डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

मार्क्स न वाचताही मार्क्सवादाच्या जवळ

‘एखाद्या अर्थशास्त्र्याने चांगले काम केले, तर त्याला पुढचा जन्म भौतिकशास्त्र्याचा मिळतो. जर काम चांगले नसेल, तर मात्र तो पुढच्या जन्मी समाजशास्त्री होतो.’ जसे; ‘‘तुमचा जीडीपी वाढण्याने समाजाचे भले होते हे पटत नसेल, तर तुम्ही ‘डावे’ आहात.’’ या प्रकारे सतत चर्चांमध्ये डोकावणारे आजचे विश्व-3 मला अस्वस्थ करते. जसे; आरक्षण, affirmative action वगैरेंसारखी धोरणे मार्क्सच्या ‘विषमांना विषम वागणूक देऊनच समतेकडे जाता येते’ या मतातून घडली आहेत, हे नाकारले जाते. तर आजचे, मार्क्सच्या द्विशताब्दीच्या वेळचे विश्व-3 मार्क्सचेही आहे, जरी तसा उल्लेख करणेही त्या विश्वाला नावडते आहे. एक गंमत वाटते की, मार्क्स न वाचताही माझ्यासारखे अनेक जण मार्क्सवादाजवळ गेले आहेत. हो, विश्व-3 एकच पायवाट नाही, गंगा- ब्रह्मपुत्र जसे सहाशे मुखांनी समुद्राला भेटतात तसे आपणही हजार तऱ्हांनी वास्तवाला भिडू पाहतो. आणि यांपैकी शेकडो वाटांवर चालताना वाटाड्या म्हणून मार्क्स असतो!

दाढी-मिशा-जटाधारी एक माणूस. गांधी-टिळकच नव्हे, तर गोखले-रानड्यांच्याही आधी जन्मलेला. आज असता तर दोनशे वर्षे पार करून असता. बहुतेक भारतीयांनी त्याचे नाव ऐकलेलेही नसते. ऐकून असणाऱ्यांपैकी बहुतेकांना तो कामगारनेता होता, कामगारांना ‘एकी करा, बंधने तोडा’ अशी चिथावणी देणारा होता, नक्षलवादाचा जनक असलेला हिंस्र क्रांतिकारक होता असे वाटते. नाव ऐकलेल्यांपैकी काहींना मात्र तो तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, इतिहासाचा अर्थ लावणे या ज्ञानशाखांमधला दादा माणूस वाटतो. हा होता/आहे कार्ल मार्क्स. ‘कम्युनिस्ट जाहीरनामा’ सोडून मी मार्क्सचे काहीही वाचलेले नाही. त्याच्या लिखाणाची टीका-समीक्षा करणारे प्रचंड साहित्यही मी वाचलेले नाही. पण यार- दोस्तांमध्ये मार्क्सचा टिळा लावणारे अनेक ‘वारकरी’ आहेत. त्यांपैकी एकाने काही वर्षांपूर्वी जॉन लँचेस्टर या पत्रकार-साहित्यिकाचा ‘मार्क्स ॲट 193’ (लंडन रिव्ह्यू ऑफ बुक्स, 5 एप्रिल 2012) हा लेख मला अग्रेषित केला. माझा घर क्रमांक 193 आहे, या पोरकट कारणामुळे मी तो वाचला. वाचताना करतो तसा मैत्रीपूर्ण संवादही केला. आज वारकरी मित्रांच्या एका प्रकल्पासाठी मूळ लेख रीमिक्स करत, पुस्त्या जोडत, हुज्जत घालत हा लेख घडवतो आहे. माझी मते व पुस्त्या चौरस कंसात आहेत, तर इतर सारे लँचेस्टरच्या म्हणण्याचे माझे आकलन आहे.

अरिष्टचक्रे

पैसा म्हणजे काय? त्याचे ‘मूल्य’ कुठून येते? वस्तू कशा बनतात? त्यांची पैशांतली किंमत कशी ठरते? वस्तू बनवण्यात गुंतलेल्या वेगवेगळ्या लोकांना किमतींचा किती भाग मिळतो? हे भाग कसे ठरतात? यातल्या सर्व प्रश्नांवर मार्क्सने भरपूर, सर्वांगीण आणि ताजा विचार केला. त्यातून अर्थव्यवहाराबद्दल एक चित्र घडले. लँचेस्टर अर्कचित्रासारख्या लेखणीच्या मोजक्या फटकाऱ्यांमधून हे चित्र देतो. मीही ‘जार्गन’ टाळत तसेच चित्र मराठीतून देण्याचा प्रयत्न करतो आहे.

वस्तू घडवण्यासाठी अनेक कामगारांनी केलेली मेहनत लागते. या कामगारांचे पगार हाच त्या वस्तूंचा उत्पादनखर्च  असतो. म्हणजे वस्तू हे कामगारश्रमाचे मूर्त रूप असते आणि तिचा उत्पादनखर्च हे कामगारश्रमाचे पैशांतले मूर्त रूप असते. एखादी वस्तू घडण्याला अनेक उपवस्तू लागतात. खुरपे बनवायला लोखंड आणि लाकूड लागते आणि वर घडणावळ लागते. तेव्हा लोखंड बनवणाऱ्यांची मेहनत, लाकूड उगवणाऱ्यांची मेहनत, घडवणाऱ्यांची मेहनत यांची बेरीज म्हणजे वस्तूचा खर्च. लोखंड, लाकूड, घडवण्यात वापरलेली अवजारे, साऱ्यांचा तपशिलातला उत्पादनखर्च आपण तपासू शकतो. उत्तर मात्र तेच असते. सर्व कामगारांच्या मेहनतीचे मूर्त रूप म्हणजे खुरपे. सेवांनाही वस्तूंसारखेच मेहनतीत मोजता येते आणि त्यांचे खर्चही मेहनतीच्या पगारांच्या बेरजेतून कळतात. आजच्या GST जमान्यात वस्तू आणि सेवा या दोन्ही ‘क्रयवस्तू’, विकाऊ ‘वस्तू’, कमोडिटीज आहेत, हे भांडवलदारी जगही मान्य करते आहेच!

आणि प्रत्येक उपलब्ध काम करायला गरजेपेक्षा जास्त कामगार तयार असतात. त्यांच्या आपसातल्या स्पर्धेमुळे त्यांचे पगार कमी कमी होत जातात. शेवटी ते जेमतेम जगू देणाऱ्या पातळीला जाऊन ठेपतात. या सगळ्या कामगारांची जमवाजमव, त्यांना पगार देणे, त्यांनी घडवलेली खुरपी विकणे वगैरे काम करणारे ते मालक-लोक. त्यांना खुरपी विकताना जो काही भाव मिळतो, त्यातून उत्पादनखर्च वजा केला की मिळणाऱ्या पैशांना मार्क्स वरकड मूल्य सरप्लस व्हॅल्यू म्हणतो. मालकलोक अर्थातच सतत वरकड मूल्य वाढवू पाहत असतात. पण तेही एका स्पर्धात्मक बाजारातच खुरपी विकत असतात. खुरप्यांना चांगला भाव मिळू लागला, तर नवनवे मालक खुरपी बनवू लागतात. हे लोक कमी भावांना खुरपी विकू लागतात आणि एकूणात मालक- लोकांना मिळणारे वरकड मूल्य घटत जाते.

मालकलोक वरकड मूल्य वाढवायला यंत्रे आणि नवतंत्रज्ञान वापरू लागतात, म्हणजे कामगार वेतनाचा खर्च कमी होऊन वरकड मूल्य वाढावे. यंत्रे गरजेपेक्षा जास्त उत्पादन करतात, ज्यामुळे वस्तू विकणे अवघड होऊ लागते. अखेर वस्तू घेणाऱ्यांमध्येही मोठा भाग कामगारांचाच असतो. म्हणजे उत्पादन कमी असताना मिळणारे, चांगले वरकड मूल्य देणारे भाव यंत्रांमुळे मिळेनासे होतात. कमी उत्पादन-जास्त वरकड मूल्य या स्थितीला तेजी म्हणतात. जास्त उत्पादन-कमी वरकड मूल्य याला मंदी म्हणतात. तर कामगारांची वेतने जेमतेम पातळीला दाबणारी ही व्यवस्था थोडा तेजीचा काळ, खूपसा मंदीचा काळ अशा boom and bust चक्रांमधून सतत जात राहते. आणि मंदी, वरकड मूल्य घटणे हे मालकलोकांसाठी अरिष्ट ठरते. व्यवस्था मात्र अपरिहार्यपणे या अरिष्टचक्रात अडकते.

वस्तूंना श्रमाचे मूर्त रूप मानणे, वेतने कमी ठेवण्यातूनच वरकड मूल्य घडणे, त्यातून उत्पादनात अटळपणे तेजी-मंदीच्या लाटा येणे, हे मार्क्सने भांडवलदारी व्यवस्थेबद्दल वर्तवलेले भाकीत आहे.

भांडवलवादाचे समर्थक एक चुटका सांगतात. ‘‘वायुगतिकीच्या (एरोडायनामिक्स) नियमांप्रमाणे भुंगे उडू शकतच नाहीत. पण ते धडपडत का होईना, उडतात. भांडवलवादी व्यवस्था अशीच चालते. तिला पर्याय म्हणून मार्क्सने सुचवलेली समाजवादाची आवृत्ती मात्र चालतच नाही!’ आता एरोडायनामिक्सच्या नियमांप्रमाणेही भुंगे उडू शकतात, पण धडपडतच. ते तरंग-उड्डाण, gliding मात्र करू शकत नाहीत! म्हणजे मार्क्स एरोडायनामिक्सच सांगत होता. पर्यायी व्यवस्था काय करू शकते, काय करू शकत नाही, हे कधी तपासले गेलेच नाही. त्याबाबतीत मार्क्सची सव्वा लाखाची मूठ आजवर झाकलेलीच आहे!

USSR

बऱ्याचदा सांगितले जाते की, मार्क्सचे समाजवादी स्वप्न सोव्हिएत रशियात साकार झाले. रशियन नसलेले समाजवादी मात्र तसे मानत नाहीत. त्यांच्या मते, USSR मध्ये शासकीय समाजवाद- State Socialism होता. मूठभर शासक सर्व वरकड मूल्याच्या वापराची धोरणे ठरवे. ‘तळे राखील तो पाणी चाखेल’ या न्यायाने हा शासकवर्ग वरकड मूल्याचा उपभोगही करत असे, कमी- जास्त वाटपातून. याला हेटाळणीने श्रीमंतांसाठीचा समाजवाद- Socialism for the Rich असेही म्हटले गेले आहे. लँचेस्टर सांगतो की, त्याच्या लेखाच्या जरा आधी शासकीय समाजवाद हा शब्द ‘द इकॉनॉमिस्ट’ या नियतकालिकाने आजच्या जगासाठी वापरला! त्यांचा रोख आजच्या मालकवर्गाचे शासकवर्गाशी असलेल्या साट्यालोट्याकडे होता- Crony Capitalism कडे.

वस्तू म्हणजे श्रमांचे मूर्त रूप, वरकड मूल्य येथपासून अरिष्टचक्रापर्यंची मार्क्सची मांडणी लँचेस्टरला elegant- देखणी वाटते, मलाही. पण मार्क्सला अपेक्षित पर्याय कुठेच वास्तवात उतरला नाही, याबद्दल मात्र लँचेस्टर फार काही लिहीत नाही. मला त्याची काहीशी खंत वाटते.  सोव्हिएत प्रयोग फसला हे तर खरेच, पण तो नेहमीच्या आजच्या साट्यालोट्याच्या भांडवलवादासारखा नव्हता. एका गरीब, अशिक्षित, आडमाप देशसमूहातून सोव्हिएत प्रयोगाने एक महासत्ता घडवली, हे कसे नाकारता येईल?

कल्याणकारी भांडवलवाद

 मार्क्सला भांडवलवादातून एकाच एका नमुन्याच्या अर्थराजकीय व्यवस्था घडतील असे वाटले नव्हते. पण वेगवेगळ्या नमुन्यांच्या भांडवली व्यवस्थांमध्ये एक समान सूत्र कल्याणकारी राज्याचे- welfare state चे असेल, ही शक्यता मात्र मार्क्सने तपशिलात तपासली नाही, असे लँचेस्टर सांगतो. लँचेस्टर ब्रिटिश असल्याने तो ब्रिटिश व्यवस्थेचे तपशीलवार वर्णन करतो. ती व्यवस्था वरकड मूल्याचा काही भाग वापरून कामगारांना जेमतेम जगण्याच्या हलाखीतून (immiseration) वर काढते. उरलेले वरकड मूल्य मालकवर्ग विषम प्रमाणात वाटून घेतो, असे लँचेस्टर सांगतो. हे विषम वाटप मार्क्सला दिसले नव्हते, असेही लँचेस्टर सुचवतो. 

एखादे वेळी कल्याणकारी राज्याचे स्पष्टीकरण मार्क्सने वेगळ्या रूपात दिले असते. आफ्रो-आशियाई देश, दक्षिण अमेरिकन देश, हे सारे अविकसित देश मुख्यतः कामगारवर्गी असतील आणि विकसित देशांची बहुतांश प्रजा एका जागतिक मालकवर्गाचा भाग बनेल, असे मार्क्सने नोंदवले होतेच. इतर कोणत्याही अर्थशास्त्र्यापेक्षा मार्क्सची नजर ‘जागतिक’ होती आणि आजही आहे. अशीही कल्पना करता येईल की, जे.एम. केन्स (Keynes) हा शासकीय खर्चातून व कल्याणकारी योजनांमधून मंदीचे अरिष्ट टाळण्याचा पुरस्कर्ता आणि मार्क्स कोणत्या तरी काल्पनिक स्वर्गात हुज्जत घालताहेत!

कल्याणकारी हा शब्द न वापरताच त्या नमुन्याच्या योजना आज बहुतेक विकसित देश वापरतात. स्कँडिनेव्हियन देश या प्रकारात सर्वांत कामगारप्रेमी मानले जातात, पण युरोपीय देशही त्या दिशेने विचार करतात. जपान बराचसा कल्याणकारी आहे. सिंगापूर जरी मुक्त बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असले, तरी प्रजेचा एक मोठा खर्च सिंगापूर सरकार करते. बहुतेक सिंगापुरी लोक सरकारी घरांमध्ये राहतात. अमेरिकन (USA) भांडवलवाद ‘जो तो स्वतःसाठी’ या तत्त्वाने चालतो. पण तिथेही सामाजिक सुरक्षायंत्रणा आहे ती आज अडखळते आहे. पण 2014 मध्ये ज्येष्ठ अर्थशास्त्री नीळकंठ रथ यांनी नि:संदिग्धपणे सांगितले की, अमेरिकेतल्या शासकीय खर्चाचे सकल राष्ट्रीय उत्पादनातले प्रमाण भारतातल्या प्रमाणाच्या कैक पट आहे!

MECTIZ-N

मर्क (Merck) या अमेरिकन औषध कंपनीने 1987 मध्ये बराच खर्च करून मेक्टिझान (Mectizan) हे औषध घडवले. नद्यांवर वावरणाऱ्यांना काही कारणाने अंधत्व येऊ शकते. असा ‘रिव्हर ब्लाइंडनेस’ या औषधाने टाळता येतो. मर्कने हे औषध यावच्चंद्रदिवाकरौ (in perpetnity) मनुष्यजातीला फुकट देऊन टाकले आहे. या धर्मादाय कृतीची मर्कच्या मुख्य बाजारपेठेत (पाश्चात्त्य देशांत) जाहिरातही केली गेली नाही. लँचेस्टर सांगतो की, हे कल्याणकारी राज्य नमुन्याचे, पण जागतिक निःस्वार्थीपणाचे उदाहरण आहे, जे मार्क्सच्या मांडणीत अशक्य ठरले असते. एक वेगळाही विचार करता येतो. काही वर्षांपूर्वी सी.के.प्रल्हाद या व्यवस्थापनतज्ज्ञाने ‘द फॉर्चून ॲट द बॉटम ऑफ द पिरॅमिड’ नावाचे पुस्तक लिहिले. त्याचा गाभा म्हणजे सातेक अब्ज माणसांपैकी चारेक अब्ज दरिद्री आहेत, उत्पन्न-स्तुपाच्या तळाशी आहेत. त्यांना गुंतवून घेण्याच्या विविध पद्धती प्रस्थापित कंपन्यांची उलाढाल वाढवू शकतात किंवा नव्या कंपन्यांना सबळ करू शकतात. उदाहरणार्थ- शांपूच्या बाटलीऐवजी पाच रुपयाचे पाऊच आणि जोमदार जाहिरात यांतून झोपडपट्टीतल्या प्रत्येक तरुणीला ऐेश्वर्या राय होण्याचे स्वप्न दाखवता येते!

सोबतच प्रल्हाद बांगलादेशातील ‘ग्रामीण बँक’ वगैरेही उदाहरणे तपासतात; नाही तर हे सारे केवळ ‘चर्रे हरित तृण लिपसु जैसे’ नमुन्याचे पशूंना पोसून मग मारण्याचे कारस्थान वाटले असते!

श्रीयुत लींचा देश

2011 च्या सुमाराला माणसांची संख्या सात अब्जांना पोचली. ‘नॅशनल जिओग्राफिक’ मासिकाने त्या वेळी एक ‘टिपिकल’ नमुना म्हणून वापरण्याजोग्या मानवी व्यक्तीचे चित्र रेखाटले. ही सरासरी (mean किंवा average) व्यक्ती नव्हती. ती मध्यस्थित (median) या वर्णनाजवळची व्यक्ती होती. आपण ही व्यक्ती प्रातिनिधिक (representative) मानू. ही व्यक्ती म्हणजे अठ्ठावीस वर्षांचा ‘ली’ (Li किंवा Lee) नावाचा हानवंशीय चिनी पुरुष. प्रातिनिधिक व्यक्ती पुरुष असण्यामागे वैद्यकशास्त्राने बालमृत्यूंचे प्रमाण घटवणेही आहे आणि स्त्रीभ्रूणहत्याही आहेत (निसर्गतः जन्मणाऱ्या मुलांची संख्या मुलींच्या संख्येपेक्षा किंचित जास्त असते, कारण बालमृत्यूचे प्रमाण मुलांत जास्त असते आणि तो ‘आघात’ सोसून स्त्री-पुरुष प्रमाण साधारण सारखे होते. बालमृत्यू आटोक्यात आणल्यास पुरुषांचे प्रमाण वाढते. मुली जन्मूच न देणे, जन्मल्यास मरू देणे किंवा मारणे हे माणसांच्या मुलगा-निवडीतून, Son preference मधून येते.).

श्रीयुत लींकडे मोबाईल फोन आहे, पण पैसे साठतच नसल्याने त्यांचे बँक खाते कुठेच नाही. त्यांचे वार्षिक उत्पन्न (2011) आठ हजार डॉलर्स आहे. 2011 मध्ये नेमक्या या वर्णनाची नव्वद लाख माणसे होती! मार्क्सला याचे आश्चर्य वाटले नसते, कारण संख्येने जास्त अशा कामगारवर्गाचे केंद्र विकसनशील देशांत जाईल, हे त्याने म्हटले होतेच. त्यांच्या मेहनतीतून घडणारे वरकड मूल्य मात्र विकसित देशांतल्या मालकवर्गाकडे असेल, हेही त्याने म्हटले होते. चीनमधील फॉक्स्कॉन (Foxconn) ही कंपनी मुख्यतः अमेरिकन मालकीच्या ॲपल या कंपनीसाठी वस्तू बनवते. सोबतच मायक्रोसॉफ्ट Xbox, ॲमॅझॉन Kindle वगैरे शेकडो ॲपलबाह्य वस्तूही ती घडवते.

सर्वांत मोठा कारखाना शेंझेन (Shenzen) शहरात आहे. तिथे दोन लाख तीस हजार कामगार बारा-बारा तासांच्या पाळ्यांमध्ये काम करतात, आठवड्याचे सहा दिवस. पगार तासाला दोन डॉलर्सपासून सुरू होतात. पूर्ण वर्षासाठी (सुट्‌ट्या नाहीत) माझा हिशोब साडेसात हजार डॉलर्सना जातो. हजारो काम मागणाऱ्यांना फॉक्स्कॉन दररोज दारातूनच परत पाठवते. फॉक्स्कॉन या आणि असल्याच इतर कामगारांपासून वरकड मूल्य कमावते. त्याहून जास्त कमावते ॲपल. 2011-12 च्या शेवटच्या तिमाहीत ॲपलने 46 अब्ज डॉलर्स उलाढालीतून (turnover) 13 अब्ज डॉलर्स नफा कमावला. ती जगातली तेव्हाची सर्वांत महाग कंपनी होती.

पण शेंझेनच्या कामगारांचे आयुष्य मार्क्सच्या काळातील व्हिक्टोरियन हलाखीपेक्षा सुसह्य आहे. श्रीयुत ली जे ग्रामीण शेतकरी आयुष्य सोडून शेंझेनला आले, त्या ग्रामीण हलाखीपेक्षाही ते आज सुस्थितीत आहेत. तीव्र हलाखी, immiseration श्रीयुत ली भोगत नाही आहेत. लोकसंख्येत सर्वांत मोठा असलेला चीन हलाखीमुक्त नाही. आजही तिथे वारंवार झुंड-घटना (MGI- mass group Incidents) नावाच्या दंगली घडतात, पण त्या पाश्चात्त्य व जागतिक माध्यमांपासून लपून राहतात किंवा लपवून ठेवल्या जातात.

 ग्राहकांकडूनचे वरकड मूल्य

आज आपण घरबसल्या बस-रेल्वे-विमान प्रवासाची तिकिटे काढू शकतो. हे प्रवास आपल्या गावापासून किंवा देशापासूनही सुरू होणे आवश्यक नाही. हा ऑन-लाईन व्यवहार त्याच्याच ग्राहकांकडून वाहन कंपन्यांसाठी वरकड मूल्य घडवतो. याचे कारण म्हणजे सर्वच माणसे ऑनलाईन नाहीत. तिकीट खिडकीतला बाबू, चेक-इन काऊंटरमागची मुलगी, बँकेतला कॅशियर हे आजही ऑफलाईन ग्राहकांसाठी गरजेचे आहेत. प्रवासी संख्या वाढूनही या कामातली माणसे वाढत नाहीत, कारण ऑन-लाईन व्यवहार. म्हणजे प्रत्येक ऑन-लाईन व्यवहार वाहन कंपन्यांना वरकड मूल्य देत असतो. शिवाय वाढीव संख्यांमुळे प्रवासाच्या वेळेच्या किती आधी स्थानकावर पोचावे लागते याचे हिशोब मात्र वाढले आहेत!

ऑन-लाईन व्यवहारांचा एक अत्यंत लोकप्रिय नमुना म्हणजे फेसबुक. त्यातून मित्र-स्नेह्यांशी अत्यंत कमी खर्चात बोलता-बोलत राहता येते. आणि वाईटसाईट काही त्या व्यासपीठावर येऊ नये याची काळजी घेतली जाते. बहुतेकांना फेसबुकवर जाणे-राहणे अत्यंत निरामय, काहीसे निरागसही वाटते. ह्यातून फेसबुकचा जनक आज जगभरातल्या तरुण-तरुणींना माहीत आहे. त्याच्या कर्तृत्वावर चरित्रात्मक चित्रपटही बनला आहे. लँचेस्टरचा लेख लिहिताना फेसबुकच्या समभागांची प्रथम जाहीर विक्री (Initial Public Offering) होऊ घातली होती आणि त्यातून शंभर अब्ज डॉलर्स भांडवल उभे राहील, असा अंदाज होता. पण हा प्रकार वाटतो तेवढा निरामय नाही, हे एका मोरोक्कन माणसाने स्पष्ट केले. फेसबुक मजकूर जो वाईटसाईटापासून मुक्त असतो, तो कोणी तरी निवडण-टिपण केल्यामुळे तसा होतो. आणि हे निवडण-टिपण करणाऱ्यांना ताशी एक डॉलर इतके (दरिद्री) वेतन दिले जाते, हे त्या मोरोक्कन माणसाने  जाहीर केले. तो निवडणारा होता! पुन्हा एकदा अविकसित देशांमधले कामगार विकसित देशांतल्या मालकांना भरघोस वरकड मूल्य देत होते; स्वतः दरिद्री राहूनच. आज केंब्रिज ॲनलिटिका वगैरे प्रकरणांमधून फेसबुकादी सेवांचे जास्त-जास्त दुष्ट वापर उघडकीला येत आहेत.

बरे, नवनवे तंत्रज्ञान सेवांचा बाजार कामगारविरोधी करत आहे. भांडवलवादाचा पाया मुक्त बाजारपेठेत आहे. आणि न्याय्य बाजारपेठेत उत्पादक कामगार सहज दरिद्री श्रमांकडून चांगल्या पगाराच्या श्रमांकडे जाऊ शकतो, असे मानले जाते. हे आज खरे ठरत नाहीये. लँचेस्टर सांगतो की, सुताराची मुलगी माहिती तंत्रज्ञानाकडे वळणे सर्वांना झेपते; सुताराला, मुलीला, समाजालाही. पण चाळिशीतल्या सुताराला ‘सुतारकीला मागणी नाही, माहिती तंत्रज्ञानाला भरपूर मागणी आहे. तू आपला सुतारकी सोडून आयटीत जा बाबा!’ हे सांगण्यात अर्थ नसतो. त्याला (आणि पुढे समाजाला) नवतंत्रज्ञान झेपतच नाही. मग तो सुतार हलाखीत लोटला जातो आणि आयटी तंत्रे घडवणारे अतिश्रीमंत होत जातात. बाजारपेठ न्याय्य होऊ शकतच नाही आणि नवतंत्रज्ञान बाजारपेठेला जास्त-जास्त अन्याय्य करते. एकीकडे बेरोजगारी वाढवते, तर दुसरीकडे विषमता; हे मार्क्स म्हणून गेला आहे. पाश्चात्त्य विकसित देशांमध्ये विषमता वाढतेच आहे याचा मार्क्सच्या मांडणीशी संबंध लागत नाही, असे लँचेस्टरला वाटते. सुतार-आयटी उदाहरणही तोच नोंदतो, हे मला आश्चर्यकारक वाटते.

जगभरातील कामगारांनो!

कम्युनिस्ट जाहीरनाम्यातील बहुधा सर्वाधिक वेळा उद्‌धृत केले जाणारे वाक्य म्हणजे, ‘जगभरातील कामगारांनो, एकत्र व्हा!’ पण आज जाहीरनाम्याला 168 वर्षे होऊनही मार्क्सच्या हाकेला ‘ओ’ म्हटले गेलेले नाही. फार कशाला, एखाद्या देशातही वेगवेगळ्या पेशांमधले, भौगोलिक क्षेत्रांमधले कामगारही एकत्र झालेले नाहीत. चीनमधल्या झुंड-घटना मागे नोंदल्या. त्या कामगार-एकीतून घडत नाहीत. चीनची किनारपट्टी अंतर्भागापेक्षा जास्त विकसित असण्याचे ताण आहेत. ग्रामीण शेतकरी आणि नागर औद्योगिक समाज यांच्यात ताण आहेत. भ्रष्टाचार, कुशासन, प्रकल्पांसाठी होणारे लोकांचे विस्थापन यांमुळे समाज ताणला-दाबला जातो. पण या साऱ्यांतून एकीकडे कामगारवर्ग, दुसरीकडे मालकवर्ग असा सामना उभा राहत नाहीये. भारतही चीनसारखाच बव्हंशी कामगारवर्गी आहे. नवी ‘मेक इन इंडिया’ योजना तर थेट फॉक्स्कॉन व तसल्या चिनी निर्याताधारित उद्योगांशी स्पर्धा करायला घडवली गेली आहे. पण चीनमधल्या सर्व ताणतणावांसोबतच भारतात जात-धर्माचे प्रश्नही आहेत. चीनमध्ये धर्मामुळे फारसे तणाव नाहीत. वायव्य चीनमध्ये काही मुस्लिम गटच फक्त बाकीच्या चीनला नाठाळ वाटतात. जातीचे प्रश्न चीनमध्ये नाहीत. तेव्हा चीनसारखाच भारतातही कामगारवर्ग एकत्र होत नाही, हे आश्चर्याचे नाही.

जरी ह्या दोन खंडप्राय देशांत जमातींचे प्रश्न- ethnicity चे प्रश्न फार नाहीत, तरी आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका खंडांमध्ये ते प्रश्न केंद्रस्थानी आहेत. कुठे कुठे या जमातींमधल्या वादांना पाश्चात्त्य देश इंधन पुरवत असले, तरी एकूण ते प्रश्न स्थानिकच आहेत. भारतातल्या अस्मितांच्या राजकारणातही भांडवलदार तेल ओततात, पण मूळ प्रश्न लोकांना पटणारे आहेत.

मालक-कामगार गुंतागुंत

पाश्चात्त्य देशांमधील सामाजिक सुरक्षा यंत्रणांमधून घडणारे एक अंग लँचेस्टर नोंदतो. ही यंत्रणा आपल्याकडील भविष्यनिर्वाह निधीला- प्रॉव्हिडंट फंडाला समांतर आहे. पण ती सर्वच्या सर्व नागरिकांसाठी आहे. या यंत्रणांमध्ये सर्व वेतनांचे काही प्रमाण कापून घेऊन अखेर ते पैसे कोणत्या तरी उद्योगांत गुंतवले जातात. म्हणजे काही प्रमाणात कामगार भांडवलदारही होतात! भारतातला भविष्यनिर्वाह निधी यातून कामगारांना निवृत्तीच्या वेळी एक ठोक रक्कमही देतो आणि पुढे कामगारांना व त्यांच्या पती-पत्नींना तहहयात थोडेसे पेन्शनही देतो. इतर देशांमधील सामाजिक सुरक्षा यंत्रणा पेन्शन देतात, ती जीवनावश्यक पातळीची असते आणि सर्व नागरिकांपर्यंत पोचणारी असते. भारतीय यंत्रणेची पोच फारच मर्यादित आहे. पण ती सबळ करण्याचे काम मात्र सरकारने टाळले आहे, असे म्युच्युअल फंड्‌सच्या सध्या प्रचंड प्रमाणात वाढलेल्या जाहिराती सुचवतात.

या मालक-कामगार भूमिकांच्या गुंतागुंतीबद्दल लँचेस्टर म्हणतो, ‘‘आपण बहुतेक जण वेतन-गुलाम आहोत, कल्याणकारी राज्याचे लाभार्थी आहोत, शासनाचे  सावकार आहोत आणि आजी-माजी पेन्शनर आहोत. या शेवटच्या अवतारात आपण बूर्झ्वा (मालकवर्गी) आणि उत्पादन साधनांचे मालकही आहोत.’’ मला हे अतिसुलभीकरण वाटते. मालकीच्या संकल्पनेत नियंत्रण करणे, धोरणे ठरवणे वगैरेही अंगे आहेत; नुसतेच वरकड मूल्यातून पेन्शन घेणे नाही. आणि आपल्या लँचेस्टरकथित बूर्झ्वापणात धोरण-नियंत्रणाचा मागमूसही नाही. ते सारे शासक-भांडवलदारांच्याच हातांनी घट्ट धरलेले आहे. उदा. बँकांचे राष्ट्रीयीकरण झाल्याने सर्व भारतीय बूर्झ्वा झाले का? बरे, जगभरातल्या किती माणसांना कल्याणकारी राज्य आणि सामाजिक सुरक्षा यंत्रणांचा फायदा होतो? बहुधा टक्केवारी एक आकडीच असेल!

लँचेस्टर सांगतो की, या कामगार-मालकी गुंतागुंतीचे प्रभाव आता संख्यात्मक न राहता गुणात्मक होऊ लागले आहेत. उदाहरणार्थ- कम्युनिस्ट जाहीरनामा प्रकाशित होताना (1850) ब्रिटनमध्ये आयुर्मान (Expectancy of Life at Birth) 43 वर्षे होते आणि बालमृत्यूंचे प्रमाण दर हजार जन्मांमागे 150 होते. आज ब्रिटिश आयुर्मान ऐंशीच्या पुढे आहे आणि वाढणारही आहे. बालमृत्यू हजारी 4.7 इतके कमी आहेत. भारताने स्वातंत्र्यापासून आजवर आयुर्मान 32 वर्षांपासून 65 ला आणले आहे. पण आजचा बोट्‌स्वाना 31.6 वर्षे आयुर्मानाला आहे, ज्यात एड्‌स वगळला तर आयुर्मान सत्तरीला जाईल! अशा बदलांचा संबंध माझ्या मते तरी कल्याणकारी वृत्तीशी जास्त आहे; तर कामगार-बूर्झ्वापणाशी असंबद्ध आहे. पण लँचेस्टर म्हणतो तसा हा संख्यात्मक वाटणारा बदल गुणात्मक होऊ लागतो, हे तर खरेच.

पर्यावरण

आजच्या काळापेक्षा मार्क्सच्या काळात पर्यावरणावरचे ताण बरेच कमी होते. सन 1850 ची जगाची एकूण लोकसंख्या आजच्या सात अब्जांच्या एक-तृतीयांश होती. दरडोई ऊर्जावापर आणि वस्तुवापरही खूप कमी होता. या पृथ्वीची ऊर्जा- वस्तुवापराची क्षमता 1850 मध्ये ‘दृष्टिपथात’ नव्हती. आज काही घटक पुरवण्याची निसर्गाची क्षमता एकटा मनुष्यप्राणी बळकावतो आहे. जसे- अमेरिकेतला दरडोई दररोज पाणीवापर शंभर अमेरिकन गॅलन्स, म्हणजे 360 लिटर आहे. शहरी भारतात तो 100 लिटर आहे. सर्व मानवजातीला अमेरिकन पातळी गाठू देण्याइतके गोडे पाणीच उपलब्ध नाही आणि इतर नैसर्गिक संसाधनांबाबत एकेक करून अशीच स्थिती येत जाणार आहे. लँचेस्टर सांगतो की, असे अमानुष निसर्गदोहन भांडवलवादी व्यवस्थेत होईल असे मार्क्सने सांगून ठेवले होते.

स्टीफन लो हा ग्लासगोचा माणूस लँचेस्टरच्या लेखावरील पत्रचर्चेत मार्क्सचे एक अवतरणही देतो. ‘भांडवलवादी शेतीतली सर्व प्रगती ही कामगारांना आणि जमिनीला लुटण्याच्या कलेतली प्रगती आहे. जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यातून अखेर उपजाऊपणाच्या शाश्वतीचाच बळी जातो.’ जर हे अवतरण अपवादात्मक नसेल, तर मार्क्सच्या द्रष्टेपणाला साष्टांग दंडवत, कारण नंतरचा कोणी मार्क्सिस्ट शाश्वतीबद्दल बोलल्याचे माझ्या तरी पाहण्यात नाही. उलट, जीडीपी वाढवण्याची गरज वगैरे बाबींमध्ये भांडवलवादी व मार्क्सिस्ट यांच्यात फारसा फरक करता येत नाही.

विदा!

दि.21 मे 2018 च्या इंडियन एक्स्प्रेसमध्ये योगिंदर अलघ यांचा मार्क्सवर लेख आहे. ते म्हणतात की- लोक काय म्हणतात याकडे दुर्लक्ष करून ते काय करतात ते पाहून मते बनवावी, हे अलघना मार्क्सने शिकवले. अलघ कोणत्याही अर्थी मार्क्सवादी नाहीत. लँचेस्टर मात्र सांगतो की, मार्क्स अनुभववादी empiricist नाही. मार्क्सला (म्हणे) वाटत असे की, अनुभवातून माहितीचे तुकडे (Data Points) गोळा करून सत्य सापडत नाही. आपण माहिती घेताना आपोआपच प्रस्थापित पूर्वग्रह आणि व्यवस्था मान्य करू लागतो. त्यामुळे आपल्याला आजचा विचारव्यूहच खरा वाटू लागतो. मार्क्सच्या तत्त्वज्ञानाचे सखोल विश्लेषण करणारा (मला विज्ञानाचा तत्त्वज्ञ म्हणून माहीत असलेला) कार्ल पॉपर सांगतो- ‘‘प्राण्यांच्या जंगलांतल्या पायवाटा कशा घडतात? कोणता तरी प्राणी पाणवठ्यावर पोचायला झाडोऱ्यातून वाट ‘फोडतो’. मग इतर प्राण्यांनाही तीच वाट वापरणे सोईस्कर ठरते. वारंवारच्या वापराने ती वाट रुंद व उपयुक्त होते, ती नियोजित नसते. ‘‘माणसांच्या भाषा व इतर संस्थाही अशाच उद्भवू शकतात. त्यांच्या अस्तित्वामागे, विकासामागे फक्त सोय  असते; हेतू किंवा नियोजन नसते. त्या घडण्यापूर्वी एखादे वेळी त्यांची गरजही नसते. पण एकदा का त्या घडल्या की त्या नव्या गरजांना, नव्या उद्दिष्टांना जन्म देतात.’’

पॉपर एक वर्गीकरण करतो. जड पदार्थांचे ‘विश्व-1’ (World-1), माणसांच्या मनांचे ‘विश्व-2’ (World -2) आणि माणसांच्या व इतर प्राण्यांच्या व्यवहारांतून हेतूविना घडलेले ते ‘विश्व-3’ (World -3). पॉपर या विश्व-3 ला उपयुक्त मानतो, तर मार्क्स ‘विश्व-3 पासून सांभाळून राहा!’ असे ठसवत राहतो. पॉपर भाषेच्या उद्‌भवाखालोखाल चिकित्सेच्या विकासाला महत्त्व देतो, जे मार्क्सला मान्य असावे. लँचेस्टर सांगतो तसा मार्क्स अनुभववादाच्या विरोधात असलेला मात्र मला दिसत नाही. (हे पॉपरच्या मताचे वर्णन ब्रायन मॅगीच्या एका लेखातून उचलले आहे.)

आजची विदा (data) देऊन युक्तिवाद करण्याची पद्धत मात्र मार्क्सला आवडली वा पटली नसती. विदांचा उदो- उदो करणारे त्या विदा तटस्थ असतात असे मानतात, जे (मलासुद्धा!) घोर शंकास्पद वाटते. मार्क्सने तर ती पद्धतच उधळून लावली असती, तीही सुमारे वीस हजार शब्दांत! विश्व-3 चे उदाहरण लँचेस्टरच पुरवतो. तो सांगतो की- आज अर्थशास्त्राचे क्षेत्र फक्त भांडवलवादी व्यवस्थेचे विश्लेषण, त्यावरील समीक्षा, टीपा जोडणे यांपुरतेच उरले आहे. विरोधाचे, वेगळ्या विचारांचेच अंकुर उगवल्यासारखे दिसतातही, अधूनमधून; पण मूलभूत पातळीवर कोणीच भांडवलवादापलीकडे जाताना दिसत नाही. मला सुचलेली काही उदाहरणे नोंदवतो. ‘द ग्रोथ डेल्यूझन’ (डेव्हिड पिलिंग, 2018) हे पुस्तक जोमदार टीका-टिंगलीतून अर्थव्यवस्थेची वाढ, तिचे अर्थ-उपार्थ तपासून तो प्रयोग व्यर्थ असल्याचे सुचवते. पण पुढे मात्र ‘तेही पाहा, पण तेवढ्यावर थांबू नका’ अशा भूमिकेपर्यंत मागे सरकते. त्या तुलनेत थॉमस पिकेटीचे ‘कॅपिटल इन द ट्वेंटी फर्स्ट सेंचरी’ (2013) हे पुस्तक विकास व विषमता याचे संबंध तपासते आणि तथाकथित विकास मुळातच वाढत्या विषमतेसोबतच घडतो, हे विदांमधून दाखवून देते. पण तिथेही कररचनेतील फेरफार यापुढची मूलभूत उत्तरे पिकेटी देत नाही. हे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा समतेचा पुरस्कार करणारा पिकेटी हा ‘दुसरा मार्क्सच’ आहे, असे सांगितले जात असे.

हेही अतिशयोक्त वाटते, कारण ‘भांडवली व्यवस्थाच बदला’ असे पिकेटी म्हणत नाही. विषमतेला अनिष्ट मानतो, म्हणून पिकेटीला आजच्या बहुतेक अर्थशास्त्र्यांपेक्षा वेगळे मानायला हवे, एवढेच.

विश्व-3 चा हिसका

अर्थशास्त्र म्हणजे केवळ भांडवलवादाचे विश्लेषण या विश्व-3 पाऊलवाटेपुढचा राजमार्ग असा. ‘अर्थशास्त्र हे निसर्गविज्ञानांसारखे मानवनिरपेक्ष शास्त्र आहे. त्यात विचारधारांना, विचारप्रणालींना, ideologies ना थारा नाही.’ हे मत अर्थातच चुकीचे आहे आणि हे मार्क्सवादी नसलेल्या अनेकांनीही दाखवून दिले आहे. उदा.- अमर्त्य सेन. पण विनोदांपासून अध्याहृत मानलेल्या मतांपर्यंत अनेक पातळ्यांवर अर्थशास्त्राला मानवनिरपेक्ष मानण्याकडे कल आहे. जसा हा ‘विनोद’. ‘एखाद्या अर्थशास्त्र्याने चांगले काम केले, तर त्याला पुढचा जन्म भौतिकशास्त्र्याचा मिळतो. जर काम चांगले नसेल, तर मात्र तो पुढच्या जन्मी समाजशास्त्री होतो.’ जसे; ‘‘तुमचा जीडीपी वाढण्याने समाजाचे भले होते हे पटत नसेल, तर तुम्ही ‘डावे’ आहात.’’ या प्रकारे सतत चर्चांमध्ये डोकावणारे आजचे विश्व-3 मला अस्वस्थ करते. जसे; आरक्षण, affirmative action वगैरेंसारखी धोरणे मार्क्सच्या ‘विषमांना विषम वागणूक देऊनच समतेकडे जाता येते’ या मतातून घडली आहेत, हे नाकारले जाते. तर आजचे, मार्क्सच्या द्विशताब्दीच्या वेळचे विश्व-3 मार्क्सचेही आहे, जरी तसा उल्लेख करणेही त्या विश्वाला नावडते आहे.

एक गंमत वाटते की, मार्क्स न वाचताही माझ्यासारखे अनेक जण मार्क्सवादाजवळ गेले आहेत. हो, विश्व-3 एकच पायवाट नाही, गंगा-ब्रह्मपुत्र जसे सहाशे मुखांनी समुद्राला भेटतात तसे आपणही हजार तऱ्हांनी वास्तवाला भिडू पाहतो. आणि यांपैकी शेकडो वाटांवर चालताना वाटाड्या म्हणून मार्क्स असतो!

Tags: मार्क्सवाद कार्ल मार्क्स नंदा खरे Marxism Karl Marx nanda khare weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नंदा खरे
nandakhare46@gmail.com
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके