डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

लो. टिळक आणि म. गांधी : नेतृत्वाची सांधेजोड

लोकमान्य टिळकांनी 1920 मध्ये स्थापन केलेल्या ‘काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टी’ या पक्षाच्या जाहीरनाम्यातून टिळक आपल्याला खऱ्या अर्थाने कळतात. गांधीजींशी त्यांचे काही मतभेद असूनसुद्धा वैचारिक मूल्यांच्या दृष्टीने ते गांधींच्या किती जवळ होते, हे आपल्या लक्षात येते. शेवटी मला असं म्हणावंसं वाटतं की, अत्यंत वाचनीय असे हे पुस्तक आहे. लेखकाच्या अभ्यासू वृत्तीचा, तसेच संयमित व समतोलरीत्या विचार मांडण्याच्या पद्धतीचा प्रत्यय प्रत्येक पानावर येतो. लोकमान्य टिळक व महात्मा गांधींवरील हे पुस्तक या दोन महान व्यक्तींवर वेगळा प्रकाश टाकणारे आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या एका संस्मरणीय भागावर लिहिले गेलेले हे पुस्तक अभ्यासकांनी वाचावे. एवढेच नव्हे, तर ते आपल्या संग्रही ठेवावे, असे मला प्रामाणिकपणे वाटते. एका महत्त्वाच्या विषयावर उत्कृष्ट पुस्तक लिहिल्याबद्दल न्या.चपळगावकर अभिनंदनास पात्र आहेत.
 

न्यायमूर्ती नरेन्द्र चपळगावकर यांनी पुस्तकाच्या शीर्षकात ‘नेतृत्वाची सांधेजोड’ हे शब्द वापरले आहेत, याचा खुलासा आपल्या प्रास्ताविकात खालील शब्दांत केला आहे. ‘महात्मा गांधी हे काही टिळकांचे अनुयायी नव्हते, पण टिळकांचे मोठेपण त्यांना मान्य होते. त्या पार्श्वभूमीवरच आपल्याला पुढे जायचे आहे, हेही त्यांनी लक्षात घेतले होते. टिळकांबद्दल त्यांच्या मनात आदर होता आणि त्यांच्याशी जाहीरपणे मतभेद व्यक्त करण्याचे प्रसंग ते टाळत होते, ही गोष्ट लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाचा सांधा जुळून येण्यासाठी उपयुक्त ठरली होती.’ पुढे जाऊन न्या. चपळगावकर लिहितात, ‘लोकमान्यांनीही गांधीजींच्या नेतृत्वगुणाचे विशेष लक्षात घेतले होते. उद्याच्या भारतात गांधी राष्ट्रनेते होतील, हे लक्षात आल्यामुळे त्यांनीही गांधींसोबत निर्माण झालेले धोरणविषयक मतभेद शक्यतो चर्चेचा विषय होऊ दिले नाहीत. आपला वारसा आपल्याच पद्धतीने राजकारण करणाऱ्या कोण्या अनुयायाकडे जाणार नाही, गांधीजीच ती धुरा सांभाळणार आहेत, हेही त्यांना माहीत होते.’

जेव्हा देशात स्वातंत्र्यप्राप्तीकरता चळवळ सुरू असते, तेव्हा देशाचे नेतेपद कसे ठरते, याचे उत्तर लेखकाने खालील शब्दांत दिले आहे : ‘परिस्थितीतून, लोकांच्या अप्रत्यक्ष संमतीतून राष्ट्रीय नेतृत्व उदयास येते. या नेतृत्वाचा वारसाही परिस्थिती आणि लोकच ठरवतात. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना राष्ट्रीय नेतृत्व परिस्थिती व लोकांनी बहाल केले आणि महात्मा गांधींनाही ते पद तसेच मिळाले.’

ढोबळरीत्या पाहू गेल्यास 1905 च्या वंगभंग चळवळीपासून लोकमान्य टिळकांची गणना राष्ट्रीय पुढाऱ्यांमध्ये व्हायला लागली. तिथून 1916-1917 पर्यंत क्रमाक्रमाने त्यांचे महत्त्व वाढतच गेले. काँग्रेसच्या लखनऊ अधिवेशनात, म्हणजे डिसेंबर 1916 मध्ये त्यांनी महत्त्वाचा भाग घेतला होता आणि त्या वेळी लोकांच्या दृष्टीने ते भारताचे सर्वश्रेष्ठ पुढारी होते. वंगभंगाची चळवळ व त्यानंतरच्या काळाबद्दल नेहरू आपल्या आत्मचरित्रात लिहितात : 'News of Tilak's activities and his conviction... stirred all of us Indians in England. Almost without an exception we were Tilakites as the new party was called in India.' (Jawaharlal Nehru : An Autobiography, p. 21) 1915 च्या सुरुवातीस महात्मा गांधी भारतात परत आले. त्यांनी दक्षिण आफ्रिकेत केलेल्या ऐतिहासिक कार्याची भारतातल्या सुशिक्षित समाजाला जाणीव होती, पण सर्वसामान्य जनतेला त्याबद्दल फार थोडी माहिती होती. किंबहुना, भारतात गांधी कितपत यशस्वी होतील, याबद्दल सुशिक्षित समाजही साशंक होता. गांधींशी झालेल्या त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल नेहरू आपल्या आत्मचरित्रात लिहितात : 'My first meeting with Gandhiji was about the time of the Lucknow Congress during Christmas 1916. All of us admired him for his heroic fight in South Africa, but he seemed very distant and different and unpolitical to many of us young men.' (p. 35) साधारण रूपरंगाचा, किरकोळ शरीरयष्टीचा, वक्तृत्वाची फारशी देणगी नसलेला व काही अंशी लाजराबुजरा असा हा माणूस- म्हणजे गांधी अवघ्या पाच वर्षांच्या अवधीत भारताचा सर्वश्रेष्ठ नेता बनला, ही बाब थक्क करणारी आहे.

1915 च्या सुरुवातीस भारतात आलेल्या गांधींच्या स्वभावाचं, त्यांच्या विचारांचं व कामाचं योग्य असं वर्णन लेखकाने केलं आहे, तरीही त्यांनी त्या काळच्या श्रेष्ठ व ज्येष्ठ पुढाऱ्यांचा आणि जनतेचा विश्वास कसा व कोणत्या रीतीने संपादन केला, याबद्दल लेखकाने अधिक तपशिलात जाऊन लिहिलं असतं, तर या दर्जेदार पुस्तकाचे मोल अधिक वाढलं असतं. गांधींनी त्या वेळी भारताच्या राजकीय रंगभूमीवरील महान पुढाऱ्यांना आधी जिंकून घेतलं व जनतेला नंतर, असा हा आश्चर्यकारक इतिहास आहे.

लोकमान्य टिळकांच्या हयातीतच गांधींना काही अंशी त्यांच्यापेक्षाही जास्त महत्त्व प्राप्त झालं, या गोष्टीकडे लेखकाने आपले लक्ष वेधले आहे. मधुमेहाचे पोखरलेले व सहा वर्षांच्या दीर्घ तुरुंगवासाने अधिकच खंगलेले टिळक राजकीय रणभूमीवर एका शूर योद्‌ध्याप्रमाणे शेवटपर्यंत लढत व झुंजत राहिले, हे जरी खरं असलं; तरीही टिळकांच्या अखेरच्या काळात लोकप्रियतेचं पारडं गांधींकडे थोडे का होईना, पण जास्त झुकलं होतं, हेही तितकंच खरं. लोकमान्य टिळकांनी गांधींना कोठेही जाहीररीत्या विरोध करण्याचं टाळलं आणि त्यामुळे गांधी आपलं कार्य अधिक वेगाने करू शकले, याबद्दल वाद नसावा. लोकमान्य टिळकांबद्दल अपार आदर असलेल्या नेहरूंनी 1919 च्या सुमारास असलेल्या वास्तवाचे वर्णन आपल्या आत्मवृत्तात खालील शब्दांत केले आहे -

'The Amritsar Congress (1919) was the first Gandhi Congress. Lokmanya Tilak was Present and took a prominent part in the deliberations, but there could be no doubt about it that the majority of the delegates and even more so the great crowds outside looked to Gandhi for leadership. The slogan Mahatma Gandhi ki Jai began to dominate the Indian political horizon.' (p.45-46).

 जवळजवळ दोनशे पानांच्या व अत्यंत व्यवस्थित मांडणी असलेल्या या पुस्तकात लोकमान्य व महात्मा गांधी यांच्याशी निगडित असलेल्या कित्येक हकिगती आल्या आहेत. तसं पाहता, हे पुस्तक फारसं मोठं नाही, पण त्यात आलेल्या माहितीचा व विषयांचा आवाका मात्र फार मोठा आहे. अशा पुस्तकाबद्दल थोडक्यात लिहिणं अत्यंत कठीण आहे, त्याकरता एक पुस्तिकाच लिहावी लागेल. वृत्तपत्रीय लिखाणाच्या मर्यादा लक्षात घेऊन मी त्याबद्दल लिहितो आहे.

टिळक हे मुख्यत: राजकीय पुढारी होते आणि त्या काळाच्या संदर्भात राजकीय दृष्ट्या कोणते धोरण स्वीकारायचे व कोणते नाही, याचे भान त्यांना होते. राजकीय पुढाऱ्याला जनतेला आपल्याबरोबर घेऊन जायचे असते व त्याकरता त्याला काही पथ्यं पाळावी लागतात, हे आपण लक्षात घेत नाही. त्यांच्या राजकीय जीवनातील पहिली काही वर्षे महाराष्ट्राशीच निगडित होती, त्यामुळे त्या भागातील लोकांच्या धार्मिक व सामाजिक संकल्पना लक्षात घेऊन त्यांनी राजकीय पथावर पावलं टाकली होती. टिळक मुळातच सनातनी व प्रतिगामी वृत्तीचे होते आणि त्याचा परिणाम त्यांच्या त्या वेळच्या धोरणांवर झाला, हे खरे नाही. टिळक हे राजकीय पुढारी होते, हे लक्षात घेऊनच त्यांची धोरणं आपण समजावून घेतली पाहिजेत.

टिळक मुस्लिम समाजाच्या विरुद्ध होते, असाही खोडसाळ प्रचार कधी कधी केला जातो. त्याकरता त्यांनी सुरू केलेल्या शिवाजी उत्सवाचा आधार देण्यात येतो. त्या उत्सवाची सुरुवात करण्यापूर्वी टिळकांनी जे पत्रक काढलं होतं, ते अशी टीका करणाऱ्यांनी जरूर वाचावं. शिवाजी-महाराजांनी मुस्लिम समाजालाही किती न्यायाची वागणूक दिली आणि  त्यांच्या सैन्यात व इतरत्र महत्त्वाच्या जागांवर कसे मुस्लिम अधिकारी होते, याचा त्यात उल्लेख आहे. बॅरिस्टर मोहम्मद अली जीना, हसरत मोहानी, मोहमद अली व शौकत अली व इतर मुस्लिम पुढाऱ्यांना टिळकांबद्दल अतिशय आदर होता, अशी इतिहासाची साक्ष आहे. लोकमान्य टिळकांबद्दल मुस्लिम सामाजाची काय धारणा होती, याचा उल्लेख चपळगावकरांनी खालील शब्दांत केला आहे :

‘लखनऊला झालेल्या हिंदू-मुस्लिम समझोत्यात टिळकांनी घेतलेला पुढाकार मुस्लिमांच्या मनात त्यांच्याबद्दल अधिक विश्वास व आदर निर्माण करणारा ठरला होता. त्यांच्या सभांना आता मुस्लिमही गर्दी करत. स्वत: टिळक गणपतीच्या मिरवणुकीत जसा भाग घेत, तसे ते मोहरमच्या मिरवणुकीतही भाग घेत. दि.10 मार्च 1918 रोजी मुस्लिम बहुसंख्यात असलेल्या भिवंडीमध्ये टिळक आले, तेव्हा झालेल्या सभेत मुस्लिम नगराध्यक्षांच्या हस्ते त्यांना पाच हजार रुपयांची थैली देण्यात आली, ही सरकारी गुप्तचरांनी नोंदवलेली माहिती य.दि. फडक्यांनी आपल्या पुस्तकात उद्‌‌धृत केली आहे.’ (लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी, पृ. 72) दि.23 मे 1920 रोजी लोकमान्य टिळकांनी 'Congress Democratic Party'  हे नाव असलेल्या पक्षाची स्थापना केली. या पक्षाचा जाहीरनामा वाचल्यास मुस्लिमांबाबत त्यांचे धोरण गांधींच्या धोरणापेक्षा वेगळे नव्हते, हे लक्षात येईल.

या पुस्तकात लेखकाने लोकमान्य टिळकांच्या राजकीय जीवनाचा इतिहास थोडक्या व नेमक्या शब्दांत सांगितला आहे. किंबहुना, साऱ्या पुस्तकाचे हे वैशिष्ट्य आहे. 1915 मध्ये भारतात परतल्यानंतर महात्मा गांधींनी राजकीय क्षेत्रात जे असामान्य कार्य केलं, त्याचाही लेखकाने आढावा घेतला आहे. 1916 पासून ते 1920 पर्यंत टिळक व गांधी यांनी भारताचा राजकीय रंगमंच गाजवला होता. हे पुस्तक मुख्यत: या काळावरच आधारित आहे. या काळाचा तपशील फार कमी लोकांना माहीत असल्यामुळे या पुस्तकाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. या पाच वर्षांच्या काळात दोन असामान्य पुढारी एकत्र वावरले आणि त्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न न करता देशहिताचाच विचार केला, हे कोणी तरी सांगण्याची अत्यंत गरज होती व ते काम न्यायमूर्ती चपळगावकर यांनी केले आहे. टिळकांची थोरवी व त्यांच्या मनाचा मोठेपणा व तसेच देशहिताबद्दल त्यांची कळकळ लेखकाने या शब्दांत व्यक्त केली आहे. : ‘महात्मा गांधींचे नेतृत्व हळूहळू उदयाला येत आहे, चळवळीच्या त्यांच्या मार्गाला लोकांचा पाठिंबाही मिळू लागलेला आहे, हे टिळकांना कळले होते. ‘केसरी’तील आपले सहकारी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्याशी केलेल्या हितगुजात आणि त्यापूर्वीही नव्या नेतृत्वाची चाहूल त्यांनी व्यक्त केली होती. गांधीजींचे नेतृत्व देश स्वीकारणार असेल, तर आपली भूमिका काय असेल याचाही टिळकांनी विचार केला होता. दुय्यम भूमिका स्वीकारण्याची तयारीही त्यांनी दाखवली होती. गांधीजींचे येऊ पाहणारे नेतृत्व थोपवण्याची त्यांची इच्छा नव्हती आणि ती ताकदही उरलेली नव्हती. या भवितव्यतेला कसे सामारे जावे, याचा टिळक विचार करीत असतानाच नियतीने त्यांना काळाच्या पडद्याआड नेले आणि हा प्रश्न सोडवला. या दोन्ही नेत्यांच्या परस्परांना समजून घेणाऱ्या धोरणामुळे भारताच्या राष्ट्रीय नेतृत्वातली टिळक-गांधी ही सांधेजोड अतिशय सुलभतेने पार पडली.’(पृष्ठ 7-8)

या विषयावर आपल्याला पुस्तक का लिहावेसे वाटले, याचे स्पष्टीकरण लेखकाने खालील शब्दांत केले आहे.

लोकमान्य टिळक शस्त्रांचा उपयोग करून भारतातील ब्रिटिश राज्य संपुष्टात आणावे या विचारसरणीचे होते, असा आभास निर्माण करण्यात येतो; पण वस्तुस्थिती मात्र त्याउलट होती. क्रांतिकारकांबद्दल त्यांच्या मनात ममत्वाची भावना होती व अडचणीच्या वेळी ते त्यांची  मदतही करीत, पण हिंसेच्या मार्गाने आपलं उद्दिष्ट साध्य करता येईल यावर त्यांचा विश्वास नव्हता. वासुदेव बळवंत फडक्यांचं अपयश त्यांच्या डोळ्यांसमोर होतं. पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिका-कॅनडात अस्तित्वात आलेल्या ‘गदर पार्टी’चे अपयशही त्यांनी अनुभवलं होतं. एखाद्या इंग्रज अधिकाऱ्याचीही हत्या केल्याने अगर बॉम्ब टाकून एखादी इमारत नष्ट केल्याने स्वातंत्र्य जवळ येते, असे टिळकांना अजिबात वाटत नव्हते.’ (लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी (पृ. 24) या पुस्तकातील पृष्ठ 25 व 26 वरील एक वाक्य अधिक महत्त्वाचे आहे व ते असे आहे- ‘थोडक्यात, लोकमान्य हिंसक मार्गाचा जाहीर पुरस्कार करीत नव्हते. अशा प्रकारच्या एकट्यादुकट्या प्रयत्नातून स्वातंत्र्य मिळणार नाही आणि सार्वत्रिक बंड करण्याची सध्या देशाची तयारी नाही, असे ते मानत होते. (हाच विचार पंडित नेहरूंनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून (लखनऊ काँग्रेस 1936) मांडला होता. (पंडित नेहरू : एक मागोवा - डॉ.न.गो. राजूरकर, प्रा. नरहर कुरुंदकर, दुसरी आवृत्ती, पृ. 44)

सुरत येथे 1907 मध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनात प्रचंड गोंधळ झाला आणि त्याचा परिणाम म्हणून जहाल मंडळी काँग्रेस संघटनेत येण्याचा मार्गच खुंटला. लोकमान्य टिळक या पक्षाचे सर्वश्रेष्ठ नेते होते. जहाल पक्षीयांना 1916 मध्ये काँग्रेसमध्ये परत प्रवेश मिळाला. 1916 हे वर्ष लोकमान्य टिळकांच्या राजकीय जीवनात महत्त्वाचे ठरले. याच वर्षी त्यांनी ‘होमरूल लीग’ची स्थापना केली व काँग्रेसमध्येही त्यांचा प्रवेश झाला. 26 डिसेंबर 1916 रोजी अंबिकाचरण मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेले अधिवेशन ऐतिहासिक महत्त्वाचे ठरले. मुस्लिम लीगचे अधिवेशनही याच वेळी लखनऊ येथे झाले आणि त्यातून काँग्रेस व लीगमधील लखनऊ करार जन्मला आहे. या कराराद्वारे काँग्रेसतर्फे मुस्लिमांना 1909 च्या कायद्यानुसार (Morley - Minto Reforms) देऊ करण्यात आलेल्या विभक्त मतदार संघांना मान्यता देण्यात आली. स्वतंत्र मतदारसंघाला मान्यता देऊन काँग्रेसने फार मोठी चूक केली, असे मानण्यात येते आणि टिळक त्या वेळी काँगे्रसचे सर्वश्रेष्ठ पुढारी असल्यामुळे त्याबाबत दोष टिळकांना देण्यात येतो. या संदर्भात न्या.चपळगावकर लिहितात : ‘स्वतंत्र मतदार संघ हा पुढच्या काळात भारताच्या फाळणीने निर्माण झालेल्या स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा पायाच होता. पुढच्या काळात निर्माण होऊ शकणारा हा धोका त्या वेळी कोणी लक्षात घेतला नाही. गांधीजींनी पुढच्या काळात अस्पृश्य मानल्या जाणाऱ्यांसाठी त्यांच्या लोकसंख्येतील प्रमाणापेक्षा अधिक जागा मान्य केल्या, पण त्यांना वेगळे मतदारसंघ देण्यास मात्र प्राणपणाने विरोध केला. त्यातले धोके नंतरच्या काळात लक्षात आले असावेत.’ (पृ. 64-65) लेखकाने मांडलेल्या विचारांबद्दल दुमत असण्याचे कारण नाही, पण त्या संदर्भात टिळकांची अडचण काय होती व त्याबरोबरच इंग्रजांविरुद्ध एकत्र येऊन लढा देणे त्यांना किती आवश्यक वाटत होते, या दोन गोष्टी आपण विचारात घ्याव्यात, असे मला वाटते. 1909 चा कायदा जेव्हा विचाराधीन होता, तेव्हा टिळक तुरुंगवास भोगत होते व त्यामुळे त्यांना त्याबद्दल काही करता येणे शक्य नव्हते. गोखले यांनी स्वतंत्र मतदारसंघ अत्यंत मर्यादित जागांबद्दल असावेत, असं सुचवलं होतं, पण त्यांच्या मताकडे मोर्ले यांनी दुर्लक्ष करून मुस्लिम लीगच्या पुढाऱ्यांनी केलेल्या स्वतंत्र मतदार संघाच्या मागणीला कायद्याचं स्वरूप दिलं होतं. लोकमान्य टिळकांनी व इतरांनी 1916 मध्ये विरोध केला असता, तर मुस्लिम समाज अधिकच बिथरला असता व त्यातून इंग्रजांच्या ‘तोडा आणि झोडा’ या धोरणाला खतपाणी मिळालं असतं आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला धोका निर्माण झाला असता. त्या वेळी एकीकडे आड व एकीकडे विहीर अशी परिस्थिती होती. एकूण परिस्थितीच्या संदर्भात स्वतंत्र मतदारसंघांना मान्यता देणं हेच योग्य, असं लोकमान्य टिळकांना व इतरांना का वाटलं असावं याबद्दलचा माझा विचार मी येथे व्यक्त केला आहे.

भारताच्या फाळणीला मोहमद अली जीनांमध्ये झालेला बदल व स्वतंत्र मतदारसंघ जबाबदार होते, का त्याला मुस्लिम समाजाची मानसिकता- याचा शोध विचारवंतांनी घ्यावा, असे मला प्रामाणिकपणे वाटते.

लोकमान्य टिळकांनी 1920 मध्ये स्थापन केलेल्या ‘काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टी’ या पक्षाच्या जाहीरनाम्यातून टिळक आपल्याला खऱ्या अर्थाने कळतात. गांधीजींशी त्यांचे काही मतभेद असूनसुद्धा वैचारिक मूल्यांच्या दृष्टीने ते गांधींच्या किती जवळ होते, हे आपल्या लक्षात येते.

शेवटी मला असं म्हणावंसं वाटतं की, अत्यंत वाचनीय असे हे पुस्तक आहे. लेखकाच्या अभ्यासू वृत्तीचा, तसेच संयमित व समतोलरीत्या विचार मांडण्याच्या पद्धतीचा प्रत्यय प्रत्येक पानावर येतो. लोकमान्य टिळक व महात्मा गांधींवरील हे पुस्तक या दोन महान व्यक्तींवर वेगळा प्रकाश टाकणारे आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या एका संस्मरणीय भागावर लिहिले गेलेले हे पुस्तक अभ्यासकांनी वाचावे. एवढेच नव्हे, तर ते आपल्या संग्रही ठेवावे, असे मला प्रामाणिकपणे वाटते. एका महत्त्वाच्या विषयावर उत्कृष्ट पुस्तक लिहिल्याबद्दल न्या.चपळगावकर अभिनंदनास पात्र आहेत. त्यांचे मित्र या पुस्तकाचे प्रकाशक (समकालीन प्रकाशन, पुणे) श्री.सुहास कुलकर्णी यांनी आपल्या ‘मनोगता’त पुस्तकाच्या विषयावर मननीय असे विचार मांडले आहेत, याचाही उल्लेख मला येथे आवर्जून करावासा वाटतो.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके