डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मल्याळी दिग्दर्शक लिजो जोसे पेलिसरी

‘जलिकट्टू’ सिनेमाचं तामिळनाडूमध्ये होणाऱ्या ‘जलिकट्टू’ किंवा ‘सलिकट्टू’ या पारंपरिक खेळाशी नावाखेरीज दुसरं कोणतंही साधर्म्य नाही. या खेळात एका ठरावीक जातीचा बैल लोकांच्या गर्दीत सोडला जातो आणि त्यात सहभागी झालेले पुरुष आपल्या दोन्ही हातांनी या बैलाची मदार पकडून त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. बैल स्वाभाविकच सुटण्याचा प्रयत्न करत असतो. ‘माणूस विरुद्ध बैल’ अशी ही ताकदीची स्पर्धा असते. या सिनेमामध्ये माणसाने रेड्याविरुद्ध पुकारलेलं युद्ध आहे, पण ते अगदी वेगळ्या परिस्थितीतलं. ‘माओइस्ट’ नावाच्या हरीश या लेखकाच्या लघुकथेवर हा सिनेमा आधारलेला आहे. गेल्या वर्षीच्या ऑस्करसाठी भारताची एन्ट्री म्हणून ‘जलिकट्टू’ची निवड करण्यात आली होती.

एखादं शहर.

एखादं गाव.

खूप सारी गर्दी.

खूप सारा गोंधळ.

खूप सारे खाण्याचे पदार्थ.

खूप सारी माणसं.

त्यांच्या नात्यांमधली गुंतागुंत.

त्याला अनेक पदर. काही सरळसोट. बरेचसे क्लिष्ट.

आणि तरीही प्रेक्षकांना बांधून ठेवण्याची ताकद. नुसतंच जखडून ठेवणं नाही, तर कालांतराने प्रेक्षकांना आपण पडद्यावरच्या त्या गर्दीतलेच एक आहोत असं वाटावं इतकं त्यात गुंतवून ठेवण्याची ताकद.

मल्याळम दिग्दर्शक लिजो जोसे पेलिसरीच्या सिनेमांचं हे वैशिष्ट्य म्हणायला हवं. त्याच्या ‘जलिकट्टू’ची सुरुवात आठवतेय? अंगावर येईल असा संगीताचा ठेका. आणि पडद्यावरच्या काळोखात दिसतो एका पुरुषाचा खाडकन उघडणारा डोळा. त्या पाठोपाठ दुसऱ्याचा. मग तिसऱ्याचा. पहाटेच्या त्या अंधारात गाव जागं होतंय हे सांगत असतानाच, इथे काहीतरी घडणार आहे याचीही जाणीव करून देणारं ते संगीत अर्ध्या क्षणात आपल्याला त्या गावाची ओळख करून देतं. पुरुषीपणा अंगावर मिरवणारं. रांगडं. बरंचसं लाऊडही. इथली माणसं एकमेकांशी शांतपणे बोलतच नाहीत जणू! ती ओरडतात, फिस्कारतात आणि भांडतात. एकमेकांवर आणि घरातल्या बायकांवरही.

पहिल्या दहा-अकरा मिनिटांमध्ये आपण गावाच्या खाटीकखान्याला भेट दिलेली असते, तिथे वेगाने होणारे मांसाचे तुकडे, गिऱ्हाइकांची गर्दी आणि एका मोठ्या हस्तीच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी एक रेडा मारण्याची प्रक्रिया सुरूही झालेली असते. दुर्दैवाने तो रेडा खाटकांच्या हातून निसटतो आणि मग पुढची ऐंशी मिनिटं आपण हे श्वापद शोधणाऱ्या, त्याला मारू पाहणाऱ्या गावातल्या पुरुषांच्या झुंडीमध्ये हरवून जातो. यात एकाच मुलीवर प्रेम करणारे आणि त्यामुळे एकमेकांचा तिरस्कार करणारे आणि संधी मिळताच एकमेकांवर सूड उगवणारे दोन तरुण आहेत. बायकोला मारहाण करणारा इन्स्पेक्टर आहे. कर्ज दिलेला आणि कर्ज घेतलेला यांच्यातले ताणतणाव आहेत. त्यांचे आपापसांतले हेवेदावे, एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न, अख्खं गाव एका गोष्टीच्या मागे लागलेलं असतानाही गावातली सामाजिक उतरंड कायम असणं या सर्वांचे आपण साक्षीदार होत असतो. मोकाट सुटलेला हा रेडा समोर जे जे येईल ते नष्ट करू लागतो. मग ती रस्त्यावरची दुकानं असोत की शेतात लावलेली धान्याची रोपं. त्याला पकडू पाहणाऱ्या गावातल्या पुरुषांच्या रूपाने माणूसपण नष्ट करणारी हिंसक वृत्ती आपल्यासमोर येऊ लागते आणि दुसऱ्या बाजूला गिरीश गंगाधरन यांचा कॅमेरा हिरव्यागार जंगलाचं सकाळचं आणि रात्रीचं सौंदर्य टिपत असतो. झुंडींच्या हातातल्या मशालींच्या उजेडात ते जंगल रहस्यमय वाटतं. आणि त्याच्या जोडीला असतो तो रेड्याच्या फुरफुरण्याचा आवाज. आणि संपूर्ण सिनेमाभर पसरलेलं त्याचं अस्तित्व.

या सिनेमात पुरुषांच्या व्यक्तिरेखा ठसठशीत आहेत हे खरंच. कारण रेड्याच्या मागे लागणाऱ्या बायका आपल्याकडे दिसत नाहीत, मग त्या कशा दाखवणार? असा लिजोचा या बाबतीतला युक्तिवाद आहे. किंबहुना पुरुषी अहंकारावरच दिग्दर्शकाला भाष्य करायचंय. तो म्हणतो, ‘‘माझ्या दृष्टीने मला जी गोष्ट सांगायचीये त्यासाठी आवश्यक त्या गोष्टी मी करतो. खरं तर या सिनेमात दोनच व्यक्तिरेखा आहेत. एक आहे रेडा आणि दुसरी आहे गर्दी. या गर्दीत कुणीही असू शकतं.’’ त्यामुळे इथल्या बायका पुरुषांच्या अहंकाराचा बळी म्हणूनच आपल्यासमोर येतात. रोज तोच तोच नाश्ता करणाऱ्या बायकोवर हात उगारणारा नवरा आपण पाहतो. बायकोच्या शरीराशी झटापट करणारा पुरुष आपल्याला दिसतो. बहुतेक बायकांनी ‘हे असंच असणार’ म्हणून आपलं नशीब स्वीकारलंय हेसुद्धा आपल्या लक्षात येतं. मात्र, मधूनच एखाद्या प्रसंगातून या बायकाही संधी मिळताच इतर बायकांविषयी कुत्सितपणे बोलताना आपण ऐकतो आणि सामाजिक आणि आर्थिक स्तर इथेही असतातच याची जाणीव होते.

माणसामध्ये असलेल्या दांभिकपणाचं, स्वत:वर वेळ आली की वेगळी भूमिका घेण्याच्या दुटप्पीपणाचं दर्शनही या गोष्टीत आपल्याला होतं. रेडाही या निसर्गाचा एक भाग आहे, त्याचासुद्धा या मातीवर अधिकार आहे असं प्रेमाने सांगणारा एक गावकरी आपल्या शेताची नासधूस झालेली पाहताच तावातावाने रेड्याला शिव्या घालू लागतो तेव्हा मजा वाटते. गंमत म्हणजे त्या शिव्या आपल्या कानांवर पडतच नाहीत. आपल्याला दिसतो तो फक्त त्याचा संतापलेला चेहरा. आणि ऐकू येतं पार्श्वभूमीला वाजणारं संगीत.

...आणि मग ती शेवटची दहा मिनिटं. त्वेषाने या रेड्याच्या अंगावर लाकडी भाले फेकणारे, त्याला जखमी करणारे, रक्तबंबाळ करणारे बेभान झालेले गावातले पुरुष. एका श्वापदाचा शोध घेताना स्वत:च श्वापद बनलेले. एव्हाना तो रेडा हे केवळ निमित्त बनलेलं असतं. या रेड्यालाही लाजवेल अशी जनावरं या पुरुषांच्या रूपाने आपल्या समोर येऊ लागलेली असतात. कुठून येतो इतका पराकोटीचा द्वेष? आपल्याच गावातल्या आपल्याच शेजाऱ्यावर तुटून पडण्यामध्ये कोणता पुरुषार्थ जाणवत असतो? की आपलं कर्तृत्व दाखवण्यासाठी इतर कोणताही मार्ग सापडत नाही म्हणून ही हिंसा बाहेर पडते? (सप्टेंबर महिन्यात आसाममध्ये पोलिसांनी काठी घेऊन धावणाऱ्या एका निदर्शकावर गोळी झाडली. त्याला मारहाण केली. पोलिसांबरोबर असलेल्या एक फोटोग्राफरने जमिनीवर पडलेल्या त्याच्या निष्प्राण शरीरावर धावत जाऊन उडी मारली, त्याला लाथा घातल्या. तो अंगावर शहारा आणणारा व्हिडिओ पाहताना हेच प्रश्न मनात आले होते.)

‘जलिकट्टू’ सिनेमाचं तामिळनाडूमध्ये होणाऱ्या ‘जलिकट्टू’ किंवा ‘सलिकट्टू’ या पारंपरिक खेळाशी नावाखेरीज दुसरं कोणतंही साधर्म्य नाही. या खेळात एका ठरावीक जातीचा बैल लोकांच्या गर्दीत सोडला जातो आणि त्यात सहभागी झालेले पुरुष आपल्या दोन्ही हातांनी या बैलाची मदार पकडून त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. बैल स्वाभाविकच सुटण्याचा प्रयत्न करत असतो. ‘माणूस विरुद्ध बैल’ अशी ही ताकदीची स्पर्धा असते. या सिनेमामध्ये माणसाने रेड्याविरुद्ध पुकारलेलं युद्ध आहे, पण ते अगदी वेगळ्या परिस्थितीतलं. ‘माओइस्ट’ नावाच्या हरीश या लेखकाच्या लघुकथेवर हा सिनेमा आधारलेला आहे. गेल्या वर्षीच्या ऑस्करसाठी भारताची एन्ट्री म्हणून ‘जलिकट्टू’ची निवड करण्यात आली होती.

तांत्रिकदृष्ट्या ‘जलिकट्टू’ निव्वळ अप्रतिम आहे. हा सिनेमा सुरू झाला आणि तो इतका लाऊड का आहे असा प्रश्न क्षणभर माझ्या मनात निर्माण झाला होता. सगळे पुरुष एकमेकांशी उच्च स्वरात बोलतात, साध्या साध्या गोष्टींसाठी आक्रस्ताळेपणा करतात. पण जसजशी गोष्ट पुढे सरकू लागली तसं लक्षात आलं की हाच तर मुद्दा आहे पुरुषीपण ठसवण्याचा, बारीकसारीक गोष्टींमध्ये आपला इगो आणण्याचा. आणि त्याला जोड आहे ती नेमक्या संगीताची. प्रशांत पिल्लई यांचं संगीत आणि रंगनाथ रवी यांचं साउंड डिझाइन हे या सिनेमाचं खूप मोठं वैशिष्ट्य म्हणायला हवं. त्यांनी केलेला ढोलाचा वापर किंवा बैल कापताना दगडावर होणारा सुऱ्याच्या आवाजाचा वापर सिनेमाचा सूर काय आहे यावर शिक्कामोर्तब करतात.

लिजो आणि त्याच्या टीमने केवळ 38 दिवसांमध्ये ‘जलिकट्टू’चं शूटिंग केलं. त्या आधीचा त्याचा सिनेमा ‘इ.मा.यो.’ विविध चित्रपट महोत्सवांची वारी करत असताना तो हे शूटिंग करत होता. आपल्या शूटिंगच्या एकूण प्रक्रियेविषयी बोलताना लिजोने एका मुलाखतीमध्ये म्हटलंय, ‘‘माझ्या ‘अंगमलाई डायरीज’मध्ये जेवण, खाद्यपदार्थ यांविषयीचं प्रेम दिसतं आणि इथे त्याभोवती एक दहशत जाणवते असं म्हटलं जातं. पण मुळातच ‘जलिकट्टू’ ज्या लघुकथेवर आधारलेला आहे त्यात या दहशतीचा समावेश आहे. त्यामुळे मला यातली दृश्यं शक्य तेवढी जंगली असायला हवी होती. सिनेमाचा लुक, सेटिंग, पार्श्वभूमी या सगळ्यांतून ते सतत जाणवत राहायला हवं होतं. आणि माझा कॅमेरामन गिरीशमुळेच मला ते सगळं करता आलं.’’

आणि त्या रेड्याचं काय? ‘माओईस्ट’वर सिनेमा करायचं मनात आल्यानंतर प्रत्यक्षात ‘जलिकट्टू’चं शूटिंग करायला सुरुवात करेपर्यंत दोन वर्षं उलटून गेली होती. दरम्यानच्या काळात लिजोने एक सिनेमाही दिग्दर्शित केला होता. या दोन वर्षांच्या काळात सिनेमात वापरायचा बैल आपल्याला हवा तसा बनायला हवा यासाठी लिजो आणि त्याच्या टीमचे प्रयत्न चालू होते. त्याचा मुख्य साहाय्यक असलेला टिनू पप्पाचन सांगतो की या रेड्याचा नेमका लुक मिळावा यासाठीही त्यांनी तीन महिने घालवले. लिजोला व्हीएफक्सचा पर्याय होता, पण त्याला ज्या प्रकारचे व्हिज्युअल इफेक्ट्‌स हवे होते ते त्यांच्या बजेटमध्ये शक्य नव्हते. ‘‘अखेर आम्ही एक रेडा मिळवला आणि चेन्नईच्या एका कारागिराला तीन मॉडेल्स बनवायला सांगितली. या मॉडेल्सवर खऱ्या रेड्याची त्वचा लावण्यात आली होती,’’ असं लिजो सांगतो.

इथे दोन प्रकारचे रेडे वापरण्यात आले आहेत. एक खरा, ज्याचा लाँग शॉट्‌ससाठी वापर केला गेला आणि दुसरा होता डमी किंवा ॲनिमाट्रॉनिक्सने बनवलेला. ज्याला पूर्वी आपण रोबो म्हणत असू. साधारण तेच तंत्रज्ञान इथे वापरलं जातं. फक्त रोबोची जागा आता प्रत्यक्षात दिसणाऱ्या जिवंत प्राण्यांनी किंवा माणसांनी घेतलेली आहे. या तंत्रज्ञानाद्वारे केलेल्या आकृती कॉम्प्युटरद्वारे हाताळता येतात किंवा माणूसही त्यांचं नियंत्रण करू शकतो. ‘जलिकट्टू’मध्ये असलेला ॲनिमाट्रॉनिक डमी रेड्याचे क्लोज अप्स घेण्यासाठी वापरण्यात आला आहे. स्वाभाविकच रेड्याचं शूटिंग करणं ही खूप कठीण गोष्ट होती. पण त्याहून कठीण होता क्लायमॅक्स.

‘आमच्यापाशी त्या संपूर्ण दृश्याचं डिझाइन तयार होतं. काय हवंय हे डोक्यात पक्कं होतं, पण ते प्रत्यक्षात कसं उतरेल याची धाकधूक होती. कारण त्यात खूप जास्त माणसं होती. दोन-तीन दिवस आमचं ते शूटिंग चाललं.’’ आणि सुन्न करणाऱ्या त्या क्लायमॅक्सने ‘जलिकट्टू’ला खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं.

*   

लिजो जोसे पेलिसरी हे नाव ‘जलिकट्टू’मुळे भारतातल्या घराघरांत पोहोचलं, आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलं हे जरी खरं असलं, तरी सिनेमामध्ये रस असणाऱ्या आणि त्यातूनही मल्याळम सिनेमाकडे लक्ष असलेल्यांच्या दृष्टीने या दिग्दर्शकाने ‘अंगमलाई डायरीज’ आणि ‘इ.मा.यो.’ या सिनेमांमधून आपलं वेगळं स्थान निश्चित केलेलं होतं. आणि त्याही आधी आलेल्या त्याच्या सिनेमांनी हा काहीतरी प्रयोग करू पाहणारा दिग्दर्शक आहे याची जाणीव करून दिलेली होती.

‘नायकन’ (2010) हा लिजोचा पहिला सिनेमा. लिजोने काही शॉर्ट फिल्म्स केल्या. लहान मुलांना घेऊन केलेली ‘द गेम’ साडेतीन मिनिटांची फिल्म आहे. एक मुलगा सायकलवर बसलाय. आणि त्याच्या मागे लागली आहेत सायकलवरच स्वार झालेली अनेक मुलं. मुलगा वेगाने सायकल पळवतोय. इतर मुलं त्याचा पाठलाग करताहेत. कधी क्लोजअप्स, कधी लाँग शॉट्‌स. मुलगा सायकल दामटवतोय. तो एका उघड्या माळरानावर येतो आणि अचानक त्याला समोर कुंपण घातलेलं दिसतं. पुढे जायला मार्गच नाही. तो थांबतो. मागे वळून पाहतो. काही अंतरावर एका ओळीत सगळी मुलं थांबलेली आहेत. त्यातला एक जण सायकलवरून उतरतो आणि या मुलाच्या दिशेने चालू लागतो...

एका चार मिनिटांच्या फिल्ममध्येही लिजो आपल्या मनातला थरार जागवतो. पुढे काय होणार याची उत्सुकता चाळवतो. या दिग्दर्शकाला थ्रिलर्समध्ये खास रस आहे हे त्या वेळीच लक्षात आलेलं असतं. त्यामुळे त्याचा पहिला पूर्ण लांबीचा सिनेमा याच पठडीतला असणं यात नवल ते काय असणार!

‘नायकन’ ही तशी सूडकथा आहे. म्हटलं तर गोष्टीत फारसं नावीन्य नाही. कथकली नृत्य करणाऱ्या बापाचा आणि बहिणीचा खून होतो आणि वडिलांकडून हे नृत्य शिकणारा मुलगा त्याचा सूड घेतो ही एका ओळीतली कथा. पण सिनेमा म्हणजे तेवढंच नसतं. ती कथा पडद्यावर कसा आणि कोणता आकार घेते, कोणत्या पद्धतीने सांगितली जाते यावर त्याचं वेगळेपण ठरतं. ‘नायकन’मध्ये असे एलिमेंट्‌स प्रकर्षाने जाणवतात. कथकलीचा केलेला वापर कौतुकास्पद वाटतो. खलनायकाचं जादूगार असणं इंटरेस्टिंग बनतं. सिनेमाची गोष्ट आपल्यासमोर सरळसोट मार्गाने सादर होत नाही. सुरुवातीच्या दृश्याचा संदर्भ नंतर येतो. ती सतत मागेपुढे जात राहते. पोस्ट मॉर्टेमच्या टेबलवर अचानक जिवंत झालेली एक व्यक्ती आपल्याला ही गोष्ट सांगू लागते. या सगळ्यांमुळे नेहमीचं गुन्हेगारी जग, दोन गँग्समधली स्पर्धा, नायकाने खलनायकावर सूड उगवण्यासाठी घेतलेली एका वयस्क गँगस्टरची मदत, त्याचं गुंड होणं हे सगळं नेहमी ऐकलेल्या आणि पाहिलेल्या सिनेमामधलंच असलं तरी वेगळं वाटतं. यातल्या काही मारामाऱ्या वेगळ्या वाटतात. आणि बऱ्याच टिपिकलही.

‘नायकन’ बऱ्यापैकी सपक सिनेमा आहे. त्यात दोष निश्चितच आहे. पण तरीही तो वेगळा आहे. ‘नायकन’ फार चालला नाही. पण लिजो जोसे पेलिसरी नावाच्या नवीन दिग्दर्शकाची चाहूल निश्चितच लागली होती. आणि त्याच्या ‘सिटी ऑफ गॉड’ने (2011) त्यावर शिक्कामोर्तब केलं.

*   

2003 मध्ये ‘सिटी ऑफ गॉड’ (सिदाद दे दिअस) नावाचा ब्राझीलचा अप्रतिम सिनेमा प्रदर्शित झाला होता. रिओ द जनेरिओमधल्या एका छोट्याशा उपनगरात त्या सिनेमाची गोष्ट घडते. पराकोटीची बेकारी आणि समोर आशेने बघण्यासारखं भविष्यही नाही. बारा, तेरा, पंधरा वर्षांची मुलंही गुन्हेगारी जगताशी संबंधित. मृत्यू हे अतिशय कोरडेपणाने स्वीकारलेलं वास्तव आहे त्यांच्या दृष्टीने. बंदुकींचा सहजी वापरही या लहान मुलांच्या अंगवळणी पडलाय. अतिशय भयाण असं हे जग. दिलासा देणारा एकही क्षण नाही. काही बरं घडेल अशी आशा नाही. हा सिनेमा पाहताना खूप त्रास होतो. असहाय वाटत राहतं. दिग्दर्शक फर्नांडो मेरिलेसचा हा सिनेमा जगातल्या सर्वोत्तम सिनेमांपैकी एक मानला जातो.

लिजोचा ‘सिटी ऑफ गॉड’ या सिनेमाच्या जवळपासही पोहोचत नाही. पण यातलं जगही साधंसरळ नाही. सोनी वदयत्तिल नावाच्या अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या उद्योगपतीचा ज्योतिलाल नावाचा एक खास माणूस आहे जो त्याच्यासाठी गैरमार्गाने करण्याची सगळी कामं पार पाडतो. सोनीला जिचं आकर्षण वाटतंय ती सूर्यप्रभा नावाची एक नायिका आहे. अनेक तडजोडी करून तिने आपलं स्थान या चित्रपटसृष्टीत पक्कं केलंय, पण तरीही आपला भूतकाळ ती विसरू शकत नाहीये. विजी नावाची एक उच्चभ्रू महिला आहे. सोनी आणि ज्योतिलालमुळे तिच्या नवऱ्याचा खून झालाय आणि कोणत्याही मार्गाने तिला या दोघांचा सूड उगवायचाय. त्यासाठी आपलं शरीर वापरणंही तिला मंजूर आहे. आणि या सगळ्यांच्या पलीकडे जगणारा स्वर्णवेल आहे, एक तमीळ बांधकाम मजूर. त्याच्याच साइटवर काम करणाऱ्या मरथक्कमच्या तो प्रेमात आहे. तिचं लग्न झालंय हे त्याला माहितीये, तिला मुलगा आहे हेही ठाऊकेय. पण तिचा नवरा तिचा छळ करत असल्यामुळे ती त्याला सोडून आलीये याची जाणीव असल्यामुळे तो तिच्याशी लग्न करू पाहतोय. या स्वर्णवेलसाठी कोची शहर हे केरळीय माणसाचं गल्फ किंवा अमेरिका आहे - सिटी ऑफ गॉड. मात्र, देवाची या शहरावर मेहेरनजर राहिलेली नाही. जणू त्याने आपल्या मुलांना, निदान काही मुलांना वाऱ्यावर सोडून दिलंय!

ही सगळी आयुष्यं एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत. थेट नव्हे, पण कोणत्या ना कोणत्या मार्गाने. त्यामुळे एकच घटना आपल्याला वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या दृष्टिकोनांतून पाहायला मिळते. त्यावरची त्यांची त्यांची प्रतिक्रिया आपल्याला विचार करायला लावते. एकीकडे सोनीचं श्रीमंती आयुष्य असतं. तिथे उंची दारू वाहत असते आणि दुसरीकडे मजुरांच्या बाया गुत्त्यामधल्या दारूत आपले श्रम विसरू पाहत असतात. स्वर्णवेल आणि मरथक्कमची एकमेकांवरच्या विश्वासावर आधारलेली ही लव्ह स्टोरीही आहे. सोनी आणि ज्योतिलालचं पूर्णपणे विश्वासघातावर आधारलेलं आयुष्यसुद्धा. विजीचं एकटेपण आहे आणि सूर्यप्रभाची तगमग.

लिजोच्या सिनेमांमधून बायकांच्या व्यक्तिरेखांवर किंचित अन्याय होतो असं वाटतं. ‘इ.मा.यो.’ आणि ‘सिटी ऑफ गॉड’मधल्या या बायकांचा अपवाद वगळता ‘सिटी ऑफ गॉड’मधल्या तीनही नायिका स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या आहेत, स्वत:साठी निर्णय घेऊ शकणाऱ्या आहेत.

‘सिटी ऑफ गॉड’चं समीक्षकांनी कौतुक केलं. नव्या पिढीचा मल्याळम सिनेमा म्हणून त्याचं नाव घेतलं गेलं, पण तोही फारसा चालला नाही. आणि कळत्या वयापासून सिनेसृष्टीत काम करण्याचं आपण पाहिलेलं स्वप्न धुळीला मिळणार की काय, असा विचार लिजोच्या मनात येऊ लागला.

*

कळायला लागलं तेव्हापासून आपल्याला सिनेमाचं वेड होतं, असं लिजो सांगतो. त्याचे वडील, जोसे पेलिसेरी नाटकांमधून काम करत. सारथी थिएटर्स नावाची त्यांची स्वत:ची एक नाटक कंपनीही होती. त्यामुळे शाळेला सुट्टी लागली की लिजोचा बहुतेक वेळ नाटकाच्या तालमींना हजेरी लावण्यात जायचा. त्याच्या वडिलांना रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट कलाकाराचा राज्य पुरस्कार मिळालेला होता. त्याचा जन्म झाला तोवर त्याचे वडील सिनेमांमधून काम करू लागले होते. कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून दक्षिणेकडच्या शंभरांहून अधिक सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे. कालांतराने काही टीव्ही सिरियल्समध्ये त्यांनी भूमिका केल्या. लिजोचे आजोबा- आईचे वडील- सिनेमाचे शौकीन होते. त्यामुळे सुट्टीत त्यांच्याकडे गेलं की रोज ते नातवंडांना घेऊन सिनेमा पाहायला जात. लिजोचा जन्म 1978चा. त्या वेळी त्यांच्या भागात पहिल्या रांगेचं तिकीट दोन रुपये होतं. त्यामुळे एखाद्या नातेवाइकाने लाडाने हातात वीस रुपये ठेवले की दहा सिनेमांची सोय झाली असा विचार त्याच्या मनात यायचा. त्यामुळे मोठं होऊन आपण याच क्षेत्रात जायचं हे मनाशी पक्कं झालं होतं.

फिल्म कम्पॅनियन या वेब पोर्टलवर दिलेल्या एका मुलाखतीमध्ये लिजोने म्हटलंय, ‘‘दहावी पास झालो आणि मी आता दिग्दर्शक बनू का? असं मी वडिलांना विचारलं. त्यांनी म्हटलं- ‘तू अजून म्हणावा तितका प्रगल्भ झालेला नाहीस. अशा वेळी तू या क्षेत्रात काही करू पाहिलंस तर लोक तुला गंभीरपणे घेणार नाहीत. त्यापेक्षा तू पुढचं शिक्षण का नाही पूर्ण करत? त्यानंतर ठरव तुला हेच करायचंय की नाही ते.’ ’’ वडिलांचा सल्ला लिजोने ऐकला आणि त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं. पदवी घेतल्यानंतर त्याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅन्टेशन मॅनेजमेंटमधून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स केलं आणि टाइल्स बनवणाऱ्या एका कंपनीत नोकरी स्वीकारली. एमबीए केलेलं असल्यामुळे अशी एखादी नोकरी करण्यासाठी त्याच्यावर घरून दडपणही बरंच होतं.

‘‘मी बहुधा बरं काम करत नसणार. निदान मला तरी तसं वाटत होतं. एके दिवशी सकाळी अकरा-साडेअकरा वाजता मी वडिलांना फोन केला आणि सांगितलं की मला हे काम जमत नाहीये. मी नोकरीचा राजीनामा दिला. आजतागायत मी माझं डिग्री सर्टिफिकेट, एमबीएचं सर्टिफिकेट काहीही घेतलेलं नाही. माझ्या पासपोर्टवर ईसीआरचा ठप्पा आहे. आता ही सगळी कागदपत्रं व्यवस्थित जमा करण्याचा प्रयत्न मी करतोय,’’ लिजो सांगतो.

नोकरी सोडून सिनेमाच्या क्षेत्रात येण्याचा निर्णय लिजोने पक्का केला, तेव्हा वडील त्याच्या पाठीशी उभे राहिले. लिजोने मनोज पिल्लई या ॲड फिल्ममेकरचा सहायक म्हणून काम करायला सुरुवात केली. आणि मग त्याच सुमारास तो शॉर्ट फिल्म्सही बनवू लागला. ‘3’ नावाच्या त्याच्या शॉर्ट फिल्मचा 2007 मध्ये पिक्सच्या शॉर्ट फिल्म महोत्सवातल्या पहिल्या तीन सर्वोत्कृष्ट फिल्म्समध्ये समावेश झाला होता. त्यामुळे पूर्ण लांबीचा सिनेमा बनवण्यासाठी आपण तयार आहोत असं त्याच्या मनाने घेतलं आणि ‘नायकन’ची निर्मिती झाली. ते अपयश पचवून लिजोने ‘सिटी ऑफ गॉड’ बनवला. पण तोही फ्लॉप झाल्यावर त्याच्या मनात आपल्या कारकिर्दीविषयी अनिश्चितता नक्कीच निर्माण झाली असणार. एक शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने ‘आमीन’ (2013) करायला घेतला असावा.

प्रेक्षकांना हमखास आवडेल म्हणून त्याने लव्ह स्टोरी निवडली खरी, पण त्यातही नेहमीच्या वाटेवरून जाणं त्याने टाळलंच. ‘आमीन’ची सुरुवात खूपच विचित्र आहे. कुणीतरी सुरेख कागदात गुंडाळलेली भेटवस्तू गावातल्या एका घराच्या बाहेर ठेवतं. हे काय असेल असा विचार करत घरातले ती उघडतात. आतमध्ये मानवी विष्ठा असते. ही मंडळी ती पुन्हा एकदा गिफ्ट रॅप करतात आणि गावात त्यांचं भांडणं असलेल्या घरात नेऊन देतात. गावातल्या दोन घरांमध्ये असलेलं वितुष्ट दाखवण्याची ही कोणती पद्धत? बरं, पुढे त्याचं काही फार होतही नाही. पण वेगवेगळ्या मार्गांनी एकमेकांच्या कुटुंबांवर होणारी चिखलफेक आपल्याला सिनेमाभर दिसत राहते.

‘‘सिनेमाची सुरुवात अशी करावी का- या बाबत बराच काळ आपल्याला स्वत:लाच खात्री वाटत नव्हती,’’ असं लिजोने एका मुलाखतीमध्ये कबूल केलंय. ‘‘अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, म्हणजे सिनेमा प्रदर्शित होण्याच्या वेळेपर्यंत माझी टीम आणि मी ते दृश्य ठेवावं का याच्या विचारात होतो. प्रेक्षकांना ते पाहून किळस आली तर संपूर्ण सिनेमावरच त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता होती. पण त्यांना ते दृश्य आवडलं तर आमचा सिनेमाही त्यांना आवडेल याची आम्हांला खात्री वाटत होती. एकूणच तो प्रकार जरा बटबटीत होता, पण आमच्या सुदैवाने प्रेक्षकांनी तो स्वीकारला.’’

‘आमीन’ सुपरहिट झाला. एका भोळ्याभाबड्या मुलाच्या आणि श्रीमंत घरातल्या मुलीच्या या प्रेमकथेला चर्चमधल्या म्युझिकल बँडची पार्श्वभूमी होती. एका अतिशय देखण्या, निसर्गरम्य गावात ही गोष्ट घडते. गोष्टीच्या केंद्रस्थानी आहे पुराणकालीन सिरियन चर्च. गावातल्या सॉलोमनचं एका श्रीमंत कॉन्ट्रॅक्टरच्या मुलीवर, शोषन्नावर प्रेम आहे. तिचंही आहे. सॉलोमनचे वडील अतिशय प्रख्यात क्लॅरिनेट वादक. बोटीच्या अपघात त्यांचा मृत्यू होतो. वडिलांसारखंच क्लॅरिनेट वादक व्हायचं, चर्चच्या बँडमध्ये सामील व्हायचं हे सॉलोमनचं स्वप्न आहे. पण लोकांसमोर क्लॅरिनेट वाजवायची वेळ आली की त्याचा विश्वास ढासळतो. शोषन्नासमोर मन लावून, भान हरपून अद्वितीय सूर निर्माण करणारं त्याचं क्लॅरिनेट जणू अबोल होऊन जातं.

अशातच गावात व्हिन्सेंट वेतोली नावाच्या नवीन फादरचं आगमन होतं. जीन्स घालणारा, लोकांमध्ये मिसळणारा पाद्री बघायची सवय नसलेल्या गावामध्ये फादर व्हिन्सेंट बदल करू पाहतात. चर्च ही आपली खाजगी मालमत्ता आहे असं समजणाऱ्या जुन्या धेंडांशी लढू बघतात आणि सॉलोमन व शोषन्नाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्नही करू लागतात. अखेर गावात मानाची समजली जाणारी संगीत स्पर्धा येते आणि त्यात सॉलोमनचा बँड जिंकला तर शोषन्नाशी त्याचं लग्न लावून दिलं जाईल अशी पैज लावली जाते.

संगीत ही या सिनेमाची जमेची बाजू आहेच; मात्र, अभिनंदन रामानुजम यांच्या छायाचित्रणाने संपूर्ण सिनेमाला एक परीकथेचा स्पर्श दिलाय. शांत तलावातून जाणारी बोट, काळोख्या रात्रीत चमचमणारं चांदणं, शोषन्नाच्या घराखाली रात्री सॉलोमनचं क्लॅरिनेट वाजवणं... एखाद्या चित्रासारखं दिसत राहतं. या सगळ्यांमुळे हा सिनेमा म्हणजे आपल्याला सवयीच्या झालेल्या प्रेमकथांसारखा राहत नाही. तो वेगळा बनतो. त्यावर लिजो जोसे पेलिसरी नावाच्या दिग्दर्शकाचा ठसा उमटलेला असतो.

तोच ठसा त्याच्या ‘डबल बॅरल’वरही (2015) आहे. या सिनेमाचं वर्णन क्रेझी कॉमेडी म्हणून करता येईल. सिनेमाच्या कथेला लॉजिक नाही, वास्तवाचा तर स्पर्शही नाही. लैला आणि मजनू नावाचे दोन अतिशय मौल्यवान हिरे मिळवण्यासाठी गुन्हेगारी विश्वामधल्या अनेक गँग्स करत असलेले प्रयत्न हा गोष्टीचा गाभा. पण त्यात एक मेख आहे. लैलाशिवाय मजनू आणि मजनूशिवाय लैला यांना शून्य मोल आहे. त्यामुळे मिळवायचे तर दोन्ही हिरे एकत्रच मिळवायला हवेत. हिऱ्यांच्या मागे लागलेल्या गँग्समध्ये एक स्थानिक गँग आहे, गोव्यातले काही गुंड आहेत आणि चक्क मल्याळममध्ये बोलणारा रशियन गँगस्टरही आहे. मोठमोठी दालनं आहेत, लाल रंगाचा धूर आहे, अमली पदार्थांचं सेवन करणारे आहेत, टंच मुली आहेत, एक छोटा मुलगा आहे आणि या सगळ्यांना नकळत पुरून उरणारे आणि आपण नेमकं काय करतो आहोत याची फारशी जाणीव नसणारे दोन नायक.

सिनेमाचा क्लायमॅक्स म्हणजे कमालीचा गोंधळ आहे. बंदुकीच्या गोळ्या, बॉम्ब, मशीनगन्स आणि विमानातून होणारा हल्ला... कशाची म्हणून कसर दिग्दर्शकाने सोडलेली नाही.

‘डबल बॅरल’ अजिबातच चालला नाही. अशा प्रकारच्या सिनेमांची केरळातल्या प्रेक्षकांना सवय नसावी असं मत काहींनी व्यक्त केलं होतं. लिजो म्हणतो, ‘‘हा सिनेमा मी कॉमिक बुकसारखा बनवला होता. त्यात विचित्रपणा ठासून भरलेला होता. लोकांनी तो फार गंभीरपणे घेतला. विश्लेषण करावं असा तो लॉजिकवर आधारलेला सिनेमा नव्हताच.’’ मात्र, ‘डबल बॅरल’च्या अपयशानंतर लिजोने आणखी एक गोष्ट केली. त्याने आता आपली स्टाइल बदलावी अशी अपेक्षा करणाऱ्यांसाठी त्याने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली, ‘‘सॉरी गाईज, नो प्लॅन्स टु चेंज, नो प्लॅन्स टु इम्प्रेस.’’ प्रेक्षकांचं मन जिंकणं, त्यांना आवडतील असे सिनेमे बनवणं आपल्या अजेंड्यावर नाही हे त्याने स्पष्टपणे सांगूनच टाकलं.

अशा दिग्दर्शकाचा पुढचा सिनेमा ‘अंगमलाई डायरीज’ असावा हे मला तरी पूर्णपणे स्वाभाविक वाटतं.

‘अंगमलाई डायरीज’ने (2017) लिजो खऱ्या अर्थाने मोठ्या दिग्दर्शकांमध्ये गणला जाऊ लागला. अंगमलाई नावाच्या एका छोट्या शहराची ही गोष्ट आहे. किंबहुना 80 च्या वर नवीन कलावंत असलेल्या या सिनेमाचा नायक हे शहरच आहे. लिजोचं खाण्यावर असलेलं प्रेम या सिनेमामध्ये प्रकर्षाने जाणवतं.

सिनेमाची सुरुवात होते तीच अंगमलाईमधल्या विविध खाद्यपदार्थांनी. भल्या मोठ्या कढईत तळले जाणारे पदार्थ. कुठेतरी फोडणीला टाकला गेलेला मसाला. पोर्कची बनत असलेली रेसिपी... एका पाठोपाठ एक वेगवेगळे पदार्थ बनताना आपल्या दिसतात आणि त्याबरोबरच अंगमलाईचं दर्शन होत राहतं. गजबजलेला बाजार दिसतो, रेल्वे स्टेशन दिसतं, कामावर जाणारी माणसं दिसतात. त्यांची घाईगडबड अधोरेखित करणारं संगीत ऐकू येतं. एकूणच, अंगमलाई इतर कोणत्याही सर्वसाधारण शहरासारखं, तुलनेने लहान शहरासारखं असावं असं वाटू लागतं. या शहराची स्वत:ची काय गोष्ट असणार?

पण प्रत्येक शहराची गोष्ट असतेच. त्या शहराचं स्वत:चं असं व्यक्तिमत्त्व असतं. तिथल्या माणसांनी बनलेलं. त्यांच्या सुखदु:खांनी नटलेलं. आपापसांतल्या नातेसंबंधांवर उभं राहिलेलं. त्या शहराची नस पकडता आली की आपोआप ती गोष्ट आपल्याला आपली वाटू लागते. मग ते शहर आपल्या ओळखीचं नसलं तरी चालतं. किंबहुना, नव्याने त्या शहराकडे आपण बघत असलो तरी त्याच्याशी नातं जुळतं. एखादी स्थानिक गोष्ट अशाच वेळी वैश्विक बनते. गोष्ट त्या मातीतली मात्र असायला हवी. ‘अंगमलाई डायरीज’मध्ये हे सगळं आहे. आणि त्याहूनही अधिक काहीतरी आहे.

लिजोच्या चलकुडी गावापासून अंगमलाई साधारण 14-15 किलोमीटर्सवर आहे. सिनेमाचा लेखक विनोद चेम्बन याचं ते गाव. दोघांचीही अंगमलाईशी ओळख होती, हे लहानसं शहर कसं चालतं हे माहीत होतं. त्याचा उपयोग त्यांना कथेसाठी जसा झाला, तसाच शूटिंगसाठीही झाला. अंगमलाईमध्ये राहणाऱ्या अनेक तरुणांनी या सिनेमात काम केलंय. पहिल्यांदाच ते कॅमेऱ्यासमोर उभे राहिले आहेत. काही व्यावसायिक कलावंत आहेत, पण जवळपास 85 माणसं ही नवोदित आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठीही अंगमलाईची संस्कृती अनोळखी नव्हती.

अंगमलाईमध्ये राहणारा व्हिन्सेंट पेपे. वडील कर्नाटकात कामाला. घरी आई आणि बहीण. तसा हा साधा मुलगा. कॅथोलिक संस्कार झालेला. फुटबॉलवर प्रेम करणारा. स्थानिक न्यू स्टार्स टीम आणि त्यांचा कॅप्टन बाबूजी हे व्हिन्सेंटचे आदर्श. बाबूजीचं गुंड असणंही त्यामुळे त्याला आवडत असतं. बाबूजीसारखा आपलाही दरारा असायला हवा असं त्याच्या मनात येऊ लागतं आणि आपल्या कॉलेजातल्या मित्रांच्या मदतीने तो स्वत:ची फुटबॉल टीम काढतो. मारामारी करून, छोटेमोठे दंगेधोपे करून आपली दहशत पसरवू पाहतो. एकदा आपण या गुहेत शिरलो की बाहेर येणं कठीण असतं याची जाणीव होईपर्यंत तो पार त्यात अडकून गेलेला असतो. मारामाऱ्यांपासून सुरुवात झालेली ही गुंडागर्दी खुनापर्यंत कधी पोहोचते हे कळतही नाही. शहरातल्या पोर्कच्या व्यवसायातही आपण शिरावं आणि चार पैसे कमवावेत असा विचर व्हिन्सेंट आणि त्याची गँग करते, पण तिथे आधीपासून बस्तान बसवलेले त्यांना सहजी शिरकाव करू देणं शक्यच नसतं. पुन्हा मारामारी, पुन्हा हिंसा.

‘अंगमलाई डायरीज’मधली हिंसा लिजोच्या ‘नायकन’ आणि ‘सिटी ऑफ गॉड’मधल्या रक्तपाताची आठवण करून देते. पण आता त्यात सफाई आली असल्याचं जाणवतं. या सिनेमातली प्रत्येक मारामारी वेगळ्या पद्धतीने डिझाइन करण्यात आलेली आहे. मग, बॉम्ब बनवताना आपल्या अंगावर तो फुटू नये म्हणून झाडाला घट्ट पकडून आपलं काम करणारा एखादा मुलगा असो की ऑटोरिक्षातून जाताना हातातला चाकू झपकन हवेत फिरवणारा दुसरा. अगदी सुरुवातीच्या दृश्यांमध्ये एका बारमध्ये झालेली मारामारी आपण पाहतो. येशू ख्रिस्ताचे कपडे घातलेला एक जण, ननचे कपडे घातलेला दुसरा आणि रोमन सैनिकासारखे कपडे असलेला तिसरा त्यात सहभागी झालेले दिसतात. पार्श्वभूमीला एका म्युझिक बँडचं संगीत चालू असतं. त्यामुळे ही हाणामारी आपण एरवी सिनेमांमध्ये बघतो त्यापेक्षा खूप वेगळी दिसते. या फाइट सीन्सची कोरिओग्राफी निराळी आहे हे लक्षात यायला फार वेळ जावा लागत नाही. संपूर्ण सिनेमाभर ही ॲक्शन भरून राहिलेली दिसते. त्यातला जोश जाणवत राहतो. अगदी ज्या दृश्यांमध्ये शून्य मारहाण आहे तिथेही. त्यामुळेच गँगवॉरसारखा अनेक वेळा पडद्यावर आलेला विषय असूनही ‘अंगमलाई डायरीज’ त्यातल्या ताजेपणामुळे मनाला भावतो.

‘अंगमलाई डायरीज’चा शेवटही खास लिजो स्टाइलचा आहे. चर्चची एक मिरवणूक चाललेली आहे. माणसं नटूनथटून त्यात सामील झालेली आहेत. मुलांना कडेवर घेऊन आईबाप रस्त्याच्या कडेला उभे आहेत. बँड, बाजा, रोषणाई आणि जोडीला फटाके. खूप हालचाल आहे, खूप घडणं आहे. कॅमेरा एका व्यक्तिरेखेचा पाठलाग करत निघतो, गर्दीतून मार्ग काढत त्या व्यक्तिरेखेबरोबर एका घरात शिरतो, मित्रांच्या गप्पागोष्टी दाखवतो, कुणा एकाच्या खुनानंतर झालेली पैशाची वाटणी करताना आपण फसवले गेलोय याची जाणीव त्या मित्रांमध्ये असलेल्या दुसऱ्या गटातल्या मुलाला होते आणि तो तिथून निघतो. कॅमेरा आता या मुलाच्या हालचालींचा वेध घेतोय. रस्त्यावरच्या आपल्या बॉसला तो रागारागाने सगळं सांगतो आणि आपण आता सूड घेणार म्हणून निघतो. दुसऱ्या, म्हणजे आपल्या नायकाच्या गँगमध्ये तो परत येतो आणि चाकूने एकावर हल्लाच करतो. एका क्षणात दोन गटांमध्ये मारामारी सुरू होते, पाहता पाहता माणसं रस्त्यावर येतात, मिरवणूक जातच असते, संगीत चालूच असतं, वातावरणात उत्सव आणि उत्साह असतो आणि या सगळ्याला छेद देणाऱ्या एकमेकांच्या जिवावर उठलेल्या दोन गँग्स अक्षरश: तुटून पडलेल्या असतात. कॅमेरा हे सगळं टिपत असतानाच आपल्या लक्षात येतं की हे दृश्य सलग आपल्यासमोर साकारतंय. दिग्दर्शकाने ‘कट्‌’ म्हटलेलंच नाही. हा क्लायमॅक्स म्हणजे अकरा मिनिटांचा एक सिंगल टेक आहे.

त्याविषयी बोलताना एके ठिकाणी लिजोने म्हटलंय, ‘‘क्लायमॅक्स कसा असणार आहे हे आम्ही पक्कं केलेलं होतं. एवढा मोठा टेक घेण्यामागे माझा विचार असा होता की प्रेक्षकांना त्यात सहभागी करता यायला हवं. ते प्रेक्षक न राहता त्या दृश्याचा भाग व्हायला हवेत. शूटिंगच्या दिवशी आम्ही सकाळच्या वेळी सेटवर गेलो. डीओपी, ॲक्टर्स आणि आमची कोअर टीम एवढे जण. त्या वेळी रस्ते रिकामे होते. आम्ही तिथे संपूर्ण दृश्याची सगळी कोरिओग्राफी स्ट्रक्चर केली. कुठे काय घडणार, कोण कुठे थांबणार, कोण कुठे वळणार, मारामारी कुठे होणार वगैरे. गर्दीबरोबर ही तालीम नव्हती, फक्त ॲक्टर्सना साधारण कल्पना यावी हा हेतू होता. साध्या फोनवर शूटिंग करून आम्ही ही तालीम केली. पण प्रत्यक्ष गर्दी आल्यावर हे दृश्य कसं आकार घेईल याची कल्पना तेव्हा आम्हांलाही नव्हती. संध्याकाळी शूटिंगच्या वेळी माणसांची गर्दी आली आणि आम्हांला त्या दृश्याचं नेमकं स्वरूप जाणवू लागलं. वाटलं होतं तितकं ते सोपं नव्हतं.

‘‘आम्ही मुव्ही टेन हा कॅमेरा वापरत होतो. तो स्टेडी कॅमला पर्याय म्हणून वापरतात. स्टेडी कॅम हा मूव्हिंग शॉट स्थिर शूट करण्यासाठी वापरला जातो, पण आता अधिक सोपी उपकरणं आलेली आहेत. मुव्ही टेन अधिक कॉम्पॅक्ट आहे हाताळण्यासाठी. तोही दोनेक किलो वजनाचा असतो. आणि जोडीला असलेली इतर उपकरणं मिळून कॅमेरामनला एका वेळी साडेचार किलो वजन हाताळावं लागतं. या क्लायमॅक्समध्ये सुरुवातीला कॅमेरा व्यक्तिरेखांबरोबर मूव्ह करतो. पण मग साधारण हाफ वे थ्रू या व्यक्तिरेखांमध्ये मारामारी होऊ लागते, माणसं धावू लागतात, हे जरा कठीण होतं. ती व्यक्तिरेखा गर्दीतून धावतेय, कॅमेरा तिचा पाठलाग करतो, त्या कलाकाराला हरवून चालणार नाहीये, तो फ्रेममधून बाहेर जाता कामा नये याचं भान ठेवायला हवंय. आणि कॅमेरामनला प्रचंड गर्दीतून तो पाठलाग करायचा आहे. अशी गर्दी जिचं शंभर टक्के नियंत्रण शक्य नाही. ते कसेही चालताहेत. त्यांना कॅमेऱ्याशी देणंघेणं नाही.

‘‘एका प्रसंगी तुम्हांला कॅमेरा कोणाच्यातरी खांद्याला धडकल्याचं जाणवेल. झालं असं की, कॅमेरा त्या इक्विपमेंटच्या मध्यभागी असतो. तो जर कशावर आपटला तर पुन्हा बॅलन्स व्हायला काही काळ जावा लागतो. गर्दी रस्त्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत होती. आम्ही प्रत्येक लॅम्पपोस्टवर स्पीकर्स टांगलेले होते आम्ही देत असलेल्या सूचना कलाकारांना कळाव्यात म्हणून. त्यामुळे आमच्या व्यक्तिरेखा कुठल्या पॉइंटपासून कुठे गेल्या आहेत त्यानुसार आम्ही त्या स्पीकर्सवरून गर्दीला सूचना देत होतो की आता कॅमेरा तुमच्याजवळ येतोय तेव्हा कॅमेऱ्याकडे पाहू नका, नॉर्मल वागा, त्यावर धडकू नका नाहीतर आम्हांला शॉट कट करावा लागेल वगैरे.

‘‘सुरुवातीला आम्ही असं ठरवलं होतं की स्टन्ट आर्टिस्ट आगीतून बाहेर येऊन लोकांसमोर पडेल. ज्या दोघांची मारामारी होतेय ते आगीच्या समोर मारामारी करत जातील, आणि त्यातली जी निगेटिव्ह व्यक्तिरेखा आहे तिला आगीत ढकललं जाईल. त्यानंतर आमचा कॅमेरा आगीसमोरच्या व्यक्तिरेखेपासून वर्तुळाकार फिरेल म्हणजे मग स्टन्ट आर्टिस्ट आगीतून बाहेर येताना दिसेल. अशी आमची योजना होती. पण तसं घडलं नाही. फायर आर्टिस्ट बाहेर येताना ते कृत्रिम दिसतंय असं आम्हांला वाटलं. मग आम्ही पायाच्या किकने तो आगीत ढकलला जातो इथवर शूट केलं आणि आम्ही त्या आगीवर क्लोज घेतला. नंतर त्यात आम्ही आगीचं आणखी एक स्ट्रक्चर ॲड केलं.

‘‘शॉट संपला तेव्हा आमचा डीओपी अक्षरश: खाली पडला. कारण त्याला कॅमेरा पकडणं अशक्य झालं होतं. टेन्शनमुळे आम्हां सगळ्यांनाच धाप लागल्यासारखं झालं होतं. आजही मला त्या दृश्यात बरेच दोष दिसतात. पण त्या परिस्थितीत चित्रित झालेलं ते सगळ्यांत चांगलं दृश्य आहे.

‘‘मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये अजूनही कमी बजेटचे सिनेमे बनतात. ‘अंगमलाई डायरीज’मध्ये सुदैवाने आम्हांला पोस्ट प्रॉडक्शनसाठी बऱ्यापैकी वेळ मिळाला म्हणून तो एवढातरी चांगला झाला. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर मला त्यात शंभरेक चुका दिसल्या. शक्य असतं तर मी त्यातल्या अनेक गोष्टी बदलल्या असत्या. एक वेगळाच सिनेमा बनवला असता कदाचित. कोणाला खरं नाही वाटणार, पण आधीच्या माझ्या अनेक सिनेमांमध्ये जो रॉनेस दिसतो तो नेहमीच जाणीवपूर्वक आणलेला नाही. काही वेळा बजेट आणि मर्यादित वेळ यांमुळेही आलेला आहे.’’

‘अंगमलाई डायरीज’ची दखल दक्षिणेकडच्याच नव्हे, तर भारतभरातल्या सिनेक्षेत्राने घेतली. अनुराग कश्यपसारख्या दिग्दर्शकांनी तोंडभरून या सिनेमाचं कौतुक केलं. समीक्षकांनी तर तो डोक्यावर घेतलाच, पण प्रेक्षकांनाही हा सिनेमा आवडला. कमी बजेटमध्ये बनलेल्या ‘अंगमलाई डायरीज’ने वीस कोटी रुपयांचा व्यवसाय केला. मोठे स्टार्स नसतानाही लोकांनी या सिनेमाचं स्वागत केलं हे विशेष. लिजोच्या सिनेमांसाठी मल्याळम सिनेमाचा प्रेक्षक सज्ज झालेला होता. लिजोचाही आत्मविश्वास आता वाढला असावा. म्हणून तर त्याने आपल्या पुढच्या सिनेमासाठी एक आणखीन वेगळी गोष्ट निवडली.

‘इ.मा.यो.’(2018), इशो मरियम योसेप्पू किंवा जीझस मेरी जोसेफ. आर.आय.पी. - रेस्ट इन पीस या अर्थानेही त्याचा वापर होतो. नावावरूनच हा सिनेमा मृत्यूशी संबंधित आहे हे कळत होतं. पण इथे लिजो शहरापासून दूर, पुन्हा एकदा ग्रामीण भागात आला होता. एर्नाकुलममधल्या चेल्लनम या समुद्रकिनारी वसलेल्या गावात एक डार्क कॉमेडी आकार घेत होती.

या सिनेमाची सुरुवातही लक्षात राहावी अशी आहे. कॅमेरा एके ठिकाणी स्थिर आहे. समोर समुद्र आहे. शांत. आणि उजव्या कोपऱ्यातून एक मिरवणूक, नव्हे एक अंत्ययात्रा येताना दिसते. आणि सावकाश ती डाव्या कोपऱ्यातून निघून जाते. पांढऱ्या कपड्यातली माणसं. पाठोपाठ संगीताचा बँड. पाद्री. वर निळंभोर आकाश, त्या खाली समुद्र आणि वाळूतून चाललेली ती अंत्ययात्रा. दिमाखदार.

वाचन हे मेस्त्रीचं स्वप्न. हा तसा वयस्क गृहस्थ. त्याचं घरातून महिनोन्‌महिने गायब होणं घरच्यांच्या अंगवळणी पडलंय. दारू पिणं आणि स्वत:शीच बोलत राहणं ही त्याची सवय. घरात बायको, एक मुलगी, लग्न झालेला मुलगा आणि त्याची बायको. एके रात्री वावाचन अचानक घरी येतो. सोबत एक बदक पकडून आणलेलं असतं, त्याचं मांस शिजवायची ऑर्डर देतो. बायको पेनम्मा अखंड बडबड करणारी. नवरा घरात आल्यापासून तिचं तोंड चालू आहे. मुलीचं- निसाचं- गावातल्या एका मुलाबरोबर अफेअर चालू आहे. मुलगा एझी नेहमीप्रमाणे दारूची बाटली घेऊन घरी येतो आणि वडिलांना पाहून त्यांच्याबरोबर बैठक मारतो. बदक शिजेपर्यंत दोघांच्या गप्पा सुरू होतात. अख्ख्या एर्नाकुलममध्ये आपल्या वडिलांची अंत्ययात्रा कशी भव्य झाली होती याचं वर्णन वावाचन करू लागतो. मग एझीही त्याला वचन देतो, ‘‘तुझी अंत्ययात्राही मी तेवढ्याच दिमाखात करेन. सोन्याचा क्रॉस असेल, उंची शवपेटी असेल, बँड असेल...’’

आणि त्याच रात्री, जेवणही होण्याआधी वावाचन हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू पावतो. कनवटीला फारसे पैसे नसलेल्या एझीची वडिलांसाठी श्रीमंती अंत्ययात्रेची तयारी करण्याची धडपड म्हणजे हा सिनेमा. वावाचनच्या मृत्यूमध्ये काळंबेरं आहे असं मानणारा पाद्री, लोकांना समजून घेणारा इन्स्पेक्टर, एझीच्या मागे ठामपणे उभा राहणारा मित्र, कबर खणणारा गावकरी, जगाशी कोणतंही देणंघेणं नसणारे बुद्धीबळ खेळणारे दोन वृद्ध, अशा अनेक व्यक्तिरेखांच्या बरोबरीने धो धो पडणारा पाऊस या गंभीर घटनेचा पार विनोद बनवून टाकतात. वावाचनचं शरीर शवपेटीमध्ये ठेवताना घसरून दगडावर आपटतं, ती जखम म्हणजे त्याचा खून झाल्याचा पुरावा आहे असं फादरना वाटणं, वावाचनच्या मृत्यूचा दाखला देण्याकरता होणारा उशीर... काय काय म्हणून घडतं तिथे! एकाच वेळी ते सगळं केविलवाणंही दिसतं आणि विनोदीही. काही प्रसंगांमध्ये हसायला येतं आणि त्या सगळ्यांतला फोलपणा जाणवून तुटल्यासारखंही वाटतं.

अंत्ययात्रेची तयारी होईपर्यंत वावाचनचा देह घरात ठेवलेला असतो. पेनम्मा, तिची मुलगी आणि सून त्या भोवती कपाळाला हात लावून बसून असतात. पण पेनम्माची बडबड कमी झालेली नसते. फक्त आता ती, ‘‘असा कसा माझा नवरा गेला, आत्ता तर घरी आला होता...’’ असं काहीतरी बोलत असते. मध्येच या बायका स्वैपाकघरात जातात आणि थोड्या वेळाने कुणीतरी भेटायला आलंय हे कळताच पेनम्मा घाईघाईने बाहेर येते तीच कढ काढत. तिचं तेच तेच बोलणं थोड्या वेळाने नकोसं वाटू लागतं आणि विनोदीही. वावाचनची सून साबेथ आपल्या नणंदेच्या गळ्यातली चेन मागते तो प्रसंगही असाच. ‘‘तुझा मोकळा गळा कुणी बघणार नाही, पण येणाऱ्या माणसांच्या नजरेत घरच्या सुनेच्या गळ्यात काहीही नाही हे ठसेल,’’ असा साबेथचा युक्तिवाद आहे. तो सगळा प्रकारच इतका हतबल करणारा आहे की, काही वेळा खरोखरच हसावं की रडावं हे कळत नाही. माणूस गेल्यानंतर त्याच्यासाठी हजारो रुपये खर्च करणारा मुलगा शहाणा की वेडा? वडिलांना दिलेला शब्द पाळणं हे आपलं कर्तव्य आहे असं समजणारा मुलगा मूर्ख की निरागस? त्याच्या असहायतेचा फायदा करून घेणारे चांगले की वाईट? आणि मग त्याचा भावनिक स्फोट झाल्यानंतरचा आक्रोश योग्य की अयोग्य?

‘इ.मा.यो’ लिजोसाठी खास सिनेमा आहे. ‘‘इट रिमेन्स व्हेरी क्लोज टु माय हार्ट. - माझ्या दृष्टीने ती माझी एकमेव फिल्म आहे जी पाहताना मी नेहमी इमोशनल होतो. त्यामागे वैयक्तिक कारणंपण आहेत. एरवी माझे सिनेमे मी फार वेळा बघत नाही. कधी ताण असेल तर मग ‘डबल बॅरेल’ पाहतो. निव्वळ मनोरंजन म्हणून.’’

गोव्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘इ.मा.यो’ला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला होता. आणि त्याच्या नंतरच्या वर्षी तोच पुरस्कार ‘जलिकट्टू’नेही पटकावला. ‘जलिकट्टू’चा पटकथाकार आणि मूळ ‘माओईस्ट’ या कथेचा लेखक हरीश म्हणतो, ‘‘अख्खं आयुष्य सिनेमे पाहण्यात घालवल्यामुळे दुसरं काहीही न येणाऱ्या लहान मुलासारखा तो आहे. माझ्याच कथेवरची पटकथा मी लिहीत असताना तो सतत माझ्या प्रत्येक वाक्यावर चर्चा करत असायचा. कथेतले बारकावे त्याला नेमके समजलेले होते. मनात जे दृश्य तयार झालंय तसंच नेमकं कॅमेऱ्यात पकडलं जाईपर्यंत त्याला स्वस्थता लाभत नाही. मुख्य म्हणजे, त्याच्या पिढीतल्या अनेक दिग्दर्शकांप्रमाणे तो स्वत:ला इन्टलेक्चुअल मानत नाही. राजकारणामध्ये तो खोलवर बुडालेला नाही. पण योग्य अयोग्यतेचं त्याचं भान पक्कं आहे.’’

नॉन लिनिअर नॅरेशन हे लिजोचं एक वैशिष्ट्य म्हणायला हवं आणि लांबच्या लांब एका टेकमध्ये चित्रित केलेली दृश्यं हेसुद्धा. त्याच्या सिनेमांमधली हिंसाही खास लिजो स्टाइलची असते असं म्हणता येईल. त्याविषयी बोलताना तो म्हणतो, ‘‘आपल्या आजूबाजूला जी हिंसा घडतेय त्यातली अंशभरही पडद्यावर प्रतिबिंबित होत नाहीये. सिनेमा पाहताना हे खरं आयुष्य नाही याची जाणीव आपल्याला सातत्याने होत असते. तेव्हा प्रेक्षकांवर त्या हिंसाचाराचा परिणाम करायचा असेल तर नेहमीपेक्षा वेगळं, अनपेक्षित असं काहीतरी त्यांना दाखवायला हवं. वास्तव तुकड्यातुकड्याने दाखवायचं आणि बाकीचं लपवून ठेवायचं हे मला नाही जमत. म्हणून माझ्या सिनेमांमध्ये एवढी हिंसा असते.’’

त्याच्या ‘नायकन’मध्ये बंदुकीची गोळी थेट मेंदू भेदून जाताना आपल्याला दिसते. ‘जलिकट्टू’मध्ये तर हिंसा केंद्रस्थानीच आहे. ‘अंगमलाई डायरीज’ गँगस्टर सिनेमा आहे. या बाबतीत क्वेन्टीन टॅरन्टीनो या दिग्दर्शकाचा आपल्यावर प्रभाव आहे हे लिजो मान्य करतो. पण महत्त्वाचं म्हणजे इतका हिंसाचार दाखवूनही लिजो जोसे पेलिसरी आपल्या कुठल्याच सिनेमात या हिंसेचं उदात्तीकरण करताना दिसत नाही.

आणि आता त्याचा नवा कोरा सिनेमा तयार आहे. सिनेमाचं नाव आहे ‘चुरुली’. केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये तो दाखवला गेलाय. या वेळी त्याने थ्रिलरबरोबरच सायन्स फिक्शन आणि हॉररची वाटही चोखाळली आहे.

चुरुली नावाचं गाव आहे, पण लिजोच्या मते, या सिनेमापुरतं बोलायचं तर ‘चुरुली’ म्हणजे एक चकवा आहे, ज्यात शिरल्यावर माणूस आपण कुठे चाललो आहोत त्याचं भान हरवून जातो. या सिनेमाची गोष्ट ही एका लघुकथेवर आधारलेली आहे. एका वाक्यात सांगायचं, तर दोन पोलीस पळून गेलेल्या एका गुन्हेगाराच्या मागे लागतात आणि त्या प्रवासात या गुन्हेगाराने केलेले गुन्हे तेही करतात अशी ती कथा आहे. पण त्याचा भर अस्तित्ववादावर अधिक आहे. लिजो म्हणतो, ‘‘बायबलमध्ये स्वर्ग, नरक आणि परगेटरी म्हणजे मृतात्म्यांच्या पापक्षालनाचं ठिकाण यावर चर्चा आहे. माझ्या आधीच्या दोन सिनेमांमध्येही या विचारांची बीजं आहेत. लाइफ, डेथ आणि आफ्टर लाइफ या गोष्टी या तीनही सिनेमांमध्ये समान आहेत. ‘इ.मा.यो’,‘जलिकट्टू’ आणि ‘चुरुली’ हे तीन सिनेमे म्हणजे एक त्रिसूत्री- ट्रिलॉजी आहे. पहिला सिनेमा करायला घेताना माझ्या मनात असा काही विचार नव्हता. हे आपोआप घडलंय.’’

मूळ कथेवर सिनेमा करताना दिग्दर्शकाने थ्रिलर आणि सायन्स फिक्शनचा आधार घेतलाय. या प्रकारचे सिनेमे आपल्याला नेहमीच आकर्षित करतात असं लिजोचं म्हणणं आहे. मात्र ते आपल्या स्थानिक वातावरणात घडणारे असायला हवेत असाही त्याचा आग्रह आहे. त्यातली दृश्यं, संगीत प्रेक्षकांबरोबर राहायला हवं. त्यांच्या स्वप्नात यायला हवं. सिनेमाची त्यांच्या मनातली जी संकल्पना आहे त्याला धक्का बसायला हवा. त्यामुळे सिनेमाची गोष्ट सांगताना तो प्रेक्षकांना कुठल्याही प्रश्नांची उत्तरं देत नाहीत. ती त्यांची त्यांनी द्यावीत किंवा शोधावीत अशी त्याची अपेक्षा असते.

मल्याळमच नव्हे, तर आजच्या भारतीय सिनेमाच्या क्षेत्रात लिजो जोसे पेलिसरी हे नाव महत्त्वाचं मानलं जातंय. आपल्या कामाने हे स्थान त्याने मिळवलंय यात शंकाच नाही, पण एकूणच मल्याळम सिनेमाच आज इतर कोणत्याही भारतीय भाषांमधल्या सिनेमांपेक्षा खूप जास्त प्रगल्भ झालाय हेही त्याच्या यशामागचं एक कारण आहे. वेगळं काही बघण्याची प्रेक्षकांची तयारीच नसेल तर निर्माता आणि दिग्दर्शकांना प्रयोग करण्याचा विश्वास तरी कुठून येणार? गेल्या काही वर्षांमध्ये असे अनेक प्रयोग दक्षिणेच्या, आणि खास करून तामिळी आणि मल्याळम सिनेमांमध्ये होत असल्याचं आपल्याला दिसतं. (अदूर गोपालकृष्णन यांनी सुरू केलेल्या) 70 आणि 80च्या दशकातल्या केरळामधल्या न्यू वेव्ह सिनेमानंतर पुन्हा एकदा या राज्यातल्या तरुण दिग्दर्शकांची चर्चा राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर होऊ लागली आहे. उगीच नाही, आजकाल ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर मल्याळम सिनेमा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. कारण तो बघणाऱ्या प्रेक्षकांची संख्या खूप जास्त आहे. हे सगळेच सिनेमे तांत्रिकदृष्ट्या उच्च पातळीवरचे आहेत असं नाही म्हणता येणार, पण विषयाच्या बाबतीत ते काहीतरी नवीन करू पाहताहेत एवढं नक्की. एम्सी जोसेफ (विकृथी), महेश नारायण (सी यू सून, मालिक), दिलीश पोथान (जोजी), सनलकुमार ससीधरन (सेक्सी दुर्गा, युनमादियुडे मरनम, चोला), झकारिया मोहम्मद (सुदानी फ्रॉम नायजेरिया, हलाल अ लव्ह स्टोरी), मधू नारायण (कुंबलंगी नाइट्‌स) अशी कितीतरी नावं घेता येतील. लिजोचे सहप्रवासी असलेल्या या मल्याळी दिग्दर्शकांनी आपल्या प्रेक्षकांची प्रगल्भता वाढवली आहे. केवळ मोठे स्टार्स असणं हा सिनेमाचा फोकस असू शकत नाही याची जाणीव त्यांना करून दिली आहे. वेगळ्या प्रकारचे, राजकीय भाष्य करणारे, काहीतरी नवीन सांगू पाहणारे, प्रयोग करणारे आणि त्याबरोबरच मनोरंजन करणारे सिनेमे थिएटरमध्ये जाऊन पाहायला त्यांची हरकत राहिलेली नाही.

लिजोसारख्या दिग्दर्शकांनी मध्यम मार्ग स्वीकारलंय. आपल्याला जे सांगायचंय ते आणि जसं सांगायचंय तसंच तो सांगतो. मात्र, आपल्याला हवा तसा सिनेमा करताना हे व्यावसायिक जग आहे याचं भानही तो सोडत नाही. गोष्ट सांगताना निरनिराळे प्रयोग करतो, पण ती गोष्ट प्रेक्षकांना अपील होईल अशी असते. आपला सिनेमा प्रचारकी होणार नाही हे तो पाहतो, त्याचबरोबर आपलं सत्य काय आहे ते लपवून ठेवत नाही. आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे, व्यावसायिक यश मिळो वा न मिळो, कोणताही सिनेमा प्रामाणिक असणं आवश्यक असतं. लिजो जोसे पेलिसरीचा सिनेमा शंभर टक्के तसा आहे.

Tags: लिजो जोसे पेलिसरी सिनेमा जलिकट्टू दिग्दर्शक मल्याळम सिनेमा malyalam director william jose-pellissery meena karnik marathi article on cinema malyalam cinema weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके