सरदारांचे बाह्यरूप तसे काळेसावळे आणि ओबडधोबड. बोलणेही तसेच. शब्द थोडे. पण अंतराचा वेध घेणारे... दृष्टीही मर्मभेदक. वेष कमालीचा साधा, जाडाभरडा दुरून पाहाणाऱ्याला रुक्ष, तुसडे वाटणारे व्यक्तिमत्व. पण फणसातले गरे आणि नारळातले पाणी केवळ वर दिसणाऱ्या रूपावरून थोडेच पारखता येते?
एका विद्वान कवीने सरदार पटेलांच्या बाबतीत मोठे मार्मिक विधान केले होते. 'विसाव्या शतकाला आकार देण्यासाठी विधात्याने कालवलेल्या मातीच्या एका भागात वज्राचे चूर्ण मिसळून जगाच्या तीन भागांत तीन पुतळे पाठवले. रशियात एक पुतळा जाऊन पोचला. त्याला जग स्टॅलिन म्हणून ओळखते. इंग्लंडच्या भूमीवर, पराजयातून विजय निर्माण करणारा विचक्षण पुरुष-चर्चिल जाऊन पोहोचला आणि भारतात करमसद नावाच्या लहानशा खेड्यातल्या एका शेतकऱ्याच्या झोपडीत जन्म घेतला वल्लभभाई पटेलांनी.’ गेल्या शतकातले हे तीन वज्रपुरुष. पण प्रत्येकाने आपल्या भूमीचे संस्कार, परिस्थितीला अनुरूप असे आपले व्यक्तित्व प्रगट केले.
सरदार म्हटले की 'भारताचा लोखंडी राजपुरुष' अशी एक प्रतिमा साहजिकच उभी राहते आणि ती तशी आहेही. पण 'राजपुरुष' म्हटले की कुटिलतेत कमालीचा प्रवीण- सदा कोठल्या ना कोठल्या कारस्थानात व्यग्र असलेला- त्यातून पुनः 'लोखंडी' ! म्हणजे 'दया- माया' असल्या 'पुळचट' पणाशी तोंडओळखही नसलेला- असे जे गैरसमज त्या शब्दातून डोकावतात त्याहून मात्र सरदार अगदी वेगळे आहेत.
राजनीतिज्ञ वरून दिसतो त्याहून अगदीच वेगळा आतून असावा हीही एक कल्पना. सरदारांचे बाह्यरूपही तसे काळेसावळे आणि ओबडधोबडच. बोलणेही तसेच. शब्द थोडे. पण अंतराचा वेध घेणारे. स्पष्ट आणि परखड. त्यांची दृष्टीही मर्मभेदक. समोरच्या माणसाच्या मनातले क्षणात पारखून घेणारी. वेष कमालीचा साधा. त्यामुळे त्यांच्याबद्दलचे समज, दुरून पाहाणारांच्या मनात 'एक, तुसडा, तिरसट, हुकूमशाही मिजाशीचा नेता' अशा प्रकारचे झाले असले तर नवल नाही. पण फणसातले गरे आणि नारळातले पाणी केवळ वर दिसणाऱ्या रूपावरून थोडेच पारखता येते?
सरदारांना समजून घेण्यासाठी आज आहेत ती त्यांची पत्रे. पत्रे ही प्रसिद्धीच्या दृष्टीने लिहिलेली नसतात. माणसाच्या स्वभावाचे पैलू आणि कंगोरेही पत्रांतूनच जास्तीत जास्त व्यक्त होतात. त्यातूनही निकटच्या व्यक्तींना लिहिलेल्या खाजगी पत्रांतून पत्रलेखक बऱ्याचवेळा मुखवट्याशिवाय दिसू शकतो. त्याप्रमाणे मागोवा घेता घेता सरदारांच्या पत्रांतून आढळणारे त्यांचे व्यक्तित्व, त्यांनी केलेली कामे, जोडलेली माणसे, केलेले संघटन, फार काय पण जाहीर सभेतली त्यांची भाषणेदेखील एकच चित्र दाखवतात. त्यांच्या मनात, वागण्यात आणि बोलण्यात विसंगती शोधूनही सापडण्यासारखी नाही. असे एक निर्मळ पारदर्शक व्यक्तित्व असलेला हा माणूस उत्तम राजनीतिज्ञ होता. निधड्या छातीचा शूर माणूस होता. तसाच एखाद्या आईसारखा वत्सल. आईला स्वतःच्या मुलांच्या बाबतीत असतें तशी वत्सलता स्वभावातच मुरलेली दिसते. सर्वोच्च स्थाने भूषवणारा हा लोकनेता अत्यंत विरक्त आहे. व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा, व्यक्तिगत सुख-चैन अशा विचारांना त्या आयुष्यात वकिली सोडताक्षणीच सोडचिठ्ठी दिलेली आहे. परस्परविरोधी स्वभावविशेष त्यांच्या व्यक्तित्वात अगदी ठळकपणे उठून दिसतात. सहकाऱ्यांच्या, परिचयातील माणसांच्या सुखदुःखांची हळुवार जाणीव त्यांना आहे. कोण आजारी आहे, कोण अस्वस्थ मनःस्थितीत आहे त्याची चौकशी करून या म्हणून मणिबेन, डाह्याभाई दोघांना सूचना दिलेल्या आहेत. नोकरांशी मणिबेनचे पटत नाही... फार कटकट करतात हे कानावर आल्यावर त्यांनी लिहिले आहे, ‘हे वागणे बरे नाही. त्या बिचाऱ्यांचे शिक्षण ते काय, हलाखीत दिवस काढताना त्यांना वळण ते कितीसे लागणार? आपल्याला त्यांना क्षमा करता यायला हवी.
त्यांच्या कमनशिबाबद्दल सहानुभूती वाटायला हवी. आपल्या सहवासातून त्यांना काही शिकता यावे, त्यांनी सुधारावे असे प्रयत्न आपण करायला हवेत.’ ही सहृदयता! पोस्टमन डाक घेऊन आला... त्याचे मळके ढगळ कपडे पाहून लगेच त्यांनी विचारले, ‘हे असे का?’ तेव्हा ते भारताचे उपपंतप्रधान होते. घाबरत घाबरत त्या बिचाऱ्याने सांगितले, 'गणवेष हलक्या कपड्याचे, मापाशिवायच शिवलेले मिळतात. रोज धुवावे तर सुकले न सुकले ही पंचाईत!' त्यानंतर पोस्टमनना अंगाबेताचे, टिकाऊ आणि पुरते गणवेष मिळावे म्हणून सरदारांनी लगेच खटपट केली. स्वयंसेवक म्हणून लहान मोठी कामे काळजीपूर्वक करणाऱ्या 'पोरासोरां'ना ते कधी विसरले नाहीत. त्यांना हात देऊन वर चढवण्यासाठी ते नेहमी तत्पर असत. उषाबेन मेहता 1942 साली आझाद रेडिओ केसमधे पकडल्या गेल्या. त्या वेळी त्यांनी एका पत्रात लिहिले आहे, ‘एवढीशी एकेरी बांध्याची अशक्त मुलगी! कसे सहन करील?’ ही कळकळ त्यांच्या स्वभावात मूळचीच असावी.
विद्यार्थीदशेत असताना नडियाद गावी ते वकिलीचा अभ्यास करीत होते. तेव्हा त्यांच्या मित्राच्या वडिलांचे एक वकील मित्र होते, त्यांची पत्नी वारली. त्यांचे बाळ पोरके झाले. त्याला वल्लभभाई रात्री कुशीत घेऊन झोपत. वेळच्या वेळी दूध पाजून ओले कपडेही बदलीत! पत्नीच्या पश्चात् मुलांना त्रास होऊ नये म्हणून स्वतः दुसरे लग्न न करण्यामागे हा हळुवार स्वभावच होता. पण त्याचबरोबर नाजुकसाजुक गोष्टी, थाटमाट, स्तुती, कीर्ती - अशा साऱ्या बाबतींत ते कमालीचे रुक्ष वाटत. सौदार्ह आणि रूक्षता, आदर्शवाद आणि वास्तव व्यवहारदक्षता, निर्भयता आणि विनम्रता, शौर्य आणि दूरदर्शीपणा, मुक्त हास्यविनोद आणि सखोल गांभीर्य अशा गुणांचे एक विलक्षण रसायन म्हणजे सरदार!
उभे आयुष्य राजकारणात काढले. तेथे वास्तवाशी समोरासमोर तोंड देत त्यांनी आपले पवित्रे घेतले. प्रचंड सभा आणि भावना हेलावून टाकणारी शब्दांची उधळण यातून शेवटी काहीच साध्य होत नाही. तसेच राजकारण हे व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा पूर्ण करून घेण्याचे साधन नसून दुर्लक्षित गोरगरिबांचे भले करण्याचा तो एक परिणामकारक मार्ग आहे, या दृष्टीने त्यांनी राजकारणाच्या क्षेत्रात प्रवेश केला. त्यांच्या भूमिकेला पोषक असे म. गांधींचे नेतृत्व त्यांनी स्वीकारले आणि ते शेवटपर्यंत शोभवले.
बारडोलीच्या सत्याग्रहापासून ते संस्थानांच्या विलीनीकरणापर्यंत त्यांचे राजकीय क्षेत्रातले कर्तृत्व यशस्वी आणि डोळे दिपावे असे आहे. पण त्या चढत्या आलेखाकडे पाहिले तर चटकन् लक्षात येते की सरदार त्या प्रश्नांशी संबंधित असलेल्या दोन्ही बाजूंच्या माणसांच्यात मिसळलेले आहेत. प्रश्नाच्या उलटसुलट बाजू समजावून घेऊन त्यांनी निर्णय घेतलेले आहेत. सर्वांच्या सहकार्याने प्रश्न सोडवले आहेत. शेतकऱ्यांपासून ते संस्थानिकांच्यापर्यंत सर्वांचा त्यांच्यावर विश्वास आहे. सुरुवातीपासून त्यांनी तो संपादन केलेला आहे. कोणाच्याही भाबडेपणाचा किंवा भावनावशतेचा आधार त्यासाठी त्यांना शोधावा लागलेला नाही.
सामान्यांतल्या सामान्य आणि दुर्लक्षित लोकांच्याविषयी त्यांच्या मनात कळवळा होता. त्यांच्या राजकीय आयुष्याची सुरुवात झाली ती 1923 साली बोरसदसारख्या नकाशावर टिंबाएवढीही जागा नसलेल्या भागात. बोरसद हा दीड लाख लोकवस्तीचा जिल्हा. बारिला आणि पाटण जमातींना सरकारने गुन्हेगारी टोळ्यांत जमा केले होते. बायकापोरांसकट सर्वांना पोलिसठाण्यावर रोजच्या रोज हजेरी द्यावी लागे. कोठेही चोरी किंवा लुटालूट झाली की वस्तीतल्या हाती येतील त्यांची धरपकड, मारहाण सुरू होई. त्यांच्या टोळ्या गावोगावी डाके घालीत. वाघ म्हटले तरी खातो, वाघोबा म्हटले तरी खातो... मग आता डाके घालून चार पैसे तरी मिळवू - असा विचार करून या टोळ्या रानोमाळ भटकत आणि गुन्हे करीत. यामागे आपली काही चूक आहे हा विचार न करता सरकारने जिल्हयातील लोकांच्यावर - म्हाताऱ्याकोताऱ्यांपासून पाळण्यातल्या पोरापर्यंत दरडोई 2 रु. 7 आणे दंड बसवला. त्या मागास भागातल्या गोरगरिबांच्या माथी त्या स्वस्ताईच्या काळात अडीच लाख रुपयांचा बोजा! लहान मोठी 102 खेडी भरडली गेली.... वल्लभभाईंनी रविशंकर महाराज आणि मोहनलाल पंड्या या त्या भागातील लोकसेवकांकरवी खरी हकीकत जाणून घेतली. गावोगावी क्षुब्ध जमावाला आवरून शिस्तबद्ध स्वयंसेवकांच्या छावण्या उभारल्या. आणि पाहाता पाहाता लष्कराला हेवा वाटावा असे शिस्तबद्ध सत्याग्रही सैन्य उभे केले. सरकारला त्यांच्यापुढे हात टेकावे लागले. दंड मागे घ्यावा लागला. तेवढयावर न थांबता लोकजीवनात सुधारणा करणारी रचनात्मक कामे त्या छावण्यांद्वारा कायम होत राहिली. हे त्यांचे पहिले सार्वजनिक काम. त्यानंतर चार वर्षांनी बारडोली सत्याग्रहात वेगवेगळ्या स्तरांतील व्यक्तींना एकत्र आणून त्यांची शिस्तबद्ध संघटना उभी करून ते भारतीय स्वातंत्र्ययुद्धातले 'सरदार' झाले.
एखादे काम, मग ते लहान असो वा मोठे, अंगावर घेण्याआधी ते पार पाडण्याची एक पूर्ण सुबद्ध योजना सरदारांच्या मनात तयार असे. आणि त्याप्रमाणेच ते स्वतः काम करीत आणि इतरांच्याकडूनही करवून घेत. गांधीजींनी हे अचूक हेरले होते. वस्तुतः 'गांधीजींच्या आदेशांचे अक्षरशः पालन' हा सरदारांनी स्वतः स्वीकारलेला पहिला नियम होता. पण बोरसद सत्याग्रहानंतर गांधीजींनी स्वतः म्हटले, "हे पाहा, बारडोलीच्या बाबतीत मी सत्याग्रहाच्या नेत्याला बांधलेला आहे. सरदारांना विचारल्याशिवाय मी काही करू शकत नाही. बारडोलीला जायचे म्हटले तरी मला त्यांची परवानगी घ्यायला हवी." सरदारांचे कर्तृत्व असे बावनकशी होते!
राष्ट्रीय सभा- इंडियन नॅशनल काँग्रेस- ही खऱ्या अर्थाने राष्ट्रीय व्हावी, देशातल्या प्रत्येक नागरिकाला ती 'आपली' वाटावी, म्हणून त्या वेळच्या नेत्यांनी जे प्रयत्न केले त्यांत सरदारांचा वाटा फार मोठा आणि महत्त्वाचा आहे. हा पक्ष म्हणजे केवळ आंदोलने करणारा बेशिस्त जमाव नसून एक शिस्तबद्ध, सर्वांच्या हिताचा विचार करणारी, एक जबाबदार आणि समर्थ संस्था, असा एक आकार त्या पक्षाला मिळाला आणि म्हणूनच साऱ्या नेत्यांना तुरुंगात डांबले तरी 1942 चे आंदोलन सरकारला दडपता आले नाही. संस्थेचे असे संघटन फक्त हुकूमशहाच करू शकतात असा एक गैरसमज आहे. आणि म्हणूनच कदाचित् प्रिन्स बिस्मार्कशी सरदारांची तुलना करण्याचा प्रयत्न होतो. पण सरदारांचा मार्ग फार वेगळा होता! संस्थेची शिस्त ते स्वतः अत्यंत काटेकोरपणे पाळीत. आंतरिक मतभेद होणे हे स्वाभाविक आहे, परंतु व्यक्तिगत पूर्वग्रह किंवा हट्टाग्रह न धरता सर्वांच्या विचाराने आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीने योग्य असेल ते स्वीकारावे आणि जे स्वीकारले त्याविरुद्ध वर्तन किंवा भाषण चुकूनही करू नये ही शिस्त त्यांनी स्वतः कधी मोडली नाही आणि इतरांना मोडूही दिली नाही. हे करीत असताना त्यांनी स्वतःच्या मतांना मुरड घातली, त्याचप्रमाणे भल्याभल्यांना न जुमानता घेतलेले निर्णय पारही पाडले. या कडक शिस्तीसाठीच म. गांधींना अपेक्षित असलेले अपरिग्रहाचे व्रत त्यांनी आणि त्यांच्या मागून मणिबेननी त्यांच्या मागे राहिलेल्या पुण्यांशासारख्या कन्येनेही अगदी कडकडीत पाळले. अनेक उच्च पदे भूषवली तरी कोणत्याच स्थानाची हाव कधी घरली नाही. राष्ट्रीय सभेची एकूण एक मते आपल्या बाजूला आहेत हे माहिती असूनही पंतप्रधानपदाची इच्छा त्यांच्या मनाला शिवली नाही. पंतप्रधानपदामागून येणाऱ्या वैभवाने त्यांची मती चळली नाही. जरूर नसेल तेथे एक दिवा देखील त्यांच्या महालयात उगीच कधी लावला गेला नाही, की बँकेत कधी खाते उघडले गेले नाही!
स्वातंत्र्यपूर्व काळातल्या कामापेक्षा स्वातंत्र्योत्तर काळातली आव्हाने अधिक अवघड होती. एक तर फाळणी स्वीकारली त्या वेळी असह्य मनस्ताप झालेला होता. परंतु तात्पुरत्या संयुक्त सरकारात होणारी मुस्कटदाबी, हानी ही पारतंत्र्याइतकीच दुःसह होती. म्हणून काँग्रेस नेत्यांनी फाळणी स्वीकारली. गांधीजींचा विरोध पत्करून! जागोजागी धर्माच्या नावावर द्वेषाचे वणवे पसरत होते. पंजाब आणि बंगालचे सुपीक भाग डाव्या उजव्या हातासारखे तोडले गेले होते. महायुद्धामुळे महागाई आणि दुर्भिक्ष्याची पांढरी पावले देशात पडली होती. राज्यकारभाराचे योग्य शिक्षण घेतलेल्या निष्ठावंत लोकांची उणीव पदोपदी भासणार होती. या अग्निदिव्यातून देशाला वाचवून बाहेर काढायचे होते. राज्यकारभार चालवण्यासाठी सर्वसंमत होईल अशी व्यवहारी घटना तातडीने तयार करायला हवी होती. ही सर्व परिस्थिती डोळ्यांसमोर ठेवून सरदारांनी पहिला निर्णय घेतला- वहिवाटी तंत्र मजबूत आणि व्यवस्थित हवे.
आजवर जे सरकारी अंमलदार, अधिकारी 'शत्रुपक्षात' होते ते स्वतंत्र हिंदुस्थानात 'आपले' आहेत, ही भावना नागरिकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या मनात निर्माण होणे अगत्याचे होते. केवळ अधिकारीच नाही पण लहान-मोठे कर्मचारीही तितकेच महत्त्वाचे होते. प्रस्थापित यंत्रणेत योग्य तो बदल काळवेळ पाहून, परिस्थितीप्रमाणे, कार्यकर्त्यांना आणि त्या यंत्रणेमधील माणसांना विश्वासात घेऊन करायला हवा. फाळणीच्या यातनाकांडात अगत्याची कामे वेगळी आहेत हे तारतम्य ठेवून त्यांनी सी. एच्. भाभा यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, सर्व-प्रांतीय विचारी, विवेकी माणसांची एक 'संकटकालीन'समिती प्रथम रचली. त्या समितीत सरकारी सचिव आणि लॉर्ड माउंटबॅटनही होते. समितीत घेतलेले निर्णय अमलात आणण्यासाठी सरकारी सचिव आत्मीयतेने कामाला लागावेत या दृष्टीने विचारपूर्वक ही आखणी केली होती. खुद्द दिल्लीमध्ये जाळपोळ, दंगेधोपे आणि हत्याकांडे सुरू होती. संकटकालीन समितीला परिस्थितीला आवर घालण्यासाठी पर्याप्त सत्ताही सरदारांनी दिली. एल्. के. झा आणि के. बी. लाल यांच्या हाती प्रत्यक्ष तामिलीची आणि अंतिम निर्णयाची सूत्रे त्यांनी सोपविली. त्याचबरोबर देशाच्या कानाकोपऱ्यांतली हकीकत व्यवस्थित कळावी म्हणून जुन्या, निःस्पृह कार्यकर्त्यांशी सरदारांनी सतत पत्रव्यवहार ठेवला होता. रविशंकर महाराज, किशोरीलाल मश्रुवाला, मुनि संत बाल, ठक्करबाप्पा यांच्यासारख्यांना सल्ला विचारला आहे. परिस्थितीची कल्पना देत राहाण्याची विनंती केली आहे. मुनशी, ढेबरभाई, खेर, यांच्यासारख्या राजकारणी लोकांशी निकटचा संबंध ठेवलेला आहे आणि हे सर्व करीत असताना काँग्रेस कार्यकारिणी आणि प्रधानमंडळातील सहकाऱ्यांच्या मतभेदांना, कधी पडते घेऊन, कधी समजावून, तर वेळप्रसंगी डावलून कामे केली आहेत. पण विरोध म्हणजे वैर नव्हे, आणि जाहीरपणे राहो, पण पत्रातूनदेखील विषाद असला तरी वैर किंवा संरक्षण आणि संचार व्यवस्था राज्यांनी ईर्ष्या शोधून सापडण्यासारखी नाही.
'विभाजन झाले आणि स्वातंत्र्य मिळाले’ या प्रत्येक शब्दातून जीवघेण्या समस्या आग्यामोहळासारख्या उठत होत्या. तो इतिहास तटस्थ भूमिकेतून आझम जीना स्वतः भेटी देत होते आणि संशोधनपूर्वक तयार करून एकीकरणाच्या अटी पाकिस्तान नाही सतत डोळ्यांपुढे ठेवला तर आजचे प्रश्न घेतलेले निर्णय मार्गदर्शक ठरल्याशिवाय राहाणार नाहीत.
सरदार वल्लभभाईंच्या कारकीर्दीतील अत्यंत महत्त्वाचे सीमाचिन्ह- त्यांनी भारताला अर्पण केलेली सर्वोत्तम सेवा म्हणजे साडेपाचशे संस्थानांचे विलीनीकरण करून एकात्म भारताची केलेली निर्मिती. ढासळणारी प्रकृती, वाढते वय, सारे विसरून सरदार देशाच्या प्रत्येक प्रश्नाकडे जीव ओतून लक्ष देत होते. येणाऱ्या प्रत्येक विघ्नाशी झुंजत होते. भारत ब्रिटिशांच्या शासनातून मुक्त झाला त्याच क्षणी साडेपाचशे संस्थानेही मुक्त झाली, स्वतंत्र भारतासारखीच सार्वभौम राज्ये म्हणून अस्तित्वात आली! त्यांच्याशी भारत आणि पाकिस्तान दोन्ही नवोदित राष्ट्रांच्या मुत्सद्यांनी वेगवेगळ्या प्रकारे पवित्रे टाकून बोलणी सुरू केलेली होती. ही संस्थाने देशभर सगळीकडे विखुरलेली होती. एका म्यानात दोन तलवारीही राहाणे अशक्य. तेथे भारतात दुसरी पाचशे साडेपाचशे स्वतंत्र राज्ये नांदणे म्हणजे अनागोंदीलाच निमंत्रण! ही राज्ये भारतातच सामावून घेणे भारताचे अस्तित्व टिकवण्यासाठी अत्यंत महत्वाचे होते. राज्य, संपत्ती आणि हाती येणारी सार्वभौम सत्ता कोणीही सुखासुखी सोडेल, अशी कल्पनाही करता येण्यासारखी नाही.
वाटाघाटीत काढायला वर्षानुवर्षीचा वेळही हाती नव्हता. सर्व राजांना स्वीकार्य असा एक मसुदा सरदारांनी आपल्या राजनीतिज्ञ सहकाऱ्यांच्या मदतीने तयार केला. विदेशनीती, संरक्षण आणि संचार व्यवस्था राज्यांनी केंद्राकडे सोपवावी, अशी मुख्य सूचना होती. दुसऱ्या बाजूने पाकिस्तानचे प्रयत्नही चाललेच होते. विशेषतः सरहद्दीच्या जवळपासच्या राजांना कायदे आझम जीना स्वतः भेटी देत होते आणि एकीकरणाच्या अटी पाकिस्तान नाही- तुमच्या तुम्हीच नक्की करा, असा त्यांचा पवित्रा होता! सही करून कोरा कागद त्यांच्यापुढे पाकिस्तान धरू पाहात होते. जुनागढ, हैदराबादसारखी राज्ये तिकडे झुकू पाहात होती. ब्रिटिशांनी करून ठेवलेले कायदे त्यांच्या पाठीशी होतेच. ब्रिटिश मुत्सद्यांनाही ही फाटाफूट करण्यात रस होता. जरूर तर लष्करी मदतदेखील मिळण्यासारखी होती. दोनचार मोठी राज्ये इकडे-तिकडे झाली की बारकी-सारकी संस्थानेही त्यामागून जातीलच. आणि मग हा डोलारा कसा सांभाळतात ते पाहू असे मनोरे ते रचीत होते. पण सरदारांनी आपल्या धोरणी, शहाण्या काठियावाडी सहकाऱ्यांच्या आणि प्रजेच्या मदतीने सौराष्ट्रातील 202 राज्ये भारतात सामावून घेतली. छत्तीसगडाच्या बाजूची संस्थानेही दोनचार दिवसांतच भारतात विलीन झाली. राजस्थानचे राजे आणि प्रजा देशाभिमानाच्या भावनेने भारलेलीच होती. तेथेही राजीखुशीने तडजोडी झाल्या. हैदराबादला मात्र लष्करी कारवाई करावी लागली. त्यासाठी निंदा, आक्षेप सारे सहन करून सरदारांनी ती केली. राजांना त्यांची प्रतिष्ठा, संपत्ती कायम राहील अशा मानमरातबाने वळवून घेतले आणि संरक्षणाची व्यवस्था केंद्राकडे घेऊन भारताचे सैन्य एकजिनसी करून सरदारांनी हे काम सर्वतोपरी पूर्ण केले. तरीही नवल असे की हे राजे महाराजे आणि त्यांचे परिवारदेखील सरदारांना आपले वडीलघारे हितेच्छू मानून त्यांच्यावर विश्वास ठेवून मनमोकळेपणाने आपली सुखदुःखे त्यांना कळवू लागले! ही खरी सिद्धी!
सरदारांच्या व्यक्तित्वाचा एक आगळा विशेष म्हणजे त्यांची सदाप्रसन्न, निर्मळ विनोदवृत्ती. सरदार असतील तेथे निराशा, दुर्मुखलेपणा कथी टिकायचा नाही. महादेवभाईंच्या डायरीत त्यांचा हा स्वभावविशेष ठायी ठायी उमटलेला आहे. एकदा एका पुस्तकातील प्रकरणाचे शीर्षक होते 'ब्रिटिश बायबल'.
हा काय प्रकार? बायबल तर जगात एकच आहे. मग हे कुठचं नवं बायबल?' गांधीजींना नवल वाटले.
सरदारांनी पुस्तकाकडे न पाहाताही क्षणात उत्तर दिले, 'पौड, शिलिंग आणि पेन्स! हे ब्रिटिश बायबल!'
एका पत्रलेखकाने गांधीजींना कळवळून विचारले होते, 'बापू! मला शंभर टक्के अहिंसा पाळायची आहे. पण कशी पाळावी? पावलागणिक किती जीवजंतूंचा चुराडा होतो!"
काय उत्तर द्यायचे या फिरस्त्याला! 'लिहा- पाय डोक्यावर घेऊन चाल!" सरदारांनी उत्तर देऊन टाकले!
ब्रिटिशांचे बायबल हेरणाऱ्या या विचक्षण मुत्सद्याला भारतापुढची खरी समस्या आर्थिक आणि उत्पादनाची आहे, अन्नधान्याचा प्रश्न सर्वात आधी हाती घ्यायला हवा आहे हे फार तीव्रतेने जाणवत होते. आपण नसत्या निरुपयोगी गोष्टींचा काथ्याकूट करण्यात वेळ घालवतो आहोत म्हणून ते जिवाच्या आकांताने सांगत राहिले. शेवटच्या क्षणापर्यंत अडचणींचे ढीग उपशीत राहिले. आज त्यांचे ते शब्द वाचताना वाटते, 'आयुष्य पुरले नाही! एरवी कदाचित् आज आपल्यापुढे आ वासून उभे राहिलेले प्रश्न- त्यांचाही निकाल त्यांनी लावला असता!'
Tags: Maniben British Gandhi Vallabhabhai Patel Saradar iron man संस्थान मणिबेन गांधी लोहपुरूष ब्रिटिश राजपुरुष मृणालिनी देसाई वल्लभभाई पटेल सरदार weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या