डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

प्राथमिक शिक्षणाच्या उज्वल भवितव्यासाठीचे चिंतन

हे पुस्तक प्राथमिक शिक्षणाच्या- पर्यायाने देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी धडपडणाऱ्या शिक्षकांच्या माफक अपेक्षांचे, त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांचेच संकलन आहे. या शिक्षकांची स्वप्ने सत्यात आणण्यासाठी पैशांपेक्षा इच्छाशक्तीची गरज आहे. त्यांनी मांडलेल्या अपेक्षा अवास्तव नाहीत, तर त्या विद्यार्थ्यांचे हक्क आहेत. जी मुलं उद्या देशाचे भवितव्य ठरवणार आहेत, त्यांच्यासाठी इतक्या माफक अपेक्षा पूर्ण करू न शकणाऱ्या देशाचे भविष्य नक्कीच अंधकारमय असेल. त्यासाठी या पुस्तकातील शिक्षकांच्या अपेक्षा नवे शिक्षण धोरण ठरवताना, अभ्यासक्रम रचताना आणि अगदी शाळांसाठी नव्या इमारती बांधतानाही विचारात घ्याव्यात इतक्या महत्त्वाच्या आहेत. शिक्षणाबद्दल अनास्था बळावत चाललेल्या या दिवसांत शिक्षणक्षेत्रानेच नाही, तर संपूर्ण समाजाने अशा पुस्तकाचे मन:पूर्वक स्वागत केले पाहिजे. 

भुदरगड पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी दीपक मेंगाणे यांनी संपादित केलेले ‘आमच्या कल्पनेतील प्राथमिक शिक्षण’ हे पुस्तक प्राथमिक शिक्षणाच्या भवितव्यासाठी केलेल्या चिंतनपर निबंधांचे संकलन आहे. पुस्तकाची निर्मिती एका विशिष्ट मानसिक अस्वस्थतेतून झालेली आहे. ही अस्वस्थता काय आहे, हे संध्या वास्कर आपल्या निबंधात नेमकेपणाने सांगतात. त्या लिहितात : नोकरीची सुरुवातीची वर्षे छान गेली. ‘पाठ्यपुस्तकांत जे आणि जसं दिलं आहे ते आणि तसंच मुलांच्या गळी उतरवणे म्हणजे अध्यापन’ असं वाटायचं. मुलंही पोपटासारखी बोलायची. छान चाललं होतं. पण हल्ली थोडंसं अस्वस्थ झालं होतं. कशामुळे, ते मात्र समजत नव्हतं. कुठे तरी काही तरी बिघडलं होतं. ‘घडी विस्कटल्यासारखं.’ हे घडी विस्कटल्याचे वास्तव प्राथमिकच नव्हे, तर सर्व स्तरांवरच्या शिक्षणक्षेत्राचे वास्तव आहे. सरकारने शिक्षकांना आपले पूर्ण लक्ष आपल्या कामावर केंद्रित करता यावे म्हणून त्यांचे वेतन वाढवले आहे. त्यांचे काम बौद्धिक असल्यामुळे कामाच्या ठिकाणी राहण्याचे बंधन त्यांना असते. परंतु, बरेच शिक्षक दिल्या जाणाऱ्या वेतनापेक्षा अधिकचे काही कसं मिळवता येईल यात गुंतलेले असतात. कोणी एलआयसी एजंट, तर कोणी स्टेशनरीचे दुकान टाकतात. खेडोपाडी शाळेपेक्षा शेतीकडे जास्त लक्ष देणारे शिक्षक आहेत, तर अनेक शिक्षक प्लॉट खरेदी-विक्री ते वडापच्या गाडीपर्यंत नाना प्रकारचे धंदे करताना दिसतात.

भौतिक सुखसोयींच्या हव्यासाने मुलांचे शिक्षण आणि इतर काय वाट्टेल ती कारणे पुढे करत ते निर्धास्तपणे शहरात येऊन राहतात. शंभर-शंभर किलोमीटरचा प्रवास करत नोकरीच्या स्थळी पोहोचतात. असे शिक्षक ना विद्यार्थ्यांना न्याय देतात, ना कुटुंबाला. अशा शिक्षकांमुळे आज शिक्षणक्षेत्र बदनाम झालेय. तथापि, शिक्षणाचा व विद्यार्थ्यांचा गांभीर्याने विचार करणारे शिक्षक आणि अधिकारीदेखील आहेत. हे वास्तव खूप आशादायी आहे. शाळेच्या वेळेपेक्षा अधिकचा वेळ हे विद्यार्थ्यांसाठी देऊ इच्छितात. त्यामुळे सारेच बिघडले आहे, असेही म्हणता येणार नाही. काही चांगलेही होत आहे, काही चांगले शिक्षक आज अस्वस्थ आहेत. ते नव्या कल्पना अमलात आणू इच्छिताहेत. दीपक मेंगाणे हे असेच अस्वस्थ अधिकारी आहेत. या अस्वस्थेतून त्यांनी प्राथमिक शिक्षणात काय प्रयोग करता येतील, याबद्दलची निबंध स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेतून शिक्षकांबद्दलचे एक आशादायी वर्तमान लोकांसमोर येते आहे. हे वर्तमान वाचून महात्मा गांधींच्या स्वप्नातील ‘नई तालीम’ आठवते. कारण या सर्वच शिक्षकांनी प्राथमिक शिक्षणाच्या भवितव्यासाठी नानाविध कल्पना सुचवलेल्या आहेत, त्यातील कोणत्याच कल्पना अनाठायी नाहीत. थोडीशी इच्छाशक्ती असेल आणि थोडी धडपड केली, तर त्या सर्वांनाच कमी-जास्त प्रमाणात अमलात आणता येतील अशा आहेत.

दीपक मेंगाणे यांनी घेतलेल्या या स्पर्धेत भुदरगड तालुक्यातील 530 प्राथमिक शिक्षकांपैकी केवळ 70 शिक्षक सहभागी झाले, हे चित्र चिंता व्यक्त करणारे आहे. परंतु, आशादायीही आहे. कारण सहभागी न झालेल्यांचा विचार करताना सहभागी झालेल्या कल्पक शिक्षकांच्या स्वप्नांकडे, कल्पनांकडे आणि त्यांच्या विचारांकडे दुर्लक्ष होऊ नये. सर्वोत्कृष्ट सोळा निबंध सदर पुस्तकात एकत्रित करण्यात आले आहेत. प्रारंभी मेंगाणे यांनी या निबंधांमधून वाचकांनी ‘प्रत्यक्ष वर्ग आणि शाळेत काम करणारी आम्ही मंडळी प्राथमिक शिक्षणाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काय विचार करतो, कोणत्या कल्पना बाळगतो इतकंच समजून घ्यावं’ ही अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांची ही अपेक्षा वाचकांनी समजून घेतल्यास आणि आपल्या पातळीवर या कल्पनांना सत्यात उतरवण्यासाठी थोडी धडपड केल्यास प्राथमिक शिक्षणाचे भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही.

स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करणाऱ्यांनी  आपल्या देशात स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी, प्राथमिक शिक्षणातील गोंधळ दूर करता आलेला नाही, हे लक्षात घ्यावे. त्यासाठीच हे सारे शिक्षक नव्या कल्पना घेऊन आले आहेत. त्या कल्पना मनापासून समजून घेणे आवश्यक आहे. अशोक कौलवकर आपल्या निबंधात ‘आपली शाळा प्रेमाच्या पायावर उभी असेल’ असे लिहितात. पुढे आपले स्वप्न व्यक्त करताना जे लिहितात, ते वाचून  आपल्याला स्वत:चीलाज वाटायला लागते. कारण ते अपेक्षितात त्या प्राथमिक गोष्टीही आपल्या राज्यकर्त्यांना मागील सत्तर वर्षांत पूर्ण करता आलेल्या नाहीत. कौलवकर यांनी अपेक्षिलेल्या प्राथमिक गोष्टीही आज शाळांमध्ये नाहीत, हे भयावह वास्तवच यातून समोर येते. ते लिहितात, ‘शाळेची इमारत नव्या युगाची गरज ओळखून सुसज्ज बांधलेली असेल. प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र खोली असेल. खोलीत पुरेसा प्रकाश असेल. बैठकव्यवस्था, वायुवीजन यांची सोय असेल. प्रत्येक वर्गखोली अध्ययन-अध्यापनाच्या साधनांनी परिपूर्ण असेल.’ इत्यादी. या गोष्टीत कोणतीच गोष्ट अनाठायी नाही. खरे तर या अपेक्षा मुलांच्या प्राथमिक हक्काच्या आहेत. या गोष्टी स्वप्नवत्‌ वाटाव्यात अशा पद्धतीने आपले शिक्षक मागताहेत, हे वाचून मन खजील होते. या सर्व मूलभूत सुविधाही अद्याप प्राथमिक शिक्षकांना मिळत नाहीत, हे वाचून मनात चीड निर्माण होते. देशातील बहुतांश शाळांच्या इमारती कोंदट, स्वच्छ प्रकाश नसलेल्या, अस्वच्छ, अडचणीच्या ठिकाणी बांधलेल्या आणि देखभाल न केलेल्याच आहेत. बसायला पुरेशी आणि योग्य जागा मिळणे, हेही स्वप्न असल्याचे वाचून मान लाजेने खाली जाते. या अपेक्षा म्हणजे नाकर्तेपणाचा कळस आणि आपणच केलेला आपला पराभव आहे. गावोगावी भव्य-दिव्य मंदिरे बांधली जाताहेत, त्यासाठी लाखोंच्या देणग्या लोक देताहेत; तर गावोगावच्या प्राथमिक शाळा मात्र बंद पडताहेत. पालकांना जिल्हा परिषदांच्या कोंदट, पडक्या इमारतीत आपल्या मुलांना पाठवायला लाज वाटू लागली आहे. या गोष्टीचा पुरेपूर फायदा खासगी शाळा घेत आहेत. शासनालाही या बाबतीत अंग झटकायचेच आहे.

या अपेक्षेमध्ये चांगल्या विचारांचे शिक्षक ही एक महत्त्वाची बाब आहे. हेच शिक्षकच काही चांगले करू शकतात, भव्य स्वप्न पाहू शकतात, नव्या कल्पना राबवू शकतात. परंतु, आज चांगले शिक्षक निर्माण करणारी यंत्रणा भ्रष्ट झाली आहे. ती एका गर्तेत अडकली आहे. तिच्यावरचे शासनाचे नियंत्रण सुटले आहे. या समस्येचे मूळ तेथे आहे. वशिल्याचे तट्टू आणि लाखोंची देणगी देऊन आलेले शिक्षक चांगली स्वप्नं बघू शकत नाहीत. असे शिक्षक बोगस डीएड, बीएड कॉलेजातील पदवीचा कागद विकत घेऊन व्यवस्थेत शिरले आहेत. हे महाभागच आज शिक्षण संपवत आहेत. अधिकारी आणि राज्यकर्तेदेखील अशा महाविद्यालयांच्या वाढीला पोषक वातावरण तयार करत आहेत. थोड्याशा लालसेने त्यांचा गैरकारभार डोळ्यांआड करताहेत. यातून अंतिमत: अनेक पिढ्यांचे आणि देशाचे भवितव्य अंधकारमय होऊ लागले आहे, हे वास्तव ते विसरताहेत. हे पुस्तक अशा अनेक गोष्टी ऐरणीवर आणते आहे.

निसर्गशिक्षण, खेळ या गोष्टीही अलीकडे कालबाह्य होताहेत. गावाच्या सार्वजनिक जागा विकासाच्या नावाखाली बिल्डर हडप करताहेत. मुलांची क्रीडांगणे बळकावली जात आहेत. निसर्ग तर चित्रातच राहतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गावोगावी मोकळी जागा हेही स्वप्नच बनले आहे. हे सर्व वाचताना अभय बंग यांचे ‘माझी शाळा’ हे पालक आणि मुलांसाठी लिहिलेले पुस्तक आठवते. या पुस्तकातील शिक्षणाचे प्रयोग गांधीजींच्या स्वप्नातील शाळा समजून घेण्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. त्यांच्या ‘नई तालीम’मधील अनेक प्रयोगच हे सर्व शिक्षक आपल्या अपेक्षा म्हणून व्यक्त करताहेत. मूल्यशिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, संवेदनशीलता, सहिष्णुता, विवेक, स्त्री-पुरुष समानता या गोष्टी शिक्षकांनाच नव्याने शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याशिवाय या निबंधातून व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण होऊ शकणार नाहीत. पी.एस. पाटील या शिक्षकाने योगाभ्यास, सकारात्मकता, वेळोवेळी प्रशिक्षणवर्ग, परिपाठ, गटचर्चा या गोष्टींची गरज अधोरेखित केली आहे. तर आनंदा आरेकरांनी शिक्षकांच्या वाचनावर बोट ठेवले आहे. शिक्षकांचे ‘वाचन’ ही शिक्षणातील मूलभूत गोष्ट आहे. त्यामुळे यावर अनेकांगी विचार होणे आवश्यकच आहे. कारण चांगले ग्रंथच शिक्षणाचा पाया मजबूत करतात. त्यामुळे सर्व शिक्षक वाचनाकडे वळले पाहिजेत. त्यांनी धरलेला अधिकचा व्यासंग विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करणारा असणार आहे. संध्या वास्करांनी अपेक्षिलेल्या अनेक गोष्टींमध्ये ‘निर्णयप्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग असावा’  ही महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. ही कल्पना वाचताना गो.ना. मुनघाटे यांची ‘माझी काटेमुंढरीची शाळा’ ही शिक्षणप्रयोगाचे प्रारूप ठरावी अशी कादंबरी आठवते. या कादंबरीत आदिवासी मुलांच्या कल्पना गुरुजी ऐकतात. त्यांच्या अचाट कल्पना सत्यात आणतात आणि स्वत: ज्ञानसमृद्ध बनतात. या आदिवासी मुलांचे ज्ञान पाहून ते थक्क होतात. मुलं म्हणतात- झाडाखाली शाळा भरवू, नदीकाठी भरवू, एक दिवस डोंगरावर शाळा नेऊ. गुरुजी मुलांचे ऐकतात. मुलांच्या निर्णयांची कदर करतात. त्यामुळे मुलंही आनंदी होतात. त्यांना शाळा, गुरुजी आणि शिक्षण आपले वाटू लागते. त्यामुळे वास्करांची ही कल्पना फार महत्त्वाची आहे. मुलांच्या सहभागातून त्यांच्या आवडी-निवडीचे कल तपासता येतील. त्यांना कोणत्या विषयात गती आहे, ते जाणता येईल. त्यामुळे त्यांच्या निर्णयाला, मताला योग्य किंमत दिली गेली पाहिजे. त्यांच्यावर आपल्या गोष्टी सतत लादत राहण्यापेक्षा त्यांचेही ऐकले पाहिजे. त्याशिवाय शेतीशिक्षणाचे धडे  हे मूल्यशिक्षणाचा भाग समजले आहेत. नवी पिढी शेतीपासून तुटू न देण्यासाठी हे फार आवश्यक आणि आश्वासकही आहे. त्यांनी पालात राहणाऱ्या श्रमकरी वर्गाच्या मांडलेल्या शिक्षणसमस्याही भारतीय समाजशास्त्र समजून घेण्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत.

बाजीराव पाटील, श्रीकांत माणगावकर यांनीही काही मूल्यं सांगून आपल्या अनुभवांच्या आधारे सांगितलेले प्रयोग विचारप्रवृत्त करणारे आहेत. त्यांच्या विचारांमध्ये विद्यार्थिकेंद्री शिक्षणाच्या कल्पना आहेत. विद्यार्थ्यांची भावना जपत केलेले प्रयोग नक्कीच शिक्षणाची गोडी वाढवणारे असतील, यात शंका नाही. राजेंद्र शिंदे यांनी दिव्यांग-अपंग मुलांना आपल्याच शाळेत, परंतु विशेष सुविधा देऊन आणि त्यांची सर्वस्वी काळजी वाहणाऱ्या आईची मदत घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे स्वप्न पाहिले आहे. ही मातृहृदयी शाळेची कल्पना म्हणजे मोठाच मानवतावादी विचार आहे. संजय नानंग आणि सचिन देसाई यांनी इतर शिक्षकांप्रमाणे अनेक प्रयोग सांगत खासगी इंग्रजी शाळांना तोंड देण्यासाठी आपल्या मुलांना परकीय भाषा शिक्षणाचे महत्त्व सांगितले आहे. थोड्याशा परिश्रमाने आपली मुले इंग्रजीसारखी भाषा कशी शिकतील, त्यासाठी काय प्रयत्न अपेक्षित आहेत, हे सुचवले आहे. सागर मोरे यांनी विद्यार्थांच्या नजरेतून शिक्षकांनी जग पाहण्याची आवश्यकता असल्याचे सांगतिले आहे. त्यासाठी शिक्षक निरंतर शिकणारा हवा. त्याचे वाचन चतुरस्र हवे. तो स्वप्रज्ञ असावा. त्याला स्वत:ची दृष्टी असावी. स्वत:ची मते हवीत. त्याबरोबर त्याचे चारित्र्य सदाचारी, सदाशयी हवे- असे सांगत आता अभ्यासक्रम पारंपरिक पद्धतीने शिकवण्याचे दिवस संपले असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची गरजही त्यांनी अधोरेखित केली आहे.

ज्योती चौगले आपल्या कल्पनेतील शिक्षण सांगताना कृतिशील स्वयंशिक्षणाचे महत्त्व सांगतात. मुले अनेक गोष्टी करून पाहतात, स्वत: अनुभव घेतात; पण हे सारे शाळेच्या चार भिंतींत अशक्य असल्याची खंत त्या व्यक्त करतात. त्यासाठी शाळेबाहेरच्या आणि कौशल्यविकासाच्या शिक्षणाची गरज त्या अधोरेखित करतात. तर भगवान मुंढे आपल्या कल्पनेतील शाळेत परिसरस्वच्छता, परसबाग, सूतकताई, स्वयंपाक, समाजसेवा, कार्यानुभव या उपक्रमांना महत्त्व देतात. त्यांना केवळ पुस्तकी शिक्षण नको आहे. हे करत त्यांना चुकीचे इंग्रजी शिकवणाऱ्या खासगी इंग्रजी शाळांशी सकारात्मक स्पर्धा निर्माण करायची आहे. आपले विद्यार्थी चंगळवादाला बळी पडू नयेत, याची त्यांना काळजी घ्यायची आहे. नितीन देसाई यांनाही असेच काही प्रयोग करायचे आहेत. त्यासाठी प्रसंगी पाठ्यपुस्तके गुंडाळून ठेवण्याचे धाडस दाखवण्याची त्यांची तयारी आहे. त्यांना गोष्टी, गाणी, नाटके, चित्रपटांची रेलचेल वर्गात हवी आहे. मुलांचा गळून पडलेला ‘श्रवण’ हा टप्पा त्यांना मजबूत करायचा आहे. देसार्इंसमोर लीलाताई पाटील यांच्या शाळा आदर्श शिक्षणाचे मॉडेल म्हणून आहेत.

नव्या स्पर्धेच्या युगात ताणतणावांना दूर करण्यासाठी शाळांमध्ये वाचनसंस्कृतीची रुजवात करण्याचे स्वप्न संजय शिंदे बघताहेत. त्यासाठी विद्यार्थांना ते ‘एक तास वाचनासाठी’ हा उपक्रम राबण्याची कल्पना सांगताहेत. आज विद्यार्थ्यांपेक्षा पालक तणावाखाली आहेत. त्यांच्यासाठी ते वाचनालयात पालक विभाग कल्पिताहेत. त्यांच्या आदर्श वाचनालयात शिक्षक, पालक आणि विद्यार्थी असे विभाग असतील. तर, कृष्णा कोटकर हे गुणांची सूज व फुगवटा कमी करण्यासाठी काही कल्पना सांगताहेत. त्यासाठी ‘घोका आणि ओका’ आणि खासगी क्लास प्रवृत्तीवर ते नेमकेपणाने भाष्य करतात. मुलांच्या सर्जनशीलतेला आणि मानसिकतेला ते विशेष महत्त्व देताहेत. शेवटच्या निबंधात विठ्ठल कोळीही मुलांच्या मेंदूशी मैत्री करण्याची भन्नाट कल्पना सांगताहेत. ते राजर्षी शाहू आणि साने गुरुजींच्या स्वप्नातील आनंददायी विद्यार्थी घडवू इच्छिताहेत.

प्रस्तुत पुस्तकाच्या दुसऱ्या भागात पुस्तकात समाविष्ट न केलेल्या निबंधावर संपादकांनी दीर्घ चर्चा केली आहे. त्यामध्ये शिक्षण हे व्यक्तीला सुजाण नागरिक बनवण्यासाठी आणि जात, धर्म, पंथ, लिंग भेद, अज्ञान, अंधश्रद्धांपासून दूर ठेवण्यासाठी दिले पाहिजे, अशा कल्पना सांगितल्या आहेत. शिक्षणामुळे आत्मविश्वास वाढतो. माणूस जीवनातील समस्यांना निर्भयपणे तोंड देतो. श्रमाला प्रतिष्ठा देतो. विवेकी बनतो. त्यासाठी योग्य ते प्रयोग करण्याची आवश्यकता येथे चर्चेत घेतली आहे. उर्वरित निबंधांची सांगोपांग चर्चा मेंगाणे यांनी केली असून शिक्षक, विद्यार्थी, पालक, शिक्षण, तंत्रज्ञान, प्रशासन, विद्यार्थी मूल्यमापन प्रक्रिया, मानवी मूल्ये, राष्ट्रपुरुषांचे विचार अशा अनेक गोष्टी केंद्रवर्ती ठेवून लिहिलेल्या निबंधांची केलेली सविस्तर चर्चा मुळातून वाचली पाहिजे.

एकूणच हे पुस्तक प्राथमिक शिक्षणाच्या- पर्यायाने देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी धडपडणाऱ्या शिक्षकांच्या माफक अपेक्षांचे, त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांचेच संकलन आहे. या शिक्षकांची स्वप्ने सत्यात आणण्यासाठी पैशांपेक्षा इच्छाशक्तीची गरज आहे. त्यांनी मांडलेल्या अपेक्षा अवास्तव नाहीत, तर त्या विद्यार्थ्यांचे हक्क आहेत. जी मुलं उद्या देशाचे भवितव्य ठरवणार आहेत, त्यांच्यासाठी इतक्या माफक अपेक्षा पूर्ण करू न शकणाऱ्या देशाचे भविष्य नक्कीच अंधकारमय असेल. त्यासाठी या पुस्तकातील शिक्षकांच्या अपेक्षा नवे शिक्षण धोरण ठरवताना, अभ्यासक्रम रचताना आणि अगदी शाळांसाठी नव्या इमारती बांधतानाही विचारात घ्याव्यात इतक्या महत्त्वाच्या आहेत. या पुस्तकाची निर्मिती विषयाला साजेशी असून, मुखपृष्ठ, आतील रेखाटने, मांडणी आणि पुठ्ठाबांधणी आतील मूल्ययुक्त लेखनाला साजेशी आहे. शिक्षणाबद्दल अनास्था बळावत चाललेल्या या दिवसांत शिक्षणक्षेत्रानेच नाही, तर संपूर्ण समाजाने अशा पुस्तकाचे मन:पूर्वक स्वागत केले पाहिजे.

आमच्या कल्पनेतील प्राथमिक शिक्षण

संपादक : दीपक मेंगाणे
दर्या प्रकाशन, पुणे
पृष्ठे : 155, किंमत : रु. 250

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नंदकुमार मोरे,  कोल्हापूर, महाराष्ट्र
nandkumarmore@gmail.com

मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके