डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

आमचं निरीक्षण, बोलणं सुरू असताना मुलं वहीवर, पाटीवर लिहिलेलं बार्इंना दाखवत होती. मी विचारलं, ‘तुम्ही मुलांना काय लिहायला सांगितलंय?’ बाई म्हणाल्या, ‘त्यांच्या मनाचं इंग्रजीतलं कोणतंही वाक्य. आपण सांगितलेलं लिहिण्यापेक्षा त्यांच्या मनाचं त्यांनी लिहिण्यात किती मजा.’ य.गो. जोशींनी ‘ठोकळ्याचं चित्र’ या कथेध्ये ठोकळ्याचं चित्र काढायला सांगितलं असताना पोपटाचं चित्र काढणाऱ्या मुलाचं गुरुजींनी कौतुक केल्याचं दाखवलंय. त्या गुरुजींचं रूप मला बार्इंध्ये दिसलं.  

  

दुपारी 2.05 वाजता उपळीच्या शाळेसमोर पोहोचलो. शाळेच्या कुंपणाच्या आत केळी फोफावलेल्या, दोन केळींना भलेोठे घड लगडले होते. प्लास्टिकच्या ठिक्यात घड घातलेले. कोकरांनी दुध पिऊ नये म्हणून शेळीच्या कासेला पिशवी बांधतात तसं ते दिसत होतं. फोटो काढण्याचा मोह मला आवरता आला नाही. नंतर एका घडाची पिशवी काढून एक फोटो घेतला.

केळीशेजारी पपईची तीन झाडं. चांगली दहा-बारा फूट उंचीची झाडं. दोन झाडांना पपया लगडलेल्या. मधल्या झाडाला एकही पपई नव्हती. आमचं निरीक्षण सुरू होतं, तोपर्यंत उज्ज्वला ढाणे या शिक्षिका आल्या. त्यांना त्याबद्दल विचारलं, तर त्या म्हणाल्या, ‘या झाडाला एकोणचाळीस पपया लागल्या होत्या. ओझ्यानं झाड कललं. जमिनीला टेकलं. म्हणून पपया काढल्या. झाड परत उभं केलं. आता झाडानं परत मूळं मातीत रुतवली आहेत.’

शेजारी पाण्याची टाकी होती. कट्‌ट्यावर साबण ठेवला होता. हात धुवून मुलं दुपारच्या भाताचा आस्वाद घ्यायला जात होती. सांडपाणी झाडांना जात होतं. कुंपणाजवळ पाणी साठत होतं. तिथं आळूची लागवड केली होती. शेजारी छोटीशी परसबाग होती.

शाळेच्या टेपरेकॉर्डरवरती गीत सुरू होतं, हा देश माझा.

माझा देश शेतीप्रधान आहे. शेती कशी करतात याचं छोट्या शेतीत छोट्यांचे सहज शिक्षण.

शाळेत इयता पहिली ते चौथीचे वर्ग. 18 मुले, 12 मुली. भारताचं छोटं रूप. सर्वच शाळांत मुलींचं प्रमाण कमी दिसतंय. सहा मुलांना बायको शोधायला दूरदेशी जावं लागणार.

शाळेत जराही गडबड गोंधळ नव्हता. गप्प बसा, दंगा करू नका अशी कसलीही सूचना ऐकू आली नाही. शैक्षणिक उठावातून दुपारचा आहार घेण्यासाठी मोठ्या प्लेट घेण्यात आल्या आहेत.

बऱ्याच शाळांत भात संपत नाही, मुले खात नाहीत अशी तक्रार असते. त्याचं कारण असतं तो मुलांचा छोटा डबा किंवा डब्याचं झाकण. त्यात भात घेतला जातो. त्यात किती भात मावणार? दुसऱ्यांदा जाऊन मागून घेणं, रांगेत उभं राहणं आलं. छोट्या झाकणातून खाताना खरकटं सांडणं आलंच.

बार्इंनी मोठ्या प्लेट घेतल्या, मग खरकटं कसं सांडेल?

दोन-चार मुलींनी वाढून घेतलेलं. त्या रांगेत बसलेल्या.

मी विचारलं, ‘गप्प का बसलाय? भात खायला सुरुवात करा.’

‘सर्वांनी वाढून घेतल्यावर आम्ही जेवतो’, चिमुरडी चुणचुणीत ऋतुजा म्हणाली.

सर्वांनी वाढून घेतल्यावर मुलांनी सामुदायिक ‘वदनी कवल घेता...’ म्हटलं आणि खायला सुरुवात केली.

दत्ता-संतोषच्या चपाती-भाजीबरोबर आम्ही भाताचीही चव घेतली. प्रत्येक मुलाजवळ त्याचा स्वत:चा रुमाल आहे. हात पुसायला, तोंड पुसायला मुले तो वापरतात. आम्ही वर्गात बाकावर बसलो होतो. शैक्षणिक उठावातून उज्ज्वला ढाणे आणि शिवाजी मोरे यांनी शाळेला लाकडी बाक मिळवलेत आणि केंद्रप्रमुखांनी जाहीर केलेलं हजार रुपयांचं बक्षीसही प्रथम पटकावलं.

तिसरीतला सुयोग आमच्याजवळ रेंगाळला होता.  त्याला परसबागेचं विचारलं. त्यानं मसालामाती कशी करतात ते सांगितलं. दोन मुली प्रदर्शन फलकासमोर बसल्या होत्या. त्यावर वर्तानपत्रातलं लहान मुलांचं पान लावलेलं होतं. त्याचं वाचन सुरू होतं.

वऱ्हांड्यात आलो. काही मुलं वऱ्हांडा झाडत होती. मी विचारलं, ‘तुम्ही का झाडताय?’ तर तो छोटा म्हणाला, ‘आज आमच्याकडे वर्ग आणि वऱ्हांडा आहे.’ मला अर्थबोध झाला नाही.

बार्इंना विचारलं, तर म्हणाल्या, ‘इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे सहा गट केले आहेत. रोज वेगळं काम दिलं जातं. दुपार, मैदान परिपाठ, पाणी, शौचालय, वर्ग वऱ्हांडा असे गट.’  शिवाय वर्गातले अभ्यासाचे गट वर्गनिहाय वेगळे होते. सांघीक कृती, सहकार्य, निकोप स्पर्धा, आत्मविश्वास, जबाबदारीची जाणीव काय-काय शिकवलं जातं या शाळेत! आणि तेही आपण शिकतोय हे न कळता, सहज.

इशा पवार वऱ्हांड्यात मुलांना एका ट्रेमधील बालवाचनालयाची पुस्तकं देत होती. पुस्तकांचा अवतार बघितल्यावर कळत होतं की यांची दोस्ती मुलांबरोबर झालीय. एक छोटा मोठ्यानं वाचत होता. तेही अडखळत. त्याचं नाव गौरव. मी म्हटलं, ‘किती मोठ्यानं वाचतोस! दुसऱ्यांना त्रास होतोय.’ त्यानं आवाज लहान केला. चौकशी केली, तर तो पहिलीत होता. या मुलांना ‘वाचाल तर वाचाल’ म्हणून सांगण्याची आवश्यकता राहणार नाही. रसास्वाद आणि वाचनातला शाश्वत आनंद तेच इतरांना सांगतील. या वयात झालेली पुस्तकांशी दोस्ती कायम राहील. बालपणाचे सोबती आपल्या आठवणीत राहतात. ही मुले अभिमानाने म्हणतील, ‘ग्रंथ आमुचे सोबती.’

शिवाजी पवार हे शिक्षक रजेवर होते. त्यामुळे सर्व मुले एकाच वर्गात बसली. प्रत्येकाचं काम स्वतंत्रपणे सुरू होतं. पहिलीची मुलं स्वाध्यायपुस्तिका सोडवत होती. मी बार्इंना विचारलं, ‘किती मुलं प्रगत आहेत.’ बाई म्हणाल्या, पहिलीतला गौरव वगळता सर्व प्रगत आहेत. तो जरा मंद आहे.’

थोड्या वेळापूर्वी मोठ्यानं पुस्तक वाचणारा गौरव. मी त्यांच्याजवळ गेलो. ‘काय करतोयस?’ मी विचारलं. तर त्यानं स्वाध्याय पुस्तिकेतल्या शब्दावर बोट ठेवून त्याचं नाव तिथं लिहिल्याचं दाखवलं.

मी म्हटलं, ‘अरे व्वा! गौरवचं नाव पुस्तकात छापलंय.’ गौरव खुष.

त्यानं लगेच भिंतीकडे बोट केलं. तिथंही माझं नाव लिहिलंय. मी बघितलं. फळ्यावर गुणगौरव असं लिहिलं होतं. एवढ्या सर्व लिखाणातून त्यानं आपलं नाव शोधलं होतं आणि ते वाचून या पहिलीतल्या मुलाची आत्मप्रतिष्ठा जागृत झाली होती. ‘स्व’ची जाणीव झाली होती. मी बार्इंना थोडं दुरुस्त केलं, ‘गौरव मंद नाही. कदाचित तो गतीमंद असेल, पण माझ्या दृष्टीनं तो गौरवास प्राप्त आहे.

आमचं निरीक्षण, बोलणं सुरू असताना मुलं वहीवर, पाटीवर लिहिलेलं बार्इंना दाखवत होती.

मी विचारलं, ‘तुम्ही मुलांना काय लिहायला सांगितलंय?’

बाई म्हणाल्या, ‘त्यांच्या मनाचं इंग्रजीतलं कोणतंही वाक्य. आपण सांगितलेलं लिहिण्यापेक्षा त्यांच्या मनाचं त्यांनी लिहिण्यात किती मजा.’

य.गो. जोशींनी ‘ठोकळ्याचं चित्र’ या कथेध्ये ठोकळ्याचं चित्र काढायला सांगितलं असताना पोपटाचं चित्र काढणाऱ्या मुलाचं गुरुजींनी कौतुक केल्याचं दाखवलंय. त्या गुरुजींचं रूप मला बार्इंध्ये दिसलं.

तिसरीतल्या मुलानं लिहिलं होतं, This is box दुसरीतल्या मुलानं लिहिलं होतं, This is my pen

बापरे! हे आम्ही आठवीत शिकलो होतो.

तिसरीतील दहा पैकी दहा मुलं आणि दुसरीतील पाच पैकी पाच मुलं अशी छोटी वाक्यं लिहू शकतात. सहज शिक्षण देणारे हे शिक्षक नक्कीच गौरवास पात्र आहेत.

Tags: बाग गट शिक्षक शाळा उपळी garden group teacher school - Upali weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नामदेव माळी,  सांगली, महाराष्ट्र
namdeosmali@gmail.com

शिक्षण क्षेत्रात वर्ग दोनचे अधिकारी, कादंबरीकार व शैक्षणिक लेखक.


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात