Diwali_4 इराणी सिनेमाचा बदलता चेहरा
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

तीन सिनेमे आजच्या इराणी मुलींचं रूप दाखवणारे प्रातिनिधिक सिनेमे म्हणायचे का? आजच्या घडीला इराणमध्ये वर्षाला दोन-अडीचशे सिनेमे बनताहेत. यातले काही ठरावीक दिग्दर्शकांचे सिनेमे आंतरराष्ट्रीय महोत्सवांच्या निमित्ताने बघायला मिळतात. पण त्यावरून एक जनरलाइज्ड विधान करणं धाडसाचं होईल. जे काही दिसतं, त्यावरून बुरख्याच्या या देशातल्या मुली कायद्याच्या चौकटीत राहून आपला अवकाश शोधायचा प्रयत्न करताहेत, असं मात्र नक्की म्हणता येईल.

‘डॉटर’ या इराणी सिनेमाला या वर्षी इफ्फीमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सर्वोत्तम सिनेमाचं पारितोषिक मिळालं आणि त्या निमित्ताने बदलू लागलेल्या इराणी सिनेमाची एक लहानशी झलक पाहायला मिळाली. ‘फाईमेह आझादी आज पस्तीस वर्षांची आहे. तिने अजून लग्न केलेलं नाही. दहा वर्षांपूर्वी एका नात्यामधून बाहेर पडल्यानंतर तिने तेहरानमध्ये एकटं राहण्याचा निर्णय घेतला. अनेकांच्या भुवया त्या वेळी उंचावल्या होत्या. इस्लामिक देशात, आई-वडिलांच्या अपेक्षा धुडकावून एकटं राहण्याचा आणि लग्न न करण्याचा निर्णय घेतलेल्या आझादीसारख्या मुलींची संख्या इराणमध्ये वाढतेय...’’ 

शशांक बेंगाली या ‘लॉस एंजलिस टाइम्स’च्या आशियातील पत्रकाराने इराणला जाऊन आल्यानंतर लिहिलेल्या लेखाची ही सुरुवात आहे. इराणच्या न्यायव्यवस्थेची अधिकृत वृत्तसंस्था असलेल्या मिझानच्या आकडेवारीनुसार तीस वर्षांवरील तीस लाख सुशिक्षित मुली आज लग्न न करता राहताहेत. या संख्येत दिवसेंदिवस वाढच होतेय; कारण घटस्फोटांची संख्याही वाढतेय, विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींची आकडेवारी सुधारतेय, करिअरचे अनेक पर्याय त्यांच्यासमोर उभे ठाकताहेत आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मुली बदलू लागलेल्या असल्या तरी, इराणी पुरुष आपल्या परंपरांचं ओझं टाकून द्यायला तयार नाहीयेत. त्यांना हे नवं जग समजून घेता येत नाहीये. अजूनही त्यांना घरदार सांभाळणारी, नवऱ्याच्या आज्ञेत राहणारी मुलगी बायको म्हणून हवीये. 

हे सगळं सांगायचं कारण म्हणजे, इफ्फीमध्ये या वर्षी अशा काही मुलींचं प्रतिनिधित्व करणारे सिनेमे पाहायला मिळाले. त्यावरून सरसकट इराणी सिनेमा पुरोगामी होतोय असं विधान करता येत नसलं, तरी बदलाची चाहूल या सिनेमांमधून ऐकू येतेय, असं नक्कीच म्हणता येईल. उदाहरणार्थ- ‘डॉटर’. दिग्दर्शक रेझा मिरकरीमी यांच्या ‘डॉटर’ या सिनेमाला या वर्षीचा सुवर्णमयूर पुरस्कार मिळाला आणि त्यात काम करणाऱ्या फरहाद असलानी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिक मिळालं. ‘मोहसेन मखमलबाफ हे इराणचे प्रसिद्ध दिग्दर्शक आपलं स्फूर्तिस्थान आहेत,’ असं सुवर्णमयूर स्वीकारताना मिरकरीमी म्हणाले, यावरून त्यांच्या सिनेमांचा पोत लक्षात येतो.

रेझा मिरकरीमी गेली सोळा-सतरा वर्षं सिनेमे करताहेत. ‘द चाइल्ड अँड द सोल्जर’ हा त्यांचा पहिला सिनेमा. मात्र, त्यांच्यातलं वेगळेपण जाणवलं ते ‘अंडर द मूनलाईट’ या 2000मध्ये केलेल्या सिनेमामधून. सय्यद हसन हा तरुण मुल्ला बनण्यासाठी इस्लामचा अभ्यास करायला तेहरानला येतो. पदवी घेताना आवश्यक असणारे कपडे आणताना एक मुलगा त्याला भेटतो आणि त्याचे कपडे घेऊन जातो. त्याच्या मागे गेलेल्या सय्यदला एक वेगळंच जग अनुभवायला मिळतं. तिथली गरिबी पाहून त्याच्या मनात निर्माण झालेले प्रश्न हा सिनेमा आपल्यासमोरही मांडतो. एक प्रकारे आपल्याच धर्माची चिकित्सा हा सिनेमा करतो. 

अशा प्रकारचे सिनेमे इराणमध्ये जवळपास होतच नसल्याने मिरकरीमी यांच्या धाडसाचं त्या वेळी खूप कौतुक झालं होतं. दोन वर्षांपूर्वी त्यांचा आणखी एक सिनेमा इफ्फीमध्ये पाहायला मिळाला होता. सिनेमाचं नाव होतं ‘टुडे’. नऊ महिन्यांची एक गरोदर बाई आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेणारा एक प्रामाणिक टॅक्सीवाला यांची ती गोष्ट होती- टॅक्सीवाल्याच्या नजरेतून सांगितलेली, पण तरीही बाईची व्यथा मांडणारी. तिच्यावर नवऱ्याकडून होणारी जबरदस्ती, मारहाण या प्रश्नांना स्पर्श करणारी. एक ताकदीचा सिनेमा पाहिल्याचा आनंद ‘टुडे’ने दिला होता. त्यामानाने ‘डॉटर’ जरा फिका वाटला, तरी त्यातला वेगळेपणा भावणारा होता. 

सितारेह नावाच्या मुलीची ही गोष्ट. वडिलांनी मुली लहान असताना त्यांना स्वातंत्र्य दिलं असलं, तरी ते अचानक बदलतात. कर्मठ होतात. मुलींविषयीचे सगळे निर्णय आता तेच घेऊ लागतात. सितारेहच्या बहिणीचं लग्न जमलंय, तिच्या सासरचे लोक घरी येणार आहेत, घरात खूप कामं आहेत आणि सितारेहला तेहरानला जायचंय. तिची जिवाभावाची मैत्रीण देश सोडून शिकण्यासाठी परदेशात चाललीये. तिच्यासाठी सगळ्या मैत्रिणींनी पार्टी ठेवलीये. वडील अर्थातच सितारेहला तेहरानला जायची परवानगी देत नाहीत. बरोबर कुणी पुरुष नसताना एकट्या मुलीने असं बाहेर पडणं त्यांना मान्य नसतं. विमानाने तेहरान काही तासांच्या अंतरावर. सकाळी जायचं, मैत्रिणींबरोबर वेळ काढायचा आणि दुपारच्या फ्लाईटने परत घरी- बहिणीच्या सासरच्यांची सरबराई करण्याकरता... असा विचार करून सितारेह घरी कोणालाही न सांगता तेहरानला जाते आणि तिथे अडकते. 

घरी हे कळल्यावर वडिलांचा संताप होतो. ते गाडी काढून तेहरानला येतात, सितारेहशी एक शब्दही न बोलता तिला गाडीत घालतात. वाटेत काही तरी घडतं आणि आपला सगळा राग ते तिच्यावर काढतात. सितारेह त्यांना न सांगता गाडीतून उतरून निघून जाते. मग मात्र ते घाबरतात. तिची शोधाशोध सुरू होते आणि ती तिच्या आत्याच्या घरी आहे, हे वडिलांना कळतं. तेहरानमध्ये राहणाऱ्या या बहिणीने मनाविरुद्ध लग्न केल्यापासून सितारेहचे वडील भेटलेले नसतात. तिचं काय चाललंय, कसं चाललंय याची त्यांना कल्पना नसते. त्यानंतरचा सिनेमा हा भाऊ आणि बहिणीचा सामना आहे. बहिणीने आपलं ऐकलं नाही म्हणून मुलींच्या बाबतीत कडव्या झालेल्या वडिलांची कानउघाडणी आहे. 

मुलींना हव्या असलेल्या स्वातंत्र्याची आणि त्याबरोबर जाणीव असलेल्या जबाबदारीची चर्चा आहे. पुरुष कायम बरोबरच असतो असं नाही; तसा अट्टहास त्याने सोडायला हवा, हे सांगणं आहे. म्हटलं तर कथेचा जीव छोटासा आहे. पण सितारेह आणि तिच्या मैत्रिणींच्या गप्पांमधून इराणमधल्या तरुण मुलींचं मनोगत आपण ऐकतो. सितारेहला विमानतळावर सोडण्यासाठी वेगाने गाडी चालवणं, खिडकीतून बेभान वाऱ्याचा सामना करणं, धमाल-मस्तीचा अनुभव हवासा वाटणं... या सगळ्या गोष्टी फक्त पुरुषांसाठी नाहीत, हे या मुली सांगतात. आता त्यांना स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायचे आहेत? मग ते चुकले तरी त्यांचे परिणाम भोगायची त्यांची तयारी आहे. आत्याच्या खड्या सवालांमधून या इराणी मुली उत्तरं शोधताहेत याची जाणीव होते. या सिनेमाचं ट्रेलर नक्की पाहा. 

यु-ट्यूबची ही लिंक आहे- https://youtu.be/e7SxoyFEXow

‘इनव्हर्जन’मधली नायिकाही आपल्या भावासमोर असेच प्रश्न उभे करताना दिसते. निलोफर तिशीतली आहे. तिने लग्न केलेलं नाही. तिचा स्वत:चा व्यवसाय आहे. आपल्या आईबरोबर तेहरानमधल्या एका उच्चभ्रू वस्तीतल्या घरात ती राहतेय. एक भाऊ आणि एक बहीण आपापल्या संसारात तेहरानमध्येच, पण दुसरीकडे रहायला गेले आहेत. 

सिनेमा सुरू होतो त्या दिवशी तेहरानमध्ये कधी नव्हे एवढं प्रदूषण वाढलंय. निलोफरच्या आईला फुप्फुसांचा त्रास आहे. मुलगी नको-नको म्हणत असताना आई बाहेर जाते आणि आजारी पडते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तेहरानच्या हवेत राहणं तिच्या तब्येतीसाठी हानिकारक आहे. तिला गावाकडच्या घरी पाठवायचा निर्णय भाऊ व बहीण घेतात आणि आईबरोबर निलोफर जाणार, हे जणू आपोआप ठरतं- निलोफरला न विचारताच. तिचा व्यवसाय महत्त्वाचा नसतो. त्यातून ती एकटी. आईबरोबर राहत असल्याने आईची जबाबदारीही तिची असते. त्यामुळे आपलं सगळं करिअर सोडून तिने जावं, हे गृहीत असतं. 

निलोफर जाणार म्हणून तिचा भाऊ आपलं कर्ज चुकवण्यासाठी तिचं दुकान भाड्याने देऊन टाकतो. दहा वर्षं जो व्यवसाय तिने मन लावून जोपासलेला असतो, जिथे काम करून काही मुलींना आर्थिक कमाई होत असते; तो व्यवसाय एका फटक्यात बंद होतो. निलोफरला हे मान्य होत नाही. ती भावाला प्रश्न विचारते. ‘माझ्यासाठी तुम्ही निर्णय घेणारे कोण?’ असा सवाल करते. ‘आईच्या संपत्तीमध्ये वाटेकरी असाल,’ तर तिची काळजी घेण्यातही असायला हवं, असं सांगते. इनव्हर्जन प्रत्येकाने दहा-दहा दिवस आईबरोबर राहावं, असा प्रस्ताव देते. दरम्यान, तिचा जुना मित्र परत तिच्या आयुष्यात येतो. आपल्याला नव्याने सुख सापडणार, असं वाटत असतानाच त्याला एक मुलगा आहे आणि त्याने ते आपल्यापासून लपवलंय, हे तिला कळतं. आयुष्यातल्या एका कठीण वळणावर निलोफर येते, जिथे तिच्या मनासारखं काहीच होत नसतं. 

दिग्दर्शक बेहनाम बेहझादी यांचा हा तिसरा सिनेमा. 2007 साली त्यांनी ‘वुई ओन्ली लिव्ह ट्ईस’ हा आपला पहिला सिनेमा बनवला आणि त्यानंतर 2012मध्ये ‘अ रुल ऑफ ॲक्सिडेंट’ किंवा ‘बेंडिंग द रुल’ ज्यात थिएटर करणाऱ्या तरुण मुलामुलींची गोष्ट होती. मात्र, त्यांच्या नावावर सहलेखक म्हणून असलेला ‘हाफ मून’ हा कुर्दी दिग्दर्शक बाहमान घोबादी यांचा सिनेमा खूपच वेगळा होता. सद्दाम हुसेनच्या अंतानंतर इराकमधल्या कुर्दिस्तानात इराणमध्ये राहणाऱ्या कुर्दी संगीतकाराला आपली कला सादर करण्याचं आमंत्रण येतं. 

इराणच्या कायद्यानुसार बायकांना सगळ्यांसमोर संगीत सादर करण्याची परवानगी नसल्याने तो एका बाईला स्मगल करून नेतो आणि त्याला कोणकोणत्या संकटांचा सामना करावा लागतो, याविषयीचा हा सिनेमा होता. ‘इनव्हर्जन’ त्या मानाने साधा-सरळ आहे. बेहझादी यांनी एकट्या राहणाऱ्या एका मुलीला घरातले सगळे कसे गृहीत धरतात, याची एक गोष्ट आपल्यासमोर थेटपणे मांडली आहे. आणि ती तितक्याच थेटपणे आपल्याला भिडतेही. निलोफर आणि तिच्या भावामधला खटका पाहताना इराणीच का- अनेक भारतीय मुलींना निलोफरच्या जागी आपण स्वत:ला पाहतोय, असं नक्की वाटेल. त्यामुळे हा सिनेमा केवळ इराणी मुलींचा राहिलेला नाही. आणि तेच त्याचं यश आहे. 

सिनेमाच्या ट्रेलरची ही लिंक- https://youtu.be/SFQ8noNAwMI

या दोन्ही सिनेमांच्या मानाने दिग्दर्शक परवेझ शहाबाझी यांचा ‘मलेरिआ’ अगदीच सपक आहे. टिपिकल हिंदी सिनेमा. घरातून पळून निघालेले प्रियकर आणि प्रेयसी. त्यांना एक ट्रकवाला लिफ्ट देतो. त्याचा मलेरिआ नावाचा स्वत:चा एक म्युझिक बँड आहे. प्रियकराला पोलीस पकडून नेतात. मग हा ट्रकवाला त्या मुलीला आपल्याकडे आसरा देतो. आपल्या बँडमध्ये सामील करतो. वगैरे वगैरे. ‘मलेरिआ’चा इथे उल्लेख करण्याचं एकमेव कारण म्हणजे, एरवी सर्वसाधारण इराणी सिनेमांमध्ये न दिसणारं यातल्या मुलीचं बँडमध्ये सामील होणं, रस्त्यावर ड्रम वाजवणं आणि स्वत:चे निर्णय स्वत: घेणं. 

या सिनेमाचा ट्रेलरही यु-ट्यूबवर उपलब्ध आहे.https://youtu.be/2TdJbjWrplk

हे तीन सिनेमे आजच्या इराणी मुलींचं रूप दाखवणारे प्रातिनिधिक सिनेमे म्हणायचे का? आजच्या घडीला इराणमध्ये वर्षाला दोन-अडीचशे सिनेमे बनताहेत. यातले काही ठरावीक दिग्दर्शकांचे सिनेमे आंतरराष्ट्रीय महोत्सवांच्या निमित्ताने बघायला मिळतात. पण त्यावरून एक जनरलाइज्ड विधान करणं धाडसाचं होईल. जे काही दिसतं, त्यावरून बुरख्याच्या या देशातल्या मुली कायद्याच्या चौकटीत राहून आपला अवकाश शोधायचा प्रयत्न करताहेत, असं मात्र नक्की म्हणता येईल. आणि सिनेमाच का- सुरुवातीला उल्लेख केलेला एकटं राहण्याचा निर्णय घेतलेल्या तेहरानमधल्या मुलींवरचा लेखही हेच तर सांगतोय. 

Tags: iffi 2016 daughter inversion Malaria meena karnik international film festival irani movies weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात