Diwali_4 माजिद मजिदींनी केली सपशेल निराशा
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

इफ्फीमधल्या सिनेमांविषयीच्या मालिकेतला हा शेवटचा लेख- महोत्सवामधल्या मी पाहिलेल्या सर्वांत वाईट सिनेमाविषयी. पण त्याबद्दल लिहिणं आवश्यक आहे, कारण या सिनेमाने महोत्सवाचं उद्‌घाटन झालं आणि तो प्रसिद्ध इराणी दिग्दर्शक माजिद मजिदी यांनी भारतात येऊन बनवलेला सिनेमा होता- त्या बियाँड द क्लाऊड्‌सविषयी...

माजिद मजिदी यांच्यासारख्या इराणी दिग्दर्शकाचा भारतीय सिनेमा इफ्फीमध्ये उद्‌घाटनासाठी असणं, हे ‘मेक इन इंडिया’चं उत्तम उदाहरण आहे- महोत्सव संचालक सुनीत टंडन यांनी व्यासपीठावरून म्हटलं आणि कला अकादमीच्या सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. समोर प्रत्यक्ष मजिदी उभे होते. त्यांच्या बाजूला ‘बियाँड द क्लाऊड्‌स’ या त्यांच्या सिनेमातले कलावंत होते. संगीत दिग्दर्शक ए.आर. रेहमान होते आणि या सिनेमाचे संवाद ज्यांनी हिंदीत लिहिले आहेत, ते विशाल भारद्वाजही होते. चित्रपटक्षेत्रातली एकापेक्षा एक तगडी माणसं आपला सिनेमा पेश करण्यासाठी उभी होती आणि त्याबरोबरच सिनेमाविषयीच्या आशा वाढवतही होती.

थिएटरमधले अनेक जण तर ‘हा सिनेमा उच्च दर्जाचा असणार आहे आणि तो आपल्याला आवडणारच आहे’, असं मानून चालले होते. थिएटर गच्च भरलं होतं. महोत्सवाची सुरुवात आपण एक उत्कृष्ट कलाकृती पाहून करणार आहोत, हाच विचार सगळ्यांच्या मनात होता. दुर्दैवाने सिनेमा संपला तेव्हा घोर निराशेखेरीज दुसरी कोणतीही भावना मनात नव्हती. हा सिनेमा ना धड माजिदींच्या सिनेमासारखा होता, ना धड टिपिकल व्यावसायिक हिंदी सिनेमांच्या पठडीतला होता. लेखक- दिग्दर्शक माजिदींना हा देश माहीत नसल्याचा, इथला इतिहास-भूगोल ठाऊक नसल्याचा पुरावा या सिनेमातून पदोपदी मिळत होता. नवल याचं वाटत होतं की, विशाल भारद्वाजसारख्या सरस दिग्दर्शकाने संवाद लिहीत असताना यातल्या काही ढोबळ चुका दिग्दर्शकाला दाखवून का दिल्या नाहीत? पण त्या चुकांविषयी नंतर.

‘बियाँड द क्लाऊड्‌स’ ही गोष्ट आहे एका भावाची आणि एका बहिणीची. आमीर (इशान खट्टर) ड्रग्जची देवाण-घेवाण करून पैसे कमावतोय, हे पहिल्याच दृश्यात दिग्दर्शक आपल्याला सांगतो. तो धाडसी आहे, बेपर्वा आहे, एकटा राहत असल्यामुळे बेफिकीर आहे. मात्र त्याला झटपट पैसे कमावून श्रीमंत व्हायचंय. त्यासाठी काहीही करायची त्याची तयारी आहे. आमीरच्या निमित्ताने दिग्दर्शक आपल्याला मुंबईतल्या झोपडपट्टीची सैर करवतो. वेश्यावस्तीत नेतो. तिथे मुलींची खरेदी-विक्री करणाऱ्या गुंडाला टशन देणारा नायक दाखवतो. एका पडीक इमारतीत पोलिसांबरोबरचा पाठलाग चित्रित करतो. पण हे सगळं चकचकीत, खोटं- खोटं वाटत राहतं. अनिल मेहतांसारखा कॅमेरामन  असल्यामुळे पडद्यावर जे दिसतं, त्यात सौंदर्यदृष्टी जाणवत राहते. पण त्यामुळेच ती गरिबी अंगावर येण्याऐवजी फिल्मी असल्याचं वाटत राहतं.

पोलिसांचा ससेमिरा चुकवून आमीर थेट धोबीघाटावर येतो. तो नेमका कुठून कुठे पळतो, हे आपल्याला कळत नाही; पण ते असो. इथे त्याची बहीण तारा (मालविका मोहनन) काम करतेय. ताराच्या नवऱ्याच्या जाचाला कंटाळूनच अगदी लहान वयात आमीरने घर सोडलेलं असल्यामुळे आणि ताराने तेव्हा त्याला न थांबवल्यामुळे त्याच्या मनात ताराविषयी राग आहे. ताराचा बॉस आक्षी हा आमीरला लपायला मदत करतो आणि बदल्यात ताराकडून शारीरिक सुखाची अपेक्षा करतो. स्वत:चा बचाव करण्यासाठी तारा त्याच्या डोक्यात दगड घालते आणि पोलीस तिला पकडून नेतात.

धोबीघाटावर वाळत घातलेले कपडे, त्या कपड्यांच्या रांगांमधून ताराचं आक्षीला चुकवणं आणि मग त्याच्या डोक्यात दगड घातल्यानंतर कपड्यांवर रक्त उडणं हा संपूर्ण सिक्वेन्स पडद्यावर एखाद्या चित्रासारखा दिसतो. सुरेख, अगदी हवे तिथे हवे ते रंग टाकून तयार झालेलं चित्र. फक्त त्यात जीव नाही. प्रेक्षकांना काय बघायला आवडेल, कोणती रंगसंगती इथे योग्य वाटेल याचा विचार करून हे चित्र तयार झालंय; दिग्दर्शकाच्या हृदयातून ते उमटलेलं नाही. ही गोष्ट नंतर सिनेमा पाहताना सतत लक्षात येत राहते आणि आपणही त्यात भावनिक दृष्ट्या गुंतण्याचं थांबतो. कारण समोर जे चाललंय त्यातलं काहीही खरं नाही, हे जणू काही दिग्दर्शकाने एव्हाना आपल्याला सांगून टाकलेलं आहे.

ताराला पोलीस पकडून नेतात, कोर्टात उभं करतात, तुरुंगात डांबतात. तिच्यावरचा खुनाचा आरोप खोडून काढायचा तर आक्षीला जिवंत ठेवणं आणि आपण बलात्काराचा प्रयत्न केला हे त्याच्याकडून वदवून घेणं, एवढा एकच उपाय आमीरसमोर उरतो. हॉस्पिटलमध्ये असलेल्या आक्षीचा मग तो रखवालदार बनतो. त्याच्यासाठी औषधं आणतो. मात्र हे करत असताना शुद्धीवर आलेल्या आक्षीवर दहशत गाजवायलाही कमी करत नाही. ताराच्या तुरुंगवारीच्या निमित्ताने दिग्दर्शक मग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या बायका दाखवतो. ताराच्या खोलीतली नवऱ्याचा खून केलेली बाई आपल्या लहानग्या मुलाबरोबर तिथे आहे. या मुलाचा जन्मच तुरुंगात झाल्यामुळे त्याने बाहेरचं जगच बघितलेलं नाही.

इथे आक्षीचं कुटुंब गावाहून मुंबईला येतं. त्याची आई आणि त्याच्या दोन मुली. त्यांना मुंबईत घर नाही म्हणून त्या आमीरच्याच घरी येतात. आधी त्यांना हाकलून लावणारा आमीर मग त्यांना घरात थारा देतो. अरे हो, हे घर ताराने पैसे जमवून घेतलेलं आहे. मुंबईसारख्या शहरात एक मजली घर घेणारी तारा अर्थातच गरीब आहे. बरं, या घरात इतर खोल्या असतानाही आमीर बेडरूममध्ये दोरी बांधून, त्यावर चादर टाकून पलीकडे या तिघींना झोपायला जागा देतो. भिजलेल्या तरुण मुलीला पडद्याच्या सावलीत कपडे बदलताना दाखवणं हे अर्थातच दिग्दर्शकाला एक्झॉटिक वाटलं असणार. आकाशात ढगांच्या आडून डोकावणाऱ्या चंद्रामध्ये आपली आई शोधणारा आमीर, विजांच्या गडगडाटासह पडणारा पाऊस, या पावसाळ्यात मधेच येणारी होळी आणि त्या निमित्ताने होणारी रंगांची उधळणं हे पाहताना त्यातला कृत्रिमपणा आपण नजरेआड करूच शकत नाही.

भूगोलाच्या चुका तर विचारूच नका. व्हीटीहून निघालेला आमीर मधेच कबुतरखान्यापाशी दिसतो, मग रिक्षातून जाताना दिसतो, नंतर कधी तरी ट्रेनने प्रवास करतो, पुढच्या एका दृश्यात ओहोटी आलेल्या समुद्रकिनाऱ्यावर चिखलात लोळत मार खातो, आक्षीच्या मुलीला वेश्या म्हणून विकण्यासाठी जेट्टीने जातो... अर्थात, एरवी सिनेमा चांगला असता, तर या चुका काही फार महत्त्वाच्या ठरल्या  नसत्या. पण सिनेमात असा एकही क्षण येत नाही जेव्हा आपण आपल्या व्यक्तिरेखांच्या आयुष्यात गुंतून जातो, त्यांचं दु:ख आपलं वाटून हळहळतो, त्यांच्या असहायपणामुळे निराश होतो, त्यांच्या छोट्या-छोट्या आनंदात हसतो. या सगळ्याचा परिणाम म्हणून ए.आर. रेहमानचं संगीतही प्रभाव टाकत नाही. आणि सिनेमाचा भाग बनून जाण्याऐवजी अनिल मेहतांच्या अप्रतिम छायाचित्रणाची वेगळी जाणीव सतत होत राहाते.

माजिद मजिदींना व्यावसायिक हिंदी सिनेमांच्या जगात प्रवेश मिळवायचाय की काय, असा विचारही ‘बियाँड द क्लाऊड्‌स’ पाहताना आल्याशिवाय राहत नाही. ताराची भूमिका करणाऱ्या मालविका मोहननची निवड माजिदींनी दीपिका पदुकोनला डावलून केली होती. पण तिचा अभिनय अजिबात नैसर्गिक नाही. इशान खट्टरने मात्र ही पहिलीच भूमिका अतिशय आत्मविश्वासाने साकारली आहे. तो दिसतो देखणा आणि त्याचा वावरही सहज आहे. आमीरच्या व्यक्तिरेखेशी तो पूर्णपणे एकरूप झाल्यासारखा वाटतो. दुर्दैवाने त्या व्यक्तिरेखेला कोणतेही कंगोरे देण्यात दिग्दर्शक यशस्वी झालेला नाही. तसे ते कोणत्याच व्यक्तिरेखेला नाहीत. सगळं कसं अगदी टिपिकल, एका सरळ रेषेत गेल्यासारखं, आखीव-रेखीव आणि खोटं.

‘चिल्ड्रन ऑफ हेवन’, ‘बरान’ किंवा ‘कलर्स ऑफ पॅरेडाईज’सारखे सिनेमे बनवणारे माजिद मजिदी आणि ‘बियाँड द क्लाऊड्‌स’ बनवणारे माजिद मजिदी यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. त्यांच्या त्या सिनेमांमध्ये एक हळुवारपणा होता, खरेपणा होता. तो भोवताल त्यांना माहीत असल्याचा परिणाम असेल कदाचित, पण ते सिनेमे थेट हृदयाला स्पर्श करणारे होते. ‘चिल्ड्रन ऑफ हेवन’ने तर भारतीय मनाला इतकी भुरळ घातली होती की, त्यावर आपल्या वर्तमानपत्रांमधून मोठमोठे लेख आलेले होते. इराणची ती ऑस्करची अधिकृत एन्ट्री होतीच, पण कुठल्याही आंतरराष्ट्रीय सिनेमाला मिळाली नसेल एवढी प्रसिद्धी आपल्याकडे ‘चिल्ड्रन ऑफ हेवन’ला मिळाली होती. त्या वर्षी सर्वोत्कृष्ट परदेशी सिनेमाचं ऑस्कर ‘लाईफ इज ब्युटिफुल’ या अप्रतिम सिनेमाला मिळाल्यामुळे ‘चिल्ड्रन ऑफ हेवन’चा पुरस्कार हुकला असला, तरी ऑस्कर नॉमिनेशन्सपर्यंत मजल मारणारा तो पहिला इराणी सिनेमा ठरला होता. त्यावर एक हिंदी सिनेमाही निघाला. माजिद मजिदी हे नाव इतर कोणाही आंतरराष्ट्रीय दिग्दर्शकापेक्षा सर्वसामान्यांना जास्त माहीत झालं.

‘कलर ऑफ पॅरडाईज’मध्येही एका लहान मुलाची गोष्ट होती. आंधळ्या मोहम्मदची. त्याच्या आंधळेपणाची लाज वाटणाऱ्या त्याच्या वडिलांची. त्याच्या दोन बहिणींचीही. त्या गोष्टीच्या पलीकडे जाऊ पाहणाऱ्या दिग्दर्शकाला सलाम करावासा वाटला होता. ‘बरान’ बघतानाही मजिदींची संवेदनशीलता प्रेक्षक म्हणून आपल्यापर्यंत ताकदीने पोचलेली होती. अफगाण निर्वासित, त्यांचं बेकायदा काम करणं, मुलाच्या वेशात काम करणारी रेहमत, सुरुवातीला तिच्यावर चिडणारा आणि ती मुलगी आहे हे कळल्यावर तिची काळजी घेणारा लतीफ... या गोष्टीतला भोवताल दिग्दर्शकाच्या जाणिवांचा भाग आहे, हे त्यातल्या बारकाव्यांमधून लक्षात येत होतं.

मला स्वत:ला त्यांचा ‘चिल्ड्रन ऑफ हेवन’च्या आधीचा ‘फादर’ हा सिनेमाही खूप आवडला होता. त्यातही चौदा वर्षांच्या मेहरुल्लाची कहाणी होती. शहरातून गावात आल्यानंतर आईने दुसरं लग्न केल्याचं कळल्यावर रागावलेला हा मुलगा आपल्या मृत वडिलांची जागा सावत्र वडिलांना देऊ मागत नाही. त्यांच्या घरी राहायला जात नाही. आपल्या दोन लहान बहिणींना पळवून आणतो. सावत्र वडिलांचं पिस्तुल घेऊन शहरात पळून जातो. वडील त्याला आपल्या मोटरसायकलवर बसवून गावाकडे आणतात आणि त्या प्रवासात दोघे एकमेकांच्या जवळ येतात. अगदी साधी, सरळ-सोपी गोष्ट. किंबहुना, हे साधेपण म्हणजेच मजिदींचं बलस्थान होतं. ते ज्या मुलांचं विश्व दाखवत होते, त्यांच्यासारखंच. मात्र, 2005 मध्ये आलेला त्यांचा ‘द विलो ट्री’ फार आवडला नसला तरी ‘द साँग ऑफ स्पॅरोज’ बरा होता. (त्यांचा 2015 मध्ये आलेला ‘मोहम्मद’ हा सिनेमा मी बघितलेला नाही. या सिनेमालाही ए.आर. रेहमानचं संगीत होतं). पण या दिग्दर्शकाचा जादूई स्पर्श हरवत चालल्यासारखं वाटत होतं. तरीही ‘बियाँड द क्लाऊड्‌स’सारखा तद्दन व्यावसायिक गणितं आखून केलेला सिनेमा ते करतील, असं कधीच वाटलं नाही. भारतातला आपला दुसरा सिनेमा करण्यासाठी माजिदी पुन्हा एकदा भारतात येणार आहेत. तो सिनेमा अधिक खरा असेल, अशी आशा आणि अपेक्षा करू.

Tags: beyond the clouds majid majidi maajid majindini keli sapshel nirasha cinema review review cinema mina karnik meena karnik iffi iffi 2017 weekly sadhana weekly sadhana 13 january 2018 sadhana saptahik बियाँड द क्लाऊड्‌स माजिद मजिदी माजिद मजिदींनी केली सपशेल निराशा सिनेमा परिक्षण सिनेमा मीना कर्णिक इफ्फी इफ्फी : 2017 साधना साधना साप्ताहिक 13 जानेवारी 2018 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात