Diwali_4 वुमन ॲट वॉर आणि थ्री फेसेस : बायकांच्या गोष्टी
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

वुमन ॲट वॉर आणि थ्री फेसेस : बायकांच्या गोष्टी

इराणी दिग्दर्शक जाफर पनाही यांच्या ‘थ्री फेसेस’बद्दल मात्र इतक्या उत्साहाने लिहिता येणार नाही. तीन वर्षांपूर्वी त्यांचा ‘टॅक्सी तेहरान’ हा सिनेमा इफ्फीमध्ये बघायला मिळाला होता. इराणच्या सरकारने 2011 पासून पनाहींना त्यांच्या घरात नजरकैदेत ठेवलंय. त्यांच्यावर सिनेमे करायची वीस वर्षांसाठी बंदी आहे. आणि तरीही या काळात त्यांनी चार सिनेमे बनवलेले आहेत. ‘टॅक्सी तेहरान’ याच चारांमधला एक. बर्लिनच्या चित्रपट महोत्सवामध्ये हा सिनेमा दाखवला गेला, तेव्हा पनाही स्वत: अर्थातच तिथे जाऊ शकले नव्हते. ‘टॅक्सी तेहरान’ला गोल्डन बेअर हा सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला, तेव्हा हाना सैदी या त्यांच्या भाचीने तो स्वीकारला होता. पनाही यांचे ‘व्हाईट बलून’ किंवा ‘ऑफसाईड’ किंवा ‘धिस इज नॉट अ फिल्म’ किंवा ‘क्लोजड्‌ कर्टन्स’ यासारखे अनेक सिनेमे बघितलेल्या माझ्यासारख्या त्यांच्या चाहत्यांची ‘थ्री फेसेस’ने किंचित निराशाच केली, असं म्हणायला हवं.

आइसलँडची हाला आणि इराणमधल्या तीन पिढ्यांतल्या तीन बायका... बेनेडिक्ट अर्लिंग्सन आणि जाफर पनाही या दिग्दर्शकांच्या दृष्टिकोनातून चितारलेल्या. त्याविषयी

पन्नाशीची एक बाई एका उंच डोंगराच्या दिशेने जातेय. हव्या त्या ठिकाणी पोचल्यावर आपल्या हातातली अवजारं ती बाजूला ठेवते. जमिनीमध्ये काही तरी ठोकून बसवते आणि मग नेम धरून आकाशाच्या दिशेने खास अशा कामासाठी तयार केलेल्या धनुष्यातून बाण सोडते. हा बाण इलेक्ट्रिक वायर्सच्या दिशेने जातो, त्यांच्यावर आदळतो आणि शॉर्टसर्किट होऊन शहरातल्या एका मोठ्या कारखान्यामधली वीज जाते. कारखान्यातली मशिन्स बंद पडतात. काम फत्ते!

ही आहे हाला. हसऱ्या चेहऱ्याची. प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची. शहरात चर्चमधल्या गायकवृंदांसाठी प्रशिक्षण वर्ग चालवणारी. पण हे तिचं बाह्य रूप आहे. त्या हसऱ्या चेहऱ्यामागे पर्यावरणासाठी तडफडणारी एक बाई आहे. शहरात सुरू झालेल्या एका कारखान्याच्या निमित्ताने आपलं सरकार पर्यावरणाचा नाश करतंय याची जाणीव झालेली.  थांबवण्यासाठी आपण जाहीरपणे काहीच करू शकत नाही, हे लक्षात आल्यामुळे अशी लपून-छपून कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न करणारी. एक अज्ञात ‘माऊंटन वुमन’ म्हणून ओळखली जाणारी.

 

दिग्दर्शक बेनेडिक्ट अर्लिंग्सन यांचा हा दुसरा सिनेमा. 2013 मध्ये आलेला ‘ऑफ हॉर्सेस अँड मेन’ हा त्यांचा सिनेमाही खूप गाजला होता तो त्यातले घोडे आणि त्यांच्या मालकांच्या सहा वेगवेगळ्या पण एकमेकांमध्ये गुंतलेल्या कथा व त्यांच्या विनोदी हाताळणीमुळे. ‘वुमन ॲट वॉर’मध्येही औद्योगिकीकरणाचा होणारा अतिरेक, त्यातून होणारं पर्यावरणाचं नुकसान अशा गंभीर विषयालाही विनोदाची झालर आहे.

हाला आपल्या मिशनवर निघते, तेव्हा प्रत्येक वेळी आपल्याला तिच्या रस्त्यात एक वाद्यवृंद किंवा गाणाऱ्या बायका दिसतात. कथानकाला पुढे नेण्याचं काम त्या करतातच, पण एक छोटंसं हसूही आपल्या चेहऱ्यावर आणतात. कधी हे कलावंत तिचे सहकारी असतात, तर कधी सहानुभूती दर्शवणारे प्रेक्षक. हाला जेव्हा जेव्हा एखादा स्फोट करते, तेव्हा तेव्हा स्कूटरवरून फिरायला निघालेला एक तरुण पर्यटक त्या जागी पोलिसांना सापडतो. बिचाऱ्याला प्रत्येक वेळेला अटक होते आणि दर वेळी निर्दोष म्हणून सुटकाही.

दिवसभर एक वेगळा चेहरा घेऊन वावरायचं आणि गुप्तपणे आपल्या कामगिरीवर निघायचं, हे हालासाठीसुद्धा कठीणच असतं. शहरातला ॲल्युमिनयमचा कारखाना बंद पाडणं हे हालाचं उद्दिष्ट असलं, तरी सरकारच्या विरोधात उभं राहणं सोपं कसं असेल? ही ‘माऊंटन वुमन’ अशी दहशतवादी आहे, कारखान्यामुळे निर्माण होणारा रोजगार कसा आपल्या फायद्याचा आहे- असा प्रचार सरकारी यंत्रणेकडून स्वाभाविकपणेच सुरू होतो. शहरातली सर्वसामान्य माणसं त्याला बळीही पडतात. दुसऱ्या बाजूला हालाच्या बाजूने उभी राहणारी माणसंही आहेत. तिला पळून जायला मदत करणारा गावातला एक शेतकरी असेल किंवा सरकारी नोकरीत असलेला हालाच्या गायकवृंदात काम करणारा आणि सरकारी बातम्या पुरवणारा तिचा मित्र असेल किंवा मग  हालाची जुळी बहीण असेल. या सगळ्या व्यक्तिरेखांच्या मदतीने दिग्दर्शकाने एक हलकाफुलका सिनेमा सादर केलाय- त्याच्या विषयाचं गांभीर्य कुठेही कमी होऊ न देता.

हालाच्या घरात असलेले महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांचे फोटो तिच्यातल्या कार्यकर्त्यामागची प्रेरणा आपल्याला आपोआप सांगतात. युक्रेनमधली एक अनाथ झालेली मुलगी आपल्याला दत्तक मिळण्याची शक्यता निर्माण झालीये, हे कळल्यानंतर हरखून गेलेल्या हालाचं हळुवार रूपही दिसतं. एकट्याने जिंकण्यासारखी तिची लढाई नाही याची कल्पना असली, तरी सिनेमाचा शेवट आपल्याला आशावादी बनवतो. ‘वुमन ॲट वॉर’ पाहताना आपण हालाच्या गोष्टीत पूर्णपणे गुंतून गेलेलो असतो. तिच्याशी आपलं काही तरी नातं जुळलेलं असतं. चांगल्या सिनेमाकडून असतात त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण झालेल्या असतात. ‘वुमन ॲट वॉर’चं तुम्हाला ट्रेलर इथे बघायला मिळेल.

इराणी दिग्दर्शक जाफर पनाही यांच्या ‘थ्री फेसेस’बद्दल मात्र इतक्या उत्साहाने लिहिता येणार नाही. तीन वर्षांपूर्वी त्यांचा ‘टॅक्सी तेहरान’ हा सिनेमा इफ्फीमध्ये बघायला मिळाला होता. इराणच्या सरकारने 2011 पासून पनाहींना त्यांच्या घरात नजरकैदेत ठेवलंय. त्यांच्यावर सिनेमे करायची वीस वर्षांसाठी बंदी आहे. आणि तरीही या काळात त्यांनी चार सिनेमे बनवलेले आहेत.

‘टॅक्सी तेहरान’ याच चारांमधला एक. बर्लिनच्या चित्रपट महोत्सवामध्ये हा सिनेमा दाखवला गेला, तेव्हा पनाही स्वत: अर्थातच तिथे जाऊ शकले नव्हते. ‘टॅक्सी तेहरान’ला गोल्डन बेअर हा सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला, तेव्हा हाना सैदी या त्यांच्या भाचीने तो स्वीकारला होता. पनाही यांचे ‘व्हाईट बलून’ किंवा ‘ऑफसाईड’ किंवा ‘धिस इज नॉट अ फिल्म’ किंवा ‘क्लोजड्‌ कर्टन्स’ यासारखे सिनेमे बघितलेल्या माझ्यासारख्या त्यांच्या चाहत्यांची ‘थ्री फेसेस’ने किंचित निराशाच केली, असं म्हणायला हवं.

‘टॅक्सी तेहरान’मध्ये पनाहींनी एका टॅक्सीत एक कॅमेरा ठेवून तेहरानमध्ये सैर केली होती. या टॅक्सीत अनेक प्रवासी चढतात, उतरतात आणि ड्रायव्हरशी बोलता- बोलता इराणच्या सामाजिक-राजकीय वातावरणावर टिकाटिप्पणी करतात. पनाहींनी आपल्या देशातल्या विरोधाभासांवर, सेन्सॉरवर, पुरुषसत्ताक कुटुंबपद्धतीवर इतके नेमके आघात केलेले होते की, त्यांच्या सरकारच्या ते पचनी पडलेच नसते.

‘थ्री फेसेस’मध्येही पनाही सामाजिक परिस्थितीवर भाष्य करू पाहतात, पण त्याची धार कमी झालेली आहे. कदाचित, घराबाहेर पडण्याची परवानगी असली, तरी सरकारने आखून दिलेली चौकट जाहीरपणे मोडणं त्यांना शक्य होत नाहीये. मात्र, त्यांचा हा नवा कोरा सिनेमा या वर्षी कानमध्ये दाखवला गेला. पनाही स्वत: येऊ शकलेच नाहीत, कारण अजूनही त्यांना देश सोडायची परवानगी नाही; पण त्यांच्या सिनेमावर त्या अर्थाने दबाव आला नाही.

2018 च्या कान चित्रपट महोत्सवामध्ये जाफर पनाहींप्रमाणेच असगर फरहादी या आणखी एका मोठ्या इराणी दिग्दर्शकाचा ‘एव्हरीबडी नोज’ नावाचा स्पॅनिश सिनेमा होता. फरहादींनी बंधन घालणाऱ्या देशात राहायचं नाकारून फ्रान्समध्ये स्थलांतर केलंय. गेली काही वर्षं ते तिथेच सिनेमे बनवताहेत. कानमध्ये फरहादींची पत्रकार परिषद झाली, त्यात ‘पनाहींना आंतरराष्ट्रीय चित्रपट   महोत्सवांमध्ये सहभागी होण्याची परवानगी द्यावी’ अशी विनंती त्यांनी इराणच्या सरकारला केली. इतर देशांमधल्या केन लोआच, ऑलिव्हर स्टोन यांसारख्या अनेक दिग्दर्शकांनी अशी मागणी केलेली आहे. स्टोन यांनी तर इराणच्याच चित्रपट महोत्सवामध्येच ‘पनाहींना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये जाण्याची परवानगी द्यावी’, अशी मागणी केलेली होती. आंतरराष्ट्रीय दबाव वाढवत राहावा, अशीही त्यामागची भूमिका आहे. पण अजून तरी इराणच्या सरकारने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पनाहींचं कौतुक आणि मोठेपण हे की, अशा परिस्थितीतही देश सोडण्याऐवजी ते त्या परिस्थितीशी सामना करून सिनेमा बनवण्याचं आपलं काम सुरू ठेवताहेत. मग त्यासाठी थोड्या तडजोडी कराव्या लागल्या तरी त्यांना ते मंजूर असावं, असं दिसतंय. निदान ‘थ्री फेसेस’ पाहताना तरी तसं जाणवलं.

सिनेमाची सुरुवात होते ती एका मुलीने फोनवरून पाठवलेल्या व्हिडिओने. मारीझिये नावाच्या या मुलीने जाफरी नावाच्या नायिकेला हा व्हिडिओ पाठवलाय. (ही भूमिका खरोखरच जाफरी या अभिनेत्रीने केलेली आहे). या मुलीलाही जाफरी यांच्यासारखं नटी व्हायचंय. पण आपले पालक, आपल्या गावातली माणसं आपल्याला कधीच परवानगी देणार नाहीत याची कल्पना तिला आहे. जाफरींनी आपल्याला मदत करावी, त्यांच्या लोकप्रियतेचा उपयोग करून आपल्या घरच्यांचं मन वळवावं अशी आपली इच्छा होती, तसा प्रयत्नही आपण केला; पण जाफरींनी त्याकडे लक्ष न दिल्याने आपण आता आत्महत्या करत आहोत, असं ती मुलगी म्हणते. झाडाच्या फांदीला तिने टांगलेला दोर आपल्याला दिसतो. त्याचा फास ती गळ्यात घालते आणि फोनचा कॅमेरा हललाय. पुढे काय घडलं, हे आता कळत नाहीये.

हा व्हिडिओ पाहून जाफरी भयंकर अस्वस्थ होतात. अपराधीपणाच्या भावनेतून त्या या मुलीच्या शोधासाठी निघतात. त्यांच्या सोबत आहेत त्यांचे दिग्दर्शक सहकारी जाफर पनाही. (ही भूमिका अर्थातच खऱ्याखुऱ्या पनाहींनीच केलीये.) एक प्रकारे ही रोड ट्रिप आहे. जाफरी आणि पनाहींच्या प्रवासाचा सिनेमा. शोध घेत त्यांचं त्या मुलीच्या गावात पोचणं, तिथे वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटणं, त्यातून गावातल्या लोकांची मानसिकता आपल्यापर्यंत पोचणं, आधीच्या पिढीतल्या एका कलावंत महिलेची झालेली शोकांतिका आपल्यासमोर येणं- अशी अनेक वळणं घेत दिग्दर्शक आपल्याला भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ अशा तीन काळांमधल्या तीन स्त्रियांच्या परिस्थितीचं दर्शन घडवतो.

पण हे सगळं थेटपणे तो मांडत नाही. घडणाऱ्या घटनांमधून संदर्भ लावण्याचं काम दिग्दर्शक प्रेक्षकांवर सोडून दिलंय. पण हा प्रवास किंचित रेंगाळल्यासारखा झालाय. काही दृश्यं खेचल्यासारखी वाटतात. पनाहींच्या सिनेमांना डॉक्युमेंटरीचा पदर असतो, तसा तो इथेही आहे. खऱ्या आणि खोट्या व्यक्तिरेखांची उत्तम सरमिसळ ते करतात, तशी ती इथेही झालीये. आणि तरीही एक परिपूर्ण अनुभव मिळाल्याचं समाधान आपल्याला लाभत नाही. पनाहींकडून असलेली अपेक्षा पूर्ण झालीये, असं वाटत नाही. पण तरीही या माणसाला सलाम करण्यावाचून आपल्यापाशी पर्याय नसतो. कारण त्यांना जे सांगायचंय, जी भूमिका घ्यायचीये, जे मांडायचंय, त्यापासून ते फार दूर गेलेले नसतात. ‘थ्री फेसेस’चं ट्रेलर इथे पाहता येईल.

लेबनॉन, युक्रेन, जपान, स्वीडन, अर्जेंटिना, आइसलँड आणि इराण अशा सात देशांमधल्या सात सिनेमांविषयी या मालिकेमध्ये तुम्ही वाचलंत. यात फ्रान्स, जर्मनी, स्पेनसारख्या युरोपियन देशांचा समावेश नव्हता. हे अर्थातच आपोआप घडलं. पण दर वेळी निरनिराळ्या देशांची, त्यांच्या सेन्सिटिव्हिटिजची, तिथल्या सिनेमाच्या संस्कृतीची ओळख व्हावी, यापूर्वी झालेली ओळख अधिक घट्ट व्हावी अशीच तर अपेक्षा असते. आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधून मिळणारं संचित तेच तर असतं, असं म्हणायला हवं ना?

Tags: Iranian film jafar Panahi Benedikt Erlinsson woman at war film festival iffi फिल्म फेस्टिवल meena karnik चित्रपट महोत्सव जाफर पनाही बेनेडिक्ट अर्लिंग्सन थ्री फेसेस वुमन ॲट वॉर इफ्फी मीना कर्णिक weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात