डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

तीन मुलांचे चार दिवस : प्रकाशन समारंभातील भाषण

साधना साप्ताहिकाचा 15 ऑगस्ट 2016 चा अंक ‘तीन मुलांचे चार दिवस’ या विषयावर काढलेला विशेषांक होता. आदर्श पाटील, विकास वाळके व श्रीकृष्ण शेवाळे या टी.वाय.बी.ए.च्या तीन विद्यार्थ्यांनी गडचिरोली-छत्तीसगढ परिसरातील आदिवासींच्या प्रदेशात सायकलप्रवास केला होता. त्या प्रवासादरम्यान त्यांना नक्षलवाद्यांनी (पोलिसांचे खबरे आहेत अशा संशयावरून) आदिवासी पाड्यांवर थांबवून ठेवले आणि चार दिवसांनंतर चौकशी करून त्यांना सोडून दिले. तर अशा प्रकारे तीन मुलांचे चार दिवस अशी ती डायरी होती. त्या अंकाचे प्रकाशन पुणे येथील एस.एम.जोशी सोशॅलिस्ट फाउंडेशनच्या सभागृहात- सुभाष वारे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. राजा शिरगुप्पे यांनी त्या तीन मुलांची मुलाखत घेतली आणि मिलिंद बोकील यांनी प्रमुख भाषण केले, त्याचेच हे शब्दांकन. आता इथे देण्याचे निमित्त काय तर सावित्रीबाई पुणे विद्यापीठाने त्यांच्या टी.वाय.बी.ए. अभ्यासक्रमासाठी हे पुस्तक लावले आहे. - संपादक
 

साधनाने ‘तीन मुलांचे चार दिवस’ हा जो विशेषांक काढला आहे, त्याच्या प्रकाशन समारंभासाठी यायला मला खूप आनंद होत आहे. कारण आदर्श पाटील, विकास वाळके आणि श्रीकृष्ण शेवाळे या तिघा युवकांनी भारताच्या अंतर्भागातील आदिवासी प्रदेशांमध्ये सायकलवर प्रवास करण्याचे हे जे साहस केले आहे; त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. ही अतिशय लोकविलक्षण अशी गोष्ट आहे. शिवाय ते नुसतंच हे धाडस करून आले आहेत असं नाही तर त्याचा वृत्तान्तही त्यांनी लिहिलेला आहे. त्यांच्या या कृतीला अनेक परिमाणे आहेत. ही सगळी परिमाणे (डायमेन्शन्स) लक्षात घेतली तर या कृतीची मौलिकता समजून घेता येईल. 

पहिल्यांदा लक्षात येणारी गोष्ट म्हणजे हे तिघेही विशी-बाविशीतील तरुण आहेत. देश घडवण्यामध्ये युवकांचा सहभाग फार महत्त्वाचा असतो, असे आपण येता-जाता म्हणत असतो. पण प्रत्यक्षात हे कसं करायचं, याच्याबद्दल मौन बाळगतो. मुख्य म्हणजे हे काम युवकांनी स्वतःचे स्वतः करायचे असते; याबद्दलही आपण कधी बोलत नाही. युवकांचा देशकार्याकरता किंवा इतरही कुठल्या कामाकरिता वापर करण्याचा प्रयत्न अनेकजण करत असतात, पण युवकच या प्रक्रियेचे सूत्रधार असतील अशा प्रकारची आखणी किंवा मांडणी त्यातून होत नसते. सत्तरीच्या दशकामध्ये जयप्रकाश नारायण यांनी युवकांमधील ही शक्ती अचूक हेरली होती. आणि म्हणून त्यांनी युवकांना सामाजिक परिवर्तनाचंच नाही; तर संपूर्ण क्रांतीचं वाहक मानलं होतं. तसं मानण्याचं त्याचं कारण असं होतं की, युवक हे निर्भय, स्वतंत्र विचारांचे आणि व्यवस्थेमध्ये कुठलेही हितसंबंध नसलेले असे असतात. माणूस जसजसा मोठा होत जातो तसतसे त्याचे व्यवस्थेमध्ये निरनिराळ्या प्रकारचे हितसंबंध तयार होत जातात. मग त्याच्या हातून कुठल्याही प्रकारची निर्भीड कृती होत नाही. फक्त युवावस्थेत त्याच्या अंगी अशी ताकद असते की, तो प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध बंड करू शकतो, भांडू शकतो. त्यामुळे व्यवस्था बदलाची कृती युवक अतिशय सहजपणे करू शकतात. आणि तो बदल कसा करायचा हे त्यांचे तेच ठरवू शकतात. मात्र गेल्या काही वर्षांत असं झालं आहे की, व्यवस्था परिवर्तनात हा जो युवकांचा अग्रभाग आहे तो जणू विस्मरणात गेल्यासारखा झाला आहेे. ह्या पार्श्वभूमीवर, या तिघांनी, युवकच सामाजिक बदलांचे अग्रदूत कसे बनू शकतात, याचं अतिशय सुंदर असं उदाहरण घालून दिलेलं आहे.

याला जोडून दुसरी गोष्ट येते ती म्हणजे साहस. म्हणजे हे नुसते युवक नाहीत तर साहसी युवक आहेत. साहस ही युवावस्थेची एक निशाणी आहेच, पण तिला राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय परिमाणसुद्धा आहे. युरोपिअन लोकांच्या तुलनेत आपलं भारतीय मन एवढं साहसी नसतं. म्हणजे पूर्वी कधीकाळी आपल्या लोकांनी साहसीपणा दाखवला असेल, पण मध्ययुगामध्ये आपली सगळी सामाजिक व्यवस्था ही संकुचित, कुंचबलेली आणि चिरफाळलेली झाल्यामुळे भारतीयांच्या मनोवृत्तीतून साहस नावाच्या गुणाचा जणू काही लोपच झालेला होता. समुद्रोल्लंघन  हे असं पाप मानलं गेलं की, त्याचं प्रायचित्त घ्यावं लागायचं. याच्या उलट युरोपिअन लोक बेदरकारपणे नव्या, अज्ञात जगाच्या शोधाला निघायचे. युरोपिअन लोकांचा वरचश्मा जगभर पसरला, त्याचं मुख्य कारण त्यांच्या साहसी वृत्तीमध्ये होतं. कोलंबस हे त्याचं एक प्रतीक आहे, पण इतरही अनेक असे धाडसी प्रवासी होते, ज्यांनी कुठल्याही संकटांची पर्वा न करता आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून नवनवे प्रदेश धुंडाळले. आजही त्यांच्यामधली ही वृत्ती लोपलेली नाही.

मी या कार्यक्रमाला येत होतो तेव्हा माझ्या मुलाने, ह्या सायकल प्रवासाचं वर्णन ऐकून, एका स्वीडिश साहसी वीराची गोष्ट सांगितली. त्याचं नाव गोरान क्रॉप (Goran Kropp). तुम्ही इंटरनेटवर टाइप केलं किंवा गुगलवर सर्च केलं तर तुम्हांला त्याची माहिती कळेल. गोरान क्रॉप 1995 मध्ये स्वीडनमधून सायकलवर एकटा निघाला (वय 29) आणि 13 हजार किलोमीटर अंतर कापून एव्हरेस्ट शिखराच्या पायथ्याला आला. तिथं आल्यानंतर त्याने ऑक्सिजन न घेता आणि कुठल्याही शेरपाची मदत न घेता एव्हरेस्ट शिखर सर केलं. नंतर तो स्वीडनला परत गेला. पुन्हा तीन वर्षांनी आपल्या मैत्रिणीसोबत आला व पुन्हा एकदा त्याने एव्हरेस्ट सर केलं. त्याने ह्या प्रवासाकरिता एक खास सायकल बनवून घेतली होती आणि स्वत:चा शिधा स्वतःबरोबर नेला होता. तो पूर्णपणे स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी होता.

साहसाची परंपरा असते ती अशी! त्या परंपरेमधलं हे साहस या तीन मुलांनी केलेलं आहे आणि ते ज्या प्रदेशाच्या प्रवासाला निघाले होते तो निव्वळ दुर्गम, आदिवासी प्रदेश नव्हता; तर गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड हिंसाचार होत असलेला, हिंसात्मक चळवळीने पेटलेला, अत्यंत असुरक्षित आणि जवळजवळ संचारबंदी असलेला विभाग होता. त्या भागातल्या हिंसाचाराच्या नुसत्या बातम्या ऐकूनच जिथे मध्यमवर्गीय लोकांचं मन भयकंपित होत असतं, तिथे व्यावसायिक किंवा दुसरं कोणतंही कारण नसताना - केवळ त्या भागातल्या लोकांना भेटायला म्हणून जायचं - हे खरोखर फार मोठं धाडस आहे.

तिसरी महत्त्वाची गोष्ट ही की त्यांनी हा प्रवास सायकलवर केलेला आहे. मोटरसायकलवर, मोटारीने किंवा बोटीद्वारे जगप्रवास करणारे लोक असतात. त्यालाही हिंमत लागते. पण सायकलवरून असा प्रवास करण्याला एक विशेष महत्त्व आहे. आदर्श पाटील याने आपल्या वृत्तान्तामध्ये लिहिले आहे की, ‘सायकल ही प्रत्येकाला जवळची असते. माणसं सायकलमुळे खूप सहजरीत्या कनेक्ट होतात. म्हणजे तुम्ही जेव्हा सायकलवरून चालता तेव्हा, रस्त्यावरचा माणूस तुमच्याशी सहजरीत्या कनेक्ट होतो. आणि मग त्यांच्यात व आपल्यात दुरावा राहत नाही.’ ही गोष्ट अगदी खरीच आहे. पण त्यासोबत आणखी एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की, सायकल हे असं एक यंत्र किंवा वाहन आहे, जे आपल्या शरीराशी आणि भोवतालच्या निसर्गाशी सुसंवादी असतं. म्हणजे तुमच्या अंगात जेवढी शक्ती आहे, जेवढा उत्साह आहे, तेवढ्याच जोरात सायकल पळणार! तुमच्याशी आणि भोवतालच्या निसर्गाशी ती अगदी समरूप होऊन चालत असते. मोटारसायकल रस्त्यावर सुसाट पळवून दाखवणारी मुलं असतात; पण ती शक्ती त्या इंजिनाची किंवा पेट्रोलची असते. त्यांना जर सांगितलं की, तुम्ही तेवढ्या जोरात पळवून दाखवा तर त्यांना ती डेअरिंग दाखवता येणार नाही. जे लोक सायकल चालवतात त्यांना हे माहीत असेल की, सायकलवरून जाताना आपण गतिमान असलो तरी भोवतालच्या वातावरणाशी एक प्रकारची तद्रूपता साधतो. तशी तद्रूपता दुसऱ्या कुठल्याच वाहनाने साधता येत नाही. त्यामुळे सायकल हे प्रवासाचचं नाही तर एक प्रकारच्या आत्मिक आनंदाचंसुद्धा साधन राहिलेलं आहे.

आणखी एका गोष्टीसाठी त्यांचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे; ती म्हणजे या साहसाला सहानुभूतीची जोड आहे. त्यांनी या वृत्तान्तात लिहिल्याप्रमाणे त्यांच्या प्रवासाची ‘थीम’ ही ‘माणूस म्हणून जगायला शिकण्यासाठी आणि माणूस समजून घेण्यासाठी’ अशी होती. मला वाटतं, ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. उद्देश काय, तर माणूस म्हणून जगायचं आणि माणूस समजून घ्यायचा. हा खडतर प्रवास करण्याच्या आदल्या वर्षी त्यांनी चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये असाच प्रवास सायकलवरून केला होता. पण तो मुख्यतः त्या भागातले प्रसिद्ध सामाजिक प्रकल्प बघण्यासाठी होता. त्या अनुभवापासून प्रेरणा घेऊन त्यांनी गोंडवनाच्या अंतर्भागात ही मोहीम काढली. का? तर त्यांना तिथल्या आदिवासी लोकांच्या जगण्याशी स्वतःला जोडून घ्यायचं होतं. ते राहतात कसे, जगतात कसे, त्यांचे प्रश्न कोणते आहेत हे सगळं समजून घ्यायचं होतं. याला आपण सहानुभूती असे म्हणतो. म्हणजे हे साहस करण्यामागे त्यांचा कुठलाही स्वार्थ किंवा महत्त्वाकांक्षा नव्हती. निव्वळ सहानुभूती आणि प्रेम या भावनांपोटी त्यांनी हे साहस केलं.

अगोदर मी ज्या युरोपिअन लोकांच्या साहसाचा उल्लेख केला त्यांच्यामध्ये सुप्त का होईना, महत्त्वाकांक्षा होत्या : नवी भूमी पादाक्रांत करण्याच्या किंवा व्यापारातून नफा कमवण्याच्या किंवा धर्मप्रसार करण्याच्या. त्या आशा-आकांक्षांनी त्यांचं साहस डागाळलेलं होतं. परंतु या युवकांचं असं साहस कुठंही डागाळलेलं नाही. आपल्याच देशातल्या दुर्लक्षित, वंचित समाजघटकांशी बंधुभावाचं नातं जोडण्याचा त्यांचा उद्देश होता. हे या प्रवासाचं सगळ्यांत मोठं वैशिष्ट्य आहे, त्यामुळे त्यांच्या या कृतीला विशेष मौलिकता प्राप्त झाली आहे. या तरुणांचं साहस पाहून इतिहासातल्या त्या ‘वेडात दौडलेल्या सात वीरां’ची आठवण येणे साहजिकच आहे. मात्र ते सात आणि हे तीन यांच्यामध्ये फार मोठा फरक आहे. ते जे वीर दौडले त्यांच्यामध्ये शौर्य होतं नि आत्मघातही होता. हे जे वीर आहेत त्यांच्यामध्ये साहस आहे आणि आत्मशोध आहे. कारण  दुसऱ्यांना समजून घेण्याची प्रक्रिया जेव्हा आपण चालवतोे, तेव्हा आपण आपलाच शोध घेत असतो. हा आत्मशोध  सगळ्यांत महत्त्वाचा आहे.

आता माझ्यासारख्या लेखकाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर या तीन मुलांनी हा जो प्रवास केलेला आहे तोच केवळ उल्लेखनीय नाही तर त्यांनी तो लिहून ठेवला आहे; हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण त्यांनी हे लिहून ठेवलं नसतं तर हा सगळा अनुभव त्यांच्यापुरताच राहिला असता किंवा वर्तमानपत्रातील बातम्यांपुरताच राहिला असता. पण तो लिहिला गेल्यामुळे एक महत्त्वाचा सामाजिक दस्तऐवज आपल्या हाती लागलेला आहे. त्या दस्तऐवजाची आणि त्यातून व्यक्त झालेल्या दृष्टिकोनाची म्हणून काही खास वैशिष्ट्ये आहेत.

सर्वांत पहिलं वैशिष्ट्य म्हणजे हा जो दस्तऐवज आहे तो मानवशास्त्रीय आहे (ॲन्थ्रॉपॉलॉजीकल). म्हणजे त्यातील लेखन आदिवासी समाजाबद्दल आहे म्हणून नाही, तर ह्या अनुभवासाठी जे सूत्र त्यांनी घेतलं होतं (माणूस समजून घेण्याचं) ते मानवशास्त्रीय आहे. कारण माणूस समजून घेणं यालाच मानवशास्त्र किंवा ॲन्थ्रॉपॉलॉजी असं म्हणतात. तसं पाहिलं तर तिघांपैकी कोणीच रूढ अर्थाने मानवशास्त्राचा विद्यार्थी नाही, पण त्यांचा दृष्टिकोन हा मानवशास्त्रीय आहे. तसा तो असल्यामुळे जी माणसे यांना दिसताहेत, जो समाज दिसतोय त्यांच्याबद्दलची निरीक्षणे ते आपल्या वृत्तान्तामध्ये नोंदवताहेत. आणि ते बघत असताना त्यांच्या मनामध्ये जे विचारतरंग उमटतात त्यांची नोंद करताहेत. ह्या संदर्भात काही तात्त्विक मुद्देसुद्धा उपस्थित करताहेत. या सगळ्यांचा मिळून असा हा मानवशास्त्रीय दृष्टिकोन होतो आहे. आदिवासींकडे आपल्या समाजाचे मूळातच दुर्लक्ष होत असल्यामुळे, त्यांच्याविषयीचे पुरेसे संशोधन आपल्याकडे होत नाही. त्यामुळे ह्या वृत्तांताला खरं म्हणजे फार मोठं मोल आहे. मात्र आपल्याकडची विद्यापीठे अतिशय संकुचित आणि अनुदार झाल्यामुळे ते मोल ओळखलं जात नाही. अन्यथा, या वृत्तान्तामध्ये थोड्या अधिक माहितीची भर घालून आणि व्यवस्थित संदर्भ देऊन हे तिघेही सहज एम.ए. किंवा एम. फिल. डिग्रीसाठी पात्र होऊ शकतील.

जे वाचक हा वृत्तान्त वाचतील त्यांना मध्य भारतातल्या आदिवासी जीवनाचं यथार्थ असं दर्शन घडेल आणि त्यांचे आदिवासी जीवनाबद्दलचे गैरसमज व अज्ञान दूर होईल. आदर्शने आपल्या लेखात सुरुवातीलाच म्हटलं आहे की, ‘हा भाग दुर्गम किंवा अविकसित वाटला तरी येथील माणसं माणूस म्हणून फार पुढे गेलेली आहेत.’ श्रीकृष्ण आणि विकास यांनीही आपल्या लेखात लिहिलं आहे की, ‘आमच्या वस्तू तिथे अनेकदा त्या लोकांनी हाताळल्या, पण कोणीही चोरी केली नाही. काही वेळा काही लोकांना जेव्हा असा मोह झाला तेव्हा तेथील वडीलधाऱ्यांनी त्यांना सांगितलं की, अजिबात तसं करायचं नाही. त्यामुळे बस्तरचं नाव खराब होईल. म्हणून कोणीही तसं केलेलं नाही.’

आता हे वर्णन तुम्ही वाचल्यावर लक्षात येईल की, आदिवासी लोक एका विशिष्ट जीवन पद्धतीने राहतात - आणि ती जीवनपद्धत आपल्यापेक्षा वेगळी आहे - म्हणून ती मागास आहे असं मात्र अजिबात नाही. आपण सगळे एके काळी त्याच पद्धतीने जगत होतो. परंतु आपल्यातील काही लोक उठून खेड्यात, नंतर खेड्यातून शहरात गेले. आज आपण शहरी, औद्योगिक पद्धतीने जगायला लागलो म्हणून आदिवासींचे जगणे मागास आहे असे समजायचे अजिबात कारण नाही. त्यांची जगण्याची जी विशिष्ट शैली आहे - म्हणजे ते डोंगरात शेती करतात, जंगलातून वनोपज आणतात, पशुपालन करतात, कोंबड्या-बकऱ्या पाळतात, शिवाय मजुरी करतात - ती त्या त्या भागातल्या निसर्गाशी सुसंवादी अशी आहे; जशी आपली शहरी, औद्योगिक विश्वाशी आहे. त्यांच्या उपजीविकेला जर चांगल्या रितीने उत्पादक केले आणि त्याला शिक्षणाच्या संधी, आरोग्याची जपणूक आणि मूलभूत साधनसुविधांची जोड दिली तर त्यांनाही समृद्ध आणि स्वस्थ जीवन जगता येणं शक्य आहे. पण तसं करण्याची संधी आणि अवकाश आपली सध्याची व्यवस्था देत नाही, ही खरी समस्या आहे. आदर्शने अगदी अचूक म्हटलेलं आहे की, ‘आदिवासी संस्कृतीचा खेळखंडोबा सुरू आहे. तो बिचारा आदिवासी तिथल्या भयाण काळोखात सुन्न होऊन बसलेला आहे.’ (या प्रवासामधलं आणखी एक निरीक्षण फार मनोरंजक, पण अतिशय विदारक असं आहे. ते म्हणजे या तिघांपैकी आदर्श आणि श्रीकृष्ण ही नावं तिथल्या लोकांच्या कधी लक्षात राहायची नाहीत. पण विकास हे नाव मात्र लक्षात राहायचं. कारण तो शब्द कायम त्यांच्या कानांवर पडलेला होता, जरी त्या भागाचा विकास झालेला नसला तरीही.)

मात्र आदिवासी जीवनाचं केवळ दर्शन घडवून हे तिघे थांबलेले नाहीत; तर आदिवासी जीवनातल्या काही कळीच्या मुद्द्यांंना त्यांनी स्पर्श केलेला आहे. आदर्श आपल्या लेखात म्हणतो, ‘जंगल आहे म्हणून ते आहेत आणि ते आहेत म्हणून जंगल आहे.’ मध्यमवर्गीय शहरी माणसांना या निरीक्षणाचं मोल चटकन लक्षात येणार नाही. कारण आदिवासी जंगलतोड करतात आणि म्हणून जंगलं उजाड झालेली आहेत, असा अपप्रचार कायम होत असतो. वस्तुस्थिती याच्या बिलकूल उलट आहे. जंगलांची लूट ही उद्योगपती, कंत्राटदार आणि भ्रष्ट सरकारी अधिकारी यांनी केलेली आहे आणि त्याचे शेकडो पुरावे उपलब्ध आहेत. याउलट आदिवासींची परंपरा मात्र ‘ही साधनसंपत्ती आपण कशी जपू, कशी वाढवू’ अशा प्रकारची राहिलेली आहे. हे तर कोणालाही समजण्यासारखं आहे की, जो जंगल वापरतो त्यालाच ते टिकवण्यामध्ये रस असतो. अलीकडच्या काळामध्ये गडचिरोली जिल्ह्यात ‘मेंढा-लेखा’ नावाचं जे गाव आहे किंवा चंद्रपूर जिल्ह्यात ‘पाचगाव’ नावाचं जे गाव आहे; त्यांनी दाखवून दिलेलं आहे की, जर आदिवासींना आपल्या भोवतालच्या जंगलांचा अधिकार मिळाला तर त्याचा अतिशय उत्पादक आणि संवर्धनशील असा वापर ते करू शकतात. ‘गोष्ट मेंढा गावाची’ हे पुस्तक वाचलं तर कळेल की जर खरोखर आदिवासींना जंगलव्यवस्थापनाचे अधिकार दिले तर त्यातून पूर्वी कधी नव्हती इतक्या तऱ्हेची संपत्ती आणि भांडवल ते गाव स्वतः गोळा करू शकते.

  दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आदर्शने मांडलेला आहे, तो म्हणजे आदिवासी आणि त्यांचा धर्म. त्याने अगदी अचूक लिहिले आहे की, ‘आदिवासींचा धर्म हे दुसरेच लोक ठरवतात.’ आपला धर्म काय आहे हे ठरवायचा अधिकार त्यांनाच असला पाहिजे. केवळ आदिवासींनाच नाही, तर कोणत्याही माणसाला स्वत:चा धर्म ठरवायचा अधिकार असला पाहिजे. ‘तुझा धर्म अमुक आहे,’ असं दुसरा माणूस त्याला सांगू शकत नाही. भारतात संघटित धर्मांचा उदय झाला तेव्हापासून हा गोंधळ झालेला आहे. केवळ आदिवासीच नाहीत तर जे लोक संघटित धर्माचे नसतात त्यांच्यावर संघटित धर्मांनी सांस्कृतिक आक्रमण केलेलं आहे. संघटित धर्म येण्याच्या अगोदर भारतात पुष्कळ मानवसमूह होते. त्या सगळ्या मानवसमूहांचा आपला म्हणून एक धर्म होता. त्यांच्यात अनेक सूत्रे समान होती. काही उपासनापद्धती सारख्या होत्या आणि ‘विविधतेत एकता’ असं आपण म्हणतो ते त्या अर्थाने अगदी खरं होतं. पण म्हणून त्या सगळ्यांचा एकच एक धर्म होता असं मात्र अजिबात नव्हतं. फार फार तर असं म्हणता येईल की, या देशात राहणाऱ्या लोकांचे अनेक धर्म त्या काळात इथे होते. म्हणून आपला धर्म कोणता हे आदिवासींना स्वतः सांगू देत. ते बाकीच्यांनी ठरवू नये. ते जर कुठल्याही संघटित धर्माचे सदस्य नसतील तर मग त्यांना तसं मानण्याचा अट्टहास केला जाऊ नये. फसवून किंवा सक्तीनं त्यांचं धर्मांतरही केलं जाऊ नये. खरं तर ‘तुझा धर्म कोणता?’ हा प्रश्नच आता कालबाह्य झाला पाहिजे. मानवता हाच जर धर्म असेल आणि सगळ्यांची त्यावर सहमती असेल तर प्रत्येकाने वेगळा धर्म सांगण्याची काहीच आवश्यकता नाही. सांस्कृतिक परंपरा वेगळ्या असू शकतील. त्यांचं आपण जतन करू शकतो, त्या वाढवू शकतो. पण सांस्कृतिक परंपरांना धर्माचे स्वरूप देण्याची काहीही गरज नाही. ज्या धर्मोत्तर (पोस्ट-रिलिजिअस) सोसायटीकडे सगळ्या जगाला जायचंय, तिकडे जाताना भारतातले आदिवासी हे आपले अग्रदूत असू शकतील. तसं असण्याचा पूर्ण अधिकार आपण त्यांना दिला पाहिजे.

आणखी एक महत्त्वाचं निरीक्षण ह्या तीन मुलांनी या वृत्तान्तामध्ये नोंदवलं आहे ते म्हणजे भाषेचं. गोंड आदिवासी अनेक राज्यांत विखुरलेले आहेत. म्हणजे अगदी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमध्ये. आणि ते राहतात त्या प्रत्येक ठिकाणी त्यांना परक्या भाषेचं शिक्षण घ्यावं लागतं. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाची पूर्ण ससेहोलपट झालेली आहे. आदर्शने मांडलेला हा मुद्दाही बरोबर आहे की, ‘खरोखर जर भाषावार प्रांतरचनेच्या तत्त्वावर राज्यांची निर्मिती करत होतात, तर मग गोंडी भाषेच्या तत्त्वावर गोंडवनाचीसुद्धा निर्मिती करायला पाहिजे होती.’ हे अगदी खरं आहे. कारण गोंड समाज गंगेच्या दक्षिण तीरापासून गोदावरीच्या उत्तर तीरापर्यंत पसरलेला आहे. तुम्ही मनाशी कल्पना करा की, केवढा मोठा हा भूभाग होतो. म्हणजे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात अशी राज्ये केली तेव्हा गोंडी भाषेचं राज्य करायला हवं होतं. तसं न झाल्यामुळे या गोंड समाजाची- जो देशामधला लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक एकचा आदिवासी समाज आहे- विभागणी अनेक राज्यांत झाली. त्यामुळे गोंड मुलांच्या शिक्षणाची दुरवस्था झाली. ती चूक दुरुस्त करावी या दृष्टीने कुठल्याही राज्याने तशा प्रकारची पावले उचललेली नाहीत. त्यामुळे ती मुलं अतिशय हुशार आणि चुणचुणीत असूनसुद्धा शिक्षणापासून वंचित राहतात. ही चूक आपण कधी सुधारणार आहोत? अनेक पिढ्यांचं शिरकाण झाल्यावर?

हा प्रश्न आपल्याला त्या भागामध्ये जो असंतोष पेटला आहे त्याच्याकडे घेऊन जातो. नक्षलवाद्यांना भेटणं आणि त्यांचा अभ्यास करणं असा या युवकांचा मूळ उद्देश नव्हता. तशा प्रकारच्या गाठीभेटी काही लेखकांनी, पत्रकारांनी घेतलेल्या आहेत. त्याच्यावरची पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. त्या पुस्तकांतून समजते की, विशिष्ट अशी राजकीय भूमिका त्या लेखकांनी वा पत्रकारांनी घेतलेली आहे. या युवकांना मात्र अभावितपणे नक्षलवाद्यांना सामोरे जावे लागले. नक्षलवादी कसे आहेत याचं वर्णन या वृत्तान्तामधून अबोलपणे, अप्रत्यक्षपणे आणि अराजकीय भूमिकेतून आलं आहे. मात्र ते पुरेसं बोलकं आहे आणि त्यातून एक गोष्ट आपल्याला नक्की समजते की, भारताचा सगळा अंतर्भाग गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित राहिलेला आहे. वर्षानुवर्षे अन्यायाची शिकार झालेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांच्यावर अन्याय झालाच. पण स्वातंत्र्यानंतरही तो अन्याय कमी होण्याऐवजी आणखीनच वाढलेला आहे. हिंसाचार ही आदिवासींची कधीही सहज प्रवृत्ती नव्हती. परंतु त्यांना त्या दिशेकडे ढकलण्यात आलेलं आहे. आता तर त्यांची परिस्थिती भीषण झालेली आहे. विशेषतः त्या समाजातील युवकांची. कारण त्यांच्यावर आता दोन्ही बाजूंनी बंदुका रोखलेल्या आहेत. कुठूनही गोळी सुटली तरी मरतो तो मधला आदिवासीच. सरकारने तिथे मोठ्या प्रमाणावर फौज आणि सशस्त्र सेना तैनात केलेली आहे. ही फौज तिथे काय करते याच्यावर या युवकांनी भाष्य केलेलं नाही. पण त्या वृत्तान्ताच्या शेवटी एक चित्र टाकलेलं आहे ते पुरेसं बोलकं आहे. तुम्ही ते वाचाल तेव्हा मी काय म्हणतो आहे ते बरोबर समजेल.

आता या सगळ्या उपक्रमाचं फलित काय? तर विकासने अचूक म्हटलेलं आहे की, ‘आमच्या प्रवासातल्या अनुभवाकडे नाही, तर आदिवासींच्या प्रश्नांकडे समाजाचं लक्ष गेलं तर ही मोहीम कारणी लागली असं होईल.’ ही भावना अगदी खरी आहे. या तरुणांनी हे जे साहस केलं आहे, जो वृत्तान्त लिहिला आहे त्यातून आपल्याच आदिवासी बांधवांवर आपण कसा अन्याय करतोय हे लक्षात येईल. आणि ही गोष्ट बाकीच्या समाजाने नीट लक्षात घ्यायला पाहिजे. मला तर असं वाटतं की सरकारी यंत्रणेनंसुद्धा आपलं धोरण ठरविण्यासाठी या वृत्तान्ताचा आधार घ्यायला पाहिजे. आणि खरं तर याचं भाषांतर हिंदी किंवा हळबीमध्ये केलं पाहिजे. म्हणजे छत्तीसगडमध्येसुद्धा त्याचं वितरण करता येईल.

शेवटी मी असं म्हणेन की, आजच्या सामाजिक संदर्भामध्ये, सर्वसामान्य घरातले तीन तरुण जेव्हा आपल्या आयुष्यातले फक्त दहा-पंधरा दिवस अशा साहसासाठी देतात तेव्हा त्यातून केवढा मोठा अनुभव आणि केवढं मोठं ज्ञान तयार होतं! आज पुण्यासारख्या शहरात शेकडो युवक-युवती महिनोन्‌महिने ढोलताशे बडवण्यात आपली शक्ती खर्च करताहेत. त्याच्यातून काय निष्पन्न होतं? तर बहिरे कान, पोटाचे असह्य विकार आणि प्रचंड सामाजिक गोंगाट!

या पार्श्वभूमीवर या तिघांनी जे केलेलं आहे ते खरोखर सगळ्या तरुणांचे डोळे उघडणारे ठरेल. आपल्या तारुण्याची जी ऊर्जा व ताकद आहे ती कशासाठी खर्च करायची? ती राजकारणी आणि हितसंबंधी लोकांना वापरू द्यायची, की स्वतःच स्वतःच्या जीवनाचं सूत्रधार बनायचं? हा विचार प्रत्येक तरुण माणसाने करायला पाहिजे. म्हणून या वृत्तान्ताच्या प्रकाशनप्रसंगी मी या तिघांचेही भरभरून अभिनंदन करतो. मला खात्री आहे की, जीवनातली साहसाची ही जी प्रेरणा आहे, ते ती अशीच पेटती ठेवतील. एवढंच नाही तर तिला अभ्यासाची आणि संशोधनाची जोड देऊन समाजाला उपकारक आणि भूषणावह अशी मोठमोठी कामे पार पाडतील. त्यांना ह्या कार्यासाठी शुभेच्छा देऊन हे भाषण पुरे करतो.

(शब्दांकन : हरेश शेळके, पारनेर)

(‘तीन मुलांचे चार दिवस’ या साधना विशेषांकाचे प्रकाशन 15 ऑगस्ट 2016 रोजी झाले. त्यानंतर त्या अंकाला साधना प्रकाशनाकडून पुस्तकरूप देण्यात आले. त्या पुस्तकाचे प्रकाशन 12 जानेवारी 2017 रोजी (युवक दिन) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात, विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु वासुदेव गाडे यांच्या हस्ते झाले. विद्यापीठाचा मराठी विभाग व विद्यार्थी कल्याण मंडळ यांनी तो कार्यक्रम साधना प्रकाशनाच्या साह्याने आयोजित केला होता. तेव्हा मिलिंद बोकील व अतुल पेठे हे दोघे प्रमुख पाहुणे होते. वरील दोन्ही कार्यक्रमांचे व्हिडिओ weeklysadhana.in वर पाहता येतील. हे पुस्तक इ-बुक स्वरूपात किंडलवर उपलब्ध असून, ऑगस्ट महिन्यात ऑडिओ बुक स्वरूपात स्टोरीटेलवर उपलब्ध होणार आहे.)

हेही पाहा :

मिलिंद बोकील यांनी 'तीन मुलांचे चार दिवस' या अंकाच्या प्रकाशन समारंभात केलेले भाषण... 

राजा शिरगुप्पे यांनी आदर्श, विकास, श्रीकृष्ण यांची घेतलेली मुलाखत... 

तीन मुलांचे चार दिवस या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ...

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मिलिंद बोकील

लेखक, सामाजिक कार्यकर्ते
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके