डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

रेड कार्पेटचा गाजावाजा आणि 2115 मध्ये प्रदर्शित होणारा सिनेमा

कानच्या रेड कार्पेटवरून चालणं हे हॉलीवुडलाही प्रतिष्ठेचं वाटतं. खूप पूर्वीपासून इथे हॉलीवुडचे कलावंत येताहेत. पण ही संख्या आणि अमेरिकन सिनेमांचं अस्तित्वही वाढत चाललंय. कदाचित त्यामुळे कानला ग्लॅमर मिळालं आणि म्हणूनच जगभरातले अनेक महोत्सव याची नक्कल करू लागले. अगदी भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवामध्येही हिंदी चित्रपटसृष्टीला मिळणारं प्राधान्य हे त्याचंच लक्षण नाही का? याला आक्षेप घेणारेही अनेक जण आहेत. मला स्वत:ला त्यात फार आक्षेपार्ह काही वाटत नाही. कोणताही महोत्सव म्हणजे सिनेमाचा उत्सव साजरा करणं असतं. तो साजरा करण्याची  प्रत्येकाची वेगळी रीत. काही जण केवळ चांगले सिनेमे पाहून खूश होतात, काही स्टार्सच्या हजेरीमुळे भारावून जातात.

कानला येऊन दाखल झाल्यानंतर सुरुवातीचे दोन-चार दिवस या परिसराची, वातावरणाची आणि रस्त्यांची माहिती करून घेण्यात गेले. सोबतीला सिनेमे पाहणं असतंच, पण आधी या शहराविषयी आणि चित्रपट- महोत्सवामध्ये भेटलेल्या निरनिराळ्या माणसांविषयी समुद्राकाठी वसलेलं कान हे तसं छोटं शहर. पण इथला चित्रपटमहोत्सव जगातला मोठा. त्याचा प्रत्यय बसमधून उतरताक्षणी येतो. पॅले हा मुख्य व्हेन्यू. इथे दोन मोठी थिएटर्स आहेत. पैकी पहिलं ग्रँड थिएटर लुमिए आणि दुसरं सॅले देबुसी. स्पर्धेतले तसेच ‘आन्‌ सर्ते रिगा’ विभागातले सिनेमे इथे दाखवले जातात. याशिवाय पॅलेमध्ये साले बझीन, साले ब्युने आणि पॅले ए पासून ते के पर्यंत छोटी- मोठी थिएटर्स आहेत.

गोव्याप्रमाणेच इथेही भरपूर मोठ्या रांगा. पत्रकारांसाठी वेगळी, प्रतिनिधींसाठी वेगळी आणि आमंत्रितांसाठी वेगळी. रोज संध्याकाळी रेड कार्पेटचा सोहळा. जगभरातले आणि विशेषत: हॉलीवुडमधले मोठेमोठे स्टार्स, दिग्दर्शक आपापल्या सिनेमांसाठी इथे येतात, रेड कार्पेटवरून ग्रँड थिएटर लुमिएमध्ये ऐटीत शिरतात, पत्रकार परिषदा घेतात आणि निघून जातात. त्यांना पाहण्यासाठी कानमधले लोक तोबा गर्दी करतात. शेवटी सगळीकडचे फॅन्स सारखेच. आपल्या आवडत्या  स्टारला बघण्यासाठी काय वाटेल ते करणारे! पोलीस बंदोबस्त कडेकोट असतो. या वर्षी तर पॅरिस आणि अलीकडे ब्रुसेल्सला झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे त्यात वाढ झाल्याचं गेली कित्येक वर्षं नेमाने इथे येणाऱ्या अनेकांनी सांगितलं. ‘‘म्हणूनच या वेळेला थिएटरमध्ये पाणीसुद्धा न्यायला देत नाहीयेत. असं यापूर्वी कधीच झालं नव्हतं,’’ एका पत्रकाराने माहिती दिली. एकूण दोन लाख सिनेप्रेमी या महोत्सवाला हजेरी लावत असल्यामुळे प्रशासनाने या वर्षी पाचशे जास्त पोलीस मागवून घेतलेले आहेत.

कानच्या रेड कार्पेटवरून चालणं हे हॉलीवुडलाही प्रतिष्ठेचं वाटतं. खूप पूर्वीपासून इथे हॉलीवुडचे कलावंत येताहेत. पण ही संख्या आणि अमेरिकन सिनेमांचं अस्तित्वही वाढत चाललंय. कदाचित त्यामुळे कानला ग्लॅमर मिळालं आणि म्हणूनच जगभरातले अनेक महोत्सव याची नक्कल करू लागले. अगदी भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवामध्येही हिंदी चित्रपटसृष्टीला मिळणारं प्राधान्य हे त्याचंच लक्षण नाही का? याला आक्षेप घेणारेही अनेक जण आहेत. मला स्वत:ला त्यात फार आक्षेपार्ह काही वाटत नाही. कोणताही महोत्सव म्हणजे सिनेमाचा उत्सव साजरा करणं असतं. तो साजरा करण्याची  प्रत्येकाची वेगळी रीत. काही जण केवळ चांगले सिनेमे पाहून खूश होतात, काही स्टार्सच्या हजेरीमुळे भारावून जातात.

कानच्या मार्केटमध्ये या वर्षी महाराष्ट्राचं बूथ आहे. एखाद्या राज्याचं असं स्वत:चं बूथ असलेलं महाराष्ट्र हे आपल्या देशातलं एकमेव राज्य आहे. ‘रिंगण’, ‘हलाल’ आणि ‘वक्रतुंड महाकाय’ या तीन सिनेमांबरोबरच मुंबईतल्या फिल्मसिटीचं प्रमोशनही इथे होतंय. पत्रकार अशोक राणे यांनी ही जबाबदारी घेतलीये. संजय पाटील, आणि सिनेमांचे दिग्दर्शक, कलावंत 15 तारखेला येऊन दाखल झाले आहेत. पॅलेच्या समोर समुद्रकिनाऱ्याला लागून विविध देशांची पॅव्हेलियन्स आहेत. त्यात अर्थातच आपलंही आहे. भारताच्या या पॅव्हेलियनमध्ये गोवा, उत्तर प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यांचे प्रतिनिधी आपल्या राज्यात शूटिंगसाठी येण्याचे कोणते फायदे आहेत त्याची माहिती देतात. काही जण त्यात रस दाखवतात आणि त्यातूनच नेटवर्कींग होतं, कालांतराने त्याचे फायदे दिसू लागतात. त्यासाठी प्रयत्न मात्र सातत्याने करावे लागतात. मार्केटमध्येच ‘मेमेन्टो’ या वितरण कंपनीचाही बूथ आहे आणि 1३ तारखेला त्यांनी संपूर्ण फ्रान्समध्ये आपला ‘कोर्ट’ प्रदर्शित केल्याची माहिती मला मिळाली.

महोत्सव सुरू होण्याच्या आधीपासूनच वेगवेगळ्या ई- मेल्स यायला लागल्या होत्या- रशियन सिनेमाच्या पब्लिसिस्टपासून ते ॲनिमेशन फिल्म्सच्या विभागाची माहिती देणाऱ्या. 1३ तारखेला अशीच एक मेल आली आणि त्यातल्या मजकुराच्या वेगळेपणाने लक्ष वेधून घेतलं. ‘कोणीही पाहू शकणार नाही अशी कानमधली एकमेव फिल्म’ या शीर्षकाची ती मेल होती. दिग्दर्शक रॉबर्ट रॉड्रिग्ज यांनी ‘100 इयर्स’ नावाचा सिनेमा बनवला आहे. त्यात जॉन माल्कोविच या नटाने मुख्य भूमिका केली आहे. सिनेमा पूर्ण झालाय, पण दिग्दर्शकाला तो प्रदर्शित करायचाय 2115मध्ये. बरोबर वाचलंत, वर्ष चुकलेलं नाही. आणखी शंभर वर्षांनी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तोपर्यंत त्याची एकमेव प्रिंट कानमधल्या मॅजेस्टिक बॅरिअर या हॉटेलमधल्या एका लॉबीत खास बनवून घेण्यात आलेल्या तिजोरीत ठेवली गेली आहे. ही तिजोरी अशा पद्धतीने बनवलीये की, ती थेट शंभर वर्षांनंतर उघडेल. या वर्षीच्या महोत्सवामध्ये खास आमंत्रितांना ही तिजोरी आणि त्यात असलेली सिनेमाची प्रत पाहायला मिळणार आहे. मात्र, आज जिवंत असलेल्या कोणालाही या सिनेमाविषयी आणखी काहीही कळू शकणार नाही. शंभर वर्षांनंतर पृथ्वीवर काय घडत असेल, हे सिनेमाचं साधारण सूत्र आहे. का करावं वाटलं असेल दिग्दर्शकाला असं काही तरी? हा केवळ पब्लिसिटी स्टंट आहे का? आपण शंभर वर्षांनंतर सिनेमा बघणाऱ्या प्रेक्षकांना ‘एन्जॉय’ इतकंच फक्त म्हणू शकतो! आम्ही मात्र महोत्सवामध्ये दाखवले जात असलेले सिनेमे एन्जॉय करत आहोत.

शनिवारी ऐश्वर्या रायचं रेड कार्पेटवर आगमन झालं आणि त्याच दिवशी रात्री तिच्या ‘सरबजित’ या ओमंग कुमार दिग्दर्शित सिनेमाचा शोसुद्धा झाला. अर्थात, हे व्यावसायिक स्क्रिनिंग होतं. म्हणजे महोत्सवाच्या आयोजकांना पैसे देऊन थिएटर घ्यायचं आणि आपला सिनेमा दाखवायचा. जे तीन मराठी सिनेमे दाखवले गेले, तेही याच पद्धतीने दाखवले गेले. इथे खूप माणसंही भेटताहेत. भारताच्या पॅव्हेलियनमध्ये भारतभरातून आलेले पत्रकार आहेत, विविध राज्यांमधून आलेले अधिकारी आहेत, फ्रान्समधले भारतीय दूतावासात काम करणारे अधिकारी आहेत. पण गप्पा मारायला खरी मजा येतेय ती परदेशातून आलेल्या लोकांबरोबर. नेदरलँडहून आलेला एक तरुण पत्रकार मी भारतीय आहे म्हटल्यावर आपल्या भारताच्या भेटीविषयी सांगू लागला. दक्षिण भारत किती सुंदर आहे, तिथलं जेवण किती रुचकर आहे, हे तो मला सांगत होता. यानंतर उत्तर भारताचा दौरा करायची इच्छाही त्याने व्यक्त केली. झ्युरिचच्या विमानतळावर कॅनडाहून आलेली निर्माती भेटली. वेगवेगळ्या देशांबरोबर चित्रपटनिर्मिती करण्याची आपल्या संस्थेची इच्छा आणि प्रयत्न आहे, असं सांगत होती. जर्मनीहून आलेला भारतीय चित्रपटांचा चाहता भेटला आणि 95 वर्षांच्या बाईवर डॉक्युमेंटरी करणारी अमेरिकन दिग्दर्शकही भेटली. सिनेमांबरोबरच अशा माणसांच्या भेटींमुळेही आपण समृद्ध बनतोच ना!

Tags: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फ्रान्स कान फेस्टीव्हल international film fetival films kaan festival meena karnik मीना कर्णिक weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके