डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

श्री. यदुनाथ थत्ते यांना सुधारककार आगरकर पुरस्कार

साधनेचे भूतपूर्व संपादक आणि विख्यात मराठी पत्रकार श्री. यदुनाथ थत्ते यांना सुधारककार आगरकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ही गोष्ट त्यांच्या आजवरच्या कार्याचे चीज करणारी आहे.

मराठी पत्रकारितेत लक्षणीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना ‘सुधारककार आगरकर’ पुरस्कार दिला जातो. गेल्या वर्षी तो पुरस्कार श्री. अनंतराव भालेराव यांना देण्यात आला होता. श्री. यदुनाथ थत्ते यांनी साधनेचे संपादक म्हणून आणीबाणीत केलेली कामगिरी सुवर्णाक्षरांनीच लिहून ठेवण्यासारखी आहे. साधनेचे संपादक म्हणून त्यांनी दीर्घकाल जे कार्य केले आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा साधनेवर उमटविला त्याबद्दल आम्हांला अतिशय अभिमान वाटतो. अशा त्यागी आणि ध्येयवादी पत्रकाराचा सन्मान थोर, सुधारक आणि ध्येयवादी पत्रकारितेची परंपरा निर्माण करणारे गोपाळ गणेश आगरकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार देऊन करण्यात येत आहे, हे अत्यंत औचित्यपूर्ण आहे.

श्री. यदुनाथ थत्ते हे केवळ लेखक नाहीत. त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली आहे आणि अनेक विधायक उपक्रमांसाठी अपार झीज सोसली आहे. त्यांची पत्रकारिता ही संपादकीय खुर्चीतून निर्माण झालेली नसून रचना आणि संघर्ष यांच्यातील सहभागातून निर्माण झालेली आहे. आंतरभारती, मुस्लिम सत्यशोधक मंडळ, महाराष्ट्र सर्वोदय मंडळ, महात्मा गांधी लोकसेवा संघ, राष्ट्र सेवा दल अशा विविध संस्थांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. आमच्या या निकटच्या सहकारी मित्राचा साधनेशी सतत अतूट संबंध राहिला आहे, ही आम्हांस भाग्याची गोष्ट वाटते. यदुनाथजींचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांना दीर्घायुरारोग्य लाभो आणि विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांना त्यांचे मार्गदर्शन अक्षय मिळो, ही शुभेच्छा.

Tags: राष्ट्र सेवा दल महात्मा गांधी लोकसेवा संघ महाराष्ट्र सर्वोदय मंडळ मुस्लिम सत्यशोधक मंडळ आंतरभारती पुरस्कार संपादक पत्रकार अनंतराव भालेराव गोपाळ गणेश आगरकर यदुनाथ थत्ते Rashtra Seva Dal Mahatma Gandhi Lokseva Sangh Maharashtra Sarvodaya Mandal Muslim Satyashodhak Mandal Antarbharati Award Editor Journalist Anantrao Bhalerao Gopal Ganesh Agarkar Yadunath Thatte weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके