डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वर्तमानपत्रातील लेखनाला एका तात्कालिकतेचा संदर्भ असतो. त्यामुळे तो काळ गेला की ते लेखनही पुष्कळदा निर्माल्यवत होऊन जाते. परंतु काही फार थोडे पत्रकर्ते असे असतात की, त्यांचे लेखन कायम टवटवीत असते. असे लेखक केवळ तात्कालिक संदर्भापुरतेच लिहीत नाहीत. त्यापुढे जाऊन त्या विशिष्ट अशा घटिताच्या प्रेरणा कोणत्या होत्या, त्यातील एकूण मानवी वर्तन कसे होते, अशा एका व्यापक दृष्टीने संपादक लिहायला लागतात, तेव्हा ते लेखन सार्वकालिक होत जाते. शिवाय अशा संपादकांजवळ एक भाषिक सामर्थ्यही असते. अशा अगदी मोजक्या संपादकांमध्ये मुकुंदराव पाटील यांचा समावेश करावा लागतो. त्यांच्या लेखनातून तत्कालीन भारत- विशेषत: महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, धार्मिक इत्यादी बाबी दृग्गोचर होतात. म्हणून या लेखनाला केवळ ऐतिहासिक महत्त्व आहे, असे म्हणता येणार नाही, तर त्यातून समाजाचे अंत:प्रवाह आणि सार्वकालिक मानवी जीवनही प्रकट होताना दिसते.

दि.23 नोव्हेंबर 1910 रोजी मुकुंदराव पाटील यांनी ‘दीनमित्र’चा प्रारंभ केला. खरे म्हणजे ते पुनरुज्जीवनच होते. पहिल्या अंकात त्यांनी ‘दीनमित्र’संबंधी माहिती देताना कृष्णराव भालेकर आणि गणपतराव पाटील यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला असून त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे आपण वाटचाल करू, असे आश्वासन दिले आहे. तसेच आपले धोरण काय असेल, याची स्पष्ट नोंद त्यांनी केली आहे. ते म्हणतात,

‘थोडक्यात सांगायचे म्हणजे दीनमित्र पुढील नियमाप्रमाणे आपले धोरण सदैव ठेवण्याचा प्रयत्न करील.

1. स्वार्थी व निर्दय लोकांनी धर्माच्या शुद्ध तत्त्वात ढवळाढवळ करून, इतर हिंदू लोकांचा मनुष्यपणा पायाखाली तुडवीत आणला आहे. तो त्यांना प्राप्त करून देण्यासाठी शक्य तो उपाय सुचवीत जाईल.

2. इंग्रज सरकारच्या राज्यामुळे आमच्या या देशात मिळू लागलेल्या शांततेची आणि होऊ लागलेल्या सुधारणेची ओळख मागासलेल्या लोकांस पटवून देण्याचा प्रयत्न करीत जाईल.

3. पूर्वीच्या कोणत्याही राजांकडून कोणत्याही युगात कधीही न झालेला विद्याप्रसार व शांतता यास अडथळा करण्याच्या ज्या ज्या चळवळी उपस्थित होत जातील, त्या सर्वांचा पूर्ण निषेध करीत जाईल.

येणेप्रमाणे या खेड्यातील दीनमित्राचे धोरण राहणार आहे.’ (वर्ष 1 ले, अंक 1 - 23 नोव्हेंबर 1910)

मुकुंदराव पाटील यांनी जाहीर केलेले धोरण नीट समजून घेतले पाहिजे, म्हणजे तत्कालीन परिस्थिती आणि त्यातील ताणतणाव लक्षात येतील. इंग्रजांनी येथे जाती-धर्मातीत अशी सार्वजनिक शिक्षणाची सुविधा सुरू केली. त्यामुळे ज्यांना शिक्षण मिळू लागले, ते जीवनासंबंधी, आपल्या दु:स्थितीसंबंधी आणि शोषणासंबंधी विचार करू लागले. तसेच इंग्रजांनी शांतता प्रस्थापित केली, ही बहुजनांसाठी फार महत्त्वाची गोष्ट होती.

त्या काळात इंग्रजांबद्दल काही प्रमाणात विरोधी सूर लागत होता. विशेषत: राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनांमधून इंग्रजांविरुद्ध बोलले जाऊ लागले होते. चापेकरांसारखे अत्यंत प्रतिगामी वृत्तीचे लोक इंग्रजांविरुद्ध घातपाती कृत्ये करीत होते. या सगळ्यांमधून पुन्हा पेशवाई येईल आणि बहुजनांचा छळ होईल, अशी भीती अनेकांना होती. म्हणून अशा लोकांचा आपण निषेध करू, असे ते सांगतात. कारण स्वार्थी व निर्दय लोकांनी इतर हिंदू लोकांचा मनुष्यपणा पायाखाली तुडवीत आणला आहे, तसेच त्यांच्या सुधारणेचा प्रयत्न करू, असेही ते सांगत आहेत.

सत्ता कोणाची आहे, यापेक्षा सत्ता कशी आहे, हा मुकुंदराव पाटील यांच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. इंग्रजांपूर्वी भारतात सहाशे-साडेसहाशे लहान-मोठे राजे होते. त्यांनी लोकांच्या शिक्षणाच्या आणि इतर सोईंचा कधी विचार केला नाही. ते ख्यालीखुशालीत जगत होते. (अपवाद बडोदानरेश, औंधचे पंतप्रतिनिधी आणि कोल्हापूरचे शाहू छत्रपती) असल्या राजांपेक्षा माणसाकडे माणूस म्हणून पाहणारे इंग्रज बरे, अशीच तत्कालीन मानसिकता होती.

मुकुंदराव पाटील यांनी पहिल्या अंकात जी ध्येयधोरणे जाहीर केली- त्याप्रमाणे ते शेवटपर्यंत लेखन करीत राहिले. शेतकरी-कष्टकरी असा बहुजन समाज, दु:खात होरपळणारे अस्पृश्य आणि धर्माच्या ठेकेदारांकडून धर्माच्या नावावर होणारे शोषण ते शेवटपर्यंत उजागर करीत राहिले. यातून लोकजागृती करीत राहिले.

प्रारंभी काही वर्षे दर वर्षी वर्षाच्या प्रारंभीच्या अंकात आपले धोरण पुन:पुन्हा जाहीर करीत असत. अर्थात बदललेल्या सामाजिक स्थितिगतीचाही वेधही घेत. नव्या परिस्थितीत काय केले पाहिजे, ते नव्याने सांगत. कधी कधी ‘दीनमित्र’ चालू ठेवावे की नाही, याचाही कानोसा घेत. परंतु पुढे-पुढे मात्र हा शिरस्ता खंडित झालेला दिसतो. दोन-चार वर्षांनी कधी तरी पुन्हा आपल्या धोरणांचे स्मरण करून देत. खरे म्हणजे हे स्मरण जसे वाचकांसाठी असे, त्याप्रमाणे त्यांच्या स्वत:साठीही असावे, असे वाटते.

2.2 - मध्ययुगापर्यंत पूर्वजन्म, कर्मसंचित आणि देव अशा कल्पनांचा प्रभाव असल्यामुळे, तसेच लौकिक जीवन असार मानण्याचा उपदेश  सतत केला जात असल्यामुळे मानवी दु:खे ही सहन करण्यासाठीच असतात, हे समाजात पक्के ठसून बसलेले होते. त्यामुळे शूद्रातिशूद्रांची दु:खे असोत की स्त्रियांची दु:खे असोत- ती दैवजात असतात, असे मानले जात होते. एकोणिसाव्या शतकानंतर भारतात या दु:खाच्या मागे समाजव्यवस्था असते, धर्मही त्यासाठी कारण असू शकतो अशी जाणीव हळूहळू व्हायला लागली. मार्क्सवादाच्या उदयानंतर आर्थिक कारणे हीच प्रबळ असतात, याची चर्चा सुरू झाली; पण हे सर्व एकोणिसाव्या शतकाच्या उदयानंतरच झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाल-अपेष्टांची मध्ययुगात चर्चा होण्याचे कारणच नव्हते. अशी चर्चा भारतात इंग्रज आल्यानंतर सुरू झाली. शेतकऱ्यांनी भारतभर उठावही केले. म. फुले यांनी ‘शेतकऱ्यांचा आसूड’ लिहून शेतकऱ्यांच्या दु:खांना उजागर केले. येथून पुढे शेतकऱ्यांच्या संदर्भात साहित्य निर्माण व्हायला लागले, चळवळीही होऊ लागल्या. मुकुंदराव पाटील यांनी आपल्या ‘दीनमित्र’च्या ध्येयधोरणांमध्ये ज्याचा ‘मनुष्यपणा पायाखाली तुडविला गेला’ अशा जनसमूहांमध्ये सगळ्यात मोठा जनसमूह आहे, तो शेतकऱ्यांचा- त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांवर विपुल लिहिले आहे. आज शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या कमी झालेली असली तरी स्वातंत्र्यापूर्वी मात्र भारतातील सत्तर ते ऐंशी टक्के जनता शेतीवर अवलंबून होती. सगळ्यात मोठा महसूल हा शेतकऱ्यांकडूनच वसूल केला जात असे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांचा छळही होत असे. शेतकऱ्यांना उलटे टांगून मिरचीचा धूर कसा दिला जात असे, याची पेशवाईमधील पुष्कळ वर्णने अनेक ठिकाणी आलेली आहेत. किंबहुना असे म्हणता येईल की, राजाचे वैभव शेतकऱ्यांच्या लुटीतूनच निर्माण होत असे. तसेच शेतकरी हे राजाच्या चैनीसाठीच असतात असा राज्यकर्त्यांचा समज होता, अशी उपहासपर नोंदही मुकुंदराव पाटील करतात. याशिवाय शेतकऱ्यांच्या दुर्दशेस इतरही अनेक कारणे होती आणि आहेत. म्हणून सत्यशोधक समाजाने परिवर्तनाची जी कार्यक्रमपत्रिका तयार केलेली होती, त्यात शेतकरी अग्रक्रमाने होता. हा शेतकरी म्हणजे ‘शूद्रातिशूद्र’. शेतीशी संबंधित वेगवेगळ्या जाती असल्या तरी म. फुले यांच्या दृष्टीने आणि पुढे सत्यशोधकांच्या दृष्टीने शूद्रातिशूद्रच किंवा बहुजन. या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावे, सौख्य निर्माण व्हावे या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले.

मुकुंदराव पाटील यांनी ‘दीनमित्र’ काढले तेच मुळी सत्यशोधक विचारांच्या प्रसारासाठी आणि शूद्रातिशूद्रांच्या मुक्तीसाठी, शेतकऱ्यांच्या मुक्तीसाठी. त्या दृष्टीने त्यांनी आयुष्यभर लेखन केले. दि.23 नोव्हेंबर 1910 रोजी ‘दीनमित्र’चा प्रारंभ झाला आणि दुसऱ्याच आठवड्यामध्ये त्यांनी लिहिलेल्या अग्रलेखाचे शीर्षक आहे, ‘शेतकऱ्यांची निकृष्ट स्थिती व ती घालविण्याचे उपाय’. 1910 मधील या पहिल्या लेखापासून 1962 पर्यंतच्या उपलब्ध अंकांपर्यंत शेतकऱ्यांसंबंधी मुकुंदराव पाटील शेतकऱ्यांच्या दु:स्थिती-संबंधी अखंडपणे लिहीत होते. या पन्नास-बावन्न वर्षांमध्ये इंग्रजांची राजवट असो की स्वातंत्र्यानंतरची राजवट असो, शेतकऱ्यांच्या दु:स्थितीमध्ये फारसा फरक पडला नाही. किंबहुना, या दु:स्थितीमध्ये वाढच झाली, असे मुकुंदराव पाटील यांच्या लेखनातून दिसून येते.

शेतकऱ्यांच्या दु:स्थितीचे स्वरूप तर ते सांगतातच; पण वेळोवेळी उत्पन्न होणाऱ्या प्रश्नांमुळे शेतकऱ्यांच्या दु:स्थितीमध्ये कशी भर पडत गेली, याचाही ते विस्ताराने परामर्श घेतात. त्यावरील उपाययोजनाही सुचवितात.

अनावृष्टी, अतिवृष्टी आणि दुष्काळामुळे तर शेतकऱ्यांचे हाल होतातच; पण इतर वेळीसुद्धा शेतकऱ्यांची अवस्था काबाडकष्टाची आणि हाल-अपेष्टांचीच असते, हे मुकुंदराव पाटील आपल्या अग्रलेखांमधून पुन:पुन्हा प्रकट करतात. उदाहरणार्थ-,

‘...हिंदुस्थानात खरोखर दारिद्र्यावस्था भोगणारे असे लोक निराळेच आहेत. या लोकांचा वर्गही मोठा आहे. ह्या वर्गातील लोक दारिद्र्याने किती गांजलेले आहेत, त्यांचे पंचप्राण कसे व्याकूळ होतात, त्यांना उपासमारीत दिवस कसे काढावे लागतात व प्रसंगी अन्नान्न दशा होऊन ते कसे मरतात, ह्याची इंग्लिश लोकांना बरोबर कल्पनासुद्धा करता येणार नाही. हा वर्ग गरीब शेतकऱ्यांचा होय. दुष्काळाचे स्वरूप भयंकर होऊन सरकारचे तिकडे लक्ष जरी वेधले नसले, तरी ह्या गरीब लोकांची ही उपासमार चालूच असते. ह्यात विशेष आश्चर्य वाटण्याजोगी गोष्ट ही की, ह्या लोकांच्या अंगी सहनशक्ती म्हणजे काही अनुपम असते. ते आठवड्याचे आठवडे, महिन्याचे महिने, दिवसरात्र काबाडकष्ट करून कालक्रमणा करीत असतातच. ते दिवसानुदिवस खंगत जातात. शहरात राहणाऱ्या गरीब लोकांप्रमाणे त्यांना काही आश्रयस्थान नसते व अक्षरश: ते निराश्रित असतात... जेथे शेतकऱ्यांची वस्ती मोठी, तेथे सर्वच स्थिती निराळी असते. तेथे सर्व लोक एक धंदा करणारे असे असतात. या सर्व लोकांची संपन्नावस्था किंवा विपन्नावस्था एकाच धंद्यावर अवलंबून राहते व सर्वच लोक दरिद्री अशी स्थिती असते...’ (‘हिंदुस्थानातील गरीब शेतकरी’, दि. 28 डिसेंबर 1927, खंड 4.)

काळ बदलत गेला तरी शेतकऱ्यांच्या विपन्नावस्थेचे स्वरूप साधारणत: वरीलप्रमाणे असते, असे मुकुंदराव अनेक अग्रलेखांमधून सांगतात. पाऊस पडलाच नाही तरी शेतकरी अडचणीत येतो आणि खूप पडला तरी तो अडचणीत येतो. हवा तेव्हा आणि हवा तसा पाऊस पडणे ही केवळ दुर्मिळ गोष्ट असते. अशा प्रकारे नैसर्गिक कारणांमुळे तर तो अडचणीत येतोच; पण याशिवाय आणखी दोन महत्त्वाच्या कारणांचा निर्देश मुकुंदराव पाटील करतात. त्यापैकी एक म्हणजे- शासन वेळोवेळी जे निर्णय घेते, त्यामुळेही शेतकऱ्यांच्या दु:स्थितीत मोठीच भर पडत जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे- धार्मिक जंजाळात अडकून तो स्वत:चे शोषण करून घेतो.

जुन्या काळापासून शेतीसंबंधित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी एक व्यवस्था निर्माण करण्यात आलेली होती. म्हणजे गावाची शांतता व सुव्यवस्था पाहण्याचे काम पाटलांकडे होते, तर शेतीसंबंधीच्या नोंदी करण्याचे काम कुलकर्ण्यांकडे होते. हे कुलकर्णी त्या-त्या गावचे असत आणि परंपरेने त्यांच्याकडे कुलकर्णीपण येत असे. म्हणजे त्या-त्या गावच्या शेतीशी संबंधित सर्व नोंदी कुलकर्ण्यांच्या दप्तरी असत. गावातील पाटलांसह सर्वच शूद्रातिशूद्र म्हणजे शेतकरी आदी मंडळी संपूर्णत: अशिक्षित. कुलकर्णी हा त्या भागातील अधिकृत शासकीय प्रतिनिधी. शिकलेला. लिहिता-वाचता येणारा. शिवाय उच्चवर्णीय. उच्चवर्णीय म्हणून लोक त्याच्याकडे आदराने पाहतच. शिवाय महत्त्वाचा हुद्दा. अशा परिस्थितीत हे कुलकर्णी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करीत. पिकांच्या खोट्या नोंदी करणे, सारा वसूल करणाऱ्यांची दिशाभूल करणे, कर्ज देणाऱ्या सावकारांना शेतकऱ्यांविरोधात मदत करणे अशा असंख्य गोष्टी कुलकर्णी करीत असे किंवा तो म्हणेल ती पूर्वदिशा असे. यातून शेतकऱ्यांचा छळच होत असे.

‘दीनमित्र’चा प्रारंभ झाल्यानंतर या कुलकर्णी वतनासंबंधी मुकुंदराव पाटील यांनी लिहावयास प्रारंभ केला. शेतकऱ्यांना कुलकर्णी कसा त्रास देतात, यासंबंधीचे सलग पाच लेख त्यांनी लिहिले. हे लेख विदारक वास्तवाचे दर्शन घडविणारे होते. (पुढे या कुलकर्णीपणासंबंधी त्यांनी ‘कुलकर्णी लीलामृत’ नावाचे उपहासगर्भ काव्यही लिहिले. ते अतिशय परिणामकारक असल्यामुळे शेतकऱ्यांच्या छळाकडे लक्ष वेधून घेणारे ठरले.) शासनाचे आणि समाजातील जाणत्यांचे लक्ष या समस्येकडे वेधले गेले, परंतु या साऱ्याच प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाला. वस्तुत: हा सगळा प्रश्न एका व्यवस्थेच्या संदर्भातील होता. पुढे कुलकर्णी वतन खालसा झाले. मुकुंदराव पाटील यांनी सुचविल्याप्रमाणे तलाठ्यांच्या नेमणुका सुरू झाल्या. अशा प्रकारे कुलकर्णी वतन रद्द करून तलाठी नेमण्याची पद्धती छत्रपती शाहू-महाराजांनी दि. 2 मार्च 1918 रोजीच त्यांच्या संस्थानात सुरू केलेली होती, याची नोंद येथे केली पाहिजे. (नानासाहेब साळुंखे : शाहूंच्या आठवणी, वृषाली, कोल्हापूर, 2016) हे सरकारी पद बदल्या होणारे आणि परीक्षा घेऊन भरले जाणारे. म्हणजे वंशपरंपरागत नाही. परिणामी, गावोगावचे कुलकर्णी अधिकारविहीन झाले. अशा अवस्थेत ‘केसरी’सारखी प्रस्थापित व्यवस्थेची बाजू घेणारी वृत्तपत्रे कुलकर्णी वतनाच्या बाजूने उभी राहिली. वादविवाद सुरू झाले. या विवादामागील सामाजिक आणि जातीय दाह मुकुंदराव पाटील यांनी लिहिलेल्या ‘केसरीचा दाह’ या दोन लेखांवरून लक्षात येतो.

कुलकर्णी वतनाचा प्रश्न मुकुंदराव पाटील यांनी बराच लावून धरला. पुढे तलाठ्यांच्या नेमणुका सुरू झाल्यानंतरही काही कुलकर्ण्यांच्या तलाठी म्हणून नेमणुका झाल्या. तेव्हा अशा कुलकर्ण्यांच्या बदल्या झाल्या पाहिजेत, असा आग्रह मुकुंदराव पाटील यांनी धरलेला दिसतो. हे सारे मुकुंदराव पाटील यांनी शेतकऱ्यांची छळातून सुटका व्हावी, म्हणूनच केले.

शासकीय व्यवस्थेचा आणि शेतकऱ्यांचा संबंध शेतसारा भरण्यासंदर्भात येतो. विशेषत: दुष्काळाच्या काळात सारा कमी करण्याच्या संदर्भात पिकांच्या नोंदी तपासल्या जातात. याबाबतही मुकुंदराव पाटील अनेक सूचना करतात. विशेषत: शासकीय अधिकाऱ्यांवर विसंबून न राहता या नोंदी करताना गावातील लोकांनाही मदतीला घ्यावे, अशी एक सूचना ते करतात. तसेच वेगवेगळ्या गावांत वेगवेगळी परिस्थिती असते, याची जाणीव सरकारी अधिकाऱ्यांना नसते. त्यातूनही शेतकऱ्यांवर अन्याय होतो. तेव्हा गावाप्रमाणे नोंदी केल्या पाहिजेत, अशीही एक महत्त्वाची सूचना मुकुंदराव पाटील करतात. व्यापारी मात्र उत्पन्नाप्रमाणे कर भरतात, पण शेतकऱ्यांना मात्र ठरावीक शेतसारा भरावाच लागतो, असेही ते सांगतात.

शेतकऱ्यांच्या संदर्भातील मुकुंदराव पाटील यांचे आणि ‘दीनमित्र’चे हे कार्य बहुमोल आहे. कायम स्मरणात ठेवले जाणारे आहे.

शेतीमालाचे योग्य भाव न मिळणे ही भारतातील एक जुन्या काळापासूनची समस्या आहे. आजही ही समस्या  तशीच आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावेत यासाठी सरकार मदत तर करीतच नाही, उलट शेतमालाच्या संदर्भात मनमानेल तसे निर्णय घेतले जातात, हे मुकुंदराव पाटील आवर्जून आणि पुन:पुन्हा मांडतात. उदा. ‘साखरेचा कडवट भाव’ (खंड 10) या लेखात ते परदेशातील साखरेच्या उत्पादनाची किंमत आणि भारतातील साखरेच्या उत्पादनाची किंमत यात 300 रुपयांचा फरक असल्याचे सांगतात. म्हणजे भारतातील साखरेचे उत्पादन 300 रुपयांनी महाग पडते. ही वाढीव किंमत आम्ही शेतकऱ्यांना देतो, असे कारखानदार सांगतात, परंतु वस्तुस्थिती तशी नसल्याचेही मुकुंदराव पाटील स्पष्टपणे सांगतात आणि साखर कारखानदारांची लबाडी सूचकपणे उघड करतात. सरकारच्या आयात-निर्यात धोरणांवरही शेतीमालाचे बाजारभाव कमी-अधिक होत असतात. एका वर्षी परदेशी साखर मागविण्यात आली, व्यापाऱ्यांनी साठवून ठेवलेली साखर बाजारात आणली. परिणामी, शेतकऱ्यांचे नुकसानच झाले. एका वर्षी आखूड धाग्याचा कापूस घ्यायचा नाही, असे कारखानदारांनी ठरविले आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले. म्हणजे शासनाने घेतलेले निर्णय तर शेतकऱ्यांना जाचक होतातच, पण व्यापारी आणि कारखानदार यांच्या अडवणूक करणाऱ्या स्वार्थी वृत्तीची झळ शेवटी शेतकऱ्यांनाच सोसावी लागते. असे जेव्हा जेव्हा होते, तेव्हा तेव्हा मुकुंदराव पाटील संघर्षाची भूमिका घेतात. शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहतात. अशा वेळी त्यांच्या लेखणीला धार येते.

शासकीय निर्णयामुळे शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनावर परिणाम तर होतोच, पण एकूण राष्ट्रावरही परिणाम होतो, हे मुकुंदराव पाटील आपल्या अग्रलेखांतून वेळोवेळी सांगतातच; पण काही वेळा शेती, शेतकरी आणि एकूण राष्ट्राच्या दृष्टीने दूरगामी परिणाम करणारे निर्णय शासनाकडून घेतले जातात, त्याचे काय परिणाम होतात, ते मुकुंदराव पाटील विस्ताराने आणि समस्येच्या अंतरंगात शिरून सांगतात. उदा. स्वातंत्र्यपूर्व काळात अन्नधान्याची गंभीर टंचाई निर्माण झाली तेव्हा सरकार लेव्ही म्हणून शेतकऱ्यांकडून धान्य घेऊ लागले. यात पुष्कळशी बळजबरी तर होतीच, पण शेतकरी कुटुंबाला वर्षभर पुरेल एवढेसुद्धा धान्य ठेवले जात नव्हते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा काही काळ या लेव्हीची वसुली होत होती. याबाबतीत शेतकऱ्यांनी थोडासुद्धा विरोध करता कामा नये, अशी सरकारची (म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांची) भूमिका होती. त्यातून एरंडगावी गोळीबार झाला. ‘दीनमित्र’च्या आठव्या खंडामध्ये ‘एरंडगाव गोळीबार चौकशी’ हा या संदर्भातील महत्त्वाचा लेख आहे. इतर काही लेखांमध्येही त्यांनी या लेव्ही प्रकाराचा ऊहापोह केला आहे. राष्ट्राला जेव्हा आवश्यकता असेल, तेव्हा शेतकऱ्यांनी राष्ट्राला मदत केली पाहिजे, अशीच भूमिका मुकुंदराव पाटील यांची आहे; पण त्यासाठी शेतकऱ्यांचा छळ कशासाठी आणि त्याला काही इच्छा, आकांक्षा असतात की नाही, असा एक मूलभूत प्रश्न ते उपस्थित करतात. असाच आणखी एक प्रश्न  म्हणजे शेतीच्या छोट्या-छोट्या तुकड्यांचा. असे छोटे-छोटे तुकडे कसण्याच्या दृष्टीने कठीण असतात. म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळात शासन असा विचार करत होते की, हे छोटे तुकडे शेतीच्या मोठ्या तुकड्यास जोडले जावेत. म्हणजे मोठ्या शेतकऱ्यांनी हे छोटे तुकडे विकत घ्यावेत. याचा एक अर्थ असा झाला की, छोट्या शेतकऱ्यांकडे काहीच असणार नाही. यातून शेतकऱ्यांचा आणि शेतीचा काहीही फायदा होणार नाही, हे मुकुंदराव पाटील ठामपणे सांगतात. एवढेच नाही तर सामुदायिक शेतीचे प्रयोग केले पाहिजेत असे स्वातंत्र्यानंतर पं.जवाहरलाल नेहरू यांचे म्हणणे होते. (ही कल्पना डॉ.आंबेडकर यांनीही मांडलेली होती) पं.नेहरू यांच्यावर समाजवादी समाजरचनेचा प्रभाव असल्यामुळे अशी कल्पना मांडत आहेत, हे मुकुंदराव पाटील यांनी नेमके ओळखले आणि सामुदायिक शेतीमध्ये कोणकोणत्या अडचणी येऊ शकतील, याचीही चर्चा ते करतात. परंतु कूळ कायदा लागू झाल्यानंतर जी चर्चा केली आहे, ती अधिक मूलगामी आहे. तसेच कोणाकडे किती जमीन असावी, याचेही प्रमाण ठरविण्यात आले. येथेही मुकुंदराव पाटील म्हणतात की- एखाद्याकडे विपुल जमीन असावी आणि दुसऱ्याकडे टिचभरही जमीन असू नये, हे मूलत:च अन्यायकारक आहे. म्हणजे त्यांची सहानुभूती भूमिहीनांच्या बाजूने आहे. तरीही काही प्रश्न त्यांनी परखडपणे विचारले आहेत, ते फार फार महत्त्वाचे आहेत. ते म्हणतात, जमिनीचे वाटप झाले म्हणजे उत्पन्न वाढते का? ज्यांना जमीन दिली जाते, त्यांना वहितीसाठी पैसा नको का? या आणि अशा प्रश्नांपेक्षाही आणखी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनींचे वाटप करता तसे श्रीमंतांच्या तिजोरीतील पैशांचे का वाटप करीत नाही? श्रीमंतांना हात न लावता केवळ शेतकऱ्यांच्या शेतीचे वाटप करणे अन्यायकारकच आहे, हे कोणीही कबूल करील. म्हणून अशा सगळ्या गोष्टींना ते ‘नवे कायदेशीर लफडे’ (खंड 10) म्हणतात.

असाच दृष्टिकोन ‘भूदाना’च्या चळवळीबद्दल मुकुंदराव पाटील व्यक्त करतात. आचार्य विनोबा भावे यांनी ही भूदानाची चळवळ सुरू केलेली होती. ज्यांच्याकडे अतिरिक्त जमिनी आहेत, त्या त्यांनी दान म्हणून द्याव्यात. त्यासाठी ते पदयात्रा करीत. मग हे दान भूमिहीनांना केले जाईल.

वस्तुत: हैदराबाद राज्यात शेतकऱ्यांनी जमीनदारांविरोधात सशस्त्र लढा उभा केला होता. त्यातून अनेक जमीनदार मारले गेले. ह्या लढ्याचे नेतृत्व डाव्या विचारांच्या नेतृत्वाने केले होते. त्याची प्रतिक्रिया म्हणजे आचार्य विनोबा भावेंची ही ‘भूदाना’साठीची ‘पदयात्रा’ होती. या बाबीची नोंद मुकुंदराव पाटील करीत नसले, तरी या चळवळीवर त्यांनी घेतलेले आक्षेप अतिशय मूलभूत स्वरूपाचे आहेत. त्यांचे महत्त्वाचे आक्षेप म्हणजे- ‘भूदान’ आणि ‘पदयात्रा’ यामधील ‘दान’ व ‘यात्रा’ अशा पारंपरिक धार्मिक अर्थवाहक शब्दांमुळे समाजात अंधश्रद्धा वाढण्यास मदत होते. तसेच विभूतिपूजा वाढण्यासही मदत होते. कुठल्याही प्रकारची विभूतिपूजा आणि अंधश्रद्धा मुकुंदराव पाटील यांना अजिबात मान्य नाही. भूदानावरील दुसरा महत्त्वाचा आक्षेप म्हणजे- ‘भूदान’ मागता, तसे श्रीमंतांच्या तिजोरीतील अधिकच्या पैशाचे दान का मागितले जात नाही? म्हणजे कूळ कायद्याच्या निमित्ताने होणारे जमिनीचे वाटप असो की, भूदानाच्या निमित्ताने होणारे जमिनीचे दान असो- दोन्ही ठिकाणी शेतकरीच आहे; परंतु श्रीमंत, व्यापारी, उद्योगपती अशांकडे असणाऱ्या अतिरिक्त संपत्तीचे का वाटप होत नाही? वस्तुत: मुकुंदराव पाटील हे साम्यवादी विचारसरणीचे टीकाकार आहेत, विरोधक आहेत; परंतु त्यांनी विचारलेला प्रश्न मात्र अत्यंत मूलभूत आहे. व्यवस्थेत जे दुबळे असतात, त्यांच्यासंबंधी विरोधी निर्णयही घेतले जात असतात, हेच मुकुंदराव पाटील सूचित करीत आहेत. शिवाय निवडणुकांच्या संदर्भात विचार करताना ते म्हणतात, ‘सरकारमध्ये व्यापारी बसलेले आहेत, शेतकरी नाहीत’ त्यामुळे शेतकऱ्यांबद्दलचे भले-बुरे निर्णय सरकार म्हणून ते घेऊ शकतात, असे ते शेतकऱ्यांशी संवाद साधताना लिहितात. (‘सत्ता आणि शेतकरी’, खंड 7)

आचार्य विनोबा भावे यांच्या भूदानाबद्दल मूलभूत आक्षेप घेतल्यानंतर काही आनुषंगिक बाबींचाही ते निर्देश करतात. म्हणजे विनोबांच्या पदयात्रेसाठी शासकीय मदत का पुरविली जाते? या यात्रेमध्ये विनोबांची पुस्तके खपविण्याचा दबाव सरकारी अधिकारी आणि पुढाऱ्यांवर का टाकला जातो आहे? ते ‘येत आहेत, जात आहेत’ (खंड 10) अशा प्रसिद्धीमधून बुवाबाजी वाढत नाही काय? त्यांच्या सोबतचे खूप सारे फुकटे लोक केवळ ऐश करायला मिळते, म्हणून पदयात्रेत सहभागी झाले नाहीत काय? पदयात्रेतील लोकांना गोडधोड जेवणाची अपेक्षा काय म्हणून आहे? हे आणि यांसारखे प्रश्न मुकुंदराव पाटील उपस्थित करतात आणि आचार्य विनोबा भावे यांच्या पदयात्रेला आलेल्या बुवाबाजीचे रूप ते औपरोधिक भाषेत प्रकट करतात. तसेच आता भूदान, ग्रामदान असल्या चळवळींची गरज नाही; तर विनोबांनी मिळालेली थोडी तरी जमीन स्वत: कसावी, पिकवावी आणि अन्नदान करावे, असेही ते सांगतात. एकंदरीत हा सगळाच प्रकार अंतिमत: फारसा फलदायी होणार नाही, असेच त्यांना सुचवायचे आहे.

या चळवळीतील भाबड्या भक्तांची आणि त्यांच्या हास्यास्पद वर्तनाची नोंदही मुकुंदराव पाटील एका अग्रलेखात करतात. गोवा मुक्ती संग्रामाच्या काळात एका सर्वोदयी नेत्याने पोर्तुगालच्या शासनाला पत्र पाठवून मागणी केली होती की, ‘गोवा हे राज्य’ भूदान म्हणून त्यांनी सर्वोदयी चळवळीला (म्हणजे विनोबांना) दान करावे. (म्हणजे भारतामध्ये गोवा सामील होण्याचा प्रश्नच नाही) हे दान शंभर वर्षांसाठी असावे. तेथे सर्वोदयाचे प्रयोग करण्यात येतील. म्हणजे तोपर्यंत त्या सरकारने हस्तक्षेप करता कामा नये.

मुकुंदराव पाटील म्हणतात, आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही ताणतणाव असतात, याची जाणीवच या लोकांना नाही.

म्हणजे शेती व शेतकऱ्यांसंबंधी शासनाने घेतलेले निर्णय असोत की, तत्कालीन परिस्थितीमध्ये उपस्थित झालेले काही ताण-तणाव, चळवळी असोत- त्यामुळे शेतकऱ्यांचे जगणे अधिकाधिक दु:स्थितीकडे जाते आहे, हेच मुकुंदराव पाटील पुन:पुन्हा सप्रमाण सांगतात. या संदर्भात ‘शेतीचा धंदा’ (खंड 1), ‘कठीण प्रसंग’ (खंड 2), ‘शेतकऱ्यांनी कसे जगायचे?’ (खंड 3), ‘शेती नव्हे, शेतकरी सुधारा’ (खंड 4), ‘खेडी हीच राष्ट्राची प्रकृती’ (खंड 5), ‘शेतकऱ्यांचे दैन्य निवारण कसे होणार? 1, 2, 3’ (खंड 6), ‘शेतकऱ्यांचा सोशिकपणा’ (खंड 6), ‘शेतकऱ्यांसाठी 1, 2, 3’ (खंड 7), ‘शेतकरी देवतेचे रक्षण करा!’ (खंड 8), ‘शेतकऱ्यांची अधोगती आणि जळवांची प्रगती’ (खंड 10).

येथे अगदीच निवडक लेखांचा उल्लेख केला आहे. याशिवायही मुकुंदराव पाटील यांचे शेतकरीविषयक लेखन विपुल आहे.

शेतकऱ्यांचे जीवन अधिकाधिक दु:खमय होण्याचे कारण म्हणजे त्यांच्यामधील अंधश्रद्धा, धार्मिक समज-अपसमज आणि त्यामुळे त्यांचे पुरोहितांकडून होणारे शोषण हे एक महत्त्वाचे कारण होय. शेतकऱ्यांचा कर्मकांडांत जाणारा पैसा, त्यांचा दैवावर असणाऱ्या विश्वासामुळे आत्मविश्वास हरवणे यांसारख्या गोष्टींचा निर्देश करून म.फुले यांच्या काळापासून शेतकऱ्यांनी मुक्त व्हावे हे पुन:पुन्हा सांगितले गेलेले दिसते. उदा. शेतकऱ्यांना उपदेश करताना कृष्णराव भालेकरांनी शेतकऱ्यांनी दैव संकल्पनेपासून स्वत:ची सुटका करून घ्यावी, अन्यथा दैव त्यांच्या उरावर बसेल, असे सांगितल्याचे दिसते. त्याहीपूर्वी ‘तृतीय रत्न’ नाटकामधून शेतकऱ्यांचे अज्ञान आणि त्याचे पुरोहितांकडून होणारे शोषण म.फुले यांनी प्रकट केलेले आहे. याचा अर्थ सत्यशोधक समाजाला धर्म मान्य नाही, असे नाही (त्यांच्या धर्ममीमांसेचा विचार पुढे करावयाचाच आहे); मात्र धर्माच्या नावाने होणारे शोषण त्यांना मान्य नाही. या संदर्भात मुकुंदराव पाटील यांची लेखणी अधिकच धारदार होताना दिसते. कारण लोकजागृती करणे हा तिचा हेतू आहे.

शेतकरी, बहुजन वर्ग (आणि अस्पृश्य वर्गही) विकृत धर्मकल्पनांमुळे शोषला जातो. त्याला धर्ममार्तंडांची जशी संमती असते, तशीच शासनाची म्हणजे राजाचीही संमती असते आणि हे पूर्वपरंपरेने शेतकऱ्यांसह सर्वांच्याच मनात ठासून बसविलेले आहे, हे मुकुंदराव पाटील अनेक अग्रलेखांमधून सांगतात.

शेतकरी उपाशी मरताना शेतकऱ्यांच्या जीवावर चैन करणाऱ्या धर्ममार्तंडांना काहीही दु:ख होत नाही याचे फार विदारक चित्र ते एका अग्रलेखात रेखाटतात- ‘डोक्यावर चिंध्याचांध्यांची बोचकी घेतली आहेत, पाठीशी बांधलेली मुले रडत आहेत, रस्त्याने उघडी-नागडी पोरे फरफटत चालली आहेत, म्हातारी माणसे काठी टेकीत ठेचकाळत आहेत, अशी शेकडो कुटुंबे सडकेवर दिसतात. पोटात अन्न नसल्यामुळे ही माणसे प्रवासात कुठल्या मुक्कामावर कधी मरतील याचा नेम चांगल्या ज्योतिषासही सांगता येणार नाही. नाही तरी जोतिष्यांना पुढचे काही सांगताच येत नाही, हे अशा दुष्काळावरून वारंवार व्यक्त होत असते.

‘अशा प्रकारे दुष्काळाच्या तापात माणसे आणि जनावरे तडफडत असल्याचे स्पष्ट दिसत असता, महाराष्ट्रातील समस्त महाथोर बुवा महाराज अनंत कोटी ब्रह्मांडपती हे काय करून आहेत? दगडातून पाणी काढणारे महाराज आज कोणीकडे गेले? आज दुष्काळाच्या वेळी ठिकठिकाणच्या डोंगर-दगडांतून जर हे महाराज पाणी काढतील, तर त्या पाण्यावर किती तरी शेते पिकतील आणि किती तरी जनावरे जगतील... यांना जर दुष्काळात वीतभर जमीन भिजविण्याइतके  पाणी काढून दाखविता येत नाही, तर महाराजपणा काय कामाचा? तसेच शिऱ्याच्या कढाया शिजविणारे आणि हजारो सत्यनारायण घालून चमत्कार दाखविणारे नारायण महाराज कुठे दडले, ते समजत नाही. एका कढईत हजारो माणसे जेवली तरी शिरा संपत नाही, असा चमत्कार करून दाखविणारे महाराज आज ऐन दुष्काळाच्या प्रसंगी कुठे तोंड लपवून बसले? शिरा राहिला, साध्या मीठ-भाकरीचे ढीग जरी या महाराजांनी निर्माण केले,’ तरी महाराजांचे शिष्य सर्वजण बनतीलच बनतील, पण प्रत्यक्ष सरकारही शिष्य बनेल... तेव्हा महाराजांनो, या वेळी तुम्ही कुठे आहात? हजारो प्राणी क्षुधेने तडफडत मरत आहेत, त्यांना वाचविण्यासाठी धावा.’- (‘महाराजांनो, कुठे आहात?’, 11 नोव्हेंबर 1936, खंड 6) येथे तीव्र दुष्काळामध्ये धर्ममार्तंडांचा काही उपयोग होत नाही, हे तर ते सांगतच आहेत, पण धर्ममार्तंडांच्या चमत्कारांमागील खोटेपणाही ते उघड करून त्यांच्या सदसद्‌विवेकालाही मुकुंदराव पाटील आवाहन करीत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील अत्यंत छोट्या खेड्यामधून मुकुंदराव पाटील यांनी ‘दीनमित्र’ हे पत्र अर्धशतकापेक्षा अधिक काळ एकहाती चालविले. तेथे सुविधा कुठल्या नव्हत्याच, पण जाहिराती नाही की कुणाचा आश्रय नाही. त्यामुळे मुकुंदराव पाटील यांच्या पत्रकारितेला एक निर्भीड रूप प्राप्त होत गेले. स्वातंत्र्यापूर्वी ते जसे निर्भीडपणे लिहीत होते, तेवढ्याच निर्भीडपणे स्वातंत्र्यानंतरही त्यांची लेखणी चालत होती. त्याचे कारण असे की, ते कुठल्या पक्षाचे सदस्य नव्हते की, कुठल्या मोठ्या नेत्याचे अनुगामित्व करणारेही होते. म्हणून ते म.गांधी, पं.नेहरू यांच्यापासून यशवंतराव चव्हाण यांच्यापर्यंत सर्वांच्या कार्यावर टीका करू शकले होते. त्याचे कारण कोणते म्हणाल, तर त्यांची ध्येयवादी वृत्ती. मुळात सत्यशोधक विचारांच्या प्रसारासाठी तसेच ग्रामीणांच्या, बहुजनांच्या आणि अस्पृश्यांच्या जागृतीसाठी ‘दीनमित्र’ सुरू झालेले असल्यामुळे मुकुंदराव पाटील यांना कुणाच्या राग-लोभाची पर्वा करण्याचे कारण नव्हते. एका अर्थाने आपल्या विचारांवर ठाम असलेला पत्रकार कायम विरोधी पक्षात असतो, तसे मुकुंदराव पाटील यांचे होते, असे म्हणावयास हरकत नाही. त्यामुळे कुठलीही घटना असो अगर व्यक्ती असो- तिचा बहुजनांवर काय परिणाम होईल, अस्पृश्यांच्या मुक्तीसाठी उपयोग होईल का, हे पाहणे मुकुंदराव पाटील यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. म्हणून त्यांचा प्रत्येक अग्रलेख काही तरी नवा विचार देणारा, नवी दिशा देणारा आणि तेवढाच अर्थपूर्ण असायचा. हे तेव्हाच घडते, जेव्हा एक उच्च प्रकारचा ध्येयवाद त्या व्यक्तिमत्त्वाकडे असतो.

वर्तमानपत्रातील लेखनाला एका तात्कालिकतेचा संदर्भ असतो. त्यामुळे तो काळ गेला की ते लेखनही पुष्कळदा निर्माल्यवत होऊन जाते. परंतु काही फार थोडे पत्रकर्ते असे असतात की, त्यांचे लेखन कायम टवटवीत असते. असे लेखक केवळ तात्कालिक संदर्भापुरतेच लिहीत नाहीत. त्यापुढे जाऊन त्या विशिष्ट अशा घटिताच्या प्रेरणा कोणत्या होत्या, त्यातील एकूण मानवी वर्तन कसे होते, अशा एका व्यापक दृष्टीने संपादक लिहायला लागतात, तेव्हा ते लेखन सार्वकालिक होत जाते. शिवाय अशा संपादकांजवळ एक भाषिक सामर्थ्यही असते. अशा अगदी मोजक्या संपादकांमध्ये मुकुंदराव पाटील यांचा समावेश करावा लागतो. लो.टिळक, कृष्णशास्त्री चिपळूणकर, गो.ग. आगरकर, म.गांधी, डॉ.आंबेडकर यांच्या संपादकीय लेखनाला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच मुकुंदराव पाटील यांच्या लेखनालाही आहे. त्यांच्या लेखनातून तत्कालीन भारत- विशेषत: महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, धार्मिक इत्यादी बाबी दृग्गोचर होतात. म्हणून या लेखनाला केवळ ऐतिहासिक महत्त्व आहे, असे म्हणता येणार नाही, तर त्यातून समाजाचे अंत:प्रवाह आणि सार्वकालिक मानवी जीवनही प्रकट होताना दिसते. त्यामुळे मुकुंदराव पाटील यांच्या लेखनामध्ये पुष्कळदा लालित्यही अवतरते. (ते एक श्रेष्ठ प्रतीचे ललित लेखक आहेत, याचा निर्देश यापूर्वी केलाच आहे.)

वृत्तपत्राच्या संपादकाला सतत सजग राहावे लागते. नजर चौफेर ठेवावी लागते. वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करावा लागतो. मुकुंदराव पाटील इतक्या छोट्या खेड्यात राहूनही सर्व प्रकारची माहिती मिळवीत असत, असे त्यांचे अग्रलेख वाचू लागलो की लक्षात येते. स्वत:ची अन्वेषण दृष्टी तर हवीच असते, पण प्रबळ तर्कबुद्धीही असणे गरजेचे असते. हे सारे मुकुंदराव पाटील यांच्याकडे आहे. शिवाय चांगल्या संपादकाला आपल्या काळाचे नीट वाचन करता यायला हवे. आपल्या काळाचे वाचन ज्या संपादकाला करता येते, त्यास भविष्याबद्दल चिंतन करता येते. तसेच काहीसे द्रष्टेपणही अशा संपादकांकडे असते. उदा.- चीन भारतावर आक्रमण करू शकेल, रशियाचे भविष्यकाळात तुकडे होऊ शकतात. (‘आंधळा भलेपणा’, खंड 10) अशी भाकिते ते करतात व ती पुढे खरी झालेली दिसतात. तसेच म. गांधी यांचा खून केला जाऊ शकतो, हेही त्यांनी किमान तीन-चार वेळा सांगितलेले आहे.  उदा.- ‘परंतु राउंड टेबल परिषदेची बैठक यशस्वी झाल्यावर या भुतावळीस दुसरा उद्योग काही न उरल्यास, हे म. गांधींवर झडप घालतील असे आमचे अंधुक भविष्य आहे... त्यांची धार्मिक व सामाजिक मते कशी काय आहेत, हे आता सर्वांस कळून चुकलेच आहे. महार-मुसलमानांचे हातचे खाण्यात चातुर्वर्ण्याची हानी होते, असे त्यांना मुळीच वाटत नाही. तेव्हा, म. गांधींचे सबगोलंकारी विचार या भुतावळीला मुळीच पटणार नाहीत आणि ते आपले मूळचे रूप प्रकट केल्याशिवाय राहणार नाहीत.’ (‘एक अंधुक भविष्य’, 19 ऑगस्ट 1931, खंड 4) अर्थात हे भाकितही देशाच्या दुर्दैवाने खरे ठरलेले आहे.

आपल्या देशातील भविष्यकालीन माणूस सुखी-समृद्ध व्हावा, या दृष्टीने त्यांचे कायम चिंतन असते. याचा अर्थ असा की, ‘दीनमित्र’ हे साप्ताहिक ग्रामीण भागातून प्रकाशित होत असले तरी एकूण समाजालाच ‘प्रबुद्ध’ करण्याची पात्रता बाळगून आहे. फक्त या कर्तबगार संपादकाची महाराष्ट्राने घोर उपेक्षा केली, हे मात्र कटू असले तरी सत्य आहे.

(‘विचारकिरण’च्या प्रस्तावनेतील काही भाग)

Tags: अग्रलेख दारिद्र्य शेतकरी बहुजन दीनमित्र विचार किरण मुकुंदराव पाटील weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके