Diwali_4 कशाला जायचं एवढ्या लांब?
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

फ्रान्समधल्या कान शहरात दर वर्षी मे महिन्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरतो. या वर्षीचं हे 69वं वर्षं. जगातला हा पहिल्या क्रमांकाचा चित्रपट महोत्सव मानला जातो. काय आहेत त्यामागची कारणं? कसा असेल या वर्षीचा महोत्सव? प्रत्यक्ष तिथे जाण्यामध्ये कसलं आलंय एवढं थ्रिल? या सगळ्याचा वेध घेणारी ही लेखमाला. थेट कानहून...  

उजव्या बाजूला कानचा निळाशार समुद्रकिनारा आणि डाव्या बाजूला चित्रपट महोत्सवाचं भलं मोठं आवार. माझ्यासारख्या मुंबईकराला किंचित शहारा आणणारी 15 डिग्रीची थंडी आणि अकरा दिवसांची जागतिक सिनेमाची मेजवानी. स्वर्ग-स्वर्ग म्हणतात तो आणखी काय वेगळा असणार! सातत्याने, गेली दहा-बारा वर्षं प्रत्येक वर्षाला किमान दोन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांना हजेरी लावल्यानंतरही फ्रान्सच्या कान चित्रपट महोत्सवाला जाण्याचं थ्रिल ‘या वर्षी जावं का?’ हा विचार मनात आल्या क्षणापासून जाणवत होतं. मग पत्रकार म्हणून ॲक्रिडिटेशन मिळवण्यासाठी अर्ज करणं आलं, तिथून होकार आल्यानंतर बाकीची तयारी सुरू झाली आणि पाहता-पाहता जायची वेळ आली. कानविषयी आजवर ऐकलेलं, वाचलेलं सगळं प्रत्यक्ष अनुभवण्याची वेळ. कानला एवढं महत्त्व का मिळतं, हे जाणून घेण्याची वेळ.

कानचं रेड कार्पेट, तिथे येणारे हॉलिवुडपासून हिंदी चित्रपटसृष्टीतले स्टार्स, त्यातलं ग्लॅमर यामुळे आपल्याकडे कानविषयी बोललं- लिहिलं- वाचलं जाऊ लागलं असलं, तरी हे काही कानचं वैशिष्ट्य नाही. या महोत्सवामध्ये निवडले जाणारे सिनेमे हे केवळ गुणवत्तेच्या आधारे निवडले जात असल्यामुळे ‘आपला सिनेमा कानला दाखवला गेला,’ असं निर्माते- दिग्दर्शक अभिमानाने सांगतात, कानमध्ये स्पर्धेतला सर्वोच्च सन्मान ‘पाम ए दोअ’ (गोल्डन पाम) मिळवण्याचं स्वप्न बघतात आणि तेच कानचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य आहे. गोव्यात नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (इफ्फीमध्ये) एखाद्या सिनेमाची चर्चा आहे असं म्हटलं जातं, तेव्हा हटकून ‘कानला या सिनेमाचं खूप कौतुक झालं होतं’ किंवा ‘कानला या सिनेमाविषयी दोन टोकाची मतं होती’ अशासारखा उल्लेख होतो.

थोडक्यात, कानमध्ये काही तरी करून दाखवलेलं असेल तर तो सिनेमा (आवडो किंवा न आवडो) बघायला हवाच, असा एक सर्वसाधारण सूर असतो. ‘‘याचं कारण या महोत्सवामध्ये गुणवत्तेशी तडजोड कधीही होत नाही,’’ डॉ.जब्बार पटेल म्हणतात. ‘‘बर्लिनच्या महोत्सवालाही मोठा मान आहे. तिथेही उत्तमोत्तम सिनेमे सादर केले जातात. तिथेही अभ्यासपूर्ण चर्चा होतात. तेही आपल्या महोत्सवामध्ये ग्लॅमर आणायचा प्रयत्न करताहेत. पण तरीही कानला एक वेगळा दर्जा आहे. याचं कारण केवळ इथलं ग्लॅमर आणि झगमगाट हे नाही. चांगल्या सिनेमांबरोबरच कानला एक रोमँटिक  किनारही आहे. जर्मनांच्या स्वभावातच एक कोरडेपणा असल्याने त्यांच्या महोत्सवामध्ये ती सापडत नाही आणि फ्रेंचमंडळींमध्ये ती दिसल्याशिवाय रहात नाही.’’

खरं तर हा काही सर्वांत जुना महोत्सव नाही. इटलीमधला व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा सगळ्यात जुना, म्हणजे 1932 मध्ये सुरू झाला. त्यानंतर तीन वर्षांनी मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली. इटलीबरोबरच्या स्पर्धेतून कान चित्रपट महोत्सवाची बीजं रोवली गेली. खरं तर 1939मध्येच लुई लुमिए यांच्या अध्यक्षतेखाली हा महोत्सव सुरू व्हायचा होता. पण दुसऱ्या महायुद्धामुळे ते शक्य झालं नाही आणि मग युद्ध संपल्यानंतर, 1946मध्ये पहिला-वहिला आंतरराष्ट्रीय कान चित्रपट महोत्सव सुरू झाला ज्यात 16 देशांमधले सिनेमे दाखवले गेले होते. प्रसारमाध्यमांनी दिलेली प्रसिद्धी, रेड कार्पेटवर जगभरातल्या स्टार्सनी लावलेली हजेरी यामुळे हा महोत्सव झपाट्याने लोकप्रिय झाला आणि पाहता-पाहता जगातला पहिल्या क्रमांकाचा महोत्सव म्हणून ओळखला जाऊ लागला. स्वाभाविकच, दर वर्षी नाही, पण निदान एकदा तरी कानला जाऊन येणं हे कुणाही चित्रपटप्रेमी व्यक्तीच्या ‘बकेट लिस्ट’मध्ये निश्चितच असतं.

भारताच्या बाहेर या आधी रॉटरडॅम आणि बर्लिनाले या दोन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांना मी जाऊन आलेय. इफ्फीला गेली दहा बारा वर्षं न चुकता जातेय. पण कानला पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या व्यावसायिकतेचा जो काही अनुभव आला, तो विलक्षण होता. ॲक्रिडिटेशन मिळाल्यानंतर त्यांच्या साईटवर पत्रकारांसाठी कोणकोणत्या सुविधा आहेत त्याची यादी होती. नीस या विमानतळावर उतरल्यानंतर तिथून कानला येण्यासाठी असलेल्या मोफत बससेवेचं कूपन होतं. कोणते फोटो कसे वापरायचे, याविषयीची माहिती होती. साधारण दहा-पंधरा दिवस आधीपासून वेगवेगळ्या पब्लिसिस्ट्‌सच्या ई-मेल्स येऊ लागल्या होत्या. अमुक-अमुक सिनेमांसाठी तुम्हाला मुलाखत हवी असेल तर तमुक-तमुक नंबरवर संपर्क साधा, असं सांगणाऱ्या. महोत्सवाविषयीची बारीक-सारीक माहिती देणाऱ्या. कानचं अधिकृत पोस्टर डाऊनलोड करायचं तर त्यासाठी लागणारा पासवर्ड पाठवणाऱ्या. गेल्या 68 वर्षांमध्ये महोत्सवामध्ये कोणकोणत्या सुधारणा  झाल्या, कोणकोणत्या नव्या स्पर्धा सुरू झाल्या आणि आपला महोत्सव कसा महत्त्वाचा आहे, हे अधोरेखित करणाऱ्या.

या वर्षीचा महोत्सव सुरू होतोय वुडी ॲलन यांच्या ‘कॅफे सोसायटी’ या सिनेमाने. सिनेमातला काळ आहे 1930चा. न्यूयॉर्कमध्ये राहणारा एक तरुण मुलगा सिनेमात काम मिळवण्यासाठी हॉलिवुडला येतो आणि काय घडतं, हे सांगणारी ही रोमँटिक कॉमेडी. स्पर्धेमध्ये स्पेनच्या पेद्रो अल्मादोवर या प्रसिद्ध दिग्दर्शकाचा ‘ज्युलिएटा’ नावाचा सिनेमा आहे, तर असगर फरहादींच्या ‘द सेल्समन’ या सिनेमाचीही निवड झालेली आहे. झेवियर दोलान, शॉन पेन हे दिग्दर्शकही पाम ए दोअ मिळवण्यासाठी स्पर्धेत आहेत. ‘आन्‌ सर्ते रिगा’ विभागात जपानी दिग्दर्शक हिरोकाझू कोरीडा (होय, अवर लिट्‌ल सिस्टर आणि लाईक फादर, लाईक सन या सिनेमांचे दिग्दर्शक) यांचा ‘आफ्टर द स्टॉर्म’ हा नवा सिनेमा आहे. ‘आऊट ऑफ कॉम्पिटिशन’ विभागात चारपैकी तीन सिनेमे अमेरिकन दिग्दर्शकांचे आहेत, ज्यात स्टीव्हन स्पीलबर्ग यांचा ‘द बीएफजी’ आणि जुडी फॉस्टर यांचा ‘मनी मॉन्स्टर’ या सिनेमांचा समावेश आहे. शॉर्ट फिल्म्सच्या विभागात सौरव राय या कोलकाताच्या सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याच्या ‘गूढ’ (द नेस्ट) या फिल्मची निवड झालीये. ‘रिंगण’, ‘हलाल’ आणि ‘वक्रतुंड महाकाय’ हे तीन मराठी सिनेमे कानला दाखवले जाणार असल्याचं वृत्त प्रसिद्ध झालंय. मात्र या सिनेमांचं व्यावसायिक स्क्रिनिंग होणार आहे, त्यांची निवड झालेली नाही. एकूणच भारताचं प्रतिनिधित्व या वर्षी जरा कमीच दिसतंय.

चांगले सिनेमे बघायला मिळण्याबरोबरच कानचा फिल्म बझारही चांगलाच मोठा असतो. आणि निर्मात्यांसाठी किंवा नव्या दिग्दर्शकांसाठी महत्त्वाचाही. जितेंद्र मिश्रा गेली पाच वर्षं सातत्याने कानच्या महोत्सवाला येताहेत. या वर्षीही ते इथे आले आहेत. स्वत:ची ओळख ते ‘प्रमोटर ऑफ गुड सिनेमा’ अशी करून देतात. लहान मुलांचे सिनेमे प्रमोट करणं हे त्यांचं काम. त्यामुळे इटलीच्या किंवा रॉटरडॅम, बर्लिन इथल्या महोत्सवांना तसंच टोरोन्टोच्या खास लहान मुलांच्या चित्रपटांसाठी असलेल्या महोत्सवाला ते आवर्जून जातात. अनेक परदेशी महोत्सवांना हजेरी लावल्यानंतर आपल्याला कानचं महत्त्व अधिकच जाणवू लागलंय, असं त्यांचंही म्हणणं आहे. ते सांगतात, ‘‘कानमध्ये फीचर फिल्मपासून ते डॉक्युमेंटरीजपर्यंत सर्व प्रकारच्या फिल्म्ससाठी विशेष वातावरण तयार झालंय. इथल्या मार्केटमध्ये सर्जनशीलतेबरोबरच व्यावसायिक चर्चाही होतात. निर्मात्यांचं एक नेटवर्क इथे बनवण्यात आलेलं आहे. दर वर्षी 500 निर्मात्यांची निवड केली जाते. या व्यासपीठावरून तुम्ही एकमेकांशी चर्चा करता, कोप्रॉडक्शनसाठी प्रयत्न करू शकता. प्रत्येकासाठी एक टेबल असतं. तुम्हाला एक तास दिलेला असतो. त्या वेळी खरेदीदार, वितरक, एजन्ट्‌स तिथे येऊन तुमचं म्हणणं ऐकतात.

गेल्या वर्षी इथेच मी एका प्रोजेक्टची सुरुवात करून दिली होती. दोन वर्षांपूर्वी मी प्रमोशनसाठी घेऊन आलेल्या सिनेमांसाठी काही तरी करू शकलो होतो. फंडिंग करणाऱ्यांशी भेट घडवून आपलं प्रोजेक्ट त्यांच्यासमोर सादर करू शकलो होतो. भारताबाहेरच्या- विशेषत: युरोपमधल्या फिल्म मेकर्सबरोबर या निमित्ताने विचारांची देवाण-घेवाण होते, मैत्री होते. दुसऱ्या कुठल्याही महोत्सवामधून मला एवढं सगळं मिळत नाही.’’ म्हणजे कानला येऊन कुठचा सिनेमा बघायचा यावर चर्चा करायची आहेच; पण केवळ सिनेमे बघायचे नाहीयेत, फिल्म बझारलाही भेट द्यायची आहे. पत्रकार परिषदा कव्हर करायच्या आहेत, लोकांशी बोलायचंय. हा महोत्सव हावरटासारखा अनुभवायचाय.

डॉ.जब्बार पटेल म्हणाले आहेत, ‘‘तू कितीही तयारी करून जा, हा महोत्सव तुला भारावून टाकेल.’’ भारावून जायची तयारी मी नक्की केलीये.

कानमध्ये भारतीय चित्रपट सन 1946 मध्ये कान चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली आणि त्याच वर्षी दिग्दर्शक केतन आनंद यांच्या ‘नीचा नगर’ या सिनेमाने ग्रां प्री (त्या वेळेला पाम ए दोअ नव्हतं. स्पर्धेतल्या सर्वोत्कृष्ट सिनेमाला ग्रां प्री दिलं जायचं) पटकावलं होतं. डेव्हिड लीन यांच्या ‘ब्रीफ एन्काऊन्टर्स’ या सिनेमाच्या बरोबर चेतन आनंद यांना हा पुरस्कार मिळाला होता. ‘नीचा नगर’मध्ये कामिनी कौशल आणि झोहरा सेहगल यांच्या भूमिका होत्या. 1952मध्ये व्ही. शांताराम यांच्या ‘अमर भूपाळी’ या सिनेमाला नामांकन मिळालं होतं, पण पुरस्कार मिळाला तो सर्वोत्तम साऊंड रेकॉर्डिंगचा.

1954मध्ये बिमल रॉय यांच्या ‘दो बिघा जमीन’ला प्री इन्तरनॅशने पुरस्कार दिला गेला, तर पुढच्याच वर्षी त्यांच्या ‘बिराज बहू’चं आणि राज कपूर यांच्या ‘बूट पॉलिश’ या सिनेमांचं स्क्रिनिंग कानला झालं. बेबी नाझला ‘बूट पॉलिश’मधल्या तिच्या भूमिकेसाठी विशेष पुरस्कारही दिला गेला होता. सत्यजित रे यांना 1956 मध्ये ‘पथेर पांचाली’साठी बेस्ट ह्युमन डॉक्युमेंटेशकरता पाम ए दोअ दिलं गेलं. 1957मध्ये राजबन्स खन्ना यांच्या ‘गोतोमा- द बुद्धा’ या डॉक्युमेंटरीला ज्युरीचा पुरस्कार मिळाला. त्यानंतरचा बराच काळ भारतीय सिनेमाला पुरस्कारांपासून दूर राहावं लागलं असलं, तरी भारतीय सिनेमे मात्र कान महोत्सवामध्ये नियमितपणे दाखवले जात होते. सत्यजित रे यांचा ‘देवी’, ख्वाजा अहमद अब्बास यांचा ‘परदेसी’, बिमल रॉय यांचा ‘सुजाता’, मोनी भट्टाचारजी यांचा ‘मुझे जीने दो’, एम. एस. सत्थ्यू यांचा ‘गर्म हवा’, श्याम बेनेगल यांचा ‘निशांत’ आणि मृणाल सेन यांचा ‘एक दिन प्रतिदिन’ या काळात कानमध्ये दाखवले गेले.

मृणाल सेन यांचा ‘खंडहर’ आन सर्ते रिगा विभागाच्या स्पर्धेत निवडला गेला होता. याच विभागात 1988मध्ये गौतम घोष यांचा ‘आंतरजली जत्रा’ व मीरा नायर यांचा ‘सलाम बॉम्बे’ दाखवले गेले आणि त्यांना कॅमेरा द ऑ व प्रेक्षकांच्या पसंतीचा पुरस्कार मिळाला. 1989 मध्ये शाजी करुण यांच्या ‘पिरावी’चा विशेष उल्लेख करण्यात आला आणि सत्यजित रे यांचा ‘गणशत्रू’ दाखवला गेला. 1991 मध्ये मणिपुरी दिग्दर्शक अरिबम स्याम शर्मा यांचा ‘इशनवू’ आन सर्ते रिगामध्ये दाखवला गेला. याच विभागात 1994 मध्ये शाजी करुण यांचा ‘स्वहम’ आणि संदीप रे यांचा ‘उतोरन’ दाखवले गेले. त्याच्या पुढच्या वर्षी ‘इंद्रधनुरा छाई’ यांच्या ओरिया सिनेमाने मुख्य स्पर्धेत सहभागी होण्याचा मान पटकावला. दीपा मेहता यांचा ‘सॅम अँड मी’ (मात्र हा सिनेमा कॅनेडियन सिनेमा म्हणून सादर झाला होता), आसिफ कपाडिया यांची शॉर्ट फिल्म ‘द शीप थीफ’, गौतम घोष यांचा ‘गुडिया’, शाजी करुण यांचा ‘वानप्रस्थाश्रम’, मुरली नायर यांचा ‘मराना सिम्हासनम’ यांनी कानला हजेरी लावून पारितोषिकंही पटकावली.  

मनीष झा यांच्या ‘अ व्हेरी व्हेरी सायलेंट फिल्म’ या शॉर्ट फिल्मला 2002 मध्ये ज्युरीचा पुरस्कार मिळाला. त्याच वर्षी हिंदी चित्रपटसृष्टीतल्या मुख्य प्रवाहातल्या सिनेमाने संजय लीला भन्साळी यांच्या ‘देवदास’च्या रूपाने आपलीही हजेरी कानला लावली. 2003 मध्ये मुरली नायर यांचा ‘अरिमपरा’ आणि 2010 मध्ये विक्रमादित्य मोटवाने यांचा ‘उडान’ कानमध्ये दिसला. 2012 मध्ये तीन भारतीय सिनेमे कानला होते. अशीम अहलुवालिया यांचा ‘मिस लव्हली’, अनुराग कश्यप यांचे ‘गँग्ज ऑफ वासेपूर’चे दोन्ही भाग आणि वासन बाला यांचा ‘पेडलर्स’ हे ते सिनेमे होय. 2013मध्ये अमिताभ बच्चन यांनी महोत्सवाचं उद्‌घाटन केलं. त्यांची छोटीशी भूमिका असलेला ‘द ग्रेट गॅटस्बी’ महोत्सवामध्ये होता. ‘बॉम्बे टॉकीज’ व अमित कुमार यांचा ‘मॉन्सून शूटआऊट’ तसंच ‘लंचबॉक्स’ याच वर्षी दाखवले गेले आणि कानच्या क्लासिक्समध्ये सत्यजित राय यांचा ‘चारुलता’ही पाहायला मिळाला. 2014 मध्ये कनू बहल यांचा ‘तितली’ झाला. 2015 मध्ये नीरज घेवान यांचा ‘मसान’ आणि गुरविंदर सिंग यांचा पंजाबी सिनेमा ‘चौथी कूट’ कानला दिसले.

Tags: फ्रेंच लघुपट आंतरराष्ट्रीय चित्रपट चित्रपट चित्रपट महोत्सव कान फेस्टिव्हल मीना कर्णिक French International Films Cinema Films Kaan Festival Meena Karnik weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात