डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

साधनाचे दिलदार मित्र श्री. शंकरराव करंबेळकर

शिक्षक आणि कराडच्या सांस्कृतिक जीवनात कार्यरत असलेल्या श्री. शंकरराव करंबेळकर यांचे निधन. 

श्री. शंकरराव करंबेळकर यांचे कराड येथे अडुसष्टाव्या वर्षी निधन झाल्याच्या वृत्ताने अनेक मंडळी हळहळतील.

शंकररावांचा मित्रपरिवार फार मोठा होता. विविध राजकीय पक्षांत त्यांचे मित्र होते. अनेक सार्वजनिक संस्थांत त्यांचे साथी होते आणि मुख्य म्हणजे शिक्षणक्षेत्रात त्यांचे अनेक सुहृद होते.

कराडच्या सार्वजनिक व सांस्कृतिक जीवनाच्या घडणीत त्यांचा वाटा फार मोठा आहे. कराडची व्याख्यानमाला आणि कथामालेचे कार्य यांत ते जातीने लक्ष देत असत. त्यासाठी गावोगावी ते खेपा घालीत. नवनव्या मंडळीचा शोध घेत आणि आवर्जून त्यांना आमंत्रण देत. कराडला अत्यंत रसिक असा मोठा श्रोतृवृंद वक्त्याला मिळे आणि त्याच्यातला आत्मविश्वास दुणावे.

शाळा हेच त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र असले तरी शाळेच्या चार भिंतीत होते तेवढेच शिक्षण असे त्यांनी कधी मानले नाही. निरंतर शिक्षण देणाऱ्या अध्यापकाला दशदिशा मोकळ्या असतात तसे त्यांचे होते. ज्ञाननिष्ठा, विद्यार्थिनिष्ठा या आचार्यांच्या मूलभूत निष्ठा त्यांच्यापाशी होत्याच, पण त्यांची वृत्ती प्राय: निष्पक्ष निर्वैर व निर्भय असे. यशवंतराव चव्हाणांशी त्यांचे घनिष्ट संबंध असले तरी त्यापायी त्यांनी पक्षांधता कधी येऊ दिली नाही. जे जे उत्कट, उदार, उदात्त त्या त्या गोष्टीचे त्यांनी सतत स्वागतच केले. यशवंतराव चव्हाणांशी जाहीर वादविवाद त्यांनी कधी केला नाही, पण आपली मते मात्र त्यांच्या कानी घालताना त्यांनी कधी हयगय केली नाही.

पुण्यात शंकरराव आले की त्यांची हटकून साधनेत फेरी व्हायची. साधनेबद्दल त्यांना खूप माया होती. आले म्हणजे साधनेत जे जे चांगले आढळले असेल त्याची मुक्तकंठाने ते वाहवा करीत. साधनेची नवी प्रकाशने खरेदी करीत. त्यांच्या डोक्यात ज्या अनेक योजना घोळत असत त्यांच्याबद्दल ते चर्चा करीत. त्या योजना अमलात आणण्याची त्यांची तळमळ शब्दाशब्दांतून जाणवे.

तसे शंकररावांचे शरीर कसलेले होते. त्यामुळे अनेक धकाधकीतून ते सफई बाहेर पडू शकले होते. पण गेली काही वर्षे हृदयविकाराने त्यांची पाठ धरली होती. जहांगीर नर्सिंग होममध्ये गेल्या वर्षीच त्यांची भेट झाली होती. आजारालाही त्यांची प्रसन्नता हरण करता आली नव्हती. त्यामुळे ते इतक्यात जातील असे कोणालाच वाटले नव्हते.

त्यांच्या निधनाने साधना एका दिलदार मित्राला मुकली आहे.

Tags: शिक्षक कराड निधन शंकरराव करंबेळकर teacher karad death shankarrao karambelkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके