Diwali_4 दर्जेदार पोलीश सिनेमा
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

2013 च्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये महान दिग्दर्शक आंद्रे वायदा यांच्या नव्या कोऱ्या सिनेमासह पोलंडचे बरेच सिनेमे होते. इतकंच नव्हे, तर पोलीश दिग्दर्शिका ॲग्निझस्का ऑलाँ यांच्या सहा सिनेमांचा रेट्रोस्पेक्टिव्हही होता. त्या निमित्ताने पोलीश सिनेमाविषयी थोडंसं...

पोलंड. एक छोटासा देश. पण इतिहासाने या देशाला अनेक लढाया, युद्ध, बंड, मारामाऱ्या, हिंसा यांना तोंड द्यायला लावलेलं आहे. 1864 पर्यंत पोलंडमध्ये सशस्त्र बंड झाली. पहिल्या महायुद्धानंतर या देशाला पुन्हा एकदा स्वतंत्र होण्याची संधी मिळाली. 1918 ते 39 या काळात पोलीश गणतंत्र अस्तित्वात होतं. पण नाझी जर्मनीने त्यांच्यावर स्वारी केली आणि या देशाने आपलं स्वातंत्र्य गमावलं. नाझींनी ज्युंच्या बरोबरीने पोलीश लोकांवरही अनन्वित अत्याचार केले. हद्दपार असलेल्या पोलीश सरकारने तरीही कार्यरत असणं थांबवलं  नाही आणि मित्र राष्ट्रांना ते मदत करत राहिले. रशियन सैन्याने पोलंडमध्ये प्रवेश करून नाझींचा पराभव केला खरा, पण त्याचा परिणाम म्हणून स्थापना झाली ती कम्युनिस्ट पीपल्स रिपब्लिक ऑफ पोलंडची, सोविएत युनियनच्या उपग्रहासारख्या देशाची.

नाझींचे अत्याचार सहन केलेल्या पोलंडवर नंतरच्या काळात कम्युनिस्टांचा अन्याय सहन करण्याची वेळ आली. 1980च्या उत्तरार्धात लेक वालेसाच्या सॉलीडॅरिटी चळवळीने अखेर कम्युनिझम संपुष्टात आणला आणि देशात संसदीय लोकशाही प्रस्थापित केली. या सगळ्याचा परिणाम म्हणून  असेल कदाचित, पण या देशाने जागतिक सिनेमाला एकाहून एक दर्जेदार दिग्दर्शक बहाल केले. क्रिस्टॉफ किस्लोवस्की, रोमन पोलनस्की, क्रिस्टॉफ झानुसी, ॲग्निझस्का ऑलाँ आणि अर्थातच आंद्रे वायदा. पोलंडचा सर्वात लोकप्रिय नेता लेक वालेसा यांच्यावरचा ‘वालेसा, मॅन ऑफ होप’ हा आंद्रे वायदांचा सिनेमा या वेळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये दाखवला गेला आणि प्रेक्षकांची त्याला चांगलीच वाहवा मिळाली.

या वर्षी पोलंडने ऑस्करसाठी परदेशी  सिनेमांच्या विभागात आपली अधिकृत एन्ट्री म्हणून या सिनेमाची निवड केली आहे. वायदा यांचं वय आज नव्वदीच्या जवळ आलंय. आणि तरीही ते जोमाने सिनेमे बनवताहेत. द प्रॉमिस्ड लँड, मॅन ऑफ आयर्न, कटीन यासारख्या त्यांच्या अनेक सिनेमांमधून त्यांनी  आपल्या देशाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक परिस्थितीवर भाष्य करायचा प्रयत्न केलाय. प्रत्येक वेळी त्यांचा सिनेमा म्हणजे मास्टरपीस होता असं जरी नाही म्हणता  आलं तरी त्यांनी आजवर केलेल्या सुमारे चाळीस सिनेमांपैकी दहा सिनेमे तरी क्लासिक्स  म्हणून गणले जाऊ शकतात एवढा हा दिग्दर्शक मोठा आहे. आणि वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी वालेसावरचा बायोपिक केलाय.

या सिनेमातला वायदांचा फोकस स्पष्ट आहे. वालेसांचं आयुष्य त्यांना दाखवायचं आहेच, पण त्यातही वालेसांच्या कामावरच त्यांना लक्ष केंद्रित करायचंय. त्यामुळे त्यांचं घर, त्यांचं बायकोवरचं प्रेम, त्यांना झालेली अनेक मुलं हे सगळं गोष्टीच्या ओघात संदर्भ म्हणून  येतं. ओरियाना फलाची या प्रसिद्ध पत्रकार, जगातल्या अनेक मोठमोठ्या नेत्यांच्या त्यांनी  घेतलेल्या मुलाखती गाजलेल्या आहेत. थेट आणि कोणताही आडपडदा न ठेवता बोचणारे प्रश्न विचारणारी मुलाखतकर्ती  म्हणून त्या प्रसिद्ध होत्या.

वालेसांची मुलाखत घेण्यासाठी  त्या येतात आणि त्या मुलाखतीमधून आपल्यासमोर वालेसा उलगडत जातात. दिग्दर्शक काही वेळा जुनं फुटेज वापरतो पण  ते अगदी बेमालूमपणे सिनेमात विरघळून जातं. प्रत्येक वेळी  दरवाजावर अटक करायला पोलीस आले की हातातली  अंगठी काढून बायकोला, ‘माझं काही बरंवाईट झालं तर ही अंगठी विक,’ असं सांगून जाणाऱ्या या नेत्याच्या नव्याने  प्रेमात पडायला हा सिनेमा आपल्याला भाग पाडतो. रस्त्यावर  उतरून लोकांचं नेतृत्व करणारे वालेसा, ‘विचारवंत तीन तास चर्चा करून ज्या निष्कर्षापर्यंत पोहोचतात तो निर्णय मी तीन  मिनिटांत माझ्या मनाचा कौल लावून घेतो’ असं म्हणणारे  वालेसा, कम्युनिस्ट सरकारला बातमी पुरवणारे हेर म्हणून  आपल्याच लोकांकडून हेटाळणी झालेले वालेसा, शांततेचा  नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर तो स्वीकारण्यासाठी बायकोला  पाठवताना, ‘मी गेलो आणि मला पुन्हा या देशात परत घेतलं  नाही तर?’ असा सावध प्रश्न विचारणारे धोरणी वालेसा...

पोलंडच्या या सर्वात मोठ्या नेत्याची कहाणी सांगताना आंद्रे  वायदा आपल्याला थेट त्या काळात घेऊन जातात. (शाळांमधून इतिहास शिकवायला आपण सिनेमासारख्या  माध्यमाचा का उपयोग करत नाही असा प्रश्न मला नेहमी  पडतो. अर्थात त्यासाठी योग्य इतिहास चित्रित होणंही  आवश्यक आहे, समाजातल्या अनेक वर्गांच्या भावनांचा  विचार करून इतिहास नाही चित्रित करता येत. असो). वायदांनी दुसऱ्या महायुद्धाच्या भोवती आपल्या काही सिनेमांची कथा गुंफलेली आहे. या सिनेमाच्या निमित्ताने ते आपल्या अधिक नजीकच्या इतिहासाकडे आलेले दिसतात. पोलंडच्या अनेक दिग्दर्शकांना महायुद्धाने, नाझींच्या आणि त्यानंतर कम्युनिस्टांच्या अत्याचारांनी सिनेमाचा विषय  म्हणून आकर्षित केलेलं आहे.

 वायदांनंतर दहा वर्षांनी, 1953 मध्ये जन्मलेले यान किदावा ब्लॉन्स्की हेही त्याला  अपवाद नाहीत. त्यांच्या ‘इन हायडिंग’ या सिनेमाला दुसऱ्या  महायुद्धाचीच पार्श्वभूमी आहे. पण गोष्ट त्याविषयीची नाही. अजिबातच नाही. यानिना आपल्या वडिलांबरोबर राहतेय. एक दिवस घरी आल्यावर तिला कळतं की वडिलांनी घरात एका तरुण ज्यू मुलीला इस्तेरला आसरा दिलाय, लपवून  ठेवलंय. यानिनाला हे अजिबात पसंत पडत नाही, पण वडिलांचा निर्णय मान्य करण्यावाचून तिच्यासमोर पर्यायही  नसतो. मात्र, हळूहळू ती इस्तेरमध्ये गुंतत जाते. इतकी की,  युद्ध संपल्यानंतर ती निघून जाईल म्हणून यानिना तिला ते कळणारच नाही याची काळजी घेऊ लागते. इस्तेरवरचा आपला हक्क अबाधित राहवा म्हणून खून करण्यापर्यंत तिची पातळी घसरते.

दरम्यान तळघरात, कोणाशीही संपर्क  नसलेल्या इस्तेरची घुसमट वाढत जाते. अखेर यानिना  स्वत:ला पोलिसांच्या हवाली करते आणि इस्तेर घरातून बाहेर पडते तेव्हा बदललेले पोलंडचे रस्ते तिला अनोळखी वाटतात. रेस्तराँमध्ये आपण ज्यू असल्याची निशाणी लावून ती बसते तेव्हा तिथला एक वयस्क वेटर तिला, आता याची  गरज उरलेली नाही, हे हळुवारपणे सांगतो आणि इस्तेरला बऱ्याच काळानंतर पहिल्यांदा आपण आता स्वतंत्र आहोत  याची जाणीव होते. मोकळं आकाश, वेगाने बोगद्याच्या बाहेर येणारी आगगाडी... सिनेमाच्या सुरुवातीला दिसणारी ही दृष्य  शेवटीही दिसतात तेव्हा त्यांना एक वेगळाच अर्थ प्राप्त  झालेला असतो. युद्धाच्या निमित्ताने त्याबरोबर येणारं मळभ, आकसलं जाणारं स्वातंत्र्य, नातेसंबंधांमधले ताण, अविश्वास  अशा अनेक भावभावनांवर दिग्दर्शक भाष्य करतो. संपूर्ण सिनेमाभर आपल्याला तणावात ठेवण्यामध्ये यशस्वी होतो.

यानिनाच्या भूमिकेसाठी बोकझारस्का मॅगडॅलेना हिला इफ्फीमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दिला गेला हेही इथे सांगायला हवं. ‘व्हिवा बेलारुस’ हा सिनेमा केला होता पोलंडचा तरुण दिग्दर्शक क्रिस्टॉफ ल्युकासझेविक्झने. मुख्य म्हणजे सिनेमा  पोलंडविषयी नव्हताच. शेजारच्याच बेलारुसमधल्या हुकुमशाहीविरुद्ध मिरॉन या तरुणाने केलेल्या बंडाची ही सत्यकथा होती. दिग्दर्शक स्वत: महोत्सवासाठी आलेला होता आणि प्रेक्षकांशी गप्पा मारताना त्याने हा सिनेमा  करण्यामागचा आपला हेतूही सांगितला. तो म्हणाला, ‘आम्ही आजवर खूप अत्याचार बघितले आहेत. त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आता आमचा शेजारी देश जेव्हा असे प्रयत्न करताना दिसतो त्यावेळी त्यांच्या बाजूने आपण उभं रहायला हवं असं वाटतं. आणि मी  माझ्या माध्यमातूनच त्यांना पाठींबा देऊ शकतो.’

 सिनेमामधून आपली बांधिलकी दाखवणाऱ्या या तरुण दिग्दर्शकाने एक उत्तम कलाकृती प्रेक्षकांसमोर पेश केली होती. त्यात कुठेही प्रचारकीपणा नव्हता. किंबहुना मिरॉनची कहाणी इतकी नाट्यपूर्ण आहे की तशा कोरडेपणाला इथे  वावही नव्हता. त्यामुळेच सिनेमाबरोबरच मला स्वत:ला भावली ती दिग्दर्शकाची बांधिलकी, राजकीय जाणीव आणि त्यासाठी भूमिका घेण्याची असलेली तयारी. पोलंडचे सिनेमे एका ठराविक दर्जाचे असतातच या माझ्या मतावर ‘व्हिवा बेलारुस’ने शिक्कामोर्तबच केलं. दिग्दर्शक व्लॅदिस्लॉ पासिकोवस्की यांच्या ‘आफ्टरमाथ’ सिनेमाची निर्मिती पोलंडबरोबरच नेदरलंड, रशिया, स्लोवाक रिपब्लिक या देशांनीही केली होती.

अमेरिकेत वीस वर्षं  काढल्यानंतर फ्रँकिस्झेक आपल्या पोलंडमधल्या गावात परत येतो तो त्याचा धाकटा भाऊ गावकऱ्यांबरोबरच्या संघर्षात  सापडतो म्हणून. हा संघर्ष कोणता, भाऊ जुने जुने ज्यूंच्या  नावाचे दुसऱ्या महायुद्धाच्या काळातले थडग्यांवरचे दगड  आणून आपल्या शेतात का ठेवतोय, तो असा विक्षिप्त का वागतोय, गावकऱ्यांचा त्याला विरोध का आहे, गावातले  म्हातारे त्याच्यावर हल्ला करण्याएवढे का चिडले आहेत या प्रश्नांची उत्तरं शोधत असताना त्याला आणि त्याच्या  भावाला एका भयंकर गोष्टीचा उलगडा होतो.

 जर्मन सैनिक  गाव सोडून जाताना गावकऱ्यांच्या मदतीने गावातल्या ज्यूंना, ज्यात लहान मुलांचाही समावेश होता, फ्रँकिस्झेकच्या जुन्या घरात कोंडून घराला आग लावलेली असते. यात ते सगळे ज्यू जळून खाक होतात. त्यांच्या जमिनींची मग गावकरी आपापसात वाटणी करून घेतात. आपले वडीलही त्यात सहभागी होते हे कळल्यानंतर दोन्ही भाऊ हादरतात. आपल्या जुन्या घरात त्यांना हाडांचे सापळे, कवट्या सापडतात. पूर्वजांच्या पापाचं क्षालन करणं एवढंच मग या भावांच्या  हातात उरतं. हा सिनेमाही एका वेगळ्याच जगाची ओळख आपल्याला करून देतो.

 पोलंडचा इतिहास, भूगोल, संस्कृती या सगळ्याचा पगडा त्यांच्या सिनेमांवर कायम दिसत आलाय  याची जाणीव या सगळ्या सिनेमांनी करून दिली. (दुर्दैवाने ॲग्निझस्का ऑलाँ या दिग्दर्शिकेचे रेट्रोस्पेक्टिव्हमध्ये असलेल्या सहा सिनेमांपैकी एकही मला पाहता आला नाही). आणि पोलंडमधून एकापेक्षा एक मास्टर दिग्दर्शक का निर्माण होतात या प्रश्नाचं उत्तर थोडं थोडं मिळू लागलंय असंही वाटलं.

Tags: मॅन ऑफ होप वालेसा कटीन मॅन ऑफ आयर्न द प्रॉमिस्ड लँड सिनेमा इन हायडिंग व्हिवा बेलारुस ॲग्निझस्का ऑलाँ क्रिस्टॉफ ल्युकासझेविक्झ इफ्फी आफ्टरमाथ आंद्रे वायदा नाझी Man Of Hope Man Of Aryan Iffi AfterMath Nazi Poland Cinema Meenakarnik weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात