डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

शाळेच्या परिसरात आंबा, शेवगा, कडुलिंब, केळी, नारळ, लिंबू, बदाम, फणस, सिताफळ, चिक्कू, पेरू या झाडांची लागवड केली  आहे. शाळेच्या पाण्याच्या टाकीतील पाणी ठिबकसिंचन पद्धतीने झाडांना दिलं जातं. परसबागेत पालेभाज्या, फळभाज्यांचं उत्पादन घेतलं जातं. आजही मेथीचा एक वाफा आणि मिरच्यांनी लगडलेली झाडं दिसली. छोटंसं ग्रीनहाऊसही शाळेत आहे. शाळेसमोर फुलझाडांबरोबर औषधी वनस्पतींची बाग केली आहे. या बागेत अडुळसा, तुळस, गवती चहा, कोरफड, मेंदी, लिंबू, कढीपत्ता, पानफुटी, पुदीना, आले, सब्जा या औषधी वनस्पती आहेत. औषधी वनस्पतींचं दर्शन घेऊन आम्ही वऱ्हांड्यात आलो.

आष्ट्याच्या शाळेच्या गेटवर आंब्याचा हिरवागार वृक्ष तुमचं स्वागत करतो. तुमच्याकडे पाहून बागेतली फुलं हसतात. मग तुमचं मन आनंदाने नाचू लागतं. ध्वजारोहणाच्या कट्‌ट्याभोवतालची फुलं फेर धरून नाचताहेत असं वाटतं.

यापूर्वी एका रविवारी मी आणि प्रतिभा भराडे यांनी या शाळेला भेट दिली होती. शिक्षकांना आम्ही शाळेकडे जाणार आहोत याची कल्पना नव्हती. आम्ही शाळेत गेल्यावर जवळपासच्या मुलांना गोळा केलं. तिसरीतली स्नेहल गायकवाड आणि चौथीतल्या अभिषेक भोसलेनं शाळा खोल्या उघडल्या. खेड्यात वर्गखोल्यांच्या चाव्या मुलांकडेच असतात.

कार्यालयात दोर टांगलेला आम्हांला दिसला. दोर कशासाठी टांगला आहे, हे माहीत असूनही दोर का टांगलाय असं मुलांना विचारलं.

मुलं म्हणाली, ‘ही मल्लखांबाची दोरी आहे. ’

‘दोरीवर कोण चढेल’ म्हणून विचारलं, तर मुलं मी-मी म्हणू लागली.

शाळेत शिक्षक नसताना मुलांनी आम्हांला दोरीवर चढून दाखवलं होतं. दोरीवर विविध प्रकारची आसनं करून दाखवली. मुलांनी शाळेची माहिती दिली होती.

आम्ही शाळेतून बाहेर पडताना तिसरीतल्या स्नेहलने आणि पहिलीतल्या गौरवने फूल देऊन, नमस्कार करून आमचे आभार मानले होते. कोणीही न सांगता त्यांनी ही कृती केली होती. संस्कार अंगवळणी पडले होते. म्हणून या शाळेविषयी मला आकर्षण होतं.

आज शिक्षक उपस्थित असताना मी आलो होतो. साधना कदम आणि मनीषा शिरटावसे या शाळेत अध्यापनाचे काम करतात. या दोन शिक्षकांनी गावकऱ्यांच्या मदतीने दोन एकरांचा शाळेचा परिसर फुलवला आहे. हिरवागार केला आहे.

शाळेच्या परिसरात आंबा, शेवगा, कडुलिंब, केळी, नारळ, लिंबू, बदाम, फणस, सिताफळ, चिक्कू, पेरू या झाडांची लागवड केली  आहे. शाळेच्या पाण्याच्या टाकीतील पाणी ठिबकसिंचन पद्धतीने झाडांना दिलं जातं. परसबागेत पालेभाज्या, फळभाज्यांचं उत्पादन घेतलं जातं. आजही मेथीचा एक वाफा आणि मिरच्यांनी लगडलेली झाडं दिसली. छोटंसं ग्रीनहाऊसही शाळेत आहे.

शाळेसमोर फुलझाडांबरोबर औषधी वनस्पतींची बाग केली आहे. या बागेत अडुळसा, तुळस, गवती चहा, कोरफड, मेंदी, लिंबू, कढीपत्ता, पानफुटी, पुदीना, आले, सब्जा या औषधी वनस्पती आहेत. औषधी वनस्पतींचं दर्शन घेऊन आम्ही वऱ्हांड्यात आलो.

व्हरांड्यात चप्पल स्टँड ठेवलं होतं. मुलांनी स्टँडध्ये ओळीनं चपला ठेवल्या होत्या. आम्ही कार्यालयात आलो.

बार्इंनी दोरीवरच्या मल्लखांबावरती कसरत करणाऱ्या मुलांना बोलावलं. खोलीत आढ्याला दोर बांधलेला होता. खाली काथ्याची गादी टाकली. दुसरी ते चौथीच्या मुलांनी एवढ्याशा दोरीवरती जमिनीवर योगासने केल्याप्रमाणे स्ट्रॅडलर क्रॉस, निद्रासन, हनुंतासन, एका पायाची रिकीब, दोन पायांची रिकीब, क्रॉस रिकीब, पर्वतासन, गवराई, पश्चिमोत्तानासन, पदमासन इत्यादी आसनं दाखवली. ही नावं मला मुलांच्याकडून कळली.

फुलं देऊन माझे आभार मानणारा साडेपाच-सहा वर्षांचा पहिलीतील गौरव खारोटीसारखा सरसर दोरीवरती चढत होता. तो आठ-दहा फूट उंच लीलया चढला. तेवढ्याच सफाईदारपणे खाली उतरला. केवढा आत्मविश्वास! केवढं धाडस निर्माण केलं बार्इंनी! वर्गसजावट, वर्गरचना उत्तम. समोर फळ्याजवळ आरसा. मी कसा दिसतो? अध्ययन कोपरे, शैक्षणिक साधनांचं स्वाध्याय कार्डसचं रॅक गणेश उत्सवात आरास केल्याप्रमाणे सजवलेलं. झिरमुळ्या किंवा  पताकांनी नव्हे, तर शब्द कार्डस्‌, अक्षर कार्डस्‌चा वापर करून.

मनीषा मॅडमकडे इयत्ता चौथीचा वर्ग आहे. पट 10 आहे. 7 मुलं इंग्रजी उत्तम वाचतात. पाठांतर केलेलं नव्हे. पुस्तकातील आपण बोट ठेवू ती ओळ.

संतोष पवार कातकऱ्याचं पोर, झोपडीत राहणारं. पालक मासे पकडून, मजुरी करून उदरनिर्वाह करतात. अज्ञान, अनारोग्य, दारूचं व्यसन त्यांच्या पाचवीला पुजलं आहे. संतोषला बार्इंनी शिक्षणाची गोडी लावलीय. संतोष इंग्रजी वाचतोय. कातकरी समाजातील मुलं एवढं वाचू शकतील असं आपल्याला प्रथमदर्शनी वाटत नाही. ‘काय भुललासी वरलिया रंगा, ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा’, असं संतोषकडे आणि या शाळेतल्या कातकऱ्यांच्या इतर मुलांकडे बघितलं की वाटतं.

या शाळेत कातकऱ्यांची चौदा मुलं शिकत आहेत. ज्या तीन मुलांना वाचता येत नाही, (सात मुलांच्या मानाने ती अप्रगत आहेत.) त्या मुलांनी नुकताच या शाळेत प्रवेश घेतला आहे. अद्याप त्यांचे दाखलेही मिळालेले नाहीत. ही आश्रमशाळेत राहतात. त्यांच्यासाठीही बार्इंचे प्रयत्न सुरू आहेत.

त्यांच्याकडे पूर्वीपासून असलेल्या 100 टक्के मुलांची त्यांनी इंग्रजीची तयारी करून घेतली आहे. इंग्रजीची तयारी आहे म्हणजे इतर विषयांचीही असणारच. मला बार्इंचा हेवा वाटला. ऱ्हाइम्समध्ये अडकलेलं पहिलीपासूनचं इंग्रजी मनीषानं पुढे नेलंय.

मी विचारलं, ‘तुम्हांला हे कसं काय शक्य झालं?’

मनीषा मॅडम म्हणाल्या, ‘इंग्रजीमध्ये एम.ए. केलंय. नोकरी लागल्यानंतर एम.ए. केलंय. जून ते ऑगस्ट, दुसरी ते चौथीच्या मुलांची ए टु झेड पर्यंत उच्चारांची तयारी करून घेते. समान उच्चाराचे शब्द घटवून घेते. ‘गार्डन ऑफ वर्डस’मधील 50 शब्दांचा ज्या त्या वेळी सराव घेते. या शब्दांचा सराव झाला की वाचन करणं सोपं जातं. याच शब्दांचा वापर करून पाठ तयार केले आहेत. शासनाने पुरविलेल्या My first English Marathi Dictionary चा वापर करते. शिवाय Happy Reading, Happy
Writing  या पुस्तकाचा वापर करते.’ मनीषा मॅडमनी मला ते रंगीत चित्रांचं आकर्षक पुस्तक दाखवलं.

हे सगळं हाताशी असतं, पण करण्याची प्रबळ इच्छा महत्त्वाची असते. ती मनीषाजवळ आहे. म्हणून तर चौथीमध्ये शिक्षकांच्या पाठोपाठ विद्यार्थ्यांनी इंग्रजी म्हणावं असं असताना स्वत: वाचण्याइतकी विद्यार्थ्यांची तयारी झाली आहे.

या विद्यार्थ्यांना 100 पैकी 125, 150 गुण का मिळू नयेत? एवढं असूनही माझ्या मनात प्रश्न होताच. मी मनीषाला विचारलं, ‘इतर खूप उपक्रम राबवूनही इतका चांगला दर्जा कसा काय आहे?’ यावर ती म्हणाली, ‘आम्ही दोघी एकमतानं काम करतो. त्यांनी एखादा मुद्दा मांडला तर समजून घेऊन आम्ही काम करतो. माझंही बाई ऐकून घेतात.’

 ‘हे आहेच, पण मुलांची तयारी कशी होते?’

‘आम्ही सरावाला अधिक वेळ देतो. शेवटच्या मुलाला कळेपर्यंत सराव घेतो. मुलं गटात सराव करतात. एकमेकांना मदत करतात. प्रत्येक गटात दोन तरी हुशार विद्यार्थी आहेत. ते शिक्षकाचं काम करतात. एकदा शिकवणं म्हणजे दोनदा शिकणं होतं. शिक्षकांच्यापेक्षा हुशार मुलांनी शिकवलेलंच चटकन समजतं मुलांना. गरज पडल्यास ते शिक्षकांची मदत घेतात.’

‘आणखी काय?’

‘उद्या शिकवायचा भाग मुलांना घरून वाचून यायला सांगतो. समजून घ्या, अवघड वाटेल ते विचारा. इतिहास, भूगोल, विज्ञान या विषयांना ही पद्धत आम्ही वापरतो. दिवसाची सुरुवात काल काय शिकलो, घरी काय केलं, दिलेला अभ्यास केला का, यानं होते.’

स्वयंअध्ययन यापेक्षा काय असतं?  इथं शिकवण्यापेक्षा शिकण्याला अधिक महत्त्व दिलंय. शिकण्यास योग्य परिस्थिती निर्माण केलीय आणि सगळं कसं आपलेपणानं, कोणताही आवेश न बाळगता. अगदी सहज. माझ्या मनात विचार सुरू होता.

मनीषा पुढं म्हणाली, ‘पालकांचं शाळेला सहकार्य आहे. शिक्षकांच्यावर विश्वास आहे.’

उगीच कोण कोणावर विश्वास टाकतो? विश्वास ही देण्याघेण्याची गोष्ट आहे. शिक्षकांनी विश्वास दिला म्हणून पालकांनी दिला. शिक्षकांनी अविश्वास दिला असता तर त्यांनीही अविश्वास दिला असता. धरण बांधल्यामुळे विस्थापित झालेले लोक आहेत हे. पोळलेल्या लोकांचं इथं डोंगराच्या कुशीत पुनर्वसन झालंय. उन्हाळाभर पाणी पुरेल की नाही याची शाश्वती नाही. पुनर्वसन ही सहज सोपी गोष्ट नाही. विश्वास पाटलांची ‘झाडाझडती’ ही कादंबरी वाचली म्हणजे कळतं, काय होरपळ असते ती.

या झाडाझडतीमुळे विस्थापितांचा प्रस्थापितांवरचा विश्वास उडाला असणं साहजिक आहे. परंतु शिक्षकांवरचा समाजाचा विश्वास अजूनही आहे. तो टिकविण्याचं काम साधना, मनीषा यांच्यासारख्या शिक्षिका करतात. मुलांच्यासमोर नारळ देऊन शाळेनं आणि अंगणवाडी तार्इंनी माझा सत्कार केला. अंगणवाडी स्वच्छ, सुंदर आहे. मी गौरव आणि स्नेहलचं नारळ व फूल देऊन कौतुक केलं. मी यापूर्वी शाळेला भेट दिली होती, त्या दिवसाची सर्व मुलांना आठवण सांगितली.

कातकरी समाजातल्या मुलांनी, कष्टकऱ्यांच्या मुलांनी, वंचित घटकातील मुलांनी शिकावं म्हणून या दोघी शिक्षिका धडपडतात. मुलांना शेतीचं ज्ञान देतात, इमू पक्ष्याचा प्रकल्प दाखवतात. मानवी मनोरे उभे करतात. तळमळीनं चाललंय सगळं. आपण वेगळं काही करतोय असं त्यांना वाटत नाही. खरं तर सावित्रीबार्इंनी सुरू केलेलं काम त्या पुढे नेत आहेत. सावित्रीच्या या लेकींना हृदयापासून सलाम!

Tags: मनीषा शिरटावसे साधना कदम दोरीवरचा मल्लखांब इंग्रजीची तयारी पुनर्वसन विस्थापित Manisha Shiratvasse sadhana kadam English preparation rehabilitation displacement weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नामदेव माळी,  सांगली, महाराष्ट्र
namdeosmali@gmail.com

शिक्षण क्षेत्रात वर्ग दोनचे अधिकारी, कादंबरीकार व शैक्षणिक लेखक.


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात