Diwali_4 कॅपरनॉम : झेनची गोष्ट
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

या सिनेमाची जन्मकथा ऐकण्यासारखी आहे. या आधी नदीन यांनी दोन सिनेमे केलेत. ‘कॅरेमल’ (2007) आणि ‘व्हेअर डू वी गो नाऊ?’ (2011) ‘कॅरेमल’मध्ये बैरुतमधल्या एका ब्युटी पार्लरमध्ये जमलेल्या बायकांच्या कहाण्या आहेत. हलक्याफुलक्या पद्धतीने त्या आपल्यासमोर येतात. तर ‘व्हेअर डू वी गो नाऊ?’मध्ये एका मुसलमान आणि ख्रिश्चन गावातल्या बायका आपल्या पुरुषांनी एकमेकांविरुद्ध लढू नये म्हणून काय काय क्लृप्त्या लढवतात हे दाखवलंय. पुन्हा हलक्या-फुलक्या पद्धतीनेच. मग आता त्यांना हा असा सिनेमा का करावासा वाटला? एका मुलाखतीमध्ये नदीन यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलंय. त्या म्हणतात, ‘माझ्या अवतीभोवती दिसणाऱ्या या लहान मुलांच्या जगाविषयी मला बोलायचं होतं. आणि जसजसा मी अभ्यास करू लागले, लोकांना भेटू लागले, लहान मुलांशी बोलू लागले तसतशी मला या भयंकर समस्येची व्याप्ती जाणवू लागली

गोव्यात, पणजी इथे होणारा भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) संपल्या- नंतरही मनात काही सिनेमे रेंगाळत राहतात. एखादं दृश्य, एखादी व्यक्तिरेखा, एखादा संवाद... अशाच काही सोबत राहिलेल्या सिनेमांविषयी. क्रमश:

17 मे 2018.

‘कान’ चित्रपट महोत्सवामधल्या स्पर्धेतल्या सिनेमाचं स्क्रिनिंग संपलं तेव्हा संपूर्ण थिएटर टाळ्यांच्या कडकडाटाने भरून गेलं होतं. थोडीथोडकी नाही, तब्बल पंधरा मिनिटं. ‘मी बधीर झालो होतो. पूर्णपणे बधीर. हे असं स्टँडिंग ओव्हेशन मी कधीच पाहिलं नव्हतं. या संपूर्ण प्रवासातला हा सगळ्यात छान अनुभव होता,’ बारा वर्षांचा झेन अल राफिआ त्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाला. प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केलेल्या त्या सिनेमाचं नाव आहे, ‘कॅपरनॉम’. लेबनॉनच्या या सिनेमाच्या दिग्दर्शिका आहेत नदीन लबाकी. आणि झेनने त्यात प्रमुख भूमिका केलीये. कानमध्ये या सिनेमाला मानाचं पाम अ दोअर मिळालं नाही, पण खास ज्युरी पारितोषिकाने त्याला सन्मानित केलं गेलं. या वर्षीच्या इफीमधला मी पाहिलेल्या सिनेमांमधला हा सर्वोत्तम सिनेमा होता.

सिनेमाच्या सुरुवातीलाच आपल्याला दिसतो हातात बेड्या घातलेला बारा वर्षांचा झेन. कुणावर तरी खूनी हल्ला केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्याच्याच भाषेत सांगायचं तर, ‘ही इज अ सन ऑफ अ बिच.’ पण त्याला कोर्टात उभं करण्याचं तेवढंच एक कारण नाही. झेन न्यायाधिशांसमोर उभा आहे तो आपल्या आई-वडिलांवर त्याने ठोकलेल्या दाव्यामुळे. कोणता आरोप केलाय त्याने आपल्या आई- वडिलांवर? ‘मला जन्माला घातल्याचा,’ झेन न्यायाधीशांना सांगतो. आई-वडिलांकडून तुला काय हवंय असं विचारल्यावर, ‘यापुढे त्यांनी मुलांना जन्माला घालू नये,’ असं ठामपणे म्हणतो.

संपूर्ण सिनेमा आपण झेनच्या नजरेतून पाहतो. झेनचं कुटुंब बैरुतमधल्या एका पडक्या इमारतीत राहतंय. तुला किती भावंडं आहेत या प्रश्नावर झेनचं उत्तर आहे, ‘खूप.’ त्यांच्यासारखी बरीच कुटुंब तिथे वस्तीला आहेत. गरिबी आणि बकालपणा पावलापावलावर दिसतोय. सगळी लहान मुलं काही ना काही कामं करताहेत. खोट्या खोट्या बंदुकांनी खेळताहेत. शाळेत जाण्याचा प्रश्नच नाही. आणि आला दिवस ढकलताहेत. झेन आणि त्याच्यासारख्या त्याच्याएवढ्या मुलांचं बालपण केव्हाच हरवून गेलंय. भोवतालच्या जगाचं अकाली आलेलं हे भान झेनच्या डोळ्यांमध्ये आपल्याला सतत जाणवतंय.

झेनची मोठी बहीण सहार वयात येते आणि आई- वडील तिला विकून टाकतात. बहिणीला वाचवण्याचे झेनचे सगळे प्रयत्न फसतात. हताश होऊन तो घर सोडून निघतो आणि एका वेगळ्याच जगात जाऊन पोचतो. इथे त्याला भेटते इथोओपियाहून कामाच्या शोधात आलेली राहील. बेकायदेशीर मार्गाने लेबनॉनमध्ये आलेल्या या तरुण मुलीला एक वर्षांचा मुलगा आहे, योनास. राहीलपाशी स्वत:चं ओळखपत्र नाही, मग योनासच्या अस्तित्त्वाचा पुरावा कुठून असणार? त्यामुळे कामावर जाताना ती योनासला बॅगेत लपवून नेते. एका टॉयलेटमध्ये ती बॅग ठेवून येणाऱ्या बायकांना ते टॉयलेट चालत नाहीये असं खोटंच सांगते. काम करून, पैसे मिळवून, लाच देऊन कायदेशीर कागदपत्रं मिळवणं हे तिच्या आयुष्याचं ध्येय आहे.

अशातच एक दिवस संध्याकाळ उलटून गेली तरी राहील घरी येत नाही. दुसऱ्या दिवशीही नाही आणि आठवड्याभरानंतरही नाही. योनासची काळजी घेण्याची जबाबदारी झेनवर येते. खिशात पैसे नाहीत, काम  मिळण्याची शक्यता नाही. झेनला आता एका नव्या संघर्षाशी सामना करायचाय. आजूबाजूला वेगवेगळ्या देशांमधून आलेल्या निर्वासितांचा लोंढा आहे. यात सिरियाहून आलेले निर्वासित आहेत, तसेच इतर देशांमधून आलेलेही आहेत. आजूबाजूच्या या गजबजाटाचं सावट झेनवर पडलंय. एकूण झेनच्या आयुष्यात फक्त गोंधळ आहे. ‘कॅपरनॉम’चा अर्थच मुळी गोंधळ किंवा केऑस असा आहे. (इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात पॅलेस्टाईनमध्ये कॅपरनॉम नावाचं एक गाव होतं. पंधराशे लोकसंख्या असलेलं हे मासेमारीवर जगणारं गाव अकराव्या शतकापर्यंत अस्तित्त्वात होतं. क्फार नाहुम हे या गावाचं मूळ हिब्रू नाव. फ्रेंचमध्ये त्यावरून कॅफरनॉम हा शब्द तयार झाला. अव्यवस्थितपणे कोंबलेल्या वस्तू या अर्थी हा शब्द वापरला जाऊ लागला, मग गोंधळाची परिस्थिती, केऑस म्हणून आणि कालांतराने नरक म्हणून तो रुढ झाला.)

नदीन लबाकी यांच्या ‘कॅपरनॉम’मध्ये नरकासारखं झेनचं आयुष्य, त्यातली गुंतागुंत तर आपल्याला दिसतेच, पण त्याचबरोबर देशांमधल्या सीमा, त्या ओलांडून येणारी माणसं, त्यामुळे निर्माण झालेली सामाजिक स्थिती, त्यात हरवत चाललेलं माणूसपण असे कितीतरी स्तर सापडत राहतात. दिग्दर्शिकेने या सामाजिक-राजकीय परिस्थितीवर थेट विधान करायचं टाळलं असलं, तरी झेनच्या माध्यमातून गरिबांची आणि विशेषत: लहान मुलांची होरपळ तिने अतिशय परिणामकारपणे मांडली आहे. इतकी की काही वेळा डोळे भरून आल्यामुळे समोरचं दृश्य धूसर होऊन जातं. सहारला मासिक पाळी आलीये हे लक्षात आल्यावर आई-वडिलांपासून तिचं वयात येणं लपवण्यासाठी झेन दुकानातून सॅनिटरी नॅपकीन्स चोरतो, ते कसे वापरायचे हे तिला सांगतो हा प्रसंग तर अंगावर शहारा आणणारा आहे. योनासची भूक भागवण्यासाठीची झेनची धडपड घशात आवंढा आणणारी आहे. आणि तरीही, नदीन लबाकी मध्येमध्ये आपल्या चेहऱ्यावर हसू आणण्यातही यशस्वी झालेल्या आहेत.

राहीलची वाट बघून थकलेला झेन रडणाऱ्या योनासला आपल्या मांडीवर घेतो. वर्षाच्या योनासचा हात आपोआप आईच्या स्तनांचा वेध घेण्यासाठी झेनच्या छातीवर येतो आणि झेन त्याला, ‘इथे काय शोधतोयस तू?’ असं विचारतो तेव्हा आपल्यालाही गंमत वाटते.  किंवा, सिरियन निर्वासितांसाठी अन्नवाटप होत असल्याचं कळल्यावर झेन तिथे जायचं ठरवतो. त्यासाठी सिरियन उच्चारांमध्ये बोलण्याची प्रॅक्टिस करतो. कृष्णवर्णीय योनास आपला भाऊ आहे असं सांगताना, योनास पोटात असताना आईने खूप कॉफी प्यायली असं स्पष्टीकरण देतो. पदोपदी झगडा आहे, लहान असूनही मोठ्यांच्या जगात मोठ्यांसारखं वावरणं आहे, त्यामुळे डोळ्यांमध्ये एक केविलवाणेपण आलंय, पण तरीही झेनचं निरागस असणं या प्रसंगांमधून अधोरेखित होत राहतं. लहान मुलं समोरच्या व्यक्तीवर पटकन विश्वास टाकतात. अविश्वासाची नजर मिळते ती वय वाढल्यावर. अकाली प्रौढत्व आलेलं असलं तरी झेनने ते बाल्य अजून हरवलेलं नाही. म्हणूनच सिनेमाचा आशावादी शेवट मनाला दिलासा देतो.

इतके कंगोरे असणारी ही झेनची भूमिका झेन अल राफिआ या मुलाने इतक्या ताकदीने वठवली आहे की, त्याला बघून नदीन लबाकी यांना हा सिनेमा करावासा वाटला की काय असा विचार मनात येऊन जातो. हा खरा झेन मूळचा सिरियन आहे. सहासात वर्षांपूर्वी त्याचं संपूर्ण कुटुंब पळून बैरुतमध्ये आलं. वडील कचरा उचलण्याचं काम करतात, रस्त्यावर कॉफी विकतात, पार्किंग लॉटमध्ये गाड्यांची सफाई करतात. एका मुलाखतीमध्ये ते म्हणतात, ‘या जगातली सर्वात कठीण गोष्ट कोणती आहे माहितीये? तुमची मुलं तुमच्याकडे खायला केळी मागतात आणि आपल्याला तीही परवडत नसतात!’ स्वाभाविकच झेन शाळेत गेलेला नाही. या वयातच त्याच्यावरही छोटी-मोठी कामं करण्याची वेळ आलेली आहे. तोही लेबनॉनमध्ये बेकायदा नागरिक आहे. पण आता मात्र त्याचं आयुष्य बदललंय. झेनच्या डोळ्यांत एक प्रकारची दु:खाची झाक आहे. ती पाहूनच लबाकी यांना हा आपला झेन आहे असं वाटलं आणि त्यांनी त्याची निवड केली. सिनेमातल्या झेनसारखं आयुष्य जगलेलं असल्यामुळे ही भूमिका समजणं त्याला अवघड गेलं नाही असंही लबाकी यांनी म्हटलंय.

झेनही या नव्या कामावर खुश होता. तो म्हणतो, ‘सेटवरचे सगळे माझ्याशी प्रेमाने वागत होते. मला माणूस म्हणून वागवत होते. काम संपवून मी घरी यायचो तेव्हा खूप आनंदात असायचो. इतका की, उशीवर डोकं ठेवून गाढ झोपून जायचो. मला शाळेत जायला खूप आवडलं असतं. तिथे शिक्षण मिळतं, तिथे शांतता असते. तिथे लिहायला आणि वाचायला येतं. पण आता मी नॉर्वेला जाणार आहे. तिथल्या शाळेत शिकणार आहे. नवीन आयुष्य, अधिक चांगलं आयुष्य जगणार आहे.’ केवळ झेनच नाही, तर योनासचं काम करणाऱ्या छोट्या मुलीचे आई-वडीलही निर्वासित आहेत. प्रत्यक्ष शूटिंग चालू असताना तिच्या आईला डिपोर्ट करण्यात आलं होतं. सिनेमातल्या व्यक्तिरेखा रंगवणाऱ्या कलावंतांनी या आधी कधीही अभिनय केलेला नाही. किंबहुना, लबाकी आणि त्यांच्या टीमने बैरुतच्या बकाल वस्त्यांमध्ये फिरून त्यांची निवड केलेली आहे. या सिनेमाची जन्मकथा ऐकण्यासारखी आहे.

या आधी नदीन यांनी दोन सिनेमे केलेत. ‘कॅरेमल’ (2007) आणि ‘व्हेअर डू वी गो नाऊ?’ (2011) ‘कॅरेमल’मध्ये बैरुतमधल्या एका ब्युटी पार्लरमध्ये जमलेल्या बायकांच्या कहाण्या आहेत. हलक्याफुलक्या पद्धतीने त्या आपल्यासमोर येतात. तर ‘व्हेअर डू वी गो नाऊ?’मध्ये एका मुसलमान आणि ख्रिश्चन गावातल्या बायका आपल्या पुरुषांनी एकमेकांविरुद्ध लढू नये म्हणून काय काय क्लृप्त्या लढवतात हे दाखवलंय. पुन्हा हलक्या- फुलक्या पद्धतीनेच. मग आता त्यांना हा असा सिनेमा का करावासा वाटला? एका मुलाखतीमध्ये नदीन यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलंय. त्या म्हणतात, ‘माझ्या अवतीभोवती दिसणाऱ्या या लहान मुलांच्या जगाविषयी मला बोलायचं होतं. आणि जसजसा मी अभ्यास करू लागले, लोकांना भेटू लागले, लहान मुलांशी बोलू लागले तसतशी मला या भयंकर समस्येची व्याप्ती जाणवू लागली. यावर उपाय काय मला माहीत नाही, पण हजारो मुलं जन्माला येतात आणि त्यांच्याकडे बघायला कोणी नाही म्हणून मरूनही जातात. कोणी बाल्कनीतून खाली पडून, कोणी आणखी कशामुळे. चार वर्षं मी अशी फिरत होते. सज्ञान नसलेल्या मुलांच्या तुरुंगाला भेट देत होते, लहान मुलांच्या न्यायालयांमध्ये जात होते. या प्रश्नाविषयी आपण बोलायला हवं असं वाटलं. आणि त्या रागातून या सिनेमाची गोष्ट तयार झाली. मला भेटलेल्या बहुतेक मुलांनी ‘मी मेलो असतो/ असते तर बरं झालं असतं’ किंवा ‘जन्माला आल्याचा मला अजिबात आनंद नाहीये’ अशी उत्तरं दिलेली आहेत. ही मुलं कशा प्रकारचं आयुष्य  जगताहेत हे यावरून लक्षात येईल. या सिनेमाने माझं मलाच बदलून टाकलं. कारण मुळात हा सिनेमाच नाही, हे वास्तव आहे.’

आणि म्हणूनच तो खूप खरा वाटतो. ‘स्लमडॉग मिलिअनेअर’पेक्षा खूप जास्त प्रामाणिक वाटतो. रस्त्यावर ज्युस विकणारा झेन आणि त्याची भावंडं, मुलांना शाळेत घेऊन जाणाऱ्या गाडीकडे आशेने पाहणारा झेन, सतत शिव्या देणारा झेन किंवा मारामारी करणारा झेन आपल्या मनात घर करून राहतो. कॅमेऱ्याचं असणं विसरायला लावतो. या सिनेमाची आणखी एक भक्कम जमेची बाजू म्हणजे याचं एडिटिंग. एक क्षणही असा नाही जो गरजेचा नाही असं वाटतं. एक फ्रेमही अशी नाही जी आवश्यकतेपेक्षा जास्त रेंगाळते असं वाटतं. पण हे कामही खूप कठीण होतं. लबाकी यांनी केलेलं चित्रीकरण तब्बल बारा तासांचं होतं. त्यातून संकलन करून त्यांनी 131 मिनिटांचा हा सिनेमा तयार केलाय.

एका बारा वर्षांच्या मुलाची गोष्ट सांगणारा सिनेमा. आपल्या धाकट्या बहिणीचं तिच्यापेक्षा वयाने खूप मोठ्या असलेल्या पुरुषाबरोबर लग्न होऊ नये म्हणून जिवाच्या आकांताने धडपडणाऱ्या मुलाची गोष्ट. अचानक एका लहान बाळाची जबाबदारी अंगावर पडल्यानंतर ती निभावण्यासाठी जंग जंग पछाडणाऱ्या मुलाची गोष्ट. तुम्हा आम्हाला आपल्या आजुबाजूला वावरणाऱ्या अशा अनेक मुलांच्या अस्तित्त्वाचं रखरखीत भान देणारी गोष्ट. सिनेमाचं ट्रेलर ही https://www.youtube.com/watch?v=ULUo0048xZE इथे बघता येईल. 

(20 ते 30 नोव्हेंबर या काळात दरवर्षी पणजी, गोवा येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत असतो, त्या महोत्सवाला मीना कर्णिक गेली अनेक वर्षे उपस्थित राहतात. या वर्षीच्या महोत्सवातील त्यांना विशेष भावलेल्या चित्रपटांविषयी त्या पाच लेख साधनात लिहिणार आहेत, त्यातील हा पहिला लेख.)

Tags: आंतरराष्ट्रीय सिनेमा कॅॅपरनॉम गोवा फिल्म फेस्टिवल फिल्म फेस्टिवल इफ्फी international cinema capernaum film festival iffi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात