1920 नंतरचे गांधी हे गोखल्यांचे सनदशीरपण आणि टिळकांचे जहालपण यांना एकत्र आणून पुढे जाणारे नेते आहेत. गांधीजी अहिंसेचे आग्रही होते. सशस्त्र आंदोलनाने मिळालेले स्वातंत्र्यही मला नको, असे म्हणणारे आहेत. मात्र टिळकांचा लोकक्षोभ जागवून जनतेत असंतोष उभा करण्याचा मार्ग त्यांना चालणारा आहे. तो तसा चालवूनच प्रथम असहकार, नंतर खिलाफत, पुढे दांडीयात्रा आणि अखेर व्यक्तिगत सत्याग्रह अशी आपल्या लढ्याची रूपे त्यांनी आखली व बदलली.
थोरामोठ्यांचे वर्तमान आणि त्यातील त्यांचे तात्कालिक वर्तन वा विचार यांच्या आधारे त्यांचा अभ्यास करणे ही बाब बरेचदा आपली फसवणूक करणारी ठरते. त्यांचे वर्तमान न विसरता, त्यांच्या पश्चात त्यांचा व त्यांच्या कार्याच्या प्रभावाचा परिणाम लक्षात घेऊनच असा अभ्यास पूर्ण करावा लागतो. प्लेटोला सॉक्रेटिसचा आणि ॲरिस्टॉटलला प्लेटोचा शिष्य ठरवून मोकळी होणारी आपली तत्त्वज्ञानाची शालेय व महाविद्यालयीन पुस्तके आपल्या विद्यार्थ्यांना खरे दिग्दर्शन करण्याऐवजी त्यांची दिशाभूलच अधिक करीत असतात. सॉक्रेटिसच्या आयुष्यातून व विशेषतः त्याने स्वेच्छेने स्वीकारलेल्या मृत्युदंडातून त्याच्या बुद्धीला व मनाला पटणारे निष्कर्षच तेवढे प्लेटो स्वीकारतो. या निष्कर्षांचा आधार घेऊन तो आपली तत्त्वज्ञानविषयक प्रमेये स्वतंत्रपणे मांडतो. तो सॉक्रेटिस सांगत नाही. स्वतःचे तत्त्वज्ञान सांगतो आणि ते सांगतांना सॉक्रेटिसच्या जीवनाचा व मृत्यूचा आधारच तेवढा घेतो. आपल्या देशातले सारे विचारवंत नेहरूंना गांधीजींचा शिष्य म्हणून मोकळे होतात. असे करणारी माणसे नेहरूंना आपला उत्तराधिकारी ठरविणाऱ्या गांधींना त्यांच्या कृत्याची खरे तर शिक्षाच देत असतात. त्या दोघांच्याही हयातीत त्यांचे झालेले मतभेद, त्यांच्यात निर्माण झालेले दुरावे आणि गांधीजींचे मोठेपण मान्य करण्याची (व तसे करतांना आपली मते बाजूला ठेवण्याची) नेहंरुंची शिष्यवृत्ती ते विचारात घेत नाहीत. नेहरू हे गांधींचे काँग्रेसमधील उत्तराधिकारी असतील, पण ते त्यांचे वैचारिक उत्तराधिकारी वा शिष्य नव्हते. गांधींचे वैचारिक व कृतिशील उत्तराधिकारी होण्याचा मान विनोबांकडेही जात नाही. त्यांनी प्रसंगपरत्वे घेतलेल्या भूमिका व चोखाळलेल्या वाटा लक्षात घेऊनच या माणसांचे स्वयंभू वेगळेपण समजून घ्यावे लागते.
दि. 9 मे 2017 ही नामदार गोपाळकृष्ण गोखले या थोर देशसेवकाची दीडशेवी जयंती. दि. 19 मार्च 1915 ला त्यांचा मृत्यू झाल्याने हाच त्यांच्या स्मरणाच्या शताब्दीचाही काळ. या काळात गोखल्यांची घ्यावी तशी दखल देशाने सोडा, महाराष्ट्रानेही घेतली नाही. गोखल्यांच्या नावावर मते गोळा करता येत नाहीत, हे त्याचे पहिले कारण आणि गोखल्यांच्या मागे त्यांच्या विचारांचे झेंडे खांद्यावर घेतलेली माणसे नव्हती, हे दुसरे. (व्यंकय्या नायडू या केंद्रीय मंत्र्याचे त्यांच्याविषयीचे विस्मरण व अज्ञान एवढे मोठे की, आपल्या टि्वटरवर गोखल्यांना श्रद्धांजली वाहताना त्यांनी त्यात चक्क लोकमान्यांचे छायाचित्र टाकले.) ज्यांनी याही काळात त्यांची दखल घेतली, त्यांनीही त्यांना ‘गांधीजींचे राजकीय गुरू’ म्हणून आपली जबाबदारी संपविली. गांधीजींनी गोखल्यांना आपले गुरू म्हटले, हे खरेच आहे. पण ते केव्हा, कोणत्या परिस्थितीत आणि त्या दोघांच्याही कोणत्या वैचारिक अवस्थेच्या काळात - या प्रश्नांची चर्चा कोणी केली नाही. तो काळ कधी संपला, त्यांच्या वैचारिक अवस्था कुठवर तशाच राहिल्या आणि नंतरच्या काळात गांधीजी खरोखरीच गोखल्यांच्या वाटेने चालत राहिले काय, याची चर्चा करणेही साऱ्यांनी टाळले. त्यामागे एक तर त्या दोघांच्या संबंधांविषयी चर्चा करणाऱ्यांच्या मनातील पूज्य बुद्धी असावी वा त्या संबंधांचे उत्तरकालीन स्वरूप तपासण्याची तसदी घ्यावीशी त्यांना वाटली नसावी.
गोखल्यांची आणि गांधीजींची पहिली भेट 1906 या वर्षातली. त्या वेळी गांधीजी द. आफ्रिकेतील त्यांच्या सत्याग्रहाला पाठिंबा व मदत मिळवायला भारतात आले होते. हा काळ गांधीजींनी स्वतःला ब्रिटीश साम्राज्याचे नागरिक समजण्याचा होता. साम्राज्याचे नागरिक म्हणून आपल्या वाट्याला येणारी कर्तव्ये प्रामाणिकपणे बजावण्याचा वसा या काळात त्यांनी घेतला होता. 1902 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या बोअर युद्धात त्यांनी स्वयंसेवकांचे पथक बनवून त्याद्वारे युद्धात जखमी झालेल्या ब्रिटीश सैनिकांची सुश्रूषा केली होती. रणांगणावर जखमी होऊन पडलेल्या सैनिकांना कित्येक मैल उचलून नेऊन इस्पितळात दाखल करण्याचे कामही त्यांनी अंगावर घेतले होते. त्याचसाठी त्यांना ब्रिटीश सरकारने ‘हिंद केसरी’ हा सन्मान बहाल केला होता. हा काळ गोखल्यांच्या व त्यांच्या राजकीय भूमिकांमधील सारखेपणाचा काळ आहे. ब्रिटीश सरकार हे भारताला लाभलेले ईश्वरी वरदान आहे असे गोखले मानत होते. या सरकारच्या वतीने व निःस्वार्थ बुद्धीने सेवा करण्यासाठी त्यांनी ‘सर्व्हंट्स् ऑफ इंडिया सोसायटी’ची स्थापना केली होती. 1905 मध्ये ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले. पण त्या पदावर असतानाही त्यांनी ब्रिटीशविरोधी वा स्वातंत्र्याला अनुकूल अशी भूमिका घेतली नव्हती. काँग्रेस पक्षाची सूत्रे जहालांच्या, म्हणजे टिळकांच्या हाती जाऊ नयेत व काँग्रेस पक्ष आंदोलनाच्या वा साध्या प्रतिकाराच्याही दिशेने जाऊ नये, हा त्यांचा तेव्हाचा प्रयत्न होता. गोखल्यांच्या देशभक्तीविषयी कोणाच्या अगदी टिळकांच्याही मनात संशय नव्हता. पुढेही कोणी तो तसा ठेवला नाही. हा देश स्वातंत्र्यासाठी तयार करणे, त्यासाठी सार्वत्रिक शिक्षणाचा आधार घेणे, ब्रिटीशांच्या मदतीने लोकशाही परंपरांची या देशाला ओळख करून देऊन त्या परंपरा येथे रुजविणे अशी त्यांची नेमस्त भूमिका होती. अगदी निःशस्त्र प्रतिकारातले निःशस्त्रपणेच त्यांना मान्य होते. प्रतिकाराला मात्र त्यांचा विरोध होता. त्यामुळे तेव्हा गांधींना ते जवळचे व आपले वाटणे स्वाभाविकही होते. त्या भारतभेटीत गांधीजी गोखल्यांप्रमाणेच टिळकांना आणि फिरोजशहा मेहता या नेमस्त नेत्यांनाही भेटले. त्यांचे वर्णन करतांना गांधीजी म्हणतात, ‘फिरोजशहा मला हिमालयासारखे, टिळक सागरासारखे, तर गोखले गंगेसारखे वाटले. हिमालयाची धास्ती मनात भरते, सागराला कवेत घेता येत नाही, गंगा मात्र साऱ्यांना जवळ घेते व आपलेसे करते.’
पुढल्या काळात गांधीजींच्या द. आफ्रिकेतील सत्याग्रहाला गोखल्यांनी आणि टिळकांनीही यथाशक्ती साह्य केले. गोखल्यांनी आफ्रिकेत जाऊनही गांधीजींची भेट घेतली आणि तेथे त्यांच्या आश्रमवासीयांसोबत त्यांच्या आग्रहावरून मराठीत भाषणही केले. ‘तुमच्या आंदोलनाकडे देश आशेने पाहतो’ असे उद्गार त्यात त्यांनी काढले. टिळकांनी आफ्रिकेला कधी भेट दिली नाही, पण आपण भारतात जसा लोकक्षोभ उभा करतो आणि त्यासाठी ज्या साधनांचा वापर करतो तसा लोकक्षोभ तशाच मार्गांनी गांधींनाही उभा करता येतो, हे त्यांच्या आफ्रिकेतील सत्याग्रहाच्या रूपात त्यांनी पाहिले व त्यांना जाणवले होते.
गांधीजी स्वतःला पत्रकार म्हणवीत. समाज व जग पाहण्याचा एक विलक्षण डोळा त्यांना लाभला होता. आपल्या भारतभेटीच्या काळात त्यांनी टिळकांची वाढती लोकप्रियता पाहिली होती. समाजातील सारे वर्ग त्यांच्या मागे एकवटताना त्यांना दिसले होते. बंगालपासून मद्रासपर्यंत टिळकांना मिळालेली राष्ट्रीय मान्यताही त्यांना कळत होती. जहालांचा वर्ग वाढता आहे आणि मवाळांचा संकोचतो आहे, हे त्या द्रष्ट्याला दिसतही होते. 1908 मध्ये टिळकांना सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली. त्या शिक्षेने त्यांच्या देशभक्तीभोवती त्यागाचे वलय उभे केले. त्यांचे ज्ञानीपण त्याआधीही सर्वाना मान्य झाले होते. देशासाठी एवढा त्याग करणारा राष्ट्रीय महापुरुष ही टिळकांची त्या शिक्षेने निर्माण केलेली प्रतिमा साऱ्या मवाळांचा शक्तिपात करणारी होती. टिळकांच्या शिक्षेच्या काळात काँग्रेसची सूत्रे मवाळांकडे गेली आणि त्यांचे नेतृत्व गोखल्यांकडे आले. पण आपली शिक्षा पूर्ण करून टिळक परत येताच ती सूत्रे पुनश्च टिळकांकडे आली, हेही येथे नोंदवायचे. जहालांचे वाढते सामर्थ्य आणि मवाळांचे मावळतेपण या बाबी गांधींच्या नजरेतून तेव्हा सुटणाऱ्याही नव्हत्या.
गांधीजी 1915 मध्ये कायमचे भारतात आले. मुंबई आणि पुण्यात त्यांच्या सत्काराच्या मोठ्या सभा झाल्या. त्यांचे अध्यक्षपद कुठे टिळकांनी, तर कुठे गोखल्यांनी भूषविले. याच काळात गोखल्यांनी त्यांना भारत फिरून पाहण्याची सूचना केली. त्याप्रमाणे गांधीजींनी देशभर भ्रमण करून येथील गरिबांचे व शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र याच काळात गोखल्यांचे त्यांच्या वयाच्या अवघ्या 49 व्या वर्षी निधन झाले. त्यांची थोरवी लक्षात असलेल्या त्यांच्या निकटच्या लोकांएवढाच त्यांच्या टीकाकारांनाही त्यांचा मृत्यू धक्का देऊन गेला. ‘गोखले हे देशाची शोभा आणि महाराष्ट्राचा अलंकार होते’ असे टिळकांनी त्यांच्याविषयी ‘केसरी’त लिहिले. गांधीजींना त्यांची गंगा हरवल्याएवढे दुःख झाले. यानंतरचा गांधीजींचा प्रवास कोणत्या मार्गाने व वळणांनी झाला हे पाहणे हे त्या तीन महापुरुषांच्या परस्परसंबंधांवर प्रकाश टाकणारे ठरेल.
चम्पारणमधील निळीच्या झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व 1917 मध्ये गांधीजींनी केले ते गोखल्यांच्या सनदशीर व नेमस्त मार्गाने. त्यातील शेतकऱ्यांचा क्षोभ मोठा होता. पण गांधीजींनी त्यांना प्रतिकाराच्या पातळीवर नेले नाही. त्यांना राज्यातून हद्दपार करण्याचा आदेश सरकारने काढला, तो त्यांनी धुडकावला. मात्र न्यायालयात तो आदेश न मानण्याचा अपराध आपण केल्याची त्यांनी कबुलीही दिली. न्यायालयाने त्यांना जामीन मागितला, तेव्हा तो द्यायला नकार देऊन त्यांनी तुरुंगात जाणे पसंत केले. त्यांना शिक्षा द्यायची किती आणि कशी, हा पेच न्यायालयालाच त्यामुळे पडला. अखेर त्यांना ‘कोर्ट उठेपर्यंत’ न्यायालयाच्या आवारात राहण्याची ‘शिक्षा’ फर्मावून न्यायालयानेच स्वतःची सुटका करून घेतली. हा घटनाक्रम प्रत्यक्ष पाहणारे तेथील निळीचे शेतकरी व नागरिक न्यायालयासमोरच गांधीजींच्या जयजयकाराच्या घोषणा देत होते.
हा गोखल्यांचा मार्ग होता. कायद्यावारचा व सरकारवरचा विश्वास सांगत केलेले हे सदनशीर आंदोलन होते. या काळात गोखले नसले तरी टिळक होते. त्यांना हा मार्ग फारसा पसंत नसला तरी लोकक्षोभाचा त्यामुळे झालेला उद्रेक व त्याचे संघटन त्यांना आवडणारे होते. शिवाय गांधी या इसमात जनतेला आकर्षून घेण्याचे सामर्थ्य आहे आणि ते त्यांनी त्यांच्या द. आफ्रिकेतील सत्याग्रही वृत्तीने व चळवळीने आत्मसात केले आहे, हे त्या असंतोषाच्या जनकाला कळतही होते. (टिळकांच्या अखेरच्या काळात गांधीजी, जीना व काँग्रेसचे इतर नेते त्यांना भेटायला गेले आणि हिंदू-मुसलमान प्रश्नाबाबत त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांना उत्तर देताना टिळक म्हणाले, ‘गांधी जे सांगतील आणि लिहून देतील, त्यावर माझी सही करायला मी केव्हाही तयार आहे.’ गांधी टिळकांचे शिष्य नव्हते, तरीही त्यांच्याविषयी टिळकांना वाटणारा हा विश्वास महत्त्वाचा होता. यापुढे हा माणूस देशाचे नेतृत्व करील, याविषयीची टिळकांना खात्रीही वाटत होती.) टिळकांच्या निधनानंतर गांधी देशाचे सर्वोच्च नेते बनले ही बाब टिळकांचा हा विश्वास खरा ठरविणाराही होती.
गांधी आणि गोखले यांचे नाते दरम्यानच्या काळातही गुरू-शिष्याचेच होते. त्याला तडा दिला तो जालियनवाला बागेतील अमानुष हत्याकांडाने. दि. 12 एप्रिल 1919 या दिवशी आलेल्या वैशाखी पौर्णिमेच्या मुहूर्तावर अमृतसरच्या सुवर्णंमंदिराशेजारी असलेल्या जालियनवाला बागेत हजारो स्त्री-पुरुषांची प्रार्थनासभा भरली होती. त्या सभेत स्वातंत्र्याच्या व गांधीजींच्या जयजयकाराच्या घोषणाही उठत होत्या. त्या बागेत जाणारी एकमेव चिंचोळी वाट सात ते आठ फूट रुंदीची आहे. जन. डायर या ब्रिटीश अधिकाऱ्याने ती आपल्यासोबतच्या शिपायांसह अडविली. तीत एक लहानशी तोफही त्याने आणून उभी केली. सभेतले लोक हा प्रकार हतबुद्धपणे पाहात असताना, कोणतीही पूर्वसूचना न देता डायरने त्याच्या शिपायांना गोळीबाराचा आदेश दिला. तो देताना या गोळ्या कमरेवरच लागल्या पाहिजेत, असेही त्यांना सांगितले गेले. काही मिनिटांच्या आतच ती बाग मृतांच्या शवांनी आणि जखमींच्या किंकाळ्यांनी भरून गेली. त्या हत्याकांडात 379 जण मृत्यू पावले, तर बाराशेहून अधिक जखमी झाले. या घटनेने देशाएवढेच सारे जग हादरले. निःशस्त्रपणे एकत्र येऊन प्रार्थना करणाऱ्या जमावावर असा अमानुष गोळीबार होण्याची घटना जगात प्रथमच घडली होती. प्रत्यक्ष विन्स्टन चर्चिल यांनीही या घटनेचा निषेध केला व ती ब्रिटीशांच्या परंपरेला कलंक लावणारी बाब आहे, असे म्हटले. सारा देश या जुलमाने पेटून एकसंघ होऊन उभा राहिला. काँग्रेसने या हत्याकांडाची व त्याला जोडून जनतेवर झालेल्या तेवढ्याच पाशवी अत्याचारांची पाहणी करून त्याचा सविस्तर अहवाल तयार करण्याची जबाबदारी मोतीलाल नेहरूंवर सोपविली. त्यांना त्यांच्या अनेक अडचणींमुळे ती पार पाडणे जमले नाही, तेव्हा त्यांनी ते काम गांधीजींवर सोपविले. गांधीजींनी दीर्घ काळ अमृतसरमध्ये राहून शेकडो लोकांच्या मुलाखती घेतल्या. तेथील हत्याकांडासह साऱ्या जुलमांचे तपशील एकत्र केले. त्यांच्या शिस्तप्रिय व विधिज्ञ वृत्तीने ते त्यांनी संपादितही केले. हे करताना गांधीजींना ब्रिटीश सरकारच्या पाशवी वृत्तीचे स्वरूप खऱ्या अर्थाने व संपूर्णपणे उमगले आणि ‘हे राज्य ईश्वराचे नसून सैतानाचे आहे,’ अशी ग्वाहीच त्यांनी दिली. ती देतानाच त्यांनी त्यांना मिळालेला हिंदकेसरी हा किताबही सरकारला परत केला. जालियनवाला बागेतील हत्याकांडाने गांधीजींचे मवाळपण घालविले, त्यांच्या नेमस्तपणालाही तडा दिला आणि यापुढे अहिंसेच्या मार्गाने गेलो तरी फार काळ आपण सनदशीर राहू शकणार नाही याची खात्री त्यांना पटविली.
त्यांनी गुरू मानलेले गोखले इंग्रजांचे राज्य हे वरदान असल्याचे सांगत होते. त्यांच्या सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या घटनेतही ब्रिटीश साम्राज्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ समाविष्ट होती. गोखल्यांनी गांधीजींना या सोसायटीचे सदस्य होण्याचे निमंत्रणही दिले होते. पण ब्रिटीश सत्तेशी, गांधीजी फारकाळ एकनिष्ठ राहणार नाहीत असे मत त्यांच्या द. आफ्रिकेतील सत्याग्रहाच्या आधारे बनविलेल्या, सोसायटीच्या इतर सदस्यांनी त्यांना ते देण्याचे नाकारले. तो गोखल्यांच्या निराशेचा व गांधीजींच्याही विषादाचा विषय होता.
ज्या क्षणी गांधीजींनी ब्रिटीश साम्राज्याला सैतानाचे राज्य म्हटले त्या क्षणी त्यांचा व गोखल्यांचा गुरू-शिष्य हा नातेसंबंध संपला. यानंतरचे गांधीजींचे राजकारण वेगळ्या वाटेने जाणारे राहिले. जालियनवाला बागेच्या काळात गोखले हयात नव्हते. ते तसे असते तर त्यांनीही ब्रिटीश साम्राज्याचे वर्णन पूर्वीप्रमाणे वरदानासारखेच असे केले असते की नाही, हे कळायला मार्ग नाही. कदाचित त्यांनीही त्यांच्या शिष्याप्रमाणे त्याला सैतानी म्हटले असते. पण या जर-तरच्या गोष्टी आहे. 1915 मध्ये असलेले त्यांचे संबंध 1999 मध्ये मागे, पडले ही बाब येथे महत्त्वाची.
हा काळ मवाळांचे राजकारण संपण्याचाही होता. रानडे कधीचेच गेले होते, फिरोजशहाही काळाच्या पडद्याआड झाले होते आणि गोखले हे त्यांचे उरलेले एकमेव नेतेही हयात नव्हते. वास्तव हे की 1914 मध्ये मंडालेहून सुटून आलेल्या लोकमान्यांच्या हाती राष्ट्रीय चळवळीची व काँग्रेसची सारी सूत्रे आपोआप गेली होती आणि पुनश्च हरिओम म्हणून त्यांनी त्यांचा राष्ट्रधर्म जागविण्याचा जहाल मार्ग हाताळायला सुरुवातही केली होती. त्यांचे नेतृत्व देशाने मान्य केले होते आणि महाराष्ट्राबाहेर साऱ्या देशात ते ‘बडे दादा’ म्हणून मान्यता पावले होते. हे नाव त्यांना पूर्व बंगालातील मुसलमान विणकरांनी दिले होते, ही बाब त्यांच्या राष्ट्रीयत्वाचे सर्वसमावेशक स्वरूप सांगणारी व त्यांना चिकटवला जाणारा धर्मवाद गळून पडला असल्याचे सांगणारीही होती. टिळक असंतोषाचे जनक होते, तर गांधीजी या असंतोषाला आंदोलनाचे स्वरूप देऊन ते रस्त्यावर आणणारे नेते होते. 1920 चे असहकार आंदोलन हा टिळकांनी जागविलेल्या राष्ट्रीय असंतोषाचा पुढचा अध्याय आहे, हे येथे लक्षात घ्यावे लागते.
यानंतरचा गांधींचा प्रवास टिळकांनी जागविलेला लोकक्षोभ सत्याग्रहात रूपांतरित करण्याचा व त्याच वेळी गोखल्यांचे निःशस्त्र राहण्याचे वचन पाळण्याचा आहे. 1920 नंतरचे गांधी हे गोखल्यांचे सनदशीरपण आणि टिळकांचे जहालपण यांना एकत्र आणून पुढे जाणारे नेते आहेत. गांधीजी अहिंसेचे आग्रही होते. सशस्त्र आंदोलनाने मिळालेले स्वातंत्र्यही मला नको, असे म्हणणारे आहेत. मात्र टिळकांचा लोकक्षोभ जागवून जनतेत असंतोष उभा करण्याचा मार्ग त्यांना चालणारा आहे. तो तसा चालवूनच प्रथम असहकार, नंतर खिलाफत, पुढे दांडीयात्रा आणि अखेर व्यक्तिगत सत्याग्रह अशी आपल्या लढ्याची रूपे त्यांनी आखली व बदलली. मात्र याही मार्गाने स्वराज्य जवळ येत नाही असे दिसले, तेव्हा 1942 मध्ये त्यांनी ‘चले जाव’ची घोषणा करून जनतेला ‘करो या मरो’ हा संदेश दिला. ही गोखले मागे पडल्याची व टिळकांचे राजकारण आणखी पुढे गेल्याची व टोकदार बनल्याची परिणती होती. गांधी हे गोखल्यांचे वैचारिक शिष्य असले तरी ते टिळकांच्या राजकारणाचे वारसदार होते, हे वास्तवच यातून लक्षात येते.
एखाद्या मोठ्या माणसाविषयीचा आदर व्यक्त करण्यासाठीही त्याला ‘गुरुस्थानी’ मानण्याची आपली पद्धत आहे. ‘ते माझे गुरू आहेत’ हे वचन खूपदा सत्यार्थी असण्याहून आदरार्थी अधिक असते. ॲरिस्टॉटल या तत्त्वज्ञाला अलेक्झांडरचा गुरू मानण्याची किंवा अवघे पंधरा दिवस आश्रमात राहून सांदीपनीला आपला गुरू म्हणण्याची श्रीकृष्णाची पद्धत बहुधा अशी असते. ॲरिस्टॉटल अलेक्झांडरला राज्यशास्त्र शिकवू शकतो, युद्धशास्त्र नाही आणि सांदीपनीही कृष्णाला धर्मशास्त्र सांगू शकतो, राजकारणाचे धडे देऊ शकत नाही. शिवाय ‘गुरू’च्या काळचे राजकीय व सामाजिक वातावरण, तेव्हाच्या त्यांच्या विरोधकांचे डावपेच आणि त्यांच्याशी त्यांना द्यावी लागलेली झुंज या साऱ्याच गोष्टी नंतरच्या काळात बदललेल्या असतात. लॉर्ड मोर्ले यांच्याशी गोखल्यांचे संबंध निकटचे होते. 1909 चा मोर्ले-मिन्टो हा कायदा घडविण्यातही गोखल्यांची त्यांना साथ होती. गोखल्यांच्या निधनानंतर टिळकांना ज्यांच्याशी लढत द्यावी लागली, ते भारतमंत्री किंवा व्हॉईसरॉय हे मोर्ले आणि मिन्टो यांच्यासारखे उदारमतवादी नव्हते. गांधीजींचा संबंध ज्या इर्विनसारख्यांशी आला, ते व्हाईसरॉयही कमालीचे कर्मठ व वृत्तीने साम्राज्यवादी होते. गोखल्यांची खेळी टिळकांच्या काळात चालणारी नव्हती आणि गांधीजींच्या काळात तर ती परिणामशून्य ठरण्याचीच भीती अधिक होती.
गांधींचा विचार गोखल्यांच्या जवळ राहणारा पण आचार टिळकांच्या निकट असणारा व त्याला अधिक धारदार बनविणारा होता, हे लक्षात घेतल्याखेरीज त्या तीन महापुरुषांचे यथार्थ स्वरूप समजून घेता येत नाही. गोखल्यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त त्यांना नमस्कार आणि त्याच निमित्ताने टिळक व गांधी या त्यांच्या समकालीनांचेही कृतज्ञ स्मरण.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या