Diwali_4 चार सर्वोत्तम सिनेमे
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

भारताचा 45 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच गोव्यामध्ये पार पडला. दर वर्षीप्रमाणे या वेळीही व्यवस्थापनाचे घोळ होते. सिनेमांची संख्या खूप होती; पण त्यांचे रिपीट शो फार कमी होते, तीन-तीन तासांचे सिनेमे रात्री ठेवलेले होते वगैरे वगैरे... पण चित्रपट महोत्सव म्हणजे सिनेमांचा उत्सव. देश-विदेशांतले नवे-जुने सिनेमे पाहण्याची संधी. जगभरातल्या संस्कृतींची ओळख. महोत्सवात मी पाहिलेल्या सिनेमांपैकी पहिल्या चार उत्कृष्ट सिनेमांविषयीचा हा लेख 

एक दहा वर्षांचा मुलगा. एक युरोपियन युनियनच्या प्रतिनिधींची प्रमुख. एक रशियन सैनिक. चेचन्यामध्ये रशियाने घुसखोरी केली तो काळ आणि या तिघांची एकमेकांमध्ये गुंतलेली आयुष्ये. दिग्दर्शक मायकेल हॅझॅनाव्हिशुस (2011 मध्ये ऑस्करमध्ये बाजी मारणाऱ्या ‘द आर्टिस्ट’ या सिनेमाचे दिग्दर्शक) यांचा ‘द सर्च’ हा सिनेमा गोव्यातल्या चित्रपट महोत्सवामधला माझ्या दृष्टीने सर्वांत उत्तम सिनेमा होता. 

हाजी हा दहा वर्षांचा मुलगा. घरासमोरच रस्त्यावर रशियन सैनिक त्याच्या आई-वडिलांना गोळ्या घालतात. तरुण बहिणीला घेऊन जातात. घाबरलेला हाजी आपल्या दुपट्यातल्या भावाला उचलतो आणि घरातून बाहेर पडतो. वाटेत एका घराबाहेर आपल्या भावाला ठेवतो, आतली माणसं रशियन भाषा बोलत नाहीत ना याची खात्री करून घेतो आणि ते बाळाला घेऊन आत जातात, हे पाहून एकटाच पुढे चालू लागतो. गावातून मजल-दर मजल करत हाजी शहरात येऊन पोचतो. मात्र विचारलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर तो देत नाही. कुणालाच नाही. तो इतका गप्प  झालाय की, समोरच्याला हा मुलगा मुका आहे असं वाटावं. 

युरोपियन युनियनच्या प्रतिनिधींची प्रमुख म्हणून कॅरोल या शहरात आलीये. विस्थापितांच्या मुलाखती घेऊन त्यांची कहाणी जगासमोर मांडण्यासाठी. बाहेरच्या जगाला त्यांच्याविषयी कणव वाटतेय एवढं तरी चेचन्यातल्या नागरिकांना किमान कळावं, यासाठी तिची धडपड आहे. आणि तिसरा आहे कोल्या. वीस वर्षांचा तरुण रशियन. संगीतात रस असलेला. एक दिवस रस्त्यातून चालताना रशियन सैनिक त्याला पकडतात. त्याच्या खिशात गांजा मिळतो म्हणून चौकीवर नेतात आणि शिक्षा म्हणून थेट सैन्यात दाखल करतात. 

कॅरोलला भुकेला हाजी दिसतो. आणि प्रसंग असे घडतात की, त्याला कॅरोल आपल्या घरीच आणते. दोघांना एकमेकांची भाषा येत नाही. हाजी तर बोलायलाही तयार नाही; पण कॅरोलची आस्था त्याला जाणवते. हळूहळू तो माणसांत येऊ लागतो. दोघांमध्ये एक नातं निर्माण होतं. कोल्याच्या आयुष्यातही बदल होतात. बुजरा, भित्रा कोल्या सैन्यामध्ये जाऊन नखशिखांत बदलतो. आगीने पेटलेल्या इमारतीच्या समोर उभं राहून आपल्या मित्राला, ‘इथे तर स्वर्गच आहे,’ असं म्हणण्यापर्यंतचा त्याचा प्रवास आपल्या साक्षीने होतो. दरम्यान, हाजीची बहीण रईसा त्याला आणि आपल्या तान्ह्या भावाला शोधायला निघालेली आहे. 

या सगळ्यांच्या गोष्टी तुकड्या-तुकड्याने आपल्यासमोर येतात. हा सिनेमा म्हणजे रईसाचा शोध आहे, तसाच तो कॅरोलचाही आहे. सभोवतालच्या भीषण घडामोडींमध्ये घेतलेला माणुसकीचा शोध. हाजी तर आपलं हरवलेलं आयुष्यच शोधतोय. लहान वयात झालेले हिंसेचे संस्कार, रशियन सैनिकांविषयी मनात निर्माण झालेली दहशत यातून जगण्याचा आधार शोधतोय. आणि कोल्या स्वत:ला शोधता-शोधता एक वेगळाच माणूस बनून गेलाय. माणसं मरताना आणि मारताना विकृत आनंद होणारा. निगरगट्ट. पण आपण एका सापळ्यात अडकलोय, जे घडतंय ते घाण आहे याचीही जाणीव असलेला. 

या सिनेमात युद्ध आहे, राजकारण आहे. यातली हिंसा पाहताना शहारा येतो; पण तरीही हा सिनेमा माणसांमधली नाती, भावना, माणुसकी याबद्दलचा आहे. आणि म्हणूनच तो अधिक अंगावर येतो. हा नुसताच युद्धाबद्दलचा सिनेमा असता तर आपण त्यातला हिंसाचार, गोळीबार गृहीत धरला असता; पण इथे युद्धामुळे माणसांचं काय होतं, हे आपण बघतो- तेही एका लहान मुलाच्या दृष्टिकोनातून, एका स्त्रीच्या दृष्टिकोनातून आणि एका विशीतल्या तरुणाच्या दृष्टिकोनातून. आणि बघता-बघता आपण तिघांच्याही आयुष्याचा भाग बनून जातो. कोल्या खरं तर शोषितापासून ते शोषकापर्यंतचा प्रवास करतो. पण तरीही काळाकुट्ट खलनायक वाटत नाही. त्याचं पतन आपण हताशपणे पाहतो.  

रशियाने 1999 मध्ये चेचन्यावर दुसऱ्यांदा आक्रमण केलं, त्या काळातला हा सिनेमा आहे. आणि 1948 मध्ये आलेल्या ‘द सर्च’ याच नावाच्या, दिग्दर्शक फ्रेड झिनेमन यांच्या सिनेमाचा रिमेकही. त्या सिनेमात दुसरं महायुद्ध संपत असताना एक लहान मुलगा कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये आपल्या पालकांपासून तुटतो आणि एक कनवाळू सैनिक त्याची काळजी घेतो, असं दाखवलं होतं. मूळ सिनेमाला उत्कृष्ट कथेचा ऑस्कर पुरस्कारही मिळालेला होता. अशा सिनेमाचा रिमेक करायचा, त्याला अधिक नजीकच्या इतिहासाची पार्श्वभूमी द्यायची आणि तो तितकाच परिणामकारक करायचा (मी हा मूळ ‘सर्च’ पाहिलेला नाही), हे मोठंच आव्हान म्हणायला हवं. मायकेल हॅझॅनाव्हिशुस यांनी अडीच तासांचा हा सिनेमा बनवताना एक क्षणही तुम्ही आपल्या सीटवरून हलणार नाही याची पूर्ण काळजी घेतली आहे. मानवी भावना सिनेमाच्या केंद्रस्थानी ठेवताना रशियन सैन्याने चेचन्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांची कत्तल केली, हेही स्पष्टपणे मांडलंय. 

एका बाजूला ‘द सर्च’मधला शासनाच्या आशीर्वादाने चाललेला दहशतवाद तर ‘टिम्बक्टू’मध्ये बघायला मिळतो- इस्लामच्या नावावर चाललेला अतिरेक. धार्मिक अतिरेक्यांनी शहरावर कब्जा केला की किती पातळ्यांवर माणसं उद्‌ध्वस्त होतात याचं चित्रण दिग्दर्शक अब्दर्रहमाने सिसॅको यांचा हा सिनेमा करतो. शहरापासून दूर राहणारा किदाने, त्याची बायको सातिमा, त्यांची मुलगी टोया आणि बारा वर्षांचा गुराखी इस्सान यांचं आयुष्य संथपणे चाललंय. शहरातल्या अतिरेक्यांना धुडकावून लावण्याएवढं धैर्य अजून तरी त्यांच्यापाशी आहे. मात्र एक दिवस जीपीएस नावाची त्यांची गाय नदीत वाट चुकते आणि अमादाओ या कोळ्याकडून मारली जाते (आजूबाजूला निराशेशिवाय दुसरं काहीच नसताना, या वाट हरवलेल्या शहराच्या जवळ असलेल्या गावातल्या गाईचं नाव जीपीएस असावं, यातही दिग्दर्शकाची सर्जनशीलता दिसतेच), या एका घटनेने गाव ढवळून निघतं. दुसऱ्या बाजूला संगीतात रमणाऱ्या एका ग्रुपला देहांताची शिक्षा ठोठावली जाते. मुलांच्या फुटबॉल खेळण्यावरही बंदी येते. 

या सिनेमाची गोष्ट अगदी छोटीशी आहे. दिग्दर्शकाचा भर आहे तो विविध प्रसंगांद्वारे आपल्याशी संवाद साधण्याचा. उदाहरणार्थ- फुटबॉल खेळायचा नाही म्हटल्यावर गावातली मुलं मैदानात जमतात आणि नसलेल्या बॉलने खेळू लागतात. एक जण दुसऱ्याकडे पास करतो, दुसरा तिसऱ्याकडे... सगळे गोलपोस्टच्या दिशेने धावताहेत आणि गोलकीपरही उडी मारून गोल वाचवतोय. मधे-मधे पायांमुळे उडणारी धूळ हीच काय ती मुलांसाठी बॉलची निशाणी. हे दृश्य पाहताना अंगावर सरसरून काटा येतो आणि दिग्दर्शक आपलं म्हणणं प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यात यशस्वी होतो. 

आणखी एक दृश्य. सगळ्या बायकांनी हातमोजे घालणं आवश्यक आहे, असा फतवा काढला जातो. अतिरेकी गावात फिरत असताना मासे विकणारी बाई हातमोजे न घालता बसलेली त्यांना दिसते. ते चिडतात; तेव्हा  त्यांच्यापेक्षा दुप्पट चढ्या आवाजात ती त्यांना विचारते, ‘पाण्यातून मासे काय मी हातमोजे घातलेल्या हाताने काढू?’ आदेश किंवा फतवे काढणारे किती मूर्ख डोक्याचे असतात, हे जाणवून देण्यासाठी हा एक प्रसंग पुरेसा ठरतो. 

‘द सर्च’चा शेवट आशावादी आहे, तर ‘टिम्बक्टू’चा हताश करणारा. दिग्दर्शकाने इथल्या लोकांच्या आयुष्यातला रखरखीतपणा कॅमेऱ्यामध्ये सही-सही उतरवलाय. रणरणतं वाळवंट, मातीची घरं, छोट्या- छोट्या बोळांमधून फिरणाऱ्या मोटरसायकल्स, धूळ उडवत जाणाऱ्या जीप्स आणि सर्रास वापरात येणाऱ्या बंदुका. सिनेमाची प्रत्येक फ्रेम ओरडून आपल्याला एक अख्खं शहर नष्ट होताना कसं दिसतं, ते दाखवत राहते. 

तिसरा सिनेमा ‘चार्लीज कंट्री’. ऑस्ट्रेलियाने या वर्षी ऑस्करच्या परदेशी चित्रपटांच्या विभागासाठी आपल्या देशाची एन्ट्री म्हणून या सिनेमाची निवड केलेली आहे. दिग्दर्शक रॉल्फ द हीर यांनी डेव्हिड गुलपिलील या चार्लीची भूमिका केलेल्या नटाबरोबर सिनेमाची कथा विकसित केली आहे. चार्ली हा ऑस्ट्रेलियातल्या उत्तरेमधल्या एका गावातला ॲबओरिजिनल, म्हणजे मूळ रहिवासी. पण विकासाच्या, कायदा-सुव्यवस्थेच्या नावाखाली या मूळ रहिवाशांच्या जीवनावर गोऱ्यांचं आक्रमण होऊ लागतं आणि चार्लीला ते जगणं असह्य होतं. आपल्या परंपरेशी तुटत चाललेलं नातं त्याला बंड करायला प्रवृत्त करतं. याचा अर्थ, तिथे आलेल्या गोऱ्या पोलिसांशी त्याचं वैर असतं, असं नाही. किंबहुना, सिनेमाच्या सुरुवातीलाच पोलीस चौकीच्या दारावरून चाललेला चार्ली आतल्या पोलीस अधिकाऱ्याला ओळखीची हाक मारतो, ‘यू व्हाईट बास्टर्ड!’ आणि प्रत्युत्तर येतं, ‘यू ब्लॅक बास्टर्ड!’ एकमेकांचा अपमान करण्याचा दोघांचाही इरादा नाही. उलट, नंतरच्या प्रसंगांमध्ये चार्ली या पोलिसांना गुन्हे शोधण्यासाठी मदतही करताना दिसतो. पण त्याचा सगळा अट्टहास आपल्या मुळांकडे परत जाण्यासाठी आहे. आपलं नृत्य, आपली जीवनशैली त्याला परत हवीये; पुढच्या पिढीपर्यंत ती पोचवायचीये. शिकारीसाठीचं त्याच्या मित्राचं पिस्तुल पोलीस काढून घेतात, तेव्हा तो फांदीपासून भाला बनवतो. शस्त्र बाळगायचं नाही, या नियमामुळे तेही त्याच्याकडून हस्तगत केलं जातं. चार्ली हताश होऊन आपल्या मित्राला म्हणतो, ‘आपण शिकारी आहोत, हे यांना कसं समजत नाही?’

एक दिवस वैतागून चार्ली जंगलात निघून जातो. तिथे, शहरी होत चाललेल्या संस्कृतीपासून दूर जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात जगायचं, असं ठरवतो. मासे पकडून ते शेकोटीवर शिजवायचे. एक छोटंसं खोपटं बांधून त्यात राहायचं. सोबतीला बिअर मात्र हवी. पण मग धो-धो पाऊस त्याला असं जगणं नको करून टाकतो आणि चार्लीला पुन्हा आपल्या गावात परतावं लागतं. म्हटलं तर चार्लीचं हे वाटणं वैश्विक आहे. आदिवासींचा विकास म्हणजे नेमकं काय, हा वाद आपल्याकडेही होतोच. शहरातल्या लोकांना वाटतो तोच विकास असतो का? आदिवासींचं शिक्षण म्हणजे एबीसी  किंवा अआइ हेच असायला हवं का? त्यांची बाराखडी वेगळी नसते का? त्यांना नेमकं काय शिकवायला हवं? इतिहास-भूगोलाची माहिती त्यांच्या उपयोगाची असते का? विकास म्हणजे आरोग्याची जाणीवसुद्धा. आणि त्यासाठी हॉस्पिटल्स तर हवीतच ना? यातला सुवर्णमध्य नेमका कसा साधायचा? प्रश्न अनेक आहेत आणि त्याला ‘हो’ किंवा ‘नाही’ असं थेट उत्तर नाही. 

‘चार्लीज कंट्री’ हे प्रश्न आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करतो. आपल्याला सगळी उत्तरं समजली आहेत, असा दिग्दर्शकाचा दावा नाही; पण ही गोष्ट एका चार्लीचा स्वत:शी आणि बाहेरून आलेल्यांशी चाललेला झगडा निश्चितच दाखवते. 

चौथा सिनेमा रशियाचा ‘लेव्हियाथन.’ ओल्ड टेस्टामेंटमधल्या एका कथेचा आधार या गोष्टीला आहे. उसळलेल्या समुद्रातल्या लेव्हियाथन व्हेल माशाचा उद्देशच मुळी बोट आणि त्यावरच्या माणसांना नष्ट करणं हा असतो. पोट भरल्यानंतर हा व्हेल समुद्रात लुप्त होतो, मागे राहिलेल्यांसाठी परतीचा कोणताही मार्ग न ठेवता. 

आंद्रे झव्यॅगिन्तसेव या दिग्दर्शकाच्या या सिनेमाची गोष्ट उत्तर रशियातल्या एका छोट्या शहरात राहणाऱ्या कोल्याची असली तरी त्याचाही विषय वैश्विक आहे. कोल्याची जमीन शहराच्या भ्रष्ट मेयरला हवीये. तिथे बिल्डर्सच्या साह्याने मोठं हॉटेल बांधण्याची योजना आहे. सुरुवातीला तो कोल्याला पैशाचं आमिष दाखवतो. त्याचा उपयोग होत नाही, असं पाहून बळाचा वापर करतो. पण ही जमीन म्हणजे केवळ एक तुकडा नाही; तर आपण लहानपणापासून जसे वाढलो-जगलो त्याचं प्रतीक आहे, असं कोल्याचं ठाम म्हणणं असतं. त्याच्या या लढ्यात त्याची बायको त्याच्याबरोबर आहे. शहरातून आलेला त्याचा वकील मित्रही आहे आणि काही स्थानिक मित्र-मैत्रिणीही आहेत. पण कोल्याची लढाई सोपी नाही, कारण ती संपूर्ण व्यवस्थेशीच आहे. मेयर हा त्याचा एक भाग आहे आणि त्याच्या आजूबाजूचे त्याचे मित्र-मैत्रिणीही. कोल्या जिंकण्याची मुळी शक्यताच नाही. 

पण म्हणून दिग्दर्शक फक्त या शोकांतिकेवरच अडून राहत नाही. कोल्याची गोष्ट सांगता-सांगता तो राजकीय कॉमेंटही करतो. कोल्या आणि त्याचे मित्र आपल्या कुटुंबीयांसह पिकनिकला जातात. पुरुषांनी शूटिंग करायचं आणि बायकांनी (अर्थातच) स्वयंपाकाची तयारी करायची. पुरुषमंडळी समोर ठेवलेल्या बिअरच्या बाटल्यांचा वेध घेण्याचा खेळ सुरू करतात. आणि त्या संपतात तसा पार्टी देणारा मित्र म्हणतो, ‘काळजी करू नका, मी खूप टार्गेट्‌स घेऊन आलोय.’ आणि बॅगेतून आपल्या एकेका नेत्याच्या फोटोफ्रेम्स काढू लागतो. यात रशियाचे सगळे जुने नेते आहेत. पुतिन का नाहीत, असं विचारल्यावर म्हणतो, ‘अजून ते इतिहासजमा झालेले नाहीत ना!’ 

मेयरच्या ऑफिसमध्ये पुतिन यांचा फोटो टांगलाय आणि मेयर व त्याचे सहकारी आपापल्या भ्रष्टाचाराची चर्चा करताहेत, असंही एक दृश्य सिनेमात दिसतं. मात्र हा सिनेमा मोठ्या उंचीवर जातो तो त्यातल्या शेवटच्या धर्मगुरूच्या भाषणामुळे. समाजातला विरोधाभास, व्यवस्थेपुढे शरण जाणं आणि लालची माणसांचा दुटप्पीपणा या सगळ्या गोष्टींची झलक आपल्याला दिसते. 

गोव्याच्या महोत्सवामध्ये या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा सुवर्ण मयूर पुरस्कार मिळाला. मला आवडलेल्या पहिल्या चार सिनेमांची ही थोडक्यात ओळख. हे सिनेमे असोत किंवा क्युबा, लात्विया यांसारख्या छोट्या-छोट्या देशांमधले सिनेमे असोत; एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. प्रत्येक महोत्सवामध्ये जाणवते. दिग्दर्शक आपल्याला भावलेली गोष्ट सांगताना भोवतालच्या समाजावर भाष्य करत असतात. राजकीय भूमिका घेत असतात. महोत्सवामध्ये येणारे सिनेमे त्या देशातले मुख्य प्रवाहातले सिनेमे असतील असं नाही. किंबहुना, नसणारच. पण आपल्याकडे होणाऱ्या समांतर हिंदी किंवा मराठी सिनेमांमध्ये हे का दिसत नाही? भूमिका घेणं तर सोडाच, पण काही अगदी थोडके अपवाद वगळता आपल्या सिनेमांमध्ये जराही राजकीय जाणीवच दिसत नाही; असं का? जगातली सर्वांत मोठी लोकशाही म्हणून आपण अभिमानाने मिरवतो; पण या बाबतीत आपले कलाकार कुठे कमी पडतात का? सत्तेशी पंगा न घेण्याचा आपला स्वभाव आहे का? प्रश्न अनेक आहेत. आपल्या निर्माता-दिग्दर्शकांनी याचाही थोडा विचार करायला हरकत नाही. 

Tags: ऑस्कर गोवा फिल्म महोत्सव सिनेमा अब्दर्रहमाने सिसॅको टिम्बक्टू मायकेल हॅझॅनाव्हिशुस द सर्च रॉल्फ द हीर चार्लीज कंट्री आंद्रे झव्यॅगिन्तसेव लेव्हियाथन मीना कर्णिक Timbktu Oscar The Artist Goa Film Festival Cinema Michel Hazanavicius Abderrahmane Sissako The Search Rolf De Heer Charlis Country Andrey Zvyagintsev Leviathan Meena Karnik weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात