डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सिनेमा : द ब्लू अम्ब्रेला (हिंदी, भारत)

बिनिया उन्हा-पावसात-बर्फात ती छत्री मिरवत फिरते. अभ्यास करताना शेजारी घेऊन बसते, जेवताना छत्रीला जवळ ठेवते, झोपताना जवळ घेऊन झोपते. बिनिया आणि ती निळी छत्री- ती निळी छत्री आणि बिनिया. कायम एकत्र, चिकटवल्यासारख्या एकत्र. गावात त्या छत्रीचीच नुसती चर्चा. बिनियाचं नुसतं कौतुक.

BOND... RASKIN BOND! रस्किनची गोष्ट गमतीदार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीची गोष्ट. भारतात कितीतरी राजे होते, त्यांचे मोठमोठे राजवाडे होते. अशाच जामनगरच्या राजवाड्यात राजकुमाराला इंग्रजी शिकवण्यासाठी एक ब्रिटिश शिक्षक नेमण्यात आले. त्या शिक्षकांचा मुलगा म्हणजे हा रस्किन. नंतर भारत स्वतंत्र झाला, रस्किनचे वडीलही अकाली गेले. पण तो भारतातच राहिला. भारतीय झाला. राजवाड्यात जन्माला आला आणि वडील गेल्यानंतर मसुरीसारख्या निसर्गरम्य ठिकाणी होस्टेलमध्ये राहून शिकला. तरुणपणीच लिहायला लागला.

आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात किस्से घडतात. आपण ते आपल्या मित्रांना सांगतो, गप्पा मारतो आणि विसरून जातो. अशा अगदी रोजच्या जगण्यातल्या किश्श्यांच्या रस्किन बाँडने कथा बनवल्या, त्यांना larger than life करून टाकलं. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचं त्याने नीट निरीक्षण केलं, त्या मनात साठवल्या, त्यावर विचार केला. त्याने केलेल्या कल्पनांच्या पुढे कादंबऱ्या झाल्या. त्या कादंबऱ्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. आज 87 वर्षांचे आहेत, हे आजोबा रस्किन बाँड. पण राजवाड्यात आणि मसुरीमध्ये भिरभिरत्या नजरेने फिरणारा त्यांच्यामधला छोटा मुलगा कधीच हरवला नाही. त्यांनी लहान मुलांसाठी शेकडो कथा-कादंबऱ्या लिहिल्या. इंग्रजी वाचनाची आवड लावायची असेल तर मुलांना पहिले रस्किन बाँडच्या कथा वाचायला द्याव्यात असं म्हटलं जातं. अशा या साहित्य अकादमी विजेत्या आणि पद्मश्री-पद्मभूषण पुरस्कारप्राप्त लेखकाची गाजलेली कथा म्हणजे ‘द ब्लू अम्ब्रेला’.

जी कथा वर्षानुवर्षे जुनी होत नाही, ती उत्तम कथा असं म्हणतात. 1980 मध्ये ‘द ब्लू अम्ब्रेला’ ही अवघ्या 90 पानांची कादंबरी प्रकाशित झाली. प्रचंड गाजली. त्यानंतर जवळजवळ 25 वर्षांनी म्हणजे 2005 मध्ये या कथेवरचा सिनेमा आला ‘द ब्लू अम्ब्रेला’. तोही गाजला.

कथा रस्किन बाँड यांची. पटकथा-संवाद-संगीत-दिग्दर्शन विशाल भारद्वाज यांचं आणि सिनेमामधली गाणी लिहिली गुलजार यांनी. मुख्य भूमिकेमध्ये एक छोटी मुलगी श्रेया शर्मा आणि पंकज कपूर. ‘भट्टी जमून येणे’ याचं याहून सुंदर उदाहरण काय असू शकतं!  प्रेक्षकांना तर हा सिनेमा भावलाच, पण सर्वोत्कृष्ट बालचित्रपटासाठीचा केंद्र शासनाचा पुरस्कारही या सिनेमाला मिळाला.

हिमालयाच्या पायथ्याशी उत्तराखंड राज्यात ‘गढवाल’ जिल्हा आहे. नजर जाईल तिकडे निळं आकाश, हिरवीगार राई, डोंगरांच्या रांगा. पावसाळ्यात रग्गड पाऊस, थंडीत रिमझिम बर्फवृष्टी, आणि उन्हाळ्यात सोनेरी चमचमतं ऊन. कसाही कॅमेरा ठेवून कुठूनही फोटो काढला तरी सुंदर लँडस्केप निघेल, अशा पठारावर हे छोटंसं गाव. गावात जेमतेम 30-40 घरं असतील. त्यामुळं गावातील सर्वजण परस्परांना ओळखतात. सगळं सगळ्यांना माहीत होतं. अशा या गावात राहते दहा वर्षांची चिमुकली बिनिया. मोठा भाऊ बिज्जू आणि आई यांच्यासोबत. बिनियाला वडील नाहीत. आई शेती करते. कष्ट करून मुलांना शिकवते. आईकडे खूप पैसे नाहीत, हे खरं, पण बिनियाला काही कमी पडत नाही, हेही खरं. बिनियाच्या भावाला पैलवान व्हायचं आहे. बिनिया शाळेत जाते. शाळा सुटली की घरच्या दोन गार्इंना घेऊन चरायला नेते. एका गाईचे डोळे निळे आहेत म्हणून तिचं नाव ‘निलू’, दुसरी गाय पांढरी सफेद आहे म्हणून ती ‘गोरी’. बिनिया गोल चेहऱ्याची, तिच्या दोन वेण्या, डोळ्यांत काजळ, गुलाबी गाल, पंजाबी सलवार-कमीज, त्यावर आईनं विणलेलं सुंदर स्वेटर. बिनिया अभ्यास करते, गार्इंना फिरवते, घरी आईला मदत करते, मित्र-मैत्रिणींसोबत खेळते. सगळं मन लावून हसत-खेळत मजा घेत करते.

सिनेमामध्ये सुरुवातीलाच गावामधली दहा-बारा मुलं नटून रस्त्यावरून गाणं म्हणत नाचत नाचत ‘चंदा’ गोळा करतायत. त्यांची म्होरक्या आहे बिनिया. तिच्या हातात आहे एक बुजगावणं. त्या भागात बुजगावण्याला ‘टेसू’ म्हणतात. स्थानिक शब्द वापरत, तिथली संस्कृती सांगत ज्येष्ठ कवी गुलजार यांनी यामधली गाणी लिहिली आहेत. ही मिरवणूक गावात प्रत्येकाकडून चंदा मागत फिरते. गावकरीसुद्धा त्यांच्यात सामील होतात आणि कौतुकाने चंदा देतात. नाचत नाचत ही मिरवणूक येते नाक्यावर.

सगळ्या घरांपासून एखादा मैल अंतरावर नाका. नाक्यावर एक चहाचं टपरीवजा दुकान. बस स्टॉप. मुलं याच दुकानावरून शाळेला जातात, लोक बससाठी इथं थांबतात, लांबच्या गावाला जाणारी बस इथे थांबली की प्रवासी इथेच उतरून चहा घेतात, देशी-परदेशी पर्यटक टपरीबाहेरच्या बाकांवर बसून मैफली जमवतात.  या टपरीचा मालक आहे ‘खत्री’. या खडूस खत्रीची भूमिका केली आहे ‘पंकज कपूर’ यांनी. या मुलांना चंदा द्यायला लागू नये म्हणून हा चिंगूस खत्री दार लावून लपून बसतो.

हा खत्री नुसता चिंगूसच नाही तर लालची आणि लबाडसुद्धा आहे. शाळेत जाणारी मुलं दुकानामधली टॉफी, बिस्किटं पाहून थांबतात. त्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. कधी कुठल्या मुलाकडे एखादं नाणं असलं तर तो काहीतरी घेतो. नसेल तर बघत निघून जातो. तेव्हा हा लबाड खत्री त्यांना टॉफी, बिस्किटं उधार देतो. उधारीवर खाताना त्या मुलांना आपण किती रुपयांचं खातोय याचं भान राहत नाही. उधारी वाढत जाते. उधारीची रक्कम मोठी झाली की खत्री पैसे मागायला सुरुवात करतो. एवढे पैसे मुलांकडे कुठून येणार? मग तो त्या मुलांच्या जवळच्या किमती वस्तू  उधारीच्या बदल्यात मागतो. अशा अनेक वस्तू त्याने गट्टम केलेल्या आहेत.

एक दिवस पठारावर निलू गाय दिसेनाशी होते. बिनिया ‘निलू निलू’ करत शोधायला लागते. इतक्यात बिनियाची नजर वरती जाते. बघते तो निळ्या आकाशातून एक निळी सुंदर छत्री हळूहळू वाऱ्यावर हेलकावे खात खाली येत असते. बिनिया ती पकडते. हीच ती ‘द ब्लू अम्ब्रेला’. एकदम फ्रेश निळा रंग, तिचा लाकडी कोरीव दांडा, नाजूक लाकडी काड्यांची रेखीव बांधणी, छत्रीच्या टोकाला वर लाकडी नाजूक घुमट. दरीत निळं फूल फुलावं अशी इतकी सुंदर ती निळी छत्री की काय वर्णन करावं! तिच्याकडं बघतच बसावं अशी लाखात एक ती निळी निळी छत्री.

ती निळी छत्री उडतउडत खाली येते. सिनेमामध्ये कॅमेऱ्याने खूप कलात्मक पद्धतीने हा सीन दाखवला आहे. छत्री वाऱ्यावर हेलकावे घेते तसा कॅमेरा हेलकावे घेत हळूहळू बिनियाकडे येतो. एकंदरीत संपूर्ण सिनेमामधेच उत्तराखंडचा तो निसर्ग, लहान मुलांचं बागडणं, निळ्या छत्रीचं ते सौंदर्य सगळं सगळंच सचिन कृष्ण यांनी कॅमेऱ्यामध्ये खूप छान टिपलं आहे. त्यांचा कॅमेरा एका जागी खिळून न राहता, सिनेमातील पात्रांसोबत चालतो-फिरतो-नाचतो. त्याचमुळे थोड्या वेळाने आपण सिनेमा बघतोय असं न वाटता आपणही त्या गावातले एक आहोत आणि आपल्यासमोर सगळं घडतं आहे असं वाटतं.

बिनिया छत्रीकडे अप्रूपाने बघत राहते. डोक्यावर धरते, थोडी बागडते. तेवढ्यात जापनीज पर्यटक तिथं येतात. त्यातल्या एका मोठ्या मुलीची ती छत्री असते. बिनिया तिला छत्री परत देते. त्या मुलीची नजर बिनियाच्या गळ्यातल्या माळेकडे जाते. वाघनखे माळलेला तो दोर संकटापासून आपल्या मुलीचे रक्षण करण्यासाठी बिनियाच्या आईने तिला घातलेला असतो. ती जपानी मुलगी बिनियाकडे ती माळ मागते. बिनिया द्यायला तयार होत नाही. जपानी मुलगी स्वतःकडचे सगळे पैसे बिनियाला देऊ करते. पण बिनिया माळ देत नाही. आपल्या आवडीच्या वस्तू, आपल्या माणसांनी प्रेमाने दिलेल्या वस्तू अनमोल असतात. त्या पैशांसाठी कशा कोणाला देऊन टाकणार! ते जापनीज लोक जायला लागतात. तेवढ्यात बिनिया त्यांना थांबवून निळी छत्री मागते. त्या बदल्यात माळ देते. एक अनमोल गोष्ट मिळवण्यासाठी एक अनमोल गोष्ट बिनियाला गमवावी लागते.

बिनियाला ती निळी छत्री इतकी आवडली आहे की, तिच्यासमोर तिला दुसरं काही सुचत नाही. निळी छत्री घेऊन बिनिया गावात फिरायला लागते. तेव्हा प्रत्येक जण वळून वळून छत्रीकडे पाहतोय. सगळ्यांचं लक्ष आपल्याकडं जावं, रस्त्यावरून आपण चालताना लोकांनी आपल्याकडं वळून वळून बघावं, मित्रांनी आपला हेवा करावा, आपल्याकडे अशी काहीतरी मौल्यवान गोष्ट असावी जी कोणा कोणाकडे नाही, असं कुणाला वाटत नाही? एखादी खूप सुंदर वस्तू माझ्याकडे आहे आणि ती मला लोकांमध्ये मिरवता आली नाही तर तिचा काय उपयोग! किंवा तीच वस्तू  आजूबाजूला सर्वांकडे आहे- तरी काय उपयोग?

बिनिया उन्हा-पावसात-बर्फात ती छत्री मिरवत फिरते. अभ्यास करताना शेजारी घेऊन बसते, जेवताना छत्रीला जवळ ठेवते, झोपताना जवळ घेऊन झोपते. बिनिया आणि ती निळी छत्री- ती निळी छत्री आणि बिनिया. कायम एकत्र, चिकटवल्यासारख्या एकत्र. गावात त्या छत्रीचीच नुसती चर्चा. बिनियाचं नुसतं कौतुक. तिची छत्री कशी दिसते, साप आला असताना छत्रीमुळे बिनिया कशी वाचली वगैरे वगैरे.  मास्तरांच्या बायकोला तशीच छत्री पाहिजे, त्या खत्रीलासुद्धा तशीच छत्री पाहिजे. पण ती तर जापनीज छत्री, गावात कुठली मिळायला! मग खत्री तीच बिनियाची निळी छत्री मिळवण्याच्या मागे लागतो. पहिले तर विकत मागतो. बिनिया नाही म्हणते. बदल्यात त्याच्या जवळच्या काही वस्तू देऊ करतो, बिनिया नाहीच म्हणते. तो तिला टॉफी, बिस्किट उधार देऊ करायला बघतो, बिनिया तेही घेत नाही. लबाड खत्री कितीतरी जाळी टाकतो. पण बिनिया गळाला लागत नाही. शेवटी तशीच छत्री विकत घ्यायला तो जातो. पण ती खूप महाग असते.

छत्री मिळवण्यासाठी खत्रीचा इतका आटापिटा पाहून एक छोटा मुलगा विचारतो. ‘‘चाचा, छाता लेके कोई फायदा होगा क्या?’’ तेव्हा खत्री म्हणतो, ‘‘इंद्रधनुष्य को देख के कोई फायदा होता है क्या? पानी मे छोटीसी नाव को तैराते हुए देखके कोई फायदा होता है क्या? पहाडी के पिछे सूरज को डुबते देखके कोई फायदा होता है क्या? तेरे जैसे निकट्टू को काम पे रखकर कोई फायदा होता है क्या? आत्मा की शांती मे कोई नफा-नुकसान नही देखा जाता...’’

मग एके दिवशी जिथं पठारावर ती निळी छत्री बिनियाला मिळाली, तिथंच गार्इंच्या मागे ती पळते तेव्हा तिने झाडाखाली ठेवलेली छत्री गायब होते. कोणी म्हणतं, वाऱ्यानं छत्री उडून गेली, दरीत पडली. कोणी म्हणतं, चोरी झाली. इकडे बिनिया छत्रीशिवाय अगदी एकटी पडते. ती जेवत नाही, हसत नाही, खेळत नाही. 

त्याच दरम्यान खत्रीनं दिल्लीवरून मागवलेलं पार्सल येतं. त्या निळ्या छत्रीसारखीच अगदी सेम; परंतु लाल रंगाची छत्री येते. आता बिनियावरून लोकांचं सगळं लक्ष खत्रीकडं जातं. चहा पिण्यासाठी थांबलेले पर्यटक खत्री आणि त्याच्या छत्रीसोबत फोटो काढून घेतात, बसमध्ये चढताना लोक खत्रीला आधी वाट करून देतात. बिनिया मात्र शांत शांत एकटी एकटी फिरत असते. निळ्या छत्रीसोबत तिचा आनंदसुद्धा वाऱ्यावर उडून जातो. असंच एके दिवशी बसमध्ये चढताना खत्रीची ती लाल छत्री बंद होत नसते. त्यामुळं त्याला बसमध्येही चढता येत नसतं. तेवढ्यात तिथं बिनिया येते. त्याच्याकडून छत्री घेते आणि बंद करून देते.

ती लाल छत्री हातात घेतल्यावर बिनियाला वाटतं ही आपली छत्री आहे. आपण आपल्या काही वस्तूंना एवढा जीव लावतो की नुसत्या स्पर्शानंसुद्धा आपल्या वस्तू ओळखता येतात. बिनियासुद्धा ओळखते. पण ही तर लाल छत्री आहे आणि बिनियाची तर सुंदर निळीभोर छत्री होती. पण हुशार बिनिया हार मानत नाही. ती शोधून काढते. तेव्हा तिला कळतं की, खत्रीने तेहरी या गावाहून कपड्यांना रंग देण्याच्या एका कारखान्यातून आपल्या निळ्या छत्रीला लाल रंग देऊन आणला आहे. खत्रीची चोरी पकडली जाते. बिनियाला तिची छत्री परत मिळते. चोरी केल्याबद्दल गावचे लोक खत्रीला वाळीत टाकतात. त्याच्याकडून कोणी खरेदी करेनासं होतं. लोक त्याच्याशी बोलत नाहीत, त्याला लग्न-समारंभाला बोलवत नाहीत. त्याच्याकडून चहा-टॉफी-बिस्किटं घेत नाहीत. तो एकटा पडतो. त्याचं दुकान बंद पडतं. त्याच्या घराचीसुद्धा पडझड होते. तो सारखा गावातल्या लोकांशी बोलण्याचा, त्यांच्यात सामील होण्याचा प्रयत्न करतो. पण कोणीही त्याला जवळ करत नाही. अगदी बघवत नाही अशी त्याची अवस्था होते. त्याच्या घरावर एक भालूदेखील हल्ला करतो.

पण रोज नाक्यावरून जाताना खत्रीकडं बघून बिनियाला वाईट वाटत असतं. कुठेतरी आपण, आपली ही छत्री या खत्रीच्या अशा अवस्थेला कारणीभूत आहोत असंही तिला वाटतं. माणसापेक्षा वस्तू महत्त्वाची आहे का- असाही प्रश्न तिला पडतो. मग एक दिवस तीच एक नाणं घेऊन त्याच्या दुकानात जाते. त्याच्याकडून टॉफी-बिस्किटं विकत घेते. किती तरी दिवसांनी खत्रीकडं कोणीतरी गिऱ्हाईक आलेलं असतं. तो उत्साहानं बिनियाला बिस्किट देतो. बिनिया निघून जाते. तेव्हा एकदम खत्रीच्या लक्षात येतं की, बिनियाची छत्री तिथंच राहिली आहे. हीच छत्री मिळवण्याच्या नादात त्यानं आपली पत, प्रतिष्ठा, सुख, शांती गमावलेली आहे हे खरं; पण काही दिवसांपूर्वी जगात कशाहीपेक्षा त्याला ही छत्री फक्त हवी होती, हेही तितकंच खरं. आणि आता ही छत्री पुन्हा आपल्या दारात आलेली आहे. आता खत्री काय करतो हे अगदी अनपेक्षित आणि पाहण्यासारखं आहे.

खत्री बिनियाच्या मागे धावत जाऊन ‘‘तू तुझी छत्री माझ्या इथं विसरून आलीस,’’ असं म्हणत परत देतो. पण बिनिया म्हणते, ‘‘ही छत्री तुझी आहे.’’ इथं रस्किन बाँड म्हणतात, ‘‘त्या क्षणी ती छत्री त्या दोघांची झाली’’-"there was nothing between her and the bright blue sky." ‘द ब्लू अम्ब्रेला’ हा सिनेमा एका छोट्या गावात घडतो. शहरातल्यापेक्षा गावात वेळ संथ गतीने जातो म्हणतात. सिनेमाचा स्पेसही तसाच संथ आहे.  सिनेमामध्ये कोणीच व्हिलन नाही. माणसामधल्या स्वाभाविक गुण-अवगुणांमुळं सहज घडणारी ही घटना आहे. यातली पात्रं लाघवी आहेत. आणि म्हणूनच खत्रीला गावानं वाळीत टाकल्यानंतर किंवा शेवटी बिनिया त्याला छत्री देऊन टाकते तेव्हा डोळ्यांत पाणी येतं. हा निसर्ग, ही  पात्रं, ही कथा आणि ती मोहक निळीशार छत्री- ‘द ब्लू अम्ब्रेला’ हे सगळेच जीव लावून जातात. आयुष्यात पुन्हा कधीही कुठल्याही वस्तूवर गरजेपेक्षा जास्त जीव जडला तर ही ब्लू अम्ब्रेला आठवेल असा हा चित्रपट आहे.

----

साधना बालकुमार दिवाळी अंक 2021 मधील सर्व लेख आता ऑडिओबुक स्वरुपात स्टोरीटेलवर ऐकता येतील. त्यातील 'द ब्लू अम्ब्रेला' या हिंदी चित्रपटावर मृद्‌गंधा दीक्षित यांनी लिहिलेला लेख ऐका त्यांच्याच आवाजात. 

'साधना बालकुमार दिवाळी अंक 2021'  Storytel वर ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मृद्‌गंधा दीक्षित
mudra6292@gmail.com

सब एडिटर - कर्तव्य साधना 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके