डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

सिनेमा पाहणाऱ्या माणसाचा बडा खयाल!

सिनेमा म्हणजे काय काय आहे? अलिबाबाची गुहा आहे? आजीबाईचा बटवा आहे? जादूगाराची पोतडी आहे? सिनेमा म्हणजे बरंच काही आहे! सुप्रसिद्ध गुजराती-हिंदी कवी-लेखक अमृतलाल वेगड यांच्या शब्दांना सिनेमा जोडला तर असं म्हणता येईल- ‘सिनेमा म्हणजे आकाशात उडणारी नदी आहे आणि सिनेमा म्हणजे जमिनीवर वाहणारा ढग आहे!’

हे पुस्तक वाचताना या पुस्तकातलं जग वेगळं आहे, बाहेरचे जग वेगळं आहे, असा प्रत्यय वाचकाला येऊ शकतो; पण एकदा या न पाहिलेल्या जगात शिरण्याची, फिरण्याची संधी साधायला हवी. हे जग वेगळे आहे, इथली माणसं अनोखी आहेत. रोज भेटणारी ही माणसं नाहीत, त्यामुळे या जगात एकदा चक्कर मारून तर या! मजा येईल याची खात्री मी देतो.

आपण प्रवास करतो. प्रत्येक स्टेशनवर उतरून काही चहा पितात. काही स्टेशनवर उगाच उतरतात. काहींसाठी प्रवास म्हणजे आराम असतो, मजा असते. काही फक्त झोपा काढतात. प्रत्येकासाठी कारणे वेगवेगळी असतात. काही विनाकारण प्रवास करतात, काही जाणतेपणाने संपूर्ण प्रवासाच्या नोंदी ठेवतात. पुढे कुठल्याही प्रवासात आधीच्या प्रवासाचे संदर्भ कामाला येतात. प्रत्येक प्रवासात असं काही वैशिष्ट्य असतं. ‘सिनेमाचे’ही तसंच आहे. या सर्व गोष्टी सिनेमाला लागू पडतात.

आपल्या देशात ‘काय फालतूगिरी’ असं म्हणून हिणवल्या गेलेल्या आणि अभ्यासाच्या बाबतीत मागे राहिलेल्या या कलेने सुमारे 125 वर्षांत संपूर्ण जगाला वेड लावले, ही गोष्ट तर आपण नाकारू शकणार नाही. सर्व कलांचा संगम होतो आणि एक नवी कला अस्तित्वात येते, ती जागा म्हणजे सिनेमा. या सिनेमाच्या वेडावर जगणाऱ्या आणि जग बघणाऱ्या या एका माणसाचा रंजक प्रवास म्हणजे, ‘सिनेमा पाहणारा माणूस’ हे पुस्तक होय.

अशोक राणे हा एक सिनेवेडा माणूस आहे. गेली कित्येक वर्षे तो सिनेमा पाहतोय. थिएटरच्या अंधारात त्याला सुरक्षित वाटतं, या त्यांच्या भूमिकेत बरंच काही लपलेलं आहे. 

मला फिल्म इन्स्टिट्यूटला ॲडमिशन मिळाली, तेव्हा आई म्हणाली की- आता काही बोलायलाच नको, सिनेमे पाहणे हाच अभ्यास! एका मोठ्या माणसाने असे लिहिले आहे, ‘तुमच्या आवडीचं काम करायला मिळण्यासाठी नशीब लागतं.’ दुसऱ्याने असेही लिहिले आहे की, ‘तुमच्या आवडीचं काम करायला लागल्यावर तुम्हाला आयुष्यभर काम करावं लागत नाही; कारण मग काम हे काम राहत नाही, तिथे उरतो फक्त आनंद.’ 

अशोकसरांचं असंच काहीसं झालं आहे. त्यांना मी प्रेमाने काका म्हणतो. कुठल्याही वेळेस फोन केला तर बोलणं होईलच याची खात्री नसते, कारण ते परदेशात असतात. ते तिथेच राहतात असा समज झाला, तर त्यात काही गैर नाही. कुठूनही कुठेही उडी मारायची ताकद त्यांच्यात आहे. काकूंना विचारलं तर- आज जर्मनीत असलेला माणूस उद्या फ्रान्समध्ये सापडू शकतो. त्यांनी इतक्या वर्षांत काही हजार सिनेमे पाहिले आहेत आणि जाणतेपणी पाहिले आहेत. त्यांच्यातल्या व्यासंगाने पाहिले आहेत.

हे पुस्तक म्हणजे- एका तयारीच्या गवय्याचा बडा खयाल आहे. एक असा गाणारा- ज्याला सगळ्यातलं सगळं हवं आहे. त्याला कुठल्याही बाबतीतला परहेज मान्य नाही. अमुक एक म्हणजे चांगलं आणि तमुक म्हणजे वाईट- याच्या पलीकडे जाऊन विचार करणारा, मुक्तहस्ते मुक्त बुद्धीने सर्व प्रकारच्या कलांकडे जसा एक पट्टीचा गवय्या तयारीने बघेल, तसंच काहीसं अशोककाका सिनेमांकडे पाहतात. तिथे नियम आणि अटी लागू होत नाहीत.

सोप्या भाषेत अनेक छोटे-छोटे प्रसंग लिहून आपल्या डोळ्यांसमोर चित्र उभं करण्याची त्यांची हातोटी अभ्यासावी अशी आहे. पटकथा जशी लिहिली जाते, त्याप्रमाणे लहानपणीच्या आठवणी ते आपल्यासमोर आणतात आणि आपला सिनेमा पाहणारा पिंड कसा पोसला, कसा वाढला याचे अत्यंत दृश्य स्वरूपातील चित्र वाचकांसमोर उभं करतात. हॉस्पिटलमध्ये आईला भेटायचं तर आहे, नाही तर सिनेमा पाहायला पैसे मिळणार नाहीत आणि हॉस्पिटलमध्ये जायचं तर त्याची भीती वाटते, या द्विधा मन:स्थितीतला छोटा अशोक त्या हॉस्पिटलसकट आपल्यासमोर उभा राहतो आणि अनेक सिनेमांतली अनेक लहान मुलं त्याच्या आजूबाजूला जमा करतो. त्यात अमर, अकबर, अँथनी पण असतात... cinema Paradis मधला Salvatore Di Vita पण असतो आणि वेगवेगळ्या  वयात वेगवेगळ्या चित्रपटांत समोर आलेला आपला लाडका अपूसुद्धा असतो.

इथे सुरू झालेला हा प्रवास अनेक व्यक्ती, वृत्ती, प्रकृतींशी आपली भेट करत पुढे जातो.  हा प्रवास खरंच खूप मोठा आहे, त्यामुळे तो प्रत्यक्ष अनुभवणे योग्य आहे. अनेक प्रसंग, अनेक माणसं अनपेक्षितपणे अशोककाकांसमोर आली की, आपल्यासमोर येतात आणि काही ठिकाणी अंगावर काटा येतो. हे ‘सिनेमा पाहणाऱ्या माणसाचं स्वगत’ आहे. त्यात अनेक कलांबद्दल असलेली आत्मीयता सतत दिसत राहते. त्यामागची कळकळ आपल्याला जाणवते. नाटक, मालिका, चित्रकला, शिल्पकला, काव्य, लेखन, संगीत याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला या वाचनात सापडतात. परदेशी चित्रपटांबरोबरच भारतीय भाषांमधील अनेक चित्रपटांची ओळख आपल्याला इथे होते. आपल्या मातीतील चित्रपटांमध्ये काम केलेले, अनेक परिचित-अपरिचित कार्यकर्ते-पुढारी हेसुद्धा आपल्याला इथे भेटतात; तसेच Bergman, Trauffaut, Godard, Zanussi, Polanski, Wajda, Bertolichi, Fabri, Menzel, Renoir, Mμszoros, Jancs2, Szabo, Kurosawa, Ozu, Oshima- असे ज्यांना जगाने डोक्यावर घेतले- तसेही लोक आपल्याला भेटतात. अशोककाका त्यांच्या गुण-दोषांसकट त्यांची ओळख करून देतात; ओळख वाढवायची जबाबदारी आपल्यावर असते.

या पुस्तकातील प्रकरणे उत्तम झाली आहेत. एक-दोनचा उल्लेख करणे म्हणजे बाकीच्यांवर अन्यायासारखे आहे. त्यातील प्रकरणांची टायटलसुद्धा उत्तम आहेत आणि काही प्रकरणांतली काही वाक्ये उत्तम जमून आली आहेत.

शंभर सेंचुरीनंतरसुद्धा सचिनची रणजीमधली एखादी इनिंग आपल्या स्मरणात राहावी आणि ती आपल्यासाठी स्पेशल असावी, तसंच काहीसं आहे. ‘पक्वान्न घाईघाईत वाढले म्हणून पक्वान्नाचे महत्त्व कमी होत नाही’ हे असंच एक वाक्य. अशी अनेक छोटी, विचार करायला उद्युक्त करणारी वाक्यं अगदी सहजतेने या लिखाणात येतात. काही प्रकरणे डोळ्यांच्या कडा ओल्या करतात. जयदेव आणि मुबारक बेगम यांच्या आठवणी वाचून अनेक जुन्या कलाकारांची आठवण होते. हे प्रकरण वाचून ‘कभी तन्हाइयों में यूँ हमारी याद आयेगी’ हे गाणं तुमच्याकडून त्या संध्याकाळी ऐकलं जाईल, याची मी खात्री देतो. सिनेमा फक्त बंगाली, तमिळ, तेलुगू आणि मल्याळी माणसांनी पाहावा आणि त्यावर चर्चा करावी, ह्या भारतीय भावनेला छेद देऊन दोन भाग करायचे धारिष्ट्य हे पुस्तक ठेवतं. आपल्यातल्या, आपली भाषा बोलणाऱ्या आणि जगभरात कौतुक झालेल्या एका मराठी माणसाने उचललेलं हे शिवधनुष्य आहे. 

‘विचार करून जर सिनेमा बनला असता, तर काय बहार आली असती; इतका तो बनवणं हे कठीण काम आहे.’  हे पुस्तक वाचल्यावर असं जाणवलं, सिनेमावर अभ्यासपूर्ण लिहिणे तितकंच- किंबहुना, जास्त कठीण काम आहे. ते लिखाण फक्त काही जणांना समजून उपयोगी नाही, तर चित्रभाषा सर्वदूर पसरवण्यासाठी सर्वांना समजेल, त्यात रुची निर्माण होईल आणि सिनेमाची एक वेगळी भाषा, एक वेगळा अभ्यास आपण सगळे करायला लागू- या भावनेने हे लिहिले गेले आहे, हे यातून जाणवतं. हे खूप कठीण काम आहे. त्यात सर्व संदर्भ आठवणं आणि ते तसे वेळेवर लिहिताना उपयोगी येणं, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यात त्यांची हुकूमत आहे. ‘चित्रपटीय संदर्भांची भेळ कधीच होत नाही,’ हे त्यांच्यातील हुशार विद्यार्थ्यांचे कौशल्य आहे.

‘मी सिनेमा पाहतो आणि म्हणून मी जगातले कित्येक देश प्रत्यक्ष पाहायच्या आधीच पाहिलेले आहेत’ या आत्मविश्वासामुळे अशोककाका अनेक देशांत-शहरांत- गल्ल्यांमध्ये अगदी सहज भ्रमण करतात. परदेशात त्यांना खूप मान आहे, हे मुलुंडच्या बागेत फिरायला येणाऱ्या कित्येक लोकांना माहीत नाही- हे आपलं दुर्दैव आहे. परदेशात अशी परिस्थिती नाही, हे तितकंच खरं आहे. ‘फक्त सिनेमा पाहणं हा पूर्ण वेळ व्यवसाय आहे’ हे भारतात तरी पचनी पडणारे वाक्य नाही. ‘तू गातोस? पण मग पोटापाण्याचं काय?’ असा प्रश्न पडणाऱ्या देशात ‘फक्त चित्र काढणारे, फक्त चेलो वाजवणारे, फक्त वाईन उत्सव बघणारे लोक जगात आहेत’ असं म्हणणं म्हणजे- ‘काय सांगता काय? वेड्यांचा बाजार नुसता!’ असे शब्द कानांवर पडले तरी त्यात विशेष काही नाही. घराला असलेली गॅलरी ही कपडे वाळत घालण्यासाठी बनवली आहे, असं बनवणाऱ्याला वाटणे, विकणाऱ्याला वाटणे आणि घेणाऱ्यांनाही वाटणे- हा त्या गॅलरीचा अपमान आहे, असे मानणाऱ्या देशात या ‘सिनेमा पाहणाऱ्या माणसाचं’ महत्त्व खूप जास्त आहे.

सिनेमा ही ‘स्थळ आणि काळा’वर आधारित एक कला आहे. आपण असं म्हणू शकतो की, हेच त्याचं सर्वस्व आहे. सिनेमाबद्दल लिहायचं झालं तर ‘स्थळ आणि काळ’ याला डावलून चालणार नाही. त्याला सोडून पुढे जाता येत नाही आणि आपण अशा लोकांमध्ये आहोत (कधी-कधी आपणही तसेच असतो) जिथे ‘स्थळ आणि काळ’ याची किंमत त्याच्या युटिलिटीवर केली जाते. स्थळ म्हणजे स्क्वेअर फूट जागा आणि काळ म्हणजे ऑफिसची वेळ किंवा 08:51 ची लोकल.

काकांचा फोन लागला नाही म्हणजे ते परदेशात आहेत, असे समजावे. आता व्हाट्‌सॲपमुळे मेसेज येतो आणि ठावठिकाणा कळतो. फोन करणारा माणूस ‘नवं काय पाहिलं’ हे ऐकायला तयार होतो. देश-विदेशात जाऊन संग्रहालय बघणे, तिथली चित्रं पाहणे, वेगवेगळ्या स्थळांना भेट देणे, तिथले संदर्भ तपासणे- हे सर्व सिनेमाच्या अभ्यासाला पोषक-पूरक आहे, असं मानणारे अशोककाका आहेत. सिनेमाच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी त्यांनी केल्या आहेत आणि म्हणूनच ते आज अनेक विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.

भारतात तीन गोष्टींवर कोणीही अधिकारवाणीने बोलू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे, क्रिकेट. एखाद्या तज्ज्ञाला लाजवील अशा आविर्भावात ‘सचिनने कसा चुकीचा शॉट मारला आणि तो आऊट झाला’ असे संवाद भरून वाहणाऱ्या लोकल आपण देशात पाहतो. राजकारण आणि सिनेमा ह्या त्यातल्या पुढच्या दोन गोष्टी! ‘काय बकवास आहे यार’ असं म्हणून जो सिनेमा दहा मिनिटांत थिएटरवरून खाली उतरतो, तो सिनेमा बनवण्यासाठी किती कष्ट घेतले हे त्या बघणाऱ्याला कळत नाही. त्यात त्याची चूक नाही. कोथिंबिरीच्या भावानुसार वर-खाली होणारे Blood Pressure हे त्यामागचे कारण आहे. वेचलेल्या प्रत्येक पैशाचा परतावा मागण्याची वृत्ती आपल्या सगळ्यांमध्ये आहे.  अमुक एक गोष्टी आहेत म्हणजे सिनेमा भारी आणि नाही तर तो खराब, असं मानणाऱ्यासाठी हे पुस्तक म्हणजे वरदान आहे. 

सिनेमा म्हणजे काय काय आहे? अलिबाबाची गुहा आहे? आजीबाईचा बटवा आहे? जादूगाराची पोतडी आहे? सिनेमा म्हणजे बरंच काही आहे! सुप्रसिद्ध गुजराती-हिंदी कवी-लेखक अमृतलाल वेगड यांच्या शब्दांना सिनेमा जोडला तर असं म्हणता येईल- ‘सिनेमा म्हणजे आकाशात उडणारी नदी आहे आणि सिनेमा म्हणजे जमिनीवर वाहणारा ढग आहे!’ हे पुस्तक वाचताना या पुस्तकातलं जग वेगळं आहे, बाहेरचे जग वेगळं आहे, असा प्रत्यय वाचकाला येऊ शकतो; पण एकदा या न पाहिलेल्या जगात शिरण्याची, फिरण्याची संधी साधायला हवी. हे जग वेगळे आहे, इथली माणसं अनोखी आहेत. रोज भेटणारी ही माणसं नाहीत, त्यामुळे या जगात एकदा चक्कर मारून तर या! मजा येईल याची खात्री मी देतो.

‘त्यांना काय कळतंय? नुसतं बोलायला-लिहायला काय जातंय? एकदा करून तर बघा म्हणजे कळेल’ अशी टिप्पणी अनेक समीक्षकांबद्दल केली जाते. काकांच्या बाबतीत असं काही बोलायची सोय त्यांनी ठेवली नाही. त्यांनी सिनेमा लिहिला आहे, दिग्दर्शित केला आहे. त्यांनी लघुपट बनवले आहेत. या प्रत्येक मांडवाखालून ते गेले आहेत आणि त्यातून आलेल्या चांगल्या-वाईट अनुभवांतूनच त्यांची सिनेमाकडे बघण्याची दृष्टी अजून प्रगल्भ झाली आहे, हे निर्विवाद. त्यासंबंधीच्या सर्व प्रवासाचा साक्षीदार हा ‘सिनेमा पाहणारा माणूस’ आहे.

या पुस्तकाच्या डिझाईनबद्दल इथे मी लिहायला हवं. ज्यांना अंधार प्रिय आहे, अशा लेखकाच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ त्या ‘सिनेमा पाहणाऱ्या माणसाचं’ मनोगत होऊन व्यक्त झालं आहे. प्रोजेक्शन रूममधून बाहेर पडणारा निळ्या रंगाचा हा उजेड आहे आणि बाकी सर्व अंधार!

काकांनी वेगवेगळ्या फेस्टिव्हलमधली कार्डं आणि त्यांनी पाहिलेल्या आणि जपून ठेवलेल्या सिनेमाची तिकिटं डिझाईनचा भाग म्हणून वापरली आहेत. नवसारीतल्या एका लहान मुलाचा जहांगीर टॉकीजमध्ये व्यावसायिक चित्रपट बघत सुरू झालेला प्रवास म्हणजे सुरुवातीला आपल्याला दिसणारी अनेक चित्रपटांची तिकिटं आहेत आणि पुस्तक संपताना देश-विदेशातील जागतिक चित्रपट महोत्सवांमधील त्यांची उपस्थिती आणि कौतुकास्पद अशी ‘परीक्षक’ कामगिरी दर्शवणारी वेगवेगळी डेलिगेट कार्डं आहेत- हा खूप मोठा प्रवास अधोरेखित करणारा डिझाईनचा एक भाग आहे. कल्पक संयोजकांचे कौतुक करणे, आभार मानणे आवश्यक आहे. सिनेमाविषयक या पुस्तकात मुखपृष्ठ ते मलपृष्ठापर्यंत वेगळेपण जपण्याचा एक स्तुत्य असा पाठ आहे.

‘मी माझ्याकडे पाहिलं तर मी कसा दिसतो, हे मला कळेल; पण त्यासाठी मी स्वतःकडे पहायला हवं आणि खरं उत्तर ऐकायची आपलीच आपण तयारी ठेवायला हवी.’ सिनेमा पाहणाऱ्या माणसाचा हा बडा खयाल आहे. स्वतःबरोबरच जगाकडे बघायची- किंबहुना, जग बघताना स्वतःला तपासायची तयारी ठेवूनच काकांनी हा घाट घातला आहे. 

Andre Bazin, Francois Truffaut, Henri Langlois  या तिघांचे ऋण मानून या मैफिलीत आपण शिरतो आणि एका वेड्या माणसाबरोबर एका प्रवासाला निघतो. 512 ठिकाणे घेत हे पुस्तक वाचल्यावर एक उद्‌गार प्रत्येकाच्या तोंडून नक्की निघेल आणि तो म्हणजे- ‘राजा, असा असतो सिनेमा!’  एकदा पाहा तरी!
धन्यवाद, अशोककाका!!!

सिनेमा पाहणारा माणूस
लेखक : अशोक राणे
संधिकाल प्रकाशन, मुंबई
पृष्ठे : 512, किंमत : 550 रुपये

Tags: नवे पुस्तक संधिकाल प्रकाशन सिनेमा पाहणारा माणूस चित्रपट अशोक राणे संगीत लेखन काव्य शिल्पकला चित्रकला मालिका नाटक Oshima Ozu Kurosawa Szabo Jancs2 Mμszoros Renoir Menzel Fabri Bertolichi Wajda Polanski Zanussi Godard Trauffaut Bergman weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मिलिंद दामले
mida_1978@yahoo.com

भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्थान, पुणे


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात