Diwali_4 इनसिरियेटेड : सुन्न करणारा अनुभव
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

सिनेमा त्या अर्थाने युद्धपट नाही, पण बाहेर होत असलेल्या त्या युद्धाची गडद छाया मात्र आहे. काळोख पडल्यावर सलीमला घरात आणण्यासाठी जिवावर उदार झालेला करीम, त्याच्यावरच्या प्रेमापोटी आपला जीव धोक्यात घालून त्याच्या मागे धावणारी यारा, स्वत:वर बलात्कारासारखा प्रसंग आल्यानंतरही आलियाची समजूत घालणारी हलीमा, देहलानीची अस्वस्थता समजणारे मुस्तफा आणि या सगळ्यांची जबाबदारी आपल्यावर आहे या भावनेने वावरणारी ओयुम- करारी, झटपट निर्णय घेणारी. तो निर्णय योग्य की अयोग्य याचा विचार करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही याची जाणीव असणारी. आपण खंबीर आहोत हे जणू इतरांना आणि स्वत:लाही वारंवार जाणवून देणारी. आणि रात्र झाली तरीही नवरा परत न आल्यामुळे उन्मळून पडणारी. प्रत्येक व्यक्तिरेखा एका परीने असहाय. युद्धाचे परिणाम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांवर होत असतात आणि ते भयानकच असतात, हे सांगणारी. कदाचित कुठल्याच युद्धाला ग्लोरिफाय करू नये, असं सूचित करणारी.

सिरियाची राजधानी असलेल्या दमास्कस शहरातली एक इमारत. त्या इमारतीतलं एक घर. घरात काही माणसं. आणि त्यांच्या आयुष्यातला एक अख्खा दिवस -  सभोवताली सुरू असलेल्या हिंसेच्या, भीतीच्या, दडपणाच्या, तणावाच्या, आशेच्या आणि निराशेच्या भावनांवर हेलकावे घेणारा. कदाचित यापुढे असेच दिवस आपल्याला घालवायचे आहेत, असं सांगणारा.

युद्धाच्या भीषण खुणा सर्वत्र दिसताहेत. म्हणजे घरातल्या खिडक्यांच्या पडद्यांआडून हळूच बाहेर बघताना दिसतील तेवढ्या. भग्न, भकास इमारती. सगळीकडे निव्वळ पडझड. पार्श्वभूमीला मधूनच ऐकू येणारे बंदुकांचे आवाज, रॉकेट व बॉम्बस्फोटाचा धडाका. आणि त्यापासून स्वत:चा बचाव करणारं एक कुटुंब.

ओयुम याझान (हियाम अब्बास) ही या कुटुंबाची कर्ती स्त्री. नवरा सकाळीच कुठे तरी निघून गेलाय. कुठे, कशासाठी हे आपल्याला माहीत नाही आणि ते कळतही नाही. तिच्यासोबत यारा व आलिया या तिच्या दोन मुली, याझान हा साधारण दहा वर्षांचा मुलगा आणि सासरा मुस्तफा (मोहसीन अब्बास) आहेत. घरात काम करणारी देहलानी (ज्युलिएट नेव्हीन बारदीन) आणि तिच्या मुलीचा मित्र करीम आहेत. शिवाय वरच्या मजल्यावर राहणाऱ्या शेजाऱ्यांचं घर उद्‌ध्वस्त झाल्यामुळे तिथले नवरा-बायको सलीम व हलीमा (दियामांद अबौद) आणि त्यांचं तीनेक महिन्यांचं बाळही आहे. या सगळ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपल्यावर आहे, हे ओयुमच्या वावरण्यातून सतत जाणवतं. सिनेमा सुरू होतो तेव्हा नुकतीच सकाळ झालीये. सलीम आणि हलीमा त्या रात्री लेबनॉनला पळून जाण्याचं ठरवताहेत. कुणी एक रिपोर्टर त्यांना मदत करणार असतो. पण त्या आधी सलीमला त्या रिपोर्टरला भेटणं आवश्यक असतं. बायकोचा निरोप घेऊन तो घरातून बाहेर पडतो. घराचा दरवाजा बाहेरून सहजी उघडता येऊ नये, म्हणून आतून लावलेले मोठे लाकडी ओंडके आपल्याला घरातल्या माणसांना असलेल्या धोक्याची जाणीव करून देतात.

 सलीम बिल्डिंगमधून बाहेर पडतो आणि थोडा पुढे जात नाही तोच सण्‌कन आलेली एक गोळी त्याच्या शरीरात घुसते. तो रस्त्यावरच कोसळतो. त्याच वेळी स्वयंपाकघराच्या खिडकीत आलेली देहलानी हे पाहते आणि नखशिखान्त हादरते. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांमधून आपल्याला सलीमचं अर्धवट शरीर दिसत  राहतं. तो जिवंत आहे की मेलाय, हे कळायला मार्ग नसतो. ही घटना ती ओयुमला सांगते खरी, पण ओयुम तिला गप्प बसवते. हलीमाला हे समजलं, तर ती इमारतीबाहेर धावेल आणि स्वत:सकट सगळ्यांचंच आयुष्य धोक्यात घालेल, असा विचार त्यामागे असतो. गोळी चालवणारा अजून तिथेच असण्याची शक्यताही नाकारता येत नसते. रात्र झाली की काळोखात सलीमपर्यंत पोचणं अधिक व्यवहार्य ठरेल, अशी देहलानीची समजूत काढते.

दिवसाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या घटनेने निर्माण झालेला तणाव मग वेगवेगळ्या प्रसंगांमधून वाढतच जातो. कधी जवळच झालेल्या बॉम्बस्फोटाने घर हादरतं, सीलिंगवरची माती भुरूभुरू खाली पडते. गोळ्यांचे आवाज झाले की, छातीत धस्स होतं. आणि बिल्डिंगमध्ये घुसलेल्या माणसांच्या पायांचे आवाज ऐकू येऊ लागल्यानंतर एक शब्दही न बोलता एकमेकांना आधार देत गप्प बसून राहणं अपरिहार्य ठरतं. ओयुमच्या नवऱ्याने आणीबाणीच्या प्रसंगात सगळ्यांना स्वयंपाकघरात एकत्र लपण्याच्या सूचना दिलेल्या असतात. मुख्य म्हणजे, या सगळ्यात रोजचे व्यवहार कोणाला चुकलेले असतात? पाण्याची चणचण आहे म्हणून आईने अंघोळ केलेल्या मुलीवर रागावणं, त्याही परिस्थिती आजोबांनी नातवाचा अभ्यास घेणं, यारा अन्‌ करीमचं एकमेकांना स्पर्श करण्यासाठी आसुसणं आणि करीम हलीमाकडे बघत असताना याराला मत्सर वाटणं... समोर मोठं संकट असताना या छोट्या गोष्टीसुद्धा मानवी नातेसंबंधांविषयी खूप काही सांगत राहतात. एका प्रसंगात आईला बिलगलेला याझान विचारतो, ‘‘आई, तू मरणार का?’’

‘‘नाही. आपण इथे सुरक्षित आहोत. एक दिवस हे युद्ध संपणार आहे आणि मग सगळं नीट होणार आहे.’’

हीच आई दुसऱ्या बाजूला आपल्या मुलीला रागावताना म्हणते, ‘‘शहाण्यासारखी वाग, आपल्या भोवती युद्ध चालू आहे- जे कधीच न संपण्याची चिन्हं दिसताहेत.’’

दारावर झालेली ठक्‌ठक्‌ही हृदयाचा थरकाप उडवणारी. ती ऐकून सगळे स्वयंपाकघरात लपतात खरे, पण आपल्या बाळाला खोलीतून आणायला गेलेली हलीमा बाहेरच राहते. दोन माणसं दुसऱ्या मार्गाने घरात शिरतात. त्यांच्यासमोर भेदरलेली हलीमा आहे- ‘घरात आणखी कोण आहे?’ असं विचारल्यावर गप्प बसून राहणारी... आपल्या बाळाला इजा न करण्याच्या बोलीवर स्वत:चं शरीर त्यातल्या एकाच्या हवाली करणारी. आतल्या माणसांना बाहेरच्या आवाजांवरून काय घडतंय याची कल्पना येते. करीम बाहेर जाऊ मागतो, पण ओयुम त्याला थांबवते. पुन्हा एकदा समोर तीच दुविधा. एका व्यक्तीला वाचवण्यासाठी किती जणांचे प्राण पणाला लावायचे?

ओयुमचं वागणं बरोबर की चूक याचा निर्णय दिग्दर्शक घेत नाही; तो आपल्यावर सोडतो. मात्र, अशा प्रसंगांमधून येणारा तणाव, जाणवणारी घुसमट आणि अस्वस्थता तो आपल्यापर्यंत प्रत्येक क्षणाला पोचवत असतो. माणसांचं या खोलीतून त्या खोलीत जाणं, घरातल्या घरात फिरणं, कॅमेऱ्याने त्यांचा पाठलाग करणं, प्रसंगी क्लोजअप्सच्या माध्यमातून त्यांच्यावरच्या दडपणाची जाणीव करून देणं- यातून या घरातल्या माणसांचं जग किती कोंडलेलं आहे, त्यांना मोकळेपणाने श्वास घेता येत नाहीये, हे दिग्दर्शक आपल्यापर्यंत पोचवतो. सिनेमा त्या अर्थाने युद्धपट नाही, पण बाहेर होत असलेल्या त्या युद्धाची गडद छाया मात्र आहे. काळोख पडल्यावर सलीमला घरात आणण्यासाठी जिवावर उदार झालेला करीम, त्याच्यावरच्या प्रेमापोटी आपला जीव धोक्यात घालून त्याच्या मागे धावणारी यारा, स्वत:वर बलात्कारासारखा प्रसंग आल्यानंतरही आलियाची समजूत घालणारी हलीमा, देहलानीची अस्वस्थता समजणारे मुस्तफा आणि या सगळ्यांची जबाबदारी आपल्यावर आहे या भावनेने वावरणारी ओयुम- करारी, झटपट निर्णय घेणारी. तो निर्णय योग्य की अयोग्य याचा विचार करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही याची जाणीव असणारी. आपण खंबीर आहोत हे जणू इतरांना आणि स्वत:लाही वारंवार जाणवून देणारी. आणि रात्र झाली तरीही नवरा परत न आल्यामुळे उन्मळून पडणारी. प्रत्येक व्यक्तिरेखा एका परीने असहाय. युद्धाचे परिणाम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांवर होत असतात आणि ते भयानकच असतात, हे सांगणारी. कदाचित कुठल्याच युद्धाला ग्लोरिफाय करू नये, असं सूचित करणारी.

‘इनसिरियेटेड’ हा सिनेमा इफ्फी (भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव) मधला मी पाहिलेला सर्वोत्कृष्ट सिनेमा. फक्त 85 मिनिटांची लांबी असलेला फिलीप व्हॅन ल्यू (Philippe Van Leeuw) या बेल्जियम दिग्दर्शकाचा हा दुसरा सिनेमा आहे. आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्याने छायाचित्रकार म्हणून केली. त्याने आपला पहिला सिनेमा 2009 मध्ये दिग्दर्शित केला, ज्याचं नाव होतं- ‘द डे गॉड वॉक्ड अवे’. रवांडामधल्या नरसंहाराची पार्श्वभूमी या सिनेमाला होती. पण तिथेही त्याने प्रचारकी विधानं केलेली नाहीत. बहुसंख्या असलेल्या हुतू लोकांनी आपल्या अल्पसंख्याक टुट्‌सी बांधवांच्या केलेल्या हत्याकांडाची भीषणता एका बाईच्या अनुभवातून त्याने आपल्यासमोर मांडली.

या सिनेमाची कल्पना आपल्याला कशी सुचली, ते फिलीप व्हॅन ल्यूने एका मुलाखतीत सांगितलंय. ‘‘1992 च्या एप्रिल महिन्यात माझ्या मित्राचं कुटुंब रवांडाहून परतलं. तिथे आणीबाणीची परिस्थिती असल्यामुळे त्यांना आपल्या देशात परतायला सांगण्यात आलं होतं. त्या वेळी घर सोडताना त्यांनी त्यांच्या मुलांच्या आयाचं काम करणाऱ्या जॅकलीन या टुट्‌सी बाईला आपल्या घराच्या माळ्यावर लपून राहायला सांगितलं होतं. बाहेरच्या नरसंहारापासून तिचं रक्षण व्हावं म्हणून. तिचं पुढे काय झालं, हे त्यांना कधीही समजलं नाही.’’

सिनेमात फिलीप व्हॅन ल्यू या जॅकलीनचा पुढचा प्रवास दाखवतो. घरातून निसटून, लपून-छपून ती आपल्या गावात पोचते, मुलांना शोधण्याचा प्रयत्न करते आणि पुढे काय काय घडतं त्याची ही कहाणी आहे. सिनेमाभर पसरलेला दहशतवाद आहे, दडपण आहे, तणाव आहे.

हिंसेची पार्श्वभूमी हा या दिग्दर्शकाच्या पहिल्या दोन्ही सिनेमांमधला समान दुवा आहे. त्या हिंसेवर थेट भाष्य न करता माणसांच्या गोष्टीमधून त्याची भीषणता तो आपल्यासमोर मांडतो. 63 वर्षांच्या या दिग्दर्शकाच्या तिसऱ्या सिनेमावर आता लक्ष ठेवायला हवं.

‘इनसिरियेटेड’चं ट्रेलर युट्यूबवर उपलब्ध आहे.


एस. शशिधरन यांच्याकडून निषेध

यंदाचा चित्रपट महोत्सव गाजला तो इंडियन पॅनोरामामध्ये निवड झालेल्या दोन सिनेमांचं प्रदर्शन रद्द झाल्यामुळे. दिग्दर्शक रवी जाधव यांचा ‘न्यूड’ हा मराठी सिनेमा आणि एस. शशिधरन यांचा ‘एस दुर्गा’ हा सिनेमा. या दोन्ही सिनेमांची निवड ज्युरींनी केलेली होती. मात्र, आयोजकांनी थातूरमातुर कारणं देऊन हे सिनेमे बाहेर काढले आणि एकच गदारोळ माजला. या निर्णयाच्या निषेधार्थ काही ज्युरींनी आपले राजीनामेही दिले. रवी जाधव आणि त्यांच्या सिनेमाला मिळालेली वागणूक याचा निषेध मराठी चित्रपटसृष्टी करणार, अशा बातम्याही महोत्सव सुरू होण्याआधी येत होत्या. प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही. मुळात, ‘न्यूड’चे दिग्दर्शक आणि निर्मातेच फार काही करायला उत्सुक नसावेत, असं दिसत होतं. त्यामुळे इतरांनी त्यांची लढाई लढण्यात काहीच अर्थ नव्हता. (झी टॉकीजने ‘न्यूड’ची निर्मिती केलीये आणि त्यांच्याच ‘बियाँड द क्लाऊड्‌स’ या माजिद मजिदी यांच्या सिनेमाने महोत्सवाची सुरुवात झालेली असल्याने त्यांना हा विषय फार ताणायचा नव्हता, अशी कुजबूजही आयनॉक्सच्या आवारात ऐकायला मिळाली.)

मात्र एस. शशिधरन यांनी आपल्यावर झालेला अन्याय गप्प बसून सहन न करण्याचं ठरवलं. ते केरळच्या उच्च न्यायालयात गेले. तिथे त्यांच्या बाजूने निकाल लागला. आपला सिनेमा आता इफ्फीमध्ये दाखवला जाईल, म्हणून शशिधरन यांनी शेवटच्या दिवसापर्यंत वाट बघितली आणि अखेर आयनॉक्सच्या प्रांगणात आपल्या सहकाऱ्याबरोबर ‘सेव्ह डेमॉक्रसी’ असा फलक घेऊन आपला निषेध व्यक्त केला.

ते सांगत होते, ‘‘महोत्सवाचे संचालक आम्हाला धूप घालत नाहीयेत. मी त्यांना भेटायचा प्रयत्न करतोय  आणि ते मला एखाद्या रस्त्यावरच्या कुत्र्यासारखी वागणूक देताहेत. यात आपण न्यायालयाचाही अपमान करतो आहोत याचीसुद्धा या लोकांना फिकीर नाही. ही तर अघोषित आणीबाणीच आहे. तुमच्या विरोधात बोलणारे तुमचे शत्रू आहेत, असं आज मानलं जाऊ लागलंय. या हिंदुत्ववाद्यांनी काही वाचलेलं नाही. आपल्या पुराणात देवींची वर्णन वाचून पाहा, त्यांना कामरूपिणी असं म्हटलेलं आहे. म्हणजे सेक्सीच ना? त्यांना मुळात हिंदू धर्मच माहीत नाही. पण तरीही मी सेक्सी दुर्गा हे नाव बदलून ‘एस दुर्गा’ केलं. हा सिनेमा लोकांपर्यंत पोचावा यासाठी मी प्रयत्न करणार आहेच. केरळातही मी गावोगावी याचे शोज करू शकतो. पण मुद्दा तो नाहीये. इफ्फी किंवा इतर आंतरराष्ट्रीय महोत्सव किंवा राष्ट्रीय पुरस्कार ही व्यासपीठं कलात्मक सिनेमाला प्रोत्साहन देण्यासाठी असतात. तिथे माझी कलाकृती दाखवली जावी, ही माझी इच्छा असते. या व्यासपीठांवर माझ्या सिनेमाला स्थान मिळावं, असं मला वाटत असतं. म्हणून मग अशा सेन्सॉरशिपच्या विरोधात उभं राहायला हवं, असं वाटतं. पण इतकं सगळं करूनही असं घडणार असेल, माझा सिनेमा दाखवलाच जाणार नसेल; तर या सगळ्या लढाईचा काय उपयोग, असा प्रश्नही मनात येतो. उद्या मी पुन्हा कोर्टात गेलो तर माझा किती वेळ यात खर्च होईल याची एक वकील असल्यामुळे कल्पना मला आहे. मुळातला मी सिनेमा बनवणारा माणूस आहे. तेच मला करता आलं नाही, तर काय उपयोग? शिवाय, ही मंडळी जर कोर्टाचा निर्णयही मानत नसतील, तर एक नागरिक म्हणून आपण आणखी काय करणार? व्यावसायिक सिनेमामधले कोणीही माझ्या बाजूने बोललेलं नाही. त्यांना ते शक्यही नाही, कारण त्यांना कॉर्पोरेटचा पैसा लागतो. कॉर्पोरेट्‌सना सत्तेच्या जवळ असावं लागतं. ते कसे माझ्या बाजूने बोलतील?’’

Tags: फिल्म सिनेमा मीना कर्णिक इनसिरियेटेड इफ्फी 2017 cinema film Meena Karnik Insyriated IffI 2017 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात