Diwali_4 द स्क्वेअर आणि बीपीएम फ्रेंच सिनेमाचं वर्चस्व
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

द स्क्वेअर आणि बीपीएम फ्रेंच सिनेमाचं वर्चस्व

‘120 बीपीएम’ हा सिनेमा मात्र ‘द स्क्वेअर’च्या तुलनेत अगदीच थेट आहे. पॅरिसमधल्या एका चळवळीवर आधारलेला. ही चळवळ आहे एड्‌स, एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेल्या तरुण मुला-मुलींची आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांची. काळ आहे 1990 चा. 1980 च्या अखेरीस न्यूयॉर्कमध्ये एड्‌सविषयीची चळवळ सुरू झाली. त्यापासून स्फूर्ती घेऊन, त्याच चळवळीची ही पॅरिसमधली शाखा. ‘ॲक्ट अप’ (ACT UP) हे या ग्रुपचं नाव. दर आठवड्याला त्यांच्या मीटिंग्ज होतात. त्यात चर्चा, वादविवाद सगळं होतं. त्यांचे काही नियम आहेत. प्रत्येक माणसाने बोलायला किती वेळ घ्यायचा, हे ठरलेलं आहे.  

‘द स्क्वेअर’ला 2017 च्या कान चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमाचा ‘पाम अ दोर’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला होता. त्या वेळी ज्युरींच्या अध्यक्षपदी असलेला प्रसिद्ध दिग्दर्शक पेद्रो अल्मादोवारने म्हटलं, ‘‘पोलिटिकली करेक्ट वागणाऱ्या समाज घटकांच्या हुकूमशाहीविषयीची गोष्ट सांगणारा हा पूर्णपणे आजच्या काळातला आणि एक अत्यंत समृद्ध अनुभव देणारा सिनेमा आहे.’’

स्वाभाविकच इफ्फीमध्ये या सिनेमाचं पहिलं स्क्रिनिंग चुकल्यामुळे (त्या वेळी दुसरा तेवढाच महत्त्वाचा सिनेमा बघायचा असल्यामुळे) रात्री दहा वाजता असणारं दुसरं स्क्रिनिंग चुकवणं शक्यच नव्हतं. दिवसभरात किमान तीन सिनेमे बघितलेले असताना रात्री उशिरा दोन तास बावीस मिनिटांचा हा सिनेमा पाहताना आपले डोळे जडावणार तर नाहीत ना, अशी भीती मनात होती. पण पहिल्या क्षणापासून या सिनेमाने असं काही बांधून ठेवलं की, अडीच तास कधी संपले, ते कळलंही नाही.

म्हटलं तर, ही एका आधुनिक आर्ट म्युझियमचा क्युरेटर असलेल्या ख्रिस्तियानची गोष्ट आहे. त्याच्या आर्ट गॅलरीमध्ये भरणाऱ्या प्रदर्शनाच्या बाबतीत असलेली त्याची भूमिका आणि प्रत्यक्ष आयुष्य जगतानाचा दांभिकपणा यावर भाष्य करणारी. उपहासात्मक, नर्म विनोदी पद्धतीने सांगितलेली. आणि या नायकाच्या माध्यमातून एकूणच समाजाच्या खोटेपणावर प्रहार करणारी.

सिनेमाच्या सुरुवातीलाच ख्रिस्तियानची मुलाखत घ्यायला आलेली ॲन त्याला म्युझियमच्या वेबसाईटवर त्यांच्या एका कलाकृतीसंदर्भात त्यानेच लिहिलेल्या एका विधानाचा अर्थ विचारते. अत्यंत क्लिष्ट भाषेत, जार्गन्स वापरून आपण काही तरी महान सांगत आहोत अशा आविर्भावात केलेल्या त्या पोकळ विधानांमधून आपल्याला नेमकं काय म्हणायचंय, हे खुद्द ख्रिस्तियानलाच सांगता येत नाही. दिग्दर्शक मात्र आपल्याला या सिनेमातून काय दाखवायचंय, ते या एका दृश्यातून प्रेक्षकांपर्यंत पोचवतो.

ख्रिस्तियानची ही मुलाखत होत असते त्याच्या कला दालनात होऊ घातलेल्या प्रदर्शनातल्या नव्या कलाकृतीच्या निमित्ताने. ‘द स्क्वेअर’ असं या कलाकृतीचं नाव आहे. तिचं वर्णन करताना, ‘हा चौकोन म्हणजे विश्वास आणि आत्मीयता यांचं प्रतिनिधित्व करतो. त्या चौकोनात उभं राहणाऱ्या सगळ्यांना समान अधिकार आणि समान जबाबदाऱ्या असतात’, असं सांगितलं जातं.

‘द स्क्वेअर’चं प्रमोशन करण्याची जबाबदारी एका जाहिरात कंपनीवर सोपवण्यात येते. या कंपनीमध्ये काम करणाऱ्या दोन तरुण मुलांना मुळातच अशा प्रकारच्या प्रदर्शनाची कल्पना अत्यंत गुळमुळीत वाटते. त्यात काही मसाला नाही, काही नाट्य नाही; मग कशाच्या आधारावर ही कल्पना आपण लोकांना विकणार? त्यासाठी धक्कातंत्राचा उपयोग करायचा. असं ही मुलं ठरवतात.

दरम्यान, ख्रिस्तियानच्या मोबाईलची आणि पैशाच्या पाकिटाची चोरी होते. मोबाईलमध्ये ट्रॅकर असल्यामुळे तो कुठे आहे, हे त्याला समजतं. त्याचा सहायक त्याला एक आयडिया सुचवतो. त्यानुसार ख्रिस्तियान ज्या बिल्डिंगच्या आवारात मोबाईल असल्याचं दिसत असतं तिथल्या सगळ्या घरांमध्ये एक पत्रक वाटतो. लपूनछपून. त्यावर कोणाचं नाव नसतं. नुसतंच, ‘माझा मोबाईल आणि पाकीट तुम्ही चोरलंय याची मला कल्पना आहे. ताबडतोब तो अमुक-अमुक दुकानात आणून द्यावा’ अशा अर्थाचा धमकीवजा मजकूर असतो. आणि खरंच त्याला आपला फोन अन्‌ पाकीट परत मिळतं.

पण प्रकरण इथेच संपत नाही. ज्या घरांमध्ये ही पत्रकं येतात, त्यापैकी एका घरातला बारा-चौदा वर्षांचा एक मुलगा ख्रिस्तियानला भेटायला येतो. ‘तू माझ्यावर चोरीचा खोटा आळ घातलास. आता माझी माफी माग. तुझ्यामुळे माझे आई-वडील मला रागावले. आता ते मला खाली खेळायला जाऊ देत नाहीत.’ ख्रिस्तियान या मुलाच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. ख्रिस्तियानचा आर्थिक स्तर पाहता, एका गरीब वस्तीत राहणाऱ्या लहान मुलाला उत्तर द्यायला आपण बांधील आहोत असा विचारही त्याच्या मनाला शिवत नाही. मात्र, त्याच वेळी भल्या मोठ्या मॉलमध्ये ख्रिस्तियानच्या मुली हरवतात, तेव्हा तो हातातल्या खरेदीच्या बॅगा एस्कलेटरजवळ बसलेल्या एका भिकाऱ्याकडे सोपवतो.

एका बाजूला ‘द स्क्वेअर’मधून समान अधिकार आणि समान जबाबदारीची भाषा करणारा ख्रिस्तियान प्रत्यक्ष आयुष्यात मात्र आपल्या वागण्याची जबाबदारी झटकू पाहत असतो. ॲनबरोबर एक रात्र घालवल्यानंतर अगदी सहजपणे तो तिला बाजूला सारू शकतो. त्याच्या लहान मुलींबरोबरचं त्याचं वागणंही तसंच. बरं, तो हे सगळं काही जाणीवपूर्वक करत नाही. असं वागणं हे त्याच्या जगण्याचा भाग असतं. आपण जे विचार मांडतो ते व्यवहारातही आणायचे असतात, हे ख्रिस्तियानच्या डोक्यातही येत नाही; जसं ते आपल्यापैकी 99 टक्के लोकांच्या लक्षात येत नाही.   

इथे, जाहिरात कंपनीने बनवलेली फिल्म सोशल मीडियावरून व्हायरल होते. पण ती लोकांना आवडते म्हणून नाही, तर ती विकृत आहे अशी टीका होते, म्हणून. ख्रिस्तियानने ही छोटी क्लिप बघितलेलीच नसते. त्या आधीच ती सोशल मीडियावर गेल्यामुळे आणि त्यातून लोकांच्या भावना दुखावल्यामुळे तो आपलं पद सोडण्याचा निर्णय घेतो. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांमध्ये त्याच्या राजीनाम्याची बातमी असतेच, पण त्या भयानक क्लिपच्या निमित्ताने ‘द स्क्वेअर’वर पानंच्या पानं छापलेली असतात!

मात्र दिग्दर्शक रुबेन ऑसलंड्‌चा हा सिनेमा ‘द स्क्वेअर’ची ही गोष्ट अशी थेट, सरळसोट मार्गाने सांगत नाही. प्रसंगी ती विचित्र, विअर्ड होते. काही वेळा ती रहस्यमय वाटते. कधी कधी विनोदी, तर बऱ्याचदा प्रेक्षक म्हणून आपल्याला सणसणीत चपराक लगावणारीही.

उदाहरणार्थ- म्युझियमला आर्थिक मदत करणाऱ्यांसाठी ठेवलेल्या उंची डिनरला कुत्र्याचा अभिनय करणाऱ्या ओलेग नावाच्या एका कलावंताला लाइव्ह परफॉर्मन्स देण्याकरता बोलावलं जातं. सुरुवातीला त्याचं गुरकावणं-भुंकणं जमलेले आमंत्रित एन्जॉय करत असतात. मात्र हा कुत्रा अधिकाधिक आक्रमक बनू लागतो, समोरच्यावर हल्ला करू लागतो, हिंस्र होतो आणि सगळं चित्रच पालटतं. जमलेली मंडळी अस्वस्थ होऊ लागतात. उठून निघून जायला लागतात. जनावरासारखं हे वागणं त्यांना झेपत नाही. त्यांच्या दिखाऊ जगण्याच्या चौकटीत बसत नाही. एका बाजूला खोटं-खोटं हसणारी, पोलिटिकली करेक्ट वागणारी उच्चभ्रू  माणसं आणि दुसरीकडे हा कदाचित त्यांच्यातल्या मानसिक हिंस्रपणाचं प्रतिनिधत्व करणारा कुत्रा. क्रौर्य आणि भीती या भावना इतक्या प्रभावीपणे आपल्या समोर येतात की, आपण त्या दृश्याने अक्षरश: अवाक्‌ होऊन जातो.

दुसरं एक उदाहरण. ॲनच्या घरी ख्रिस्तियान जातो तेव्हा त्याला दुसऱ्या खोलीत फिरणारा एक चिंपांझी दिसतो, जो कोचावर बसून अगदी शांतपणे वर्तमानपत्र वाचत असतो. ॲन तर अशी वावरत असते, जणू काही असा कोणी प्राणी तिच्या घरात नाहीच. कोण असतो हा चिंपांझी? त्याचं असणं काय सांगत असतं? हा आपला सदसद्‌विवेक आहे का, ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू लागलोय? चंगळवादी, चकचकीत जगात हा अक्राळ- विक्राळ आणि कुरूप चिंपांझी म्हणजे एखाद्या सुंदर कलाकृतीवर पडलेल्या डागासारखा दिसतोय का आपल्याला? मनातल्या अशा कोणत्याही प्रश्नांची थेट उत्तरं दिग्दर्शक आपल्याला देत नाही. सिनेमातल्या प्रसंगांचा अर्थ लावायचं काम तो आपल्यावर सोपवून मोकळा होतो.

आणखी एक आठवणीत राहिलेला प्रसंग. ख्रिस्तियानकडून माफीची मागणी करणारा लहान मुलगा त्याच्या घराच्या बाहेर बसून असतो. शेजाऱ्यापाजाऱ्यांना आरडाओरडा करून जागं करण्याची धमकी देतो. ख्रिस्तियान त्याला हाकलून लावतो. पण नंतर त्याला या मुलाचा आवाज ऐकू येतो, मदतीची याचना करणारा. ख्रिस्तियान त्याला शोधतो, पण त्याला हा मुलगा सापडत नाही. त्याचं काय होतं, हे रहस्य आपल्याला कळतच नाही. मग मात्र ख्रिस्तियानचं मन त्याला खाऊ लागतं. ‘द स्क्वेअर’च्या निमित्ताने आपण जे सांगू पाहतोय, त्याच्या थेट विरोधी आपलं हे वागणं आहे याची जाणीव त्याला होते. धो-धो पावसात, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात त्या लहान मुलाचा फोन नंबर ख्रिस्तियान शोधत असतानाचं दृश्य खास आहे. पावसाने मनावरचं मळभ निघून जातंय खरं, पण तत्त्वानं वागायचं तर भोवताली असलेल्या कचऱ्याचं भान हवं- त्यातूनच सत्य शोधायला हवं याची जाणीव करून देणारं.

म्युझियममध्ये ठेवलेल्या एका इन्स्टॉलेशनमधली माती साफसफाई करणारा चुकून झाडून टाकतो ते दृश्य असेल किंवा जाहिरात कंपनीच्या प्रेझेंटेशनला ख्रिस्तियानचा सहकारी आपल्या लहान बाळाला घेऊन येतो ते दृश्य असेल... किंवा मग ॲन व ख्रिस्तियान यांच्या संभोगानंतर ती त्याचा कॉन्डोम फेकायला जाते आणि तो नकार देतो ते दृश्य असेल; दिग्दर्शक विनोदाचा आधार घेतो, पण आपल्याला जे मांडायचंय त्यावरचा फोकस ढळू देत नाही.

या सिनेमाची ट्रीटमेंट वेगळी आहे. सरळसोट पद्धतीने ही गोष्ट आपल्यासमोर येत नाही. काही गोष्टी समजायला वेळ लागतो. मात्र, यातला प्रत्येक प्रसंग आपल्या मनाचा ताबा घेतो, यात शंकाच नाही. आपापल्या परीने आपण त्याचा अर्थ लावू लागतो. थिएटरमधून बाहेर पडल्यानंतर बराच काळ तो सिनेमा तुमच्या मनात पिंगा घालत राहतो. विचार करायला लावतो. चित्रपट महोत्सवामध्ये असं काही तरी बघायला मिळावं, हीच तर अपेक्षा असते.

‘द स्क्वेअर’चं ट्रेलर युट्युबवर उपलब्ध आहे. ही झलकही सिनेमाविषयी तुम्हाला खूप काही सांगून जाणारी आहे.

‘120 बीपीएम’ हा सिनेमा मात्र ‘द स्क्वेअर’च्या तुलनेत अगदीच थेट आहे. पॅरिसमधल्या एका चळवळीवर आधारलेला. ही चळवळ आहे एड्‌स, एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेल्या तरुण मुला-मुलींची आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांची. काळ आहे 1990 चा. 1980 च्या अखेरीस न्यूयॉर्कमध्ये एड्‌सविषयीची चळवळ सुरू झाली. त्यापासून स्फूर्ती घेऊन, त्याच चळवळीची ही पॅरिसमधली शाखा. ‘ॲक्ट अप’ (ACT UP ) हे या ग्रुपचं नाव. दर आठवड्याला त्यांच्या मीटिंग्ज होतात. त्यात चर्चा, वादविवाद सगळं होतं. त्यांचे काही नियम आहेत. प्रत्येक माणसाने बोलायला किती वेळ घ्यायचा, हे ठरलेलं आहे. बोलणाऱ्या माणसाचं म्हणणं पटलं तर टाळ्या वाजवून त्या माणसाच्या बोलण्यात व्यत्यय आणण्याऐवजी चुटक्या वाजवायच्या आणि आपला प्रतिसाद नोंदवायचा, असंही ठरलेलं आहे. नव्याने सामील झालेल्या मुला-मुलींना औषधांची माहिती देणं, त्या औषधांच्या रिॲक्शन्स काय होतात हे सांगणं, त्यासाठी त्यांची मानसिक-शारीरिक तयारी करून घेणं- हे उपक्रमही हाती घेतले जातात. मुख्य म्हणजे, ही सगळी तरुण मुलं फक्त ॲक्टिव्हिझमच करतात असं नाही. क्वचित पबमध्ये जाऊन बेधुंद नाचणं, एकमेकांची थट्टा- मस्करी करणं या नेहमीच्या आयुष्यातल्या गोष्टी त्यांच्याही दैनंदिन जीवनाचा भाग आहेत.

ॲक्ट अपच्या या बैठका, त्यांनी हाती घेतलेले कार्यक्रम, त्यांची निदर्शनं, एड्‌सवरील औषध बाजारात आणताना मोठ्या औषध कंपन्या करत असलेली दिरंगाई, त्या कंपन्यांबरोबरचा या कार्यकर्त्यांचा संघर्ष या सगळ्या गोष्टी सिनेमात आहेत. पण म्हणून 140 मिनिटं लांबीचा हा सिनेमा कुठेही कंटाळवाणा होत नाही. या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तरुण आहेत. हा आजार न झालेले आहेत, कोणी एड्‌स झालेले, कोणी एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेले. कोणी गे, कोणी बायसेक्शुअल. थोडक्यात, सगळी एलजीबीटी कम्युनिटी आहे. एड्‌स झालेल्या एका तरुण मुलाची आईसुद्धा सभासदांमध्ये आहे. पण दिग्दर्शक रॉबिन कॅम्पिलो या सगळ्यांच्या आयुष्यात डोकावत नाही. त्यांच्या  ॲक्टिव्हिझमवर लक्ष केंद्रित करताना तो त्यांच्यातल्या एका व्यक्तिरेखेच्या माध्यमातून आपल्याला त्यांच्या जगात नेतो. त्यातून आपोआप नाट्य निर्माण करतो. त्यांच्या दु:खात आपल्याला सहभागी करून घेतो.

एड्‌स किंवा एचआयव्हीसारख्या समस्येने जगाला भेडसावणारं रूप धारण केलेलं असलं, तरी समाजात त्याविषयी फारशी जागरूकता नसलेला हा काळ. त्यामुळे सामाजिक पातळीवर तर ही चळवळ आवश्यक आहेच, पण राजकीय दृष्ट्याही ती गरजेची आहे. राजकारणी मंडळींना या आजाराचं गांभीर्य पटवून देणं, तरुण पिढी त्या विळख्यात कशी अडकतेय आणि त्यांना बाहेर काढायचं तर राजकीय इच्छाशक्ती कशी महत्त्वाची आहे यावरही त्यांना फोकस करायचाय. त्यातूनच मग मंत्र्यांच्या कार्यक्रमात जाऊन घोषणा देणं किंवा कृत्रिम रक्ताने भरलेल्या पिशव्या त्यांच्यावर फेकून मारणं अशासारखे उपक्रम हाती घेतले जातात. शाळांच्या कॅम्पसमध्ये जाऊन एड्‌सविषयी माहिती देणारी पत्रकं वाटली जातात. चळवळीच्या मवाळ भूमिकेवर आक्षेप घेतले जातात, ‘आमच्याकडे त्यासाठी वेळ नाही’ तेव्हा आपण अधिक आक्रमक व्हायला हवं म्हणून तावातावाने वाद होतात.

अशा आक्रमक मुलांपैकी एक आहे शॉन. (नाऊल पेरे बिस्कायार्त या कलावंताने ही भूमिका अप्रतिम साकारलीये). एचआयव्ही पॉझिटिव्ह. रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्यांमध्ये तो आघाडीवर आहे. त्याच्या अगदी उलट आहे नव्याने आलेला नेथन. तो एचआयव्ही निगेटिव्ह आहे. त्याच्या मनात असंख्य प्रश्न आहेत. त्यातले काही बाळबोध म्हणावेत असे आहेत. एकदा एका शाळेत पत्रकं वाटत असताना काही मुलं या कार्यकर्त्यांकडे तुच्छतेच्या नजरेने बघतात. ‘आम्ही गे नाही, त्यामुळे आम्हाला या गोष्टी ऐकण्याची आवश्यकता नाही’ असं एक मुलगी नेथनला बोलून दाखवते. हे ऐकताक्षणी बाजूलाच उभा असलेला शॉन नेथनला जवळ ओढतो आणि त्याचं दीर्घ चुंबन घेतो. ही क्रिया घडते त्या मुलीला एक प्रकारे आव्हान देण्याच्या उद्देशाने, पण नेथनला शॉनचा स्पर्श आवडतो. एकत्र काम करता-करता शॉन आणि नेथन एकमेकांच्या जवळ येतात. आपण मृत्यूच्या जवळ वेगाने जातोय याची शॉनला जाणीव आहे, तशी ती नेथनलाही आहे. मृत्यूच्या दाट छायेत त्यांचं प्रेम फुलतं. सेक्स करताना आपल्याला काय काळजी घ्यायला हवी याची जाणीव त्यांना आहे. शॉनला इंजेक्शन देताना ती सुई आपल्या शरीराला स्पर्श करणार नाही हे बघणं नेथनसाठी गरजेचं आहे, हेसुद्धा त्यांना माहीत आहे. या नात्यामध्ये अनेक अडथळे आहेत. त्यावर मात करण्याचा दोघांचा प्रयत्न चाललाय. पण याचा शेवट काय होणारेय याची जाणीव दोघांनाही आहे. तोपर्यंत हाती लागतील तेवढे क्षण दोघांना उपभोगायचे आहेत. म्हणूनच त्यांच्यातल्या संभोगाचं दृश्य दिग्दर्शक तपशीलवार टिपतो. त्यातला हळुवारपणा आपल्यापर्यंत पोचवतो.

सिनेमाचा शेवट अपेक्षेप्रमाणे होतो आणि तरीही आपल्या डोळ्यांच्या कडा ओलावलेल्या असतात. ही कथा लिहिताना कॅम्पिलो आणि त्याचा सहपटकथा लेखक फिलीप मॅनजिओ यांनी ॲक्ट अपमधल्या आपल्या व्यक्तिगत अनुभवांचा उपयोग केलेला आहे. त्यामुळे यातल्या घटना सिनेमासाठी लिहिलेल्या असल्या-तरी त्यांना सत्याचा स्पर्श झालेला आहे.

एका चळवळीवर सिनेमा असल्यामुळे स्वाभाविकच त्यात खूप चर्चा आहेत. वादविवाद आहेत. परिणामी, खूप संवाद आहेत. पण त्यामुळे सिनेमा कुठे कंठाळी होत नाही. किंबहुना, हे संवाद सिनेमाची गती राखण्यात हातभार लावतात. एक प्रकारचा वेग आणतात. आणि प्रचार करत असतानाही प्रचारकी बनत नाहीत. या आजाराविषयी शाळेतल्या मुलांशी बोलणं कसं आवश्यक आहे, त्यांना गर्भनिरोधकांविषयी सांगणं कसं महत्त्वाचं आहे- यावर हा सिनेमा भर देतो, पण तरीही कंटाळवाणा किंवा संथ होत नाही. दोन महत्त्वाच्या व्यक्तिरेखांवर दिग्दर्शकाने लक्ष केंद्रित केलेलं असलं तरी इतरांकडे दुर्लक्ष केलेलं नाही. कारण ही गोष्ट फक्त शॉन आणि नेथनची नाही; ती एड्‌स आणि एचआयव्हीशी लढणाऱ्या सगळ्यांची आहे. एचआयव्हीने ग्रासलेल्या समाजाचा भाग असलेल्या आपल्या सगळ्यांची आहे.

‘बीपीएम’चा ट्रेलर युट्यूबवर उपलब्ध आहे. 

(या वर्षीच्या इफ्फीमध्ये चांगल्या सिनेमांच्या यादीत फ्रेंच भाषेचं वर्चस्व होतं, असं म्हणायला हवं. मागच्या लेखात एका फ्रेंच सिनेमाविषयी लिहिलं आणि आताही ज्या दोन उत्कृष्ट सिनेमांची ओळख करून घेत आहोत, ते फ्रान्सचेच आहेत.) 

Tags: ‘ॲक्ट अप’ रॉबिन कॅम्पिलो ‘120 बीपीएम’ रुबेन ऑसलंड्‌ इफ्फी ‘द स्क्वेअर मीना कर्णिक द स्क्वेअर आणि बीपीएम फ्रेंच सिनेमाचं वर्चस्व Meena Karnik The Square Aani BPM French cinemache varchasv IFFI: 2017 ACT UP Robin Campillo Ruben ostlund 120 BPM ( Beats Per Minute) The square weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात