Diwali_4 शोध प्रेमाचा!
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

लव्हलेसहा सिनेमा पाहताना डोळ्यांतून पाणी येत नाही, घशात आवंढा मात्र दाटून येतो. आजच्या आपल्याकडच्या ऐहिक सुखाच्या मागे धावणाऱ्या शहरी, उच्च मध्यमवर्गीय तरुण जोडप्यांची आठवण येत राहते. जन्माला घातलेलं मूल नकोसं वाटण्याइतका कोरडेपणा अजून आपल्या समाजात आलेला नाही, पण सुखाच्या मागे धावणं मात्र तेच आहे. कोणत्याही व्यावसायिक सिनेमाला साजेशी ही गोष्ट आहे. एका रेषेत चालणारी. सरळसोट पद्धतीने मांडलेली. ट्रीटमेंटमध्ये फारसे चढ- उतार नसलेली. नाओको ओगिगामी या दिग्दर्शिकेने क्लोजनिटमध्ये काही प्रयोग केलेले नसले, तरी विषयाचं वेगळेपण निश्चितच कौतुकास्पद आहे. नात्यांमधला हळुवारपणा मनाला भावणारा आहे. विणकामासारख्या पारंपरिक कलेच्या माध्यमातून कुटुंबाचं महत्त्व दाखवू पाहण्याचा प्रयत्न म्हणूनच दखल घेण्याजोगा वाटतो.एक रशियन सिनेमा, दुसरा जपानी. प्रेम शेाधणाऱ्यांचा. पण दोन सिनेमांची ट्रीटमेंट मात्र टोकाची. एक थेट शोकांतिका, तर दुसरा हलक्या-फुलक्या पद्धतीने पेश केलेला. पहिला अधिक सकस, पण दुसरा एका आगळ्या कुटुंबाचा विषय मांडणारा. आधुनिक जगाचा वेध घेणाऱ्या या सिनेमांविषयी...

मामा आणि भाचीचे बंध

शाळा सुटलीये. वर्गातून बाहेर पडून मुलं धावत आपापल्या घरी निघालीयेत. त्यातच एक आहे बारा वर्षांचा आल्योशा. मात्र त्याला घरी जायची घाई दिसत नाहीये. संथपणे, रस्त्यावर रेंगाळत तो निघालाय. आणि त्याला कारणही आहे. घरी ना वाट पाहणारी आई आहे, ना बाबा. एका टोलेजंग इमारतीमधल्या त्या घरात सगळ्या सुविधा असल्या तरी प्रेम नाहीये. किंबहुना, आई आणि बाबाची सततची भांडणंच आहेत. त्या भांडणाचा परिणाम म्हणून ना धड आई नीट वागतेय, ना बाप जवळ घेतोय. आईला आपण जन्माला यायला कसे नको होतो, हे त्याच्या कानांवर पडतंय. आई-बाप वेगळे होताहेत, हेही त्यांच्या भांडणातून कळतंय. ते सगळं काळोख्या भिंतीपाशी लपून ऐकणारा आल्योशा अगदी एकटा आहे. हमसाहमशी रडायचं, तर त्याच्यासमोर आहे फक्त त्याचा कॉम्प्युटर!
 
बोरिस आणि झेन्या या जोडप्याने घटस्फोटाचा निर्णय घेतलाय, पण अजून आल्योशाला तो सांगितलेला नाही. घरात दोघांचाही अर्धा वाटा असल्यामुळे घर विकलं जाईपर्यंत दोघेही तिथेच राहताहेत. एकमेकांशी धड दोन वाक्यंही शांतपणे बोलता येत नसल्यामुळे सतत एकमेकांवर दोषारोप करताहेत, तावातावाने एकमेकांवर करवादताहेत. भरीस भर म्हणून घर विकत घेण्याची इच्छा असणारी गिऱ्हाइकं अचानक येऊन आल्योशाच्या छोट्याशा जगावर आक्रमण करताहेत. बोरिस आणि झेन्या दोघांनाही नवा सहचर सापडलेला आहे. त्यामुळे आठवड्यातून काही वेळा आपापल्या प्रियकर/प्रेयसीच्या घरी रात्र घालवून सकाळी परत येणं त्यांच्या अंगवळणी पडलंय. कोणीही कोणाला उत्तर द्यायला बांधील नाही आणि आल्योशाला दोघांनीही गृहीत धरलेलं आहे.

अशाच एका रात्री झेन्या घरी येते, आल्योशा आपल्या खोलीत असेल असं गृहीत धरते आणि झोपी जाते. बोरिस तर त्या रात्री घरीच आलेला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी झेन्याच्या लक्षात येतं की, आल्योशा घरात नाहीये. त्याच्या सगळ्या मित्रांकडे चौकशी केली जाते. दोन दिवस तो शाळेतच आलेला नव्हता हे कळतं आणि मग हरवलेल्या आल्योशाचा शोध सुरू होतो. त्या निमित्ताने झेन्या आणि बोरिसला काही काळासाठी का होईना, पण एकमेकांना सहकार्य करावं लागतं. 

हरवलेल्या आल्योशाचं रहस्य सिनेमाभर पसरून राहिलेलं असलं तरी ‘लव्हलेस’ हा सिनेमा फक्त तेवढंच सांगू मागत नाही. इथे एकटा आल्योशाच प्रेमाचा भुकेला नाही, झेन्या आणि बोरिसही आहेत. आयुष्याकडून त्यांच्या-त्यांच्या काही अपेक्षा आहेत. एकमेकांबरोबर राहून त्या पूर्ण होत नसल्याने त्यांची होणारी घुसमट आहे आणि त्याही पलीकडे आणखी काही आहे.  

दिग्दर्शक आंद्रे झव्यॅगिन्तसेव हा रशियन दिग्दर्शक आपल्या या सिनेमामधून रशियाच्या सामाजिक- सांस्कृतिक-राजकीय मूल्यांच्या होणाऱ्या ऱ्हासावरही भाष्य करतो. आणि त्याच्यासारख्या दिग्दर्शकाकडून तीच अपेक्षा आहे. 2014 मध्ये ‘लेव्हियाथन’ या त्याच्या सिनेमाला ऑस्करचं नॉमिनेशन होतं. त्या वर्षीच्या इफ्फीमध्ये या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा सुवर्णमयूर पुरस्कारही मिळाला होता. ‘लेव्हियाथन’मध्ये आपल्या मुळांना घट्ट पकडून राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोल्या नावाच्या पुरुषाची गोष्ट होती. भ्रष्ट व्यवस्था आणि धर्मसत्ता यांच्यासमोर त्याचा झगडा अपयशीच ठरणार आहे आणि तरीही तो लढतोय.
 
‘लव्हलेस’मध्ये या व्यवस्थेने एक प्रकारे आणखी उग्र रूप घेतलंय. इथे थेट राजकीय भाष्य नाही, पण चंगळवादामधून येणारा व्यक्तिवाद आहे. सुखाचा शोध घेण्यासाठी धावणारी माणसं आहेत. त्यात त्यांची होणारी दमछाक आहे, फरफट आहे आणि तरीही त्यांच्या हाती न लागणारं प्रेम आहे. मुलगा हरवल्यानंतर आई-बापांची घालमेल होते खरी, पण ही शोकांतिका त्यांना जवळ आणत नाही. बोरिसचा बॉस धार्मिक ख्रिश्चन असल्यामुळे घटस्फोट घेतलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकतो, त्याचं टेन्शन बोरिसला आहे. दुसरीकडे झेन्या आणि तिच्या आईचा वाद आहे. घरातल्या भांडणांना कंटाळून निघून गेलेली मुलं सातेक दिवसांत परत येतात, म्हणून तक्रार लिहून घ्यायला नाखूश असलेले पोलीस आहेत. आपल्या कार्यकर्त्यांसोबत आल्योशाला शोधण्यासाठी आकाशपाताळ एक करणारी एनजीओ आहे. बोरिसची गरोदर प्रेयसी आहे. झेन्याचा श्रीमंत प्रियकर आहे. आणि या सगळ्याला आल्योशाच्या नाहीसा होण्याची पार्श्वभूमी आहे.

दिग्दर्शक आंद्रे झव्यॅगिन्तसेवनची गोष्ट सांगण्याची स्टाईल संथ आहे. तो कोणतंही विधान घाईघाईने करत नाही. आपल्याला जे म्हणायचंय, ते सावकाश पण ठामपणे मांडतो. त्याचा कॅमेराही त्यामुळे शांतपणे फिरतो, असं वाटतं आणि पहिल्याच दृश्यापासून दिग्दर्शक ते आपल्या मनावर ठसवतो. आल्योशा रमत-गमत घरी येत असताना कॅमेरा कधी रस्त्यावरच्या उंच झाडांचा वेध घेतो, तर कधी घरातल्या खिडकीतून खाली बर्फात खेळणाऱ्या मुलांकडे पाहणाऱ्या आल्योशाच्या  चेहऱ्यावरचं रिकामपण टिपतो. आणि त्यातून ‘लव्हलेस’ची शोकांतिका अधिकच गहिरी होते. प्रेक्षक म्हणून अस्वस्थ करत राहते.
 
हा सिनेमा पाहताना डोळ्यांतून पाणी येत नाही, घशात आवंढा मात्र दाटून येतो. आजच्या आपल्याकडच्या ऐहिक सुखाच्या मागे धावणाऱ्या शहरी, उच्च मध्यमवर्गीय तरुण जोडप्यांची आठवण येत राहते. जन्माला घातलेलं मूल नकोसं वाटण्याइतका कोरडेपणा अजून आपल्या समाजात आलेला नाही, पण सुखाच्या मागे धावणं मात्र तेच आहे. कुणी सांगावं, या व्यक्तिवादाच्या नादात काही वर्षांमध्ये आपणही तिथे जाऊन पोचू.
 
मोठ्या दिग्दर्शकांचं वैशिष्ट्य हेच की, त्यांच्या मातीतला सिनेमा बनवतानाही ते तो जगाशी जोडतात. इथेही नेमकं तेच घडलंय. ‘लव्हलेस’चं ट्रेलर बघायचं असेल, तर या लिंकवर क्लिक करा.

0
 
‘लव्हलेस’मधल्या डिप्रेशनमधून बाहेर काढलं ते ‘क्लोजनिट’ या जपानी सिनेमाने. ही गोष्टही प्रेमाचीच आहे. प्रेमासाठी भुकेल्या एका दहा-बारा वर्षांच्या मुलीची- तोमोची. तोमोचं एकटेपण पहिल्या फ्रेमपासून अधोरेखित होतं. ती शाळेतून घरी येते. डायनिंग टेबलवर दुकानातून आणलेलं खाणं झाकून ठेवलंय, ते खाते. घरभर असलेल्या पसाऱ्यातच वावरते आणि रात्री आईची वाट बघून झोपी जाते. या आईचं आपल्या मुलीवर प्रेम नाही असं नाही, पण आयुष्याकडून तिला वेगळं काही तरी हवंय. त्यामुळे मधूनच ती मुलीला चिट्ठी लिहून गायब होते, तशी ती आताही होते. आणि तोमो नेहमीप्रमाणे शहरातल्या आपल्या मामाकडे- माकिओकडे जाते. तिला पाहताक्षणी तो, ‘अगेन?’ असाच प्रश्न विचारतो. पण या वेळी काही तरी बदललंय. तोमोला घेऊन घरी येताना माकिओ तिला सांगतो, आता माझ्या घरी आणखी एक व्यक्ती राहतेय. माझं प्रेम आहे तिच्यावर. तिचं नाव आहे ‘रिंको.’ घरी आल्यावर सगळ्या घराचा नक्षाच पालटलाय, हे तोमोला जाणवतं. घरात पसारा नाहीये, सगळं सामान व्यवस्थित जागच्या जागी आहे, स्वैपाकघरात जेवण तयार आहे आणि मामा आनंदी दिसतोय.
 
रिंकोला भेटल्यावर मात्र तोमो बावचळते. पुरुषाची बाई झालेली व्यक्ती ती पहिल्यांदाच बघत असते. स्वाभाविकच ती रिंकोपासून दूर जाऊ मागते. रिंको आपल्या वागण्याने तोमोला जिंकून घेते, हे तर स्वाभाविकच आहे. त्यातून रिंको म्हणजे सद्‌गुणांची पुतळी आहे. ती तोमोला तिच्या आवडीचे पदार्थ करून खायला घालते, तिला कुशीत घेऊन झोपते, त्या वयातल्या मुलीला लागणारी आईची माया देते. पण तरीही हे कुटुंब नॉर्मल कुटुंब नाही याची जाणीव रिंकोला आहे, तशी ती तोमोलाही आहे आणि माकिओलाही. आणि  अर्थातच आजूबाजूच्या जगालाही. शाळेत त्यावरून तोमोला चिडवतात. तिच्या जवळच्या मित्राची आई तोमोशी तुटक वागते.
 
या मित्राचीही एक स्वतंत्र गोष्ट आहे. आपल्याला मुलगे आवडतात याची जाणीव झाल्यानंतर होणाऱ्या त्याच्या घुसमटीची. पण त्याची आई मात्र सर्वसाधारण लोकांसारखी आहे. जगातलं वेगळेपण स्वीकारायचं तर नाहीच, पण त्याकडे काही तरी पाप घडत असल्यासारखं बघायचं- अशा स्वभावाची. ती रिंकोचा अपमान करते आणि चिडलेली तोमो खूप तमाशा करते. तेव्हा तिला शांत करताना रिंको आपल्या बॅगेतून लोकर काढते आणि म्हणते, मन शांत करण्यासाठी मी विणकाम करते. रिंकोबरोबर तोमोही आपल्याला विणकाम करताना दिसू लागते. लोकरीच्या धाग्यांनी या कुटुंबाची वीण जणू घट्ट बांधली जात असते.
 
मोकळी झालेली तोमो आता रिंकोला आपल्या मनातल्या शंका विचारताना कचरत नाही. एका प्रसंगात तिला रिंकोच्या स्तनांविषयी कुतूहल वाटतं, तर आणखी एका प्रसंगात ती थेट ‘डॉक्टरांनी तुझ्या पीपीचं काय केलं?’ असा प्रश्न करते. आईच्या स्तनांवर डोकं ठेवून तिच्या कुशीत आपली सुरक्षितता शोधणाऱ्या तोमोला एक वेगळं कुटुंब मिळतं.

इथे काही खटकलेल्या गोष्टीही सांगायला हव्यात. रिंको ही स्वयंपाकात तरबेज, घरकामात हुशार आणि सेवाभावी वृत्तीची आहे. तोमोला ती शाळेच्या डब्यासाठी निरनिराळे पदार्थ बनवून देते. ती एका वृद्धांच्या हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करतेय. (माकिओची आई त्याच हॉस्पिटलमध्ये आहे आणि तिथेच त्यांची ओळख झालीये). थोडक्यात, एका गृहिणीमध्ये असतात ते सगळे गुण रिंकोमध्ये आहेत. तिची व्यक्तिरेखा थेट पांढरीशुभ्र आहे. त्याला कसले कंगोरेच नाहीत. ना तिच्या भूतकाळाचे, ना पुरुष असताना होत असलेल्या तिच्या कोंडमाऱ्याचे. नाही म्हणायला, ती आपल्या पुरुषी हातांविषयी बोलते, पुरुषांची 108 लिंगं विणायच्या आपण सोडलेल्या संकल्पाविषयी बोलते. (बौद्ध धर्मात 108 हा आकडा पवित्र मानला जात असल्यामुळे तिने तेवढी लिंगं विणून जाळण्याचं ठरवलंय. म्हणजे मग आपण मागच्या सगळ्या गुंत्यातून मोकळे होऊ, असं रिंकोने स्वत:ला सांगितलंय.) पण ते सगळं अगदी सहजगत्या येतं. हलक्या-फुलक्या पद्धतीने.
 
प्रश्न असा पडतो की- समजा रिंकोची व्यक्तिरेखा अशी गृहिणीसारखी नसती, ती करिअर करणारी बाई दाखवली असती; तर तोमोला तिला स्वीकारणं कठीण गेलं असतं का? दिग्दर्शिकेने इथे जरा सोपा मार्ग स्वीकारला नाही का? मात्र, रिंको आणि तोमोला लोकर विणताना पाहताना मनात आलेला, ‘बायकांनीच करायची का ही कामं?’ हा विचार फार टिकत नाही. कारण पुढच्याच प्रसंगांमध्ये त्या दोघींच्या बरोबरीने माकिओच्या हातातही लोकर दिसते. तोमोच्या बरोबरीने तोही रिंकोकडून विणकाम शिकताना दिसू लागतो. आता तिघे मिळून 108 लिंगं विणू लागतात. या तिघांचं एक जग बनतं. सायकलवरून तिघे पिकनिकला जातात, छोट्याशा घरात मौजमस्ती करतात, कॉम्प्युटर गेम्स खेळतात.
 
पण सिनेमा इथे संपत नाही. नेहमीप्रमाणे घर सोडून काही काळ दूर गेलेली तोमोची आई परतते, मुलीला घरी न्यायला माकिओकडे येते आणि ही घडी विस्कटते. सिनेमाचा शेवट मात्र आपल्या चेहऱ्यावर एक छोटंसं हसू आणणारा आहे. कोणत्याही व्यावसायिक सिनेमाला साजेशी ही गोष्ट आहे. एका रेषेत चालणारी. सरळसोट पद्धतीने मांडलेली. ट्रीटमेंटमध्ये फारसे चढ-उतार नसलेली. नाओको ओगिगामी या दिग्दर्शिकेने त्यात काही प्रयोग केलेले नसले, तरी विषयाचं वेगळेपण निश्चितच कौतुकास्पद आहे. नात्यांमधला हळुवारपणा मनाला भावणारा आहे. विणकामासारख्या पारंपरिक कलेच्या माध्यमातून कुटुंबाचं महत्त्व दाखवू पाहण्याचा प्रयत्न म्हणूनच दखल घेण्याजोगा वाटतो. ‘क्लोजनिट’चं ट्रेलर युट्यूबवर नक्की बघा. त्यातला गोडवा तुम्हालाही जाणवल्याशिवाय राहणार नाही.

लिंक आहे- https://www.youtube.com/watch?v=8gPJB4g5gzQ
 

Tags: close knit loveless cinema review review cinema mina karnik meena karnik shodh premacha iffi iffi 2017 weekly sadhana 06 january 2018 sadhana saptahik लव्ह्लेस क्लोजनिट सिनेमा परिक्षण सिनेमा मीना कर्णिक शोध प्रेमाचा! इफ्फी इफ्फी : 2017 साधना साधना साप्ताहिक अंक 06 जानेवारी 2018 साधना साप्ताहिक weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात