डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

मी विचारांचा ठोकळेबाजपणा मानत नाही...

(मराठीतील विख्यात समीक्षक, विचारवंत तथा वक्ते नरहर कुरुंदकर यांची 1978 मध्ये त्यांचे विद्यार्थी जगदीश कदम यांनी घेतलेली मुलाखत 15 जुलै या त्यांच्या 88 व्या जन्मदिनाचे औचित्य साधून देत आहोत )

 

प्रश्न - सर,  लग्न-मुंज वगैरे अशा प्रकारच्या विधींवर आपला विश्वास आहे का?

- मी एका धर्मश्रद्ध घराण्यात जन्माला आलो. जुन्या काळातली सगळीच माणसं धर्मश्रद्ध आहेत. त्यामध्ये आमचे सगळे ज्येष्ठ नातेवाईक आहेत. आई,  आजोबा,  काका,  मामा हे सगळे धार्मिक आहेत. अशा धार्मिक वातावरणात मी जन्माला आलो. पहिले संस्कार धर्माचे. त्यामुळे देव,  देवपूजा,  अर्चना,  नवससायास असे सर्व धार्मिक संस्कार माझ्यावर लहानपणापासून झालेले आहेत. त्या संस्कारांतच मी वाढलो. जोपर्यंत माणसाचं व्यक्तिमत्त्व त्यांच्या अभ्यासातून-चिंतनातून बनत नाही, तोपर्यंत त्याचं मत बनत नाही. मी लहानपणी धार्मिक होतो. देवावर श्रद्धा होती. वयाच्या 18 व्या वर्षी हा बदल व्हायला सुरुवात झाली. मी व्यक्ती या दृष्टीने 18 व्या वर्षी अतिशय प्रभावित झालो ते भालचंद्रमहाराज कहाळेकर यांच्यामुळे. आणि पुस्तकाच्या दृष्टीने अत्यंत प्रभावित झालो ते लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या ‘जडवाद’ या पुस्तकामुळे.

प्रश्न - नास्तिक म्हणून आपल्या व्यक्तिमत्त्वाची घडण कशी झाली?

- आधी सांगितल्याप्रमाणे या काळात मी पुष्कळ वाचत होतो. तसा माझ्या वाचनाचा वेग फार मोठा होता. रामायण,  महाभारत आणि भागवत हे तीनही ग्रंथ मी वयाच्या नवव्या वर्षी वाचलेले आहेत. ह.ना. आपटे यांच्या सगळ्या कादंबऱ्या नवव्या वर्षाअगोदर वाचलेल्या होत्या. हडप,  नाथमाधव यांच्या कादंबऱ्यासुद्धा याच काळात वाचल्या. तेव्हा वाचनाचा वेग भरपूर होता. चर्चाही पुष्कळ करीत होतो. 18 व्या वर्षापर्यंत भरपूर वाचन. पण हे शब्दज्ञान. त्या शब्दज्ञानामुळे संबंध जीवननिष्ठा, व्यक्तिमत्त्व बनायला सुरुवात झाली. याचा आरंभ वयाच्या अठराव्या वर्षाच्या सुरुवातीला झाला. त्यानंतर मी जडवादी झालो आणि नंतर नास्तिक झालो. स्नान शिल्लक राहिलं,  संध्या संपली.

प्रश्न - सर, आपला धर्म वगैरे गोष्टींवर विश्वास आहे का?

- तेव्हापासूनच माझा धर्मावर विश्वास नाही. आजही नाही. मी स्वत: होताहोईतो धर्मकृत्य टाळतो. पण चार लोकांच्या आग्रहाखातर एखादे वेळी सहभागी होतो. फक्त हे सांगून सहभागी होतो की, यापैकी कशावरही माझा विश्वास नाही. कारण जे अस्तित्वात नाही, त्याच्याशी मला शत्रुत्व करता येत नाही. म्हणून धर्म हा माझ्यासाठी चेष्टेचा,  करमणुकीचा,  अभ्यासाचा विषय आहे; परंतु तो श्रद्धेचा विषय नाही. भोवतालच्या नातेवाइकांच्या मात्र हा श्रद्धेचा विषय आहे.

माझा धर्मावर विश्वास नाही, ही गोष्ट जे माझ्या धर्माचे नाहीत त्यांना आवडते; पण त्यांच्याही धर्मावर माझा कवडीचा विश्वास नाही, हे माझे म्हणणे त्यांना आवडत नाही. माझा धर्मावर विश्वास नाही म्हणजे, जगातल्या कोणत्याच धर्मावर विश्वास नाही. भोवतालच्या लोकांना जगातील कोणत्या तरी एका धर्माचा अभिमान असतो. उरलेल्या धर्मांना ते शिव्या देतात. त्यामुळे कोणत्याही धर्मावर श्रद्धा असणाऱ्या माणसाशी माझी मनोवृत्ती जुळत नाही.

प्रश्न - सर, आपल्या शिक्षणाचा प्रवास कसा झाला?

- मी स्वत: हैदराबाद मुक्ती-आंदोलनात सहभागी झालो होतो. त्यामुळे माझ्या शिक्षणाची सगळी गाडी रुळावरून घसरली होती. 1947 ला मॅट्रिक झालो, 1957 ला इंटर झालो. या उद्योगामध्ये आयुष्याची आठ वर्षे गमावलेली आहेत. ती गमावलेली आहेत म्हणजे, मी नोकरीला लागू शकलो नाही. पण या कालखंडामध्ये नानाविध विषयांचा अभ्यास चालू होता. माझे मामा नारायणराव नांदापूरकर हे मराठीचे प्रोफेसर. त्यामुळे त्यांच्या घरी मराठी समीक्षेची चर्चा चालू असे. त्या चर्चेमध्ये मी वयाच्या 10-11 व्या वर्षापासून सहभागी होत आलो. सामान्यपणे एम.ए.चे विद्यार्थी जितकं वाचतात त्यापेक्षा त्यांनी जास्त वाचावं, अशी अपेक्षा असते. एखाद्या विद्यार्थ्याकडून एम.ए.च्या पातळीवर त्यांनी काय वाचावं याची जी अपेक्षा असते, त्याच्यापेक्षा किती तरी पटीने जास्त वाचन माझं मॅट्रिकपूर्वी झालेलं होतं. त्यामुळे मी मॅट्रिकच्या परीक्षेला अजून बसलेलो नव्हतो, पण एम.ए. मराठीसाठी असणारे विद्यार्थी माझ्याशी चर्चा करीत असत. राजकारण,  इतिहास, वाड़मयीन चर्चेच्या आखाड्यामध्ये मी लहानपणापासूनच होतो. पुढे भालचंद्रमहाराज कहाळेकरांच्या घरी माझं जाणं येणं वाढलं. त्यामुळे तर अधिक चिकित्सकपणे आणि जागरूकपणे अभ्यास व्हायला सुरुवात झाली. ते स्वत: सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक होते. त्यामुळे थोडाफार अभ्यास तिथंही झाला. ज्या वेळी मी नांदेडला नोकरीला लागलो, त्या वेळी पदवीच्या दृष्टीनं मी मॅट्रिक्युलेट होतो; पण मला पगार मिडलचा मिळत असे. दरमहा 56 रुपये 7 आणे या पगारावर माझी नोकरी सुरू झाली. ही जरी व्यावहारिक बाजू असली, तरी त्याही वेळेला लोक मला विद्वान म्हणूनच ओळखत होते. नांदेडमध्ये 1956 पासून एम.ए.ला शिकवायला सुरुवात केली, तेव्हापासून मी मराठीच्या एम.ए.ला शिकवतोय.

प्रश्न - आपण ‘रिचर्ड्‌सची कलामीमांसा’ हे पुस्तक या काळात लिहिले. त्याची पार्श्वभूमी सांगाल का?

- याच काळात शिवाजी गवूळकर एम.ए. मराठीला बसले होते. मी त्यांना शिकवीत होतो. हे शिकवीत असताना अधून-मधून माझ्या बोलण्यात रिचर्ड्‌सचा उल्लेख येत असे. म्हणून गवूळकर असं म्हणाले की,  आपण मराठी वाचकांना रिचडर्‌सची ओळख करून देऊ. त्यामुळे रिचडर्‌सचं एक छोटं पुस्तक आम्ही घेतलं. तसं ते पुस्तक शब्दश: भाषांतर करायचं असेल तर 40-42 पानांचं होतं; पण ते पुस्तक समजावून सांगणं, त्यातल्या रिचडर्‌सच्या विचारांची समीक्षा करणं, त्याचं सामर्थ्य आणि मर्यादा दाखवणं हे सगळं थोडक्यात करण्यासाठी आम्हाला 184 पानं लागली. गवूळकरांचा उत्साह व श्रम आणि माझ्या चर्चा यातून ‘रिचर्ड्‌सची कलामीमांसा’ हे पुस्तक 1962 मध्ये प्रकाशित झालं. ते प्रकाशित होण्यापूर्वी प्रेसमध्ये दोन वर्षे पडून होतं. त्यापूर्वी ती लेखमाला ‘प्रतिष्ठान’मधून आली होती. त्याच्याही पूर्वी ते मी गवूळकरांना समजावून सांगितलं होतं. त्यापूर्वी ते मी अभ्यासलं होतं. म्हणून अगदी आरंभीच्या काळात मी सौंदर्यशास्त्रावर चर्चा करीत होतो.

प्रश्न - सर, आपण नांदेडला स्थायिक झाल्यानंतरचा अनुभव कसा होता?

- नांदेडला नोकरीसाठी आलो, त्या वेळेला विद्वान आणि वक्ता अशी थोडीफार कीर्ती मला मिळालेली होती. त्यामुळे मी मॅट्रिक्युलेट असलो आणि वयाने लहान असलो तरी स.रा. गाडगीळ, सुरेंद्र बारलिंगे, के.रं. शिरवाडकर ही सगळी मंडळी चट्‌कन्‌ माझे मित्र झाली. हे सगळे बरोबरीच्या नात्याने माझ्याशी वागत. त्यामुळे त्या वेळी फारसे आश्चर्य वाटले नाही. बारलिंगे तर इतके दोस्त होते की, त्या वेळी मी होळीवर राहत असे. दर एक-दोन दिवसाआड गप्पा मारण्यासाठी ते होळीवर येत. आणि रात्री अकरा वाजेपर्यंत गप्पा मारत बसत. तेव्हा मला वयाची गरज आणि डिग्रीची अडचण पडली नाही. आणि, या नांदेडच्या लोकांचं एक फार चांगलं आहे. ते म्हणजे, एकदा भाळले म्हणजे भाळले. एकदा डोक्यावर घेऊन नाचायला लागले, म्हणजे त्यांच्या कौतुकाला सीमा नसते. मग त्याचे वय, पदवी,  पगार पाहत नाहीत. त्या दृष्टीनं काही मजेशीर गोष्टी सांगण्यासारख्या आहेत.

मी इथं नोकरीला आलो 1955 च्या जुलैअखेर. ऑगस्टमध्ये माझी आणि बारलिंगेंची ओळख झाली. ऑक्टोबर महिन्यात आज जिथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तिथे पूर्वी रिकामा त्रिकोण होता. तिथे रात्री दहा ते बारा वाजेपर्यंत फुटाणे खात मी आणि बारलिंगे सडकेवर चर्चा करीत बसायचो. माझ्याशी बोलताना आपण सडकेवर बसून गप्पा कशा माराव्यात याचा प्रिन्सिपॉल असलेल्या बारलिंग्यांना कधी संकोच वाटला नाही. मी माझ्या शाळेमधला ज्युनिअर, मॅट्रिक्युलेट टीचर. वयानं लहान. आमच्या शाळेमध्ये अधिकारानं सर्वांत मोठे मुख्याध्यापक वि.द. सर्जे होते. आणि वयानं सर्वांत मोठे कवी म्हणून प्रसिद्ध असे दे.ल. महाजन होते. पण हे दोघेही आमच्याशी नुसत्या मैत्रीनेच वागत नव्हते, तर सन्माननीय मित्र म्हणून वागत होते. एखाद्या सभेमध्ये जर आम्ही तिघे जण बरोबर गेलो तर मला खुर्ची देऊन मी खुर्चीवर बसल्याशिवाय माझे मुख्याध्यापक बसत नसत. हा सगळा कौतुकाचा भाग आहे. अशा कौतुकाच्या वातावरणात मी वाढलो.

प्रश्न - सर, आपल्याकडे कलावाद आणि जीवनवाद खूप गाजला. त्यासंबंधी आपणास काय वाटते?

- कलावादाची जी पहिली भूमिका आहे, ती ही की- कलांकडे उपयोगाच्या भूमिकेतून पाहू नये. आणि दुसरी भूमिका ही आहे की- कलांच्या बाबतीत अनुभव घेण्याचा आणि व्यक्त होण्याचा कलावंताचा जो हक्क आहे, तो धोक्यात येऊ नये. कलावंताचं स्वातंत्र्य धोक्यात येऊ नये. आता ह्या ज्या कलावादाच्या प्रमुख दोन भूमिका आहेत, त्या मला पटतात. त्या मला मान्यही आहेत. पण याच्या पलीकडे जाऊन ज्या वेळेला कलावादी मंडळी कलांचा आणि जीवनाचा काहीही संबंध नाही, असं सांगायला लागतात; ते मला पटत नाही. कारण मला असं जाणवतं की, कलांची निर्मिती असो, कलांचा अभ्यास असो किंवा कलांचा आस्वाद असो- हा नेहमी जीवनाच्या संदर्भात घ्यावा लागतो. हा जो जीवनाच्या संदर्भात सगळा विचार करावा लागतो, ते कलावादी मान्य करीत नाहीत. या ठिकाणी माझा त्यांना विरोध आहे. आणि मी काही कला हे प्रचाराचं साधन मानत नाही. प्रचार करण्यात यश येतं ती श्रेष्ठ कलाकृती, असंही मानत नाही. यामुळे पुष्कळ वेळेला जीवनवादी मंडळींना असं वाटतं की, मी जीवनवादी नाही. कलाक्षेत्राची स्वायत्तता, कलावंताचं स्वातंत्र्य आणि उपयोग मूल्यांचा आग्रह न धरणं या बाबी मान्य असणारा जीवनवादी मी आहे. म्हणून मी जीवनवादी असलो, तरी कलावंतांनी दुसऱ्या कोणाचं मार्गदर्शन करावं आणि आपल्या अनुभवांशी अप्रामाणिक राहावं, हे कबूल करणार नाही.

प्रश्न - संस्कृतमधील जुने काव्यशास्त्र आज फारसे उपयोगाचे नाही, असे आपणास वाटते का?

- संस्कृतमधलं जुनं काव्यशास्त्र हा अभ्यासाचा विषय असतो, श्रद्धेचा नाही. म्हणून जुनं काव्यशास्त्र मोठं निर्दोष आहे, असं मी समजत नाही; पण त्या काव्यशास्त्रात काही अर्थ नाही, असंही समजत नाही. त्यातही काही महत्त्वाच्या बाबी आहेत. प्रश्न कुठं येतो? हे जुनं काव्यशास्त्र नव्या साहित्याच्या अभ्यासाला उपयोगी पडेल काय? मला स्वत:ला असं वाटतं की, हे जुनं काव्यशास्त्र नव्या वाङ़्‌मयाच्या अभ्यासाला उपयोगी पडणार नाहीच, पण जुन्या वाङ्‌मयाच्या बाबतीतसुद्धा त्याच्या संपूर्ण आकलनाला हे जुनं काव्यशास्त्र अपुरं पडतं. म्हणून वाङ्‌मय नवं असो, जुनं असो- कोणत्याही वाङ़्‌मयाच्या अभ्यासाला जुनं काव्यशास्त्र अपूर्ण आहे, हे लक्षात घेऊन त्याचा ऐतिहासिक अभ्यास केला पाहिजे.

प्रश्न - सर, आपण समाजवादी विचारसरणीचे असून मार्क्सवादी तत्त्वज्ञान स्वीकारता; हे कसे?

- मी समाजवादी विचारसरणीचा आहे, ही गोष्ट खरी आहे. शिवाय मी मोठ्या प्रमाणात मार्क्सच्या विचाराने प्रभावित झालेलो आहे. त्यामुळे मी स्वत:ला मार्क्सवादीही मानतो, ही गोष्ट खरी आहे. पण मी व्यक्तीचं स्वातंत्र्य मानतो आणि जीवनाची विविधताही मानतो. त्यामुळे माझी तात्त्विक भूमिका मार्क्सवादी असते. त्याबाबतीत कुठलाही साचेबंद ठोकळेपणा मी पत्करलेला नाही. आणि म्हणूनच ठोकळेबाजपणा नसलेला मार्क्सवादी असं मी स्वत:ला मानतो. मला असं वाटतं की, मार्क्सवाद हे माणसांच्या स्वातंत्र्याचं तत्त्वज्ञान आहे, गुलामीचं नाही.

मुलाखत: डॉ. जगदीश कदम, नांदेड

 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नरहर कुरुंदकर

(१५ जुलैइ.स. १९३२ - १० फेब्रुवारीइ.स. १९८२) मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक, समाजचिंतक आणि  प्रभावी वक्ते होते.प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालय, नांदेड‎ येथे शिक्षक. नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स कॉलेज, नांदेड येथे प्राचार्य होते..


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात