Diwali_4 सर्वोत्कृष्ठ ठरलेले दोन सिनेमे
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

सर्वोत्कृष्ठ ठरलेले दोन सिनेमे

कान चित्रपट महोत्सवामध्ये या वर्षीचं पाम ए दोअ पारितोषिक मिळालं ब्रिटिश दिग्दर्शक केन लोआच यांच्या ‘आय, डॅनिएल ब्लेक’ या सिनेमाला, तर ‘ग्रॅज्युएट’ या सिनेमासाठी रोमानियाच्या ख्रिस्तियान मुन्गयू यांना दिग्दर्शनाचा पुरस्कार विभागून दिला गेला. या दोन सिनेमांविषयी-  

पन्नास वर्षांपूर्वी केन लोआच या ब्रिटिश दिग्दर्शकाने बीबीसीसाठी ‘कॅथी कम होम’ नावाच्या टेलिप्लेची पटकथा लिहिली होती आणि त्याचं दिग्दर्शनही केलं होतं. 1966 मध्ये बेघर असणं म्हणजे काय असतं, यावर यात भाष्य होतं. केन लोआचच्याच म्हणण्यानुसार, ‘‘माझ्या नव्या सिनेमामध्ये 2016 च्या ब्रिटनमध्ये जगणं कसं आहे, हे सांगायचा प्रयत्न मी केलाय.’’ हा प्रयत्न म्हणजेच ‘आय, डॅनिएल ब्लेक’ हा सिनेमा.

लोआच यांचं वय आज 79 आहे आणि सिनेमा दिग्दर्शनातून निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्यांनी हा नवा सिनेमा केलाय. बहुतेकांच्या मते, त्यांचा हा शेवटचा सिनेमा. खास त्यांच्या पठडीतला. लोआच आपल्या या सिनेमाविषयी एका मुलाखतीमध्ये म्हणतात, ‘‘माझ्या सिनेमामुळे प्रेक्षकांच्या घशात आवंढा यायला हवा; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे ते त्यांना संताप येणं. कारण ब्रिटनसारख्या प्रगत देशात आज सरकारी लाभ मिळवणं म्हणजे कॅच 22 सारखी गत झालीये. नको इतके प्रश्न, नको इतक्या अडचणी. शेवटी थकून, अपमानित होऊन माणूस सरकारकडून मिळणाऱ्या हक्काचा लाभ सोडून देण्याच्या मन:स्थितीमध्ये येतो. आणि शासनाची ही वृत्ती म्हणजे काही अपघात नाही. अकार्यक्षम आणि दुष्ट असणं जाणीवपूर्वक आहे. आपल्या या वागण्यामुळे माणसं निराश होतील, थकतील, भुकेली राहतील आणि कदाचित आत्महत्त्येला प्रवृत्त होतील, हे त्यांना माहितीये. तुम्ही गरीब आहात, हा तुमचा दोष आहे; तुमच्यापाशी नोकरी नाही, ही तुमची चूक आहे- असं भासवलं जातंय. आणि आपल्या समाजातला एक घटक त्याचे परिणाम भोगतोय. माझ्या सिनेमातून मला हेच दाखवायचंय.’’

सिनेमाच्या सुरुवातीलाच पडद्यावर क्रेडिट्‌स येत असताना आपल्या कानांवर पडतात ते केवळ संवाद. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर फोनवर असलेला पुरुष काम करण्यास पात्र आहे की नाही, हे ठरवण्यासाठी समाजकल्याण खात्यामधली एक बाई प्रश्न विचारतेय. त्याच्या हातांविषयी, पायांविषयी, अगदी पार्श्वभागा- विषयीही. थोडक्यात, हृदय सोडून सगळ्याविषयी. तो तिला सांगायचा प्रयत्न करतोय- बयो, मला डॉक्टरांनी काम करू नकोस म्हणून सांगितलंय. त्यामुळे आता मला बेरोजगारांसाठी जे लाभ आहेत ते मिळायला हवेत, त्याचं प्रमाणपत्र मला मिळायला हवं.

फोनवरचा हा पुरुष आहे साठीच्या जवळ आलेला डॅनिएल ब्लेक. निम्नमध्यमवर्गीय. सुतारकामात तरबेज. नोकरी करता-करता आपल्या आजारी बायकोची सेवा करणारा. तिच्या मृत्यूनंतर एकाकी पडलेला. आणि आता हृदयविकाराचा झटका आल्यानंतर डॉक्टरांनी काम करायला बंदी केलेला. मात्र, समाजकल्याण खातं त्याला या लाभांची गरज नसल्याचं सांगतं. डॅनिएल त्यावर अपील करतो, पण तोपर्यंत त्याला काम करता येत नाही आणि आजारपणासाठीचा भत्ताही मिळत नाही. सरकारी ऑफिसमध्ये फेऱ्या मारत असतानाच त्याची गाठ पडते केटीशी. दोन मुलांची ही तरुण आई. बेघरांसाठीच्या कोट्यातून तिला भलतीकडेच एक घर दिलं जातं, ती आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करते, पण नियमांमध्ये बांधले गेलेले आणि माणूस म्हणून समोरच्याचं बोलणं ऐकण्याची  सवयच नसलेले अधिकारी तिला बाहेर काढतात.

डॅनिएल आणि केटी समदु:खी. दोघांकडेही काम नाही आणि म्हणून पैसे नाहीत. स्वाभाविकच दोघांची मैत्री होते. तो तिला घर लावायला मदत करतो. तिच्या मुलांचा मित्र बनतो. दोघांचाही आयुष्याबरोबरच आणि नोकरशाही- बरोबरचा झगडा प्रसंगी विनोद निर्माण करतो, प्रसंगी अंगावर काटा आणतो. खास करून एका दृश्याचा उल्लेख केल्यावाचून राहवत नाही. केटी आणि तिच्या मुलांबरोबर डॅनिएल फूड बँकमध्ये जातो. कित्येक दिवस मुलांना खायला घालायचं म्हणून अर्धपोटी राहिलेल्या केटीला तिथल्या वस्तू घेताना राहवत नाही आणि एक डबा फोडून ती कोणी बघत नाहीसं पाहून आतलं अन्न बकाबका खाऊ लागते. आपलं हे वागणं किती खालच्या पातळीचं आहे याची लाज वाटून ढसाढसा रडू लागते. आपल्या मुलांसमोर आपण स्वत:ला असं उघडं पाडतोय याची लाज, आपल्यावर आलेल्या परिस्थितीवरचा राग आणि असहायपणा त्या रडण्यात असतो.

हा सिनेमा खरं तर आपल्यासारख्या देशाला न समजण्यासारखा. कारण ही गोष्ट एका प्रगत देशामधल्या गरिबांची आहे. दिग्दर्शक आणि पटकथाकार पॉल लॅव्हरटी हे अनेक महिने वेगवेगळ्या ब्रिटिश शहरांमधून फिरले. तिथे कामाच्या शोधात असलेल्यांशी किंवा अगदी जेमतेम पैसे कमावणाऱ्यांशी बोलले. त्यातून या सिनेमाच्या कल्पनेने आकार घेतला. पण आपल्याकडे बेकारीचा भत्ता नाही, आपल्याकडे डॉक्टरने फिटनेसचं प्रमाणपत्र दिल्याशिवाय काम करायचं नाही असा काही नियम नाही, बेघरांसाठी सरकारी निवास देण्याची पद्धत नाही किंवा सरकारच्या समाजकल्याण खात्याच्या अशा काही योजनाही नाहीत. पण तरीही हा सिनेमा आपल्याला आपला वाटतो. कारण नोकरशाहीमुळे त्रस्त होणारी माणसं सर्वत्र असतात. नियमांवर बोट दाखवून समोरच्याचा अधिकार डावलण्याच्या घटना जगभर घडतात. प्रस्थापितांकडून सन्मानाने जगण्याचा अधिकार हिरावून घेतल्याच्या बातम्या सतत कानांवर येतात. म्हणूनच हा सिनेमा भावतो; आपल्यातल्या संवेदनशीलतेला साद घालतो, अस्वस्थ करतो आणि वैश्विक बनतो.

या सिनेमाचा ट्रेलर पाहायचाय? https://www.youtube.com/watch?v=ahWgxw9E_h4 या लिंकवर क्लिक करा.

ख्रिस्तियान मुन्गयू या दिग्दर्शकाचा ‘फोर मन्थ्स, थ्री विक्स अँड टू डेज’ हा सिनेमा काही वर्षांपूर्वी बघितला होता आणि अक्षरश: भारावून जायला झालं होतं. (कानमध्ये या सिनेमाला 2007 मध्ये पाम ए दोअ मिळालं होतं). गर्भपात अवैध असताना आपल्या गरोदर मैत्रिणीला तो करण्यासाठी साथ देणाऱ्या मुलीची ती गोष्ट होती. या वर्षीचा त्यांचा ‘ग्रॅज्युएट’ हा सिनेमा तेवढा प्रभावी नसला, तरी सुरेख होता, यात शंकाच नाही.

पन्नाशीला आलेल्या, डॉक्टर असलेल्या रोमिओ आल्दिया आणि त्याच्या मुलीची- एलायझाची ही गोष्ट. मुलगी हुशार आहे आणि अठरा वर्षांची झाल्यावर तिला   उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवायचं, असा निश्चय वडिलांनी करून ठेवलाय. एलायझालाही यूकेमध्ये मानसशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी स्कॉलरशिप मिळालीये. तिला आता फक्त वार्षिक परीक्षा पास करायची आहे. अर्थात, तिच्यासारख्या हुशार विद्यार्थिनीसाठी ही परीक्षा म्हणजे केवळ एक फॉरमॅलिटी आहे. मात्र पहिल्या लेखी पेपरच्या आदल्या दिवशी एलायझावर कुणी तरी हल्ला करतं. त्यात ती जखमी होते, तिचा हात दुखावतो आणि तिला आवश्यक तेवढे मार्क मिळतील का, यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं. काय वाट्टेल ते झालं तरी मुलीला इथून बाहेर पाठवायचं, या देशात तिच्यासारख्या हुशार मुलीला भवितव्य नाही, असा ठाम समज असलेल्या रोमिओची मन:स्थिती द्विधा होते.

एका बाजूला पोलिसांबरोबर हल्लेखोराला पकडण्याचे प्रयत्न, दुसऱ्या बाजूला मुलीच्या बॉयफ्रेंडवरचा संशय, शाळेतल्या शिक्षिकेबरोबर स्वत:चं असलेलं अफेअर आणि मुलीच्या करिअरची चिंता- अशा चक्रात रोमिओ अडकलेला असतानाच त्याच्याकडून अवैध काम करून घेण्याच्या बदल्यात त्याच्या मुलीला अव्वल मार्क देण्याची ऑफर त्याला येते. आजवर कधीही वाकड्या मार्गाने काहीही न केलेला रोमिओ, मुलीच्या भविष्यासाठी भ्रष्ट मार्ग वापरायला तयार होतो. मात्र, कुठल्या उत्तरपत्रिकेला मार्क द्यायचे, हे समजण्यासाठी एलायझाने आपल्या पेपरवर खूण करणं आवश्यक असतं. याचाच अर्थ, एक प्रामाणिक डॉक्टर आणि मुलीच्या प्रेमाखातर भ्रष्टाचार करायला तयार होणारा बाप यांच्यातलं द्वंद्व दिग्दर्शकाने उत्तम रंगवलंय.

मात्र, त्याच्याइतकीच महत्त्वाची आहे एलायझा. वडिलांचं अफेअर कळल्यावर अस्वस्थ होणारी, वडिलांनी आपल्या बॉयफ्रेंडवर संशय घेतल्याने चिडणारी, वडिलांच्या प्रामाणिकपणाविषयी तोवर अभिमान बाळगणारी, त्यांनी बाणवलेल्या तत्त्वांवर चालणारी. हे द्वंद्व तिचंही आहे. आणि या बाप-लेकीची गोष्ट सांगताना त्यांच्या नात्याबरोबरच दिग्दर्शक एकूणच भ्रष्ट समाजव्यवस्थेवरही भाष्य करतो. नवरा-बायकोमधले ताणतणाव दाखवताना बलात्काराचा प्रयत्न झाल्यानंतर होणाऱ्या मानसिक धक्क्याबद्दलही बोलतो. डॉक्टर आणि शिक्षिकेच्या अफेअरमध्ये त्या शिक्षिकेच्या लहानग्या मुलाची व्यक्तिरेखाही ताकदीने उभी करतो. एका अत्यंत हुशार मुलीचं मोटरबाईक चालवायला शिकवणाऱ्या बॉयफ्रेंडबरोबरचं नातं दाखवताना सामाजिक स्तरामधल्या फरकामुळे बदलणारा दृष्टिकोनही अधोरेखित करतो, आणि एक चांगली कलाकृती पाहिल्याचं समाधानसुद्धा देतो.

या सिनेमाचा ट्रेलर पाहायचाय? https://www.youtube.com/watch?v=ZisE16JBUMA या लिंकवर क्लिक करा.

Tags: सिनेमा चित्रपट चित्रपट महोत्सव फिल्म फेस्टिव्हल मीना कर्णिक केन लोआच ख्रिस्तियान मुन्गयू पाम ए दोअ कान महोत्सव ken loach cristian mungiu International Film Festival France Film Festival Kaan Meena Karnik weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात