डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गोरेगावच्या केशव गोरे स्मारक ट्रस्टचे माजी विश्वस्त व मला गुरुस्थानी असलेले श्री. र. गो. ऊर्फ आबा करमरकर यांच्या आवाहनाप्रमाणे मी पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर दोन वर्षे आदिवासी भागात दामखिंड ता. मनोर, जि. ठाणे या परिसरातत्यांचे मार्गदर्शनाखाली पूर्णवेळ काम केले. त्यानंतर परिस्थितीमुळे मला नोकरीची गरज होती. बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकारी पदाच्या परीक्षेला बसलो व पासझालो. निवडीच्या वेळी माझ्या खेड्यातील कामाच्या अनुभवाला वजन मिळाले व माझी नेणूक सुरुवातीची नऊ वर्षे ग्रामीण भागात झाली. दोन-तीन वर्षे विव्हळत खेड्यात काम करून शहरात परत येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तुलनेत माझे काम वेगळे असावे. एवढेच नव्हे प्रतिकूल वातावरणात काही प्रमाणात का होईना, बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणारा अधिकारी म्हणून नोंद झाली असावी. पुढे पदोन्नतीनंतर निमशहरी, शहरी व महानगरी भागात काम करून शेवटी ‘विदेश विनिमय’ शाखेचा साहाय्यक महाप्रबंधक म्हणून निवृत्त झालो. समाजातील आर्थिक वास्तवाच्या जोडीने सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक वास्तवही डोळसपणे पाहिले. सामाजिक बांधिलकीतून प्रामाणिकपणे नोकरी करता येते असे अनुभवले. आदिवासी भागात असताना ‘साधना’तून मी अनेक लेख लिहिले. आता निवृत्तीनंतर लिहिलेले काही अनुभव साधनातून यावे असे वाटत आहे.

- 1 -

एकात्मिक ग्रामीण विकास योजनेचे शेकडो अर्ज गटविकास अधिकाऱ्याकडून शिफारस करून आले होते. जिल्हा परिषदेची जबाबदारी अशी की वीस कलमी कार्यक्रमाची अंलबजावणी पंचायत समितीने तालुक्याच्या प्रत्येक गावातील ग्रामसेवकामार्फत करायची व ज्यांची कर्जप्रकरणे मंजूर झाली त्यांना 33 टक्के ते 50 टक्के अनुदान द्यायचे. अनुदान वजा जाऊन राहिलेली कर्ज रक्कम लाभधारकांनी ठराविक मुदतीत व्याजासह भरून कर्जफेड करायची. कर्जाच्या रकमेतून म्हैशी, गायी, शेळ्या, बैल, बैलगाड्या, कोंबड्या, यंत्र-सामग्री इत्यादी खरेदी करायची. या कर्जाचा असा विनियोग करण्याची अपेक्षा होती की, जे काही उत्पादन होईल त्यातून कर्जफेड करून राहिलेल्या वाढाव्यातून संबंधित कर्जदाराची गरिबी कमी व्हावी. आता या योजनेची अंलबजावणी करताना तळागाळात काय घडले हे पाहणे आलेच. बँकेकडे अर्ज आल्याबरोबर त्याचा कडका (कानोसा) लाभार्थींना म्हणजे शेतकरी व शेतमजुरांना लागलाच. गरम शेवकाने (ग्रामसेवकाने) त्यांना सांगितले की आता बँक तुम्हाला कर्ज देणार, त्यातून तुम्ही पाहिजे ते घ्यायचे आणि गरिबी हटवायची. याच ग्रामसेवकाने प्रत्येक गरिबीरेषेखालच्या कुटुंबप्रमुखांकडून अर्ज भरून घेतले. 

कर्जाचा उद्देश व कर्ज रक्कमही कलमे वगळता अन्य मजकूर अर्जात छापीलच होता. उदाहरणार्थ, कर्जाचा उद्देश बैलगाडी व त्यासाठी कर्ज रक्कमरु. 20000 असे लिहून अर्जदाराची सही घ्यायची. अर्जावर सही दिल्यामुळे कर्ज मिळेल व त्यावर सबसिडी मिळेल असे अर्जदाराला सांगितल्यामुळे अर्जदार आनंदाने सही द्यायचा. त्यामुळे एका अर्जदाराकडून ग्रामसेवकाने 500 विलायती कोंबड्या असे लिहून घेतले व त्यावर रु. 50000 अशी रक्कम ठोकून दिली. हा अर्ज माझ्याकडे आल्यावर मी त्या ग्रामसेवकाला बोलावून घेतले. अर्जदार तर आला होताच. मी विचारले, ‘भाऊसाहेब, विलायती कोंबड्यांचे कर्जप्रकरण करण्यासाठी अर्ज लिहिताना तुम्ही काय पाहिले, काय छाननी केली?’ त्यावर ग्रामसेवक भाऊसाहेब म्हणाले, ‘मी फक्त एवढेच पाहिले की अर्जदार ‘बिलो पॉव्हर्टी लाईनच्या खाली आहे.’ त्याला (अर्जदाराला) विचारले की ‘तू विलायती कोंबड्या पाळशील का?’ तर तो ‘हो’ म्हणाला. यावर मी अर्जदाराला पुढे विचारले, ‘तू हो कसा काय म्हणालास?’ त्यावर त्याचे म्हणणे असे ‘भाऊसाहेबांनी सबसुटी (सबसिडी) मिळेल असे सांगितले. ते म्हणाले की समद्यांनी म्हैशी, बैल घेऊन चालणार नाही. तू इलायती कोंबड्या घे. मी म्हणलो ‘कोंबड्या तर कोंबड्या, कर्जावरच घ्यायच्या तर घेऊन टाकू.’ अर्जदाराचे हे म्हणणे ऐकल्यावर मी त्याला प्रश्न विचारला की ‘विलायती कोंबडीला देशी कोंबडा चालेल का?’ त्यावर तो म्हणाला ‘इलायती कोंबड्या पिंजऱ्यात बसनार आणि देशी कोंबडा बाहेर फिरनार त्यो कसा चालेल?’ पुढे मी विचारले की ‘मग तू विलायती कोंबडा घेणार की नाही?’ त्यावर तो गडबडला. मी पुढे म्हटले की ‘विलायती कोंबडी बिगर कोंबड्याचे अंडे देते हे तुला माहीत आहेका?’ तो म्हणाला ‘नाही.’ मी विचारले, ‘विलायती कोंबडीला दिवसाचे बारा तास व रात्रीचे सहा-आठ तास असा अठरा ते वीस तास प्रकाश लागतो आणि त्याचा परिणाम म्हणून दर सव्वीस तासाला वयात आलेली कोंबडी ‘बिगर कोंबड्याचे अंडे देते हे तुला माहीत आहे का?’ तो म्हणाला ‘नाही.’ ‘विलायती कोंबडीला खास प्रकारचे पोल्ट्रीखाद्य, दवा-औषधे याची तरतूद करावी लागते हे तुला माहीत आहे का?’ तो म्हणाला ‘नाही’, ‘मग तू या कर्जप्रकरणावर सही का केलीस?’ त्यावर त्याचे उत्तर ‘भाऊसाहेब (ग्रामसेवक) म्हणाले सबसुटी भेटेल, कर सही.’ हे सगळे संभाषण चालू असताना ग्रामसेवक गालातल्या गालात हसत होता. मी त्याला विचारले, ‘अशा माणसाला विलायती कोंबड्यासाठी कर्ज मागण्यासाठी सही का करायला लावली?’ त्यावर पानाचा तोबराहळूहळू चावत ग्रामसेवक थंडपणे उद्‌गारला, ‘रावसाहेबांनी (बीडीओ) सगळीच कर्जे म्हैशी बैलांसाठी नको म्हणून सांगितले होते.’ त्यावर मी त्याला विचारले ‘पण ज्याला काहीच माहिती नाही त्याला विलायती कोंबड्या?’ त्यावर तो पटकन म्हणाला, ‘साहेब, टाका बदलून उद्दिष्ट.’ मी विचारले ‘म्हणजे कसे?’ त्यावर तो हसतहसत म्हणाला ‘बँक मॅनेजरला कर्जाचे उद्दिष्ट बदलायची पावर असते. विलायती कोंबड्यांवर राऊंड करा, दुभती म्हैस लिहा व कर्जाच्या रकमेवर राऊंड करून रु. 5000 लिहा. वाटलं तर एकाऐवजी दोन दुभत्या म्हैशी व रु. 10000 लिहा.’ ते ऐकून मी कपाळाला हातसुध्दा लावू शकलो नाही, कारण उजव्या हातात पेन व डाव्या हाताखाली अर्जाचा गठ्ठा होता. बँकेच्या मॅनेजरकडे कोंबड्यांची म्हैस करण्याची पावर आहे अशी अर्जदार शेतकऱ्यांची खात्री पटली. तो म्हणाला ‘काय बी करा पण कीम (स्कीम) मंदीमला बसवा.’ दुभत्या जनावरांचे संगोपन करण्यात हा अर्जदार हुशार होता. त्यासाठी त्याला कर्ज दिले, पण जिल्हा परिषद, पंचायत समितीचा सेवक असलेल्या या ग्रामसेवकाला लाभधारकापर्यंत योजना योग्यप्रकारे कशी पोचवायची याबद्दल मार्गदर्शन कोणी व कसे करायचे हा प्रश्न होताच.

– 2 –

एक हातभट्टी दारूचा व्यापारी एकात्मिक ग्रामीण विकास योजनेखाली शिफारस केलेला अर्ज मंजूर करायचा आग्रह करीत होता. गळ्यात सोन्याची चेन, दहा बोटांत चार आंगठ्या, तांबारलेले डोळे, भक्कम देहयष्टी व पांढरा स्वच्छ झब्बा लेंगाघातलेला हा मानाजी एवढा ऐपतदार असून गरिबीरेषेखाली कसाबसला हे मी त्याला विचारले, तो म्हणाला ‘मी नाही, माझ्या मिशेस गरिबीरेषेखाली बशिवल्या आहेत, म्हणाल तेव्हा त्यांना अंगठे द्यायला आणतो.’ मी विचारले, ‘तरी पण ग्रामसेवकाने त्यांचे (मिसेसचे) नाव म्हणून कसे घेतले?’ त्यावर मानाजी म्हणाला ‘तिच्या नावावर कमी जमीन आहे म्हणून ती अल्पभूधारक आहे, कुटुंब तीच चालवते म्हणून कुटुंबप्रमुख आहे आणि स्वभावाने गरीब आहे.’ मी विचारले ‘आर्थिक गरिबीवर बी. पी. एल. यादीठरते.’ त्यावर तो म्हणाला ‘आम्ही बांधलेल्या चाळीत ग्रामसेवकाला जागा भाड्याने दिलेली आहे म्हणून बळंबळं त्यानेच आमच्या कुटुंबाला गरिबीरेषेखालच्या यादीत बसवलं.’ अर्थातच हे कर्ज प्रकरण करायचे आम्ही टाळले. पुढे मी एके ठिकाणी वाचलेकी, नाबार्डच्या एका सर्व्हेप्रमाणे आयआरडीपीच्या बीपीएल (बिलोपॉवर्टी लाईन) कुटुंबांच्या यादीत किमान पंधरा टक्के ‘गरीब नसलेल्या’ कुटुंबांची नावे घातलेली असतात.

- 3 –

एक दिवस सकाळधरून (सकाळपासून) एक डझन अर्जदार आम्ही दिलेली मंजुरीपत्रे घेऊन कागदपत्र (डॉक्युमेंटस्‌) करायला हजर झाले. मी व माझे सहकारी त्यांच्या सह्या व अंगठे घेत होतो. अशाच एका विठ्ठल चिंधू शेडगेचा कागदपत्रावर सह्या करण्याचा नंबर आला. तो लगबगीने पुढे आला स्टँपपॅडमधे डाव्या हाताचा अंगठा भिजवला व खुणा केलेल्या जागांवर भराभर टेकवत गेला. हे झाल्यानंतर मी एका रामभाऊंना म्हटले ‘रामभाऊ तुम्ही विठ्ठलच्या अंगठ्यासमोर ‘दस्तूर करा.’ (म्हणजे सही निशाणी डाव्या हाताचा अंगठा विठ्ठल चिंधू शेडगे यांचा आहे... रामभाऊ असे त्या अंगठ्याचे सत्यापन करा.) त्यावर विठ्‌टल चिंधू शेडगे म्हणतो ‘रामभाऊ कशापायी? म्या स्वोताच सही करतो ना.’ मी विचारले ‘विठ्ठल, तूच आता अंगठे दिलेस ना?’ त्यावर विठ्ठल म्हणतो ‘साहेब मला अंगठा बी येतो अनं सही बी येते.’ मी त्याला हसून म्हणालो ‘वा विठोबा, तुम्ही लई सुशिक्त, अंगठा बी येतो आणि सहीबी येते!’ आणखी गंत म्हणजे या विठ्ठल चिंधू शेडगेची सही ‘वि. चिं. शेडगे’ अशी होती मी सहज विचारले ‘विठ्ठल चिंधू शेडगे असे पूर्ण नाव लिहू शकतोस का?’ त्यावर तो ‘नाही’ म्हणाला. मी विचारले ‘तुला विठ्ठल चिंधू असे लिहिता येत नाही?’ त्यावर त्याचे उत्तर मजेशीर होते. तो म्हणाला ‘साक्षरता प्रसारात फक्त सही शिकवली वि पुढची (दोन अक्षरे) व चिं पुढचे (एक) अक्षर मला माहीतच नाही.’ मी विचारले, ‘मग तू हे वि. चिं. शेडगे कसे लिहितोस?’ तो म्हणाला ‘गिरवून गिरवून पाठ केले.’ मी म्हटले ‘तेतरी बरे लक्षात ठेवलेस पण कसे?’ तो म्हणाला ‘आपल्यावानी सुशिक्त माणसं आणि आमच्यावानी अशक्त माणसं चिमणीकावळ्याची चित्रं ध्यानात ठेऊन जशी काढतात तशीच माझी सही’ हे ऐकून माझ्या मनात प्रश्न आला की साक्षरतेचे अमुक टक्के उद्दिष्ट झाल्याच्या शासकीय आकडेवारीत असे विठ्ठल किती? सरकारी यंत्रणेची अनास्था, बीपीएल यादीतील काही बोगस नावे, ग्रामसेवकांनी बेजबाबदारपणे भरलेले काही अर्ज वि. चिं. शेडगेयांसारख्या निरक्षरांचा कोट प्रतिसाद यामुळे आमच्या कामावर काही प्रतिकूल परिणाम होत नव्हता असे नाही. तरीही प्राप्त परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आमचे काम चालूच ठेवले. उलट या कामामुळे ज्यांना फायदा होत होता ते शेतकरी शेतमजूर आमच्यावर फिदा होते. त्यांच्याशी आमचा चांगला संपर्क होता. 

एकदा वि. चिं. शेडगेच्या धाकल्या भावाचे लगीन होते. ‘वि. चिं. ’बँकेतल्या ‘समद्या स्टॉप’ला (सर्व स्टाफला) आवतान (आमंत्रण) द्यायला आला. त्यामुळे आम्ही दोन तीन जणांनी चार मैलांवरच्या त्याच्या गावाला जाऊन लग्नाला हजेरी लावली. ‘संध्याकाळी सूर्यास्ताच्या सुाराला म्हणजे गोरज मुहूर्तावर लगीन होते. आम्ही कोकेत्रीत (कुंकुमपत्रिकेत) दिलेल्या टायमावर पोचलो, पण लग्नला गायला वेळ होता असे दिसले. तिथे ‘वि. चिं. ’चा मित्र गणपतराव होता तो म्हणाला ‘तुच्यावानी आमच्यात पेशिफिक टाई नसतो. कुनब्याचा (शेतकऱ्याचा) कारभार मुळाभर अलीकडे, मुळाभरपलीकडे रहाणारच.’ आम्हालाही कुठे गाडी गाठायला जायचे नव्हते. पण गेल्या-गेल्या आम्हा चौघांच्या गळ्यांमध्ये ‘वि. चिं.’ने हार घातले. सायेब आले सायेब आले त्यानला बसायला खुर्च्या द्या. असा गलका झाला. जसे काही साहेब खुर्चीबिगर बसतच नाहीत. असो. मी ‘वि. चिं. ’ला विचारले, ‘नवरा-नवरी एकमेकांना हार कवा घालणार?’ तो म्हणाला ‘घालतील सावकाश, कशाला काळजी करता.’ लाकडी घोड्यावर अमिताभ बच्चनचा मुखवटा घातलेला माणूस ड्यानस्‌ करीत होता व लाऊस पिक्चरवर ‘मेरे अंगनेमे तुम्हॉरा क्या काम है’ हे गाणे वाजत होते. थोड्या वेळाने बामण आला कारण लगीन लावायला बामण पाहिजेच. त्याला मंगलाष्टके येत नव्हती. तो रामरक्षा म्हणता होता. कदाचित इथली पद्धतही तशी असेल. पण रामरक्षा म्हणतानाही तो अनेक चुका करीत होता, उच्चारही ठीकन व्हते. मी ‘वि. चिं.’ला विचारले, ‘विठोबा अरे असे काय म्हणतोय हा ब्राह्मण, रामरक्षा तर रामरक्षा पण तीही चुकीची आणि उच्चारही चुकीचे? हे कसं काय चालतं तुम्हाला?’ यावर हसत हसत वि. चि. म्हणाला, ‘एक धेसपांडा (देशपांडे) गावात राहतो त्याला लगीन लावायला धरून आनतात व दक्षिणा देत्यात. हुशार हुशार बामनं पुन्या-मुंबईला गेली. गाळसाळ राहिला. भागवून घेतो. पर लगीन लावायला बामन पायजेच. ही वाडवडिलांची परंपरा पाळलीच पाहिजे.’-

– 4 –

सुरुवातीला आमची भ्रष्टाचारमुक्त कामाची पध्दत खातेदारांना माहीत नव्हती. एकदा माझी मोटारबाईक बिघडली म्हणून मी पंधरा किलोमीटर वरच्या दुसऱ्या गावाला जाण्यासाठी एका एस. टीबसमध्ये घुसलो. एसटीच्या दरवाजाच्या पुढे कंडक्टरच्या बाजूला जेथे उभे राहायला जागा मिळाली. एक खातेदार ड्रायव्हर सीटच्या मागच्या आडव्या सीटवर बसला होता. उंचनिच अशा त्या रामा नावाच्या खातेदाराने मला पाहिले. मधे बरेच लोक उभे होते तरी तो तिथून माझ्याशी मोठ्याने बोलू लागला ‘साहेब हिजीट (व्हिजीट) ला कवा येणार? आपले म्हशीचे परकरन (प्रकरण) करायचे आहे.’ मी म्हटले ‘येऊ येऊ. नंतर सांगतो.’ त्यावर तोम्हणाला, ‘आत्ताच सांगा, मसाला कोंबडी तयार ठेवतो, कवा येणार?’ मी म्हटले, ‘अरे नंतर सांगतो ना व्हिजीटचे’ त्यावर त्या रामाला ओळखणारा दुसरा खातेदार सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात बोलला की ‘सायबाचे नाव जोशी साहेब हाय, तो कोंबडी खात नसंल!’ यावर रामा म्हणाला, ‘नाही तर मंग आपुन डालड्यातला रवा करू. पण कवा येणार ते निछि्‌छत सांगा.’ मी म्हटले ‘मला डालड्यातला पण नको आणि शुध्द तुपातला रवा (शिरा) पण नको. ऑफिसमध्ये येऊन भेट मग येण्याची तारीख सांगतो.’ हा सर्व संवाद ‘हॉर्न सोडून सर्व भाग वाजणाऱ्या’ एसटीच्या खडखडाटात चालू होता. कुठेही काहीही बोलणारी ही अशी मोकळी ढाकळी माणसं. पुढे त्या रामाचं ‘परकरन’ केलेही पण त्यासाठी या सायबाने कर्ज देण्यासाठी कोंबडी किंवा डालड्यातला शिरा द्यावा लागत नाही हे जगजाहीर (किंवा एसटी जाहीर) झाले.

– 5 – 

मी राहत होतो ती जलसिंचन विभागाची कॉलनी होती. रस्त्याच्या एका कोपऱ्यावरचा बैठ्या इमारतीत बँकेच्या संस्थेचे ऑफिस, बाजूला गोडाऊन व त्याच्या बाजूला माझा ब्लॉक. समोर पोस्ट ऑफिस अशाच एका इमारतीत होते. शनिवारी दुपारची वेळ होती. पोस्टातून जोराजोरात ‘चल जा, चल जा’ असा आवाज ऐकू आला. मी शिपायाला म्हटले, ‘मोहन काय चालले आहे समोर?’ तो जाऊन बघून आला व येताना चिणकाबाई नावाच्या मध्यमवयीन व कपाळावर कुंकू नसलेल्या बाईला घेऊन आला. तिच्या हातात एक कडीचा डबा होता व त्यात पैसे होते. तिला ते पोस्टात ठेवायचे होते. पण पोस्ट मास्तरने तिला हाकलून दिले कारण त्या डब्यात एक आणि दोन रुपयांची प्रत्येकी वीस वीस नोटांची अनेक भेंडोळी धाग्याने बांधून ठेवली होती. हा डबा (नोटा भरलेला) डोक्यावर घेऊन ती फिरायची. कुणीतरी सांगितले पैसे पोस्टात ठेव म्हणून ती तिथे गेली होती आणि तिची प्रॉपर्टी पाहून पोस्ट मास्तरने तिला ‘इथेकाही ठेव ठेवणार नाही, चल जा!’ म्हणून घालवून दिले होते. मी तिला हे पैसे कसे जमवले असे विचारले असता ती म्हणाली, ‘मला पोर नाही म्हणून सासरच्या लोकांनी रांडाव (विधवा) झाल्यानंतर हाकलून दिले, शेजारच्या गावात भावाबरोबर राहते. विरिकेशन कॉलनी (इरिगेशन कॉलनी) मध्ये धुनीभांडी करते, शिळे-पाके मागून घेऊन खाते, पैसे साठवते, राहायला भावाच्या घरी असते पण भाऊ दारुड्या आहे तो डब्यातले पैसे काढून घेतो. तरी इतके पैसे राहिले आहेत. कुणी म्हणालं पोस्टात ठेव म्हणून तिकडे गेले. त्यांनी घालवलं. हा तुमचा शिपाई म्हणतो, ‘ब्यांकेत ठेव पण मला ब्यांक माहीतच नाही. मी अडाणी बाई.’ वगैरे. मी, मोहन शिपाई आणि नागू नावाचा एक खातेदार तिघांनी पैसे मोजले. ते चार हजार रुपये भरले. प्रत्येक भेंडोळ्यात वीस नोटा असत. फक्त दोन भेंडोळ्यांत प्रत्येकी एकोणीस नोटा होत्या. ते पाहून त्या चिणकाबाईने नागूला झापले. ‘तू दोन नोटा खाल्या असशील.’ असे त्याला म्हणाली. 

‘माझी धा एकर शेती आहे, तुझ्या दोन नोटांनी माझे काय घर भरणार आहे?’ असे म्हणत नागूने हसतंच तिचे ‘ऑबजेक्शन ओव्हररूल’ केले. तीही ठीक आहे जाऊ दे म्हणाली. मी तिला विचारले ‘की तू वीस वीसची भेंडोळी (सुरळ्या) करण्याचे कारण काय?’ त्यावर ती म्हणाली, ‘हाताला धा बोटं, पायाला धा बोटं अशी मोजून झाली की, त्या नोटांची एक सुरळी. इसाची (वीस नोटांची) सुरळी झालीकी डब्यात टाकायची.’ असे पैसे जमवून डब्यात टाकायचे तिचे काम सुरळीत चालू होते. तिला या चार हजार रुपयाची तिमाही व्याज योजना (क्यूआयडीएस) सांगून एक पावती करून दिली आणि ‘या आमावशेनंतर तिसऱ्या आमावशेला पहिले व्याज घ्यायला यायचे. नंतर प्रत्येक तिसऱ्या आमावशेला पुन्हा पुन्हा व्याज घ्यायला यायचे, पावती डब्यात जपून ठेवायची.’ असे सांगितले. पावती घेऊन जाण्यापूर्वी चिणकाबाईने मात्र एक सिक्सरमारली. ‘चार हजार रुपये तुझ्या (सायबाच्या) म्होरल्या कपाटात ठेव, मी मधूनमधून पाहायला येईन तेवा मला दाव.’ सासरच्या लोकांकडून आणि सख्ख्या भावाकडून फसवणूक झाल्यावर चिणकाबाईने विश्वास तरी कुणावर ठेवावा? मी म्हटले काही काळजी करू नको याच कपाटात तुझे पैसे शेप (सेफ) राहतील. डबा डोक्यावर घेऊन चिणकाबाई निघून गेली. पुण्यापासून साठ किलोमीटर अंतरावर इतकी अडाणी व अन्यायाने ग्रासलेली व्यक्ती असू शकते यावर मी तिथे काम केल्यामुळेच माझा विश्वास बसला. त्या भागात एसटीचे जवळच्या प्रवासाचे तिकिटही न परवडणारी अनेक माणसे भेटली. पुढे तो पोस्टमास्तर एकदा भेटला व म्हणाला, ‘काय त्या अडाण्यांची कामं करता साहेब, विनाकारण आपला वेळ फुकट घालवता? मी तर तिला हाकलूनच दिली.’ मी म्हटले, ‘मी बँकेची ठेव पावती तिला दिली.’ जास्त काही बोललो नाही. मनात विचार आला की या अडाणी माणसांना सगळ्यांनी ढकलून देऊन कसे चालेल? चिणकाबाईने बँकेत ठेवलेली चार हजार रुपयांची ठेव कायमल क्षात राहिली. पुढे मी मुंबईच्या एका शाखेत एकरकमी दोनशे कोटी रुपयांची ठेव (शॉर्ट र्ट डिपॉझिट) एका प्रॉव्हिडंट फंडट्रस्टकडून घेतली होती. पण लोकांच्या दृष्टीने अडाणी असलेल्या चिणकाबाईंची चार हजार रुपयांची ठेव कायम आठवणीत राहिली. अगदी दीर्घ मुदतीच्या ठेवीसारखी. याचा अर्थ या भागातल्या सगळ्याच महिला चिणकाबाईसारख्या अडाणी होत्या असे नाही आणि चिणकाबाईंना अडाणी कसे म्हणायचे? रिझर्व बँकेच्या भाषेत ‘अन बँक्डएरिया’मध्ये बँकांचा विस्तार झाला पाहिजे पण अन बँक्ड एरियाएवढा मोठा असेल आणि त्यात असे चिणकाबाईंसारखे ग्राहक मिळतील याची बऱ्याच वरिष्ठांना कल्पनाही नसेल.

– 6 –

दुसऱ्या एका गावात एक चिंधाबाई राहत होती. ती आमची खातेदार होती. असेल चाळीस-बेचाळीसची, चिणकाबार्इं-सारखीच रांडाव (विधवा) होती. तिला दोन मुलगे होते. एक वीस-बावीस वर्षांचा व एक सतरा-अठरा वर्षांचा. ती दोन-तीन एकर जमिनीत पिके काढून नवऱ्याच्या माघारी टुकीने संसार करीत होती. ग्रामसेवकाने तिचा ‘गरिबीरेषेखालच्या’ प्रकरणाचा फॉर्म भरला तो योग्य होता. तिचे बैलजोडीचे प्रकरण केले. आमच्या कार्यपध्दतीत कर्ज रकमेचा योग्य उद्देश साध्य करण्यासाठी विनियोग करणे (एंड यूज टु बीएनशुअर्ड) आवश्यक होते. त्यानुसार या खातेदारांची कर्जप्रकरणे मंजूर करून त्यांना म्हैशी, गायी, शेळ्या, बैल, बैलगाड्या खरेदी करण्यासाठी त्या त्या बाजारांवर आम्ही घेऊन जात असू. चिंधाबाईव इतर दहाबारा शेतकरी, मी व माझा शिपाई असे पशुवैद्यक अधिकाऱ्याला बरोबर घेऊन बाजारावर सकाळी वेळेवर पोहोचलो. या आठवड्यात बाजारात बैलबाजारही भरायचा. जो बैल खरेदीकरायचा तो लंगडा, लुळा, पांगळा नसावा म्हणून चालवून पाहायचा, त्याचे दात पाहून वय आजमावयाचे व असा बैल शेती कामाला, गाडी जुपायला बरा असल्याचा अंदाज घेऊन, संबंधित कर्जदाराने घासाघीस करून रक्कम ठरवून सौदा पक्का झाला की, पेमेंट करून तो ताब्यात घ्यायचा. पशुवैद्यक अधिकाऱ्याने बैल तपासून विमा उतरवायची प्रोसिजर पूर्ण करायची व कर्जदाराने हे बैल आपापल्या ठिकाणी घेऊन यायचे, त्यासाठी टेंपोचे भाडेही कर्ज रकमेतून द्यायचे, अशी खातेदाराला समाधान मिळेल (टु दसॅटिस्‌फॅक्शन ऑफ द बॉरोअर) अशी सेवा देण्याची पध्दत मी वथोड्या वेळाने बामण आला कारण माझ्या सर्व सहकाऱ्यांनी खूप कष्ट घेऊन बसवली होती, पण चिंधाबाईच्या बाबतीत वेगळेच घडले. 

मी व आमचा शिपाई मोटारसायकलवरून परत येताना वाटेत आम्ही एका बैलगाडीला ओव्हरटेक करत पुढे जात होतो. पण बैलगाडीत चिंधाबाई व तिचा मुलगा आणि तिसरा कोणीतरी असे तिघेजण बसलेले मला दिसले. नंतर मी विचार करत होतो की जी बाई बैल खरेदीला आली ती खरेदी केलेले बैल बैलगाडीला जुंपून कशी जाईल? शिपायाला म्हटले रविवारी (म्हणजे बैल खरेदी शनिवारी झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी) सकाळी थोडा वेळ येऊन जा. तो आला. त्याला चिंधाबाईकडे पाठवले. चिंधाबाई शेतीच्या कामात यापलेली (व्यापलेली) होती म्हणून तिने मुलाला पाठवले. या मुलाचे लग्न ठरलेले होते. त्याला विचारले, ‘तुझ्या होणाऱ्या सासऱ्याची बैलगाडी घेऊन तू बाजारात आला होतास की नाही?’ तो घाबरला. तुम्हाला कसे कळले विचारू लागला. त्याला पावती दाखवली. बैल विकणार ‘खाणेकर’, बैल खरेदी करणार ‘मोहोळ’ म्हणजे तुम्ही. तुम्ही खाणेकरांची मुलगी करणार. त्याबद्दल त्याला दोन हजार रुपये देणार ते तुमच्याकडे नाहीत म्हणून बँकेचे कर्जप्रकरण केले. सासऱ्याचे बैल, सासऱ्याची गाडी, बैल विकलेले दाखविले, खरेदी केलेले दाखविले, विकणाऱ्याने म्हणजे सासऱ्याने दोन हजार रुपये घेतले. खरेदी करणाऱ्याच्या नावावर बँकेचे कर्ज लागले. पण या कारणासाठी कर्ज मिळत नाही. बैल न घेता मुलाला बाईल (सून) लगीन करून आणायची हा पैशाचा गैरवापर आहे. ही आमच्या डोळ्यात तुम्ही धूळफेक करीत आहात. चिंधाबाईला सांगा सोमेवारी सकाळी बँक उघडली की पूर्ण कर्ज रक्कम दोन दिवसांच्या व्याजासह भरा नाहीतर कारवाई होईल. चिंधाबाईच्या मुलाने ही सर्व हकीकत तिला सांगितली असणार. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी चिंधाबाई आली. व्याजासह कर्जाची रक्कम तिने भरून टाकली. घाबरत घाबरत मला विचारू लागली, ‘लई मानसं वायटावर असत्यात, कुन्यान फुनगी (ठिणगी) टाकली अनं तुम्हाला समदी ष्टोरी कळली?’ मी म्हटले, ‘फुनगी कशाला टाकायला पाहिजे, तुम्ही नवीन बैलजोडी बैलगाडीला बांधून घरीनेताना मीच पाहिली. बिगरबैलाची गाडी घेऊन कुणी बाजाराला येतेका? म्हणजे ज्याचे बैल त्याचीच गाडी, फक्त बैल दाखवायला आणि पावती करायला तुम्ही बाजारात आणले. पोराचं लगीन ठरवलं, खाणेकराला हुंडा दिला, बैल खाणेकराकडेच राहिले.’ मग मात्र चिंधाबाई रडायलाच लागली. मी तिच्या मुलाला म्हटले, ‘जाऊ दे. आता पैसे भरले ना? ही घ्या त्याची पावती! पुन्हा काही पीक कर्ज वगैरे लागेल तर या!’ 

माय लेक दोघेही खाली माना घालूननिघून गेले. काही दिवसांनी टोमॅटो पिकाला द्यायच्या खत खरेदीसाठी चिंधाबाई पीककर्ज मागायला आली. तिला पीक कर्ज दिले. चार महिन्यांनी तिने ते फेडले. तांबाटीच्या (टोमॅटोच्या) लागवडीतून लई फायदा झाला म्हणाली. बैलगाडीचा विषय आम्ही काढला नाही. तिने आपणहून सांगितले की तिच्या मुलाचे लग्न खाणेकरांच्या मुलीशीच झाले. पुढे वर्षा-दीड वर्षांने चिंधाबाई पन्नास हजार रुपये मुदत ठेवीत ठेवायला आली. कसले म्हणून विचारले तर एक पडीक रान विकलं त्याचे पैसे ‘शेप’ (सेफ) रहावे म्हणून बँकेत ठेवण्यासाठी आले म्हणाली. पूर्वी तिच्या होणाऱ्या व्याह्याला कर्ज काढून हुंडा द्यायची तिची ‘योजना’ आम्ही फिसकटवली. कारण ते कर्ज आमच्या नियमात बसत नव्हते पण याच लाख खातेदाराशी आम्ही ‘बँकिंग रिलेशनशिप’ कायम ठेवली. पुढे पीककर्ज घ्यायला व मुदत ठेव ठेवायला ती आमच्याकडेच आली. यात सगळे काही आले.

– 7 – 

-बँकेचे काम करताना मी जाणीवपूर्वक ठरवले होते की, वेळ असेल तर कोणत्याही सामाजिक समारंभाला जायचे. अगदी घरगुती समारंभाचे निमंत्रण आले तरी जायचे. त्यानिमित्ताने खातेदारांशी ओळखपाळख वाढते, रूढी-परंपरा कळतात. योग्य-अयोग्य रीतिरिवाज, त्यासंबंधातली निरीक्षणे आपल्याला अनुभवसमृध्द करतात. लग्न, काकड आरती, पूजा अशा कार्यक्रमांनाही आम्ही हजेरी लावत असू. लग्न आणि पाट लावणे यात फरक असतो. एकदा शंकरबुवा नावाचे खातेदार जेवणाचे निमंत्रण करायला आले. कशाबद्दल जेवण असे विचारल्यावर म्हणाले, ‘की पाट लावायच्या समारंभानंतर जेवन आहे. अवश्य या. मी विचारले, ‘कोण पाट लावत आहे?’ शंकरबुवा म्हणाले, ‘मी.’ ते ऐकून मी उडालो. शंकरबुवांचे वय चाळीस-बेचाळीस असेल. त्याची मोठी मुलगी लग्नाची म्हणजे अठरा वर्षांच्या वरची असेल. त्यावर बुवा म्हणाले, ‘मला तीन मुली आहेत. वंशाला दिवा नाही. आमचे शिर्पतबाबा म्हणून एक महाराज आहेत. त्यांच्या गावची एक वीस वर्षं वयाची विधवा मुलगी आहे. गरीब घरातली आहे. लग्नाला पैसे नाहीत म्हणून तिचे आईबाप माझ्याशी तिचा पाट लावायला तयार झाले. शंकरबुवांनी पहिल्या बायको कडून ष्ट्यांपावर (स्टॅपवर) ना हरकत लिहून घेतली. शंकरबुवा म्हणाले, ‘बँकेच्या कर्जामुळे आमचे बरे चालले आहे. त्यामुळे विचार केला की, आपण पाट लावण्याचा वेळी बँकेच्या स्टाफला बोलावलेचं पाहिजे.’ त्यांच्या अगत्याला मान देऊन आम्ही गेलो. जेवणही झाले. 

पुढे वर्षभराने शंकरबुवा पेढे द्यायला आले. मुलगा झाला. मी त्यांचे अभिनंदन केले. शिर्पतबाबांच्या गावच्या मुलीने पहिल्याचं खेपेला मुलाला जन्म दिला असे वाटले. यावर शंकरबुवांनी खुलासा केला की पहिल्या लग्नाच्या बायकोला हा मुलगा झाला आहे. आता पाट लावलेल्या बायकोलाही दिवस आहेत. पाहू या काय होते ते. ‘मुलगा म्हणजे वंशाचा दिवा’ ही कल्पना समाजात किती प्रबळ आहे आणि त्यासाठी माणसे काय काय करतात हे आमच्या प्रगतिशील खातेदाराने असा ‘दिवा लावलेला’ पाहून आम्ही चकित झालो.

– 8 –

बँक पुरस्कृत सोसायटीवर पूर्णवेळ मुख्य अधिकारी म्हणून मी पाच वर्षे होतो. 1976 ते 1981 या कालावधीत मी त्या सोसायटीच्या कार्यालया शेजारील ‘पवना डॅ इरिगेशन कॉलनी’च्या ब्लॉकमध्ये राहत असे. (1981 ते 1984 मधे, त्यानंतर ज्या शाखेार्फत या सोसायटीला कर्जपुरवठा होत होता त्या काम शेत शाखेच्या शाखाप्रबंधक पदावर माझी नियुक्ती झाली.) सोसायटीचे कार्यालय ज्या गावात होते ते काले कॉलनी हे गाव काम शेतशाखेपासून पंधरा किलोमीटर अंतरावर होते. बँकेने कर्जाऊ दिलेली मोटारसायकल मी रोजच्या कामासाठी वापरत असे पण मोटारसायकल बिघडली तर एस्‌टीने ये-जा करावी लागायची. सोसायटीच्या गावात एक एसटी रात्री मुक्कामाला यायची व दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता परत जायची. याशिवाय दिवसभरात एसटीच्या आणखी फक्त दोन फेऱ्या व्हायच्या. 

भरदुपारी बारावाजता एसटीचा डबा खचाखच भरून दरवाजा धडाम्‌कन बंद करून ड्रायव्हर व कंडक्टर अर्धाअर्धा तास वडा आणि चहापानासाठी जायचे त्यावेळी डब्यातल्या पॅशिंजरांची डोकी एसटीचे छप्पर तापल्यामुळे किती तापायची हे मी स्वत: अनुभवले आहे. पावसाळ्यात छप्पर गळणाऱ्या एसटीत छत्री डोक्यावर धरून प्रवासकरणे हाही एक अवर्णनीय अनुभव होता. कामशेत शाखेचा ब्रँच मॅनेजर म्हणून माझी नेणूक झाली ती रेल्वे स्टेशनवर हायवेला लागून होती. मला राहण्यासाठी शाखेच्या वरतीच ब्लॉक होता. या शाखेचे ऑफिसर व क्लार्क/शिपाई पुण्याहून जाऊन येऊन करीत. मला मात्र कामाच्या ठिकाणी राहणेच योग्य वाटायचे. बँकेच्या कामाला एक पध्दत (सिस्टि) असते ही पध्दत सांभाळून विकासाचे काम करायचे म्हणजे अधिक मेहनतीचे काम होते. सर्वसाधारणपणे शाखा व्यवस्थापक ग्रामीण विकास वगैरे करायच्या कामात पुढाकार घेत नसत. आपणहून आलेल्या ग्राहकांशी गोड बोलणे, मिळेल तो व्यवसाय करणे यात ते समाधान मानीत. पण मला बँकेने दिलेली व्यवसाय व नफ्याची उद्दिष्टे या पलीकडे अधिक काही करायचे होते. त्यासाठी माझी ही धडपड होती. बँकेच्या कर्जपुरवठ्याच्या माध्यमातून खातेदारांचा विकास होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायचे, लोकांपर्यंत आपणहून जायचे, त्यांच्या बैठका घ्यायच्या, विस्तार कार्यात सरकारी अधिकाऱ्यांची मदत घ्यायची आणि लोकांपर्यंत योजना पोहोचवायच्या यात मलारस होता. 

आता शाखा व्यवस्थापक म्हणून शेतकऱ्यांबरोबर दुकानदार, लहान उद्योजक यांची कामेही मी करू लागलो. सोसायटीच्या कार्यक्षेत्रात आयआरडीपी योजना राबवली तशीबँक शाखेच्या कार्यक्षेत्रातील गावांध्ये ही योजना लागू होती. या योजनेअंतर्गत येथील शेतकऱ्यांना म्हैशी व गायी कर्जाऊ दिल्या. त्याच्या वसुलीसाठी एक दूधसंकलन सोसायटी काढली. त्याचा उद्देश दूध विक्रीतून कर्जवसुली करणे हा होता. आमचे एक खातेदार महिपतराव त्याचे अध्यक्ष झाले. कामशेतपासून 25 किलोमीटर अंतरावरील एका शासकीय दूध संकलन केंद्राला या सोसायटीने दूध पाठवायला त्यांनी सुरुवात केली. दुधात पाणी घातल्याशिवाय किंवा म्हैशीच्या दुधात गायीचे दूध मिक्स केल्याशिवाय शेतकरी सहसा दूध देत नसत. त्यांचे म्हणणे असे की, तसे केले नाही तर तोटा होईल. मला काळजी वाटू लागली ती अशी की, शासकीय दूध संकलन केंद्राचे अधिकारी त्यांचे दूध नाकारतील. कदाचित दूध ताब्यात घेतील पण भाव कमी देतील पण महिपतराव सर्व खातेदारांचा पहिल्या पंधरवड्याचा पूर्ण पगार घेऊन आला. (दुधाच्या पेमेंटला पगार म्हणत असत.) त्याने आणलेला चेक सोसायटीच्या खात्यात भरून घेताना मी त्याला विचारले ‘की हे कसे काय बेस्ट पेमेंट निघाले? भाव तर बरोबर दिला आणि पगार वेळेवर दिला.’ महिपतराव मला म्हणाले, ‘साहेब तुम्ही शासकीय डेअरीवर आला नाहीत ते चांगले केले. तिथल्या अधिकाऱ्याला आम्ही रोख-कॅश देऊन म्यानेज केले.’ लदुधावरची साय काढून घेऊन त्याऐवजी त्यात थोडे डालडा मिक्स करणे, लॅक्टोमीटरबरोबर लागावा म्हणून पाणी घालून वाढलेल्या दुधात साखर किंवा युरिया मिक्स करणे, म्हैशीच्या दुधात गायीचे दूध घालून त्याला म्हैशीच्या दुधाचा ( त्यावेळी असणारा जास्त ) भाव घेणे या गोष्टी केल्या जात असत. त्यामुळे शासकीय डेअरीवर ‘ॲसिड टेस्ट’ (साखरेची भेसळ ओळखणे ), हंसा परीक्षा ( म्हैशीच्या दुधात गाईचे दूध भेसळ असेल तर ते ओळखणे ) अशा टेस्ट केल्या जातात व भेसळीचे दूध नाकारले जाऊ शकते. पण तिथे नेलेले दूध कोणतीही टेस्ट न लावता किंवा ‘रोख-कॅश टेस्ट’ने स्वीकारले जाऊ शकते ही माझ्या ज्ञानात भर होती.

–  9 –

आमचे काम जे मुख्यत: कर्जपुरवठा करण्याचे होते ते इमानेइतबारे चालू ठेवले. गाई-म्हैशीच्या बाजारावर पशुवैद्यक अधिकाऱ्याला घेऊन जाणे, दुभती जनावरे तपासून घेऊन त्यांचा विमा उतरवून त्या शेतकऱ्याच्या ताब्यात देणे व विक्री करणाऱ्याला जागेवरच पैसे देऊन ते कर्ज रूपाने शेतकऱ्यांच्या नावावर चढविणे व नंतर त्याची योग्य वेळी वसुली करणे हे आमचे काम होते. या गायी म्हैशींचा विमा (स्थानिक उच्चाराप्रमाणे इमा) उतरविणे हे दूध व्यावसायिकांना नवीन होते. मात्र बँकेच्या नियमानुसार विमा उतरविणे सक्तीचे होते, आवश्यक तर होतेच होते. चार हजाराच्या म्हैशीला विम्याचे एकशे साठ रुपये संबंधितांच्या कर्ज खात्याला आम्ही नावे टाकीत होतो. या एकशे साठ रुपयांबद्दल एका शेतकऱ्याने विचारले की हे कशापायी आमच्या डोक्यावर टाकले. मी सांगितले की विमा उतरविल्याबद्दल. तो विचारतो, ‘कुठे उतरवला इमा?’ मी त्याला समजावू लागलो, ‘म्हैशी-गायींच्या बाजारावर पशुवैद्यक डॉक्टरने जनावरे तपासून प्रत्येक गाई-म्हैशीच्या कानाला बिल्ला लावतो तेव्हापासून विम्याचे संरक्षण सुरू होते.’ त्यावर तो लगेच विचारतो, ‘त्या प्लास्टिकच्या बाळीला (बिल्ल्याला) एकशेसाठ रुपये होय?’ मी म्हटले, ‘अहो, तसे नाही, ती म्हैस मेली तर त्याची भरपाई...’ त्यावर तो मोठ्या आवाजात म्हणतो, ‘माझी म्हैस मरेलच कशी? आम्ही कुनबी जित्राबावर (जनावरावर) पोरावानी प्रेम करतो.’ मी म्हटले, ‘रामराव, संकट काही सांगून येत नाही. अपघात झाला, साप चावला, ताप आला, आजार झाला, उपचार मिळाले नाहीत, उपचार मिळूनही जनावर दगावले तर दावा सादर केल्यानंतर तो मंजूर झाल्यावर विम्याचे पैसे मिळतात.’ पण तरी काही त्याचे समाधान झाले नाही. तो म्हणतो, ‘आपून ज्या जित्राबाची पोरावाणी काळजी घेणार ते मरेलच कसे आणि त्याचा इमा पाहिजे कशाला आणि हे एकशे साठ रुपये कशापायी?’ यावर आम्ही एका चालून आलेल्या संधीचा लोक-शिक्षणासाठी उपयोग करून घेतला. अशीच एक म्हैस अचानक मेली. भिवा अर्जुना नावाचा खातेदार जवळजवळ रडतच आला. अशी अचानक म्हैस मेली कशी? मी म्हटले ‘हार्ट ॲटॅक आला असेल.’ तो म्हणतो ‘म्हस पान्यावर नेऊन आणली तवर वानकी (चांगली) होती आणि गोठ्यात येऊन बसली ती उठलीच नाही हे कसं?’ आम्ही पशुवैद्यक डॉक्टरला बोलावले. त्याने म्हैस हृदयविकाराने मेल्याचे जाहीर केले. पंचनामा केला. फोटो काढला. विमा कंपनीचे फॉर्म भरून दिले. त्यावर खातेदार भिवा अर्जुनाची सही घेतली. आम्ही शिफारस केली की विम्याच्या पूर्ण रक्कमेचा दावा मंजूर व्हावा. विमा कंपनीचे अधिकारी म्हणाले की दावा मंजुरीला एक आठवडा लागेल. त्यानंतर बँकेच्या नावाने चेक मिळेल. ज्याची म्हैस मेली तो भिवा अर्जुना हा खातेदार दूध सोसायटी अध्यक्ष महिपतरावाचा गाववाला होता. महिपतरावालामी म्हटले की फक्त तुच्या गावचे नाही तर पंचक्रोशीतल्या सर्व गावांतले खातेदार बोलवा. त्यांच्या सभेत आपण विमा कंपनीचा दावा मंजूर झाल्याचे जाहीर करू व नवीन कर्जवितरण करून नवीन म्हैस घेणार असल्याचे जाहीर करू. महिपतरावाने चक्क हँडल (हँडबिले) वाटली. पाचशे माणसांची सभा झाली. मी व माझे सहकारी, विमा कंपनीचे अधिकारी, तालुक्याचे सभापती व बीडीओ अशा सर्वांची भाषणे झाली. 

प्रारंभी महिपतरावांनी सर्वांचे स्वागत केले व माझे कौतुक करून मला भाषण करायला सांगितले. मी म्हटले, ‘भिवा अर्जुनाची म्हैस मरण पावली, अचानक गेली. त्याला आज दहा दिवस झाले. पण या दहाव्याला त्या म्हैशीचा जणू पुनर्जन्म झाला. हा पहा विमा कंपनीचा चार हजाराचा चेक. यातून नवीन म्हैस घेणार म्हणजे जणू काही पुनर्जन्म. चार हजाराचा चेक पाहून पाचशे लोक आश्चर्यचकित झाले. पुन्हा कोणी ‘इम्याच्या एकशे साठ रुपयांच्या ओझ्याबद्दल’ विचारले नाही. अशा प्रकारे बँकिंग सेवा नसलेल्या (अनबँकड्‌) क्षेत्रात अपारंपरिक विमा (नॉनट्रॅडिशनल इन्शुरन्स) या विम्याचा प्रसार आम्ही केला. नव्या युगाच्या सोयी नाममात्र किमतीत अविकसित भागात नेल्या पाहिजेत या ‘टन’भर थिअरीला आमच्या बँकेच्या कार्यक्षेत्रात ‘ग्रॅ’भर प्रॅक्टिकल करून दाखवण्याची एकही संधी आम्ही सोडत नव्हतो. या भागात 1981 ते 1984 ही साडेतीन वर्षे सेवा झाल्यानंतर माझी बदली रत्नागिरीला करण्याची बँकेची ऑफिस ऑर्डर आली. (त्याप्रमाणे मी तिकडे गेलो.) हे येथील खातेदारांना आवडले नाही. बदली होण्यापूर्वी ते हेड ऑफिसला जनरल मॅनेजर साहेबांना भेटायला गेले. महिपतराव जीएम साहेबांना म्हणाले ‘आता तर कुठे विकासाला सुरुवात झाली आहे आणि तुम्ही जोशी साहेबांची बदली केली हे बरे नाही. असे चांगले अधिकारी गेले तर आम्ही कुणाकडे आशेने पहायचे?’ जीएम साहेब त्यांना म्हणाले, ‘आमच्या बँकेचा प्रत्येक अधिकारी चांगला आहे. जोशीला काय सोनं लागलं आहेका? तुम्ही परत जाऊ शकता.’ महिपतराव व त्यांचे साथीदार ‘तोंडात मारल्यागत’ वाटून परत आले. असो. या भागात शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांशीही संबंध आला. त्यांचे बरेच किस्से आहेत, पण आणखी एक गोष्ट म्हणजे येथील एक डॉक्टर श्री. वामन सहस्रबुध्दे यांनी आम्हाला खूप मदत केली. स्थानिक लोकांच्या गुण व अवगुणांबद्दल माहिती दिलीच पण व्यक्तिश: मला दुखले, खुपले तेव्हा काळजी घेतली. चांगले काम करणाऱ्या माझ्यासारख्या बाहेरून आलेल्या अधिकाऱ्यांना नि:स्वार्थपणे मदत करणे हा त्यांचा स्वभाव होता. पेशंटागे दोन रुपये फी घेऊन ते मेडिकल प्रॅक्टिस करायचे. ही एक प्रकारे समाजसेवाच होती. त्यांना तालुक्याच्या राजकारणाची माहिती होती. ते स्वत: राजकारणापासून अलिप्त होते पण त्यांच्या माहितीचा आम्हांला खूप उपयोग होत असे. अलीकडेच हे डॉक्टरवारले.

– 10 –

‘इम्याचा क्ले भेटल्यामुळे’ कार्यक्षेत्रात आमच्या कामाची ‘लई पब्लिशिटी’ झाली. एक दिवेकर आडनावाचा शेतकरी होता. तो दुधाचा जोड धंदा करीत असे. ‘या भागातले तेली समाजाचे दिवेकर आम्हीच.’ अशी त्याने स्वत:ची ओळख करून दिली. शहरात जातीचा उल्लेख न करणे हे उपचाराला धरून (मॅनरफुल) मानले जाते. पण खेड्यात ‘हा आपल्यापैकी (मराठा)’, ‘तोतेली’, ‘हा धोबी’ अशी बिनधास्तपणे जात सांगतात. फक्त अलीकडे मागासवर्गीयांच्या जातीचे नाव घेणे चारचौघात टाळतात कारण त्या जातींचा म्हणींमध्येसुध्दा उल्लेख करणे गुन्हा आहे. एकदा एक खातेदार नवीन माणसाला घेऊन आला व बँकेत त्याचे खाते उघडण्याची विनंती करू लागला. मी त्याचे नाव विचारले, तो म्हणाला बारकू कृष्णा आढाव. यावर तो जुना खातेदार म्हणतो, ‘साहेब, हा आढाव न्हाव्याचा आहे, पण बरा आहे.. (?)’ या धर्तीवर दिवेकर तेल्याचा होता, पण बरा होता, प्रगतिशील होता. खेड्यात जातीवरून म्हणीही खूप असतात (बामनाला लिवनं, कुनब्याला दानं आणि... ला गानं.) माझ्यासारख्याला जातींचा उल्लेख पटत नव्हता, परंतु ही पूर्वीच्या बलुतेदारी पध्दतीतून आलेली परंपरा असेल. असा हा दिवेकर दुधाचा जोडधंदा करीत असे. आम्ही विम्याच्या कामाची पब्लिशिटी केल्यानंतर एकदा तो मला त्याच्या घरी त्याचा गोठा दाखवायला घेऊन गेला. तिथे आम्ही (बँकेने) कर्जपुरवठा केलेल्या म्हैशी त्याने दाखवल्या. त्यांच्या बाजूला बांधलेल्या त्याच्या तीन म्हैशी होत्या. ‘साहेब, यादोन तुमच्या म्हैशी आणि या तीन माझ्या प्रायव्हेट.’ मी विचारले, ‘दोन पब्लिक आणि तीन प्रायव्हेट?’ त्याच्या खोच लक्षात आली. तो म्हणाला ‘कर्ज फेडून व्हायचं आहे म्हणून तुमच्या (बँकेच्या) म्हटले.’ पुढे त्याचा प्रश्न होता की माझ्या प्रायव्हेट म्हैशींचा विमा उतरवता येईल का? मी सांगितले, पशुवैद्यक डॅाक्टरकडून म्हैशी तपासून घेऊन विम्याचा हप्ता भरा, मग विमा संरक्षण सुरू होईल. आवश्यक ते कागदपत्र (फॉर्म) भरायचे. दिवेकरला आनंद झाला. कारण त्याला ‘इमा भेटणार’ होता. त्याने खुशीत मला चहा पाजला, घर दाखवले. चहा पितापिता आपण माळकरी कसे आहोत, न्यानेशोरी (ज्ञानेश्वरी) वाचतो, पोरानलाबी वळण लावले आहे असे स्वत:बद्दल अभिमानाने सांगत होता. ज्ञानेश्वरीबद्दल मी त्याला अधिक विचारू लागलो. त्याची त्याने समर्पक उत्तरे दिली आणि वर असेही सांगितले की ‘न्यानेशोरी वाचाया बसलो अन्‌ इचू(विंचू) चावला तरी वाचन पुरे होई पावतो थांबनार न्हाई.’ मी म्हटले, कमाल आहे? एवढी एकाग्रता. म्हणजे तुम्ही खरंच देवभक्त आहात. पण पुढे त्याला एक प्रश्न विचारला, ‘तुम्ही दुधाचा धंदा करता; दुधात पाणी किती घालता?’ दिवेकर गडबडला नाही. तो म्हणाला ‘कमी सरस पानी घालायाच पायजे, कारण लबाडीशिवाय प्रपंच न्हाई. प्रपंच नेटका करावा आणि वेळात वेळ काढून देवभक्तीबी करावी.’ हे तो बोलत असताना माझे लक्ष त्याच्या घरातल्या दोन शिवणयंत्रांकडे गेले. मी म्हटले ‘वा, दोन शिवणयंत्रे दिसतात?’ तो म्हणाला ‘एक विधवांच्या कीममधे (स्कीममध्ये) भेटलं आणि एक निराधार कीममधे भेटलं.’ मी विचारले ‘विधवांच्या स्कीममध्ये कोण? आणि निराधारच्या स्किममध्ये कोण?’ ‘एक भईन इधवा झाली तिला सासरच्यांनी म्हायेरी म्हंजे माझ्याकडे परत धाडून दिले, तिला इधवा पुनरवसन योजनेत बसवलं आणि निराधारमधे माझ्या अठरा वर्षांच्या पोराला बसवलं.’ मी विचारलं, ‘तुमचा मुलगा मग निराधार कसा?’ दिवेकर म्हणतात ‘आमदाराशी भांडून त्याला निराधारमधे बसवून घेतला. इलेक्षनच्या टायमाला आमदार आमच्या मागोमाग फिरू लागतो, तो निवडून आल्यावर आम्ही त्याच्या मागोमाग फिरतो. आली कीम की घेतली लावून. मी आमदाराला म्हटले, हा अर्जपाहून बीडीओला चिट्ठी लिहून दे.’ आमदार म्हणतो, तुझा सख्खा मुलगा निराधार कसा? यावर मी त्याला झापले. ‘निवडणुकीसाठी आम्ही तुझ्यामागे फिरलो, तुला मतं भेटली. आता आम्हांला एखादं शिलाई मशीन भेटावं म्हणलं तर आम्हांला प्रश्न इचारतोस? ताबडतोब बीडीओला शिफारस लिहून दे.’ असा झापला त्याला. मग आला लाईनीवर आणि त्याची चिट्ठी पाहून बीडीओ साहेबांनीपण आपल्याला कीममधे बसवून घेतले. त्यामुळे हे इधवा भयनीचे मशीन आणि हे माझ्या मुलाचे अशा दोन मशिनी आहेत. मुलाला संजीव गांधी निराधार योजनेत बसवला. दिवेकरांची ही कर्तबगारी पाहून मी थक्क झालो. विंचू चावला तरी ज्ञानेश्वरी न सोडणे, लबाडीशिवाय प्रपंच नाही या उक्तीप्रमाणे दुधात पाणी घालणे व स्वत:च्या मुलाला ‘निराधार’मध्ये बसविणे हे बऱ्याच गरीब बापड्या गावकऱ्यांना जमणार नाही, पण तैल बुध्दिच्या दिवेकराला मात्र जमले. दिवेकराशी मूल्यांबाबत वाद घालणे मला त्या वेळी प्रशस्त वाटले नाही. त्याच्या तीन प्रायव्हेट म्हैशींचा विमा करण्याबाबत त्याला मार्गदर्शन केले व मी निघालो.

– 11 – 

महिपतरावांच्या गावातील गावकऱ्यांना एका पावसाळ्याच्या सुरुवातीला मी सुबाभळीची लागवड करण्याच्या योजनेची माहिती दिली. रोपे पुण्याला शेतकरी कॉलेजमध्ये मोफत वाटली जात होती. महिपतरावांनी तिकडून येणारा इरिगेशनचा एक ट्रक पकडला व रोपेगावात आणली. एक कार्यक्रम घेऊन ती वाटली. पुण्याच्या पेपरात व आकाशवाणीवर आम्ही बातमीसुध्दा दिली. लोकांचा बँकेवरचा विेशास वाढला. एकदा महिपतरावांच्या गावातील दहा-बारा जणांच्या सामाईक मालकीचा एक पोटखराब जमिनीचा तुकडा (शेती लागवड नसलेले एक माळरान) एका फलोद्यान करू इच्छिणाऱ्या बाहेरच्या माणसाला विकायचे ठरवले, पण त्याच्या वकिलाने पाठविलेला खरेदीखताचा कागद गावकऱ्यांनी मला गावात बोलावून वाचायला दिला व ‘साहेब तुम्ही हा कागद बरोबर आहे असे म्हणालात तर आम्ही सह्या करू.’ असे सांगितले. गावकरी, खरेदीदार, त्याचा वकील व मी अशी बैठक झाली. मी ‘ओके’ म्हटल्यावर सर्वांनी सह्या केल्या. खरेदीदार आश्चर्यचकित झाला. राष्ट्रीयीकृत बँकेच्या मॅनेजरच्या शब्दाला एवढे वजन? पुढे या व्यवहारामुळे आमच्या बँकेला डिपॉझिटही भरपूर मिळाले. (बँकेची सोसायटी व शाखा या दोन्ही ठिकाणी काम करण्याच्या कालावधीत त्या तालुक्यातील अनेक गावांमध्ये मी प्रत्यक्ष जाऊन आलो. खातेदार वेळोवेळी कामाच्या निमित्ताने भेटत राहिले. त्यांची कामे करण्याच्या निमित्ताने बँकेची सिस्टिम त्यांच्यासाठी चांगल्याप्रकारे कार्यान्वित केली. शिवाय सहकार, महसूल, कायदा, सुव्यवस्था राबवणारे पोलिस व कोर्ट, कृषि व कृषि विस्तार यांसारखी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून चालणारी खाती, त्याचे नियम, ते राबविणारे अधिकारी व कर्मचारी मंडळी आणि या सर्वांवर तथाकथित नियंत्रण ठेवणारी पुढारी मंडळीही सर्व जवळून पाहायला मिळाली. बऱ्याच गोष्टी कळत नकळत शिकता आल्या. चांगली, वाईट, प्रामाणिक, भ्रष्ट अशी अनेक माणसे जवळून बघितली.)

– 12 – 

महसूल खात्यात सर्वसाधारणपणे पैसे खाणारा तृणमूल (ग्रासरूट) पातळीवरचा कर्मचारी म्हणजे तलाठी. सात, सात अ, बारा या रेव्हेन्यू रेकॉर्डप्रमाणे दिला जाणारा उतारा म्हणजे सातबारा उतारा. त्याच्यावर नोंदी करायचे काम तलाठ्याचे. त्यात काही फेरफार करायचे असतील तर पेन्सिल नोंद करायचे काम त्याचे. ही नोंद शाईची (कायम) करायचे काम सर्कल इनस्पेक्टर (सर्कल) चे. अशा एका सर्कलबद्दल काही गावकऱ्यांनी तो ‘लईच पैसे मागतो’ म्हणून तहसीलदाराकडे तक्रार करायचे ठरवले. गावातले ‘समदे गुंड गुंड’ (गुंड म्हणजे कार्यकर्ते) तालुक्याला गेले. रावसाहेबाच्या (तहसीलदाराच्या) पिंजऱ्यातच (केबिनमधे) शिरले. रावसाहेबाच्या माहितीच्या एका पुढाऱ्याला पुढे घातले म्हणून रावसाहेबांनी त्यांचे गाऱ्हाणे ऐकले. ‘तुमच्या सर्कलने चिरीमिरी घेतली तर आमची काय बी कंप्लीट न्हाय, पन एक पेन्शिलवेंट्रीकायम करायला इतके पैसे मागायचे? काय मोगलाई लावली हाये, साहेब तुम्ही वाईचसं लक्ष घाला.’ असे सर्वांनी गलका करून सांगितले. त्यावर रावसाहेबांनी सर्वांना शांत व्हायला सांगितले. आपण याबाबतीत लक्ष घालू म्हणाले. पण सर्व महसूल विभागाला दोष देऊ नका असं सांगताना त्यांनी विचारले, ‘हाताची पाचही बोटं काय सारखी असतात का?’ यावर सर्व गावकरी पाहात राहिले. पण त्या गटातले एक पाटील म्हणाले, ‘रावसाहेब, हाताची पाची बोटे सारखी नसतात हे बरोबर, पण खाताना ती एक होतात हेबी बरोबर हाये की न्हाई?’ हे ऐकून रावसाहेब अवाक्‌ झाले. सरकारी खात्यात खाताना हाताची पाचही बोटे एक होतात हा व्यवहार चातुर्याचा शेरा मारून पाटलांनी सर्वांना विचार करायाला लावले. पुढे त्या सर्कल इन्स्पेक्टरची दुसऱ्या सर्कलमध्ये बदली झाली व प्रश्न तात्पुरता मिटला असे कळले.

– 13 – 

एकदा तालुक्यातील सर्व बँकांच्या शाखा प्रबंधकांची आयआरडीपी संबंधी बैठक तालुक्याच्या ठिकाणी एके दिवशी दुपारी दोन वाजता आयोजित केल्याचे बीडीओचे पत्र आले. पंचायत समितीचे सभापती, बीडीओ, आयआरडीपीचे काम पाहणारे जिल्हा परिषद/पंचायत समितीचे ऑफिसर व सर्व मॅनेजर्सअशी बैठक होणार व त्यात कामाचा आढावा घेणार असा अजेंडा होता. मी दोन वाजता पोचलो, पण मीटिंग दोनऐवजी तीन वाजता असल्याचे सुधारित सूचनापत्र मला मिळाले नव्हते. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणाहून शाखेच्या गावी परत जाण्याऐवजी तिथेच पंचायत समिती हॉलमध्ये थांबण्याचे ठरविले. त्याच ठिकाणी दीड वाजेपर्यंत पूर्ण तालुक्यातील सरपंचांची आमसभा झाली होती. त्याच्या अध्यक्षस्थानी सभापती श्री. रंगनाथराव होते. तेसुध्दा आयआरडीपीच्या मीटिंगसाठी तिथेच थांबून राहिले होते. दरम्यान काही सरपंच रंगनाथरावांशी गप्पा मारण्यासाठी तिथे बसून होते. मला पाहताच सर्वांनी ‘राम राम! बसा बसा!’ असे हसत मुखांनी उद्गार काढले व आम्ही सर्वजण बोलत बसलो. ‘काही म्हणा सभापती साहेब, जोशी साहेबाचे काम लई भारी, त्यांनी गोरगरिबांची लई कामं केली, समदे त्यांच्यावर खूश हायत.’ असे एक सरपंच बोलला. ‘ज्याचे काम नियमात बसते त्याला जोशीसाहेबाने कवा माघारी पाठवला असं झालंच नाही.’ दुसरा सरपंच म्हणाला. ‘आज बाकीच्या ब्यांका बघा आणि महाराष्ट्र ब्यांक बघा. महाराष्ट्र ब्यांक आणि जोशीसाहेबांचं गरिबावर लई ध्यान.’ तिसरा सरपंच बोलला. रंगनाथराव सभापती महोदय थोडे त्रासले. डोक्यावरची टोपी काढली. डोके खाजवले. टोपी नीट घडी करून पुन्हा डोक्यावर घातली. आणि म्हणाले, ‘जोशी साहेबांनी कर्ज दिले ते काय त्यांच्या खिशातून दिले काय?’ यावर एक सरपंच म्हणाला, ‘पण दिले ना? यापूर्वी किती बँकांनी किती कर्ज दिलं?’ रंगनाथरावांचा पुढचा प्रश्न ‘म्हणजे महाराष्ट्र बँकेनेच कर्ज दिले ना? मुद्दा लक्षात घ्या हे महाराष्ट्र बँकेचे पैसे आहेत.’ यावर दुसरा सरपंच म्हणाला, ‘महाराष्ट्र बँकेने कर्ज पुरवठा करायला काढला त्याची अंलबजावणी जोशी साहेबांनी चांगली केली.’ तरीही रंगनाथरावांनी आपला मुद्दा पुढे रेटला 

‘इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले, त्यामुळे महाराष्ट्र बँकेला खेडेगावात कर्जपुरवठा करणे भाग पडले. नाहीतर या बँका मुंबई-पुण्याच्या बाहेर कधी कर्ज देत होत्या का?’ त्यावर एक सरपंच म्हणाले, ‘इंदिरा गांधींनी राष्ट्रीयीकरण केले पण पुढे महाराष्ट्र बँकेचा कर्ज पुरवठा व्यवस्थित चालला आहे ना? इतर बँकांनी काय केले?’ रंगनाथरावपुढे म्हणाले, ‘महाराष्ट्र बँकेने कृषी क्षेत्रासाठी कर्जपुरवठा केला, त्याबद्दल नाबाद बँकेकडून पुनर्वित्त भेटते.’ नाबार्डला त्यांनी ‘नाबाद’ म्हटले. (बाद न होता कर्जाचे पुनर्वित्त म्हणून नाबाद). मी रंगनाथरावांना म्हटले, ‘वा! सभापतीसाहेब, तुम्हाला चांगली माहिती आहे. बँकींगप्रणाली कशी चालते तुम्हाला ठाऊक आहे.’ त्यावर रंगनाथराव म्हणाले, ‘जोशी साहेब, मी तुमच्या विरोधी बोलत नाही, पण या सरपंचांना पैसा कसा येतो हे कळले पाहिजे, काय बरोबर कीनाही?’ आणि जोरात हसले. मी म्हटले, ‘बरोबर आहे. लोकांना ही सिस्टिम कळली पाहिजे. अशी चर्चा झालीच पाहिजे.’ एका सरपंचाने विचारले, ‘सभापतीसाहेब ही नाबाद बँक कुठे असते? कर्ज वाटायला इतका पैसा तिच्याकडे कुठून येतो?’ मी खुलासा केला की नाबार्ड बँक आहे. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँन्ड रूरल डेव्हलपमेंट म्हणजे शेती व ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक. ही पुनर्वित्त देते सभापती साहेब म्हणाले, ‘जोशीसाहेब तुमचे म्हणणे परफेक्ट आहे. आमच्या दिल्लीच्या स्टडी टूरमध्ये आम्हाला पुनर्वित्त म्हणजे काय ते सांगितले. महाराष्ट्र बँकेने कर्ज मंजूर करून वाटप करायचे. त्याचा प्रस्ताव बँक पातळीवर तयार करून नाबादला पाठवायचा, त्याप्रमाणे नाबाद बँक महाराष्ट्र बँकेला पुनर्वित्त देते. पण नाबाद बँकेला पुनर्वित्त ‘वडबँक’ देते हे शेतकऱ्यांना माहीत आहे का?’ एका सरपंचाने विचारले, ‘सभापतीसाहेब ही वड बँक काय असते?’ सभापती म्हणतात, ‘लई मोठी बँक, दुनियाभर प्रत्येक देशात त्यांचे हापिस असते आणि अमेरिकेत हेडहापीस आहे. काय जोशीसाहेब, बरोबर की नाही.’ मी म्हटले, ‘सभापती साहेब तुमच्या स्टडी टूर मधे वर्ल्ड बँक व नाबार्डची फारच चांगली माहिती दिलेली दिसते.’ यावर सभापती साहेबांच्या चेहऱ्यावर असे हास्य झळकले की वड बँकेतून (जणूकाही वडाच्या पारंब्यातून) नाबाद बँकेच्या खजिन्यात पैसे आले ते इंदिरा गांधींनी महाराष्ट्र बँके मार्फत लोकांना वाटले, हे सर्व आमच्या पक्षामुळेच झालेले आहे- असे त्यांनी त्या हास्यातून सांगितले. तरीही शेवटी एक सरपंच बोलले, ‘सभापती साहेब, ते कायबी असो, वड बँक असो, नाबाड असो, महाराष्ट्र बँक असो, जोशी साहेबांनी लोकांची कामे केली ही ट्रू फॅक्ट आहे.’ यावर रंगनाथराव माझ्याकडे पाहत म्हणाले, ‘महाराष्ट्र बँक तुम्हाला पगार देते ते हे काम करण्यासाठीच की नाही? वाईट वाटून घेऊ नका, पण मी म्हणतो ते खरे की नाही.’ यावर मी म्हटले, ‘सभापती साहेब तुम्ही शंभर टक्के बरोबर बोलतात. पण केवळ नोकरी करून पगार घेणारे अनेक असतात. आपण लोकांची कामे करून योजनांना अर्थ दिला पाहिजे, काटेकोरपणे अंलबजावणी केली पाहिजे या भावनेने मी सर्वांच्या सहकार्याने काम करतो. इंदिरा गांधींच्या मनात गोरगरिबांचे कल्याण करण्याचे विचार कितीही असले तरी जागेवर उभे राहून आम्ही आयआरडीपीसारख्या योजनारा बवायच्या आहेत आणि त्याच्या लाभार्थीचे लोकशिक्षण करावयाचे काम आपल्यासारख्यांनी करायचे आहे.’ यावर सभापती साहेबांनी काही प्रतिक्रिया दिली नाही. पण ते ऐकून ‘लई भारी’ असे दोन तीन सरपंच उद्गारले. आणि आमची अनौपचारिक बैठक समाप्त होऊन तीन वाजता होणाऱ्या आयआरडीपीच्या औपचारिक बैठकीसाठी आम्ही तयार झालो.

– 14 –

वर लिहिल्याप्रमाणे शाखेार्फत दुकानदार, व्यापारी, छोटेछोटे उद्योग वगैरेंनाही आम्ही बँकिंग सेवा देत असू. मी नव्याने कामशेत शाखेचा शाखाप्रबंधक म्हणून रुजू झालो तेव्हा एक खातेदार माझ्या केबिनमध्ये आला. त्याने विचारले, ‘झाले का सुरू?’ मी म्हटले, ‘नाही.’ पुन्हा दोन तीन दिवसांनी आला, ‘झाले का सुरू?’ मी म्हटले, ‘अद्याप नाही.’ माझ्या लक्षात आले की तो कर्ज वितरणाबाबत विचारतो आहे. मी येण्यापूर्वी शाखेत असलेल्या एका कर्मचाऱ्याला विचारले, हा खातेदार हे असे वारंवार का विचारतो आहे. त्यावर तो कर्मचारी म्हणाला, ‘तुमच्या आधीच्या साहेबांकडे कर्जप्रकरण करण्यासाठी हा खातेदार येत असे. दरवेळी त्याला साहेब सांगत ‘सध्या बंद आहे.’ तो थोड्या दिवसांनी पुन्हा यायचा ‘कर्ज वितरण झाले का सुरू’ असे विचारायचा. साहेब म्हणायचे सध्या बंद आहे. कारण शक्यतो नवीन कर्ज पुरवठा करायचा नाही असे त्यांचे धोरण असावे. पुढच्या वेळेला तो खातेदार आला. त्याने विचारले, ‘झाले का सुरू?’ मी म्हटले, ‘हो झाले सुरू.’ त्याला बंद नळाला पाणी आल्यावर जसा आनंद होईल तसा झाला. मी त्याचे किराणा माल दुकानाच्या कॅशोडीटचे प्रकरण मंजूर केले. त्याला आश्चर्य आणि आनंद झाल्याचे दिसले. कारण मॅनेजर ‘बंद आहे’ अशासाठी सांगायचा की उद्या थकबाकी झाली तर आपल्याला कोणी प्रश्न विचारायला नको. आपल्या हातून काही कार्य झाले नाही तरी चालेल, पण आपल्यावर काही विचारणा यायला नको. कर्ज देणे म्हणजे जोखीम. त्याच्या नियम व अटींचे पालन व्हायला पाहिजे. कागदपत्र नीट घेतले पाहिजेत. पाठपुरावा (मॉनिटरिंग) वसुली वगैरे सगळेच आले. त्यापेक्षा फक्त ठेवी घ्याव्यात, गप्प बसावे उगाचच झगझग करायची नाही, बँकेच्या नोकरीत येणारी जोखीम नको, फायदे पाहिजेत. काही अधिकाऱ्यांचा जणू काही असाच विचार असायचा. पुढे या कर्जदाराला कर्ज वितरण केले व त्याला दरमहा स्टॉकस्टेटेमेंट द्यायला सांगितले ते काही त्याने दिले नाही. दर महाचे स्टेटमेंट दिले पाहिजे असा मी आग्रह धरला. तो कधी नाही म्हणायचा नाही, पण स्टेटेमेंट द्यायचाही नाही. मग मी एक दात्याच्या दुकानात गेलो. त्याला स्टेटमेंटचा दिला होता तो त्याच्या ड्रॉवरमधून बाहेर काढायला लावला. त्यात त्याला मालाचे वर्णन लिहायला सांगितले. तो म्हणाला ‘शंभर प्रकारचा माल आहे.’ मी म्हटले ‘धान्य, डाळी, साबण, तेले वगैरे अशी वर्गवारी कर. त्याची यादी जोड व स्टेटमेंटमध्ये असे तपशील लिही की किती किलो/नग माल प्रत्येक प्रकारचा आहे वगैरे.’ त्याने ते सगळे मोठ्या मुश्किलीने लिहिले आणि विचारले, ‘हे सर्व बँकेला का लागते?’ मी म्हटले, ‘आम्ही मालाचे नजरगहाण (हायपोथिकेशन) घेतो. म्हणजे या मालावर बँकेचा चार्ज असतो. काही कारणाने थकबाकी झाली तर बँक तुम्हाला नोटीस देऊन ताबा घेऊ शकते.’ हे चार्ज वगैरे बहुधा त्याला कळले नाही. तो म्हणाला, ‘रोज मी बँकेत येतो. मी स्वत: बँकेला हायपोथिकेशन आहे! तुम्ही कशाला काळजी करता.’ हे ऐकून मला क्षणभर वाटले की या व्यापाऱ्याच्या शर्टावरच ‘हायपोथिकेटेड टु बँक’ असा शिक्का मारावा.

– 15 –

कामशेत गावाची वस्ती तेव्हा साधारण पाच हजार होती. काही राजस्थानी व्यापारी गावाकडून दोन पाच हजार रुपये घेऊन रस्त्याच्या बाजूच्या चाळीत ‘आगे दुकान, पीछे मकान’ अशी जागा भाड्याने घेऊन अगदी पहिल्या दिवसापासून मालाची खरेदी विक्री सुरू करीत. पुण्याहून सुरुवातीला रोख व नंतर आपल्या बिरादरीच्या घाऊक व्यापाराकडून काही उधार असे करत स्थानिक लोकांना रोख-उधार असा माल विकून व्यवहार सुरू करीत. हातभट्टीसाठी काळा गूळ उधारीवर देऊन त्यावर जबरदस्त नफा करणारा एक व्यापारी मी पाहिला आहे. पुढे वेगवेगळ्या प्रकारच्या मालाचा व्यापार करीत गेल्या तीस वर्षांत हा व्यापारी कोट्याधीश झाला आहे असे कळले. शिक्षण बेताचेच असावे. पण व्यवहार ज्ञान व आपल्या समाजाचा पाठिंबा घेत योग्यवेळी मागणीप्रमाणे मालखरेदी करून नेमक्या ग्राहकाला रोखीने व उधारीने (उधारी कुणाला किती द्यायची याचा नेमका अंदाज घेत) विकायचा व भरपूर नफा कमवायचा. प्रचंड मेहनत. रात्रंदिवस तोच विचार. बँक हॉलिडे नाही, सॅटरडे संडे नाही. कुणाशी पंगा घ्यायचा नाही. जो पक्ष सत्तेवर येईल त्याच्याशी जुळवून घ्यायचे. असाच एक व्यापारी ओव्हरड्राफ्ट मागायला आला. मी म्हटले, ‘आम्ही असा ओव्हरड्राफ्ट देत नाही, पाहिजे तर कॅशोडीट घ्या. त्यासाठी तुमची हिशेबपत्रके दाखवा व तारण काय देणार ते सांगा.’ तो म्हणाला, ‘अमुक व्यापाऱ्यांना तुम्ही ओव्हरड्राफ्ट दिला आहे, मला का नाही देत?’ मी म्हटले, ‘त्या व्यापाऱ्यांना बँकेने कॅशोडीट दिले आहे.’ त्यावर तो म्हणतो, ‘आमच्या पैशाने करंट अकाऊंटमधून आम्ही घेतो तो ड्राफ्ट, बँकेच्या पैशातून घेतो तो ओव्हरड्राफ्ट.’ तेव्हा माझ्या लक्षात आले की डिमांड ड्राफ्ट करंट अकाऊंटमधून घेतला की, त्याला तो ड्राफ्ट म्हणतो. कॅशक्रेडिट खाते मंजूर करून त्याला रक्कम नावे टाकून तो डिमांड ड्राफ्ट घेईल त्याला तो ओव्हरड्राफ्ट म्हणतो.

– 16 – 

मी या शाखेत रुजू होण्यापूर्वी आधीच्या शाखा व्यवस्थापकाने एका गावातील मोठे शेतकरी असलेल्या चार भावांच्या संयुक्त खात्यावर जमीन सुधारणा करण्यासाठी मध्यम मुदत कर्ज आणि पिकासाठी अल्पमुदत कर्ज दिले होते ते थकित (ओव्हरड्यू) झाले होते. या कर्जाचा पाठपुरवठा करण्यासाठी मी त्या गावात गेलो. गावाच्या हद्दीत प्रवेश केल्याबरोबर लागले ते त्यांचे प्रचंड मोठे बैठे घर. एक भाऊ पोलीस पाटील, एक भाऊ सरपंच असे दोघेजण पदाधिकारी ही होते. मी त्यांची नावे विचारली तेव्हा त्यांनी ‘तुम्ही बँकेचे मॅनेजर’ असे मला लगेच ओळखले. आधीच्या मॅनेजरने लई मदत केली असे त्या मॅनेजरचे व बँकेचे कौतुक करून माझे स्वागत केले. मी दरवाज्यातून पुढे येताच त्यांनी मला मोठ्या प्रेमाणे एका मोठ्या गादीवर बसविले. एवढे प्रेम पाहिल्यावर मी विचार केला की, थकबाकीचे थोडे नंतर विचारू. पहिला ‘थोरला’, दुसरा ‘एक नंबर मधवा’, तिसरा ‘दोन नंबर मधवा’ व चौथा ‘धाकला’ असे चौघेजण गुण्यागोविंदाने एकत्र राहत होते. मात्र थोरल्याचा अधिकार अर्थातच मोठा होता व अन्य तीन भाऊ त्याच्या हाताखालचे कर्मचारी वाटतील असे होते. थोरल्याने मला गादीवर बसवले आणि टेकायला लोड दिला. मीसुध्दा मॅनेजर म्हणून जरा दाबातच लोडाला टेकून बसलो आणि माझ्या लक्षात आले की लोडाचे कापड तिरंगी झेंड्याचे आहे. केशरी, पांढरा, हिरवा आणि मधोमध चरखा. मी सहजपणे विचारले, ‘बाबुराव सगळ्या गाद्या, उशा, लोड तिरंगी का?’ त्यावर हे थोरले एवढे खूष झाले की, ‘साहेब गाद्या, उशा, लोडच काय पोरांच्या हंड्रेड बनियन बी तिरंगी कापड्याच्या आहेत.’ मी म्हटलं, ‘पक्षावर तुमची एवढी निष्ठा म्हणजे कमाल आहे?’ त्यावर बाबुराव अगदी अभिमानाने सांगू लागले की महात्मा गांधींपासून आमच्या गावाची जी पक्षाशी निष्ठा जुळली ती इंदिरा गांधी आणि आता राजीव गांधी, संजय गांधी आले तरी निष्ठा तशीच कायम आहे. गावात वाटायच्या कापडी झेंड्याचा स्टॉक आपल्याकडेच येतो. पण आपल्या एका हाकेने पूर्ण गावाचे मतदान आमच्या पक्षाला होते. मग झेंडे वाटण्याचा प्रश्नच कुठे येतो? तेव्हा आमच्या बायका म्हणाल्या गाद्या तक्के करा आणि राहिला कपडा तर पोरांना हंड्रेड (अंडर वेअर) आणि बनियन शिवा. पक्षाशी एवढी जवळीक म्हणजे विशेष आहे असे मी म्हटल्यावर बाबुराव म्हणतात, ‘साहेब झेंड्यांचं काय घेऊन बसलात (खरं तर मी झेंड्याच्या गादीवरच बसलो होतो.) गावचा टेलीव्हिजन सरकारी योजनेतून आला तो आमच्याच घरात बसवला आहे, कारण दुसऱ्या कुणाचे आपजेक्शन न्हाई. छायागीत बघायला गावातली बायका पोरं आमच्या घरीच येतात.’ 

थोड्यावेळाने मी कर्जाच्या थकबाकी बद्दल विचारले, थोरला म्हणाला, ‘साहेब एवढा मोठा बारदाना म्हणल्यावर थोडं कमी-जास्त व्हनार.’ मी विचारल, ‘पीक वानकं (चांगल) निघालं कीनाही, मग भरून का टाकत नाही बँकेचा हप्ता?’ बाबुराव म्हणतात, ‘भरू की राव, आम्ही कुठं पळून चाललो आहोत?’ मी म्हटले, ‘तुम्ही वेळेवर कर्ज हप्ते भरले की दंडाचे व्याज लागत नाही, तुमची पतही वाढते, पुन्हा कर्ज लागलं की मिळतं.’ बाबुराव म्हणतात, ‘साहेब तुची थ्योरी (थिअरी) बरोबर आहे पण येव्हारात (व्यवहारात) मागं-म्होरं होतंच. घरात पस्तीस माणसं. मी विचारलं, ‘पस्तीस कशी?’ ‘आई-वडील, आम्ही चार भाऊ, चौघांच्या सहा बायका (दोघांच्या दोन-दोन आहेत) आणि तेवीस पोरं, झाली पस्तीस. पण समद्या कामाची मी लाईन लावून दिली आहे. आई-वडील लई म्हातारे हैत. त्यांचं दुखलं-खुपलं म्यांच बघतो, कारण मी कारभारी. दोन भाऊ रोज सकाळ-संध्याकाळ शेतावर. एक भाऊ म्हैशीच्या धारा काढतो व पाठवायची व्यवस्था करतो. अडल्या-नडल्याला मी आहेच. माझ्या दोन्ही बायका स्वैपाक रांधतात, समद्या पोरांचं कमी जास्त त्याच बघतात. एक नंबर मधल्याच्या दोन्ही बायका शेतावर जातात. दोन नंबरम धल्याची बायको बैलांचं व दुभत्या जनावरांचं खाणं-पिणं बघते. धाकल्याची बायको शेण गोठा करते. या धाकल्या दोघी राहिलेल्या टायमात दुधाची उस्तवारी करतात, मुरवण लावतात, दही करतात, लोणी काढतात, टाइम राहिला तर कोंबड्या बी पाळतात. समदी मानंस लई बिझी. कुनब्याच्या परपंचात लई कामं. खर्चबी मायंदळ. राहिली तुमची परतफेड. पण या वर्षी दुकानदाराकडून घेतलेली उधारी समदी भरली, कारण त्याच व्याज जास्त होतं. तुमचे कर्ज फेडायचे मागे ठेवले, कारण व्याज कमी. जमीन तारण आहेच, काळजी करू नका. आम्ही पळून जात नाही. तुमचं भरू.’ 

मी त्याच्याकडे कर्जफेडीची निश्चित तारीख मागितली. त्याने गोलगोल उत्तरे दिली. मी म्हटले अशाने कायदेशीर कारवाई लागेल. बाबूराव म्हणतात, ‘शक्यतो कारवाई करू नका. पण करायचीच म्हटली तर आम्ही काय तुम्हाला वंगाळ (वाईट) म्हणूका? तुमची वसुलीची ड्यूटी आहे. आम्ही पैसे भरून कर्ज फेडकेली पाहिजे. हे आम्हांला समजले पाहिजे. तुम्हाला असे कर्जवसुलीसाठी यायला लावणं आम्हाला शोभत नाही. या आमच्या ‘आज-उद्या’ करायच्या सवयीमुळेच आम्ही मागे राहिलो. पण बरं झालं आज तुम्ही आलात. तुमचे पाय आमच्या घराला लागले. आमचं गावात किती वजन आहे ते तुम्हाला कळलं. कर्जफेडीची कायबी काळजी करायची न्हाय.’ बाबुरावांच्या भाषणाला उत्तर फक्त कर्जवसुलीच्या नोटिशीनेच देणं शक्य होतं तेच करावं लागलं. पुढे कायदेशीर नोटीस आणि नंतर कोर्टात दावा दाखल करावा लागला. व्यवहाराच्या गोष्टी व्यवहारानंच होतात, हे बाबूरावांना कळत होतं पण वळत नव्हतं. बँक फार तर थोड्या मुदतीसाठी थांबू शकते, पण वेळेवर कर्जफेड झाली नाही तर कोर्टकचेऱ्या करून वसुली करणे भाग असते. 

– 17 –

बाबुराव पाटलांची ही तऱ्हा तर नामदेवराव भोई यांचा वेगळाच प्रकार. नामदेवरावांची शेती होती, पण मुख्य व्यवसाय देशी दारू (संत्री मोसंबी छाप) विक्रीचे दुकान होते. हातभट्टीची दारू विकत नसल्याचा त्यांना अभिमान होता. त्यांचा जनसंपर्क उत्तम होता. जिकडे जातील तिकडचे लोक त्यांना आपल्या पार्टीत यायचा आग्रह करायचे. जुना जनसंघ, नंतर इंदिरा काँग्रेस, नंतर जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी असे ते नेहमी पाटर्या बदलायचे. आमच्या बँकेचे ते जुने म्हणजे पाहिल्या पन्नास शंभरमधले खातेदार होते. त्यांना ट्रॅक्टरचे कर्जही दिले होते. स्वत:च्या शेतापेक्षा इतर बाहेरच्या कामांसाठी ट्रॅक्टर वापरायचे. स्वत:च्या मुलाला ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून बसवून भरपूर भाडे कमाई करायचे व कर्जाचा हप्ता वेळेवर भरायचे. सरकारी खात्यात काम असले की चहा ‘पुढे घालून’ जाणार. म्हणजे ज्या आॉफिसमध्ये त्यांना प्रवेश करायचा आहे त्या ऑफिसच्या ‘समद्या स्टॉप’ला त्यांनी पुढे घालून नेलेला चहावाला चहा पाजणार. तोसुध्दा कडक मिठ्ठा. असा चहा पिणे ही सरकारी नोकरांची सवय. या चहात इतकी साखर असणार की त्या पाकाने पिणाऱ्याचे तोंडच बंद होईल. नामदेवराव असा चहा पाजून तलाठ्याकडून खाते उतारे घेणार. अशा चहा पाजण्याने काम फत्ते होत असल्याचा अनुभव आल्यामुळे नामदेवराव जिकडे जात तिकडे‘चहा पुढे घालून’ जात असत. याबद्दल त्यांची फिरकी घेतली तरी ते ती गमतीने घ्यायचे. मी त्यांना एकदा सहज विचारले, ‘तुम्ही दिवा, हात, नांगरणारा शेतकरी, कमळ या सर्व चिन्हांच्या पाटर्यांमध्ये जाऊन आलात पण तुम्ही एवढे हाडाचे कार्यकर्ते असून आमदारकीचे तिकिट कसे भेटले नाही?’ ते म्हणाले, ‘साहेब टॉर्च, टॉर्च! सगळं नशीब टॉर्चवर अवलंबून असते.’ मला क्षणभर काही कळलं नाही, पण त्यांनी आकाशाकडे पाहून हे टॉर्च म्हटल्यावर कळलं की नामदेवरावांचे स्टार्स (ग्रह) अनुकूल नसल्याने त्यांना तिकिट मिळाले नाही. एकूण काय टॉर्चचा प्रकाश त्यांना भेटला नाही म्हणून तिकिट नाही. खेड्यात राहणाऱ्या माणसाला कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते याची शहरी माणसाला अनेकदा कल्पनाही येत नाही. याच नामदेवरावांची आई वीज पडून गेली आणि तीही नामदेवरावांच्या डोळ्यासमोर. एकदा ते गावातल्या घरातून शेतातल्या घराकडे जायला संध्याकाळच्या वेळी निघाले. नामदेवराव पुढे व आई काही फुटांवर मागे असे दोघेही लगबगीने शेतातल्या घरी चालले होते. अचानक गडगडाट होऊन जोरदार वीज पडली ती आईवरच. ती किंचाळली. नामदेवरावांनी पाहिले तर आई धाडकन्‌ जमिनीवर पडली होती. ते लगेच तिला गावातल्या डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी सांगितले की बाई वीज पडून गेल्या. अंग भाजल्याचा वास येत होता म्हणून वीज पडून मरण पावल्या असे निदान केले. उपचारासाठी जराही वेळ मिळाला नाही. वीज पडून आईचा मृत्यू, नामदेवरावांच्या अगदी डोळ्यासमोर झाला. 

– 18 –

एकाच तालुक्यात दोन ठिकाणी एकूण नऊ साडेनऊ वर्षे शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, मोठे शेतकरी, दुग्ध व्यवसायिक, दुकानदार, व्यापारी, लघुउद्योजक, डॉक्टर, वकील अशा विविधस्तरातील खातेदारांची कामे करताना समाजाचा आडवा छेद (क्रॉससेक्शन) पहायला मिळाला. बँकेच्या धोरणानुसार आखून दिलेल्या पध्दतीने नेमून दिलेल्या कर्जाच्या प्रमाणानुसार उत्पादक कामांसाठी कर्जे द्यायची असतात. आलेल्या कागदपत्रांची बारकाईने छाननी करायची असते आणि काही प्रस्ताव नाकारायचा वाईटपणाही घ्यावा लागतो आणि प्रस्ताव मंजूर करायचा निर्णय घेतला तर पुढील सर्व प्रक्रिया लवकरात लवकर करून कर्जवितरण नियमानुसार करावे लागते. यात कुठेही शॉर्टकट मारायचा प्रयत्न केला तर ते अंगाशी येऊ शकते. एका पेट्रोल पंपवाल्याचे कॅशोडीटलिमिट वाढवून द्यायचा प्रस्ताव मी क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवला. तो मान्य करून त्यांनी त्याची शिफारस मंडल (झोनल) कार्यालयाकडे पाठवली. दरम्यान पेट्रोल पंपवाल्याने भुणभुण लावल्यामुळे क्षेत्रीय प्रबंधकांना फोनवर सांगून मी प्रस्तावित वाढीव कॅशोडीटचा अर्धा भाग वितरण केला, पण त्यांच्या वरच्या झोनल मॅनेजरने आक्षेप काढला. ‘आम्ही लेखी मंजुरी देण्याआधी पार्टडिसबर्सेंट का केले’ असे विचारून माझ्या रेकॉर्डला एक पत्रही लावले. यापुढे सावधगिरी बाळगण्याची सूचना देणारे हे पत्र होते. तेव्हापासून कानाला खडा लावला की असे काही वेगळे वळण (डायव्हर्जन) खातेदारांच्या हितासाठी म्हणून करायचे नाही व बँकेचे नियम अजिबात तोडायचे नाहीत आणि जे काही काम करायचे ते नियमात बसवूनच. असे जरी असले तरी आपण आपला विवेकाधिकार वापरून आपल्या हातात असलेल्या मंजुरीचे अधिकार वापरून आपल्या बँकेच्या खातेदारांची कामे करून त्यांच्या उन्नतीला बँकेच्या कर्जपुरवठ्याने हातभार लावू शकतो हे मला दाखवून द्यायचे होते. या भूमिकेमुळे बँक ऑफ महाराष्ट्र आणि दिलीप प्रभाकर जोशी (म्हणजे संस्था आणि शाखाप्रबंधक) या दोन्हींवर खातेदारांनी अमाप प्रेम केले.

– 19 –

अनेक वेळा असे म्हटले जाते की परिस्थिती इतकी खराब आहे की काही काम करण्यात अर्थ नाही. पण मी पुढाकार घेऊन मला मिळालेल्या अधिकारांचा वापर करून ही परिस्थिती बदलण्याचे माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने प्रयत्न केले. याबद्दल एसेम जोशींनी केलेले विवेचन सांगण्यासारखे आहे. नक्की वर्ष आठवत नाही, पण 1980 च्या दरम्यान असेल. तालुक्याच्या ठिकाणी एका छोट्या समारंभासाठी एसे जोशी आले होते. त्यांच्या एका कार्यकर्त्यांने मला मुद्दाम तिथे नेले. माझी ओळख करून दिली. मी त्यांना आठवण करून दिली की आदिवासी भागात सेवा दलाच्या एका शिबिरात ते आले असताना त्यांची माझी भेट झाली होती. त्यांनाही ते आठवले. असो. एसेनी मला विचारले की या तालुक्यात तुम्ही आयआरडीपीची योजना राबवता म्हणजे लोकांपर्यंत कर्जपुरवठा निश्चितपणे पोहोचतो. पण त्यांचा गरिबी हटवण्याचे दृष्टीने फायदा किती होतो? मी सांगितले, ‘चार माणसांना (चार कुटुंबांना) कर्जे दिली तर दोघांना कर्ज रकमेचा विनियोग करून त्यातून उत्पन्न वाढवून विकास करायचे कळते. चारपैकी दोनजणांना कर्जाचा वापर कसा करायचा हे फारसे कळत नाही कारण अडाणीपणा. ते केवळ दारिद्य्ररेषेखालचे नसतात कल्पना दारिद्य्रही खूप असते आणि कळणारी जी दोन माणसे उत्पन्न वाढवतात त्यातला एक माणूस कर्जफेड नीटपणे करतो मात्र राहिलेल्या न कळणाऱ्या दोघातील एकजण भीतीने किंवा धास्तीने कर्जफेड करतो अशी पन्नास टक्केवसुली होते.’ यावर एसे म्हणाले, ‘म्हणजे पन्नास टक्के रक्कम कारणी लागते. हे प्रमाणही काही कमी नाही. असेच प्रयत्न चालू ठेवा. हे प्रमाण वाढेल.’ अर्थात एसेशी झालेले बोलणे मी बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगू शकलो नाही कारण बहुतांशी वरिष्ठांना आयआरडीपी म्हणजे इतना (ख), रुपया (ठ), देना (ऊ), पडेगा (झ) एवढेच कळते. राष्ट्रीयीकृत बँकांना केंद्र सरकार, राज्य सरकार यांना उत्तर द्यावे लागते. त्यासाठी बँकेच्या केंद्रीय कार्यालयातून पाठपुरवठा होतो. त्यामुळे झोनल व क्षेत्रीय कार्यालयांकडून शाखांना उद्दिष्टे दिली जातात. ती पूर्ण केली की नाही ते तपासण्यासाठी व कर्जपुरवठा आणि कर्जवसुली यांचा पाठपुरावा करण्यासाठी शाखाप्रबंधकांच्या बैठका घेतल्या जातात. बॅ. अंतुले मुख्यमंत्री असताना प्रथम कर्जाफी झाली. तेव्हापासून ग्रामीण भागातील कर्जवसुलीही थंडावली. कर्जदारांना कर्ज माफीची आशा लागली. हा भाग जरी असला तरी राष्ट्रीयी-करणानंतर तळागाळातल्या वंचित माणसाला बँकांच्या कार्यकक्षेत आणून कर्जपुरवठा करून विकासाची संधी देणे आवश्यक होते आणि त्यामुळेच अन बँक क्षेत्रात बँकिंगचा प्रसारही चांगला झाला. पण आमचे वरिष्ठ अधिकारी असा व्यापक विचार करायला सहसा तयार नसत. बलदवा नावाच्या एका क्षेत्रीय प्रबंधकांनी (जे दुसऱ्या एका क्षेत्राचे वरिष्ठ अधिकारी होते.) एका कार्यक्रमात भेटले असता मला विचारले, ‘काय म्हणते तुचे पानशेत?’ मी म्हटले, ‘साहेब पानशेत नाही कामशेत.’ ते छद्‌मी हसून म्हणाले, ‘अहो पानशेतच. कारण तुम्ही कर्जपुरवठा करणार आणि ते धरण फुटणार. म्हणजे पैसे फुकट जाऊन संपूर्ण थकबाकी होणार.’ मात्र मी असा विचार न करता नेमून दिलेले काम सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने इमानेइतबारे केले. शक्यतेवढ्या खातेदारांकडून वसुली केली. पुढे राहिलेल्यांची थकबाकी सरकारने कर्जमार्फीच्या अनुदानातून बँकांना देऊन टाकली. माझ्या मतेमी दिलेल्या कर्जाची शंभर टक्के वसुली झाली.

– 20 –

बँकेच्या सोसायटीवर कार्यकारी संचालक म्हणून पाच वर्षे, पुढील दोन वर्षे काम शेत शाखा व्यवस्थापक व सोसायटीचा दुहेरी भार आणि त्यानंतर सुमारे दोन वर्षे फक्त कामशेत शाखाव्यवस्थापक अशी नऊ वर्षे मी त्या भागात काम केले. सहकारी संस्था (सोसायटी) हे राजकारणाचे अड्डे असतात. त्यामुळे माझी कामशेत शाखेवर नेमणूक होण्यापूर्वी बँकेच्या अध्यक्ष व कार्यकारी संचालकाच्या मागे लागून सोसायटीच्या मुख्य कार्यालयाजवळ बँकेची नवीन शाखा (काले कॉलनी) सुरू करून घेतली. त्यासाठी खूप खटपट करावी लागली. आजमितीला सोसायटीचे कर्जवितरण चालू नाही पण शासनाच्या कर्जामार्फत राहिलेली कर्जे वसूल झाली आहेत. बँकेची शाखा मात्र चांगली चालली आहे. जे नियमित कर्ज भरणारे आहेत त्यांची सोसायटीत इतर थकबाकीदारांमुळे गळचेपी होते, पण बँकेच्या शाखेत वैयक्तिक कर्जफेडीला महत्त्व दिले जाते व कर्ज फेडणाऱ्या खातेदारांना पुन्हा कर्ज मिळू शकते. शाखा प्रबंधकाने अशा कामात स्वारस्य दाखवण्यावर खातेदारांची आणि बँकेचीही प्रगती अवलंबून असते. पण तरीही व्यवस्था म्हणून बँकेची शाखा स्थानिक राजकारणापासून अलिप्त किंवा दूर राहू शकते. माझ्या कार्यकाळात जी काही व्यवस्था राबविण्याचे मला अधिकार होते त्यांचा सामान्य माणसासाठी मी गंभीरपणे उपयोग केला. काही खातेदारांना माझे वसुलीचे प्रयत्न आवडायचे नाहीत पण ते माझे कर्तव्य होते. एकदा आम्ही एका निर्यातदारामार्फत ह्या भागात पिकवलेला कांदा निर्यात केला व त्यातून कर्जवसुली केली. एका वर्षी सोसायटीतर्फे कृषिउत्पन्न बाजार समितीदार कांदा खरेदीविक्रीची अडत (कमिशन एजन्सी) चालवून सोसायटीचा फायदा तर केलाच पण मालविक्री व वसुली यांची सांगड घातली व त्यातून पीककर्ज वसूल केले. त्याच वर्षी पोपट नावाच्या एका खातेदाराने बँकेकडून कर्ज घेऊन पिकवलेला कांदा चाकणच्या बाजारावर परस्पर नेल्याचे समजले. मी व शिपाई मोटारसायकलवर चाकणला गेलो व त्याला म्हटले वसुलीचे पैसे टाक. त्याने मला शिव्या दिल्या. ‘कंच्या बापाच्या पोटचा तू कामदार, मला शिकवायला आला शहाना’ म्हणून चप्पल घेऊन अंगावर धावून आला. शिपाईमधे पडला म्हणून मला मार पडला नाही. पण त्या पोपटरावला आम्ही सोडले नाही व वसुली केली.

– 21 –

काही खातेदारांची रात्री-अपरात्रीही कामे केली. भागोजी नावाच्या खातेदाराची म्हैस विताना म्हणजे बाळंतपणात अडली. रात्री एक वाजता दोन किलोमीटरवर त्याच्या गोठ्यात गेलो. म्हैस फारच विव्हळत होती. भागोजी कासावीस झाला होता. तिथून रात्री दीड वाजता तळेगावला भागोजीच्या मुलाला मोटरसायकलवर घेऊन पशुवैद्यक डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरला घेऊन आम्ही ट्रिपलसीट परत आलो. डॉक्टरांनी म्हैशीला सोडवण्याची शिकस्त केली. पण शेवटी ती मेली. पुढे विम्याचा क्ले मिळवून दिला. हा भागोजी पुढे (1997) वारला तेव्हा मी झवेरी बाजार मुंबई येथे मॅनेजर म्हणून होतो. कामशेतच्या सहस्त्रबुध्दे डॉक्टरांचा मला फोन आला. भागोजी गेला. मृत्युशय्येवर त्याने दोघांची नावे घेतली. एक म्हणजे डॉक्टर आणि दुसरा म्हणजे महाराष्ट्र बँकेचा मॅनेजर. दोन्हीही जिवाभावाची माणसं. अशा अनेक आठवणी.

– 22 –

आदिवासी भागात काम करताना एक कार्यकर्ता म्हणाला होता की दिलीप मामलेदार व्हायला पाहिजे होता. यावर आबा करमरकर म्हणाले, ‘मामलेदार का? कलेक्टर का नाही?’ मी कलेक्टर झालो नाही. पण या कामाने जिल्हा पातळीवर बँकेचे नाव वाढवले. त्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते माझा सत्कारही झाला. कामशेत भागात काही नवीन कार्यक्रम केला की आम्ही पुण्याच्या पेपरांमधे व आकाशवाणीवर बातमी देत असू. त्यामुळे माझा व माझ्या स्टाफचा हुरूप वाढत असे आणि लोकांनाही आमच्या कामाबद्दल माहिती होत असे. अजूनही त्या भागातले काही खातेदार त्यांच्या घरी लग्नकार्य आले की मला कोकेत्री (कुंकुमपत्रिका) पाठवतात. एकाचे नाव माऊली. तो प्रगतिशील शेतकरी सोसायटीचा अध्यक्ष झाला. पुढे तो त्या भागातील नवीन सहकारी साखर कारखान्याचा संचालक झाला. गैरव्यवहार (करप्शन वगैरे) न करता काम करीत असल्याचे अभिमानाने सांगतो. हा माऊली काही वर्षापूर्वी गावठाणात (त्याच्या गावातील वस्तीत) रहात असे. तीन खणांच्या घरात माऊली हा मधला भाऊ मधल्या खणात रहायचा. दारुड्या भाऊ एका बाजूला आणि आळशी भाऊ दुसऱ्या बाजूला रहायचे. माऊली कातावला होता. त्याला त्याच्या गावापासून लांब शेतावर घर बांधायला आम्ही आर्थिक मदत केली, तीही अनेक अडचणींना सामना करून. या मदतीचे माऊलीने सोने केले व शेतावर चांगले घर बांधले. उत्तम शेती केली. आता त्याची तिन्ही मुले उच्चशिक्षित आहेत. माऊलीच्या गावातील दुसरा एक खातेदार सखाराम. तो आता नव्वद वर्षाचा असेल. एका शुक्रवारी तो सोसायटीच्या ऑफिसमध्ये आला. पावसाळ्यात औंज (लावणी) करताना त्याचा एक बैल ‘बसला’ (चालेनासा झाला). सखारामला शनिवारी सकाळी चाकणच्या बाजाराला नेले. बैल पसंत केला. विक्रेत्याला दोन-तीन दिवसात पैसे देतो असे बँकेचा अधिकारी म्हणून विनंती केली. ती त्याने मान्य केली. 

शनिवारी संध्याकाळी सखाराम बैल घेऊन घरी पोहोचला. रविवारी त्याचे औत चालू झाले. सोमवारी बँकेचे कागदपत्र केले. मंगळवारी बैल विक्री करणाऱ्याला पैसे दिले. अलीकडे एकदा त्याच्या गावात गेलो असता मला प्रेमाणे भेटला. त्याच्या डोळ्यातील आनंदाश्रू हीच माझ्या कामाची पावती होती. या अनुभवातून मला काही विचार सुचतात ते असे... जी समाजव्यवस्था आपल्याला बदलावीशी वाटते ती बदलण्यासाठी सामाजिक व राजकीय संघर्ष जरूर करायला पाहिजे पण प्राप्त व्यवस्थेतले सकारात्मक भाग घेऊन त्यातील आर्थिक योजना सामान्य माणसापर्यंत पोहचवल्या पाहिजेत. ज्या माणसांध्ये आपण काम करीत असू ती काही आदर्श नसतात. अनेकदा ही माणसे सोयीसोयीने वागतात. काही माणसे कमालीची संधिसाधू असतात. लबाड भेटले तर त्यांना बाजूला करावे लागते. प्रत्येक क्षेत्रात चांगले लोक भेटतातच, त्यांना योग्य कामासाठी जोडून घेण्याचे योजकत्व पाहिजे. ज्या बँकेसारख्या संस्थेचा कर्जपुरवठा असेल त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना यथायोग्य मान दिला पाहिजे. चांगले काम करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना काही कार्यक्रमांना/समारंभांना बोलावून त्यांचा सत्कारही केला पाहिजे. बँका आणि सरकारी खात्यात अनेक सत्प्रवृत्त माणसे अगदी निर्लोभी वृत्तीने मदत करायला तयार असतात, त्यांनाही ओळखून त्यांचा सहभाग घेता आला पाहिजे. धर्म चालीरीती यांचे हजारो वर्षांचे संस्कार समाजावर आणि त्यामुळे सामान्य जनांवर असतात हे नाकारून चालणार नाही. शेतकऱ्यांना केवळ नशिबावर हवाला न ठेवता शेती व शेतीपूरक धंद्यासाठी पीकसंरक्षण, पशुवैद्यक उपचार, विमा यांसारख्या आधुनिक पध्दतींचा फायदा घ्यायला शिकवले पाहिजे. विष्णु घरदाळे नावाच्या शेतमजुराने केंबळाच्या (पालापाचोळ्याने शाकारलेल्या) घराच्या छपरांच्या जागी मंगलोरी कौले पशुपालनाच्या धंद्यातून मिळालेल्या फायद्यातून टाकली ती केवळ नशिबामुळे नव्हे तर आम्ही त्याला वेळेवर व पुरेसा कर्जपुरवठा केला आणि त्यानंतर वेळोवेळी आलेल्या अडचणी सोडवायला मदत केली त्यामुळे. अशी कामे कुणा एकट्यामुळे होत नाहीत येथील मुख्य अधिकारी स्वयंप्रेरणेने भारलेला (सेल्फ-मोटिव्हेटेड) पाहिजे. त्याने अवतीभवतीच्या माणसांना आपल्याबोलण्या-वागण्यातून प्रेरणा दिली पाहिजे. सर्व संबंधितांनी एकदिलाने टीमवर्क केले तर कठीण परिस्थितीतूनही अनुकूल परिणाम मिळतात हा आत्मविश्वास अशा कामातून निश्चितपणे वाढतो हे जाणवले. 

राजकारणी लोकांचा एका मर्यादेपलीकडे बाऊ करता कामा नये, तो त्यांचा व्यवसाय असतो. त्यांना चांगल्या कामात फांदे घालायची म्हणजे आडवे लावायची कला अवगत असते. (त्याला आम्ही ‘पाणी अडवा पाणी जिरवा’च्या धर्तीवर ‘एकमेकांची अडवा एकमेकांची जिरवा’ असे म्हणतो.) त्याची ऊब घेता आली पाहिजे पण धग लागू देता कामा नये. काम शेतजवळची दूधसोसायटी रजिस्टर करण्यासाठी सहकार खात्याच्या निबंधक रजिस्ट्रारला आम्ही तालुक्याच्या सभापतीला फोन मारायला (दम भरायला) सांगितले. त्यामुळे ‘बिन पैशांनी’ ही सोसायटी स्थापन झाली. आम्हीही सभापतीचे याबद्दल फोनवरून आभार मानले. पण सहकार निबंधक सोसायटीला भेट द्यायला आला तेव्हा त्याला पध्दतशीर जेवायला घातले. त्याच्या पाठिंब्यामुळेच सर्व काही प्रगती चालली आहे असे वातावरण तयार केले. कुठल्याही परिस्थितीत आपल्या प्रयत्नांनी समाज चार अंगुळे पुढे गेला पाहिजे. शाळेच्या 11 वर्षांत आणि कॉलेजच्या 6 वर्षांत मी जे शिकलो त्यापेक्षा किती तरी जास्त आदिवासी भागात 2 वर्षे काम केले त्यात शिकलो. आणि त्याहीपेक्षा अनेक पटींनी त्यानंतरच्या नऊ वर्षांत सोसायटी व बँकेच्या कामात शिकलो. ग्रामीण भागात बँकेच्या माध्यमातून केलेल्या कामाचे हे अनुभव. या नंतरच्या सव्वीस वर्षांत निमशहरी, शहरी व महानगरीय भागात काम करतानाही हे अनुभव उपयोगी पडले.

Tags: dilip joshi sahib shaetkari adani maval pune bank indira congress mhanagriy shahari nimshahari दिलीप जोशी साहेब शेतकरी आडाणी मावळ पुणे बँक इंदिरा काँग्रेस महानगरीय शहरी निमशहरी weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

  1. Dhananjay Renavik- 02 Aug 2021

    My heartfelt condolences to the family of Late Shri.Dilip Joshi

    save

  1. Dr Manoj Sahare- 02 Aug 2021

    दृष्टि समृद्ध करणारा लेख !

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके