Diwali_4 कहाण्या स्त्रियांच्या
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

पाच वेगवेगळ्या देशांतल्या पाच स्त्रिया. त्यांचे पाच सिनेमे. या स्त्रियांचे प्रश्न निरनिराळे होते, त्यांना सामोरं जाण्याचे मार्ग वेगळे होते, त्यांचा काळ एकच नव्हता आणि आर्थिक स्तरही समान नव्हता. तरीही त्यांच्यामध्ये काही तरी सारखेपणा होता. त्यांची घुसमट एकमेकींशी नातं सांगणारी होती.

पाच वेगवेगळ्या देशांतल्या पाच स्त्रिया. त्यांचे पाच सिनेमे. या स्त्रियांचे प्रश्न निरनिराळे होते, त्यांना सामोरं जाण्याचे मार्ग वेगळे होते, त्यांचा काळ एकच नव्हता आणि आर्थिक स्तरही समान नव्हता. तरीही त्यांच्यामध्ये काही तरी सारखेपणा होता. त्यांची घुसमट एकमेकींशी नातं सांगणारी होती.

नॉर्वेचा ‘आय ॲम युवर्स’, व्हिएतनामचा ‘फ्लॅपिंग इन द मिडल ऑफ नोव्हेअर’, पोलंडचा ‘इडा’, कॅनडाचा ‘मॉमी’ किंवा अर्जेंटिना/चिलीचा ‘आय ॲम नॉट लॉरेना’ या पाच वेगवेगळ्या देशांतल्या पाच सिनेमांमध्ये एक गोष्ट समान होती. या सिनेमांची गोष्ट एका स्त्रीच्या नजरेतून सांगितलेली होती. तिचे प्रश्न निरनिराळे होते, त्यांना सामोरं जाण्याचे मार्ग वेगळे होते, त्यांचा काळ एकच नव्हता आणि आर्थिक स्तरही समान नव्हता. तरीही यांतल्या पाचही स्त्रियांमध्ये काही तरी सारखेपणा होता. त्यांची घुसमट एकमेकींशी नातं सांगणारी होती. कोण होत्या या पाच स्त्रिया?

‘आय ॲम युवर्स’ची दिग्दर्शक आहे इराम हक. ही कथा एका परीने आत्मचरित्रात्मक आहे, असं स्वत: इराम म्हणते. ‘‘आपल्या कुटुंबाशी नातं तुटलेलं असलं की आयुष्य कशी वळणं घेतं, हे मला दाखवायचं होतं. आपले आई-वडील आपल्यावर प्रेम करत नाहीत, आपली मुळं हरवलीयेत, आपल्यावर कोण प्रेम करतंय आणि कोण नाही हे कळत नाहीये... प्रेम म्हणजे काय हेच कधी जाणवलेलं नसेल, तर आपल्या मुलावर कसं प्रेम करायचं, हे कळणार आहे का... या प्रश्नांना भिडणारा एक प्रामाणिक सिनेमा मला बनवायचा होता. तेव्हा, सिनेमाची गोष्ट काल्पनिक असली तरी मी स्वत:पासून प्रेरणा घेतलीये, हेही खरंय.’’   

ऑस्लोमध्ये राहणाऱ्या मीनाची ही कहाणी. आपल्या सहा वर्षांच्या मुलाबरोबर- फेलिक्सबरोबर ती राहते. घटस्फोट झालाय आणि नवऱ्याने दुसरं लग्नही केलंय. मुलगा काही दिवस आईकडे आणि काही दिवस बापाकडे राहतो. मुळात मीना आहे पाकिस्तानी. तिचे आई-वडीलही ऑस्लोमध्येच राहताहेत. त्यांना भेटायला गेलं की, मीनाला आईची कटकट सतत ऐकायला लागते, ‘मुलीने असं वागायचं असतं का? तुझ्याविषयी काय काय गोष्टी कानांवर पडतात. इतक्या चांगल्या मुलाकडून तू घटस्फोट मागितलासच कसा...’ वगैरे वगैरे. प्रेमाची भुकेली ही तरुण मुलगी सेक्स आणि प्रेम यांची सतत गल्लत करत राहते. वेगवेगळ्या पुरुषांना स्वत:ला वापरू देते. हताश होत राहते. आणि येस्पर नावाच्या स्वीडिश दिग्दर्शकाला भेटल्यानंतर, दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर, हे प्रेम यशस्वी व्हावं म्हणून वाट्टेल ते करायला तयार होते. फेलिक्सला घेऊन येस्परकडे स्टॉकहोमला राहायला जाते. त्याला कौटुंबिक आयुष्य झेपत नाही म्हटल्यावर हताश होऊन परत आपल्या घरी येते. मीनाचा प्रेमाचा शोध चालूच राहतो.

मीनाचा हा शोध, तिचं केविलवाणं होणं, झालेला अपमान गिळून पुरुषांना पुन:पुन्हा शरण जाणं पाहताना पोटात खड्डा पडतो. प्रेम मिळवण्यासाठीचा तिचा अट्टहास खरा वाटत राहतो. शिवाय, दोन अत्यंत भिन्न संस्कृतींमध्ये मीना अडकलीये. त्यात तिची घुसमट होतेय. नॉर्वेत वाढलेली ही मुलगी पाकिस्तानी आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करूच शकत नाही. तिचं जग आता वेगळं आहे, तिच्या चांगल्या-वाईटाच्या कल्पना निराळ्या आहेत. लग्न, प्रेम याविषयीच्या व्याख्याही तिच्या स्वत:च्या आहेत. त्या बरोबर की चूक, हा मुद्दाच नाहीये. एका परीने मीनाची ही शोकांतिका आहे आणि आपल्यापर्यंत ती तेवढ्याच उत्कटतेने पोचते, यात शंकाच नाही. (याचं काही श्रेय मीनाची भूमिका करणाऱ्या अमृता आचार्य या मुलीलाही द्यायला हवं. नेपाळमध्ये जन्म झालेली ही नॉर्वेजियन अभिनेत्री मीनाची व्यक्तिरेखा जगलीये). ‘आय ॲम युवर्स’मधली इराम हकची ही तरुण नायिका नॉर्वेतली असली तरी जगभरातल्या अनेक मुलींशी नातं सांगते, यातच या सिनेमाचं यश सामावलंय.

‘फ्लॅपिंग इन द मिडल ऑफ नोव्हेअर’च्या दिग्दर्शक आहेत डीप होआंग न्गुयेन. स्त्रियांच्या सिनेमातली प्रोटॅगॉनिस्ट स्त्री असते, तेव्हा तो सिनेमा अधिक संवेदनशील बनतो का? त्यात स्त्रीचं मन अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त होतं का?

या सिनेमातली ह्युयेन ही सतरा वर्षांची मुलगी आहे. गाव सोडून शिकण्यासाठी शहरात आलेली. गरीब. तिच्यासारख्याच आर्थिक परिस्थितीतून आलेला तिचा मित्र. आपण प्रेग्नंट आहोत, हे तिला कळतं. दोघे मिळून पैसे जमा करून गर्भपात करून घ्यायचा निर्णय घेतात आणि जमवलेले पैसे घेऊन आयत्या वेळी मित्र पळून जातो. आता पैसे मिळवण्याचा एकच मार्ग ह्युयेनसमोर शिल्लक राहतो. कॉलगर्ल म्हणून तिच्याकडे आलेल्या क्लायंटला गरोदर  बायकांविषयीच आकर्षण वाटत असतं. ह्युयेनला त्याच्या संगतीत चक्क आनंद मिळू लागतो. आपण गर्भपात करून घ्यायचा की नाही, असा प्रश्न तिच्या मनात निर्माण व्हायला लागतो.

मात्र दिग्दर्शकाने या प्रश्नाचं थेट उत्तर दिलेलंच नाही. किंबहुना, या उत्तरापेक्षा काही अधिक महत्त्वाचे प्रश्न तिला मांडायचे आहेत. संपूर्ण सिनेमाभर आपल्याला ह्युयेन, तिचा मित्र, त्यांच्या अवती-भोवतीचे लोक यांचं दारिद्र्य दिसत राहतं. झोपडपट्टीत राहणारी ह्युयेन किंवा तिची मैत्रीण आणि त्यांच्या इच्छा-आकांक्षा, पुरुषी वर्चस्व, वर्गभेद याविषयी दिग्दर्शक काही तरी म्हणू पाहते. आणि हे सारं सांगताना ह्युयेनचा स्वत:च्या मनाचा आणि आपल्या बदलू लागलेल्या शरीराचा शोधही दाखवते. काही काही प्रसंग मात्र अंगावर काटा आणणारे आहेत. ह्युयेनला आपला गर्भपात होतो असं स्वप्न पडतं, त्या प्रसंगात तिच्या शरीरातून रक्ताचे तुकडे जमिनीवर पडताना आपल्याला दिसतात. त्याबरोबरच काही अतिशय तरल प्रसंगही आपण पाहतो. आपल्या क्लायंटबरोबर ह्युयेन जाते आणि दोघे एका भल्या मोठ्या फुग्याच्या आतमध्ये झोपून नदीतून विहार करतात ते दृश्य वास्तववादी नाही, पण रोमॅन्टिक निश्चितच वाटतं. दिग्दर्शक अत्यंत परिणामकारक व्हिज्युअल्समधून आपली गोष्ट मांडते. गोष्ट विचार करायला भाग पाडणारी, व्हिएतनाममधली ह्युयेन आपल्यालाही आपली वाटायला लावणारी.

‘इडा’चा दिग्दर्शक मात्र पुरुष आहे. पावेल पावलिकोवस्की. सन 1962 मधील पोलंडमध्ये या सिनेमाची गोष्ट घडते. सिनेमा ब्लॅक अँड व्हाईट आहे आणि दिग्दर्शकाने त्यात अंधार-प्रकाशाचा इतका सुंदर खेळ केलाय की, फ्रेम न्‌ फ्रेम म्हणजे एक देखणं चित्र बनून जातं. काही काही वेळा हे देखणेपण गोष्टीवर मात करेल की काय, अशी भीतीही वाटते. पण तसं फार होत नाही. कारण इडाच्या आयुष्यातही आपण गुंतून गेलेलो असतो.

18 वर्षांची ॲना अनाथ आहे. एका चर्चमध्ये लहानाची मोठी झालीये आणि आता काही दिवसांमध्येच नन्‌ होणार आहे. मात्र, ही शपथ घेण्यापूर्वी तिला तिच्या मावशीची-वांडाची भेट घ्यायची असते. शहरात जाऊन मावशीला ॲना भेटते आणि तिला कळतं की, तिचं खरं नाव इडा आहे. ती ज्यू आई-वडिलांची मुलगी आहे. मावशीकडून हे ऐकल्यावर इडा हादरते. मावशी कम्युनिस्ट आहे, जज्‌ आहे, हेही तिला कळतं. तिने अनेक धर्मगुरूंना मृत्यूची सजा ठोठावल्याची माहिती इडाला मिळते. मात्र दोघींनाही आता आपल्या मूळ गावी जायचंय. इडाला आई-वडिलांच्या मृत्यूचा शोध घ्यायचाय, तर मावशीला आपल्या मृत मुलाची कबर शोधायचीये. आपल्या कुटुंबाच्या स्मशानभूमीतच त्यांचं दफन करायचंय.

या दोन परस्परविरोधी बायकांची सफर हा सिनेमाचा मुख्य भाग. मावशीचं सिगारेट ओढणं, दारू पिणं आणि इडाचं येशूमय असणं यातून निर्माण होणारा वाद, तू काही अनुभवलंच नाहीस तर त्याग कसला करणार म्हणून मावशीचं इडाला चिडवणं आणि आपल्या आयुष्याचं आपण काय करायचं याच्या निर्णयापर्यंत येण्यासाठी झालेला इडाचा प्रवास आपण अनुभवतो. या जगाशी आपली ओळख नाही; पण तरीही वांडाचं जग किंवा इडाचं भावविश्व परकं वाटत नाही. अजिबातच नाही.

दिग्दर्शक झेवियर दोलान यांच्या ‘मॉमी’चं कान चित्रपट महोत्सवामध्ये खूप कौतुक झालं. मुंबईला झालेल्या मामिमध्येही हा सिनेमा बराच गाजला. गोव्यात मात्र तो आवडणारी माणसं जेवढी होती, तेवढीच न आवडणारीही भेटली.

एडीएचडी हा मानसिक आजार असलेल्या 15 वर्षांच्या स्टीव्ह या मुलाची आई डियान. मुलाला हॉस्पिटलमध्ये ठेवायचं नाही म्हणून त्याची पूर्ण वेळ जबाबदारी डियानवर येते. गाठीशी फारसे पैसे नाहीत. मुलगा म्हणजे असला तर सूत, नाही तर भूत. रागाचा पारा चढला की योग्य-अयोग्य, बरं-वाईट यांचं भान पूर्णपणे नष्ट होणारा. मग आपल्या कृष्णवर्णीय टॅक्सीवाल्याला त्याच्या रंगावरून शिव्या देणं असो, आईशी सलगी करताना तिच्या स्तनांवरून हात फिरवणं असो किंवा तिच्या मित्राचा अपमान करताना अर्वाच्य बोलणं असो... अशा मुलाला सांभाळताना होणारी आईची ओढाताण, तिला येणारं नैराश्य, तिची घालमेल या सिनेमात दिसते. नाही म्हणायला, तिला मदत करायला आपणहून समोरच्या घरातली क्याला येते. तिचा खूप मोठा आधार डियानला मिळतो. पण तरीही ही लढाई तिची तिलाच लढायची आहे.

त्रयस्थ व्यक्ती म्हणून पाहताना स्टीव्हचा आपल्याला अनेकदा राग येतो. असा मुलगा असेल तर त्याला घरीच ठेवायचा आईचा आग्रह का हवा, असा प्रश्नही मनात आल्यावाचून राहत नाही. अशा मुलाला डॉक्टरांच्याच ताब्यात द्यायला हवं, त्याने हॉस्पिटलमध्येच राहणं योग्य असा विचार बऱ्याच वेळा येत राहतो. दिग्दर्शकाला त्याच्याविषयी सहानुभूती निर्माण करायची असेल तर त्याचा तो प्रयत्न शंभर टक्के यशस्वी झालाय, असंही म्हणता येत नाही. पण तरीही मला तो सिनेमा आवडला. कारण तो मुळी मी स्टीव्हच्या नजरेतून पाहिलाच नाही. दिग्दर्शकालाही ते अभिप्रेत नाही. म्हणून तर सिनेमाचं नाव ‘मॉमी’ आहे. हा सिनेमा संपूर्णपणे डियानचा आहे. तिच्यातल्या आईचा आहे. आहे माझा मुलगा असा. नाही आवरता येत राग त्याला. त्याच्या या आजाराचा होणारेय त्रास मला आणि बहुधा आजूबाजूच्यांनाही. त्याला सांभाळणं होतंय मला अशक्य. माझं अख्खं आयुष्यच त्याच्या भोवती फिरतंय. धड मोकळा श्वासही घेता येत नाहीये मला. कधी कधी वाटतं, याच्या दोन मुस्काटात माराव्यात... पण तरीही  पोटचा मुलगा आहे ना? त्याच्याकडे पाठ फिरवून चालू लागता येईल का? त्याला नाकारून काही घडलंच नाही, असं आपलं आयुष्य जगता येईल का? म्हणजे मग आता हेच आपलं जगणं आहे, असं मानण्यावाचून काय पर्याय आहे? तो कधी तरी नीट होईल एवढ्या एका आशेवर!

मला या प्रश्नांशी सामना करणारी आई भावली. तिची जिद्द, तिचं हरलेपण, तिचं थकून जाणं, तिचं चिडणं, तिचं प्रेम करणं, तिचा आटापिटा... सगळं मला खरं वाटलं. डियान कुठल्या देशातली होती, कुठल्या कल्चरमधून आलेली होती, हे माझ्या दृष्टीने दुय्यम होतं. भरपूर मेलोड्रामा असलेल्या या सिनेमातल्या आईने मला आपलंसं केलं.

उत्तर अमेरिकेतून दक्षिणेकडच्या अर्जेंटिना-चिली- मधल्या ‘आय ॲम नॉट लॉरेना’ची दिग्दर्शक आहे इसिडोरा मर्रास. या सिनेमाची नायिका गोव्याला आली होती. आपल्या देशात सध्या वेगवेगळ्या प्रकारची पेमेंट्‌स लोकांकडून सरकार ज्या पद्धतीने वसूल करतंय, त्याबाबत खूप असंतोष आहे आणि त्यावरच आपला हा सिनेमा आहे असं ती म्हणाली खरी; पण सिनेमाची ती ओळख नव्हती, हे ‘आय ॲम नॉट लॉरेना’ पाहिल्यानंतर लक्षात आलं.

ऑलिव्हिया एक तरुण मुलगी. तिच्या आईला डिमेन्शिआ झालाय. ती आपली आणि आपल्या मुलीची ओळख विसरू लागलीये. ऑलिव्हियाचा शेजारी आहे एक ट्रान्सजेंडर. त्याची ओळखही बाहेर एक आणि घरात एक अशी आहे. स्वत: ऑलिव्हिया अभिनेत्री आहे. नवऱ्यापासून वेगळी झालीये, पण त्याच दिग्दर्शक नवऱ्याच्या नाटकात काम करतेय. रोज तालमींना जातेय. दुसऱ्या एका व्यक्तिरेखेचं आयुष्य तेवढ्यापुरतं साकारू पाहतेय.

एक दिवस ऑलिव्हियाच्या मोबाईलवर कुणा लॉरेना रुईझसाठी फोन येतो- या लॉरेनाकडून कर्जाच्या परतफेडीची मागणी करण्यासाठी. आणि त्यानंतर हे फोन येतच राहतात. ऑलिव्हियाने न केलेल्या खर्चाचं पेमेंट मागण्यासाठीचे फोन. आपण लॉरेना नाही, हे सांगण्याचा खूप प्रयत्न ऑलिव्हिया करते. पण तिला अधिकृतरीत्या संबंधित लोकांना ते पटवून देणं अधिकाधिक कठीण होऊ लागतं. या सगळ्याचा परिणाम ऑलिव्हियावर होऊ लागतो. लॉरेना कोण हे आपण शोधूनच काढायचं, असा निश्चय करून ऑलिव्हिया कामाला लागते आणि त्यात अडकत जाते.

इथेही पुन्हा एका मुलीने घेतलेला स्वत:चा शोध आहे. दुसऱ्या एका मुलीला शोधताना स्वत:च स्वत:ला सापडणं आहे. छोट्या-छोट्या प्रसंगांमधून ऑलिव्हियाचं व्यक्तिमत्त्व आपल्या समोर येतं आणि सिनेमा पुढे-पुढे जातो तसतशी ती आपल्या अधिकाधिक ओळखीची होऊ लागते. घटस्फोट घेतलेल्या दिग्दर्शक नवऱ्याला दुसऱ्या बाईबरोबर जाताना भिंतीच्या आडून पाहणारी, नाटकातल्या नायकाबरोबर सेक्स करणारी, आईच्या काळजीपोटी तिच्या केअरटेकरबरोबर कचाकचा भांडणारी, नाटकातली व्यक्तिरेखा साकारणं तुला जमत नाहीये असं दिग्दर्शकाने सांगितल्यावर अस्वस्थ होणारी आणि लॉरेनाला शोधण्यासाठी झपाटून गेलेली ऑलिव्हिया... आपली ओळख कुणी तरी हिरावून घेणं, हा खरं तर या सिनेमाचा गाभा आहे.

सिनेमा पाहून बाहेर आल्यावर प्रसिद्ध समीक्षक रफीक बगदादी म्हणाले, ‘‘हा सिनेमा म्हणजे काफ्काच्या ‘द ट्रायल’चा आधुनिक अवतार आहे.’’ कोणत्याही सिनेमासाठी याहून जास्त कौतुकाची थाप दुसरी कोणती असणार?

Tags: इसिडोरा मर्रास पावेल पावलिकोवस्की झेवियर दोलान डीप होआंग न्गुयेन इराम हका आय ॲम नॉट लॉरेना मॉमी इडा फ्लॅपिंग इन द मिडल ऑफ नोव्हेअर आय ॲम युवर्स कहाण्या स्त्रियांच्या इफ्फी मीना कर्णिक Isidora Marras I Am Not Lorena Xavier Dolan Mommy Pawel Pawlikowski Ida Nguyen Hoang Diep Flapping In The Middle Of Nowhere Iram Haq I Am Yours Kahanya Striyanchya Iffi Meena Karnik weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात