डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

साखर आयुक्त शेखर गायकवाड साहेबांनी याप्रश्नी खूप सकारात्मक भूमिका घेतली आणि अनेक निर्णय तात्काळ लागू केले. पुढच्या सीझनपासून हे बदल नक्की दिसतील. शेखर गायकवाडसर यांच्या निर्णयांमुळं ऊसतोड करणाऱ्या  आया-बायांना माणूस म्हणून हक्क मिळतील. त्याचा  अहवालही शासनाला सादर झाला आहे आणि महामंडळ स्थापन करायचा निर्णयही झाला आहे.  खेबुडकर यांनी  दिलेली ही बातमी खूप आनंदाची आहे. हा लेख लिहिता  लिहिताच ती मिळाली. या निर्णयांची अंमलबजावणी मात्र तात्काळ व्हायला हवी.

शांतिनिकेतन म्हणजे माणसांचा खजिना. हजार तऱ्हेची  हजार माणसं. प्रत्येक जण भारी. प्रत्येक जण शांतिनिकेतन  प्रॉडक्ट. त्यातही आर. आर. आबांची बॅच म्हणजे अस्सल कार्यकर्त्यांची. उत्तम कांबळे याच बॅचचं प्रॉडक्ट. पत्रकार  म्हणून ते आमच्या भावकीचे, पण माणूस म्हणूनही  उत्तमराव लय भारी. शांतिनिकेतनमध्ये जेनवर बसून रात्रभर गप्पा मारणाऱ्या आणि परत भल्या पहाटे उठून घाम  निघेस्तोवर मॉर्निंग वॉक करायला लावणाऱ्या कांबळेसरांचा सहवास मिळाला. या भेटी माझ्यासाठी अलिबाबाच्या गुहेची किल्ली सापडल्यासारख्या होत्या,  आहेत. हा माणूस  म्हणजे सॉफ्टवेअर. जगाच्या दहा-बारा वर्षे पुढं असलेला. नव्याची प्रचंड जिज्ञासा आणि त्याची नाळ जुन्याशी जोडायची तडफड. ही दोन टोकं जोडायच्या निमित्तानं  त्यांच्या हातून जे-जे लिखाण झालं आहे,  ते मेंदू जागता  ठेवणारं तर आहेच,  पण काळजाला हात घालणारंसुध्दा आहे. त्यांच्या खणखणीत भाषणाचं लीड काढताना  तारांबळ उडणाऱ्या आमच्यासारख्यांना त्यांच्या लिखाणावर काही लिहिण्याइतका आवाका नाही, पण  हजार निमित्तानं हा माणूस ओळखायचा प्रयत्न सुरू आहे.

सतत भटकंती, माणसं जोडायचा मोठा आवाका,  प्रचंड  जनसंपर्क, वाचन- लेखनासाठी ऊर फुटेस्तोवर फिल्डवर्क  करायची तयारी आणि भेदक लिखाण करून त्याची जबाबदारी घ्यायची हिंमत या माणसात आहे. जग भाषणानं  बदलत नाही,  कविता लिहून बदलत नाही,  पुस्तकं लिहून  बदलत नाही. जग बदलण्यासाठी घाव घालावा लागतो असं  अण्णाभाऊ सांगून गेले. ‘जग बदल घालूनी घाव’ असं सांगत त्यांच्या विचारांचा हा वारसदार 15 जानेवारीला थेट  कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील दत्त साखर कारखान्याच्या माळावर, ऊसतोड महिलांच्या पालासमोर, हातात पेन घेऊन उभा होता. दुसऱ्या हातात पुस्तक होतं- कोयत्यावरचं कोक.  मकरसंक्रांत होती. पाच वाजले होते. आम्ही दत्त  कारखान्यावर चेअरमन गणपतरावदादांच्या केबिनमध्ये  जमलो होतो. सोबत शांतिनिकेतनचे गौतम पाटील होते. मोहन पाटील, नीलम माणगावे, बाळ बाबर होते.  मुलखावेगळा फोटोग्राफर आप्पा चौगुले अचानकच भेटला  इथं. गप्पांना ऊत आला. वसंतदादा, सा. रे. पॉटील यांच्या  आठवणी निघाल्या. मग सारी जण मिळून ऊसतोड्यांच्या पालावर जायला निघालो. तिकडं का जायचं समजेना. चौकशी केली तर मुळाशी उत्तम कांबळेच असल्याचं समजलं. या बहाद्दर लेखकानं आपल्या पुस्तकाचं प्रकाशन  थेट ऊसतोड मजुरांच्या गाडी अड्ड्यावर आणि थेट ऊसतोड  करणाऱ्या एका बाईच्या हस्तेच करायचं ठरवलं होतं. एकदा  त्यांनी ठरवलं की संपलं. सारी तयारी झाली होती आणि  गाड्या बाहेर पडल्या होत्या. दत्त कारखाना परिसर म्हणजे  केरळचा भास. नारळाच्या बागाच बागा. हजार झाडांनी  हिरवागार झालेला हा परिसर कारखान्याचा वाटतच नाही. गाड्या कारखाना सोडून मागच्या बाजूला वळल्या.  कच्च्या रस्त्यानं वळणं घेत त्या पालावर आल्या.  

दिवस कलत होता. आपल्या मळवटात गुलाल कुंकू भरलेल्या आया-बाया पालात बसून पोळ्या भाजत होत्या. कुणी गाणी म्हणत होत्या. बापय माणसं नुकतीच टेकली  होती. पोरं किंचाळत होती. बैलं रवंथ करत बसली होती.  दादा आले दादा आले म्हणत कार्यकर्ते गोळा झाले. खुर्च्या  लावल्या गेल्या. माईकवर हॅलोहॅलो करून चेक करणं सुरू झालं. आया-बाया बाहेर डोकावायला लागल्या. पोरं गप  झाली. माणसं खुर्च्यावर येऊन बसायला लागली. जिल्हा  महिला आणि बालविकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी माईक ताब्यात घेतला आणि आया-बायांना हाक दिली. बायांनो,  झालं असलं तर या लवकर. तुमच्यासाठीच  थांबलाय कार्यक्रम... तशा आया-बाया यायला लागल्या.  दादांनी पुरुषांना खुर्च्या सोडून मागं जायला सांगितलं आणि  त्यांच्या जागी बायकांना बसायला सांगितलं,  तसं बाया  जाम खूश झाल्या. सारे पाहुणे खुर्च्यांवर बसले. मधली दादांजवळची खुर्ची रिकामीच होती. माझं लक्ष तिथंच. इथं  कोण येणार आहे? आणि ती आली. सौ. देवशला रोहिदास घुगे. ऊसतोड  करणारी बाई. साधी,  सरळ पण करारी डोळ्याची. चार बुकं  शिकलेली. धाडसी. आपल्यासोबत खुर्चीवर कोण माणसं  बसली आहेत हे तिला माहीत नव्हतं असं नाही,  पण ना  घाबरणं ना दचकणं. ना खाली बघणं ना नर्व्हस होणं.  देवशला प्रचंड कॉन्फिडन्सनं बसली होती. दादांसोबत बोलत होती. उत्तम कांबळेंच्या सवालांना उत्तरं देत होती.  देवशलाच्याच हस्ते होणार होतं पुस्तक प्रकाशन.  

उसाच्या पाल्यात बांधून आणलेलं पुस्तक देवशलानं  हातात घेतलं. तेव्हा तिच्या हातात कोयता होता. त्यानं  पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि मग तिच्या हातातला  कोयता काढून घेत कांबळेसरांनी स्वत:चा पेन तिच्या हातात  दिला. त्यानंतर देवशला जे काही बोलली ते अंगावर काटा  आणणारं होतं. आपणाला वाटतं, माणूस शिकला म्हणजे लय शाणा झाला. पण अशा शाण्यांच्या कानाखाली  वाजवणारी देवशला मी बघत होतो. ती खरं बोलत होती.  मनातलं बोलत होती. मनमोकळं बोलत होती.  आयाबायांचं आणि आपल्या पोराठोरांचं बोलत होती. ती  कारखानदारीवर बोलत होती. पिळवल्या जाणाऱ्या ऊसांवर आणि माणसांवर बोलत होती. मध्येच गोड गळ्यानं गाणं  म्हणत होती आणि धार लावल्या शब्दांनी जाब पण विचारत होती. ‘‘या सायेबांनी जे काय लिवलंय पुस्तक ते  आपल्यासाठीच हाये. आपुन ऊस तोडतो यावरती सायेबांनी  पुस्तक लिवलं. आपल्या ज्या काय अवस्था हुत्यात  त्यावरती लिवलंय. आपून लहान बाळ घेऊन पाल्यात  जातो. त्याला ऊसाच्या पाल्यावर कुठंबी टाकतो. ते रडत  असतं,  पर आपुन ते रडलं तरी पहात न्हाई. कारण आपली  परिस्थिती नाजुक असती. आपुन पोटासाठी ऊसाच्या  फडात आलेलो असतो. पर बायानो,  आपली पोरंबी शिकु  शकतेत. हितं दत्त कारखान्यावर सायेबानी पोरांसाठी साळा  चालवली हाय तर मनानं,  हैसतीनं आपलं बाळ तुमी साळत  पाठवा. काय कराचं माझ्या बाळानं शिकुन ?  ते कामाला जाईल असं चिन्हं नसाय पायजे. आपुनबी घर सोडून  आलेलो असतो, तसं पोराला घर सोडून साळंत घाला. पुस्तक लिवणाऱ्या सायेबांना सांगायचाय की,  तुमी आमच्यासाठी येवडं केलंत तर मी पाच मिनीटं तुमच्यासाठी उभा रायलं तर काय बिघडलं ?  मी उभा राहणार...’’ आणि मग उत्तम कांबळे बोलले. नेहमीसारखं. बंदुकीच्या गोळीसारखं. ‘‘आपल्याला अजून कोक म्हणजे काय हेसुध्दा माहित  नाही. कोक म्हणजे गर्भाशयाची पिशवी. नाशिकला  सकाळी-सकाळी दोघे भाऊ-बहीण माझ्या घरी आले  होते. भाऊ म्हणाला, बहिणीचा कोक काढायचाय. कुणी  वळकीचं डॉक्टर असतील तर सांगा स्वस्तातलं. मी म्हंटलं, का काढायचा कोक?  तर म्हणाला, ‘आवो, हिला तीन पोरं  हायती अगोदरची. आता परत पाळी आली तर चार दिसाचं  खाडं हुतं ना कामाचं. चार दिस रोजगार बुडतो. असं चार  चार दिस करत सहा महिन्याचं अठरा वीस हजार रुपये झाले सायेब. असं चाललं तर मुकादमाकडची उचल कशी  फेडायची आमी?  व्याज तर वाढत चाललं नुसतं. किती  दिस हे कोक छळणार अजून? ते काढूनच टाकलं एकदाचं तर रोजगार तरी भेटंल.’  बहीण खाली मान घालून बसली  होती. म्हणाली,  ‘आमच्यातल्या लय बायकांनी काढून  टाकला ना कोक. काय करायचं ठिवून?...’ माझ्या अंगावर काटा आला. मी म्हंटलं,  कुठं केलं हे सगळं ? कुणी  केलं? तर म्हणाले, ‘दिसल त्या मार्गानं करत्यात बायका. परवडायला बी पायजे की... दोघं बोलत होती. ते ऐकूनच  मन सुन्न होत होतं. काही सुचेचना. अस्वस्थता वाढायला  लागली.

मग यावर मी सविस्तर लेख लिहिला. त्यावर मग  शासनानं कमिटी नेमली. सरकारी आकडा बाहेर आला. तो  होता 16 हजार. सरकारच्या आकडेवारीनुसार तब्बल 16 हजार बायकांनी कोक काढून फेकला होता. पण मला खात्री  आहे की,  हा आकडा 70 हजाराच्या घरात असणार. सरकारनं हुकूम काढला. सरकारला विचारल्याशिवाय कोक  काढायचा नाही.  सरकारी नोकरीत बायका असतात त्यांना बाळंतपणाची सहा सहा महिने रजा मिळते. जो बाळंत होत नाही त्या तिच्या नवऱ्याला पण रजा मिळते. त्या बायकांचा आणि ऊसतोडवाल्या बायकांचा कोक वेगळा आहे का? ऊनवारा- पाऊस सोसून या बायका बाळंत होतात. कितीतरी बायका ऊसाच्या फडात बाळंत होतात. कर्जासाठी  बायकांना गर्भाशयाची पिशवी काढायची वेळ येते. त्याला हजारापासून सत्तर हजारापर्यंतचे दर सुरू आहेत. कितीतरी  बायका यात दगावल्या. भाकरी बुडू नये म्हणून बायकांना   गर्भाशय काढून जीवानीशी जायची वेळ येत असेल तर हा समाज सगळ्यात नालायक, विद्रूप, कुरुप समाज आहे.  पोटासाठी त्यांना रजा पण घेता येत नाही. रजा राहिली, त्यांना किमान मासिक पाळीच्या काळातला चार दिवसांचा  घरपोच पगार तरी द्यावा अशी आमची सरकारकडं पहिली  मागणी आहे. यासाठी मंत्र्यांना पत्रे पाठवणार आहे.  पाठपुरावा करणार आहे. पुढच्याच महिन्यात बीडमध्ये या मागणीसाठी मोठी सभा घेणार आहे. घाव घालूनच  व्यवस्था बदलायची वेळ आली आहे.’’ शांतिनिकेतन लोकविद्यापीठाचे संचालक गौतमभाऊ  पाटील आणि दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतरावदादा  पाटील या दोघांनीही ‘या मागणीसाठी आम्ही सारे आपल्यासोबत आहोत’ असा शब्द दिला. ऊसतोड  कामगारांसाठी काम करणाऱ्या दादा काळे यांच्यासारख्या  कार्यकर्त्यांना बळ आलं. आया-बायांनी कोयता बाजूला ठेवून तिळगुळ वाटायला सुरुवात केली. कार्यक्रम संपला.  

दोन दिवसांनी अचानक विधान परिषद उपसभापतींचे सचिव रविंद्र खेबुडकर यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं, विधानपरिषदेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना एकनाथ शिंदेसाहेबांनी ऊसतोड महिलांचे प्रश्न आणि त्यांचे गर्भाशय  काढण्यासंदर्भात चौकशीसाठी एक समिती नेमली होती. आमदार नीलम गोऱ्हे या समितीच्या अध्यक्षा आहेत. या समितीनं खूप सभा घेतल्या. सोबत मी होतो. पालावरच्या ऊसतोड महिलांची जिंदगी पाहून खूप वाईट वाटलं. साखर आयुक्त शेखर गायकवाड साहेबांनी याप्रश्नी खूप सकारात्मक भूमिका घेतली आणि अनेक निर्णय तात्काळ लागू केले. पुढच्या सीझनपासून हे बदल नक्की दिसतील. शेखर गायकवाडसर यांच्या निर्णयांमुळं ऊसतोड करणाऱ्या  आया-बायांना माणूस म्हणून हक्क मिळतील. त्याचा अहवालही शासनाला सादर झाला आहे आणि महामंडळ स्थापन करायचा निर्णयही झाला आहे. खेबुडकर यांनी  दिलेली ही बातमी खूप आनंदाची आहे. हा लेख लिहिता  लिहिताच ती मिळाली. या निर्णयांची अंमलबजावणी मात्र  तात्काळ व्हायला हवी.

Tags: नंदू गुरव ऊसतोड कामगार nandu gurav weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात