. त्या शेवटच्या सिनेमातली शेवटची दृश्यं आणि त्या नटाचा शेवट यांच्यामधल्या रिकाम्या जागा मिगेल गराय भरायला निघतो आणि या प्रवासात त्याला कोणकोणते शोध लागतात याची ही गोष्ट आहे.

पण, त्याआधी सिनेमाच्या दिग्दर्शकाविषयी, विक्तोर एरिसे यांच्याविषयी.

एरिसे यांचा जन्म 1940चा. म्हणजे आज त्यांचं वय 83 आहे. 1973 मध्ये त्यांनी त्यांचा पहिला सिनेमा दिग्दर्शित केला, 'द स्पिरिट ऑफ बीहाइव्ह'. आजही स्पेनमधल्या सर्वोत्कृष्ट सिनेमांमध्ये याचं नाव घेतलं जातं. 40च्या दशकातल्या ग्रामीण स्पेनचं दर्शन या सिनेमात होतं. फ्रेंन्सिस्को फॅन्को या स्पेनमध्ये सत्तेत असलेल्या हुकूमशहाच्या विरोधात सिनेमा करण्याचं धाडस त्या वेळी एरिसे यांनी दाखवलं होतं. त्यासाठी त्यांनी सिम्बॉलिझमचा उपयोग केला आणि आपलं म्हणणं प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल याची काळजी घेतली.

त्यांनतर 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या 'एल सुर' या सिनेमाचंही खूप कौतुक झालं होतं. 1992 मध्ये त्यांनी 'द क्विन्से ट्री सन' नावाची ॲन्तोनिओ लोपेझ गार्सिया या चित्रकारावर केलेली डॉक्युमेंटरी खूप गाजली. त्या वर्षीच्याा 'कान' चित्रपट महोत्सवामध्ये ज्युरी तसंच फिप्रेसीचा पुरस्कार तिला मिळाला.

'द शांघाय स्पेल' या हुआन मार्सेच्या कादंबरीवर एरिसे काम करत होते. त्यावर निघणाऱ्या सिनेमाचं दिग्दर्शनही ते करणार होते. पण, निर्मात्याने दुसऱ्या दिग्दर्शकावर ती जबाबदारी सोपवली. याचा फार मोठा धक्का एरिसे यांना बसला.

त्यानंतर आता तब्बल तीस वर्षांनंतर, त्यांची ही नवीकोरी फीचर फिल्म आलेली आहे. 'क्लोज युवर आइज.'

सिनेमाची सुरुवात होते तेव्हा दुसरं महायुद्ध नुकतंच संपलेलं आहे. फ्रान्समधल्या एका भव्य महालामध्ये राहणाऱ्या 'सेंड किंग'ला आपण पाहतो. त्याची सेवा करत असलेल्या चिनी नोकराला भेटतो. आणि त्याला भेटायला कुणी येणार आहे हे आपल्याला कळतं. हा पाहुणा स्पेनमधल्या डाव्या विचारसरणीचा आहे आणि त्याच्यावर सँड किंगची एका चिनी बाईपासून झालेली पण आता हरवलेली मुलगी शोधून आणण्याचं काम सोपवण्यात आलंय.

या गोष्टीत आपण रमतोय की काय, असं वाटत असतानाच आपल्या लक्षात येतं की हे सिनेमामधलं दृश्य आहे. हा तो सिनेमा ज्याचं शूटिंग अर्ध्यावर आलेलं असताना हुलिओ अचानक नाहीसा झाला होता.

टीव्हीवरच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मिगेलच्या डोक्यात पुन्हा एकदा हुलिओचा विचार येऊ लागतो आणि नेमकं काय घडलं हुलिओच्या बाबतीत याचं रहस्य स्वतः शोधायचं तो ठरवतो.

मिगेलचा हा प्रवास म्हणजे 'क्लोज युवर आइज'. इथे तो हुलिओच्या आता मोठ्या झालेल्या मुलीला भेटतो. ती म्हणते, "मी लहान असताना तो कधी घरी नसायचा. त्यामुळे त्याच्या असण्याची मला सवय नव्हती. माझ्या आठवणीत आहे तो त्याचा आवाज. माझ्यासाठी हा आवाज म्हणजेच माझा बाप होता".

तरुणपणी मिगेल आणि हुलिओ या दोघांचीही प्रेमिका असलेल्या मार्ताला तो भेटतो.

आणि जुन्या सिनेमांच्या रिळांचं जतन करणाऱ्या आपल्या एका मित्रालाही.

या सगळ्यांच्या बोलण्यामधून काही सूत्र सापडतंय का याचा मिगेल शोध घेत असताना आपण कधीतरी समुद्राकाठी असलेल्या मिगेलच्या घरी पोहोचतो. घर म्हणजे वाळूत बांधलेल्या खोल्या. आणि एक कुत्रा. आणि दोन शेजारी. रोज संध्याकाळी त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, म्हटलेली गाणी... हे आयुष्य कसं अगदी निवांत.

पण, या निवांतपणामध्येही काहीतरी अधुरं आहे, मनाला कुरतडणारं आहे याची जाणीव आपल्याला कायम होत राहते. सिनेमाभर वापरलेल्या रंगांमधून, संगीतामधून आणि मिगेलच्या एकूणच असण्यामधून.

सिनेमाचा शेवट एका जुन्या, वापरात नसलेल्या थिएटरमध्ये होतो. त्या अर्धवट राहिलेल्या सिनेमाची काही रिळं दाखवून. हुलिओच्या नाहीसं होण्याचं रहस्य उलगडतं खरं, पण म्हणून या गोष्टीला क्लोजर मिळालंय असं वाटत नाही.

एक प्रकारे सिनेमातल्या दिग्दर्शकाच्या माध्यमातून एरिसेने तीस वर्षं आपल्या स्वतःच्या या क्षेत्रात नसण्याचा घेतलेला हा शोध आहे का? स्वतःच्या सिनेमाविषयी ते काही विधान करू पहाताहेत का? म्हातारपण, म्हातारपणातल्या आठवणी, मृत्यू यांबद्दलचं हे त्यांचं चिंतन आहे का? आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, क्लोज युवर आइज म्हणताना त्यांनी स्वतःच्या कारकिर्दीचा हा शेवट असल्याचं सूचित केलंय का?

माहीत नाही. पण, तीन तास लांबीचा हा सिनेमा आपल्याला एका वेगळ्या जगात नेतो, विचार करायला लावतो आणि संपल्यानंतरही बराच काळ मनात रेंगाळत राहतो एवढं नक्की.

सिनेमाचा ट्रेलर पाहायचा असेल तर या लिंकवर क्लिक करा.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मीना कर्णिक,  मुंबई ( 82 लेख )
meenakarnik@gmail.com

पत्रकार, चित्रपट समीक्षक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी