Diwali_4 मुलांसाठी भित्तिपत्रक व मासिक उपक्रम
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

गुरुजींचे हे छात्रालय दैनिक फक्त निवडक काही मुलांपर्यंत राहते आहे, ते सर्व मुलांपर्यंत गेले पाहिजे; यासाठी त्यांचा जीव तुटत होता. तेव्हा स्वत:ची दोन हजार रुपयांची मिळकत घालून त्यांनी संस्थेने विद्यार्थी हे मासिक सुरू करावे, असा प्रस्ताव संस्थेला दिला. संस्थेने राजकारणाशी संबंध ठेवू नये व मंडळावर आर्थिक बोजा पडू नये, या अटीवर मासिक चालवायला संस्थेच्या आजीव सदस्य मंडळास परवानगी दिली.

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे सारेच म्हणतात; परंतु ते प्रयत्न किती टोकाचे असू शकतात, याचे साने गुरुजी एक वस्तुपाठ म्हणावेत असे होते. गुरुजींच्या काळात मुलांना काही आजच्यासारखे संगणक, इंटरनेट, गुगल हाताशी नव्हते. वृत्तपत्रेही फारशी नव्हती.

मुलांना रोज नवीन काही तरी वाचायला मिळावे, म्हणून त्यांनी रोज दैनिक लिहिण्याचे ठरविले. सलग लिहिण्याचा सराव व्हावा व अक्षर चांगले यावे, म्हणून त्यांनी पहाटे रामनाम लिहिण्यास सुरुवात केली. दि.१९ जुलै १९२७ रोजी छात्रालय दैनिकाचा पहिला अंक निघाला. साधारण पाच- ते सहा पाने ते पाठपोट लिहीत असत. मनोभूमिका शुद्ध व उदात्त करण्याचा दैनिकाचा मुख्य उद्देश आहे. मनोरंजन जिज्ञासावर्धन, माहिती पुरविणे हे त्याचे दुय्यम हेतू आहेत. हा news paper नसून view paper आहे, हे गुरुजींनी सोप्या भाषेत स्पष्ट केले.

या दैनिकात काय काय असे, हे तपशील बघितल्यावर त्यातील वैविध्य लक्षात येईल. मुलांच्या खोल्यांची वर्णने येत. मुलांच्या गुण-दोषांची चर्चा असे. मुलांमधील भांडणे, अबोला... सर्व काही असे. विनोद, कविता असे. देशाविषयी चिंतन असे. इतिहास, समाज, शिक्षण, धर्म असे नाना प्रश्न असत. कधी चरित्र, कधी निबंध, कधी गोष्ट, कधी संवाद, कधी चुटके, कधी स्फुट विचार- असे खूप काही असे. कधी झाशीची राणी, कधी सीतामाई, कधी भगवान बुद्ध, कधी रामकृष्ण परमहंस, मीराबाई, कधी जनाबाई, लोकमान्य-महात्मा गांधी, तर कधी इस्लामी संस्कृतीचा हिंदू संस्कृतीवर झालेला परिणाम दिलेला असे. जगातील विविध देशांच्या स्वातंत्र्यलढ्यांचे वर्णन असे, तर कधी रवींद्रनाथ-इकबाल-व्हिटमन-गटे-बायरन-शेले यांच्या कवितांची सुंदर रूपांतरे असत. गुरुजींनी हे मासिक जवळपास तीन वर्षे चालविले.

गुरुजी ज्या बातम्या लिहायचे त्या-त्या वेळच्या छात्रालयाची स्थिती आपल्याला त्यातून समजते.

१. काल सायंकाळी बालवीर पथकाने गावात जाऊन काही सार्वजनिक कामे केली.

२. अंदमानातील मुले काल गवत काढत होती.

३. काल क्रिकेटचे पीच करायला पुष्कळ मुले पाणी वगैरे नेण्यासाठी आली होती.

जतीनचंद्र दास यांनी दिवस उपोषण केले, त्यात त्यांचा अंत झाला. तेव्हा अमळनेरच्या विद्यार्थ्यांनी एक दिवसाचे उपोषण केले. काही मुलांनी रात्री ९ वाजेपर्यंत तोंडात पाणीही घेतले नाही. त्यांचे अभिनंदन करणारे टिपण गुरुजींनी २४ सप्टेंबर १९२९च्या अंकात लिहिले आहे.

शाळेच्या गणेशोत्सवात निरनिराळ्या वक्त्यांची होणारी भाषणे, मुलांचे कार्यक्रम, आरास इत्यादी वृत्त गुरुजी दैनिकात आवर्जून देत असत. अशा प्रकारे आषाढी एकादशी, नागपंचमी, दसरा, संक्रांत इत्यादी व्रते आणि सण यांची माहिती गुरुजी त्या-त्या वेळी अंकात लिहीत.

एका दसरा सणाचे वर्णन गुरुजी करतात. मुलांना घेऊन कसे सीमोल्लंघनाला गेले, तिथे काय केले, मुलांनी बिगुल कसा वाजविला- हे सारे तपशीलवार दिले आहे.

छात्रालयात गुरुजी अनेक प्रकारचे उपक्रम राबवत. त्यात एक खानेसुमारीचा होता. गुरुजी मुलांना विविध प्रश्न देत.

१. ड्रॉइंग कोणास बरे काढता येते? किती जणांना पोहता येते? कुस्ती किती जणांना येते? किती जण चांगले वाचतात? पेटी, तबला, बासरी कोणास वाजविता येतात? कविता कोणाला करता येते? कोणास कोणत्या विषयाची आवड आहे? पत्र इंग्रजीत लिहिता का देशी भाषेत? हिंदी भाषा किती जणांस समजते? गावात जाऊन चहा कोण पितात? व्यायामशाळेत कोण जाते? ग्रंथालयातून किती जणांनी किती पुस्तके वाचली? मुले खोल्यांत जाऊन या प्रश्नांची उत्तरे जमा करीत आणि गुरुजी त्याचा निकाल जाहीर करीत.

असाच एक उपक्रम होता- मुलांनी आपल्या गावांची   वर्णने लिहायची. आज अनेक शिक्षक हा उपक्रम मुलांकडून करून घेतात, परंतु गुरुजींनी हा उपक्रम ९० वर्षांपूर्वी मुलांकडून करून घेतला होता. मुले त्यात कंटाळा करीत. यावर एक काल्पनिक संवाद तयार करून दैनिकात टाकला आणि मुलांना या उपक्रमाचे महत्त्व सांगितले. त्यातून गावातील जातिव्यवस्था, भांडणे, दारूचा परिणाम, ऐतिहासिक-पौराणिक ठिकाणे, शिक्षणाची स्थिती, पाण्याच्या बाबतीत स्थिती, पिके व शेतीची अवस्था, कर्ज, अनेक गावांत सांगितल्या जाणाऱ्या दंतकथा... अशी विविध माहिती यानिमिताने सर्वांना माहीत होईल, असे मित्र एकमेकांना सांगतात.

गुरुजींचे हे छात्रालय दैनिक फक्त निवडक काही मुलांपर्यंत राहते आहे, ते सर्व मुलांपर्यंत गेले पाहिजे; यासाठी त्यांचा जीव तुटत होता. तेव्हा स्वत:ची दोन हजार रुपयांची मिळकत घालून त्यांनी संस्थेने विद्यार्थी हे मासिक सुरू करावे, असा प्रस्ताव संस्थेला दिला. संस्थेने राजकारणाशी संबंध ठेवू नये व मंडळावर आर्थिक बोजा पडू नये, या अटीवर मासिक चालवायला संस्थेच्या आजीव सदस्य मंडळास परवानगी दिली.

हे मासिक अमळनेरलाच प्रसिद्ध करायचे ठरले. त्याची पाने ५२ असणार होती. वार्षिक वर्गणी पावणेतीन ते तीन रुपये ठेवावी असे ठरले, पण ती अडीच रुपये ठरली.

मोहनींनी दर महिन्याला ५० रुपये खर्चासाठी दिले आणि त्यांनी गुरुजींना संपादक म्हणून घोषित करून टाकले. हे मासिक मुलांसाठीच असल्याने मला मुलेच वर्गणीदार व्हावीत असे वाटते, असे सांगून ते मुलांना वर्गणीदार होण्याचा हट्ट धरतात.

दि.९ नोव्हेंबर १९२८ रोजी ‘विद्यार्थी’ मासिकाचा पहिला अंक बाहेर आला. अंक पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण त्यांनी लेख-गोष्टी लिहिल्या नव्हत्या तरी त्यांच्या नावाने लेख-गोष्टी छापलेल्या होत्या... याचा अर्थ गुरुजींनी स्वत: इतरांच्या नावावर त्या लिहिल्या होत्या. अंकातील सगळा ५२ पानांचा मजकूर त्यांनी स्वत:च लिहून टाकला होता. ज्यांची नावे कथेखाली होती, त्यांचे लोक अभिनंदन करीत आणि ते हसत अभिनंदन स्वीकारत. अंकासाठी एक व्यवस्थापकही नेमले होते. गुरुजींनी लेख द्यायचे व व्यवस्थापकांनी ते छापून आणायचे, असे ठरले होते, पण गुरुजींनी अंक छापूनच त्यांच्या समोर ठेवले.

मुलांना अंक खूप आवडू लागला. मुले पालकांना ‘खाऊचे पैसे धाडू नका, पण मासिकाची वर्गणी पाठवा’ असे म्हणू लागली. एका ख्रिस्ती धर्मगुरूने तर ‘मला देववाणी शिकवली’ असे लिहिले.

अंक फक्त ५२ पानांचा द्यायचे असे ठरले होते, पण तो ७२ पानांचा निघाला. गोखलेगुरुजी व मोहनी यांनी गुरुजींना विचारले तेव्हा गुरुजी फक्त हसले. याचे कारण महिन्याला पदरचे ३०-३५ रुपये घालून ते वाढीव पानांचा खर्च करीत होते. गुरुजी मातृभक्त किंवा रामशरण नावाने लिहीत. हे मासिक निघताना छात्रालय दैनिकही सुरूच होते. गुरुजी १९३० पर्यंत संपादक राहिले. या दीड वर्षात १८ अंक निघाले. या १८ अंकांतील काही लेखन गोड गोष्टीच्या भाग- २ व ३ मध्ये आले आहे. त्यावर नजर टाकली तरी कल्पना येते.

‘छात्रालय’ आणि ‘विद्यार्थी’ या दोन्ही मासिकांच्या बाबतीत मला गुरुजींचे विशेष हे वाटते की, गुरुजींनी हे सारे लेखन एकहाती एकट्याने केले. अनेकांच्या नावाने लेख लिहून टाकले. यात गुरुजींच्या एकाच वेळी इतके प्रचंड लिहिण्याचे जसे कौतुक वाटते, तसेच कौतुक त्यांच्या अफाट स्मरणशक्तीचेही वाटते. त्या काळात फार संदर्भसाधने उपलब्ध नव्हती, फारशी पुस्तकेही नसतील; पण गुरुजींनी लहानपणापासून जे काही प्रचंड वाचन केले होते, ते सर्व त्या लेखनात उतरले. अनेक चरित्रे आणि वेगवेगळी माहिती ते केवळ स्मरणाच्या बळावर लिहीत होते, हे या ठिकाणी नोंदविले पाहिजे.

या मासिकाचे नंतर ग.रा.जोशी हे संपादक होते. पण त्या काळात इंग्रजांवर टीका करणारे दोन लेख अंकात प्रसिद्ध झाले होते. ते वाचून संपादकांना नोकरीतून काढण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले.

मी शिक्षक म्हणून हे सारे वाचल्यावर मी स्वत:ला प्रश्न विचारतो आहे की- खरेच माझे विद्यार्थी समृद्ध व्हावेत म्हणून मी खरेच इतके प्रयत्न कधी करीन का? मुलांसाठी वेळेचा इतका त्याग करण्याची माझी मानसिकता आहे का? अगदी खरं सांगायचे तर- या प्रश्नाचे उत्तर सांगायची लाज वाटते. पण गुरुजींच्या निमित्ताने होणारी ही जाणीव मला अंतर्मुख करते आणि मुलांसाठी झोकून देण्याची प्रेरणा देते, हेही नसे थोडके.

Tags: छात्रालय दैनिक हेरंब कुलकर्णी मासिक उपक्रम मुलांसाठी भित्तिपत्रक शिक्षकांसाठी साने गुरुजी रामशरण मातृभक्त ९ नोव्हेंबर १९२८ अमळनेर विद्यार्थी मासिक Mother devotee Mother adorer Ramsharan 9 Novembar 1928 Amalner Student Magzine Vidyarthi Masik Chhatralya Daily Report Sane Guruji For Teachers Heramb Kulkarni View paper News paper Nave Pustak weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

हेरंब कुलकर्णी
herambrk@gmail.com

मराठी लेखक (वैचारिक आणि विशेषतः शिक्षणविषयक लेखन). इ.स. २००६च्या वर्षभरात साधना साप्ताहिकाच्या संपादक मंडळात सहभागी 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात