डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

सुशिक्षित बेकारांच्या संघटनेने पदवीधरास द. म. 200 रु. बेकारभत्ता द्यावा अशी मागणी केली आहे आणि अशी खिरापत बेकारांना वाटीत राहिल्यास तो एक आळशांना पोसण्याचा खटाटोप ठरेल, असेही बोलले जात आहे. या प्रश्नावर तरुणांनी आंदोलन करू नये असे कोणताही सुबुद्ध म्हणणार नाही, पण ते विधायक मार्ग शोधणारे असले पाहिजे.

प्रति शिवसेनेचे प्रमुख श्री. बंडू शिंगरे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करताना संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांनी भलतेच सूर छेडले, असे म्हणावे लागेल. प्रति शिवसेना आणि तिने काढलेला रायफल क्लब यांचे उद्दिष्ट काय आहे?

सुधीर फडके यांच्या मनात या उद्दिष्टाबाबत फारच मोठा गोंधळ दिसून येतो. खंडित हिंदुस्थान हे पाप असून अखंड हिंदुस्थान घडविण्यासाठी सध्याच्या सरकारवर दबाव आणला पाहिजे आणि या सरकारकडून जर हे काम झाले नाही, तर ते सरकार खाली ओढून हे कार्य करणारे सरकार स्थापन केले पाहिजे!' असे सुधीर फडके म्हणाले.

ही विधाने करताना आपण कोणकोणते प्रमाद करीत आहो याचे भान फडक्यांना मुळीच राहिलेले नाही. पाकिस्तान व बांगलादेशवर आक्रमण करून भारत सरकारने ते नवे देशमुक्त केल्याखेरीज सुधीर फडक्यांना हवा असलेला अखंड भारत निर्माण होणे आणि 'पाप' धुऊन निघणे कठीणच. आणि हे काम कुणी करायचे तर मुंबईतील चार-दोन भागांत युवकांची थोडीशी संघटित शक्ती पाठीशी असणाऱ्या प्रतिशिवसेनेने! 

'नॉट फेल्युअर, बट लो एम इज क्राइम' हे सूत्र डोळ्यांपुढे ठेवूनदेखील खंडीत भारत अखंडीत करण्यासाठी सरकारवर दबाव आणा, हे सांगणे आचरटपणाचेच ठरते. शुद्ध चारित्र्याचे युवक निर्माण करणे; भ्रष्टाचारशून्य जीवन जगण्याची प्रतिज्ञा यांच्याकडून करवून घेणे, झोपडपट्टीत विधायक कामास त्यांना जुंपणे, अशी नजिकची निकडीची कामे फडक्यांना दिसू नयेत हे प्रतिशिवसेनेचे दुर्दैव.

वाद चुकवणारे मार्गदर्शक

अर्थात चुकीचे मार्गदर्शन करण्याचा मक्ता काही फक्त सुधीर फडके यांच्याकडे नाही. जांबुवंतराव धोटे यांनी सुशिक्षित बेकार युवकांना मार्गदर्शन करताना 'पेटा आणि पेटवा' या भाषेतच आवाहन केले. सुशिक्षित बेकारांच्या संघटनेने नव्या विधानसभेचे पहिलेवहिले अधिवेशन भरत असतानाच पहिल्या दिवशी मोर्चा नेऊन आपल्या प्रश्नाबद्दल 'जागो और जगाओ' ची कामगिरी पार पाडली. आता जांबुवंती नुस्का असा आहे की ‘पेटा आणि पेटवा', ‘दिल्लीचे तख्त फोडा’ या सर्व आगलाव्या घोषणा जांबुवंतराव यांच्या दिवळखोरी अकलेच्या निदर्शक आहेत; सभेत टाळ्या घेण्यासाठी त्या क्षणभर उपयोगी पडतील, पण मध्यान्ही हवे असणारे दोन घास त्या कदापी देऊ शकणार नाहीत, हे या बेकारांनी थंड डोक्याने समजून घेतले पाहिजे.

धोटे आणि बेकारांचा मेळावा

गेल्या रविवारी या बेकारांच्या मेळाव्यास धोटे यांना आयोजकांनी बोलावले, ते अशासाठी की महाराष्ट्रातील सध्याच्या सत्तारुढ काँग्रेस आघाडीने सामाजिक व आर्थिक धोरणे निश्चित करण्यासाठी जी सदस्य समिती नेमली आहे, तिचे एक सदस्य जांबुवंतराव असून, बेकारांसा द. म. साठ रूपये बेकार भत्ता द्यावा अशी सूचना या समितीने केली असल्याचे वृत्त ‘समाचार’ या वृत्तसंस्थेने दिले होते.

या चौसदस्य समितीत एड. रामराव आदिकही आहेत. या समितीच्या सूचनांच्या आधारे राज्यपाल विधिमंडळापुढे भाषण करतील असेही प्रसिद्ध झाले होते. पण प्रत्यक्षात राज्यपालांच्या भाषणात बेकारभत्त्याचा उल्लेखही नव्हता. ते कसेही असो, पण बेकारभत्ता द्यायचा ठरविले तरी त्यामुळे बेकारीचा प्रश्न सुटणार आहे की अधिक अवघड होणार आहे? हे पैसे रोजगार हमीसाठी जसा सेस गोळा केला जातो, तसे सरकारने गोळा करायचे आणि 'डाल ऑफिस’ उघडून वाटायचे काय? वाटले तर कोणाला किती? शालान्त परीक्षाच जेमतेम पास झालेल्यांना किती आणि पदवीधरांना किती? सुशिक्षित बेकारांच्या संघटनेने पदवीधरास द. म. 200 रु. बेकारभत्ता द्यावा अशी मागणी केली आहे आणि अशी खिरापत बेकारांना वाटीत राहिल्यास तो एक आळशांना पोसण्याचा खटाटोप ठरेल, असेही बोलले जात आहे.

या प्रश्नावर तरुणांनी आंदोलन करू नये असे कोणताही सुबुद्ध म्हणणार नाही, पण ते विधायक मार्ग शोधणारे असले पाहिजे.

‘बेकारी नष्ट करायची असेल तर शेती हा मूलभूत उद्योगधंदा मानून त्याची चौफेर वाढ केली पाहिजे. तसे झाले तर या देशात कोणीही बेकार उरणार नाही’ असे एक विधान जांबवंतरावांनी या मेळाव्यात बोलताना केले. पण या मुद्द्याचा विस्तार करण्याचे त्यांनी खुबीने टाळले. बरोबरच आहे, विस्तार करायचा तर जनता पक्षाच्या शेतीविषयक धोरणाबद्दल चार चांगले शब्द बोलावे लागले असते! त्यापेक्षा भडक बोलावे, टाळ्या घ्याव्या आणि आपले नेतृत्व किती दाहक आहे याची साक्ष पटवावी एवढाच धोटे यांचा उद्देश.

विक्रमी कोलांटउडी वीर!

आता चुकीच्या मार्गदर्शनाच्या गोष्टी काही अमूक एकाच संघटनेत घडतात असे नाही. पण परंपरेने चुकीचे मार्गदर्शन करीत आलेला कोणता एक पक्ष भारतात असेल तर तो म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष. कोलांटउड्या मारण्याचा विक्रमच या पक्षाने केला. स्वातंत्र्यपूर्वकालातही तेच जाणि स्वातंत्र्योत्तरकालातही तेच. सातत्य हा गाढवांचा आणि कम्युनिस्टांचा गुण अशा तऱ्हेने आजवर ठळकपणे नजरेत भरत आला आहे. कॉ. डांगे यांनी आपला इंदिरावादी प्रबंध मागे घेतल्याची बातमी काही वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होते न् होते तोच आज डांगे यांच्या माघारीची बातमी सपशेल खोटी असल्याची वार्ता प्रसिद्ध झाली आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांत गोंधळ उडवून देण्यासाठी पक्षाच्या हितशत्रूंनी डांग्यांच्या मुत्सद्देगिरीपूर्ण माघारीची ही बातमी सोडून दिलेली आहे, असे या इन्काराच्या बातमीत म्हटले आहे. आता मूळच्या बातमीने कार्यकर्ते गोंधळात पडतील की या इन्काराने अधिक गोंधळात पडतील कुणास ठाऊक? पण कॉ. डांगे यांनी मूळ प्रबंध लिहिल्यापासून ज्या ज्या घटना घडल्या त्या पाहता कार्यकर्त्यांना पक्षाच्या गोंधळात टाकण्याची पावले डांग्यांनी स्वतःच टाकली, याबद्दल संशय उरत नाही.

आणीबाणीस पाठिंबा देण्यात कम्युनिस्ट पक्षाने चूक केली. आणीबाणी आवश्यक होती, पण पुढे तिचा गैरवापर होत आहे, हे कम्युनिस्ट पक्षास लवकर उमगले नाही. (त्यासाठी मार्च 77 च्या निवडणुकीत काँग्रेससह कम्युनिस्टांचा धुव्वा उडावा लागला.) ही चूक झाली, अशा पक्षांतर्गत दोन भूमिका.

डांग्यांची आणि त्यांच्या गटाची भूमिका याहून तिसरी. आणीबाणीस पाठिंबा देण्यात पक्षाने मुळीच चूक केली नाही, या भूमिकेवर ते निर्भर. यामुळे बंगाल, आंध्र व महाराष्ट्र असे पक्षात तीन भूमिकांचे तीन प्रमुख गट. अन्य गट आपल्यावर मात करतील या भयाने मध्यंतरी डांगे यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची बातमी व मागोमाग तो मागे घेतला असल्याचीही बातमी आली. आता महिनाअखेर पंजाबात पक्षाचे अधिवेशन भरणार असून तेथे आंध्रवाद्यांचा मध्यममार्गी ठराव मंजूर होईल अशी हवा आहे. त्यामुळे डांगे यांनी आपल्या भूमिकेपासून पळ काढला की महाराष्ट्रातील पक्षशाखेतच आपल्या भूमिकेस जोराचा विरोध आहे म्हणून माघार घेतली आहे, हे कळावयास मार्ग नाही. एवढे खरे की माघार घेण्यापूर्वी त्यांनी रचलेला प्रबंध देशाला चुकीचे मार्गदर्शन करणाराच होता आणि आता माघारीनंतरही जो ठराव पक्षाच्या अधिवेशनात तडजोड म्हणून मंजूर होईल, त्यानेही चुकीचेच मार्गदर्शन होणार आहे.

त्या मानाने श्री. यशवंतराव चव्हाण, श्री. शरद पवार यांच्या भूमिका अधिक निर्दोष म्हणाव्या लागतील.

Tags: कम्युनिस्ट पक्ष कॉ. डांगे बेकारभत्ता बेकारी सुधीर फडके unemployment sudhir phadke communist party comrade dange weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके