Diwali_4 शॉपलिफ्टर्स : गुन्हेगारीमुळे जोडलेल्या कुटुंबाची गोष्ट
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

शॉपलिफ्टर्स : गुन्हेगारीमुळे जोडलेल्या कुटुंबाची गोष्ट

कोरिडा असंही म्हणतात की, मूल जन्माला घातलं म्हणजे तुम्ही पालक बनत नाही, हे सत्य मला खूप लवकर लक्षात आलं होतं. कुटुंब म्हणजे काय, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची माझी धडपड माझ्या सिनेमांमधून व्यक्त होते.

‘शॉपलिफ्टर्स’मधलं कुटुंब एकत्र आहे ते काही त्यांचं रक्ताचं नातं आहे म्हणून नाही किंवा ते जो वेळ एकमेकांबरोबर घालवतात त्यामुळेही नाही. जपानमध्ये 2011 मध्ये झालेल्या भूकंपानंतर कुटुंबातला बॉन्ड फार महत्त्वाचा आहे, असा एक सूर जपानमध्ये ऐकू येऊ लागला होता. मी ते ऐकून अस्वस्थ होत होतो. त्यातूनच गुन्हेगारीच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या कुटुंबाविषयी काही तरी भाष्य करावं, असं माझ्या मनात आलं.

हिरोकाझू कोरिडांचा ‘शॉपलिफ्टर्स’ हा नवा सिनेमा जपानमध्ये सुपरहिट झालाय. कान चित्रपट महोत्सवामध्ये या सिनेमाने सर्वोत्कृष्ट सिनेमाचं पारितोषिक पटकावलंय.

‘कुटुंब’ या आपल्या आवडत्या विषयावर कोरिडांचा हा आणखी एक सिनेमा, पुन्हा एकदा अस्वस्थ करणारा. कुटुंब म्हणजे काय- चार माणसांचं एकत्र राहणं? नाती म्हणजे काय- फक्त रक्ताची नाती? पालक होणं म्हणजे काय- केवळ मुलांना जन्माला घालणं? दिग्दर्शक हिरोकाझू कोरिडा यांचे बहुतेक सिनेमे हे कुटुंबव्यवस्थेविषयी असे अनेक प्रश्न निर्माण करणारे असतात.

केंद्रस्थानी जपानमधली परिस्थिती असली, तर आपल्यातला प्रत्येक जण या सिनेमांशी नातं सांगू शकेल इतके ते वैश्विक असतात.

‘लाईक फादर लाईक सन’, ‘अवर लिट्‌ल सिस्टर’ किंवा त्याही आधीचे ‘स्टिल वॉकिंग’ किंवा ‘नोबडी नोज’ यासारखे सिनेमे ही काही उदाहरणं. या वर्षी इफ्फीमध्ये बघितलेला त्यांचा ‘शॉपलिफ्टर्स’ही त्याला अपवाद नाही.

कान चित्रपट महोत्सवामध्ये या सिनेमाला मानाचा पाम अ दोअर हा पुरस्कार मिळालाय आणि जपानमध्ये त्याने विक्रमी व्यवसाय केलाय. पण ही झाली सिनेमाबाह्य माहिती. काय आहे ‘शॉपलिफ्टर्स’ची गोष्ट? नावावरून लक्षात येतं की- दुकानांमधून, म्हणजेच

   मोठमोठ्या मॉल्समधून वस्तू उचलणाऱ्या कुटुंबाची कहाणी कोरिडांनी सांगायला घेतलीये.

एक अतिशय गरीब कुटुंब. घरात एक आजी आहे. (किरीन किकी या जपानमधल्या नामवंत अभिनेत्रीने ही भुमिका केलीये. त्यांची ही शेवटची भूमिका. 2018 च्या सप्टेंबर महिन्यात त्यांचं निधन झालं.) ओसामू शिबाटा आणि त्याची बायको नोबुयो आहेत. त्यांचा अकरा-बारा वर्षांचा मुलगा शोता आहे. आजीची नात अकी आहे.

कुठल्याशा खुराड्यात त्यांचा संसार मांडलाय. धड उत्पन्न नाही, पण प्रत्येक जण कुठे ना कुठे काम करून जमेल तसे पैसे मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. आजीचं पेन्शन हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत. आजीला तरुणपणी तिच्या नवऱ्याने सोडून दिलंय. आज तो हयात नसला, तरी त्याचं दुसरं कुटुंब चांगलं सुखवस्तू आहे.

 या सावत्र मुलाच्या मनात आजीच्या परिस्थितीविषयी एक अपराधीपण आहे. आजीने त्याला जाणीवपूर्वक खतपाणी घातलंय. त्यामुळे महिन्या-दोन महिन्यांतून एकदा ती आपल्या सावत्र मुलाला भेट देते आणि तो आपली श्रीमंतीची लाज वाटून तिला पैसे देत राहतो.

नोबुयो एका हॉटेलमध्ये साफसफाईचं काम करतेय. धुवायला टाकलेल्या कपड्यांमधून काही मिळालं, तर ते स्वाभाविकपणे आपल्या खिशात टाकतेय. तर, अकी पोर्नोग्रॅफिक पीप शोसाठी काम करून पैसे कमावतेय. ओसामूने आपल्या मुलाला मॉल्समधून छोट्या-मोठ्या वस्तू चोरण्याचं प्रशिक्षण दिलंय. कधी खायच्या वस्तू, कधी शॅम्पूसारखी रोजच्या वापरातली उत्पादनं... जे शक्य होईल ते सगळं शोता सराईतपणे चोरू लागलाय. या वस्तूंच्या विक्रीतून थोडीफार कमाई होतेय.

 एक दिवस रात्री मुलाबरोबर घरी परत येताना ओसामूला एक पाच-सहा वर्षांची मुलगी सापडते. अंगावर जखमांचे व्रण असलेली. भेदरलेली युरी. ओसामू तिला आपल्याकडचा खाऊ देऊ करतो. ती बकाबका तो खाऊन टाकते. तिला रस्त्यावर कसं सोडून देणार, म्हणून ओसामू युरीला आपल्या खुराड्यात घेऊन येतो.

 सकाळ झाली की तिला तिच्या घरी परत न्यायचं, असं संपूर्ण कुटुंबाचं मत पडतं. नोबुयोच्या कुशीत लहानशी युरी शांत झोपून जाते. दुसऱ्या दिवशी ओसामू आणि नोबुयो तिला घेऊन तिचं घर शोधतात, पण तिथे चाललेलं नवरा-बायकोचं भांडण ऐकून युरीला परत आपल्याकडे घेऊन येतात.

युरीही या नव्या घरात रमते. शोताच्या मागे-मागे फिरू लागते. शोताप्रमाणेच मॉलमधून वस्तू उचलू लागते. शिबाटा कुटुंबाचा युरी एक भाग बनून जाते खरी, पण तिचे खरे आई-वडील पोलिसांकडे जातात. युरीचा शोध सुरू होतो आणि शिबाटा कुटुंब पकडलं जातं. त्यातून अनेक गोष्टी बाहेर येतात.

प्रत्यक्षात कुटुंबच नसलेलं हे कुटुंब विखुरलं जातं. पोलीस ओसामूला विचारतात, ‘‘या मुलांना चोरी करायला शिकवताना तुला लाज नाही वाटली?’’ ‘‘मला जे येत होतं ते मी त्यांना शिकवलं,’’ केविलवाणा ओसामू उत्तर देतो.

 युरीच्या विरहाने व्याकुळ झालेली नोबुयो कुटुंब- कल्याण खात्यातल्या बाईला विचारते, ‘‘केवळ जन्म दिल्याने आई-बाप बनता येतं का?’’ हे नवरा-बायको गुन्हेगार तर आहेतच, पण म्हणून युरीचे खरे आई-वडील निर्दोष आहेत का? आणि युरीसाठी पोलिसांचं लक्ष स्वत:कडे वेधणारा शोता एकाच वेळी निरागसही आहे आणि सराईत  उचल्याही.

कुटुंब नसलेल्या या कुटुंबामधलं हे गुंतागुंतीचं नातं, त्यांचं एकमेकांवरचं प्रेम, त्यांचा पैसे कमावण्याचा हव्यास, त्यांची हतबलता, त्यांच्या आयुष्यातले छोटे- छोटे आनंदाचे क्षण, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी- अशा वेगवेगळ्या स्तरांमधून ‘शॉपलिफ्टर्स’चा प्रवास होतो. आणि कोरिडा आपल्याला त्यांच्या ठेवणीतला आणखी एक मास्टरपीस पाहिल्याचं समाधान देतात. त्याबरोबरच सुन्नही करतात.

कोरिडांच्या ‘नोबडी नोज’मध्ये आई सोडून गेल्यानंतर अकीरा आपला धाकटा भाऊ आणि दोन लहान बहिणींना घेऊन कसा तग धरतो, हे आपण पाहतो.

‘स्टिल वॉकिंग’ ही एका कुटुंबाची गोष्ट आहे. खऱ्याखुऱ्या कुटुंबाची. पंधरा वर्षांपूर्वी पाण्यात अपघाताने वाहून गेलेल्या घरातल्या मोठ्या मुलाच्या वार्षिक श्राद्धाच्या निमित्ताने वर्षातून एकदाच एकत्र येणाऱ्या योकोयामा कुटुंबाची.

‘लाईक फादर लाईक सन’मध्ये त्यांनी मुलांची अदलाबदल झाल्यानंतर आपला पोटचा मुलगा आपला, की आपण इतकी वर्षं ज्याला जीव लावला तो आपला अशा कोंडीत सापडलेल्या बापाची कहाणी आहे. आणि ‘अवर लिटल सिस्टर’ ही तीन बहिणींनी वडिलांच्या निधनानंतर सावत्र बहिणीचं पालकत्व स्वीकारल्याची गोष्ट.

‘आफ्टर द स्टॉर्म’ बायकोपासून वेगळ्या झालेल्या, फारशी कमाई नसलेल्या आणि मुलापासून आपली ही परिस्थिती लपवणाऱ्या बापाची घालमेल दाखवते.

 कोरिडांचे हे अलीकडच्या काळातले काही सिनेमे. (त्यांचा ‘द थर्ड मर्डर’ हा वेगळ्या पठडीतला सिनेमा होता. मला स्वत:ला तो खूप आवडला असला, तरी कोरिडांच्या सिनेमांच्या मानाने त्याला फारसा चांगला प्रतिसाद मिळालेला नाही.)

या सगळ्या सिनेमांचा ‘शॉपलिफ्टर्स’ हा कळस आहे का? हा प्रश्न विचारल्यावर कोरिडांनी उत्तर देताना म्हटलंय, ‘‘माझा तसा हेतू तरी निश्चितच नव्हता. माझ्या कारकिर्दीमध्ये मी अनेक वेळा त्याच त्या थीम्सचा उपयोग केलेला आहे. आणि त्या सगळ्या थीम्सना एकत्र आणावं, असा निर्णय मी जाणीवपूर्वक निश्चितच घेतलेला नव्हता. पण आता सिनेमा पूर्ण झाल्यानंतर हे असं घडल्याचं माझ्या लक्षात आलंय.’’  

कोरिडा असंही म्हणतात की, मूल जन्माला घातलं म्हणजे तुम्ही पालक बनत नाही, हे सत्य मला खूप लवकर लक्षात आलं होतं. कुटुंब म्हणजे काय, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची माझी धडपड माझ्या सिनेमांमधून व्यक्त होते. ‘शॉपलिफ्टर्स’मधलं कुटुंब एकत्र आहे ते काही त्यांचं रक्ताचं नातं आहे म्हणून नाही किंवा ते जो वेळ एकमेकांबरोबर घालवतात त्यामुळेही नाही. जपानमध्ये 2011 मध्ये झालेल्या भूकंपानंतर कुटुंबातला बॉन्ड फार महत्त्वाचा आहे, असा एक सूर जपानमध्ये ऐकू येऊ लागला होता. मी ते ऐकून अस्वस्थ होत होतो. त्यातूनच गुन्हेगारीच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या कुटुंबाविषयी काही तरी भाष्य करावं, असं माझ्या मनात आलं. जपानमध्ये पारंपरिक कुटुंबव्यवस्था आता अस्तित्वातच नाही. अर्थात, आदर्श कुटुंब कसं असावं यावरचा मी काही तज्ज्ञ नाही, पण त्याबाबतचे प्रश्न मात्र मी नक्कीच उपस्थित करू शकतो.

‘शॉपलिफ्टर्स’मध्ये मी एका घरात राहणाऱ्या तीन पिढ्यांना तपासून पाहत होतो. पारंपरिक जपानी घरांमध्ये अशी कुटुंबं आपल्याला पाहायला मिळतात. मात्र, आजच्या न्युक्लीअर कुटुंबाचं चित्र वेगळं आहे आणि तेही झपाट्याने बदलतंय.

2002मध्ये ‘नोबडी नोज’साठी मी लहान मुलांच्या ऑडिशन्स घेत होतो. ही बहुतेक मुलं तेव्हा आपल्या आजीबरोबर किंवा आजोबांबरोबर किंवा दोघांबरोबर राहत असल्याचं माझ्या लक्षात आलं. त्यांच्या बोलण्यातून, ते वापरत असलेल्या शब्दांमधून ते जाणवायचं.

पण गेल्या पंधराएक वर्षांत- विशेषत: टोकयोसारख्या शहरांमधून- हे दृश्य दिसत नाही. बहुतांश वयस्क माणसं आता एकटी राहत असल्याचं लक्षात येतं. मुलांचं आपल्या आजी- आजोबांबरोबर खास नातं आहे, असं वाटत नाही. हे चांगलं की वाईट यात मला पडायचं नाही; पण ते घडलंय आणि मला त्याविषयी जे वाटतं, ते मी माझ्या सिनेमांमधून मांडू पाहतोय.

 कोरिडा आता एका नव्या सिनेमाच्या तयारीला लागले आहेत. जवळपास पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी लिहिलेल्या नाटकावर हा सिनेमा बेतलेला आहे. त्याचं नाव सध्या तरी त्यांनी ‘ट्रूथ’ असं ठेवलंय. मुख्य म्हणजे, हा सिनेमा जपानी भाषेत नाही, तो फ्रेंच भाषेत आहे. त्याचं शूटिंग पॅरिसमध्ये होणार आहे. आणि इथन हॉक व ज्युलिएट बिनोश त्यात काम करणार आहेत.

बिनोशची आई एक नावाजलेली अभिनेत्री असते. तिची वादग्रस्त आत्मकथा प्रकाशित होते, ज्यामुळे इथन आणि बिनोश हे नवरा- बायको पॅरिसला परत येतात. हाही फॅमिली ड्रामाच आहे; पण एका वेगळ्या, कोरिडांसाठी अनोळखी अशा भोवतालामध्ये घडणारा. आपल्या या नव्या साहसाविषयी कोरिडा म्हणतात, ‘‘माझं करिअर मी तीन टप्प्यांमध्ये विभागतो. 1991मध्ये मी सुरुवात केली तेव्हापासून ते 2011मध्ये ‘आय विश’ या सिनेमापर्यंतचा एक टप्पा. ‘लाईक फादर लाईक सन’पासून दुसरा टप्पा सुरू झाला. या सिनेमाने मला आंतरराष्ट्रीय स्तरावर एका वेगळ्याच स्थानावर नेऊन ठेवलं. हे माझं करिअर आहे, यावर माझाच विश्वास बसत नव्हता, अशा पातळीवर. तिथपासून ते ‘शॉपलिफ्टर्स’पर्यंतचा हा प्रवास म्हणजे माझ्या कारकिर्दीतला दुसरा टप्पा. आणि आता या फ्रेंच सिनेमामधून मी नव्या प्रवासाला सुरुवात करतोय, असं मला वाटतं.’’

तेव्हा पुढच्या वर्षी कोरिडांचा हा नवा कोरा सिनेमा इफ्फीसारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये पाहायला मिळेल, अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. ‘शॉपलिफ्टर्स’चं ट्रेलर https://www.youtube.com/watch?v=ZdiqxV0B13Q इथे बघा. 

(20 ते 30 नोव्हेंबर या काळात दरवर्षी पणजी, गोवा येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत असतो, त्या महोत्सवाला मीना कर्णिक गेली अनेक वर्षे उपस्थित राहतात. या वर्षीच्या महोत्सवातील त्यांना विशेष भावलेल्या चित्रपटांविषयी त्या पाच लेख साधनात लिहिणार आहेत, त्यातील हा तिसरा लेख.)  

Tags: अवर लिट्‌ल सिस्टर लाईक फादर लाईक सन कान चित्रपट महोत्सव जपान शॉपलिफ्टर्स हिरोकाझू कोरिडां our little sister like son like father the cannes festival japan shoplifters hirokazu koreeda weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात