Diwali_4 पिंक आणि पार्च्ड
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

‘पिंक’प्रमाणचे ‘पार्च्ड’ ही बायकाचं म्हणणं मांडतो. मनाबरोबरच त्यांच्या शरीराचं म्हणणं मांडतो. शहरातल्या त्या तीन मैत्रिणींप्रमाणेच गावातल्या या तीन मैत्रिणीही नकळतपणे ‘माझ्या शरीरावर माझा हक्क’ इथपर्यंतचा प्रवास करतात. आणि त्यांच्या या प्रवासात ‘ना सिर्फ शब्द नहीं है... अपने आप में पुरा वाक्य है. इसे किसी तर्क, स्पष्टीकरण, एक्सप्लनेशन या व्याख्या की जरुरत नहीं होती...’ हा ‘पिंक’मधला अमिताभ बच्चन यांचा डायलॉग हे सिनेमे पाहणाऱ्या मुलींनाही ‘नो’चा अर्थाने नव्याने सांगतो. 

पिंक आणि पार्च्ड हे अलीकडच्या काळात आलेले दोन सिनेमे. दोन्हींचा बाज वेगळा, विषय वेगळा, ट्रीटमेंटही वेगळी. पण तरीही त्यांची एकत्र दखल घ्यायचं कारण म्हणजे, त्यांचा स्त्रीप्रधान दृष्टिकोन. एका कुठल्याशा बारमधलं बिलियड्‌र्सचं टेबल. भोवताली तरुण मुलांचा घोळका. आणि साराचं तंग कपड्यांतलं असणं. चंट सारा अर्थातच मुलग्यांचं लक्ष वेधून घेणारी. त्यांच्याकडे पाहून हसणारी. फ्लर्ट करणारी. पण अचानक तिच्या लक्षात येतं, चार मुलगे आपल्या शरीराशी नको इतकी लगट करताहेत. ती त्यांना दूर सारते. 

ते ऐकत नाहीत. इतका वेळ आपल्याशी हसून, गोड बोलणारी ही मुलगी अचानक अशी का वागतेय? त्यांचा आक्रमकपणा वाढलाय आणि त्याबरोबरच पुरुषी नशाही. तिचा नकार त्यांना अपमानास्पद वाटतोय. भोवतालच्या इतर मुलांना हे सगळं पाहण्यात एक विकृत आनंद मिळतोय. त्यांच्या आरड्या-ओरड्याने मुलगे अधिकच चेकाळताहेत. एका क्षणी एक जण तिला बिलियड्‌र्सच्या टेबलवर ढकलतो. आणि थेट तिच्या कपड्यांनाच हात घालतो. त्यानंतर दिसतो तो अंगावर शहारा आणणारा बलात्कार... एका मागून एक चौघांनी केलेला... मदतीसाठी तिने मारलेल्या किंकाळ्या आणि आजूबाजूला असणाऱ्या इतर मुलांचं मदतीला न जाणं... आणि समोर घडतंय ते ‘एन्जॉय’ करणं... 

सन 1988 मध्ये आलेल्या दिग्दर्शक जोनाथन कॅप्लान यांच्या ‘ॲक्युज्ड’ या सिनेमाची ही सुरुवात आहे. साराची भूमिका केलेल्या ज्युडी फॉस्टरला या सिनेमासाठी ऑस्कर पुरस्कार मिळालाय. मात्र, ही गोष्ट जशी साराची आहे तशीच ती तिची केस कोर्टात लढणाऱ्या आणि वेश्या असली तरीही तिच्यावर बलात्कार करायचा अधिकार कोणालाही नाही असं ठामपणे सांगणाऱ्या कॅथरिन मर्फीचीही (केली मॅक्‌गिलिस) आहे. दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरी यांचा ‘पिंक’ हा सिनेमा पाहताना मला वारंवार ‘ॲक्युज्ड’ची आठवण येत होती. दोन्ही सिनेमांमध्ये अर्थातच खूप फरक आहे. पण ‘माझ्या शरीरावर माझा हक्क’ हा धागा दोन्हींमध्ये समान आहे. 

मात्र 1988 मध्ये हॉलिवूडच्या या सिनेमाने जे सांगितलं, ते मांडायचं धाडस आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीला होण्यासाठी मध्ये 2016 उजाडावं लागलं! ‘पिंक’ म्हणूनच महत्त्वाचा सिनेमा आहे. सिनेमा म्हणून तो कसा आहे, यापेक्षा तो काय सांगू पाहतो, ते महत्त्वाचं आहे. अगदी आजही. किंबहुना, आज सर्वांत जास्त. कारण आजची मुलगी बदलली आहे, तिचं समाजातलं वावरणं बदललं आहे, वागणं बदललं आहे. शहरातली मुलगी आपल्याला हवे ते कपडे घालते. कामाच्या निमित्ताने रात्री-बेरात्री घराबाहेर राहते. आपल्या करिअरविषयी गंभीर असते. मित्रमैत्रिणींबरोबर पबमध्ये जाते. दारू पिते. मोकळेपणाने वागते. 

पण बहुतांश पुरुषांची मानसिकता मात्र होती तिथेच आहे. त्याला काही प्रमाणात आपल्या जुन्या सिनेमांनी खतपाणीही घातलं आहे. नायकाने नायिकेची छेड काढायची, नायिकेने लटकं रागवायचं, त्याला झिडकारायचं, त्याने तरीही तिचा पिच्छा पुरवत राहायचं आणि शेवटी तिने त्याच्या प्रेमात पडायचं- हे आपल्या सिनेमांमध्ये एवढ्या वेळा दाखवलं गेलंय की, मुलीने दिलेला नकार म्हणजे नंतर येणारा होकार असतो, अशी मुलांची समजूत झाली असावी. 

त्यातून बाईची अब्रू म्हणजे काचेचं भांडं यासारखे विचार आपल्याकडे वर्षानुवर्षं रुजलेले. ‘पत्थर पे शीशा गिरता है तो दोष शीशे का नहीं है, लेकिन टुटता तो शीशाहि है,’ यासारख्या डायलॉग्जनी अशा मानसिकतेला आणखीनच भक्कम बनवलेलं आहे. सिनेमाचा संस्कार बाजूला ठेवला तरी भोवतालची परिस्थिती वेगळं काही सांगत नाही. (या सगळ्याला अर्थातच अपवाद आहेत. पण ते नियम सिद्ध करण्यासाठीच जणू आहेत). नकार पचवायची मानसिकता समाज म्हणून, कुटुंब म्हणून आपण आपल्या मुलग्यांमध्ये बिंबवलेलीच नाही. दिवसेंदिवस वाढणारे ॲसिड हल्ले दुसरं काय सुचवतात? मुलीने नकार दिला म्हणून होणारे खून काय सांगतात? 

अशा परिस्थितीत ‘पिंक’सारखा सिनेमा एक भूमिका घेतो. ‘नो मीन्स नो’ एवढंच सांगून तो थांबत नाही; त्याही पुढे जाऊन हा नाही म्हणायचा हक्क अगदी तुमच्या बायकोलाही आहे, असं पुरुषांना ठणकावून सांगतो. आणि रस्त्यात बसलेले पुरुषांचे धक्के, अश्लील कॉमेंट्‌स कळत्या वयापासून सहन करणाऱ्या मुलींना कुणी तरी आपलं म्हणणं मांडतंय असं वाटतं. आणि आत, खोलवर कुठे तरी बरं वाटतं. ‘इन्डिपेन्डन्ट लडकी लडकों को कन्फ्यूज कर देती है,’ असं वाक्य सिनेमातल्या अमिताभ बच्चनने म्हटल्यावर प्रेक्षागृहातल्या तमाम मुलींच्या तोंडून हसू फुटतं ते उगीच नाही. अशा कन्फ्यूज झालेल्या पुरुषांचा त्यातल्या बहुतेकींनी अनुभव घेतलेला असणार. 

ऑफिसमध्ये आपल्या बरोबरीने एखादी मुलगी निर्णय घेतेय, बॉस म्हणून आपल्याला ऑर्डर देतेय, हे आजही अनेकांना सहन होत नाही. घरात बायकोने आपल्याला न विचारता निर्णय घेणं तरी सगळ्या नवऱ्यांनी अजून कुठे स्वीकारलंय? रोजच्या आयुष्यातले हे छोटे-छोटे अनुभव ‘पिंक’सारखा सिनेमा पाहताना किंवा त्यातल्या तीन मैत्रिणींचं कोंडलेपण बघताना आजच्या तरुण मुलींना तरी निश्चितच आठवतील. 

‘पिंक’मधल्या तिघीही मैत्रिणी तशा प्रातिनिधिक आहेत. मीनल अरोरा (तापसी पन्नू) हिंदू आहे, फलक अली (कीर्ती कुलहारी) मुसलमान आणि ॲन्ड्रिआ (ॲन्ड्रिआ तारिआंग) ईशान्य भारतातून आलेली. दिल्लीत एक घर असूनही पीजी म्हणून- वेगळी राहतेय. एकीचं वयाने मोठ्या असलेल्या पुरुषाशी अफेअर आहे. तिसरीला आपण ईशान्येतून आल्यामुळे आपल्याशी अनेक जण वाईट वागतात याची खंत आहे. मित्राच्या मित्राने मीनलवर बलात्कार करायचा प्रयत्न केल्यावर आणि तिने झटापटीत त्याला जखमी केल्यावर सर्वसाधारण मुलींप्रमाणे या तिघींची प्रतिक्रियाही हे प्रकरण इथेच थांबवावं, अशी आहे. त्या अर्थाने या तिघींच्याही व्यक्तिरेखा स्टिरिओटाईप म्हणाव्यात अशा आहेत. तशीच दीपक सेहगल (अमिताभ बच्चन) या वकिलाचीही. हा माणूस विक्षिप्त आहे, हे पहिल्या क्षणापासून प्रस्थापित केलंय. त्याचा मास्क, त्याची आजारी बायको त्याच्या भोवतीचं विक्षिप्तपणाचं वलय अधिकच गडद करतं. आणि कोर्टातल्या त्याच्या शेवटच्या ‘नो मीन्स नो’ला एक वजन आणतं. सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी या सर्व व्यक्तिरेखा वर्क झाल्या आहेत ते या सगळ्यामुळे. 

सिनेमा म्हणून अर्थातच यात काही दोष आहेत. (मला स्वत:ला टायटल्सवर राजबीरने (अंगद बेदी) केलेला अतिप्रसंग दाखवायची अजिबात गरज नव्हती, असं वाटलं). तरीसुद्धा ‘पिंक’ला मिळालेला उत्तम प्रतिसाद मनाला खूप दिलासा देऊन गेलाय, यात शंकाच नाही. आपले मुख्य प्रवाहातले हिंदी सिनेमे इतकी थेट भूमिका घेताना फारसे दिसत नाहीत. बाईच्या बाबतीत तर नाहीच नाही. (तरी हल्ली आपले सिनेमे विषयाच्या बाबतीत बरेच प्रयोग करू लागले आहेत. टीव्हीवरच्या मालिका मात्र विचारांच्या बाबतीत जितकं मागासलेपण दाखवता येईल तितकं दाखवताहेत. म्हणायला मालिका स्त्रीकेंद्रित, पण नायिकेची व्यक्तिरेखा मात्र परंपरागतच. बाहेर काम करणारी मुलगी चांगली सून बनते ती घरात- विशेषत: स्वयंपाकघरात आपलं कसब दाखवते तेव्हाच). त्यामुळे ‘पिंक’ यशस्वी झाल्याचं ऐकून आनंद होतो. एक ‘पिंक’ आल्यामुळे लगेच आजूबाजूचं जग बदलेल, असा भाबडेपणाचा किंवा मूर्खपणाचा दावा कुणीच करणार नाही. 

मी सिनेमा बघायला गेले तेव्हा बायकांवर होणाऱ्या विनोदांवर हसणारे भरपूर पुरुष थिएटरमध्ये होते. त्या सगळ्यांची मानसिकता सिनेमा संपल्यावर बदलणार होती का? अजिबातच नाही. पण त्यातल्या एखाद्या पुरुषाला जरी या सिनेमाने विचार करायला भाग पाडलं असेल तरी खूप काही मिळवलं, असं म्हणता येईल. 

‘पार्च्ड’ला ‘पिंक’सारखं यश मिळालेलं नाही. तसं ते मिळणारही नव्हतं. कारण या सिनेमाची जातकुळी वेगळी आहे. इथेही तीन बायका आहेत. पण या शहरातल्या नाहीत. राजस्थानमधल्या एका दुर्गम गावातल्या आहेत. इथे टीव्हीसुद्धा नाही. वयाच्या पंधराव्या वर्षी मुलींची लग्नं केली जाताहेत. गावाची सरपंच महिला असली तरी सगळे निर्णय पुरुषच घेताहेत. इथले तरुण मुलगे वासनेने वखवखलेले आहेत. मोबाईल नुकताच हातात आलाय आणि त्यावर अश्लील क्लिप्स पाहणं हा त्यांचा छंद आहे. शिवाय, गावात येणाऱ्या बिजलीच्या सेक्सी नाचाला गर्दी करणारे. पैसे देऊन तिच्याबरोबर सेक्स करू इच्छिणारे. 

नाही म्हणायला एक चांगला पुरुष गावात आहे. एनजीओ चालवणारा तो सामाजिक कार्यकर्ता आहे. गावातल्या बायकांकडून तो खास राजस्थानी पद्धतीचे कपडे शिवून घेतो आणि ते शहरात विकून त्याचे पैसे या बायकांना देतो. त्याची बायको ईशान्य भारतातली आहे. ती इंग्लिश बोलते, शहरातल्यासारखी साडी नेसते, म्हणून गावात तिला फारसा मान नाही. पण गोष्ट या नवरा-बायकोची नाही. ती आहे रानी (तनिष्ठा चॅटर्जी), लाजो (राधिका आपटे) आणि बिजलीची (सुरवीन चावला). आणि रानीच्या सुनेची- जानकीची (लेहर खान). 

रानी विधवा आहे. गुलाब (रिधी सेन) नावाच्या आपल्या तरुण मुलाचं लग्न तिला करायचं आहे. जानकीच्या आई-वडिलांना लाखात पैसे देऊन तिने हे लग्न ठरवलंय. त्यासाठी आपलं घर गहाणही ठेवलंय. नवरा जाऊन पंधराएक वर्षं उलटून गेली आहेत आणि तिच्या शारीरिक गरजा दबल्या गेल्या आहेत. लाजो तिची मैत्रीण. मूल होत नाही म्हणून दु:खी. नवऱ्याचा मार खाणारी. शरीरावरची त्याची बळजबरी सहन करणारी. आणि त्यांची मैत्रीण बिजली. एक वेश्या. या तिघीही एका परीने शरीरसुखासाठी भुकेल्या. एकमेकींच्या स्पर्शातूनही ते शोधणाऱ्या. ती त्यांची गरज आहे आणि आधारही. 

या प्रत्येकीचा एक प्रवास आहे. सून म्हणून अन्याय सहन करणारी रानी, स्वत:ची सून घरात आल्यावर सुरुवातीला तिच्याशी सासूसारखीच वागते ते वर्षानुवर्षं झालेल्या संस्कारांमुळे. आणि मग त्या जेमतेम पंधरा वर्षांच्या मुलीची घुसमट जाणवल्यानंतर कशी बदलते, आपली आई होण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी लाजो कोणत्या टोकाला जाते आणि आपलं वय झाल्यानंतर आपल्याकडे गिऱ्हाईक कसं येणार या असुरक्षिततेच्या भावनेतून बिजली कशी बाहेर येते ते दिग्दर्शक दाखवू पाहते. 

दिग्दर्शक लिना यादव यांचा हा सिनेमा खूप काही सांगू पाहतो. पण कुठे तरी जे सांगायचंय, त्यासाठी ओढूनताणून गोष्ट रचल्यासारखं वाटतं. हा सिनेमा परदेशी आणि फेस्टिव्हल्सचा प्रेक्षक डोळ्यांसमोर ठेवून बनवल्यासारखा वाटतो. यातली नग्नता जागतिक सिनेमा पाहणाऱ्यांना अजिबातच खटकणार नाही. पण त्यात एस्थेटिक्स वरचढ ठरलंय. कॅमेऱ्यातून राजस्थानातल्या गावांचं दुर्गमपण पकडताना, या बायकांचं गावरान सौंदर्य टिपताना त्यातला आत्मा हरवल्यासारखं वाटतो. सिनेमाची प्रत्येक फ्रेम सुरेख आहे. पण अप्रतिम फ्रेम्सचा सिनेमाही तेवढाच चांगला असेल, असं नाही. तसं काहीसं या सिनेमाचं झालंय. 

मग तरीही त्याची नोंद का घ्यायची? कारण ‘पिंक’प्रमाणेच ‘पार्च्ड’ही बायकांचं म्हणणं मांडतो. मनाबरोबरच त्यांच्या शरीराचं म्हणणं मांडतो. शहरातल्या त्या तीन मैत्रिणींप्रमाणेच गावातल्या या तीन मैत्रिणीही नकळतपणे ‘माझ्या शरीरावर माझा हक्क’ इथपर्यंतचा प्रवास करतात. आणि त्यांच्या या प्रवासात ‘ना सिर्फ शब्द नहीं है... अपने आप में पुरा वाक्य है. इसे किसी तर्क, स्पष्टीकरण, एक्सप्लनेशन या व्याख्या की जरुरत नहीं होती...’ हा ‘पिंक’मधला अमिताभ बच्चन यांचा डायलॉग हे सिनेमे पाहणाऱ्या मुलींनाही ‘नो’चा अर्थाने नव्याने सांगतो. 

Tags: सिनेमा पिंक आणि पार्च्ड मीना कर्णिक pink and parched movies cinema meena karnik weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात