Diwali_4 ‘रामनला मी लव्हरबॉयसारखा साकारलाय’- नवाझुद्दीन सिद्दिकी
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

‘रामनला मी लव्हरबॉयसारखा साकारलाय’- नवाझुद्दीन सिद्दिकी

कान महोत्सवातील ‘डायरेक्टर्स फोर्टनाईट’ विभागात दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा ‘रामन राघव 2.0’ हा सिनेमा दाखवला गेला आणि प्रेक्षकांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिला. या सिनेमामध्ये मुख्य भूमिका करणाऱ्या नवाझुद्दीन सिद्दिकी यांच्याशी त्या निमित्ताने केलेली ही बातचित...

थंड डोळे. चेहऱ्यावर कोणतेही भाव नाहीत. मनात कोणतीही खळबळ नाही. दिलेलं काम आपण करतोय, एवढीच जणू भावना. मग रस्त्यावरच्या कुणाच्या डोक्यात शिग घालून खून करायचा असो, की पोलीस स्टेशनमध्ये बसून आपण करत असलेल्या कामाची कबुली द्यायची असो. असा मानसिक रुग्ण पडद्यावर साकारणं सोपं नाही. मुंबईमध्ये 1960 च्या दशकात रामन राघव नावाच्या अशाच एका मनोरुग्णाने थैमान घातलं होतं. त्याने 41 खून केले होते, कोणतंही कारण नसताना. यातले बहुतेक खून हे रस्त्यावर झोपलेल्या, झोपडपट्टीत राहणाऱ्या गरिबांचे होते.

अनुराग कश्यपचा सिनेमा सुरू होतो, तेव्हा ही माहिती पडद्यावर आपल्याला दिसते आणि त्यापाठोपाठ वाक्य येतं- ‘मात्र, हा सिनेमा रामन राघववर नाही.’ अनुराग कश्यपला मुळात सिनेमा करायचा होता तो या सिरियल किलरवरच. पण 60 चं दशक साकारायचं तर खूप मोठं बजेट लागणार होतं. त्यामुळे त्याने ही कल्पना रद्द केली आणि साधारणपणे या व्यक्तिरेखेवर आधारित सिनेमा लिहायचं ठरवलं. पण मुळात तो अनुराग कश्यप असल्यामुळे आजच्या काळात घडणारा हा सिनेमा केवळ एका मनोरुग्णाची गोष्ट सांगत नाही; ती सांगता-सांगता आणखी बरंच काही सांगून जातो. यात रामण्णा आहे, तसाच एसीपी राघवही आहे. हे द्वंद्व या रामन आणि राघवमधलं आहे. केवळ द्वंद्व नाही, आकर्षण आहे. साम्य आहे, कुरघोडी आहे. थोडक्यात, हा खास अनुराग कश्यपचा सिनेमा आहे.

कानला या सिनेमाचं स्क्रिनिंग झालं आणि तुडुंब भरलेल्या थिएटरमध्ये टाळ्यांचा मोठा कडकडाट झाला. मुळातच कानचं अनुराग कश्यपवर प्रेम आहे. त्यांच्या ‘गँग्ज ऑफ वासेपूर’चे दोन्ही भाग असोत, की ‘अग्ली’सारखा अंगावर शहारा आणणारा सिनेमा असो- कानमध्ये या सिनेमांचं खूप कौतुक झालंय. या वेळी सिनेमा संपल्यानंतर नवाझुद्दीन सिद्दिकी, विकी कौशल, अमृता सुभाष, शोभिता धुलीवाला व अनुष्का साहनी या आपल्या सगळ्या कलावंतांसह अनुराग कश्यप मंचावर आले आणि त्यानंतर झालेल्या प्रश्नांच्या सरबत्तीला तोंड दिलं. अनुराग कश्यपने या वेळी म्हटलं, ‘‘मला हा सिनेमा आजच्या काळाचा करायचा होता. भारतात सध्या जे होतंय; त्यावरही भाष्य करायचं होतं. त्यामुळे या सिनेमाची गोष्ट जरी सिरियल किलरची असली तरी ती तेवढीच नाही.’’

सिनेमाचं तर कौतुक होत होतंच, पण सगळ्यात जास्त अभिनंदनाचा वर्षाव होत होता तो नवाझुद्दीनवर. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या सिनेमाच्या सगळ्याच्या सगळ्या परीक्षणांमध्ये त्याच्यावर स्तुतिसुमनं उधळली गेली. दुसऱ्या दिवशी ‘हॉटेल मॅजेस्टिक’च्या लाऊंजमध्ये मी त्याला मुलाखतीसाठी भेटले, तेव्हा आपल्यावर होणाऱ्या कौतुकाचा आनंद अर्थातच त्याच्या चेहऱ्यावर होता. त्यातून कान म्हणजे त्याच्यासाठी जणू वार्षिक उत्सव झालाय. आजवर त्याचे आठ सिनेमे इथे दाखवले गेले आहेत आणि त्यांपैकी पाच वर्षं सलग दाखवले गेले आहेत.  या मुलाखतीची सुरुवात अर्थातच ‘रामन राघव 2.0’ने झाली.

प्रश्न : या सिनेमातल्या व्यक्तिरेखेची तयारी करणं खूप कठीण होतं, असं तुम्ही म्हणाला आहात. नेमकं काय कठीण होतं?

 - मानसिक दृष्ट्या खूप त्रासदायक होतं या व्यक्तिरेखेची तयारी करणं. सर्वसाधारणपणे स्क्रिप्ट वाचल्यावर आपल्या व्यक्तिरेखेसाठी काय तयारी करावी लागणार, हे ती व्यक्तिरेखाच सांगत असते. काही वेळा उत्स्फूर्तपणा आवश्यक असतो, काही वेळा खूप अभ्यास करावा लागतो. या सिनेमामधलं रामण्णाचं कॅरेक्टर खूप वेगळं आहे. जगण्याचे त्याचे स्वत:चे काही नियम आहेत. मारण्याचं त्याचं स्वत:चं असं लॉजिक आहे. तो अर्थातच नॉर्मल नाहीये. व्यक्तिरेखेच्या मानसिकतेमध्ये शिरण्याचा प्रयत्न मी नेहमी करतो. अमुक एक व्यक्ती अशी का वागते, अमुक एक गोष्ट ती का करते, अमुक एका पद्धतीने ती का बोलते. थोडक्यात, मी त्या व्यक्तिरेखेशी ओळख करून घेतो. रामण्णाशी ओळख करून घ्यायची म्हणजे त्याच्या विचित्र वागण्यामागची मानसिकता जाणून घेणं होतं आणि ते मला खूप कठीण गेलं. कारण काही केल्या मी त्याचं लॉजिक स्वीकारूच शकत नव्हतो. तो म्हणतो- मी खून करतो, कारण मला खून करायचा असतो. त्यात एक पावित्र्य आहे. मी खुनासाठी कारणं शोधत नाही. माणसं धर्माच्या नावाने, राजकारणाच्या नावाने खून पाडतात. माझं तसं नाही. आता हे लॉजिक कसं पचवायचं?

एखादा माणूस खून करण्यासाठी कारणच शोधत नाही, त्याच्या मानसिकतेचा अभ्यास कसा करायचा? आणि तो करताना काही वेळा आपणही तसे होतोय की काय, असं मला वाटू लागायचं. मग स्वत:चीच भीती वाटायची. त्या अर्थाने या भूमिकेची तयारी करणं मला खूप कठीण गेलं. त्याच्या विचारांमधला नागडेपणा मला हादरवून टाकत होता. आपल्या प्रत्येकामध्ये काही तरी ॲब्‌नॉर्मल असतं. पण आपण त्यावर नियंत्रण मिळवतो. एखादी व्यक्ती सार्वजनिक आयुष्यात जशी असते तशी खासगी आयुष्यात असतेच असं नाही. त्यामुळे खाजगी आयुष्यात कोण कसं आहे हे माहीत नसेल, तर आपण त्या व्यक्तीला ओळखतो असं म्हणताच येत नाही. रामण्णाचं तसं नाही. तो जसा आतून आहे, तसाच बाहेरूनही आहे.

प्रश्न : अनुराग कश्यप दिग्दर्शक असल्यामुळे व्यक्तिरेखेशी ओळख करून घेणं सोपं गेलं का? तुम्ही एकमेकांबरोबर खूप काम केलंय आणि तुम्ही एकमेकांना चांगलं समजूनही घेता.

 - आपल्या अभिनेत्यांना मोकळं करणं ही अनुरागची खासियत आहे. कठीण व्यक्तिरेखाही तो तुमच्यासमोर अशा मांडतो की, तुमचं काम सोपं होऊन जातं. त्याच्या सिनेमांमध्ये मी साकारलेली कोणतीच भूमिका त्या अर्थाने सोपी नव्हती. रामण्णाच्या बाबतीत अनुरागने मला एक गोष्ट सांगितली होती, ‘हा माणूस सर्व्हायवर आहे.’   कोणत्याही परिस्थितीत तो स्वत:ला तारून नेतो, तग धरून राहतो. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं, तर मी ही व्यक्तिरेखा एका मनोरुग्णाची म्हणून साकारलीच नाही. मी त्याला लव्हरबॉय म्हणून साकारायचा प्रयत्न केला. तो प्रचंड प्रेमात पडलाय आणि त्यासाठी तो कोणत्याही स्तराला जायला तयार आहे. ती व्यक्ती त्याची सोलमेट आहे. म्हणूनच यातली एसीपी राघवची व्यक्तिरेखा तितकीच महत्त्वाची आहे.

प्रश्न : प्रत्यक्ष शूटिंग करतानाही दडपण आलं होतं? आणि ते संपल्यानंतर हुश्श झालं?

 - सिनेमातली काही दृश्यं दहा-दहा मिनिटांची आहेत. माझं शेवटचं स्वगत 12 की 13 मिनिटांचं आहे. ते एका टेकमध्ये ओके करायचं होतं. पहिल्यांदा सीन झाला, पण काही तरी तांत्रिक अडचण आल्याने तो पुन्हा शूट करावा लागला. असं दोन-तीनदा झालं. अखेर तो सीन ओके झाला, तेव्हा मी अक्षरश: दमून गेलो होतो.

प्रश्न : या सिनेमाचं स्क्रिप्ट तुमच्याकडे पाच वर्षं होतं.

 - होय. तेवढा काळ ही व्यक्तिरेखा माझ्याबरोबर राहतेय. माझ्यापाशी असलेल्या स्क्रिप्टमध्ये फार बदल झाले नाहीत. कारण अनुरागने जे लिहिलं होतं, त्यात बदल करताच येण्यासारखे नव्हते. अर्थात, गोष्ट आजच्या काळातली बनवण्यासाठी जे काही बदल आवश्यक होते, ते केले गेलेच. आज जगभरात धर्माच्या नावावर माणसं मारली जाताहेत. 10-15 लोक काही शेकड्याने माणसं मारतात आणि आपण त्याचा निषेध करतो. तसा तो करायलाच हवा. पण दुसरीकडे कुठे तरी आणखी कुणी 10-15 माणसं दुसऱ्या कुणा लोकांना शेकड्याने मारतात आणि आपल्याला वाटतं, जे झालं ते योग्यच झालं. आपण कुठच्या बाजूला आहोत, यावर आपण हे मारणं योग्य की अयोग्य ते ठरवतो. आणि काही वेळा या दोनांतली रेषा खूप धूसर होते. अनुराग म्हणतो त्याप्रमाणे काय नैतिक आणि काय अनैतिक हे व्यक्तिसापेक्ष असतं.

प्रश्न : कान म्हणजे आता तुमचं ‘होम पीच’ झालंय. हा तुमचा आठवा सिनेमा इथे दाखवला गेलाय.

 - कानबरोबर माझं एक विशेष नातं आहे. अगदी नियमितपणे मी इथे येतो, यावं लागतं. लोक मला ओळखू लागले आहेत. त्यामुळे छान वाटतं. पहिल्या वेळेस मी आलो तेव्हा खूप एक्सायटेड होतो. थोडासा नर्व्हसही होतो. या महोत्सवाची भव्यता पाहून दडपूनही गेलो. पण या भव्यतेबरोबर इथल्या लोकांचं सिनेमाचं पॅशन मला जास्त भावलं. आपण टॅक्सीत बसलो की टॅक्सी ड्रायव्हरही आपल्याशी सिनेमावर गंभीरपणे चर्चा करतो. ही संस्कृती सगळीकडे नाही दिसत.

प्रश्न : तुम्ही बऱ्याच आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांना गेला असाल आजवर?

- होय. बर्लिन, व्हेनिस बऱ्याच ठिकाणी गेलोय. सगळीकडे चांगले सिनेमे दाखवले जातात. सनडान्स महोत्सवाचंही स्वत:चं असं एक सौंदर्य आहे. मला कान आणि सनडान्स हे दोन महोत्सव जास्त आवडतात.

प्रश्न : ‘रामन राघव 2.0’ साठी तुमचं खूप कौतुक झालंय इथे.

 - होय. पण त्यामुळे माझी जबाबदारी जास्त वाढली नाहीये का? मात्र, माझ्यासाठी असं कौतुक मला काम करायला मोटिव्हेट करतं. केवळ समीक्षकांकडून होणारं नाही. तर प्रेक्षकांनाही माझी भूमिका आवडते, तेव्हा मला काम करायला अधिक हुरूप येतो. यश मिळवण्यासाठी मला खूप झगडावं लागलंय. त्यामुळे या यशाची किंमत मला समजते. मात्र, खरं सांगायचं तर- आपल्याला एवढं यश मिळेल, असं कधीच वाटलं नव्हतं. त्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करत राहणं हे मला माझं कर्तव्य वाटतं. त्यासाठी करप्ट होण्याची गरज नाही.

प्रश्न : तुमच्या नव्या कामाविषयी बोलू. गार्थ डेव्हिस यांच्या ‘लायन’मध्ये तुम्ही छोटी भूमिका करताय.

- होय. रूनी मारा, देव पटेल आणि निकोल किडमन यांच्या मुख्य भूमिका आहेत. गार्थची मला मेल आली होती. माझ्याबरोबर काम करायची इच्छा त्यांनी व्यक्त केली. एका चांगल्या प्रोजेक्टचा भाग असणंही महत्त्वाचं असतं ना? मग भूमिका छोटी असली तरी. यात मला केवळ एकच सीन आहे. पण माझी त्याला हरकत नाही. शिवाय, अमिताभ बच्चन आणि विद्या बालन यांच्याबरोबरचा ‘टीई 3 एन 10’ जूनला येतोय. तो थ्रिलर आहे. मग रामन राघवही प्रदर्शित होईल. शिवाय एक लव्हस्टोरी करतोय. श्रीदेवीबरोबर एक सिनेमा आहे. शाहरुख खानबरोबर ‘रईस’ आहे. शाहीद कपूरबरोबर ‘फर्जी’ करतोय. आणि आताच नंदिता दास भेटून गेली. तिच्याबरोबर नव्या प्रोजेक्टची बोलणी सुरू आहेत. माझ्याकडे असलेल्या कामांच्या बाबतीत मी खूश आहे.

Tags: नवाझुद्दिन सिद्दीकी अनुराग कश्यप फिल्म्स कान फेस्टिवल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव चित्रपट मीना कर्णिक Nawazuddin Siddhiqui International Film Festival Kaan Film Festival Raman Raghav Anurag Kashyap Cinema Films Meena Karnik weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात