Diwali_4 लहान मुलांचं भावविश्व
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

मोठ्यांच्या सिनेमांमधली लहान मुलं हा खूप कठीण विषय आहे. इफ्फीमधले काही सिनेमे पाहताना ते खास जाणवलं- मग तो सिनेमा जपानचा असो की लातिव्हियाचा. महत्त्वाचं म्हणजे, इथे लहान मुलांना माणसांसारखं वागवलं जात होतं; खेळण्यांसारखं नाही. मात्र, यातही उठून दिसला तो जपानचा ‘लाईक फादर लाईक सन’ हा सिनेमा.

लहान मुलं म्हणजे एक युनिट नसतं. ‘व्यक्ती तितक्या प्रवृत्ती’ ही म्हण त्यांनाही लागू पडते. पण तरीही त्यांचं स्वत:चं एक भावविश्व असतं. त्यांचं स्वत:चं काही म्हणणं असतं. प्रतिक्रिया असते, प्रतिसादही असतो. आपल्या सिनेमाच्या विषयाला अनुसरून दिग्दर्शकाला  त्यामध्ये प्रवेश करायचा असतो. त्यासाठी काही वेळा स्वत:च्या लहानपणात डोकावून पाहावं  लागतं, तर कधी आजूबाजूला असलेल्या मुलांमध्ये त्याचा शोध घ्यावा लागतो. गोव्यामध्ये  झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये असं लहान मुलांचं भावविश्व दाखवणारे काही सिनेमे होते- भिन्न देशांचे, भिन्न विषयांचे. पण त्यात एक साधर्म्य होतंच. हे त्या-त्या  देशाच्या संस्कृतीचं वैशिष्ट्य की दिग्दर्शकाची प्रगल्भता, हे ज्याचं- त्यानं ठरवावं; पण इथे मुलांना माणसांसारखं वागवलं जात होतं. त्यांच्याशी बोलताना खरं बोलायचं असतं, खोटं- खोटं किंवा लाडे-लाडे नव्हे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पूर्ण प्रामाणिकपणे द्यायची  असतात, हे जणू सिनेमातल्या माणसांसाठी स्वाभाविक होतं. (आपल्याकडच्या सिनेमांमध्ये हे क्वचितच दिसतं. आणि, प्रत्यक्ष आयुष्यातही आपण मुलांना कुठे समान वागणूक देतो?)

उदाहरणार्थ- दिग्दर्शक यॅनिस नॉडर्‌स यांचा ‘मदर- आय लव्ह यू’ हा लातिव्हियाचा  सिनेमा. शाळेतल्या पाचवी-सहावीतल्या रेमन्ड्‌स या मुलाची ही गोष्ट. आईबरोबर तो  राहतोय. आई हॉस्पिटलमध्ये काम करते, तिला शिफ्ट्‌स कराव्या लागतात; त्यामुळे अनेकदा  रेमन्ड्‌स घरी एकटाच असतो. वॉशिंग मशीन लावणं, आपलं खाणं गरम करून घेणं- यासारखी कामं तो करत असतो. आईला काही वेळा तिच्या मित्राबरोबर जाताना पाहत  असतो. आणि तो प्रचंड मस्तीखोर असतो. म्युझिक क्लासमध्ये वयाने मोठ्या मुलीच्या चेलोमध्ये ब्रा घालून ठेवणं, मित्राची आई जिथे घरकाम करते त्या घरी मित्राबरोबर चोरून  जाणं- हे असले उद्योग सतत करत असल्यामुळे घरी त्याची तक्रार अनेकदा येत असते. एकदा  आपली तक्रार आईला कळू नये म्हणून प्रगति-पुस्तकातलं पानच तो फाडून टाकतो आणि शाळेतून घरी फोन येऊ नये म्हणून फोनची वायर कापून ठेवतो. पण त्यामुळे भलताच प्रसंग  ओढवतो.

आईला रात्री हॉस्पिटलमधून इमर्जन्सीसाठी बोलवायला माणूस पाठवावा लागतो. आई रागारागाने रेमन्ड्‌सला मुस्कटात मारते आणि कामावर जाते. झालेला अपमान सहन न  होऊन रेमन्ड्‌स आईला ‘मदर, आय हेट यू’ अशी चिठ्ठी लिहून ठेवतो आणि घरातून बाहेर पडतो. त्या रात्री त्याच्यावर अनेक प्रसंग गुदरतात. त्याचा चेलो चोरीला जातो, त्यासाठी तो  मित्राची आई काम करत असते त्या घरात शिरतो आणि चोरी करतो अन्‌ शेवटी थकून घरी  येतो. चोरी उघडकीला येते. आळ मित्रावर येतो, पण रेमन्ड्‌स काही बोलत नाही. आपण  मुलाशी जरा जास्तच रागाने वागलो म्हणून आई त्याला बाहेर फिरायला घेऊन जाते, त्याचे लाड करते. मनातली अपराधी भावना सहन न होऊन शेवटी तो आईकडे आपली चूक कबूल करतो, ‘मदर, आय लव्ह यू’ म्हणतो आणि आईच्या  कुशीत शिरतो.

खरं तर एवढीशी गोष्ट. पण किती प्रकारचे नातेसंबंध दिग्दर्शक उलगडू पाहतो! आई आणि मुलाचं नातं तर  आहेच. त्यात त्रागा आहे, प्रेम आहे, रागावणं आहे आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रामाणिकपणाही आहे. आईने  रेमन्ड्‌सला, ‘तू कुणाला तरी भेटावंस, अशी माझी इच्छा आहे’, असं सांगितल्यानंतर तो विचारतो, ‘तू  ज्याच्याबरोबर काही वेळा रात्री जातेस, त्यालाच का?’ आईसुद्धा होकार देताना आढेवेढे घेत नाही. मित्राबरोबरचं  नातं तर वर्गभेदाच्या पलीकडचं. मित्राची आई घरकाम करते याचा त्या मैत्रीवर काहीच परिणाम होत नाही. उलट, दोघे जण आईकडून चावी पळवून घरात शिरतात; घराचा  मालक कसा रात्री-बेरात्री दारू पिऊन मुलींना घेऊन येतो याची माहितीही शेअर करतात.

आयुष्यातल्या अनेक प्रश्नांचा सामना एकट्याने  करणारा रेमन्ड्‌स जितका मस्तीखोर आहे, तितकाच ‘इलो इलो’ या सिंगापूरच्या ॲन्थनी चेन या दिग्दर्शकाच्या  सिनेमातला जिआलही. पण दोघांचं जग अगदी वेगळं. जिआलही एकुलता एक. त्याचे आई आणि बाबा दोघेही  काम करणारे. एक दिवस एका फिलिपिनो मोलकरणीला ते  कामाला ठेवतात आणि जिआल व टेरेसाचं एक वेगळंच  नातं तयार होतं. आधी तो तिला खूप त्रास देतो. मग  हळूहळू मवाळ होत जातो आणि टेरेसाची परत आपल्या गावी  जायची वेळ येते, तेव्हा विमानतळावर जाताना झट्‌कन तिचा  एक केस आठवण म्हणून तोडून घेतो. टेरेसा पैसे  कमावण्यासाठी आपल्या अकरा महिन्यांच्या बाळाला  मायदेशी सोडून आलेली असते. जिआलशी वागताना कुठे  तरी ती आपल्या बाळावरची माया त्याला लावते. जिआलच्या आई-वडिलांशीही तिचं एक आगळं नातं तयार होतं. म्हटलं तर मालक आणि मोलकरणीचं, म्हटलं तर जिच्यासमोर मन मोकळं करावं अशा मैत्रिणीचं.

याचा अर्थ, टेरेसा म्हणजे आदर्श नायिका असते, असं नाही. अधिकचे  पैसे कमावण्यासाठी ती तिच्या आठवड्याच्या सुट्टीच्या  दिवशी बेकायदा मार्गाने, म्हणजे एका बुटिकमध्ये केस  कापायचं काम स्वीकारते. आपल्या मालकिणीची उंची  लिपस्टिक लावू पाहते. थोडक्यात, पडद्यावर वावरणारी सगळी माणसंच असतात- आपल्यासारखी. चांगली आणि  वाईट, दोन्हीही. कुणी देव नाही की दानव नाही.

आणि  म्हणूनच मनाला भिडणारी. ‘द अमेझिंग कॅटफिश’मध्येही एक लहान मुलगा आहे. तीन मोठ्या बहिणी आणि सतत आजारी असलेल्या  आईबरोबर राहणारा. या चार भावंडांचे वडील वेगवेगळे आहेत. खरं म्हणजे, ही गोष्ट त्या आईची- म्हणजे मार्थाची  आणि त्यांच्या आयुष्यात अचानक आलेल्या क्लॉडियाची  आहे. एकटं-एकाकी आयुष्य जगणारी क्लॉडिया आजारी  पडते आणि हॉस्पिटलमध्ये तिची गाठ मार्थाशी पडते. ही आजारी एकटी कशी राहणार, म्हणून आपल्या यथा-तथा  परिस्थितीतही मार्था तिला आपल्या घरी आणते आणि क्लॉडिया मग त्या घराचा एक भाग बनून जाते. पण दोन  वाक्यांमध्ये वाटतं तेवढं हे सोपं नसतं. घरातल्या मुली तिला  असं पट्‌कन स्वीकारत नाहीत. तिच्याकडे संशयाने पाहतात. तिला पहिल्यांदा आपलंसं करतो तो घरात हा छोटा मुलगा. आपल्या मनात येणारे असंख्य प्रश्न तो क्लॉडियाला विचारू लागतो. चुंबन घेतल्याने कसं वाटतं इथपासून ते आई कधीच  बरी होणार नाही का, इथपर्यंत सगळं. आई आता फार जगणार  नाही, हे लक्षात आल्यावर सगळं कुटुंब एक दिवसाच्या  पिकनिकला जायचं ठरवतं. दिवस मजेत जातो आणि रात्री  आईला अचानक पुन्हा त्रास होऊ लागतो. मुली तिला घेऊन  खोलीत परततात आणि हा छोटा रडायला लागतो. आपल्याला कधीच फक्त मजा का करता येत नाही, असं क्लॉडियाला विचारतो आणि ती अगदी हळुवारपणे त्याच्या  ओठांवर ओठ टेकवते. त्याची समजूत घालायलाही आणि त्याचं कुतूहल शमवण्यासाठीही.मात्र, या सर्व सिनेमांमध्ये सर्वांत उजवा होता तो जपानचा ‘लाईक फादर लाईक सन’ हा सिनेमा. महोत्सवामधल्या  पहिल्या पाच सिनेमांमध्ये ज्याचं नाव घेता येईल, असा. दिग्दर्शक होते हिरोकाझु कोरिडा. या सिनेमाचं वर्णन नितांत सुंदर असं दोन शब्दांत करता येईल. 

ऱ्योता आणि मिदोरी हे तरुण उच्चभ्रू जोडपं आहे. ऱ्योता  अतिशय मेहनती आणि महत्त्वाकांक्षी. त्यांना सहा वर्षांचा मुलगा आहे, किएता. मात्र, आपल्यामध्ये असलेली जिद्द  आपल्या मुलात नाही याचं किंचित दु:ख ऱ्योताला आहे. बापाला हवं म्हणून किएता पिआनो शिकतो, पण त्याचं मन  त्यात नाही. उलट,  शिक्षकांनी विचारल्यावर तो बापाबरोबर घालवलेला सुट्टीचा दिवस आपल्या कल्पनेने साकारतो. वडिलांबरोबर पतंग उडवण्याचं स्वप्न पाहतो. एक दिवस  हॉस्पिटलमधून फोन येतो आणि या दोघांना कळतं की- किएता आपला मुलगा नाही, तो हॉस्पिटलमध्ये बदलला  गेलाय! ज्या जोडप्याकडे यांचा मुलगा गेलेला असतो, त्यांच्याशीही हॉस्पिटलने संपर्क साधलेला असतो. ते जोडपं कनिष्ठ मध्यमवर्गीय. त्यांना दरम्यानच्या काळात आणखी दोन लहान मुलं झालेली असतात. सर्व प्रकारची नुकसानभरपाई देण्याची हॉस्पिटलची तयारी असते. या चुकीवर ते तोडगाही सुचवतात. सहा महिने दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना भेटायचं, मुलांना आपल्या खऱ्या आई- वडिलांची ओळख झाली की मग आपापल्या मुलांची अदलाबदल करायची. त्यानुसार ही कुटुंबं भेटू लागतात.

एक वेळ अशी येते- जेव्हा दोन्ही मुलांना आपणच घेऊन यावं, असा विचारही ऱ्योताच्या मनात येतो. त्याला अर्थातच ते  दुसरे आई-वडील आक्षेप घेतात. तू पैसे कमावतोस, पण  मुलाबरोबर वेळ नाही घालवता येत, असं सुनावतात. अखेर  ती वेळ येते- मुलांची अदलाबदल करण्याची. ऱ्योता शांतपणे  किएताला समजावतो... आता तू मला डॅडी नाही म्हणायचं, एकमेकांना भेटायचं नाही... तू स्ट्राँग व्हायला हवं म्हणून हे मिशन आहे, असं समज. आणखी दहा वर्षांनी तुला कळेल  काय ते, असंही सांगतो. मिदोरी मात्र भयंकर अस्वस्थ आहे. किएताशिवाय जगणं तिला नामंजूर आहे. पण अखेर किएता  दुसऱ्या घरी जातो आणि ऱ्योताचा खरा मुलगा त्याच्या  आणि मिदोरीच्या आयुष्यात येतो. तोही अर्थातच सहा  वर्षांचा. तसाच लाघवी. पण नव्या घरात बुजलेला.

मिदोरी त्याची काळजी हळूहळू घेऊ लागते. हा आपला पोटचा मुलगा आपल्याला आवडू लागलाय, म्हणून तिला  अपराधीही वाटू लागतं. आपण किएतावर अन्याय करतोय, असं मनात येऊ लागतं. पोटचं मूल आपलं, की ज्याच्यावर सहा वर्षं पोटच्या मुलासारखी माया केली- ते आपलं? जन्म देणं आणि पालनपोषण करणं यात अधिक महत्त्वाचं काय? अधिक समृद्ध करणारं काय? अधिक घट्ट नातं कुठलं? या सिनेमाचा शेवट सांगावा का? नको.

सिनेमाने एक स्पष्ट शेवट केलेला असला तरी ज्यांना हा सिनेमा पाहण्याची  संधी मिळेल, त्यांच्यासाठी तो न सांगितलेला बरा. मात्र, यातले छोटे-छोटे प्रसंग मन हेलावणारे होते. बाप-मुलगा, आई-मुलगा, नवरा-बायको यांच्या नात्यांतले कंगोरे दाखवणारे होते. किएताचं बापाकडे आदर्श म्हणून पाहणं असेल... किंवा दुसऱ्या (म्हणजे खऱ्या) मुलाने ऱ्योताला ‘तुला बिघडलेलं काहीच दुरुस्त करता येत नाही? माझ्या  बाबाला येतं,’ असं सहजी म्हणणं असेल... दोन बापांमधला  फरकही त्यातून अधोरेखित होत जातो. हा दुसरा बाप मुलांशी खेळणारा, त्यांच्याबरोबर एकत्र अंघोळ करणारा धमाल बाप आहे. पण पैशाचा विषय निघाला की हावरटपणा करणाराही आहे.

पुन्हा, माणूस म्हणजे चांगल्या-वाईटाचं पॅकेज असतं, हे मांडणारा. ऱ्योताही काही व्हिलन नाही; पण महत्त्वाकांक्षी  असल्यावरच यश मिळतं, असं मानणाऱ्या आजच्या हजारोलाखो  बापांपैकी एक आहे. दोन्ही आया मात्र निव्वळ आई  आहेत. त्यांचं एकमेकींशी छान पटतं. त्या एकमेकींचं दु:ख  समजू शकतात. आणि दोघींच्या मनात एकच गोष्ट असते. या सिनेमामध्ये मेलोड्रामा आहे. पण म्हणून काय झालं? हा सिनेमा पाहताना डोळे वारंवार भरून येतात. पण म्हणून  काय झालं? हा सिनेमा जो अनुभव देतो, तो कायम  आठवणीत राहणारा आहे. चांगल्या सिनेमाचं हेच तर वैशिष्ट्य असतं ना?

Tags: लाईक फादर लाईक सन हिरोकाझु कोरिडा द अमेझिंग कॅटफिश ॲन्थनी चेन सिंगापूर इलो इलो यॅनिस नॉडर्‌स मदर- आय लव्ह यु लहान मुलांचे भावविश्व इफ्फी २०१३ गोवा मीना कर्णिक Hirokazu Kore-eda Like Father Like Son Claudia Sainte-Luce The Amazing Catfish Singapur Anthony Chen Ilo Ilo Janis Nords Mother I Love You Meena Karnik Lahan Mulanche Bhavvishw Gao Iffi2013 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात