Diwali_4 दोन मास्टर्स
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

पेद्रो आल्मादोवर आणि असगर फरहादी हे दोन जागतिक सिनेमामधले मास्टर्सच म्हणायला हवेत. या दोन्ही दिग्दर्शकांचे सिनेमे या वर्षी कानमध्ये स्पर्धेत निवडले गेले होते. फरहादींच्या सिनेमाला सर्वोत्कृष्ट पटकथेचं पारितोषिक मिळालं, तर अल्मादोवरला काहीच नाही. पण तरीही या दोन्ही सिनेमांची दखल घेतली नाही तर चालणारच नाही. म्हणूनच...     

लालभडक रंग समोरचा अख्खा पडदा व्यापून टाकतो आणि आपण पेद्रो आल्मादोवर या स्पॅनिश दिग्दर्शकाच्या दुनियेत प्रवेश करतो. लाल हा आल्मादोवरचा खास आवडता रंग आहे आणि त्याच्या प्रत्येक सिनेमामध्ये त्याने या रंगाचा वापर केलेला आहे. ‘ज्युलिएटा’ या त्याच्या नव्या कोऱ्या सिनेमाची सुरुवातच या लाल रंगाने झालीये. कॅमेरा थोडा मागे सरकतो आणि लाल रंगाचा गाऊन घातलेली त्याची नायिका आपल्याला दिसते. पन्नाशीतली. किंचित थकलेल्या चेहऱ्याची. घरातल्या सामानाची बांधाबांध करणारी. हीच ज्युलिएटा. माद्रिद सोडून आपल्या प्रियकराबरोबर पोर्तुगालला कायमची जायचा निर्णय घेतलेली. आणि अचानक रस्त्यात तिच्या मुलीची मैत्रीण भेटल्यावर, आपली मुलगी- जिला ज्युलिएटा गेली बारा वर्षं भेटलेली नाही ती मुलगी- याच शहरात आहे हे कळल्यावर अस्वस्थ होऊन आपला निर्णय बदलणारी. आई आणि मुलीचं नातं ताणलेलं आहे, हे आपल्या लक्षात येतं. आणि मग ज्युलिएटाच्या मनातलं अपराधीपण हळूहळू आपल्यासमोर उलगडत जातं.

आपल्याला भेटते ऐन तारुण्यातली स्वच्छंदी ज्युलिएटा (आल्मादोवरने यासाठी दोन नायिकांची निवड केलीये. वयस्क भूमिका केलीये एमा सुआरेझने तर तरुण ज्युलिएटा साकारलीये आद्रियाना युगार्तेने. मुख्य म्हणजे आपण सिनेमात इतके गुंतलेले असतो की हे ट्रान्झिशन पट्‌कन लक्षातही येत नाही). तिची मुलगी, तिचे आई-वडील, तिचा नवरा झोआन. ट्रेनमध्ये ज्युलिएटाला त्या रात्री दोन पुरुष भेटतात. एक वयस्क आहे. त्याला कुणाची तरी सोबत हवीये. ज्युलिएटाशी बोलायचा तो प्रयत्न करतो, पण ते न आवडून ती उठून पॅन्ट्री कारमध्ये येते. इथे तिला भेटतो झोआन. तरुण, देखणा. ट्रेनमध्ये त्या रात्री झोआनबरोबरच्या संबंधांमधून ज्युलिएटा गरोदर राहते. आणि त्याच रात्री एक मृत्यूही पाहते. त्यासाठी अपराधी वाटून घेते. आपण गरोदर आहोत, हे कळल्यावर ती झोआनचा शोध घेते. आई आणि बायको या भूमिकांमध्ये रमून जाते. कालांतराने अशा काही घटना घडतात की, तिला आपल्या मुलीला घेऊन माद्रिदमध्ये राहावं लागतं. नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या ज्युलिएटाची काळजी अर्थातच तिची मुलगी आन्तिआ आणि आन्तिआची जिवश्च-कंठश्च मैत्रीण बिआ घेतात. (एका प्रसंगात बाथटबमध्ये शिरलेली आद्रियाना आपल्याला दिसते. टॉवेलमध्ये गुंडाळून आन्तिआ आणि बिआ जिला बाहेर काढतात, ती सुआरेझ असते).

साधारण तीस-पस्तीस वर्षांचा काळ दिग्दर्शक आपल्याला दाखवतो. नायिकेच्या आयुष्यातले अनेक चढ-उतार आपण पाहतो. पण या सगळ्यात विविध पातळ्यांवर, विविध प्रसंगांमधली अपराधीपणाची भावना हे एक सूत्र जाणवत राहतं. आल्मादोवरच्या पहिल्या तीन सर्वोत्तम सिनेमांमधला हा सिनेमा आहे, असं अजिबातच नाही म्हणता येणार. पण तरीही प्रेक्षक म्हणून आपल्याला तो बांधून ठेवतो, इतकं नक्की.

ॲलिस मन्रो या प्रसिद्ध नोबेल पुरस्कारप्राप्त कॅनेडियन लेखिकेच्या चान्स, सून आणि सायलेन्स या तीन लघुकथांचा मिळून पेद्रो अल्मादोवरने आपला हा नवा सिनेमा बनवलाय. मन्रोच्या ज्युलिएट हॅन्डरसन या व्हॅन्‌कोवरमध्ये राहणाऱ्या नायिकेचं नाव मग झालं ज्युलिएटा आणि आल्मादोवरने ही गोष्ट आपली, आपल्या देशातली केली. हा ज्युलिएटाच्या आयुष्याचा पट तर आहेच, पण वेगवेगळ्या नातेसंबंधांचाही आहे. नवरा- बायको, आई- मुलगी, मुलगी- बाप, मैत्रीण- मैत्रीण अशा विविध नात्यांचा. म्हणूनच ही गोष्ट ज्युलिएटाची असली तरी अधूनमधून आपल्या प्रत्येकाला कुठे तरी स्वत:शी त्याचं नातं सांगता येतंच. म्हणून तर आपण या सिनेमात गुंतून पडतो.

हा सिनेमा पाहण्यासाठी https://www.youtube.com/watch?v=ATcsHdyFVTE  या लिंकवर क्लिक करा.

असगर फरहादींच्या नव्या सिनेमाविषयी रसिकांमध्ये उत्सुकता नसेल तर नवलच म्हणायला हवं. म्हणून तर, कान चित्रपटमहोत्सवामध्ये त्यांच्या ‘द सेल्समन’ या नव्या सिनेमाला गर्दी होणार, हे लक्षात घेऊन संध्याकाळी सातच्या शोसाठी पत्रकारांनी पावणेपाच वाजल्यापासून रांगेत उभं राहायला सुरुवात केली होती. गप्पांमध्ये अर्थातच, फरहादींच्या अलीकडच्या सिनेमांचा समावेश होता. विशेषत: ‘अबाऊट एली’, ‘अ सेपरेशन’ आणि 2013 मधल्या ‘द पास्ट’ या सिनेमांचा. ‘द सेल्समन’ या तिन्ही सिनेमांच्या तुलनेत मला डावा वाटला, पण त्यांच्याच सिनेमांच्या तुलनेत. स्वतंत्रपणे हा सिनेमा शंभर टक्के उजवा आहे. ‘अ सेपरेशन’प्रमाणे या सिनेमामध्ये सामाजिक स्तर नाहीत, ‘द पास्ट’प्रमाणे नात्यांमधली ओढाताण नाही; पण तरीही ही गोष्ट आपल्याला बांधून ठेवते. विचार करायला लावते.

एमाद आणि राणा हे सुशिक्षित, उच्चभ्रू, सुसंस्कृत जोडपं. ते ज्या बिल्डिंगमध्ये राहत असतात त्याला तडे जातात, म्हणून सगळ्यांना घरं रिकामी करावी लागतात. एमाद आणि राणा तेहरानच्या मध्यवर्ती भागात नवं घर पाहतात. या घरात आधी एक भाडेकरू राहत असते. एका बेडरूममध्ये तिचं सामान अजूनही असतं. बिल्डिंगमधले इतर लोक तिच्याविषयी कुजबुजत्या आवाजात बोलतात. तिच्याकडे येणारे पुरुष हा गॉसिपचा विषय असतो. एमाद हा शिक्षक आहे आणि फावल्या वेळात नाटक करतो. राणा त्या नाटकांमधून काम करते. त्यांचा स्वत:चा एक ग्रुप आहे. एक कुटुंबच म्हणा ना. आणि ते आता नवं नाटक बसवताहेत. दिग्दर्शक एमाद. नाटक आहे आर्थर मिलरचं 1949 मधलं प्रसिद्ध ‘डेथ ऑफ अ सेल्समन’. यातल्या विली लोमनची भूमिका एमाद करतोय, तर त्याच्या बायकोची- लिंडाची भूमिका राणा. नव्या घरात दोघे सेटल तर होतात, पण आधीच्या त्या भाडेकरू बाईचं सामान राणाच्या नजरेत खुपत राहतं. ही घेऊन का जात नाहीये ते? कोण आहे ही बाई? त्यांच्या ग्रुपमधल्या बाबाकनेच हे घर या दोघांना मिळवून दिलंय.  तोही त्याच्या परीने त्या बाईशी संपर्क साधायचा प्रयत्न करतोय. एक प्रकारचं रहस्य त्या बाईभोवती दिग्दर्शक गुंफतो.

आणि मग एक दिवस एमादची वाट पाहणाऱ्या राणावर घरात शिरून कोणी तरी हल्ला करतं आणि या जोडप्याचं आयुष्यच बदलतं. राणाला एकटं राहताना वाटणारी भीती आणि लोकांमध्ये वावरताना येणारा ताण याचा परिणाम स्वाभाविकपणे नाटकावर होऊ लागतो. आपल्या बायकोवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचा शोध घ्यायचा, या विचाराने एमाद झपाटून जातो. कथानक आता वेगळ्याच दिशेने सरकू लागतं. राणा या हल्ल्यामधून सावरायचा प्रयत्न करत असते आणि दुसऱ्या बाजूला एमादच्या डोक्यात केवळ हल्लेखोराचा विचार असतो. ज्या पुरुषाने आपल्या बायकोवर हल्ला केला आणि त्यामुळे एक प्रकारे आपल्याला अपमानित केलं, त्याला जास्तीत जास्त लाजवता कसं येईल याचा विचार. त्यासाठी कोणत्याही स्तराला जायची त्याची तयारी असते. मग तो ना राणाचं ऐकतो, ना बऱ्या-वाईटाचा विचार करतो. एका पुरुषाचं ऑब्सेशन त्याला कुठे घेऊन जाते, हे आपण पाहतो. त्यातून निर्माण झालेलं नाट्य म्हणजे सिनेमाचा क्लायमॅक्स.

फरहादींनी आपली गोष्ट सांगण्यासाठी पार्श्वभूमीला ‘डेथ ऑफ अ सेल्समन’ हे नाटक निवडलंय. स्वत:ची ओळख हरवलेला विली, आपल्या कुटुंबासमोर वेगळी  प्रतिमा उभी करण्याचा अट्टहास करणारा विली, त्याच्यात असलेल्या कॉन्ट्रॅडिक्शन्स आपल्याला एमादमध्ये पाहायला मिळतात. त्याचं स्वयंकेंद्रित असणं आपल्याला हळूहळू जाणवू लागतं. याचा अर्थ एमाद व्हिलन आहे, असा नाही. किंबहुना, तो माणूस आहे म्हणूनच असा आहे. आपल्या बायकोवर त्याचं नितांत प्रेम आहे. तिच्यासाठीच तर हा बदला घेण्याची आपली धडपड आहे, असं त्याचं ठाम मत आहे. म्हणूनच, राणा या धक्क्यातून बाहेर पडल्यानंतरही एमादला ती घटना विसरता येत नाहीये. राणाची भूमिका त्याला पटत नाहीये. त्यामुळे आपल्या दोघांमध्ये दुरावा येतोय याचंही त्याचं भान सुटत चाललंय. म्हणूनच म्हटलं, एमाद आणि राणाच्या निमित्ताने असगर फरहादी आपल्याला मानवी स्वभावातले कंगोरे दाखवतात, त्यातला विरोधाभास अधोरेखित करतात आणि विचार करायला लावतात.

हा सिनेमा पाहण्यासाठी https://www.youtube.com/watch?v=_hHUkvNG7iU या लिंकवर क्लिक करा.

Tags: कान फेस्टिव्हल मीना कर्णिक meena karnik kaan festival weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात